श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
🕺🤣 खाणं आणि पिणं ! 🤣😅 श्री प्रमोद वामन वर्तक ☆
लेखाच शिर्षक वाचून खवय्ये आणि पिवय्ये (हा मी न पिता शोधलेला शब्द) हे दोघंही खूप खूष झाले असतील ! तशी या दोन्ही कॅटेगरी मधल्या लोकांची आपल्याकडे कधीच कमतरता नव्हती आणि पुढील काळात यातील खवय्यांची संख्या जरी डाएटच्या नवं नवीन फ्याडामुळे कमी होतं गेली तरी पिवय्यांची संख्या पुढील काळात वाढतीच राहील, हे सांगायला कोणी कुठलंही पेय प्यायची गरज नाही ! कारण न पिणारा किंवा पिणारी ही जमात हल्ली जवळ जवळ नामशेष होत चालली आहे. त्याची कारणं वगैरेचा उहापोह करण्यासाठी आणि “पिणं” या एका शब्दावर लिहायचं झालं तर त्यासाठी एक वेगळा स्वतंत्र लेख लिहावा लागेल ! आणि तो सुद्धा “संध्याकाळी व्यवस्थित बसूनच” लिहावा लागेल, हे व्होडका आणि डिस्टील वॉटर इतकं पारदर्शक सत्य आहे ! वाचकहो आता नमनाला एवढं तुम्हाला “हाय” करून झाल्यावर, (झाला नसलात तरी) मूळ विषयाकडे माझी गाडी वळवतो.
आज मी हा जो “खाणं” शब्द घेतला आहे त्याचा आपल्या हातांशी आणि तोंडाशी काडीचा संबंध नाही. त्याच काय आहे नां मंडळी, आपली मराठी भाषा इतकी प्रगल्भ आहे की आपल्या या “अभिजात मराठी भाषेत” (इतक्या वर्षांनी कां होईना, पण मिळाला बाबा एकदाचा अभिजात भाषेचा दर्जा आपल्या माय मराठीला !) असे अनेक शब्द आहेत, की त्यातील एकेका शब्दाचे अनेक अर्थ होतात हे आपण सुज्ञ वाचक असल्यामुळे जाणताच. त्यामुळे खाणं हा शब्द वाचल्या वाचल्या आपल्या डोळ्यासमोर नाष्ट्यापासून आपल्याला आपल्या जेवणात असलेले आपले आवडीचे काही पदार्थ येणं, हे आपण खऱ्या अर्थाने खवय्ये नसालत तरी, स्वाभाविकच आहे. त्याला तुमचा इलाज नाही, पण मी “खाणं” या शब्दाचे आपल्याला जे अर्थ सांगणार आहे, त्याचा वर म्हटल्याप्रमाणे खऱ्या खाण्याशी काडीचा, अगदी टूथपीकइतका सुद्धा संबंध नाही ! त्यामुळे आपण थोडा डोक्याला ताण दिलात आणि पुढील लेख, डोक्यातील आणि डोळ्यासमोर आलेले खाण्याचे पदार्थ आणि मनांतली भूक काढून टाकून वाचलात, तर मी काय म्हणतोय ते आपल्या सारख्या प्रगल्भ वाचकांना नक्कीच कळेल. लेख वाचून झाल्या नंतरच आपण आपल्या रसना देवीला आपले आवडीचे खरं खाणं खाऊन तृप्त करावे अशी नम्र विनंती ! असो !
तर मंडळी, लहानपणी आपण सगळेच घरीदारी, शाळेत दंगामस्ती करत मोठे झालो हे जवळजवळ सगळेच वाचक मान्य करतील. त्यामुळे माझ्या पिढीतील (सध्या वय फक्त ७२!) त्या वेळच्या मास्तरांच्या हातचा मार मी कधीच खाल्ला नाही, हे असं कुणी म्हणणं निदान मला तरी न पटणार आहे. अर्थात “त्याकाळी” मुलींनी आणि मुलांनी केलेली दंगामस्ती यात, “हल्लीची” हिंसक दंगल आणि एखादा खरोखरचा निषेध मूक मोर्चा इतकं अंतर होत, हे ही तितकंच खरं. पण आत्ताची मुला मुलींची दंगामस्ती एकमेकांवर सर्वच बाबतीत कुरघोडी करण्यापर्यंत गेली आहे, हे ही एक आजच वास्तव आहे, यात दुमत असण्याचं कारण नाही. म्हणून आपले आई, वडील अथवा शिक्षक कितीही प्रेमळ असले आणि त्यांच्या हातचा मार आपण कधीच खाल्ला नसेल असं आपण गृहीत धरलं तरी, आपल्याला त्यावेळेस त्यांच्या हातांच्या ऐवजी कडक “शब्दांचा मार” नक्कीच खावा लागला असेल, हे आपण आत्ता तरी नक्कीच मान्य करायला हरकत नसावी !
कधी कधी आपण एकटेच आपल्या विचारांच्या तंद्रित बाहेर पडलेले असतो. डोक्यात काही ना काही विचारचक्र चालू असतं, काहीतरी टेन्शन असतं, कसली तरी समस्या भेडसावतं असते. बाहेर पडल्यावर फिरून आल्यावर जरा बरं वाटेल, या एकाच उद्देशाने आपण निरर्थकपणे निघालेलो असतो. अशावेळी आपल्या विचारांची तंद्री भंग करणारी आपल्या नावाची हाक आपल्या कानावर पडते. आपण हाक आलेल्या दिशेने चमकून बघतो तर आपल्याला एक ओळखीचा चेहरा दिसतो. त्याच नांव आठवायचा आपण प्रयत्न करतो पण तो पर्यंत तो जवळ येताच, आपण उसन हसून “काय कसा आहॆस?” असं विचारून वेळ मारून नेतो. नंतरचा पाऊण एक तास, आपल्याला ज्या विषयात अजिबात इंटरेस्ट नाही असे अनेक वेगवेगळे विषय काढून तो आपलं डोकं “खाण्यात” घालवतो आणि आपण सुद्धा न रागावता नाईलाजाने मधून मधून त्याच्या भाषणाला प्रतिसाद देत असतो ! त्याला जरा घाईत आहे असं सुचवून देखील, तो अट्टाहासाने आपल्या डोक्याबरोबर आपला (बहुमूल्य?) वेळ सुद्धा “खात” असतो !
Other side of the grass is always greener ! ही इंग्रजी म्हण, काही काही लोकांच्या बाबतीत अगदी बररोब्बर लागू पडते मंडळी ! म्हणजे कसं असतं नां, स्वतःकडे सगळं काही असलं तरी दुसऱ्याकडे असलेली आणि आपल्याकडे नसलेली एखादी वस्तू बघून, त्याच्यावर हे अल्पसंतुष्ट लोकं उगाचच “खार” खात असतात. पण त्यात त्यांचच नुकसान आहे हे कळण्याच्या पलीकडे त्यांची विचारांची उडी तो “खार” खाण्याच्या नादात पोहचतच नाही, त्याला आपण तरी काय करणार ? एखाद्याचा असा “खार” खाण्याचा स्वभाव बदलणं हे महाकर्म कठीण !
एखाद्या कलेत अथवा कुठल्याशा विषयात थोडी फार पारंगत असलेली व्यक्ती त्याला किंवा तिला ती कला कोणी सादर करायला सांगितली, तर काहीतरी कारण सांगून तो किंवा ती उगाच “भाव” खात असते ! अशावेळी आपण त्याला किंवा तिला कितीही आग्रह केला, तरी ती किंवा तो अजिबात बधत नाही म्हणजे नाहीच ! या मागे त्याच किंवा तिच अर्थकारण सुद्धा असू शकत असं मग अनेक माणसांना तसं नसलं तरी, वाटून जातं. या अर्थकारणावरून मला काही काही लोकांचं आजकाल बोकाळलेले दुसरच खाणं आठवलं. म्हणजे कसं आहे नां मंडळी, हल्ली काही काही लोकं कुठल्याही कामात “मेरा क्या?” असा सवाल करून, तर कधी कधी असा सवाल न करताच चक्क “पैसे खातात !” आणि अशी एखादी अती खादाड व्यक्ती जर चुकूनमाकून ACB च्या जाळ्यात अडकली तर त्याला बोल लावणारे लोकं, कारण कळेपर्यंत ऑफिसात “शेण खाल्लं” असेल असं बोलायला मोकळे ! मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्याच तोंड कसं धरणार? काय बरोबर नां?
एखाद्या भांडणाचं पर्यवसान हातघाईवर येण्या आधी जेंव्हा फक्त तोंडापर्यंत मर्यादित असतं तेंव्हा, दोन्ही भांडणारे गट एकमेकांना यथेच्छ “शिव्या खायला” घालतात ! अशावेळी झालेला “अपमान खाता” येत नाही आणि त्यासोबत आलेला राग सुद्धा खायचा म्हटलं तरी कोणी खाऊ शकत नाही. पण त्याला पर्याय म्हणजे अशावेळी आलेला राग आणि झालेला अपमान हे दोन्ही “गिळायची” सोय आपल्या अभिजात मराठी भाषेत आहे ! काही काही लोकं त्यांना आलेला राग व्यक्त करण्यात पण कमी पडतात आणि मग नाईलाजाने स्वतःचेच “दात ओठ” खात बसतात ! ही अशा लोकांची हतबलता मानली तरी त्याला सुद्धा काही लोकं ऐन मोक्याच्या ठिकाणी त्यानं “कच खाल्ली” असं म्हणून मोकळे होतात, आता बोला !
काही काही लोकांच बरं असतं, म्हणजे ते लोकं कुठे बाहेर चालले आहेत आणि आपण जर त्यांना हटकून विचारलं की “कुठं पर्यंत?” तर ते लगेच उत्तर देतात “जरा हवा खाऊन किंवा ऊन खाऊन येतो!” आता या दोन्ही खाण्यामुळे त्यांच पोट नक्कीच भरणार नसतं, तरी हवा खाऊन किंवा ऊन खाऊन असे शब्द सहजपणे त्यांच्या मुखातून बाहेर पडतात आणि त्या मागचा खरा अर्थ, विचारणारा सुद्धा लगेच जाणतो हीच आपल्या अभिजात मराठीची खरी खासियत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये ! काही लोकं बोलतांना सांभाषणातले अधले मधले “शब्दच खातात. ” जर का अशा माणसाचा तो ड्रॉबॅक संभाषण कर्त्याला ठाऊक असेल तर ठीक, नाहीतर एखाद्या नवख्या माणसाला तो नक्की काय बोलतोय हे कळण जरा अवघडच जातं मंडळी !
वाचकहो, लेखाच्या शीर्षकातल्या पहिल्या “खाणं” या शब्दाचा माझ्या बुद्धीप्रमाणे आणि मला माहित असलेल्या न खाण्याच्या प्रकारांच्या उल्लेखाने उहापोह करून झाल्यावर, आता दुसऱ्या “पिणं” या शब्दाकडे मी कधी येतोय, याची वाट अनेक पिय्यकड लोकं घसा सुखा करून वाट बघत असतील ! पण त्यांच्या पदरी आज तरी निराशा येणार आहे आणि त्याला माझा ईलाज नाही मंडळी ! म्हणजे मी या लेखाच्या सुरवातीलाच आपल्याला क्लिअर केलं होतं, की “पिणं” या शब्दावर लेख लिहायचा झाल्यास तो लिहिण्यासाठी एखाद्या “संध्याकाळी व्यवस्थित बसूनच” लिहावा लागेल, काय आठवतंय का ? आणि न खाणं खायचा हा लेख वाचायच्या नादात आपण जर ते विसरला असाल, तर आपल्याला मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. लेखाचा पहिला परिच्छेद पुन्हा एकदा नीट वाचा ! आता तरी पटली खात्री तुमची ? मग आता मला सांगा, “पिणं” या शब्दावर मी लेख लिहावा असं ज्याला वाटतंय, तो मला त्याच्या घरी (अगदी कुठेही!) एखाद्या संध्याकाळी “व्यवस्थित बसायला” कधी बोलावतोय ? काय म्हणता, माझा पत्ता माहित नाही. अहो मंडळी, असं काय करता, लेखाच्या खाली माझं पूर्ण नांव, पत्ता आणि कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईल नंबर पण दिला आहे. मग वाट कसली बघता ? पटकन तुमचा मोबाईल उचला आणि माझी तुमच्या बरोबरची अशी एखादी “व्यवस्थित संध्याकाळ” आजच बुक करा !
आपल्या फोनची वाट बघणारा
आपलाच,
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





