डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १६ (इंद्र सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १६ (इंद्र सूक्त )

ऋषी – मेधातिथि कण्व: देवता – इंद्र 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील सोळाव्या  सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी इंद्रदेवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त इंद्रसूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद : 

आ त्वा॑ वहन्तु॒ हर॑यो॒ वृष॑णं॒ सोम॑पीतये । इंद्र॑ त्वा॒ सूर॑चक्षसः ॥ १ ॥

पर्जन्याची तूच देवता वृष्टी तू करीशी 

सोमरसाला तुला अर्पितो स्विकारुनिया घेशी

करीत दर्शन सूर्याचे यावे या यज्ञासी

हरिद्वर्ण तव अश्व रथातून घेउनी यावे तुजसी ||१||

इ॒मा धा॒ना घृ॑त॒स्नुवो॒ हरी॑ इ॒होप॑ वक्षतः । इंद्रं॑ सु॒खत॑मे॒ रथे॑ ॥ २ ॥

ज्या इंद्राचे हिरवे वारू घेऊन येत तयांना

हविर्भाग हे सिद्ध ठेविले प्रसन्न करण्या त्यांना 

घृतात ओथंबुनिया धानी तुम्हास्तवे सज्ज

स्वीकारुनिया झणी तयांना राख अमुची लाज ||२||

इंद्रं॑ प्रा॒तर्ह॑वामह॒ इंद्रं॑ प्रय॒त्यध्व॒रे । इंद्रं॒ सोम॑स्य पी॒तये॑ ॥ ३ ॥

प्रभात समयी मंजुळ गातो इंद्रस्तोत्र आम्ही

यज्ञाचा आरंभ होतसे यावे झडकरी तुम्ही

आवाहन हे आर्त होऊनी सुरेन्द्रास करितो

सोमरसाच्या सेवनासि देवेद्रा पाचारितो ||३||

उप॑ नः सु॒तमा ग॑हि॒ हरि॑भिरिंद्र के॒शिभिः॑ । सु॒ते हि त्वा॒ हवा॑महे ॥ ४ ॥

सोमरसाला सिद्ध करोनी पाचारण तुम्हा 

आगमनाची तुमच्या आहे आर्त प्रतिक्षा आम्हा  

रथयानाला अश्व जोडूनी रथावरी आरुढ व्हा

होऊनिया साक्षात प्राशुनी घ्या या सोमरसाला ||४||

सेमं न॒ स्तोम॒मा ग॒ह्युपे॒दं सव॑नं सु॒तम् । गौ॒रो न तृ॑षि॒तः पि॑ब ॥ ५ ॥

भक्तीभावाने आळवितो तुम्हास ही प्रार्थना

ऐकुनिया तिज अपुली मानुन आम्हा धन्य करा ना

यज्ञी येउन सोमरसाला घावे  स्वीकारुनी

मृगासारखे तृषार्त होउनि घ्यावे त्या प्राशुनी ||५||

इ॒मे सोमा॑स॒ इन्द॑वः सु॒तासः॒ अधि॑ ब॒र्हिषि॑ । ताँ इ॑न्द्र॒ सह॑से पिब ॥ ६ ॥

सोमरसाचा मान राखण्या दर्भ इथे मांडिले 

सोमरसाने भरुनी कलशा दर्भावर ठेविले

काये तुमच्या आगमनाचे होत फार क्लेश 

परिहारार्थ त्याच श्रमांच्या प्राशी सोमरस ||६|| 

अ॒यं ते॒ स्तोमो॑ अग्रि॒यो हृ॑दि॒स्पृग॑स्तु॒ शंत॑मः । अथा॒ सोमं॑ सु॒तं पि॑ब ॥ ७ ॥

अती मधुर ही स्तवने गातो तुमच्या आवाहना

अंतर्यामी भावुक होवो तुमच्या अंतःकरणा

प्रसन्न व्हावे अशा स्तुतीने देई या दाना

सोमरसाला प्राशुन घेण्या यावे या यज्ञा ||७||

विश्व॒मित्सव॑नं सु॒तमिंद्रो॒ मदा॑य गच्छति । वृ॒त्र॒हा सोम॑पीतये ॥ ८ ॥

सोमरसाचे प्राशन करण्या साऱ्या यज्ञात

रिपुसंहारी इंद्र जातसे मोठ्या मोदात

सोमरसाची अवीट गोडी देवेन्द्रा आहे

यज्ञामध्ये भक्तगणांच्या कल्याणा पाहे ||८||

सेमं नः॒ काम॒मा पृ॑ण॒ गोभि॒रश्वैः॑ शतक्रतो । स्तवा॑म त्वा स्वा॒ध्यः ॥ ९ ॥

समर्थ हे इंद्रा आम्हाला देई रे वैभव

धेनु अश्व अन् धनास देण्या आम्हासी तू पाव 

अमुच्या साऱ्या आकाक्षांना स्वरूप मूर्त दे

तुझ्याच स्तवनासाठी बुद्धी जागृत राहू दे ||९||  

(हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/KjGbB_bQX7k

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 16 :: ऋग्वेद मंडळ १ सूक्त १६

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments