श्री मकरंद पिंपुटकर
जीवनरंग
☆ चोरी! ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
इन्स्पेक्टर सूर्यकांत भोसले यांना अव्यवस्थितपणा आवडत नसे. न बांधलेल्या बुटांच्या नाड्या, चुकीच्या जागी ठेवलेली कागदपत्रे, अपूर्ण अहवाल – असं काही दिसलं की त्यांना ते सहनच होत नसे. सध्या माने हवालदारांसोबत ते पुण्यात, स्वारगेट पोलीस चौकीत तैनात होते.
आज ऐन दुपारच्या वेळी काळेबाई चौकीमध्ये घाबरलेल्या अवस्थेत आल्या होत्या. त्यांच्या शिलाईच्या दुकानातून त्यांची सोन्याची साखळी चोरीला गेली होती.
“माझे घोरपडे उद्यानाजवळ कपडे आणि शिलाईचे दुकान आहे. माझ्या सोन्याच्या साखळीचा हूक घट्ट करण्यासाठी साखळी काढून काऊंटरवर ठेवली होती. मी काऊंटरवरच एका ग्राहकाशी बोलत होते, फक्त क्षणभरासाठी मागे वळले, ” त्या सांगत होत्या, “आणि मी जेव्हा परत पाहिले, तेव्हा साखळी गायब झाली होती आणि तो ग्राहकही. ”
“ग्राहकाचे वर्णन करा, उंची, रंग, कपडे… ”
“मध्यम उंची, साधारण साडे पाच फूट, निळा शर्ट, दाढी होती, चष्मा नव्हता, ” त्या सांगत होत्या आणि माने हवालदार वहीत टिपून घेत होते.
“दुकानात आणखी कोण होते?” भोसल्यांनी विचारले.
“राजू – दुकानातला गेल्या वर्षीपासूनचा नोकर. ”
“त्याने काही पाहिले का?”
“तो नाही म्हणतोय. ”
भोसल्यांनी मान्यांना गल्लीतील लोकांशी बोलण्यासाठी पाठवले, तर ते स्वतः दुकानाची तपासणी करू लागले.
काळे बाईंच्या दुकानामागची गल्ली अरुंद आणि लहान दुकानांनी गजबजलेली होती. पार्क केलेल्या स्कूटर्सच्यामध्ये मुले क्रिकेट खेळत होती. जवळच्याच एका वडापावच्या टपरीवर तेलाचा तडतड आवाज येत होता.
बाईंच्या दुकानात सर्व काही व्यवस्थित दिसत होते. काउंटरजवळ पावतीच्या कागदाचा एक फाटलेला तुकडा पडलेला भोसल्यांना दिसला.
दरम्यान मान्यांनी गावभराच्या बातम्या गोळा करून आणल्या होत्या.
“वडापाववाल्याने निळ्या शर्टमधल्या एका तरुणाला स्वारगेट बस स्टँडच्या दिशेने पळताना पाहिलं, ” तो म्हणाला. “पण शेजारच्या न्हाव्याला वाटतं की तो माणूस लक्ष्मी फॅब्रिक्समधून आला होता. ”
भोसल्यांनी पावतीच्या त्या तुकड्याकडे निरखून पाहिले.
“हा जवळच्याच एका कापड पुरवठादाराचा – लक्ष्मी फॅब्रिक्सचा आहे. ” बाईंनी सांगितले, “तिथे डिस्काउंट कूपन अशी असतात. ”
लक्ष्मी फॅब्रिक्समध्ये, मालकाने दुजोरा दिला की काळे बाईंच्या दुकानातला राजू सकाळी ११:४२ च्या सुमारास डेनिमचा एक तागा परत करण्यासाठी आला होता. आणि काळे बाईंच्या म्हणण्यानुसार चोरी ११:४० च्या सुमारास झाली होती.
राजूविरोधात संशय निर्माण करण्याइतपत पुरावा होता, पण गुन्हा सिद्ध करण्याइतपत नाही.
भोसले राजूच्या हालचालींचा मागोवा घेत राहिले. तो घाईघाईने आल्याचे चहावाल्याला आठवत होते. बस स्टँडवरील सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट होते, पण तिथल्या कचरापेटीजवळ अर्जुनला धुळीत चपलांचे ठसे आढळले. शेजारच्या “Good Price pawn shop” (गहाणवट) दुकानात जाण्यापूर्वी त्यांनी त्या ठश्यांचे फोटो काढले.
गहाण ठेवणारा दुकानदार बोलण्यापूर्वी क्षणभर थांबला. “एक घाईगडबडीत असलेला तरुण सोन्याची साखळी गहाण ठेवण्याबद्दल विचारत आला होता, ” तो म्हणाला. “बारीक बांधा. निळा शर्ट. मनगटावर लहान ताऱ्याचा टॅटू. ”
धागेदोरे जुळून येत होते.
त्याच संध्याकाळी, भोसल्यांनी राजूला चौकशीसाठी चौकीत बोलावले. राजू तणावग्रस्त दिसत होता, त्याची नजर जमिनीवर खिळलेली होती, आणि त्याच्या डाव्या मनगटावर एक फिकट झालेला ताऱ्याचा टॅटू होता.
“मी फक्त लक्ष्मी फॅब्रिक्समध्ये कापड परत करायला गेलो होतो, ” त्याने एकच धोशा लावला.
राजूच्या फिकट निळ्या शर्टाकडे बघत, काही न बोलता भोसल्यांनी त्याला पॉन शॉपमधील सीसीटीव्ही फुटेज दाखवले.
“साखळी उचलल्यानंतर तू घाबरला होतास. पॉन शॉपनंतर तू कुठे गेलास?” भोसल्यांनी शांतपणे विचारलं.
राजूचं बिंग उघडकीस आलं होतं. त्याचा धीर सुटला.
“मी हे ठरवून केलं नव्हतं, ” तो म्हणाला. “मला काउंटरजवळ ती साखळी पडलेली दिसली. तो ग्राहक निघून जात होता, मॅडम पाठमोऱ्या होत्या. मला आईच्या औषधांसाठी पैशांची गरज असल्यामुळे मी ती साखळी उचलली तर खरी, पण नंतर मला भीती वाटली. साखळी गहाण ठेवून जास्त पैसे मिळत नव्हते, म्हणून मी ती साखळी नाकोडा ज्वेलरला विकून टाकली. आलेले पाच हजार रुपये मी आईला पाठवून दिले. ”
खोलीत शांतता पसरली.
काळेबाई रागावण्यापेक्षा जास्त दुखावल्यासारख्या दिसत होत्या.
“माझ्याकडे का नाही मागितलेस पैसे? आणि नंतर खरं का नाही सांगितलंस?” बाईंनी विचारले.
“मला भीती वाटली. ”
राजू त्यांना सोनाराकडे घेऊन गेला. त्याने ती साखळी वितळवली होती, त्यातला एक तुकडा विकलाही होता.
सोनाराने पैश्यांच्या मोबदल्यात उरलेलं सोनं परत करायचे कबूल केले.
पैसे मिळाल्यावर काळे बाईंनी तक्रार मागे घ्यायची तयारी दाखवली. पैश्यांची तूट भरून काढण्यासाठी काळेबाई राजूच्या पगारातून पैसे कापून घेणार होत्या.
“लक्षात ठेव, ” त्या राजूला म्हणाल्या, “विश्वास पुन्हा निर्माण करणं हे सोन्यापेक्षाही जास्त महाग आहे. ”
“आणखी एक केस सुटली, साहेब. ” ते सगळे गेल्यावर माने हवालदार म्हणाले.
“गरीबी फार वाईट, माने, ” भोसले म्हणाले, “माणसाला नको त्या मार्गाला लावते. काळे बाईंनी समजूतदारपणा दाखवला आणि गुन्हा दाखल केला नाही, अन्यथा राजूच्या भविष्याचं मातेरं झालं असतं. ”
भोसल्यांनी फाईल बंद केली आणि ‘SOLVED’ असे लिहिलेल्या ड्रॉवरमध्ये सरकवली.
बाहेर, स्वारगेट पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या लयीत परतले होते—रिक्षांचे हॉर्न, सायंकाळची गर्दी आणि अचानक आलेल्या पावसाने ओल्या झालेल्या रस्त्यांवर लखलखणारे दुकानांचे दिवे. अगदी शांतपणे, आणि जवळजवळ कोणाच्याही लक्षात न येता, तिथे पुन्हा एकदा सुव्यवस्था प्रस्थापित झाली होती.
(काल्पनिक कथा)
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




