सुश्री मीनल केळकर
इंद्रधनुष्य
☆ देव दे व्हाऱ्यात नाही…लेखिका : सुश्री नेत्रा नरवणे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
देव देव्हाऱ्यात नाही…
आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही शिकवून जातो. आपल्या भवतालात खूप घडामोडी होत असतात. चांगल्या वाईट बातम्या ऐकायला/ वाचायला मिळतात.
एखादी चांगली घटना घडली की आपण आनंदून जातो आणि दुःखद बातमी असेल तर आपण हळहळतो.
२४ जानेवारी, २०२६ हा दिवस मला आणि माझ्या ओळखीतील अनेकांना एक वेगळा अनुभव देऊन गेला.
२३ जानेवारीला दुपारी एका अप्रिय घटनेला सामोरे जावं लागलं.
माझी मैत्रीण, सुप्रिया पाटणकर – भरतनाट्यम् नृत्य शिक्षिका (बदलापूर) हिच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना घडली. तिचे पती सुनील पाटणकर यांचं brain hamorrhage मुळे निधन झालं. मुलुंड येथील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी सुनीलला ठेवलं होतं. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करूनही अपयश आलं होतं. डॉक्टर हे समाजसेवक असतात… पेशंट हाताळताना आपल्यासारख्यांना देवासमान भासतात. सुनील यांच्या या परिस्थितीत डॉक्टरांनी सुप्रिया आणि त्यांचा मुलगा – संकल्प यांच्यासमोर एक वेगळा प्रस्ताव मांडला – *अवयव दानाचा! *
सुप्रिया आणि संकल्पनी या प्रस्तावाला मान्यता दिली आणि आणि अवयव दानाचा निर्णय घेतला. तिने एकच गोष्ट डॉक्टरांना सांगितली – अवयव दान हे गरजू माणसांना करायचं आहे.
आजवर रक्तदान, नेत्रदान, क्वचित झालेलं देहदान इतपतच बातम्या मला परिचित होत्या… त्या ही लांबच्या, ऐकीवातील व्यक्तींच्या बाबतीत…
२४ तारखेला सकाळी ही procedure सुरू होणार होती. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सुप्रिया समोर आल्यावर कसं समोर जायचं, काय बोलायचं ते कळत नव्हतं. एक मनाशी नक्की ठरवलं होतं की, तिच्याबरोबर थांबायचं… तेवढीच मदत करणं माझ्या हातात होतं.
मैत्रीण म्हणून आम्ही रोज भेटत होतो असं नाही पण भेटल्यावर सहज संवाद सुरू व्हायचा तसा कालही झाला. अवयव दानाच्या निर्णयावर ती खूप समाधानाने बोलत होती. माझ्या मनात मात्र अनेक विचारांची गर्दी… सुनील अचानक आजारी कसा पडला इथपासून ते हे सगळं कसं पार पडेल यासारखे अनेक प्रश्न…
घट्ट पकडलेल्या हातातून प्रिया खूप काही व्यक्त झाली होती. तिला हवी असलेली space मी दिली… काहीच विचारलं नाही. मनातून खूप गलबलून आलं होतं पण तिचा निर्धार बघून या परिस्थितीत दु:ख व्यक्त करण्यापेक्षा तिला सोबत करणं महत्त्वाचं होतं.
सकाळी सहा वाजल्यापासून organ removal procedure सुरू झाली होती. अंदाजे आठ एक तास या सगळ्याला लागतील असं डॉक्टर म्हणाले. Emergency ward च्या तळमजल्यावर waiting space मधे आम्ही थांबलो होतो. १२. ३० च्या सुमारास डॉक्टरांनी निरोप पाठवला… आता एकेक अवयव रेड बॉक्समधून ambulance मधे पाठवतील… तुम्हाला सांगतील.
तिथे ड्युटीवर असलेल्या काकांनी त्या पॅसेजमधल्या खुर्च्या बाजूला सारून जागा मोकळी केली. पुढच्या १५ – २० मिनिटात security guards, organ donation team यांच्यासमवेत पहिला रेड बॉक्स आमच्यासमोरून ambulance पर्यंत गेला. सुनीलची एक किडनी कुणासाठीतरी रवाना झाली. त्यानंतरचे दोन तास काही मिनिटांच्या अंतराने असेच बॉक्स बाहेर गेले. प्रत्येक वेळी आम्ही एकच प्रार्थना करत होतो… आता ते योग्य वेळेत योग्य ठिकाणी पोहोचू देत आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होऊदे.
प्रत्येक बॉक्सला अभिमानी नजरेने प्रिया सॅल्युट करत होती. अनेक ठिकाणी पोहोचणाऱ्या सुनीलचा निरोप घेऊन समोर आलेल्या परिस्थितीला स्वतःचं वर्तमान आणि अनेकांचं सुंदर भविष्य ही सकारात्मक खुणगाठ मनाशी घट्ट करत होती.
त्यानंतर एखाद तासात त्याच जागेवर वेगळी धावपळ सुरू झाली. हॉस्पिटलमधील नर्सिंग स्टाफ, ज्युनिअर डॉक्टर्स संपूर्ण कॉरीडोअरमधे दुतर्फा उभे राहिले. लीफ्टमधून सुनीलला स्ट्रेचरवरून खाली आणलं. दुतर्फा उभ्या असलेल्या सर्वांनी पांढरे गुलाब वाहून श्रद्धांजली अर्पण केली. एखाद्या सैनिकाला मानवंदना द्यावी तशी सुनीलला सर्वांनी उभं राहून guard of honour बहाल केलं. डोळे, Lungs, Liver, दोन्ही Kidney Pancreas, bones, skin या सगळ्या अवयव दानाची certificates सुप्रिया आणि संकल्पकडे देण्यात आली. प्रत्येक सर्टिफिकेट देताना प्रियाविषयी अभिमान आणि हळहळ अशा संमिश्र भावना तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या मनात दाटून आल्या होत्या. Organ donation team व सुप्रिया यांच्यातील co-ordinator ज्योती मॅडम, नर्सिंग स्टाफ, सुनीलवर उपचारांसाठी अथक प्रयत्न करणारे डॉक्टर्स या सर्वांसाठी प्रिया आज आदर्श ठरली होती. प्रत्येकाच्या बोलण्यात इतकंच होतं… एकाच वेळी इतक्या अवयवांचं दान आजवर बघितलं नाही. प्रत्येक जण सुप्रियाला हात जोडून कृतज्ञता व्यक्त करत होते. फोर्टीस हॉस्पिटलमधील(मुलुंड) २०२६ या वर्षातील हे पहिले दान होते. या सर्व औपचारिकतेनंतर पार्थिव घेऊन बदलापूरला जायची तयारी झाली – त्याच्या गावात, राहत्या घरी!
सुप्रिया आणि संकल्पबरोबर थांबायचं ठरवलं होतं ते निव्वळ सोबत म्हणून… पण त्या दरम्यान जे अनुभवलं, जे शिकले ते कुठल्याच अभ्यासक्रमात मिळालं नसतं. सुप्रियाचा कणखरपणा, दातृत्वाचं समाधान, तिने फक्त संकल्पवरच नव्हे अनेकांवर कृतीतून केलेला संस्कार हे खूप जवळून बघितलं. सुनीलच्या अचानक जाण्याने मनातून हलले होते तरी सुप्रियाच्या निर्णयाने विचारांना गती मिळाली होती, कक्षा रुंदावल्या. पुण्यकर्माची व्याख्या मनोमन बदलली आणि इतकंच म्हणावसं वाटलं…
देव देव्हाऱ्यात नाही
तव कर्मात मी पाही
मूर्त रूपी जो पूजिला
अमूर्त रूपी जाणिला
तोच तव बुध्दी दाता
तोच कर्ता करविता
अंशरूपी ठायी ठायी
तव निश्चये जो जाई
सचेतन तो राही
लाभे जन्माची पुण्याई
अनेकांना जीवन देई
कृतार्थ तव विचारे
नतमस्तक मी होई…
नतमस्तक मी होई…
सुनीलचा आकस्मिक मृत्यू स्विकारून यातून काय सकारात्मक करता येईल तर ते अवयव दान! हा निर्णय सुप्रियाने घेतला या विचारामागे सुप्रियाच्या आई वडिलांच्या संस्कारांचा खूप मोठा वाटा आहे. राधा मावशी आणि नाना काका दुसऱ्यांच्या मदतीला धावणारी, खंबीर मनाची माणसं होती…
तेच अगदी तेच सुप्रियाला बघताना आठवत होतं. आई-वडिलांच्या पश्चात त्यांचे संस्कार जपणं हेच तर महत्वाचं!
सहा महिन्यांपूर्वी सासरे गेले असताना आजारातून बाहेर पडू पाहणाऱ्या सासूबाई, महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यावर असलेला लेक यांना सांभाळण्यासाठी सुप्रिया स्वतःला सावरत होती. या सगळ्यात सावलीसारखी वावरत होती ती मुग्धा – सुप्रियाची खरं तर धाकटी बहीण!
पण या प्रसंगी आईसम आधार देणारी, वेळोवेळी तिला जवळ घेऊन समजवणारी मुग्धा सगळी procedure पूर्णत्वाला जाईपर्यंत सर्व धावपळ करत होती. मागचे तीन दिवस, तीन रात्र तीच होती आणि आता आयुष्यभर तीच असणार आहे सुप्रियाबरोबर!
कधीतरी गप्पा मारताना सहज अवयव दानाविषयी सुनील बोलून गेला होता ते धैर्याने सुप्रियाने पार पाडलं आणि साहचर्याची एक वेगळी ओळख सुप्रियाकडून बघायला मिळाली.
सुनील आणि सुप्रियाचा प्रचंड जनसंपर्क, प्रेमाने जोडलेली अनेक माणसं तिला मनोमन प्रार्थना करून धीर देत होती.
सदैव हसत खेळत, मनमिळाऊ असलेला सुनील अस्ताला जाताना सुध्दा अनेक घरांमध्ये आनंद वाटून गेला. अनेकांना आयुष्याचं वरदान देऊन गेला. सुनील नावाच्या अर्थाप्रमाणे जगताना तो शांत, आनंदी आणि स्वच्छ मनाचा होताच पण मृत्यूनंतरही अनेकांना सुंदर आयुष्य देऊन गेला.
सुनीलसाठी शब्द सुमनांजली
सुप्रिया आणि संकल्पच्या निर्णयाला सलाम!
लेखिका : सुश्री नेत्रा नरवणे
प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



