डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ गाईड – गुरू – फिलॉसॉफर… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(अशी चार वर्षे बघताबघता गेली. उत्तम ग्रेड्स् घेऊन केतन रँक मध्ये आला. त्याची जिद्द त्याने पुरी करून दाखवली.)
इथून पुढे – –
त्याच्या उत्तम ग्रेड्सवर त्याला एन वाय के. या जपानी कंपनीत कॅडेट म्हणून जॉब मिळाला. अतिशय खूष होऊन केतन आप्पा माईना अपॉइंटमेंट लेटर दाखवायला आला. आपला रुबाबदार उंचापुरा देखणा नातू आपल्या समोर उभा राहिलेला बघून आप्पांच्या डोळ्यात पाणी आलं.
थरथरत्या हातांनी त्याला जवळ घेऊन म्हणाले, “ जिंकलंस रे पोरा. ”
– आधीच लिहिलेला पन्नास हजारांचा चेक केतनच्या हातात ठेवून आप्पा म्हणाले, “माई, नातवाला ओवाळताय ना? दूर निघालं आपलं पोरगं. ”
महेश हसत म्हणाला,
“आप्पा. मला नाही कधी दिलेत हं एवढे पैसे. त्या गाढवाला देताय हो पन्नास हजार एकदम? उडवून टाकेल तो. ”
“ अरे बाबा. दुधावरची साय आहे हा पोरगा. गुणी आहे माझा नातू. ” केतनच्या डोळ्यात पाणी आलं.
“बाबा, अप्पानी काय केलं नाही माझ्यासाठी? तुम्हाला त्यांनी कसं राजी केलं मला माहित नाही, पण ते होते म्हणूनच मी मर्चंट नेव्हीत जाऊ शकलो. तुम्ही आणि आईने कधीही नसतं मला जाऊ दिलं. ”
केतन आजी-आजोबांच्या, आई वडिलांच्या पाया पडला.
आता वेगळ्या विश्वात केतनचा प्रवास सुरु होणार होता. वर आकाश खाली पाणी असे सतत चार महिने काढायचे. बरोबर सगळे अनोळखी निरनिराळ्या देशातले लोक. थोड्याच दिवसात केतन बोटीवरच्या आयुष्याला रुळून गेला. डॉलरमध्ये जमा झालेला पहिला पगार बघून केतनला गहिवरून आलं.
केतनने आता शिपिंगच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली. लवकरच तो सेकंड मेट झाला आणि पगारही भरपूर वाढला त्याचा.
त्या दिवशी ड्राय डॉक् होते म्हणून केतनची शिप आठ दिवस ओसाकाला थांबणार होती.
केतन आणि त्याच्या बरोबरचा ऑफिसर सुट्टीत ओसाकाला हिंडायला म्हणून बाहेर पडले.
चेरी ब्लॉसमचा सिझन होता तो. जपान नुसतं चेरीच्या गुलाबी बहराने फुलून गेले होते. एका बागेत एका झाडाखाली केतन आणि त्याचा ऑफिसर जिमी बसले. चेरीच्या फुलांचा मंद सुगन्ध दरवळला होता
. छोट्या मुलांची ट्रिप आलेली दिसत होती बागेत.
जिमी म्हणाला, “ चल आपण कॉफी घेऊन येऊया. ”
समोरच्या कॉफी शॉपमध्ये एक जपानी मुलगी उभी होती. केतन म्हणाला, “ टू कॉफी प्लीज. ”
– – ती मुलगी हसली आणि म्हणाली “ सॉरी सर. हे शॉप माझं नाहीये. माझ्या मैत्रिणीचं आहे. जस्ट अ मिनिट. “ जपानी भाषेत काहीतरी बोलत तिने मैत्रिणीला बोलावून घेतलं.
दोघांच्या हातात फेसाळलेली कॉफी ठेवत ती मालकीण दहा वेळा वाकवाकून सॉरी म्हणाली.
तिची मैत्रीण अस्खलित इंग्लिशमध्ये म्हणाली, “ मी किम. इथल्या नामुरा बँकेत नोकरी करते. तुम्ही इंडियन आहात का? ”
केतन म्हणाला, ” हो. मी बोटीवर ऑफिसर आहे आणि हा माझा मित्र जिमी. तो माझा ऑफिसर आहे. Nice to meet you.. Mind for a cup of coffee? ”
किमने त्यांच्याबरोबर कॉफी घेतली. “ थँक्स “ म्हणत ती तिथून निघून गेली.
केतन तिच्याकडे ती दिसेनाशी होईपर्यंत बघत होता. जिमीने त्याला ढोसलं आणि म्हणाला “चला. गेली ती डॉल. ” दोघे पुन्हा बोटीवर परतले.
बारा बारा तास अत्यंत हेक्टिक ड्यूटी करून वैतागला होता केतन.
अजून आपला पगार कसा जमा झाला नाही, आणि मोबाईल वर नोटिफिकेशन कसं आलं नाही म्हणून केतन म्हणाला, “ बँकेत जाऊन विचारून तरी येतो. ”
जिमी म्हणाला “ चल. मी पण येतो. ”
– – बँकेत गर्दी होती. सहज बघितलं तर परवाची जपानी मुलगी स्मार्टपणे काउंटर संभाळत होती.
“ हॅलो मिस किम. मला विचारायचं होतं, माझ्या अमुकअमुक अकाउंटला पैसे जमा झालेत का सांगता का प्लीज? “
किमने लॅपटॉप वर चेक करून सांगितलं “ झालेत की. राहिलं असेल तुम्हाला नोटिफिकेशन यायचं. सॉरी. ”
केतन म्हणाला “अजून आठ दिवस आमचे शिप इथे आहे. माझ्याबरोबर डिनर घ्यायला आवडेल का तुम्हाला? ”
“आत्ता नको. बघू नंतर. ” आणि किम कामात बुडून गेली.
केतनचे शिप आणखी आठ दिवस होते पण तेवढ्यात त्याची आणि किमची भेट झाली नाही. शिप हलले. आता जवळजवळ तीन आठवड्यानी शिप मुंबईला लागणार होते.
मधेच जिमी केतनला भेटायला आला. त्याने त्याला मोबाईल वर फोटो दाखवले. जिमी आणि किम एका
रेस्टोरां मध्ये हसत खेळत ड्रिंक्स घेत होते. गप्पा मारत होते.
जिमी हसून म्हणाला, ” पोरी त्या पोरीच. जरा कौतुक केलं, लहानसहान गिफ्ट दिल्या की पाघळतात. त्यांना आमच्या गोऱ्या कातडीचं फार कौतुक. पन्नास मुली खेळवल्या आहेत मी. ”
जिमी मुद्दाम खवचट हसत तिथून निघून गेला.
केतनला मनापासून वाईट वाटलं. ही पहिलीच मुलगी त्याला मनापासून आवडली होती.
न राहवून त्याने आजोबांना कॉल केला… “ काय केतन, आज माझी कशी आठवण झाली?
बरंय ना सगळं? ”
केतनने आजोबांना घडलेलं सगळं सांगितलं. ”आजोबा, असे इतके दुष्ट लोक असतात का हो जगात? मला नाही आवडलं जिमी आणि किम वागले ते. ”
आजोबा हसले. “ अजूनही तू बच्चाच आहेस केतन. काही लोकांना दुसऱ्याच्या हातातलं खेळणं ओरबाडून घेण्यात आसुरी आनंद मिळतो. सोडून दे केतन. ती पोरगी तुझ्यासाठी नव्हती म्हण आणि move on. अरे, अजून खूप बघायची आहे तुला दुनिया. देवाने मारलेल्या गाठी या. अकस्मात समोर येऊन उभी राहतात रे माणसं. अजिबात डिस्टर्ब होऊ नको. ”
“नाही आजोबा. खूप मस्त वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्स. ठेवतो. ” केतन शांत झाला.
– – त्याने जिमीला कोणतीही रिऍक्शन दर्शवली नाही. नाही म्हटलं तरी जिमी त्याचा बॉस होताच.
शिप मुंबईला लागली. आता केतनला तीन महिने तरी सुट्टी होती. आजोबा आजी आई बाबा यांच्यासाठी जपान मधून केलेली खरेदी घेऊन केतन पुण्याला आला. सगळे त्याची वाट बघत होते.
केतनने आईबाबा, आजीआजोबांना मिठीमारली.
“मस्त मानवलेली दिसते हो नोकरी. चांगला गोरा आणि थोडा जाड झालास केतन. ” आई कौतुकाने म्हणाली.
” हो ग आई. आता इथे आहे तर मला अजिबात आग्रह करकरून खायला घालू नकोस. उद्याच जिम लावणार आहे मी”.
तेवढ्यात शेजारच्या साने काकू भेटायला आल्याच.
“काय म्हणतोय केतन? मजा आहे बाबा. सगळे देश बघायला मिळतात आणि वर मस्त पगार. ” किंचित असूयेने साने काकू म्हणाल्या.
“ काकू नीरज काय म्हणतो? झाला असेल ना डॉक्टर? सॉरी. मी इथं चार वर्षे नव्हतोच ना.
मग गेलो बोटीवर तो आत्ता येतोय. ” – काकूंच्या हातावर चॉकलेट्स ठेवत केतन म्हणाला.
“ नाहीं रे. एमेस्सी केलं नीरजने. नाही मिळाली ऍडमिशन त्याला मेडिकलला. आणि पेमेंट सीटचे इतके पैसे भरायला कोणाची ताकद आहे बाबा? पण आता छान आहे नोकरी त्याला. ” असं म्हणत साने काकू मग हळूच सटकल्याच.
आजोबा शेजारी उभे होते. त्यांनी केतनकडे बघितलं.
“बघितलंस का केतन? इतका खरोखर हुशार मुलगा. डॉक्टर व्हायच्या योग्यतेचा. पण सगळीच स्वप्नं पुरी होत नाहीत बाळा. मुकाट्याने एमेस्सी झाला आणि नोकरीला लागला. तू योग्य निर्णय घेतलास.
या ससा कासव शर्यतीत तुझा निभाव लागणार नाही हे तू अगदी वेळेवर ओळखलंस. चांगलं झालं तुझं. आपली कुवतसुद्धा माणसाने ओळखली पाहिजे. ”
आणि मग आजोबा हसत म्हणाले, “मग? काय म्हणतो जिमी आणि त्याची जपानी मैत्रीण? ”
“ अहो आजोबा, त्या जिमीने तिला नुसते खेळवले आणि गेला निघून. मला मेल आला होता किमचा. भेटूया का म्हणून. मी म्हटलं सॉरी. मी चाललो भारतात परत. बाय.
आजोबा हसले. ”बरोबर. योग्यच केलंस तू बाळा. आपलं असेल ते आपल्यासमोर चालत येतं बघ.
विश्वास ठेव या म्हाताऱ्यावर. ”
– – केतनने आजोबांच्या मांडीवर डोके घुसळले. “अरे अरे गधड्या. मांडी मोडेल की आजोबांची. ” लीना म्हणाली. केतनने आजोबांना मिठी मारली.
“ येस येस माय डिअर डिअर आजोबा. माय गाईड गुरू अँड फिलॉसॉफर टू. या वेड्या मुलाचं जे काय भलं झालंय ते तुमच्याचमुळे हो. आणि हो. सांगून ठेवतोय. सारखं म्हणू नका दोघेही की थकलो म्हणून. माझं लग्न झालेले बघायचं आहे तुम्हाला. “ ‘
… सगळं घर.. माई लीना महेश.. सगळेच हसण्यात बुडून गेलं..
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





