श्री नागेश शेवाळकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “काव्यफुले” – (कविता-संग्रह) कवयित्री : सावित्रीबाई फुले ☆ परिचय –  श्री नागेश शेवाळकर ☆

पुस्तक : काव्यफुले  (कवितासंग्रह)

रचयित्री : सावित्रीबाई फुले 

प्रकाशक : घनश्याम पाटील 

चपराक प्रकाशन,  पुणे 

 [७०५७२९२०९२]

पृष्ठ संख्या: ६४

मूल्य : ₹ १५०/-

☆ काव्यफुले: समाजप्रबोधनाची सुमने! ☆

थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह सन १८५४ यावर्षी प्रथम प्रकाशित झाला. या काव्यफुलांचा टवटवीतपणा, मनमोहक सुगंध सुमारे पावणेदोनशे वर्षांनंतरही जशास तसा आहे हे जाणून तो सुगंध आजच्या वाचकांपर्यंत पोहोचला पाहिजे या जाणिवेतून श्री घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन, पुणे यांनी ९ मे २०२६ रोजी तो मनमोहक स्वरुपात पुनर्मुद्रित केला आहे. विशेष म्हणजे या काव्यसंग्रहाचे कृष्णधवल मूळ मुखपृष्ठ आतल्या पानावर छापले असून नवीन रंगीत असे आकर्षक मुखपृष्ठ ज्योती घनश्याम यांनी चितारले आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक, संशोधक संजय सोनवणी यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. या संग्रहात त्या काळातील समाजप्रबोधन हे कदाचित आजही तितकेच महत्त्वाचे नि गरजेचे आहे हे जाणून प्रकाशक पाटील यांनी हे पाऊल उचलले असल्याचे लक्षात येते.

काव्यसंग्रहातील प्रत्येक काव्य वसंततिलका, ओवी, अनुष्टुभ, अभंग, अष्ट मात्री, अक्षर छंद, दिंडी इत्यादी लेखन प्रकारात बद्ध केले आहे. तसेच त्यांचे काव्य सामाजिक जाणीव, करुणा यासोबतच आत्मभान जागविणारे, निसर्गाचे चित्रण करणारे, प्रार्थनामय, बोधात्मक, शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे, अंधश्रद्धा दूर करणारे, स्त्री शिक्षण आणि स्वाभिमान जागृत करणारे आहे. यावरून सावित्रीबाईंचा सखोल अभ्यास, ज्ञानलालसा समजून येतेच परंतु काव्यरचनेच्या माध्यमातून समाज जागृतीची तळमळही समजून येते.

विशेष म्हणजे सावित्रीबाईंनी प्रास्तविका, अर्पणिका ह्याही काव्यात व्यक्त केल्या आहेत. प्रास्तविकेत त्या काव्यात्मक रचना सादर करतात. त्याचा थोडक्यात आशय म्हणजे, ‘माझ्याजवळ जी सुगंधित काव्यफुले आहेत, त्यांची माळ तयार करून ती अर्पण करीत आहे. या काव्यफुलांच्या वाचनामुळे वाचकांना एकप्रकारची मानसिक शांती मिळेल. काव्यफुले संग्रह वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मिशनरी छापखान्याने पूर्ण केल्यामुळे त्यांचे आभार!

कोणत्याही पुस्तकाची अर्पणिका (अर्पणपत्रिका)ही महत्त्वाची असते. रचयित्री सावित्रीबाई फुले यांनी 

वसंततिलका वृत्तामध्ये लिहिलेली अर्पणिका अर्थपूर्ण आहे…

मजवर सकळाची भाव भक्ति विशाला 

हृदय भरुनि येते वाटते हे कशाला 

उपकर कृति आहे भार होई मनाला 

सुजन हितकारांना अर्पित ही सुमाला

महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याविषयी अनुष्टुभ छंदात कवयित्रीने आदरयुक्त भावना व्यक्त करताना त्यांचे सकाळी सकाळी स्मरण करावे असे सुचवले आहे…

छत्रपती शिवाजीचे। प्रातःस्मरण करावे 

शूद्रादि अतिशूद्रांचा। प्रभु वंदू मनोभावे 

नळराजा युधिष्ठिर। द्रौपदी ही जनार्दन 

पुण्यश्लोक पुराणात। इतिहासी शिवानन

महात्मा ज्योतीबा फुले हे सावित्रीबाईंचे केवळ पती नव्हते तर ते त्यांचे शिक्षक, मार्गदर्शकही होते. त्यांच्याबद्दलचा अपरंपार भाव सावित्रीबाई ‘जोतीबांना नमस्कार’ या रचनेतून व्यक्त करतात…

जोतीबांना नमस्कार। मनोभावे करतसे 

ज्ञानामृत आम्हां देई। अशा जीवन देतसे 

थोर जोति दीन शूद्रा। अतिशूद्रा हाक मारी 

ज्ञान ही ईर्षा देई। तो आम्हाला उद्धरी

‘राणी छत्रपती ताराबाई’ यांच्याबद्दल सावित्रीबाईंनी खूप छान रचना सादर करताना ताराबाईच्या शौर्याचा जिव्हाळ्याने उल्लेख केला आहे…

छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई 

कोल्हापूरची जगदंबा महिराष्ट्राची अंबाई 

शत्रुवर घाली छापा काळ तयाची ती होई 

जेरीस शत्रूला करून करी बेफाम चढाई

अगोदर लिहिल्याप्रमाणे या संग्रहात रचयित्री सावित्रीबाई यांनी अनेक विषय हाताळले आहेत. त्यापैकी नैसर्गिक काव्यात ‘पिवळा चाफा’ या पुष्पाचे गुणविशेष वर्णन करताना शेवटचे कडवे मात्र वाचकाला स्तब्ध करते. फुले लिहितात…

नेत्र नासिका

रसिक मनाला 

तृप्त करूनी 

मरून पडतो 

त्याचप्रमाणे ‘जाईचे फूल’ या काव्यातून जाईच्या फुलाचे सुरेख वर्णन ‘अक्षर बंद’ या काव्य प्रकारातून वाचायला मिळते. या रचनेचे नि काव्य प्रकाराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कडव्यात चार ओळी असून पहिल्या आणि तिसऱ्या ओळींमध्ये पाच अक्षरे असून दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत प्रत्येकी सहा अक्षरे आहेत. अक्षरांच्या संख्येचा तोल सांभाळताना रचना आशयघन, वाचनीय होईल अशी काळजी सावित्रीबाईंनी नक्कीच घेतली आहे. ह्या काव्याचा शेवट करतानाही त्या एक सामाजिक धगधगते वास्तव समोर आणतात…

रीत जगाची 

कार्य झाल्यावर 

फेकुन देई 

मजला हुंगुन 

 ‘फुलपाखरू व फुलाची कळी’ ह्या रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही कविता चार कडव्यांची असून प्रत्येक कडव्यात सोळा ओळी आहेत. या माध्यमातून कवयित्री फुलपाखरू कळीवर एकप्रकारे कसे अत्याचार करतो त्यावर प्रकाश टाकताना फुलपाखरू कळीचे रूप कसे छिन्नविच्छिन्न करून नकोसे करतो हे सांगून फुलपाखराच्या माध्यमातून एक सामाजिक रीतही त्यांनी शब्दबद्ध केली आहे. सुंदर फुले अर्थात स्त्री आणि फुलपाखरू म्हणजे समाजातील दुष्ट प्रवृत्ती ही सांगड घालताना कवयित्री सावित्रीबाई यांची सुक्ष्मदृष्टी लक्षात आल्याशिवाय राहत नाही…

रीत जगाची 

उच्छृंखल ही 

पाहुनिया मी 

स्तिमित होई

‘दिंडी’ या काव्य प्रकारातून साकारलेली ‘द्रष्टा कवी’ या रचनेत कवींची, त्यांच्या ज्ञानाची, त्यांच्याजवळ असलेल्या चौसष्ट कला आणि नवरस यांची स्तुती करताना कवयित्री लिहितात,

कधी कल्पी मी ‘विश्व’ मित्र आहे 

काव्य माझे हे प्रतिसृष्टी आहे 

दिव्य सृष्टीचे काव्य हे तयाचे 

जीणे राहते सुंदर शिव साचे

 सावित्रीबाई फुले ह्या शिक्षिका असल्यामुळे त्यांचे विद्यार्थीनींशी आणि बालकांशी जवळचे संबंध होते. शिक्षिका आणि मायेचे नाते या भूमिकेतून त्या बालकांना सुयोग्य सवयी लागाव्यात, सुसंस्कार व्हावेत म्हणून ‘श्रेष्ठ धन’ या रचनेत मोलाचा संदेश देतात…

प्रातःकाळी करी बाळा। 

शौचादि मुखमार्जन 

होऊनिया शुचिर्भूत। 

वंदू माता पिता जन

त्याच भूमिकेतून त्या ‘बाळास उपदेश’ या चारोळीतून अनमोल असे मार्गदर्शन करतात, वेळेवर काम करण्याचे महत्त्व अधोरेखित करतात…

करणे काम आजी ते। आताच कर खेचून 

जे दुपारी करायचे। ते आताच कर जाऊन

क्षणानंतरचे काम, या क्षणि कर ठोकुन 

झालं काम की नाही, न पुसे मृत्यू कारण!

आजतागायत चालत आलेली परंपरा म्हणजे नवस! या सामाजिक प्रथेवर सावित्रीबाई फुले जणू ‘आसूड’ ओढताना लिहितात…

नवस करिती। बकरू मारीन 

नवस फेडीन। बाळजन्मी ।।

धोंडे मुले देती। नवसा पावती 

लग्न का करती। नारी नर 

 ‘मातीची ओवी’ या सुंदर, आशयघन काव्यात मातीची महती अत्यंत जिव्हाळ्याने व्यक्त केली आहे. कवयित्री फुले लिहितात…

मातीचा महिमा। सांगावा किती हा 

मातीचे नाते अहा। शिवारात

सामाजिक दुर्गुणांवर सणसणीत चपराक लगावायला सावित्रीबाई मागेपुढे पाहत नाहीत. समाजात ज्या अनिष्ट चालीरीती, परंपरा किंवा दुर्गुण घर करून आहेत, त्यातही मानवप्राणी जसा चुकार, टुकार वागतो त्यावर ‘तयास मानव म्हणावे का? ‘ या रचनेत फुले पोटतिडकीने प्रकट होतात…

ज्ञान नाही विद्या नाही 

ते घेणेचि गोडी नाही 

बुद्धी असुनि चालत नाही 

तयास मानव म्हणावे का?

 

बाईल काम करीत राही 

ऐतोबा हा खात राही 

पशू पक्षात ऐसे नाही 

तयास मानव म्हणावे का?

‘सावित्री व जोतिबा संवाद’ या कवितेत पतीशी संवाद साधताना, महात्मा जोतिबा फुले यांनी आणि त्यांच्या मदतीने सावित्रीबाईंनी काय साध्य केले ते आदराने मांडतात…

सावित्री :

काळरात्र गेली। अज्ञान पळाले।

सर्वा जागे केले। सूर्याने या।

शूद्र या क्षितिजी । जोतिबा हा सूर्य 

तेजस्वी अपूर्व । उगवला|

अशारीतीने सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी लिहिलेला, यावर्षी पुनर्मुद्रित केलेला, आशयगर्भ, भावगर्भ, विचारयुक्त, प्रबोधनात्मक, चिंतनशील असा थोर समाजसेविका, शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह वाचण्यात आला…

 

परिचय : श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted