श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ ते दहा तास… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(“अहो मागच्या महिन्यात मी याला घेऊन एकटीच अमेरिकेत जाऊन आले, आमच्या नातेवाईकाच्या लग्नाला. हा तर आपला महाराष्ट्र आहे. इथं सोबतीची काय गरज? “

मी चुपच झालो. बाई मोठी धीट दिसत होती.) 

इथून पुढे – – 

मग आमच्या गप्पा रंगल्या. मला वाटत होतं ती एक साधी गृहिणी असावी पण फॅक्टरीच्या कामातही तिचा सक्रिय सहभाग असतो हे तिनं मला सांगितलं. फॅक्टरीच्या प्राॅडक्ट्सची, त्यांच्या प्रक्रियेची आणि मार्केंटिंगची तिला खडानखडा माहिती होती. नवऱ्यासोबत ती अनेक देशात जाऊन आली होती. एका ट्रस्टच्या माध्यमातून ती बरीच समाजसेवाही करत होती.

जसजसा मी तिच्याशी बोलत होतो तसतशी माझी नजर स्वच्छ होत होती. तिच्या सौंदर्याचा माझ्यावरचा परिणाम कमी झाला होता. त्याची जागा आता आदराने घेतली होती. इतकी धनाढ्य आणि कमालीची सुंदर असुनही तिच्या वागण्यातला नम्रपणा, साधेपणा, तिच्यापुढे मी अगदीच क्षुल्लक असतांनाही माझ्याशी बोलण्यातली तिची आपुलकी हे सर्व पाहून मी खुप भारावून गेलो होतो.

“तुम्ही फिल्म इंडस्ट्रीत का नाही गेलात? ” माझ्या नकळत माझ्या मनात खदखदणारा तो प्रश्न निघून गेला. ती मोकळेपणाने हसली. मग म्हणाली

“मला हा प्रश्न अनेकांनी विचारलाय. मला ऑफरही होत्या पण तिथं जाऊन मला प्रसिद्धीव्यतिरिक्त काय मिळालं असतं? आम्ही पिढीजात श्रीमंत. पैशाची आमच्याकडे कधीच कमतरता नव्हती. फिल्म इंडस्ट्रीत काय काय धंदे चालतात हे तुम्हांलाही वाचून माहित असेल. मला ते नको होतं. आणि प्रसिद्धी क्षणभंगुर असते. काही काळानंतर तुम्हांला कुणीही विचारत नाही. मला साधंसुधं जीवन जगायला आवडतं. सामान्य माणसांत मिसळायला, त्यांचे जगण्यामरण्याचे प्रश्न सोडवायला आवडतं. खरं सांगू मला मी सुंदर असल्याबद्दल वाईटच वाटतं. लोक माझी बुद्धीमत्ता, माझं कर्तुत्व, माझ्या भावना, माझ्यातली माणुसकी किंवा इतर काही गुण बघायलाच तयार होत नाहीत हो. ते माझ्या चेहऱ्याकडेच वेड्यासारखे बघत रहातात “

मीही तर तेच करत होतो. मला माझीच लाज वाटून मी चुप बसलो.

“थोडंसं याच्याकडे बघता का? मी जरा डिश धुऊन येते “

ती म्हणाली तसं मी भानावर येऊन होकारार्थी मान हलवली.

ती बेसिनपर्यंत पोहचत नाही तर तिचा मुलगा रडू लागला. मी त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो थांबेना म्हणून मग मी त्याला उचलून घेतलं आणि पॅसेजमध्ये फेऱ्या मारु लागलो. काय गोड होता तो पोरगा! अगदी आईसारखा सुंदर, गोरापान, गुटगुटीत, चमकदार डोळे आणि लालचुटूक ओठांचा. एकदा जवळ घेतलं की सोडावसं न वाटणारा. रडतांनासुध्दा तो अतिशय गोड दिसत होता. मी त्याला थोपटलं तसा तो झोपून गेला.

तेवढ्यात ती आली.

“रडत होता वाटतं! ” तिनं जवळ येऊन त्याला घेतलं आणि बर्थवर झोपवलं.

थोड्यावेळाने आम्ही दोघंही झोपलो. पण झोप आमच्या नशिबातच नसावी. रात्रीतून चार वेळा तिच्या मुलाच्या रडण्याने आम्हांला जागवलं. चारही वेळा मी त्याला घेऊन पॅसेजमध्ये फेऱ्या मारल्या. गंमत म्हणजे तोही माझ्याकडे लगेच येत होता आणि थोडं फिरवलं की खांद्यावर पटकन झोपत होता.

“मागच्या आठवड्यात आम्ही स्वित्झर्लंडला होतो. तिथली थंडी त्याला मानवली नाही म्हणून सर्दीमुळे सारखा किरकिर करतोय ” तिनं स्पष्टीकरण दिलं.

सकाळ झाली. आख्खी रात्र जागरणात गेली होती. प्रत्येक आईच्या रात्री अशाच जागरणात जात असतील का? या विचाराने मी अस्वस्थ झालो. कितीही सुंदर असली तरी आई ती आईच असते. रात्र रात्र मुलांसाठी जागणारी, त्यांच्या सुखासाठी जीवाचं रान करणारी.

एक तासाने नागपूर येणार होतं. आम्ही दोघंही बसून खिडकीबाहेर पहात होतो. रात्रभर जागूनही ती तशीच फ्रेश आणि सुंदर दिसत होती.

“घरी कोणकोण असतं? “तिनं अचानक प्रश्न केला.

“मी, आईवडील, दोन लहान भाऊ आणि एक बहिण. वडिलांनी तब्येतीच्या कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेतलीये “

“अच्छा. म्हणजे तुम्हांला नोकरीची खरी गरज आहे “

“हो तर! वडिलांच्या पेन्शनवर किती दिवस काढणार? “

तिनं लगेच पर्समधून मोबाईल काढला. कोणाशीतरी बोलली. बोलणं झाल्यावर मला म्हणाली “तुम्ही ज्या कंपनीत जाताय तिथं माझे काका मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. इंटरव्ह्यू तेच घेणार आहेत. मी आताच त्यांच्याशी बोलले. तुमचं नाव सांगा मी त्यांना मेसेज करते “

मी नाव सांगितलं तिनं मेसेज केला.

“तुम्ही भेटलात की त्यांना सांगा संजनाने पाठवलंय म्हणून “

“संजना कोण? ” मी विचारलं

“मीच. माझंच नांव संजना” ती हसून उत्तरली.

“थँक्यू व्हेरी मच मॅडम अँड व्हेरी व्हेरी साॅरी”

“साँरी? कशाबद्दल? ” तिनं आश्चर्याने विचारलं

“काल तुम्ही म्हंटलात तसं इतर पुरुषांसारखं मीही तुमच्याकडे वेड्यासारखा बघत होतो. मी विसरुन गेलो होतो की तुम्ही विवाहीत आहात, एका मुलाची आई आहात. माझी चुक झाली. आय ॲम एक्स्ट्रीमली साॅरी फाॅर दॅट”

तिनं हलकसं स्मित केलं. म्हणाली. ” फरगेट इट. अशा नजरांची मला सवय झाली आहे. स्वतःची बायको सुंदर असतांनाही दुसऱ्या बायकांकडे पहाणारे अनेक पुरुष असतातच की. तुम्ही तर अनमॅरीड आहात. आणि सुंदरतेकडे बघणं वाईट नाही पण त्यात वासना नसावी. तुमच्या नजरेत ती नव्हती. हे मी पहिल्या नजरेतच ओळखलं होतं. नाहीतर मी तुमच्याशी बोललेच नसते “

थोडं थांबून ती म्हणाली “आणि काय हो रात्रभर कटकट न करता आपुलकीने तुम्ही माझ्या मुलासाठी जागताय त्याबद्दल मीही तुमचे आभार मानले पाहीजेत. खरं ना? “

“नाही नाही ” मी घाईघाईने म्हणालो “अहो तुमचा मुलगा इतका गोड आहे की त्याच्यासाठी मी एक रात्र काय दहा रात्री जागून काढायला तयार आहे ” तिनं स्मित केलं आणि प्रेमाने मुलाच्या अंगावरून हात फिरवला.

नागपूर आलं. मी खाली उतरलो. तीही माझ्यामागे मुलाला घेऊन खाली उतरली. निघण्यापूर्वी मी तिच्या मुलाकडे हात पसरले. तो लगेच माझ्याकडे झेपावला. मी त्याला जवळ घेऊन त्याचे मुके घेतले. मग त्याला तिच्याकडे दिलं. रात्रभरात या पोराने मला चांगलाच लळा लावला होता.

“बेस्ट ऑफ लक फाॅर युवर इंटरव्ह्यू. मी फोन केलाच आहे. तुम्हांला कोणतीही अडचण येणार नाही ” ती म्हणाली.

“थँक्यू व्हेरी मच “

जड अंतःकरणाने मी त्यांचा निरोप घेतला.

इंटरव्ह्यूमध्ये अगदी जुजबी टेक्निकल प्रश्न विचारुन एकशेसाठ उमेदवारातून माझी निवड करण्यात आली. त्यामागे संजनाचा तो फोनच होता हे नक्की.

संजना त्यानंतर मला कधीही भेटली नाही. पण नाशिक ते नागपूरच्या त्या दहा तासात ती माझं जन्मभराचं कल्याण तर करुन गेलीच पण आंतरबाह्य सौंदर्य कसं असतं याची खुप चांगली शिकवणही देऊन गेली.

समाप्त

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted