श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीता” – लेखिका : सुश्री रेणू दांडेकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीता
लेखिका : रेणू दांडेकर
पृष्ठ: १०२
मूल्य: १५०₹ –
लेखिकेचे मनोगत ::
‘भगवद्गीता’ हा महाभारतातील एक भाग आहे. संस्कृतमधील सातशे श्लोकांचे ज्ञानेश्वरांनी सुमारे नऊ हजार ओव्यांत रूपांतर केले. प्रश्न असा पडला, आपण याचं संक्षिप्त रूप कसं करायचं? भगवद्गीतेत काय आहे, सोप्या भाषेत समजून घ्यावं, असं ठरवून मी ‘गीता’ वाचत राहिले. समजलं ते लिहायचं ठरवलं आणि लिहायला घेतलं. लिहीत राहिलं तर वाटत होतं अजून अपूर्ण आहे. तहानच भागेना. या निमित्तानं समजून घेतलेलं लिहीत गेले. मुलांसाठी ती एक युद्धकथा आहे आणि मुलांना युद्धकथा आवडतात, पण ही युद्धकथा इतर युद्धांपेक्षा वेगळी आहे. कारण या युद्धकलेत रणांगणावर सगळे असतात, पण युद्धच सुरू होत नाही. आपल्याला वाटेल की, मग कौरवांनी युद्धाला सुरुवात करायची ना! अठराव्या अध्यायापर्यंत कृष्ण, अर्जुनाला, त्याच्या गोंधळलेल्या, निराश झालेल्या मनाला, मारू की मारू नको, या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी तयार करतो. अशी अवस्था मुलांची होते, पण कृष्ण ज्या पद्धतीने अर्जुनाला युद्धासाठी तयार करतो, ती पद्धत खूप महत्त्वाची वाटते. कृष्ण आज्ञा करत नाही, सक्ती करत नाही, तर कृती मागील कारणमीमांसा करताना दिसतो. अर्थात हे सारं तत्त्वज्ञान मुलांसाठी सोपं करताना अवघड होतं.
हजारो वर्षांपूर्वी लिहिलेलं महाभारत आजही तेवढंच आपल्या जीवनाला व्यापून आहे. आजच्या काळात अनेक ठिकाणी मुलं ‘गीते’तील काही अध्याय पाठ करताना दिसतात आणि अनेक मोठ्या माणसांची संपूर्ण ‘गीता’ पाठ असते, पण आजच्या विज्ञान युगात मुलांना अर्थ समजणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं. असं वाटलं, की प्रत्येक अध्यायाचा अर्थ, त्यांतील तत्त्वज्ञान सोप्या भाषेत मुलांना सांगितलं, तर मुलांना भगवद्गीतेत रुची वाटू शकेल. काळ बदलला तरी आपली अवस्था आणि अर्जुनाची अवस्था एका पातळीवर सारखीच आहे. फक्त गरज आहे ती अवघड असलेली कृष्णाची भूमिका घेण्याची. म्हणून जेवढ्या सोप्या भाषेत सांगता येईल, तेवढ्या सोप्या भाषेत सांगायचा हा प्रयत्न आहे. संस्कृत भाषेबद्दल आदर असूनही, कुठेही शक्यतो संस्कृत शब्द वापरला नाही. अध्यायाचा मुलांना समजेल अशा भाषेत तो अध्याय आणि अध्यायाच्या शेवटी चौकटीत तत्त्वज्ञानाची जमेल तेवढ्या सोप्या भाषेत, वैचारिक मांडणी केली आहे.
– लेखिका रेणू दांडेकर
– – – बाहेरच्या जगात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नुसती पोटार्थी विद्या संपादन न करता खऱ्या अर्थाने ज्ञान संपादन करण्याची गरज आहे. त्यासाठी प्राचीन ज्ञान-वारशाशी नाळ जोडली पाहिजे. हा वारसा म्हणजे प्राचीन काळात लिहिले गेलेले ग्रंथ. वेद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यांसारखे ग्रंथ म्हणजे जीवन कसे जगले पाहिजे, याचे ज्ञान देणारे भांडारच! आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले, तरी हताश न होता आपले कर्म म्हणजेच काम निष्ठेने करणे, मूल्यांना, तत्त्वांना धरून जगणे, निसर्गाचा, आपल्या आजूबाजूच्या सजीवांचा विचार करणे किती आवश्यक आहे, याचे ज्ञान या ग्रंथांतून मिळते. माध्यमिक ते महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांनी त्यांच्या संस्कारक्षम वयात या ज्ञानवारशाचा अभ्यास करावा, त्यातून त्यांच्यावर भावनिक आणि तात्त्विक संस्कार व्हावेत, या उद्देशाने या पुस्तक संचाची निर्मिती रेणू दांडेकर यांनी केली आहे. तत्त्वज्ञानाचा हा वारसा आपण जपावा आणि पुढील पिढ्यांकडे हस्तांतरित करावा, यासाठी भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेत उपलब्ध करून देण्याचा या पुस्तकाचा प्रयत्न आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





