डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ गाईड – गुरू – फिलॉसॉफर… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

“झाली का केतन शाळा नीट? आज कोणाशी भांडण?”

आप्पांनी केतनला शाळेतून येताना विचारलं. रोज आजोबा नातवाची जोडगोळी शाळा सुटली की चालत घरी येत असे. येताना केतन शाळेतले सगळे रुसवे फुगवे आजोबांना सांगत मग घरी यायचा.

घरापासून जवळच होती ही शाळा आणि आप्पांनी हौसेने हे काम गळ्यात घेतले होते.

केतनला आजोबा फार आवडत आणि माईआजीपण. केतनचे आईवडील नोकरी करत आणि केतन एकुलता एक मुलगा. आजोबाआजीच्या भरवशावर लीना आणि महेश बिनधास्त नोकऱ्या करत.

लीनाचा तर आपल्या सख्ख्या आईवडिलांपेक्षा माईआप्पांवर जास्त जीव होता. कधी त्यांची भांडणे 

झाली नाहीत की कधी वेगळे राहायचा विचार सुद्धा लीना महेशच्या मनात आला नाही.

केतनसाठी आप्पा म्हणजे जीव की प्राण. त्यांच्याकडून तो बुद्धिबळ शिकायचा. आप्पा त्याला सुट्टीत शिबिरांना पोचवायचे. माई केतनला श्लोक शिकवायच्या. साधेसुधे मध्यमवर्गीय कुटुंब ते.

केतन हुशार होता पण अगदी पहिला येईल इतका नव्हता बुद्धिमान. अप्पाना त्याची जाणीव होती.

महेशला म्हणायचे आप्पा.. “ अरे सगळे कसे पहिले येतील शर्यतीत? पण म्हणून तिसरा आलेला मुलगा काही कमी हुशार नसतो. देव सगळ्याना काहीतरी देणगी देऊन पाठवतो. आपण ते ओळखलं पाहिजे बघ. आणि कष्टाने बऱ्याच गोष्टी होतात बरं साध्य. तुझा केतन कष्टाळू आहे. सगळं छान होईल त्याचं. ”

महेशला मात्र वाटायचं हा आपला एकुलता एक मुलगा आहे त्याने खूप यश मिळवले पाहिजे आणि कोणीतरी मोठे होऊन दाखवलं पाहिजे.

केतन आता दहावीत गेला. त्याला भाराभर क्लास लावलेले आप्पा माई बघत होतेच.

त्या रात्रीआपल्या बेडरूममध्ये आल्यावर माई म्हणाल्या, ” अहो ते एवढेसे पोर पिचून जातंय असल्या हजार क्लासेसपायी. त्याचा स्वतःचा अभ्यास करायला तरी पोराला वेळ होतोय का? तुम्ही तरी सांगा की महेशला. ”

“ छे ग माई. मुलगा त्यांचा, निर्णय त्यांचे. आपण काहीही बोलायचं नाही. तूही बोलू नकोस. नसते वाद नकोत मला. गप्प बसायचं आपण. ”

आप्पा पाठ फिरवून झोपून गेले. माई मात्र बराच वेळ जाग्या होत्या.

सगळे क्लासेस संपवून घरी आला की केतन अतिशय दमलेला असे. त्याला आणखी अभ्यास करायचा उत्साहच नसे. जेवला की डोळे मिटत त्याचे.

एक दिवस केतन आजोबांच्या खोलीत आला… ”काय रे केतन? झाली का सगळी तयारी परीक्षेची? ठीक चाललंय ना सगळं? ” आणि केतन खाली मान घालून रडायला लागला.

“आजोबा, मला हे सगळं झेपतच नाहीये. मला स्वतःला एक ताससुद्धा मिळत नाहीये अभ्यासाला. मला तर आता परीक्षेला बसूच नये असं वाटतंय. मी नाही बसत परीक्षेला. मला जर वाईट मार्क्स मिळाले तर आईबाबा फाडून खातील. मी नक्की निराशा करणार त्यांची. मला नाही पडणार त्यांना हवे तसे नव्वदच्या पुढे मार्क्स. मी काय करू आजोबा. त्यांना वाटतंय खूप क्लास लावले की खूप मार्क्स मिळतील मला. तसं नाहीये आजोबा. माझा तर शिकण्यातला सगळा इंटरेस्टच गेलाय. मला शिकायचंच नाही यापुढे. ” 

– – आजोबांना अतिशय वाईट वाटलं. सोन्यासारखा हा मुलगा आणि त्याच्यावर या कोवळ्या वयात हे दडपण.

“ मग केतन, तुला मनापासून काय करावंसं वाटतं? हे बघ. हे असले शिक्षण सोडण्याचे विचारच मनात आणू नकोस. आपल्याला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही बाळा. ”

“ आजोबा मला मर्चंट नेव्हीत जावंसं वाटतं. मी सगळी चौकशी केलीय. बारावी सायन्सनंतर त्यांची आता मुंबई चेन्नई अशा ठिकाणी कॉलेजेस आहेत. मी चार वर्षे तिकडे शिकून बीएस्सी नॉटिकल ही डिग्री घेईन. मग मला कॅम्पस् इंटरव्ह्यूमध्ये चांगल्या शिपवर कॅडेट म्हणून नोकरी लागेल. मग तिथेच परीक्षा देत मी नक्की पुढे कॅप्टनपर्यंत जाऊ शकतो. मला या इथल्या शर्यतीत भागच घ्यायचा नाही. मी टिकणार नाही या रॅटरेस मध्ये आजोबा. ” 

“ अरे मग उत्तम की. चांगला निर्णय आहे तुझा केतन. ”

“हो. आहे तिकडे सगळं उत्तम. मला त्या डॉक्टर इंजिनिअर सीए या मळलेल्या वाटेला जायचंच नाहीये.

या मर्चंट नेव्ही कोर्सला फी खूपच असते पण नंतर माझं जन्माचं कल्याण होईल हो आजोबा.

मी उद्यापासून कोणत्याही क्लासला जाणार नाही. मला ऐशी टक्क्यांच्या वर नक्की मार्क्स मिळतील आजोबा. मी नव्वद आणि पंच्यांणव चा मुलगा नाही. ”

आजोबांना केतनचं अतिशय कौतुक वाटलं.

” केतन, नक्की मिळवशील ऐंशीच्या वर मार्क्स? ”

“ सहज आजोबा. पण मी क्लास बंद करून स्वतःचा अभ्यास केला तरच.. आणि हे तुम्ही आईबाबांना पटवून द्या. मी त्यांच्याशी बोलूच शकत नाही. त्यांना हे पटणार नाही. एकटे तुम्ही आहात जे मला लहानपणापासून जाणून घेता. ”.. केतनने आजोबांना मिठी मारली.

“ हो केतन. सुरू कर अभ्यास उद्यापासून. मी बोलतो लीना महेशशी. अरे, तू त्यांचा एकुलता एक मुलगा आहेस. ते काही शत्रू नाहीत तुझे सोन्या. असतो विचारात फरक. आणि हल्ली बाहेरचे फार प्रेशर असते आईबापांनाही ना. पिअर प्रेशर ना.. तुमच्या भाषेत लोक काय म्हणतील? हे! ”

केतन हसला… “ हो आजोबा. तुमच्यावेळी किती मस्त होतं ना. मॅट्रिक झालं की मिळेल ती नोकरी करायची रिटायर होईपर्यंत. तुम्हीच वेगळे आहात. त्या काळात पीएचडी करून प्रोफेसर झालात. हा बंगला बांधलात. बाबाही बँकेत मोठ्या पोस्टवर आहेत. आई सुद्धा बँकेत आहे. पण मी मात्र वेगळी वाट निवडणार. ”

“ खुशाल निवड पोरा. ” आजोबा म्हणाले. “ मी आणि माई आहोत कायम तुझ्यामागे. उद्या समजावून सांगतो महेश लीनाला. अरे तेही आनंदाने तुला सपोर्टच करतील की.. चांगला निर्णय आहे तुझा. जा आता. सगळं टेन्शन बाजूला ठेव आणि मस्त अभ्यास करायला लाग. ”

केतन रिलॅक्स होऊन आपल्या खोलीत गेला.

आजोबांनी आणि माईने काय आणि कसं सांगितलं माहीत नाही, पण केतनने सगळे क्लास सोडून दिले हे बघूनही महेश आणि लीना त्याला काही बोलले नाहीत.

केतनच्या खोलीत रात्री उशिरापर्यंत दिवा दिसू लागला. माई हळूच उठून त्याला कॉफी करून देत.

‘ घे रे केतन. मीही जागीच होते. घे एवढी कॉफी. तरतरी येईल. ” माई हळूच निघून जायच्या.

परीक्षा झाली. आता केतन एका ट्रेकिंग ग्रुपबरोबर एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेला. आणि खूप खूप अनुभवाचे मोठे गाठोडे घेऊन आला.

ठरल्या वेळी परीक्षेचा रिझल्ट लागला. केतनला सत्त्याऐशी टक्के मार्क्स मिळाले. घरी सगळ्याना अतिशय आनंद झाला. आता महेश लीनाने केतनचा निर्णय मनापासून मान्य केला.

शेजारच्या सानेकाकू घरी आल्या. लीना, काय ग.

बरे मिळाले केतनला मार्क्स ग. पण आमच्या नीरजला चौऱ्याणव टक्के मिळाले बरं. डॉक्टर व्हायचंय त्याला. ”

लीना म्हणाली, “होय हो काकू. हुशार आहेच नीरज. पण केतन म्हणेल ते करिअर आम्ही त्याला देऊ. एकच तर गुणी मुलगा आहे आमचा. नीरजचे अभिनंदन हं. ”

आजोबांनी अभिमानाने लीनाकडे बघितलं.

केतनने सायन्स साईडला प्रवेश घेतला. त्याला आता कोणत्याच स्पर्धा परीक्षा द्यायच्या नव्हत्या. एकीकडे त्याने मर्चंट नेव्हीच्या एन्ट्रन्स चा अभ्यास सुरू केला. केतनने बारावीत असताना चार ठिकाणी एन्ट्रन्स 

एक्झाम्स दिल्या. त्याला चेन्नईला लगेचच प्रवेश मिळाल्याचा मेल आला.

बारावीच्या निकालानंतर ती मार्कशीट पाठवून मगच केतनचा प्रवेश निश्चित होणार होता. केतनला बारावीत ऐशी टक्के गुण मिळाले आणि त्याचा चेन्नईचा प्रवेश आता निश्चित झाला. कधीही घराबाहेर न राहिलेला मुलगा आता घर सोडून जाणार म्हणून सगळ्याना वाईट वाटलं

….. आता ही डिग्री मिळाली की केतन एखाद्या चांगल्या शिपिंग कंपनीत जॉईन होईल आणि घरी चार महिन्यांनीच येईल हेही सत्य सर्वांनी स्वीकारले.

अर्थात या जॉबचे फायदेही भरपूर होते. डॉलर मध्ये पगार, इन्कमटॅक्स नाही. सोपं नव्हतं हे करणं पण केतनने हे करिअर मनापासून निवडलं होतं. केतनची ऍडमिशन घ्यायला, त्याला पोचवायला, लीना महेश दोघेही चेन्नईला गेले. त्याचा रूम पार्टनर कोणआहे जेवण कसे असते, ही सगळी चौकशी करून केतनला निरोप देऊन जड अंतकरणाने दोघेही परत आले.

“ बाबा सगळं व्यवस्थित आहे केतनचं. पुढच्यावेळी तुम्ही दोघे पण आमच्याबरोबर या त्याला भेटायला.

विमानाने गेलो की तुम्हाला काही त्रास होणारनाही. ” महेश म्हणाला.

 “ हो हो येऊ की आम्ही. ” माई म्हणाल्या.

अशी चार वर्षे बघताबघता गेली. उत्तम ग्रेड्स् घेऊन केतन रँकमध्ये आला. त्याची जिद्द त्याने पुरी करून दाखवली.

क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted