श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “ना खंत ना खेद…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की,

संध्याकाळी शाळा, ऑफिसेस सुटल्यावर माणसं, विद्यार्थी आणि गाड्यांची गर्दीच गर्दी होते. घरी जाण्याच्या नादात जो तो घाईत. सिग्नलमुळं गाड्यांच्या रांगा लागलेल्या त्यातही काहीजण जमेल तशी गाडी पुढे घुसण्याच्या प्रयत्नात तर काही बावळट विनाकारण हॉर्न वाजवतात. चौकातल्या गर्दीत मी थांबलेलो. बाजूला पोलिस असल्यानं बऱ्याच गाड्या नाईलाजानं थांबलेल्या तरीही एकदोन गाडीवाले सिग्नल तोडून गेलेच.

पंचवीस, चोवीस, तेवीस, बावीस लाल सिग्नलचे आकडे कमी कमी होत होते. दुसऱ्या बाजूचा हिरवा सिग्नल चालू असल्यानं तिकडून येणाऱ्या गाड्यांचा वेग वाढलेला. लाल सिग्नल असताना एका सुशिक्षित??? बाईंनी स्वतःचा आणि पाठीमागे बसलेल्या मुलांचा जीव धोक्यात घालून गाडी पुढे दामटली. कहर म्हणजे त्या फोनवर बोलत गाडी चालवत होत्या. चौकाच्या मधोमध सुसाट येणाऱ्या रिक्षाच्या समोर स्कूटर आली. रिक्षा आणि स्कूटरची जोरात धडक झाली असती परंतु रिक्षावाल्यानं करकचून ब्रेक मारून कशीबाशी रिक्षा थांबवली. अवघ्या दोन तीन सेकंदाच्या फरकानं स्कूटर पुढे गेल्यानं धडक टळली. हा प्रकार पाहून पोलिस आणि इतर गाडीवाले जोरात ओरडले पण फोनच्या नादात असलेल्या बाईंना ‘नक्की काय झालंय’ याची जाणीवच नव्हती. मुलं घाबरली पण बाईं मात्र ढिम्म उलट तिथं थांबावं लागल्यानं चिडलेल्या बाई हुज्जत घालायला लागल्या. रिक्षावाला भडकला.

“ओ बाई, एवढी कसली घाई, फुकट मेला असता. ”

“नीट बोला”

“काय नीट बोला. तुमच्यामुळे जीव गेला असता. थोडक्यात वाचलो. स्वतःचा नाही किमान पोरांचा तरी विचार करायचं ना”

“काही झालं नाही मग कशाला उगीच.. ”बाई अजूनही तोऱ्यातच बोलत होत्या.

“शिकलेल्या वाटता आणि असं वागता. गाडी चालवताना फोन वापरू नये एवढी साधी गोष्ट कळत नाही. ”

“अंताक्षरी खेळत नव्हते. महत्वाचा फोन होता. ”

“अहो, मग गाडी कडेला घेऊन बोलायचं. पंधरा वीस सेकंदासाठी जीव धोक्यात घालायची गरज नव्हती. हे सिग्नल काय टाइमपास म्हणून लावलेले नाहीत. चला चौकीत!! ”पोलिसांच्या बोलण्यानं बाई वरमल्या.

“सॉरी!! सॉरी!! ”म्हणत बाईंनी हात जोडले आणि सुसाट निघून गेल्या.

“सुधारणार नाही. बाईला जन्माची घाई दिसते. ”म्हणत रिक्षावालासुद्धा निघून गेला आणि गर्दी पांगली.

—-

प्रसंग काल्पनिक असला तरी वाहतुकीचे नियम पाळणं अनेकांना कमीपणाचं वाटतं. नो एंट्री तून गाडी चालवणं, सिग्नल तोडणं, गर्दीच्या ठिकाणी वेगात गाडी चालवणं, गाडी चालवताना फोनवर बोलणं, वाट्टेल तिथं आणि तशी गाडी उभी करणं याबद्दल कुणालाच काही वाटत नाही उलट कोणी समजावला गेला तर अंगावर धावून येतात. बेफिकीरपणे गाडी चालवून स्वतःबरोबर दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालतात त्याबद्दल ना खंत ना खेद. ट्राफिक बाबतीत लोकं फार निर्लज्ज झालेत  हेच फार काळजी करण्यासारखं आहे.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted