श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- “त्यादिवशी तुम्हीच म्हणाला होतात ना कीं बँकेच्या नियमात बसेल तीच शिक्षा करणं आम्हाला शक्य होईल असं? शिवाय या सर्व व्यवस्थेवरही सर्वाधिकार असलेली एक अदृश्य अशी ‘देवाची यंत्रणा’ असतेच आणि तो पहात असतो सगळं असंही तुम्ही म्हणाला होतात. त्याच्या हातातल्या आवाज नसणाऱ्या काठीने आता तोच योग्य तो न्याय करेल असं तुम्ही सांगितलंत ते पटलं होतं मला. म्हणूनच हे तक्रार मागं घेत असल्याचं पत्र मी त्याच दिवशी लिहून ठेवलं होतं…!”आजोबा शांतपणे म्हणाले. भारावलेल्या अवस्थेत मी थक्क होऊन पहात राहिलो फक्त!!)

माझ्या समोरचा किचकट होऊन बसलेला अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न असा सहजासहजी सुटणं हे त्या क्षणापुरतं तरी मला स्वप्नवतच वाटलं होतं. आजोबांचे  आभार मानायला माझ्याजवळ शब्दच नव्हते. पण या औपचारिकतेचा विचार मनात येण्यापूर्वीच त्या भारावलेल्या अवस्थेत एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा मी जागचा उठलो आणि त्यांना वाकून नमस्कार केला. ते भांबावले. चटकन् दोन पावलं मागे सरकले…

“अहो.. कमाल करताय तुम्ही.. काय करताय हे?..”

“योग्य तेच तर करतोय आजोबा. आत्ता या खेरीज तुमच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी दुसरं कांहीच करू शकत नाहीय. खरंच खूप आभारी आहे मी तुमचा…”

“आभार आम्ही तुमचे मानायला हवेत..” हातात चहाचा ट्रे घेऊन आलेली त्यांची मुलगी म्हणाली.” त्या घटनेचा बाबा खूप त्रास करून घेत होते. त्यांच्या जीवनमरणाचाच प्रश्न बनवला होता त्यांनी तो. आता तुम्ही समजावल्यामुळेच तर ते सावरलेत..”

त्यादिवशी आजोबांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो ते  बरंच कांही अनपेक्षितपणे मिळाल्याचं समाधान घेऊन. जे घडलं ते मनावरचं ओझं हलकं करणारं होतं हे खरंच, पण ते जसं आणि ज्या क्रमानं घडलं ते मलाच अचंबित करून गेलं होतं. मनातला अंधार जादूची कांडी फिरवावी तसा क्षणार्धात नाहीसा झाला होता आणि मनात भरून राहिलेल्या लख्ख प्रकाशात मला जाणवू लागला होता फक्त.. ‘तो’..! ‘त्या’च्या कृपालोभाशिवाय हे सगळं असं घडणं शक्य तरी होतं कां? या घटनेपर्यंतच्या, पावलोपावली अचानक समोर येत गेलेल्या असंख्य, अंधाऱ्या अशा टोकदार वळणांवर प्रत्येकवेळी मला सोबत करणाऱ्या ‘त्या’नेच मला या प्रकाशवाटेवर आणून सोडलेलं होतं! पण तरीही हे सगळं घडवत असताना स्वत: मात्र अलिप्त राहून त्याने  माझ्याचकडून सगळं करवून घेतलेलं होतं जसंकांही!

चार दिवसांपूर्वीच अतिशय अस्वस्थ मन:स्थितीत स्वत:ची निकड सोबत घेऊन प्रथमच सहस्त्रबुद्धे आजोबांच्या दाराची बेल मी वाजवली होती तो क्षण, आणि जे आणि जसं मला हवं होतं ते सगळं स्वखुशीने स्वत:च माझ्या स्वाधीन करून आज सहस्त्रबुद्धे आजोबांनी मला अतिशय समाधानाने निरोप दिला होता तो क्षण, यामधले अस्वस्थ करणारे, माझी उलघाल वाढवणारे कितीतरी प्रसंग मनात जिवंत झाले पुन्हा! आज तेच सगळे प्रसंग पुन्हा जगताना त्यातला प्रत्येक क्षण, त्या त्या वेळी वखरेसाहेबांनी,

प्रभूदेसाईंनी आणि सहस्त्रबुध्दे आजोबांनीही माझ्या विचारांना दिलेल्या परस्परविरोधी दिशा, त्यामुळे माझ्या मनात निर्माण होत राहिलेली अस्वस्थता न् अनिश्चितता, आणि त्या त्या प्रत्येक क्षणी स्वतःच्या सोयीचा आणि स्वार्थाचा लवलेशही नसलेली, माझ्याकडून माझ्याही नकळत जपली गेलेली सकारात्मकता! हे सगळं माझं कर्तृत्त्व नसून त्या त्या नेमक्या क्षणी ‘त्या’ने दिलेली प्रेरणाच होती आणि मी फक्त निमित्तमात्र! हे असंच सगळं अगदी खरं होतं पण ते फक्त माझ्यापुरतं. बाकी कुणालाच,अगदी वखरेसाहेबांनाही यामागची माझी भावना आणि यातलं तथ्य याच तीव्रतेने जाणवणं आणि पटणं अपेक्षितही नव्हतंच!

आणि म्हणूनच  ‘आपलं काम झालंय. सहस्त्रबुद्धे आजोबांनी त्यांची तक्रार मागे घेतलीय आणि तसं पत्रही दिलंय’ एवढंच सांगून मी ते पत्र वखरे साहेबांच्या समोर ठेवलं तेव्हा स्वतःच्याच कानांवर विश्वास नसावा तसे ते आश्चर्याने माझ्याकडे पहातच राहिले.

“काय सांगताय..? कसं काय?..” त्यांनी विचारलं. कसं ते त्यांना मोजक्या शब्दांत मी सांगितलं तेव्हा मात्र प्रभूदेसाईंना ‘अॅडव्हायझरी मेमो’ द्यायची सूचना आणि गरज सहजपणे स्वीकारणं त्यांना थोडं कठीण गेलं. ते सहाजिकच होतं. पण सगळी पार्श्वभूमी त्यांना सांगितल्यानंतर तसा मेमो देण्याची गरज आणि अपरिहार्यता त्यांनी समजून घेतली आणि त्यामुळे पुढे प्रभूदेसाई स्वतःवर अन्याय झाल्याच्या भावनेने बरेच नाराजही झाले. तरी मुख्य म्हणजे अचानक उभ्या ठाकलेल्या आमच्यासमोरच्या या अकल्पित संकटातून आमची अर्थातच या सुखांताने पूर्णतः सुटका झाली होती! अर्थात या सगळ्या मागचा करता-करवता ‘तो’च होता हे इतर संबंधितांपर्यंत न पोचलेलं सत्य माझ्यासाठी मात्र मला उभारी देऊन गेलं होतं!!

मनावर कायमचा कोरला गेलेला हा प्रसंग या लेखनाच्या निमित्ताने पुन्हा जगताना प्रत्यक्षात न जाणवलेले अनेक दुवे मला प्रथमच जाणवले. प्रमोशननंतर माझं पुण्यातल्या झोनल ऑफिसला झालेलं पोस्टींग पुढे अनेक अर्थांनी माझ्या उर्वरित आयुष्याला अतिशय उत्कट समाधान आणि कृतार्थता वाटावी अशी वेगळीच कलाटणी देणारं ठरणार होतं जे त्याक्षणी माझ्यासाठी अज्ञातच होतं.आज जाणवतंय ते हेच कीं सहस्त्रबुद्धे आजोबांच्या संदर्भातला हा अनोखा अनुभव पुढे घडू पहाणाऱ्या अनपेक्षित अशा आनंददायी घटनांचं सूचन करणाराच तर होता! फक्त मला ते त्याक्षणी जाणवलं नव्हतं एवढंच!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted