श्री सुधीर करंदीकर
मनमंजुषेतून
☆ मदत तयार आहे! ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
*मदत माग मदत तयार आहे – माझा एक एकदम वेगळा अनुभव.. *
सगळ्याच संत महंतांचे आपल्या सगळ्यांकरता खूप छान छान संदेश आहेत.
श्री स्वामी समर्थ यांचं छानच बोधवाक्य आहे –
“मदत माग मदत तयार आहे”.
हे आपल्याला माहित असूनही आपण बहुतेक वेळा गरज असताना मदत मागण्यात कमीपणा समजतो किंवा आपला अहंकार आड येतो. आणि त्यामुळे चांगली संधी आपल्या हातून जाते, आणि काही वेळा आपल्याला त्रास पण सहन करावा लागतो.
जेव्हा केव्हा आपण काही अडचणीत असतो आणि मदतीची गरज असते, तेव्हा मोकळ्या मनानी मदत जरूर मागावी.
मला हे वाक्य खूप आवडतं. मला कुठली पण अडचण आली तर मी निसंकोचपणे बायकोला मदत मागतो, मुली/ जावई यांना मदत मागतो, मित्रांना मदत मागतो, आणि अगदी अनोळखी लोकांना पण मदत मागतो_ आणि त्यामुळे सगळ्या अडचणींना उत्तर सापडते.
आज माझा एक रस्त्यावरचा अनुभव सांगतो.
आपल्याला काहीतरी कारणाकरता बँकेत जावेच लागते. ऑनलाइन मुळे ते खूप कमी झाले आहे. तरी पण एखादी चक्कर केव्हातरी मारावीच लागते.
एकदा काहीतरी महत्त्वाच्या कामाकरता मला बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जायचे होते.
बँक आमच्या घरापासून चालण्याच्या साधारण दहा-बारा मिनिटे अंतरावर आहे. घरून थोडं पुढे गेल्यावर चांगला चढ असलेला रस्ता आहे, नंतर कोथरूड कर्वेनगर हा रस्ता क्रॉस करायचा आणि पलीकडे बँक.
आता चढ रस्ता चढून जाणं मला जरा मुश्कील होतं आणि ट्रॅफिक चा रस्ता क्रॉस करणं पण मुश्किल होतं.
म्हणून विचार केला रिक्षा करून जावं, बँकेच्या दाराशी उतरावं, आणि काम झाल्यावर रस्ता क्रॉस करावा आणि चालत उतारावरून घरी यावं.
रिक्षेने बँकेत गेलो, काम झालं, आणि बाहेर आलो.
आता महत्त्वाचा टप्पा म्हणजे रस्ता क्रॉस करणे. त्या स्पॉटला तीन रस्ते मिळतात ट्रॅफिकचा मोठा आडवा रस्ता आणि आणि चढ असलेला तिसरा रस्ता.
ऑटो रिक्षा, टेम्पो, कार, स्कूटर, यांची जबरदस्त वाहतूक या रस्त्यांवर असते. ह्या स्पॉटला रस्ता क्रॉस करणारे लोक फारच कमी कमी असतात कारण पलीकडच्या साईडला दुकाने /मार्केट वर नाहीत.
मी रस्ता क्रॉस करण्याकरता संधी मिळते का म्हणून डावी उजवीकडे बघत होतो पण कुठेही ट्रॅफिक मध्ये गॅप मिळत नव्हती. पाच मिनिटे झाली पण मी त्याच जागेवर उभा होतो.
अशा वेळेस बावधन चा रस्ता क्रॉस करण्याकरता असलेली म्हैस आठवली. म्हशी बरोबर रस्ता क्रॉस करणे म्हणजे एकदम सेफ. आणि जेव्हा म्हैस नसेल तेव्हा रस्ता कसा करावा याबद्दल म्हशी बरोबरच्या मुलांनी मला दिलेला संदेश पण आठवला. _(काका म्हैस नसेल तेव्हा रस्ता एकट्याने कधीही क्रॉस करायचा नाही. जेव्हा कोणी रस्ता क्रॉस करत असेल तेव्हा त्यांच्याबरोबर रस्ता क्रॉस करायचा. आणि कोणी म्हणजे कोणीही नाही, तर एखादी तरुणी रस्ता क्रॉस करत असेल तेव्हाच तिच्या बाजू बाजूनी रस्ता क्रॉस करायचा. एकदम सेफ. कारण क्रॉस करणाऱ्या तरुणी कडे बघून सगळे वाहनचालक आपली स्पीड कमी करतात). _
इथे म्हैस तर नव्हतीच, आणि रस्ता क्रॉस करणारं कोणीच नव्हतं, तरुणी भेटण्याचा चान्स तर झिरो. माझं डावीकडे बघ उजवीकडे बघ चालू होतं पण पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती.
सध्या बहुतेक चौकांमध्ये पोपटी जॅकेट घातलेले ट्रॅफिक कंट्रोलर उभे असतात. लोकांनी सिग्नल पाळावे म्हणून शिट्टी वाजवून / हात दाखवून ते ट्रॅफिक वर नियंत्रण ठेवत असतात.
मी उभा होतो तिथे माझ्याच समोर रस्त्याच्या पलीकडे कंट्रोलर उभे होते आणि त्यांचे शिट्ट्या मारणे सुरू होते. तिकडे लक्ष देणारे लोक फारच थोडे असतात, त्यामुळे ट्रॅफिक सुसाट डावी उजवीकडून सुरू होता, आणि चढ चढून येणारा आणि चढ उतरणारा ट्रॅफिक पण सुरू होता.
मला एकदम स्वामींचं वाक्य आठवलं (मदत माग मदत तयार आहे) आणि मी हात वर करून आणि मान हलवत पलीकडे उभे असलेल्या ट्रॅफिक कंट्रोलरचं लक्ष माझ्याकडे वेधण्याकरता प्रयत्न केला.
आणि त्यांना खुणा करून सुचवलं, की ट्रॅफिक मुळे बराच वेळ झाला तरी मला रस्ता क्रॉस करता येत नाहीये.
नशिबाने त्यांचं लक्ष माझ्या हातवारे करण्याकडे गेलं. आणि माझी अडचण त्यांना समजली असावी.
आणि आश्चर्य म्हणजे, लगेचच ते शिट्टी वाजवत रस्ता क्रॉस करत माझ्याकडे यायला निघाले. मला वाटलं ते रस्त्याच्या मध्यापर्यंत येतील आणि माझ्या बाजूच्या ट्रॅफिक ला हात दाखवून ट्रॅफिक थोडा स्लो करून देतील, जेणेकरून मी त्यांच्यापर्यंत पोहोचेन आणि नंतर ते पुढच्या साईडच्या ट्रॅफिकला हात दाखवून मला पुढे जायला ट्रॅफिक थोडा स्लो करून देतील.
मी वर बघून स्वामींना नमस्कार केला, आणि गंमत म्हणजे ट्रॅफिक पोलीस चक्क माझ्यापर्यंत पोहोचले, त्यांनी त्यांचा उजव्या हात माझ्याकडे केला आणि मला हात धरायला सांगितले. आणि चक्क माझा हात धरून त्यांनी पूर्ण रस्ता क्रॉस करून मला पलीकडे नेलं.
तिथेच उताराचा रस्ता सुरू होतो. त्यांनी मला खुणेनी विचारलं – तुम्हाला उतारावर जायचंय, का हा पण रस्ता क्रॉस करायचा आहे. मी त्यांना उतारा कडे जायचंय असं सांगितलं. त्यांचं लगेच ट्रॅफिकला कंट्रोल करण्याचं काम सुरू झालं.
मी वाकून त्यांना नमस्कार केला आणि धन्यवाद दिले. वर बघून स्वामींना नमस्कार केला आणि उताराच्या रस्त्याने घराकडे निघालो. _ पाच मिनिटात सुरक्षितपणे घरी पोहोचलो.
मंडळी अशाप्रकारे मदत मागितली तर स्वामींच्या कृपेने मदत मिळते आणि आपलं काम सोपं होतं, अडचण दूर होते.
या अनुभवानी मला माझ्याकरता एक छान बोधवाक्य तयार करता आलं – जेव्हा आपल्याला मदत लागेल तेव्हा निसंकोचपणे समोरच्याला मदत मागायची, आणि आपल्या समोरच्या कोणाला आपली मदत पाहिजे असेल तर ती मदत आनंदाने आणि खुल्या दिलाने आपण त्याला करायची.
तुमचे पण असे अनुभव कळवा… धन्यवाद आणि शुभ दिवस
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





