श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ महावस्त्राचे पदर – भाग १० – ‘बहीण-भाऊ’ (अतूट विश्वासाचा रेशीमबंध) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
’नात्यांचं महावस्त्र’ विणताना आपण आतापर्यंत आईची ‘मायेची पैठणी’, बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’, आजीची ‘संस्कारांची शिदोरी’, आजोबांचे ‘सुरकुत्यांमधील शहाणपण’, मामाचा ‘माहेरचा समृद्ध दुवा’, मावशीची ‘आईची प्रतिछाया’, आत्याचा ‘बाबांच्या बालपणाची जपणूक करणारा कोपरा’ आणि काकांचा ‘कुटुंबाचा आधारस्तंभ’ हा समृद्ध प्रवास अनुभवला. या महावस्त्रातील सर्वात खोडकर, निष्पाप, पण तितकाच जिवाभावाचा आणि अथांग विश्वासाचा रेशमी धागा म्हणजे ‘बहीण-भाऊ’! हा असा रेशमी धागा आहे, ज्याच्या उल्लेखाशिवाय हे महावस्त्र पूर्णच होऊ शकत नाही.
हे नातं जगातील सर्व नात्यांपेक्षा वेगळं आणि विलक्षण असतं. यात रक्ताचा घट्ट बंध असतोच, पण माया देखील तेवढीच अथांग असते. एकाच घरात, एकाच छताखाली वाढलेली ही धाकली पाती असतात. महावस्त्राच्या धाग्यांमधील हे अतूट असे रेशीमबंध! घरामधील एकच माती, मातीमधली प्रेमळ नाती, भावाबहिणीची आगळीक जाती, करी लाभावीण प्रीती!
’स्मृतींची चाळता पाने’ असं म्हटलं की बालपणीचे सगळे क्षण डोळ्यांसमोर जिवंत होतात. मग ती प्रेमातली लाडीगोडी असेल वा थोड्या वेळाचा रुसवा-फुगवा; त्या मोहमयी आठवणींत जीव पुन्हा अलगद रमून जातो. आठवणींची मोरपिसे अंगावरून फिरतात आणि जीव पुन्हा लहान होतो! मग दिवाळीत ओवाळताना, भाऊबीजेला आणि राखीपौर्णिमेला ताई आठवते. जीवनातील सगळ्या कडू-गोड आठवणींचा हा समृद्ध अल्बम दोघांच्याही हृदयात कायमचा जपून ठेवलेला असतो.
टीव्हीच्या रिमोटवरून, आईने दिलेल्या खाऊच्या शेवटच्या तुकड्यावरून किंवा सायकलच्या फेरीवरून होणारी तुंबळ भांडणं प्रत्येक घरात ठरलेली असतात. “मी आईला सांगणार आहे! ” ही बहिणीची प्रेमळ धमकी आणि “जा सांग, मला काय भीती नाही! ” असा भावाचा दाखवलेला खोटा आव—यातूनच या नात्याचा भक्कम पाया रचला जातो.
पण लहानपणीचे हे दिवस एखाद्या पाखरासारखे भुर्रकन उडून जातात. ताई मोठी होते, तिचे शिक्षण पूर्ण होते आणि एक दिवस ती हे घरटे सोडून दुसऱ्या घरट्यात राहायला निघून जाते. त्यावेळी दोघांच्याही डोळ्यांत ‘गंगा-यमुना’ उभ्या राहतात; पण त्या विरहात नात्यातील बंध अधिकच घट्ट होतात. लहानपणी घरात एकमेकांशी भांडणारी हीच बहीण-भावाची जोडी बाहेरच्या जगात मात्र एकमेकांची भक्कम ढाल बनते! बाहेर कोणी भावाला किंवा बहिणीला काही बोललं, तर दोघेही एकमेकांसाठी वाघासारखे पुढे उभे ठाकतात.
बहीण सासरी गेली तरी माहेरच्या अंगणाची आणि भावाच्या संसाराची चिंता तिला कायम असते. भावाचा एक फोन आला तरी तिचा संपूर्ण दिवस आनंदात जातो. भावासाठी ती कायम एक हक्काचा विसावा असते, जिथे तो आपले मन अगदी मोकळे करू शकतो. संकटाच्या वेळी जगाने पाठ फिरवली तरी बहीण आणि भाऊ एकमेकांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहतात.
पुढे दोघेही आपापल्या संसारात रमून जातात; पण एकमेकांची विचारपूस केल्याशिवाय त्यांना करमत नाही. भावाचा काही निरोप किंवा फोन येतो का, म्हणून बहीण डोळे लावून वाट पाहत असते. गावाकडे असलेल्या भावाला ही बहीण पुन्हा सणासुदीला भेटायला जाते. दिवाळी, भाऊबीज किंवा राखीपौर्णिमेचे निमित्त साधून एकमेकांपासून दुरावलेली ही मायेची जोडी पुन्हा एकत्र येते आणि जुन्या गोड आठवणींत रमताना मनाला तृप्तता लाभते.
सासरी गेलेल्या बहिणीला आपल्या भावाकडून फार अपेक्षा नसतात. पण भावाने आपली आठवण ठेवावी, दिवाळीसारख्या सणाला आवर्जून माहेरी बोलवावे, त्या निमित्ताने चार दिवस माहेरी घालवता यावेत, राखीपौर्णिमेला आपली आठवण ठेवावी… अशा तिच्या माफक अपेक्षा असतात. तसं तर तिला तिच्या संसारात काही कमी नसतं; पण तरीदेखील ‘माहेरची साडी’ आणि भावाचं प्रेम तिला जगात सर्वात जास्त प्रिय असतं.
’माळ्याच्या मळ्यामधी पाटाचं पाणी जातं… ‘ या अजरामर गीतात बहिणीच्या या हळव्या भावना किती सुंदर व्यक्त झाल्या आहेत—
”राबतो भाऊराया मातीचं झालं सोनं,
नजर काढू कशी जिवाचं लिंबलोण,
मायेला पूर येतो, धावत मन जातं… “
किंवा
”दादाच्या शेतामंदी मोटंच मोटं पाणी,
पाजिते रान सारं मायेची वहिनी… “
बहीण मोठी असो वा लहान, तिच्यात नेहमीच एक लहानशी ‘आई’ दडलेली असते. ‘आई’ आणि ‘ताई’ या शब्दात केवळ एका अक्षराचाच काय तो फरक! पण मायेत काडीचाही फरक नसतो. आईच्या अनुपस्थितीत ताई आपल्या भावाची आई होते. आई कामात असताना भावाची काळजी घेणे, त्याचे विस्कटलेले दप्तर नीट करणे, तो आजारी पडल्यावर त्याच्या उशाशी बसून काळजीने डोक्यावरून हात फिरवणे ही बहिणीची उपजत माया असते. तर भाऊ मोठा असो वा लहान, तो बहिणीचा हक्काचा पाठीराखा आणि संरक्षक असतो. बहिणीच्या डोळ्यात आलेला एक अश्रूही भावाला आतून अस्वस्थ करून जातो.
आपल्या संस्कृतीने या नात्याला ‘रक्षाबंधन’ आणि ‘भाऊबीज’ या दोन पवित्र सणांचे सोनेरी कोंदण दिले आहे. बहिणीने भावाच्या हातावर बांधलेला साधा सुती धागा हा केवळ धागा नसतो; तर तो भावाने आयुष्यभर बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या विश्वासाचे अभेद्य संरक्षणकवच असते. भाऊबीजेला ओवाळताना बहिणीच्या मनात फक्त आणि फक्त आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची आणि यशाची प्रार्थना असते. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत या नात्याचे सुंदर रंग भरलेले आढळतात. एका मराठी गीतात बहीण म्हणते, “ओवाळीते भाऊराया, वेड्या बहिणीची रे वेडी माया… ” किंवा हिंदीतील एका अजरामर गाण्यात म्हटले आहे, “मेरे भैया, मेरे चंदा, मेरे अनमोल रतन, तेरे बदले मैं जमाने की कोई चीज न लूँ… “
आपल्या भारतीय संस्कृतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, बहीण-भावाचे हे नाते केवळ रक्ताच्या नात्यापुरतेच मर्यादित नाही! आपली संस्कृती परस्त्रीला ‘आई’ किंवा ‘बहीण’ मानण्याचे उदात्त संस्कार आपल्याला बालपणापासून देते. पशुपक्ष्यांशी नातं जोडताना सुद्धा आपण ताई आणि दादाचंच नातं जोडतो—चिऊताई, काऊदादा, खारूताई! घरामध्ये मुलगा लहान आणि मुलगी मोठी असेल तर त्या मुलाला ‘ताई’ म्हणायला शिकवलं जातं; मुलगा मोठा असेल तर त्याला ‘दादा’ म्हणायला शिकवलं जातं. पश्चिम बंगालमध्ये तर सर्व ज्येष्ठ पुरुषांचा उल्लेख आदराने नावापुढे ‘दा’ (म्हणजे दादा/भाऊ) आणि स्त्रियांना ‘दीदी’ (बहीण) म्हणूनच केला जातो.
जिथे रक्ताचे नाते नसते, तिथेही केवळ एका विश्वासाच्या धाग्याने जोडलेली मानलेली बहीण सख्ख्या बहिणीपेक्षाही जास्त माया लावते; आणि भाऊही तिच्या सन्मानासाठी व संरक्षणासाठी ढाल बनून उभा राहतो. अशी कित्येक निस्वार्थ आणि आदर्श उदाहरणे आपल्या आजूबाजूला समाजात दररोज पाहायला मिळतात. मी स्वतःही अशा नात्याचा अनुभव घेत आहे, त्याबद्दल स्वतःला भाग्यवान मानतो; आणि रक्तापलीकडे जाऊन जिने माझ्याशी भावाचं पवित्र नातं जपलं आहे, अशी प्रेमळ बहीण मला दिल्याबद्दल ईश्वराचेही आभार मानतो.
रोज शाळेत म्हटली जाणारी प्रतिज्ञा—”भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत”—या उदात्त भावनेतून आपण समाजातील स्त्रियांना भगिनींचा आणि पुरुषांना भावाचा आदर देतो. एखाद्या अनोळखी स्त्रीला हाक मारताना देखील आपण अत्यंत आदराने ‘ताई’ म्हणूनच हाक मारतो.
पाश्चात्त्य जगतात व्यासपीठावरून बोलताना नेहमी ‘लेडीज अँड जंटलमेन’ असे संबोधले जाते. पण आमचे स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेतील शिकागो परिषदेत गेले, तेव्हा त्यांनी उपस्थितांना “माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका” (माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो) अशी हाक मारून संपूर्ण विश्वाची मने जिंकून घेतली होती!
थंडी, ऊन, वारा, पाऊस अशा कठीण परिस्थितीत देशाच्या सीमेवर जागता पहारा देणाऱ्या सैनिकांना देखील देशातील हजारो भगिनी राखी पाठवून आपल्या प्रेमाची ऊब त्यांच्यापर्यंत पोहोचवतात आणि ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ हा विश्वास देतात. भारतीय संस्कृतीची ही उदात्तता इथेच थांबत नाही; आकाशातील चंद्राला देखील भारतीय स्त्री आपला भाऊ मानून (मुलांचा चांदोमामा) त्याच्याशी आपली सुख-दुःखे मनमोकळेपणाने बोलते.
इतिहासात आणि पुराणातही या नात्याचे अथांग दाखले मिळतात. श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाल्यावर स्वतःच्या भरजरी पैठणीचा पदर तत्क्षणी फाडून बांधणारी द्रौपदी आणि पुढे वस्त्रहरणाच्या निर्वाणीच्या प्रसंगी कोट्यवधी वस्त्रे पुरवून बहिणीची अब्रू राखणारा श्रीकृष्ण—हा या विश्वातील बहीण-भावाच्या नात्याचा सर्वोच्च आदर्श आहे. त्यावर किती सुंदर गाणी लिहिली गेली आहेत:
“चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला… “
किंवा
”भरजरी ग पितांबर दिला फाडून,
द्रौपदीसी बंधू शोभे नारायण… “
इतिहासातील अशीच एक प्रसिद्ध आख्यायिका सांगितली जाते—चित्तोडगडवर जेव्हा संकट ओढवले, तेव्हा मेवाडची राणी कर्णावती हिने मुघल बादशहा हुमायूनला राखी पाठवून मदतीची साद घातली होती. हुमायूननेही त्या राखीचा आणि मानलेल्या बहिणीच्या हाकेचा पूर्ण मान राखून तिच्या रक्षणासाठी तातडीने सैन्य घेऊन धाव घेतली होती. जाती-धर्माच्या आणि रक्ताच्या सीमा ओलांडून केवळ एका पवित्र धाग्याने निर्माण केलेले हे विश्वासाचे नाते जगाच्या इतिहासात अजरामर झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनीही रयतेतील प्रत्येक माऊलीला बहिणीचा सन्मान देऊन या नात्याचे पावित्र्य अखंड जपले. हेच बहीण-भावाचे पवित्र नाते भारतीय मनामनात जर कायमस्वरूपी जागृत राहिले, तर आपल्या भगिनींवर होणारे अन्याय आणि अत्याचार कायमचे संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाहीत!
आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात बहीण-भावाच्या प्रत्यक्ष भेटीगाठी कदाचित थोड्या कमी झाल्या असतील; पण मनातील ओलावा कधीच कमी होत नाही. नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा बहीण-भावाचा पदर अथांग प्रेम, निस्वार्थ माया आणि विश्वासाची ऊब देतो. हा पदर जेवढ्या आदराने जपला जाईल, तेवढं आपलं आयुष्य अधिक सुंदर, सुसंस्कारी आणि समृद्ध राहील!
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




