श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ८८ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- हाकेच्या अंतरावर आलेल्या प्रकाशन समारंभाचा आनंद हिरावून घेणारी ही परिस्थिती निर्माण व्हायला निमित्त ठरलेली आमच्या जी. एम्. मॅडमची व्हिजीट मला त्या अस्वस्थतेत एखाद्या भयंकर संकटासारखीच वाटत राहिली! .. पण प्रत्यक्षात मात्र ती माझ्यासाठी ‘त्या’नेच घडवून आणलेली इष्टापत्तीच ठरणार होती हे मला कुठे माहित होतं? )
याच आमच्या जी. एम्. मॅडम या आधी कांही वर्षांपूर्वी इथे या झोनल ऑफिसलाच डी. जी. एम्. म्हणून कार्यरत होत्या आणि इथूनच जी. एम्. म्हणून प्रमोट झाल्यावर त्यांचं पोस्टींग सेंट्रल ऑफिसला झालेलं होतं. अर्थात या गोष्टीला चारएक वर्षं उलटून गेलेली असली तरी मी तेव्हा कोल्हापूर रिजनमधे असल्याने अनेकदा त्यांची रिजनल ऑफिसला व्हिजीट व्हायची. तेव्हा होणाऱ्या ब्रॅंच मॅनेजर्स मिटिंग्जमुळे आणि एरवीही ब्रॅचेस् मधील महत्त्वपूर्ण मॅटर्ससंबंधात ब्रॅंचमॅनेजर्सशी त्यांचा अधूनमधून थेट संपर्कही असल्याने आमच्यापैकी अनेकांना त्या व्यक्तिगत पातळीवर ओळखायच्याही. त्यामुळेच त्यांचा अॅप्रोच, स्वभाव आणि त्यांची कामाची पध्दत आम्हाला नवीन नव्हती. त्या एवढ्या स्ट्रीक्ट होत्या की आमच्या ब्रँच व्हिजीटला त्या येणार असतील तेव्हा तर त्या येणार या कल्पनेचंच प्रचंड दडपण यायचं. पारशी माणसांचं वरवर फटकळ वाटणारं थेट बोलणं तरीही मनातल्या एका कोपऱ्यात ते जपत असलेलं मेणाचं मऊपण सुरुवातीची कांही वर्षे मी मुंबईत काम केल्याने जवळून अनुभवलेलं होतं. मॅडमसुध्दा छोट्या छोट्या कारणानेही खूप चिडायच्या, संतापाच्या भरात कांहीही बोलायच्या, त्यांचं तरबत्तर होत केलेलं फायरींग ऐकणाऱ्यासाठी चाबकाच्या फटक्यासारखंच असायचं. तरी त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो आणि राग उतरला कीं त्या लगेचच शांतही होतात हेही मला अनुभवाने माहित झालेलं होतं! त्यामुळे आणि यावेळी आमच्यामधे वखरेसाहेबांसारखा शाॅक अॅब्साॅर्बर असल्यानेही त्यांच्या यावेळच्या या आकस्मिक व्हिजीटचं मला फारसं दडपण वाटत नव्हतं. तरीही सगळं सुरळीत पार पडावं यासाठी मी प्रयत्नशील होतोच.
त्या आल्या आणि पाचेक मिनिटातच येथील आमच्यासारख्या फर्स्ट लाईन विभागप्रमुखांना वखरे साहेबांनी इंटरकॉम करून केबिनमधे बोलावून घेतलं. आम्ही सर्वजण आत पोचेपर्यंत आमचे डी. जी. एम्. श्री. वखरेसाहेब यांच्याबरोबर मॅडमची प्राथमिक चर्चा सुरूही झालेली होती. मॅडमनी आमच्याकडे ओझरता कटाक्ष टाकून आम्हाला बसायची खूण केली. पाठोपाठ सर्वांसाठी चहाही आला. चर्चेला अर्धविराम देत चहा घेता घेता त्यांनी आम्हा सर्वांची औपचारिक चौकशी करून आम्हाला निरोप दिला आणि मग त्यांच्या मीटिंगचं असणारं थोडंफार दडपडही त्याच क्षणी विरून गेलं. पण आम्ही सर्वजण केबिनचं दार ढकलून बाहेर पडणार एवढ्यांत त्यांच्या नेहमीच्या परिचित अशा दरडावणीच्या स्वरांत त्यांनी आम्हाला थांबायला सांगितलं आणि हाताने आत यायची खूण केली. केबिनमधलं तोवर नाॅर्मल वाटणारं वातावरण अचानक बदललं. वखरेसाहेब कांहीसे गंभीर होत काय झालं असावं याचा अंदाज घेत मॅडमकडे पहात राहिले.
” मैं सिटी और कॅंप ब्रॅंचको व्हिजीट करने जा रही हूॅं| थोडी देरमे वापस आऊंगी| तब बाद मे एकेक को देख लू़ंगी|.. ” काय होतंय आम्हाला समजेचना. कसं रिअॅक्ट व्हावं, काय बोलावं ते न समजून आम्ही एकमेकांकडे पहात राहिलो. आणि दुसऱ्याच क्षणी.. “तब तक एंजाॅय करोs.. ” म्हणत गंमत केल्यासारखं स्वत:वरच खूष होत त्या खळखळून हसत राहिल्या. आणि एकदम तो स्वीच आॅफ करून.. “देखो… मैं क्या कह रही थी.. ” म्हणत त्यांनी आपला मोर्चा वखरेसाहेबांकडे वळवला. आम्ही वळून जायला लागलो तेव्हा अतिशय सौम्य शब्दांत “बाद मे इन सबको दोपहरकी मिटिंग के बारेमे बता देना.. ” म्हणाल्या.
ते ऐकलं आणि त्या दुपारच्या मीटिंगचं दडपण सोबत घेऊनच आम्ही बाहेर पडलो. आपापल्या केबिनमधे आलो. मॅडमचा हा समोरच्याला कसलाच अंदाज बांधता न येणारा स्वभाव माझ्या परिचयाचा असला तरी मलाही थोडं दडपण जाणवू लागलं होतं ते कसलाच अजेंडा समोर नसताना मीटिंगमधे अचानक काय विचारलं जाईल याचंच. तेवढ्यांत इंटरकॉमची रिंग वाजली. फोनवर टेलिफोन ऑपरेटर बोलत होती.
” तुम्हा सर्वांसाठी साहेबांचा निरोप आहे. ते मॅडम बरोबर ब्रॅंच व्हिजिटसाठी बाहेर पडलेयत. तासाभरात दोघे परत येतील. त्यानंतर लगेचच सर्व डिपार्टमेंटल हेडस् सोबत मॅडमची लंच मीटिंग होईल आणि त्यांच्या टूर प्रोग्रॅम प्रमाणे त्या कोल्हापूर व्हिजीटसाठी निघतील. “
निरोप स्पष्ट होता. पण हातात मिटिंगची पूर्वतयारी करण्याइतका वेळही नव्हता. मीटिंगमधे जे प्रश्न विचारले जातील त्यांना स्वत:च्या अक्कलहुशारीने जमतील तेवढी समाधानकारक उत्तरं देत वेळ मारून न्यायची आणि त्या बोलतील ते ऐकून घ्यायची तयारी ठेवायची एवढंच माझ्या हातात होतं. तरीही क्षणाचाही वेळ न दवडता माझ्या डिपार्टमेंट संदर्भातल्या सर्व अद्ययावत माहितीच्या नोंदी मी भराभर आवश्यक त्या फाईल्स मागवून घेत माझ्या डायरीत नोंद करून घेतल्या आणि ‘आलिया भोगासी.. ‘ सादर व्हायला तयार झालो. तेवढ्यात घाईघाईने आलेला शिपाई माझ्या केबिनचं दार ढकलून आत येत वखरे साहेबांचा निरोप सांगून गडबडीने निघून गेला.
मॅडम आणि वखरेसाहेब ‘ब्रॅंच व्हिजीट’ आवरून परतीच्या वाटेवर होते आणि आम्हा सर्वांना दहा मिनिटांनी खाली पोर्चमधे येऊन थांबायचा तो निरोप होता! तिथून आम्हाला रिसिव्ह करून त्या दोघांच्या कार्समधूनच ते आम्हाला जवळच्याच हाॅटेलवर लंच मिटिंगसाठी घेऊन जाणार होते.
एखाद्या झंझावातासारख्या भिरभिरत राहिलेल्या या सगळ्या सकाळपासूनच्या घटनाक्रमात दोन दिवसांच्या हाकेच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या माझ्या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचं व्यवधान मीच त्याला दूर ढकलून दिलेलं असावं तसं मनाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात गुपचूप पडून राहिलेलं होतं..!
आम्ही सर्वजण ब्रिफकेस हातात घेऊन ठरल्याप्रमाणे पोर्चमधे येऊन उभे राहिलो. त्यानंतर पाचच मिनिटांत दोन्ही कार्स झोकदार वळण घेत आमच्याजवळ येऊन अलगद थांबल्या आणि आम्हाला आत घेऊन दुसऱ्याच क्षणी रस्त्यावरच्या गर्दीत मार्गस्थही झाल्या!
माझ्या हाकेची वाट पहात सकाळपासून मनात एका कोपऱ्यात निपचित पडून राहिलेलं प्रकाशन समारंभाचं ते व्यवधान मॅडमच्या यापूर्वी आमच्या कधीच अनुभवास न आलेल्या छान, आनंदी मूडमधल्या गप्पा सुरू होताच निर्माण झालेल्या निश्चिंतपणाच्या स्पर्शाने जाग आल्यासारखं उभारून वर आलं. मी क्षणभर विचलीत झालो खरा पण तरीही त्याला अलगद दूर करत मी स्वत:ला सावरलं.
ती लंच मिटींग अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सुरू झाली. मॅडमचा इतका आनंदी, प्रसन्न आणि मिष्किल मूड मी प्रथमच अनुभवत होतो. कसले प्रश्न नाहीत, उपदेशाचे डोस नाहीत, आरडाओरडा नाही, दमदाटी नाही… कामं, पेंडिंग मॅटर्स, टारगेटस् कश्शाकश्शाचे पुसटसेही उल्लेख नाहीत. मॅडमचं हे रूप मला अनोळखीच होतं. आजवरच्या मी अॅटेंड केलेल्या यापूर्वीच्या त्यांच्या असंख्य मिटींग्जमधला मॅडमचा थयथयाट आठवून तर या समोरच्या मॅडम म्हणजे त्यांचं मायावी रूपच असावं असंच वाटू लागलं. पण ते तसं नव्हतं. त्या त्याच होत्या! आज त्या प्रसन्नचित्त होत्या आणि कांहीशा हळव्याही झाल्या होत्या! त्याला कारणही तसंच होतं! त्या आता लवकरच दुसऱ्या एका राष्ट्रीयकृत बॅंकेच्या एम्. डी. पदाचा कार्यभार स्वीकारणार होत्या! हे सांगताना त्यांचा वरवर दिसणारा कडक आणि संतापीपणाचा मुखवटा आज त्यांच्याही नकळत गळून पडला होता! अर्थातच त्यामुळे त्या अतिशय मनापासून अगदी मोकळेपणाने बोलत होत्या!
बोलण्याच्या ओघात बॅंकिंग इंडस्ट्रीत येऊ घातलेल्या, संबंधित सर्वांवरच दूरगामी परिणाम करायला निमित्त ठरू शकणाऱ्या, आणि आमच्यासारख्या प्रत्येक स्टाफचं आयुष्य सावरू किंवा विस्कळीतही करू शकणाऱ्या अनपेक्षित अशा प्रचंड वादळाचं सूतोवाचही त्यांनी केलं आणि आम्ही सर्वजण सावध झालो!
मी त्यांचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत असताना त्यातलं गांभीर्य आणि त्याचं महत्त्व मला लगेच जाणवलं नव्हतं हे खरं पण हळूहळू माझ्या मनातल्या नकळत सुरू झालेल्या विचारचक्राला वेग द्यायला तेच निमित्त ठरणार होतं आणि लगेचच माझ्या उर्वरीत आयुष्यालाही एका अनोख्या वळणावर आणून उभं करणार होतं! !
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




