श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “असाही एक सिक्युरिटी गार्ड…” ☆ श्री संभाजी बबन गायके

हुतात्मा सैनिकांच्या माता-पित्यांच्या पायांखालची माती कपाळाला लावणारा माणूस!

“नमश्कार, साहब… मैं सिक्युरिटी गार्ड जितेंदर सिंग राठौर! ” 

– – एखादे सैनिक, पोलिस अधिकारी, किंवा डॉक्टर्स, प्राध्यापक जशी स्वत:ची ओळख सांगतात तशी ओळख जितेंदर सिंग राठौर सांगतात तेंव्हा या माणसातलं काहीसं वेगळेपण आपल्याला जाणवल्यावाचून रहात नाही. एरव्ही मी सिक्युरीटी गार्ड आहे असं अभिमानानं कोण सांगेल? पण हा माणूसच मनातून सैनिक प्रवृत्तीचा आहे. राजस्थानमध्ये राठौर या लढवय्या घराण्यात जन्माला आलेले जितेंदर सिंग अनेक राजस्थानी तरुणांसारखे सैनिक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून होते. पण दुर्दैवाने ते वर्दीधारी सैनिक बनू नाही शकले…! पण once a soldier… always a soldier… हे त्यांच्या मनाने अतिशय गांभीर्याने घेतलं. केवळ अंगावर गणवेश मिळतोय म्हणून त्यांनी सुरक्षा रक्षकाची तशी कमी पगाराची आणि कमी सन्मानाची नोकरी स्वीकारली… संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे २४ सुरक्षा रक्षक गणवेश परिधान केलेले आहेत. आणि सध्या ते सरदार वल्लभभाई पटेल संस्थेत कार्यरत आहेत.

१९९९ चे कारगिल युद्ध संपले होते. हुतात्मा सैनिकांचे देह त्यांच्या गावोगावी सन्मानाने पोहोचवले जात होते. अशाच एका हुतात्मा सैनिकाच्या पित्याचे “बेटा गया तो क्या हुआ… वतन तो सुरक्षित है… ” हे वाक्य जितेंदर सिंग यांच्या कानांवर पडले आणि त्यांच्या मनातील सैनिकाने एक मिशन हाती घेतले… सैनिकांच्या स्मृती जतन करून ठेवण्याचे!

– – आणि मग सुरु झाला एक मोठा प्रवास. या प्रवासात लोकांकडून काहीबाही ऐकून घेण्याचाही टप्पा आलाच. लष्कराच्या भाकरी भाजायच्या कशाला? यातून काय मिळणार? असेही प्रश्न ऐकावे लागले असतीलच. कारण यांनी ज्या कार्याला हात घातला होता… त्या कार्यात सातत्य, चिकाटी आणि परिश्रम आवश्यक आहेत. एकतर आपल्या देशात पूर्वी सैनिकांची माहिती एकत्रित ठेवण्याची रीत, सोय नव्हती. विविध बटालियन्स, रेजिमेंटस त्यांच्या त्यांच्या पुरते मर्यादित दस्तऐवज ठेवत असतील. शिवाय पायदळ, वायुदल, नौसेना असे तीन वेगवेगळे विभाग आहेत. त्यात बी. एस. एफ, सी. आर. पी. एफ. इत्यादी अनेक शाखा आहेत. त्यामुळे कुणा एका सैनिकाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असणे दुरापास्तच असेल.

– – पण सुमारे दोन लाख सैनिकांची माहिती, छायाचित्रे जमा करून ठेवण्याची किमया या केवळ दहावी उत्तीर्ण माणसाने करून दाखवली आहे. त्यांच्याकडे सुमारे तीनशे हुतात्मा सैनिकांचे छोटे पुतळेही आहेत, जे त्यांनी स्वखर्चाने तयार करवून घेतले आहेत.

हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना ते नियमित पत्रे लिहित असतात… आजवर त्यांनी दीड हजार पत्रं लिहून पोहोचवलीही आहेत. डोळ्यांत मोतीबिंदू झाल्यावर दृष्टी कमी झाल्यावर, आणखी दृष्टी कमी होण्यापूर्वीची खबरदारी म्हणून त्यांनी आणखी काही पत्रं लिहून तयार ठेवली आहेत. ज्यांवर फक्त पत्ता घातला की काम झाले!

सर्वांत महत्त्वाची आणि काळजाला हात घालणारी बाब म्हणजे हुतात्मा सैनिकांच्या माता-पित्यांच्या पायांखालची माती त्यांनी जमवून ठेवली आहे…! ही भावना काही साधीसुधी नाही… यासाठी खूप संवेदनशील मन असावे लागते!

पहिले महायुद्ध ते अगदी काल परवा झालेल्या हौतात्म्याची अचूक माहिती त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आश्चर्य म्हणजे खुद्द काही लष्करी विभागातील लोक त्यांच्याशी विशिष्ट बाबतीत माहिती घेण्यास येत असतात. जे काम खरं तर सरकारचे, सेनेचे आहेत… ते काम एक सामान्य माणूस करतो आहे, हे विचार करण्यासारखे आहे. यातून सरकार आणि सामान्य जनता खूप काही शिकू शकते. माहिती एकत्रित करून ती जतन करून ठेवणे हा विचार केला गेला पाहिजे!

कित्येक किलो वजन भरेल एवढ्या बातम्यांची कात्रणे, छायाचित्रे त्यांच्याकडे आहेत. त्यासाठी त्यांनी स्वत:च्या पगारातून खर्च केला आहे. नातेवाईक, कुटुंबीय, समाजातील इतर लोकांनी या त्यांच्या छंदाबाबत काय काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या असतील, याचा केवळ अंदाजच बांधता येईल!

सध्या गुजरात येथील सूरत शहरात नोकरीत असलेल्या या अवलिया माणसाची माहिती पंतप्रधान कार्यालयापर्यंत आणि तिथून अर्थातच पंतप्रधान महोदयांपर्यंत पोहोचली. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या मासिक आकाशवाणी संबोधनात, ‘ मन की बात’ या कार्यक्रमात श्री. जितेंदर सिंग यांच्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला!

एके दिवशी श्री. जितेंदर सिंग एका लग्न समारंभात सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. त्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला… आपणास सव्वीस जानेवारी, दोन हजार सव्वीस रोजी दिल्लीत प्रजासत्ताक दिन समारंभास निमंत्रित केले गेले आहे! यावर या माणसाने थेट सांगितले… खिशात केवळ एकशे दोन रुपये आहेत. दिल्लीत येण्यासाठी तिकिटाला पैसे नाहीत! त्यावर पंतप्रधान कार्यालयाने श्री. जितेंदर सिंग यांची सूरत-दिल्ली-सूरत विमानाची जाण्या-येण्याची तिकिटे पाठवून दिली, सोबत त्यांच्या पत्नीचीही तिकिटे दिली, दिल्लीत उत्तम निवास, भोजन व्यवस्था करून दिली. आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या सुसज्ज निवासस्थानी राहण्याचा, त्यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास… ’जिंदगी में पहली बार इतना महंगा खाना’ त्यांनी खाल्ले! आजवर मोठमोठ्या हॉटेल्सचे सुरक्षारक्षक म्हणून काम केले.. पण पहिल्यांदाच तशा हॉटेल्समध्ये राहण्याचा योग आला! एका सामान्य माणसाची एवढी छान बडदास्त ठेवणा-या पंतप्रधान कार्यालयाचे कौतुक करावेच लागेल!

‘तुम्हाला काय पाहिजे? या प्रश्नावर त्यांनी अर्थातच अशी मागणी केली आहे की… त्यांचा हा माहिती, छायाचित्र, पुतळे संग्रह एकाच ठिकाणी सुरक्षित जतन केला जाण्याची व्यवस्था व्हावी!

मी दोन वर्षांपूर्वी कै. रावत साहेबांच्या संदर्भात एक लेख मराठीत लिहिला होता. तो लेख जितेंदर सिंग यांच्यापर्यंत पोहोचला… मराठी विशेष समजत नसतानाही त्यांनी मजकूर समजावून घेतला आणि मला फोन केला… त्यांच्या कार्याची माहिती दिली!

अशा या जन-सैनिकाला आपण अभिवादन करावे, असे वाटल्याशिवाय राहवत नाही. जम्मूचे विकास मन्हास नावाचे एक गृहस्थ देशभरात हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांच्या भेटी घेत असतात, त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधून त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत असतात. मुंबईच्या उमाताई कुलकर्णी अगदी रोजच्या रोज हुतात्मा सैनिक, त्यांच्या कुटुंबियांविषयी फेसबुकवर माहिती देत असतात. असे अनेक नागरिक देशासाठी लढणा-या सैनिकांविषयी सा-या देशाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करीत असतात. जयहिंद फाउंडेशन सारख्या अनेक संस्था हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे कार्य करीत असतात. लोकवर्गणी मधून सियाचीनमध्ये सैनिकांसाठी प्राणवायू निर्मिती संयंत्र देणा-या कै. योगेश चिथडे व आताही त्यांचे कार्य पुढे नेणा-या सुमेधा ताई चिथडे यांचेही कार्य मोठे आहे. नागरिकांनी अशा प्रकारे सैनिकांच्या मागे ठाम उभे राहिल्यास त्यांनाही लढण्याचे अधिक बळ लाभेल यात शंका नाही.

– – – देशाची ‘सिक्युरिटी’ सांभाळणा-या सैनिकांच्या स्मृतींचा ‘गार्ड’ बनून अहोरात्र उभ्या असलेल्या श्री. जितेंदर सिंग राठौर यांना सल्यूट! त्यांच्या कार्यास जनतेने जरूर हातभार लावावा. जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted