सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
इंद्रधनुष्य
☆ अध्यात्म आणि विस्मरण झालेल्या लोकांचे काळजीवाहू पाल्य – भाग १ – लेखिका : डॉ. पुष्पा घळसासी ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆
☆
हा विषय म्हणलं तर सोपा आहे म्हणलं तर फार कठीण. कारण अध्यात्म हा धार्मिक विषय नाही ती एक जीवनशैली सांगते. हिंदू हा सुद्धा धर्म नाही माणसांनी समाजात, निसर्गात, वातावरणात कसे वागावे म्हणजे आजच्या भाषेत आपली लाइफ स्टाईल कशी असावी हे सांगितले जाते. म्हणूनच कदाचित अध्यात्म हे हिंदू धर्मातील काही विशेष आहे असा गैरसमज समाजामध्ये रूढ झाला आहे. अध्यात्म हे कोणत्याही जाती, धर्माने अवलंबवlवे किंवा जोपासाव. त्यास भेदभाव नाही. मुळात अध्यात्म एका धर्माची, ज्ञातीची, समाजाची मक्तेदारी नाही. मग अध्यात्म म्हणजे आहे तरी काय? त्याचा विस्तार किती? आणि ते कोणते जीवनशैली माणसाला शिकवते? हा सहज प्रश्न पडतो.
अध्यात्म या शब्दाची फोड दोन प्रकारांनी करता येते.
१) आधी + आत्मा. म्हणजेच स्वतःच्या आत्म्याची ओळख आधी करून घेणे. आणि २)आद्य अधिक आत्मा. आद्य म्हणजे प्रथम. प्रथम आपण आपल्याला ओळखायला शिकले पाहिजे. (संदर्भ यूट्यूब)याचा अर्थ आधी स्वतःला ओळखा, आत्मशोध घ्या. मी कोण आहे म्हणजेच अर्थात मी ईश्वराचा अंश आहे. आपण एक माणूस म्हणून, ” मी” कसा आहे याचे उत्तर शोधा. ते उत्तर मिळाले की पुढे आपली आपल्याला सुधारणा करता येते. यातूनच आपण आपले आयुष्य नेमके कसे जगणार आहोत याची पूर्व रेषा मनामध्ये हळूहळू तयार होईल. त्यातूनच जीवन जगण्याचा उद्देश मनात ठसेल, लक्षात येईल. त्यामुळे भावभावनांबाबत स्थितप्रज्ञता येइल. निर्भय जीवन जगणे, आत्मसन्मानाने जगणे, लोकांप्रती नि:स्वार्थ सेवा आणि प्रेम, बंधुभाव तयार होऊन जीवनात सकारात्मक दृष्टी प्राप्त करून घेणे त्यातून आनंद मिळवणे आणि नैतिक मूल्यांचे पालन करणे हे फक्त माणसातील व्यवहारातच नसून संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे, अवघ्या चराचरावर अशी माया निर्माण करणे असे प्रगटीकरण माणसांमध्ये दिसून येईल.
आता प्रश्न असा की एवढे अध्यात्याबद्दल सांगण्याचे प्रयोजन काय? मुळात अध्यात्म म्हणजे काय हे आपल्याला समजल्याशिवाय आपण ज्येष्ठांची काळजी का, कशी घ्यायची याचा उलगडा होईल. अर्थात इथे अनेक जण असे असतील की ते आपल्या आई-वडिलांची उत्तम काळजी घेत आहेत तेही ” हा विषय लक्षात न घेता किंवा न समजता. म्हणजे खऱ्या अर्थाने ते ‘अध्यात्म ‘जगत आहेत. आपल्या घरातील विस्मरण झालेले लोक पूर्वी ”normal” होते. पण कालांतराने वाढत्या वयाबरोबर त्यांच्या मेंदूतील स्मरणाच्या पेशी काम करेनाशा झाल्या. अशा पेशी (हृदय मेंदू)यातील पुन्हा त्यांना पुनरुत्पादन नाही म्हणून त्यांचा उपयोग होत नाही व मेंदूचा तो भाग किंवा केंद्र कार्य करत नाही. एरवी त्या माणसाचे जगणे ”normal असते. पण थोड्या वेळापूर्वी केलेली किंवा झालेली गोष्ट त्यांना आठवत नाही. मग अशा लोकांचे ‘संगोपन ‘एखाद्या वर्षाच्या मुलासारखे करावे लागते म्हणजे अगदी निरागस मुलासारखी असतात. यावेळी ते लोक कसे वागतात हे तुम्हाला अनुभवाने माहीत झालेले आहे.
कोणत्या गोष्टीत काळजी घ्यायची याची उजळणी आपण घेऊया.
१) आहार – संगोपन करताना अगदी प्रथम विचार त्यांच्या आहाराचा येतो त्या लोकांना काहीच उद्योग नसल्याने सतत भूक लागली आहे किंवा चहा घ्यायचा राहिला आहे असे वाटत राहते आणि ते सतत खायला दे चहा दे म्हणत राहतात प्रथम प्रथम आपण त्यांना दोन-तीन वेळा चहा किंवा खायला देतो पण ते पचत नाही चहाने ऍसिडिटी वाढते मग याच्यावर उपाय काय तर सुरुवातीलाच खायला देताना कमी खायला द्यायचं आणि पुन्हा मागितलं की पुन्हा खायला देतो म्हणजे योग्य प्रमाणात अन्नसाठा त्यांच्या पोटात जाईल त्यांना अपचन होणार नाही तसेच चहाच चहा देताना सुद्धा कपबशी चिखली उचलायचीच नाही म्हणजे त्यांना सांगता येतं की बघा मगाशी तुम्ही चहा प्यायला की नाही अजून कप बशी सुद्धा उचलल्या नाहीत किंवा अर्धा अर्धा कप दोनदा चहा दिल्यानंतर त्यांचं समाधान होतं. त्यांचा आहार सकस, पौष्टिक पण पचनास हलका असा ठेवावा.
दुसरी गोष्ट ही माणसे एखादी गोष्ट मना विरुद्ध झाली तर चिडचिड करतात. प्रसंगी व्हायोlant होतात. त्यासाठी त्यांच्या मनामनाने घ्यावे लागते. त्यांच्यावर ओरडू नये किंवा तुम्हाला कसे कळत नाही हो? असे म्हणू नये कारण अशा वागण्याने ते आणखी चिडतात. म्हणून आपणच शांत रहायला हवे.
३) तुम्हाला अमुक गोष्ट आठवते आहे का? असे विचारून, त्यांच्या स्मरणशक्तीला ताण देऊन गोंधळात पाडू नये.
४) विस्मरण होणे हा गुन्हा नाही. म्हणून घरातल्या कार्यक्रमात किंवा कोणाला कोणी भेटायला आले तर त्यांना आपल्या खोलीत न पाठवता आपल्याबरोबर बसून घ्यावे. त्यांनीही त्या गप्पा ऐकाव्यात. पाहुण्यांना त्यांच्या आजाराची कल्पना द्यावी. खरं म्हणजे हा आजार नाही तर ती बौद्धिक पातळीवर एक स्टेज आहे. आणि अवघ्या घराला त्याचा सामना करावा लागतो.
५) कुणी कोरडी सहानुभूती आपल्याला किंवा त्या व्यक्तीला दाखवत असल्यास सौम्य शब्दात त्या व्यक्तीला थांबवावे.
६) घरातील व्यक्तीला अशी स्थिती असल्यास घरात प्रथम भीती, चिंता वाटते. म्हणजे करणाऱ्या माणसालाही आणि करून घेणाऱ्या माणसालाही. त्यातून असुरक्षितता येते. म्हणून अशी परिस्थिती हाताळताना जिभेवर खडीसाखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वागावे लागते. अध्यात्माने ही मन:शक्ती वाढते.
मग या आजारातून त्या व्यक्तीचे जीवन सुखकर आणि आपले सुकर होण्यासाठी काहीतरी वागण्यातील पथ्य पाळावी लागतील.
१) स्पर्श_स्पर्शातून न बोलता अनेक भावना व्यक्त होतात. पाठीवर हात ठेवला तर तो ‘आश्वासक’ स्पर्श असतो. डोक्यावरून गालावरून हात फिरवला तर प्रेमाची जाणीव होते. त्या व्यक्तीच्या झोपेच्या वेळी हातापायावरून हात फिरवल्यास मायेची ऊर्जा, ऊब जाणवते. माणूस स्पर्शासाठी भुकेला आहे. म्हणून आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा त्यांच्याजवळ बसून, हात हातात घेऊन किंवा पाठीवर ठेवून त्यांच्याशी बोलावे. ती माया त्यांना समजते. कदाचित पुढच्या दहा मिनिटात ते विसरतील. पण तो क्षण महत्त्वाचा असतो.
२) भाषा_ त्यांच्याशी ओरडा ओरडा करत न बोलता गोड भाषेत सावकाश बोलावे. या वयाच्या माणसांना ऐकू कमी येते आणि गडबडीने बोलल्यास त्यांना समजत नाही. मग ते चिडचिड करतात.
३) चेहऱ्यावरील भाव आपण त्यांच्याशी बोलत असताना आपल्या चेहऱ्यावर तसा भाव यावा. म्हणजे घरातील आनंदात आपल्याला सामील केले आहे हे त्यांना समजते. रागीट चेहरा करून बोलल्यास ते मनात खट्टू होतात आणि नकारात्मक भावना निर्माण होतात.
४) देहबोली _यांच्याशी बोलताना नॉर्मल देहबोली असावी. एखादी जुनी गोष्ट असेल तर त्यावेळची देहबोली कशी असेल त्याप्रमाणे ठेवावे म्हणजे कदाचित क्षणभरासाठी का होईना त्यांना भूतकाळ आठवतो का ते लक्षात येईल.
५) त्यांना स्वावलंबी ठेवावे. स्वतःची कामे स्वतः करत असतील तर ती करू द्यावी. उगीच पसारा पडतो म्हणून त्यांच्या काम करण्यात अडथळा आणू नये.
त्यांचे छंद जोपासावेत. म्हणजे एखाद्याला पूर्वीच्या गाण्याची आवड असेल तर जुनी गाणी त्यांची आवडती असतील ती लावून ठेवावे. कदाचित त्यातून भूतकाळ आठवेल आणि आता म्युझिकल थेरपी अनेक आजारांवर उपयुक्त ठरत आहे. त्या व्यक्तीवरही त्याचा काही परिणाम झाल्यास चांगलेच असेल.
दोन एखाद्याला चित्रकलेची आवड असेल तर कागद पेन पेन्सिल रंग त्यांच्यासमोर आणून ठेवावे. आणि चित्र पूर्ण झाल्यावर ‘ चित्र सुंदर काढलेत ‘अशी प्रशंसा करावी.
बायकांना स्वयंपाकाची आवड असते. त्यांना पोळ्या करणे, कुकर लावणे हे करू द्यावे. फक्त त्यावेळी आपण आजूबाजूला असावे. म्हणजे पाणी, गॅस वगैरे कडील लक्ष राहील.
सडा घालणं, रांगोळी काढणे या गोष्टी करू द्याव्यात. त्याचे कौतुक करावे. देवपूजा करून घ्यावी. माणसाला आपला घरात अजूनही उपयोग होतो आहे ही भावना सुखावह असते.
— भाग पहिला
💦🌨️
लेखिका : डॉ. सौ. पुष्पा घळसासी
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड -पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





