वर्षा चोबे
☆ “हळवं नातं…” ☆ वर्षा चोबे ☆
भाद्रपदातील शिरव्याचा पाऊस हळुहळु पाऊल उचलू लागला तसे गणेश चतुर्थीचे वेध घरादाराला लागले. गोल बाजारातील प्रत्येक ओळीतील दुकाने विविधतेने सजली. एका ओळीत पानं फुलं, अत्तर, हळदकुंकू, गुलालबुक्याची मनमोहक रास रचली गेली. सगळ्या ओळखीचा सणासुदीचा मिश्रगंध विहरु लागला. तशी लहानथोरांची लगबगही वाढली होती. साफसफाई, आराशीचे बेत इ कामात सारी गुंतली होती. छोट्या अथर्वला हे खुपच नवीन होते म्हणजे आता त्याला थोडे कळायला लागले होते. त्यापाठोपाठ त्याचे प्रश्नही लुडबुड करू लागले. “आबा, गणपतीबाप्पा कसा येणारे? मग तो माझ्याशी खेळेल ना? मी माझे सगळे खेळणे देईन त्याला! मग तो माझा दोस्त होईल ना? तो खुप खुप दिवस राहील नं आपल्या घरी? ” आबांनी त्याला जवळ घेतले, “बाळा गणपतीबाप्पाला आपण आणायला जाणार आहोत. मग ह्या सुंदर मखरात बसवून त्याची पुजा आणि आरती करणार, नंतर बाप्पाला मोदक आवडतात किनई म्हणुन मोदकाचा प्रसाद करणार आहोत. तो खुप दिवस राहणार हं आपल्याकडे! तो पाहुणा म्हणुन येतोय ना मग त्याचं स्वागत कसं करायचं? ” “आनंदाने! ” गणपती बाप्पा मोरया म्हणत टाळ्या पिटत अथर्व घरभर फिरत राहिला.
पिवळं पितांबर नेसलेला, गाईसोबत निवांत बसलेला आणि हाती मोदक असलेला हसरा बाप्पा अथर्वच्या घरी सुंदर मखरात बसला. अथर्व मोठ्या उत्सुकतेने डोळेभरून बाप्पाला मनात साठवत होता. पूजा, आरती, प्रसाद सगळ्यात तो पुढे पुढे करत होता. त्याचा आनंद बघुन सगळेच खुश होते. महत्वाचे म्हणजे आज तो बाप्पासमोर सर्वांसोबत पंगतीत बसून आपल्या हाताने जेवला होता.
या सगळ्या गडबडीत अथर्वला बाप्पाशी संवाद साधताच येत नव्हता. संध्याकाळी पाहुणे मंडळी गेल्यावर सांजवातीला आजीने अथर्वला मांडीवर घेऊन भजनं, स्तोत्र म्हटले. बाबाने रोषणाई सुरु केली होती. रंगीत लाईट्सच्या माळांमध्ये बाप्पा अजुनच खुलून दिसू लागले. फुलं, उदबत्त्या आणि धुपाच्या सुगंधात घर दरवळून निघालं होतं.
दिवसभरातल्या मजा, मस्तीने अथर्व पेंगु लागला तसं आई त्याला उचलून खोलीत नेऊ लागली; अथर्व चटकन जागा झाला. “मी आजी, आबांसोबत इथेच बाप्पा समोर झोपणार म्हणुन रडायला लागला. आबांनी त्याला जवळ घेतले “बरं, बरं झोपू हं आपण! ” लगेच तो झोपुनही गेला. मध्येच कधीतरी त्याला जाग आली, त्याने बाप्पाकडे बघितले, बाप्पाच्या चेहऱ्यावर फोकस लाईटचा उजेड दिसत होता. तो उठून जवळ गेला, “बाप्पा तू झोपला नाहीस? तुला त्रास होतोय ना? थांब हं! ” बाप्पाच्या तोंडावरचा उजेड पाहुन अथर्वला वाईट वाटले, त्याने सरळ जाऊन बाबाला उठवले, “बाबा उठ ना, तो लाईट बंद कर, बाप्पाला झोप येत नाहीये, त्याच्या तोंडावर उजेड येतोय! ” पिल्लुच्या बोलण्याने बाबाचे डोळे खाडकन उघडले, ” अरेच्चा खरंच की! आपल्यालाही बालपणी बाप्पाबद्दल असेच काही वाटायचे. शेजाऱ्यांकडे बाप्पाचं कौतुक आरास पाहुन रेंगाळताना घरी जावंच वाटेना, किती हट्ट करुन घरी गणपती बाप्पा बसवला होता.
एकदा आईसोबत गौरी विसर्जनाला नदीवर गेलो असताना मातीचा छोटासा गणपती तयार केला आणि आईने परडी देवासमोर ठेवताच त्यावर हळुच ठेवून दिला. आपल्याकडे नाही मांडत रे गणपती म्हणत आईने चांगलाच धपाटा दिला. “कोण करणार त्याचं सगळं? बाबांची फिरतीची नोकरी, तू काय आज करशील उद्या मात्र मलाच करावं लागेल. माझ्यामागे बाकीचं काय कमी आहे? ” डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या. बाबांनी जवळ घेतलं होतं, “हे बघ बेटा, पाहुणा घरी आला की आपण कशी त्याची वास्तपुस्त करतो, वेळ देतो, पक्वान्न करतो. त्याहुन जास्त बाप्पाचं करावं लागेल. मग? आपला सार्वजनिक गणपती आहेच ना! ” डोळे पुसत आपण म्हणालो होतो, “मी करीन सर्व, प्रॉमिस बाबा तुम्हाला त्रास होऊ देणार नाही. अगदी अभ्यासही! ” त्या दीड दिवसात माझी परीक्षाच होती. नंतर पाच दिवस आणि मग दहा दिवसाचा गणपती कधी झाला ते कळलं देखील नाही. श्रावण सरत आला की दहावेळा गणेशचतुर्थी विचारून आईला भंडावून सोडायचो. कमी खर्चात वेगळ्या सजावटीचे बेत बाबांशी चर्चा करुन लिहुन ठेवायचे. प्राणप्रतिष्ठा करताना बाप्पाच्या हृदयाशी आपल्या हृदयाचं संधान करताना थेट त्याच्या डोळ्यात बघताना किती काय जाणवायचं आपल्याला! ते गोंडस गोजिरं रूप साठत रहायचं काळजात. उत्सवाचे दहा दिवस संपायला आले की, बाप्पाची आरती करताना डोळे पाणावायचे. हे निखळ जगणं समाजाच्या चाकोरीत विसरतच गेलो आपण! ही आपलीच कॉपी आहे. तीच निरागसता आनंदाने आणि कृतज्ञतेने जपत बाबाने लाईट बंद केला, चला तुम्हीही झोपा आता. ” अथर्व हसून पुन्हा आबाच्या कुशीत शिरला. असेच दहा दिवस बाप्पाच्या पाहुणचारात आनंद उल्हासात कधी पार पडले कळलेच नाही.
विसर्जनाचा दिवस उजाडला आणि अथर्व जरासा शांत शांत भासू लागला. हॉलमधुन जराही दुसरीकडे जात नव्हता. जेवण खेळणं सगळं तिथेच. आबांनी त्याला गणपती बाप्पाच्या बुद्धी तल्लखतेच्या खुप गोष्टी सांगितल्या होत्या. त्याला विश्वप्रदक्षिणेची गोष्ट खुप आवडली होती. बाप्पा त्याच्या घरी जाणार याचीही गोष्ट सांगितली होती. अविश्वासून त्याने विचारले, “आपलाही बाप्पा जाणार का त्याच्या घरी? ” आबा म्हणाले, “हो रे बाळा त्याची आई वाट बघत असणार किनई, त्यालाही त्याच्या मम्माची आठवण येत असेल. सुट्टीत तू नाही का मामाकडे रहायला जात, तसाच बाप्पाही आपल्याकडे येतो. आपण आनंदाने निरोप देऊया हं त्याला, मग तो परत पुढच्यावर्षी आपल्याकडे येईल. ”
बाप्पाच्या निरोपाची आरती झाली. काल्याचा प्रसाद, शिदोरी सगळं सोबत घेवून झालं. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! बोलो गजानन महाराज की जय! जोशात गर्जना झाली आणि बाप्पांना चौरंगावरून बाबाने हळुच हलवून उचलले. अथर्वचा चेहरा कोमेजल्या फुलासारखा दिसत होता. कारमधल्या आबांच्या मांडीवरचा प्राण ओतलेला गणपती आणि आजीच्या मांडीवरचा अथर्व समान धाग्याने अंतरसंवाद साधत होते. नकळत त्याच्या डोळ्यांतून अखंड अश्रूधारा वाहू लागल्या होत्या. तलावात गोंडस हसऱ्या बाप्पाचं हळुहळु विसर्जित होणारं रूप डोळ्यात साठवत सगळी मंडळी निघाली. अथर्व मम्माला घट्ट बिलगला होता…
☆
© वर्षा विद्याधर चोबे
चंद्रपुर
मो 9284199173
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





