सौ अंजली दिलीप गोखले

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ अंतरंगातील प्रवास… – संकलक : चित्कला कुलकर्णी  ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

पुस्तक : अंतरंगातील प्रवास

संकलक : चित्कला कुलकर्णी

प्रकाशिका : विद्या अनिल फडके, मनोरमा प्रकाशन.

मूल्य : रु. 550/-

पृष्ठे : 252

हे पुस्तक म्हणजे “निरोप, पुनर्भेट आणि नवा जन्म मिळाला” या तीन विषयांचे सुंदर गुंफण!

“अंतरंगातील प्रवास “ हॆ इचलकरंजी येथील चित्कला कुलकर्णी यांनी संकलित केलेले एक सर्वांग सुंदर वाचनीय पुस्तक आहे. याचे मुखपृष्ठ आपल्याला खिळवून ठेवते. व्यक्तीच्या जीवनातील आणि निसर्गातील उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतूंची ओळख या चित्रातून आपल्याला मिळते. मनोरमा प्रकाशन ने प्रकाशित केलेले आणि माय मराठी आणि इचलकरंजी मायबोली लेखन, वाचन कट्ट्यास अर्पण केलेले हे पुस्तक सर्व सजग वचकांसाठीच आहे.

या पुस्तकामध्ये आपल्याला 57 लेख वाचायला मिळतात. प्रत्येक लेख आपल्याला वेगळा अनुभव नक्कीच देते. निरोप देता घेता या भागातील नावच आपल्याला त्यातील आशय सांगून जातो. चित्कला ताईंनी निसर्गाच्या सहवासात रमत उसळीसारख्या इवल्याशा गवताच्या निरोपाचे मन हेलावून टाकणारे भावस्पर्शी वर्णन मनाला थेट भिडते. शाळेचा, कॉलेजचा, मामांच्या निरोपाच्या नारळाची गोष्ट, इंग्लंड मधल्या इपस्वीच गावाचा लागलेला लळा आणि त्या गावाचा निरोप घेताना लेखिकेच्या मनाची झालेली घालमेल वाचून आपले हे डोळे ओलेते होतात. माहेरचा निरोप तर सगळ्यांनाच रडवतो. विनयाताईंनी या निरोपाचा उपयोग सासरी आल्यावर संसाराचे नंदनवन फुलवायला करायचा, हे सांगून निरोप सुखद केला आहे. अशा निरोपाचे वर्णन वाचताना वाचक आपल्याही आयुष्यातील निरोपाच्या आठवणींमध्ये रमून जातो.

पुस्तकातील पुनर्भेट या दुसऱ्या भागामध्ये, पुनर्भेटीच्या अनेक अनुभवांमध्ये वाचक ही रमून जातो. पहिल्याच लेखामध्ये नागपूरच्या प्रज्ञा ताईंनी पहिल्याच बोलला सिक्सर मारली आणि वाचकाला धो धो पावसामध्ये ओले चिंब केले. निसर्गाला अनुभवत श्रीकृष्ण चरणी अर्पणही केले. माझा बल्लव या लेखामध्ये दीपा ताईने सात पानी ” यादों की बारात “लिहून आपल्या मनाची घालमेल, दोन ध्रुवावर दोघे आपण, ही कातर उल घाल अशी वर्णन केली आहे की आपण त्यात पूर्ण समरस होऊन जातो. म्हणूनच नक्की सांगावेसे वाटते की प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. श्रीनिवास दादांनी “इन्ही लोगोने ” या गाण्याचे केलेले विश्लेषण मनाच्या तळापर्यंत नक्कीच पोहोचते.

या पुस्तकातील प्रत्येक लेखच मनाला थेट जाऊन भिडतो. किती आणि काय वर्णन करावे हे समजेनासे होते. वैजयंती ताईंनी अल्लडवयामध्ये वाचलेल्या व पु काळे यांच्या “पार्टनर ” पुस्तकाची पुनर्भेट उतार वयामध्ये कशी पटली हे फार सुंदर शब्दात गुंफले आहे.

आणि नवा जन्म मिळाला या पुस्तकाच्या तिसऱ्या भागांमध्ये 23 लेख वाचताना वाचकाचे भान हरपून जाते. साध्या सरळ आयुष्यामध्ये एखादी घटना किती हादरवून टाकू शकते हे वाचून आपला जीवही थरारून जातो. त्या थरारक अनुभवांमधून मिळालेले पुढील पेनल्टी आयुष्य अर्थातच कसे आनंदात, समाधानात जगले जाते हे वाचून वाचकही हुश्य केल्याशिवाय राहत नाही. यासाठी चित्कला ताईंची निवड, लेखक निवड, आणि सुंदर सुंदर लेख यासाठी त्यांना दाद ही दिलीच पाहिजे. नंदनजींचा निरोप छोटा लेख. पण कलाकार कुटुंबाची आठवण त्यांनी किती जपून ठेवले आहे हे समजते.

फिनिक्स या नावामधूनच डॉक्टर असूनही सुरुवातीपासून नाट्य क्षेत्रात नट म्हणून चमकणाऱ्या नागपूरच्या डॉक्टर विजय या चमकणाऱ्या ताऱ्याचे मेडिकलच्या पहिल्याच वर्षी अपघाती हादऱ्याने आयुष्यातील भयानक परिस्थितीला कुटुंबाने कसे तोंड दिले हे वाचून खरोखरच मिळालेल्या पुनर्जन्माचे सार्थक त्यांनी केले हे समजून येते.

इचलकरंजीच्या डॉक्टर सुरेश यांनी वंध्यत्वाचे स्त्रियांवर होणारे मानसिक परिणाम आणि त्या समस्यांमधून त्यांची सुटका करून त्या कुटुंबाला मिळवून दिलेला आनंद खूप छान वर्णन केला आहे. त्या कुटुंबाला आईला आणि बाळाला नवा जन्म देण्यामध्ये डॉक्टर निश्चितच यशस्वी ठरले आहेत.

कैलास दर्शनाचा सुमुख यांचा सुखद अनुभव प्रभाताई यांनी कुशलतेने लिहिला आहे. गाभाऱ्यातल्या कारुण्य सिंधूचे दर्शन घेणारा शब्द गोठलेला मी केवळ सूक्ष्म मानवी बिंदू झालो होतो जणू! या मधूनच या यात्रेची सार्थकता आपल्यापर्यंत पोहोचते.

हर्षदा ताईंना आलेला भयानक अपघाताचा अनुभव वाचून मनाचा थरकाप होतो. पण त्यांच्या मनामध्ये इनरव्हील सेवा रुजल्यामुळे त्यामधून किती मोठे समाजकार्य पुढील आयुष्यात घडले हेही समजते जे खूप वाचनीय आहे.

घरच्या जर्मन शेफर्ड च्या हल्ल्याने घडलेला थरकाप तो प्रसंग स्मिता ताईंनी खुबीने रेखाटला आहे. त्या प्रसंगाचे परिणाम वाचताना वाचकही भीतीने थरारून जातो.

एकीची समाजसेवेची आवड गृहिणी असूनही या कार्यामध्ये झोकून देऊन कसे कार्य करते, केले हे अनुपमा ताईंनी थोडक्यात शब्दात छान सांगितले.

फक्त या भागातलेच नाहीत तर सर्व पुस्तकांमधले सर्वच लेख अप्रतिम! प्रत्येक लेखांमधून खूप काही शिकायला मिळते. सगळे प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात. पुस्तक वाचायला घेतले की पूर्णत्वाला नेल्याशिवाय खाली ठेववतच नाही.

चित्कला ताईंचे मार्गदर्शन, सर्व लिहित्या हातांचे प्रयत्न, वैचारिक मनाचे स्पंदन असलेले ” अंतरंगातील प्रवास ” पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचलेच पाहिजे.

चित्कलाताई, आणि त्यांच्या सर्व टीमला नवोदित उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

परिचय :  अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted