श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
🙏 जागा! 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ☆
*
हृदयी जागा तू अनुरागा
प्रीतीला या देशील का
*
हे शांता शेळके यांनी लिहिलेलं आणि लताबाईंनी गायलेलं भावगीत कितीही जुन झालं, तरी माझ्या पिढीतील लोकांच्या मनांत अजूनही रुंजी घालत आहे. आता माझ्या पिढीतील म्हटल्यावर, इथं मी माझं वय सांगणं अपेक्षित आहे, पण ते सांगण्याची ही जागा नाही! बायकांनी आपलं वय लपवू नये असा जरी खरा-खोटा अलिखित दंडक असला, तरी तो पुरुषांना लागू नाही असं म्हणतात (कोण ते माहित नाही! ) तरी माझं वय सांगण्याची घाई मी या जागी नक्कीच करणार नाही मंडळी!
तर त्या भावगीतात म्हटल्या प्रमाणे त्या गाणाऱ्या नायीकेची आपल्या प्रियकराकडून जागेच्या बाबतीत त्या काळी किती माफक अपेक्षा होती बघा! ती फक्त त्याच्या हृदयात जागा मागत्ये, आत्ताच्या लग्नाळू मुलींसारखी ३ बीएचके असेल तरच तुझ्याशी लग्न करीन, असं म्हणायचं धाडस तेव्हाच्या मुलीत नव्हतं! किंबहुना २- ३ बीएचके ही जागेच्या बाबतीतली कन्सेप्टच त्याकाळी अस्तित्वात नव्हती! चाळीतली एखादी जिन्याखालची सिंगल रूमची जागा, ज्या जागेत धडपणे उभं सुद्धा राहता येणार नाही अशी जागा सुखाचा संसार फुलवायला पुरेशी होती! कारण तेंव्हा जागा कितीही मुबलक असल्या तरी खिशात नगद नारायणाचा ठणठनाट! त्यामुळे मिळेल त्या इतकुश्या जागेत सुद्धा अनेकांचे संसार नेटाने आणि आनंदाने फुलत होते. नुसते फुलत नव्हते, तर आपण आता गिरगांव किंवा दादरच्या एखाद्या चाळीतल्या सुखवस्तू जागेत रहायला आल्यावर, गावात असलेल्या आपल्या नातेवाईकांना सुद्धा आपल्याच चाळीत एखादी जागा कशी मिळेल, याच विचारात मग घरचा कर्ता पुरुष असायचा आणि त्या कर्त्या पुरुषाच्या त्या विचाराला, त्या घरातली कर्ती बाई मनापासून दाद देत सर्वार्थाने मदत करायची. हे असं सगळं तेंव्हा असायचं कारण म्हणजे रहायची जागा कितीही लहान असली, तरी सगळ्यांच्या हृदयात आपल्या माणसांसाठी खूप मोठी जागा होती! आणि आता….. ४ बीएचके असला तरी, कोणी पै पाहुणा येणार म्हटल्यावर आपली बेडरूम त्यांच्या बरोबर कोणी शेअर करायची यावरून घरात भांडण होण्या पर्यंत मजल जाते. काही माणसांची रहायची जागा कितीही मोठी असली तरी त्यांच्या ह्रदयात चार दिवसासाठी आपल्याकडे येणाऱ्या जवळच्या नातलगांसाठी तसूभर सुद्धा जागा उरली नाही, हे आजच एक कटू वास्तव आहे!
जागा मग ती कुठलीही असो, ती मानवाला नेहमीच कमी पडत आलेली आहे, हे त्रिवार सत्य आहे! म्हणजे चाळीत रहाणारा जरा सधन झाल्यावर वन रूम किचन का होईना पण फ्लॅट घ्यायचा ध्यास घेतो. मग वन नंतर टू, थ्री, फोर….. जसा खिसा मोठा तशी जागा! काही काही धनाढ्य लोकांच्या स्वप्नांना इतके पंख फुटतात की तो फक्त चार पाच लोकांच्या संसारासाठी एक सत्तावीस मजली राजवाडासदृश इमारतच बांधतो!
जागा हा शब्दच जणू माणसाच्या पाचवीला पूजलेला आहे. म्हणजे असं बघा मंडळी, त्याच्या जन्माच्या आधी होणाऱ्या आईच नांव एखाद्या नर्सिंग होम मध्ये घालून येणाऱ्या बाळाची जागा तिथे बुक करावी लागते, म्हणजे आयत्यावेळी उगाच धावपळ नको! हे असे बाळावर त्याच्या जन्माच्या आधीपासून जागेबाबत झालेले संस्कारच त्याला पुढील संपूर्ण आयुष्यात उपयोगी पडतात, असं माझं तरी ठाम मत आहे बुवा! म्हणजे बाळ थोडं मोठं झाल्यावर, आई वडील नोकरीला जाणार, मग बाळाला दिवसभर सांभाळण्यासाठी एखाद्या चांगल्याशा, घराजवळ असलेल्या पाळणाघरात जागा बघा. ते आणखी थोडं मोठं झाल्यावर घराजवळच्या इंग्लिश मिडीयमच्या शाळेत कधी ओळख काढून, कधी डोनेशन देऊन जागा मिळवा. आता बाळाचा बाळ्या झाल्यामुळे त्याला दाढी मिशीबरोबर थोडी जास्तच अक्कल आलेली असते, त्यामुळे मी जाईन तर अमुक तमुक कॉलेजला नाहीतर मला पुढे शिकायचंच नाही असा हट्ट तो करू लागतो. मग त्याच्यावरील प्रेमापोटी त्याची लायकी नसतांना मॅनेजमेंटच्या कोट्यातून(? ) त्याच्यासाठी त्या कॉलेजला सीट (जागा) मिळवली जाते!
शिक्षण पूर्ण करून मग नोकरी मिळाल्यावर ट्रेन मध्ये चौथी जागा मिळवण्यासाठी करावी लागणारी धडपड, कधी कधी त्यासाठी कारशेड पर्यंत करावा लागणारा प्रवास, नोकरीतल्या अस्थिर वातावरणात आपली जागा पक्की करण्यासाठी करावे लागणारे लांगूलचालन! एक ना अनेक प्रकारे मी सुरवातीला म्हटल्याप्रमाणे, बाळावर त्याच्या जन्माधीपासून झालेले जागे बाबतचे संस्कार, त्याला असे पुढील आयुष्यात उपयोगी पडतात!
जागेच महात्म्य अगदी आपण रोज कुठे झोपतो इथपासून सुरु होतं. खरं नाही वाटत? मग जरा आठवून बघा, कधीतरी तुमची रोजची झोपायची जागा जरी बदलली तरी निद्रादेवी निदान काहीकाळ तरी तुमच्यावर रुसून बसते की नाही? इतकी सवय आपल्याला त्या जागेची झालेली असते हे ही तितकंच खरं.
आता टू व्हीलर म्हटली की ती फक्त दोन माणसांनी एकामागे एक असलेल्या सीटवर बसून, पुढच्या व्यक्तीने चालवायची, असा आपला समज! पण तो समज हल्ली सर्रास पायदळी तुडवला जातोय हे आपण सगळेच नाईलाजाने आणि उघड्या डोळ्यांनी बघतोय. बरं अशा एखाद्या ३-४ माणसं घेऊन जाणाऱ्या कसरतपटूला तुम्ही चार गोष्टी सांगायला गेलात, तरी त्याच्या मेंदू नसलेल्या डोक्यातील रिकाम्या जागेत ते शिरेल याची खात्री नाही. पण मंडळी तुम्हाला सांगतो, अशाच एका बाईक स्वाराला बघून स्व. रतन टाटा यांच्या कल्पक मेंदूत फक्त एक लाख किंमत असलेली “न्यानो” फोर व्हीलर बनवण्याची कल्पना स्फूरली व त्यांनी ती प्रत्यक्षात आणून अनेक मध्यम वर्गी्यांचे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण करून, त्यांच्या हृदयात स्वतःसाठी एक वेगळीच जागा निर्माण केली, हा इतिहास तसा ताजा आहे!
मंडळी माझ्या हृदयात एक जागा मी एका माणसासाठी राखून ठेवली आहे. आपण विचाराल कोण तो माणूस? सांगतो सांगतो. आपण सगळ्यांनीच कधीतरी एसटीने प्रवास केलेला असेल. तर एसटी स्थानकात एसटी थांबल्या थांबल्या खिडकीच्या दांड्याला एका हाताने लटकून दुसऱ्या हाताने आपला रुमाल आत टाकून, जागा अडवण्याची क्लूप्ती ज्याच्या डोक्यातून आली त्या माणसाला मला भेटायची फार म्हणजे फारच इच्छा आहे मंडळी. मला तर वाटतं कमी अधिक फरकाने एखाद्या फुकटच्या कार्यक्रमात आपल्या पत्नीसाठी किंवा मित्रासाठी बाजूच्या रिकाम्या खुर्चीवर रुमाल किंवा आपली बॅग ठेवून जागा अडवायची या आयडियेचा तोच बहुदा प्रणेता असावा, अशी मला खात्री आहे!
मुबंईसारख्या ठिकाणी भीक मागणाऱ्या लोकांची रोजची बसायची जागा सुद्धा ठरलेली असते, हे मी काही नव्याने सांगायला नको. आणि ती आपली जागा ही जणू आपलीच जहागिरी आहे अशा थाटात तो भिकारी वावरत असतो. मध्यंतरी मी पेपरला एक बातमी वाचली होती, एका भिकाऱ्याने त्याच्या जागेवर दुसऱ्या भिकाऱ्याने येऊन भीक मागितली म्हणून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.
“मानलं बुवा साहेबांना, त्याला त्यांनी पक्षातली त्याची जागा आपल्या भाषणातून काय दाखवून दिली, खरंच कमाल आहे साहेबांची! ” हे असले संवाद आपण कुठल्याही पक्षाच्या आतील गोटात असाल तर नक्कीच ऐकायला येतील. आपल्या भाषणातून किंवा कृतीतून कोणाला तरी कधीतरी त्याची खरी जागा दाखवून द्यायला फार पूर्वी लोकांना आवडायचं. पण हल्ली तेवढी प्रगल्भ भाषा ना नेत्यांच्या ना सामान्य माणसाच्या मुखातून बाहेर येते. हल्ली भांडणाच्या जागेवरच स्वतःच्या कुवती नुसार आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्याची जागा दाखवली जाते!
मुंबईकर आणि जागा यांचा एक अतूट संबंध आहे मंडळी. हां आता खरे मुंबईकर कोणाला म्हणायचं यावरून वाद नक्कीच होऊ शकतो, कारण मुंबई ही एक भली मोठी गुळाची ढेप म्हटल्यावर साऱ्या देशातून निरनिराळे काळे लाल मुंगळे त्या ढेपेत आपापली जागा निर्माण करण्यासाठी त्या ढेपेला डसू लागल्यावर मुंबईचे असे हाल होणार हे स्वाभाविकच आहे. मग तिच्या विस्तारासाठी समुद्राला मागे हटवून नरिमन पॉईंट सारखी जागा निर्माण करण्यात आली. पण ती जागा सुद्धा कमी पडत्ये असं लक्षात आल्यावर नवी मुंबई निर्माण करून अधिक जागेची निर्मिती करण्यात आली. पण मानवाची जागेची भूक थांबायचं काही नांव घेत नाही, त्यामुळेच आता तिसरी मुंबई निर्माण करून अधिक जागा निर्माण केली जाणार आहे, आता बोला!
आता तर पृथ्वीवरची जागा कमी पडत्ये म्हणून की काय मानव चंद्रावर आणि मंगळावर वस्ती करण्याची स्वप्नं बघू लागला आहे! अर्थात स्वप्न बघण्यासाठी कोणाला कुठल्याच जागेची अडचण असण्याचा प्रश्नच नाही, पण हे स्वप्नरंजन करत असतांना आपल्यावर राज्य करणाऱ्या निसर्गाचा मानवाने जरा तरी विचार करावा, नाहीतर अधिक जागा मिळवण्याच्या मानवाच्या प्रयत्नांना तो मानवाची या पृथ्वीवरील योग्य ती जागा दाखवण्यास पुढे मागे बघणार नाही हे ही तितकच खरं!
मला असं मनापासून वाटत की प्रत्येकानेच स्वतःच्या चांगल्या वागणुकीने, जमेल तशी जमेल तेंव्हा इतरांना मदत करून लोकांच्या हृदयात स्वतःसाठी एक छोटीशी का होईना पण कायमची एक जागा निर्माण करायचा प्रयत्न आयुष्यभर करत रहावा!
शेवटी, माणूस कितीही धनाढ्य असला, अगदी जगातील सर्वात श्रीमंत असला तरी त्याला त्याच्या मृत्यूनंतर फक्त तीन बाय सहाची जागा पुरते, हे जेंव्हा त्याला उमगेल तो खरा सुदिन म्हणायचा! बघा पटतंय का?
शुभं भवतु!
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



