सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ या कातरवेळी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
या कातरवेळी
कातर म्हणजे अस्थिर किंवा कमी होणारी गोष्ट. सूर्यास्त झाल्यानंतर सूर्य प्रकाश कमी होतो. म्हणून ही कातरवेळ. आपले कवी पण किती हुशार होते. त्यांनी ही वेळ व त्यावेळची असलेली मनस्थिती काव्यात गुंफली आहे. जसे मानवी मनाचा एकटेपणा वर्णन करणारे गीत, या कातरवेळी पाहिजेस तू जवळी दिवस व रात्र यांच्या मधील काळ म्हणून संधिकाळ. व त्या वरील गीते. संधिकाळी या अशा धुंदल्या दिशा दिशा ही वेळ उन्हे उतरणे, सूर्य मावळणे आणि संधीप्रकाश पडणे या तीन सांज मिळून तिन्ही सांजा या तिन्ही सांजा लक्षात घेऊन तिन्ही सांजा सखे मिळाल्या असे म्हणत सखीला वचन दिले आहे.
तर पत्नी झाल्या तिन्ही सांजा म्हणत साज शृंगार करुन पतीची वाट बघत आहे. हीच वेळ कुणाला गाई वासरांच्या परतण्याची सावळ्याची सावली वाटते. आणि सांज ये गोकुळी सारखे गाणे तयार होते. ही वेळ संध्याकाळची विविध रूपे घेऊन येते. खरे तर ती वेळ, तो सूर्य, संधीप्रकाश सर्वत्र एकच असतो. पण प्रत्येकाच्या मनस्थिती प्रमाणे संध्याकाळ प्रत्येकाला वेगळी भासते.
याच वेळी घरात दिवेलागण होऊन शुभंकरोती म्हंटले जाते. लक्ष्मीला आवाहन केले जाते. अंगणात दिवा लावला जातो. उदबत्तीचा सुगंध दरवळतो. जणू मरगळ, उदासीनता प्रार्थना करुन दूर केली जाते.
एकाच वेळेची इतकी रूपे आणि विविध भावभावना असतात. या मागेही विज्ञान आहे. आपल्या शरीराचे एक दैनंदिन घड्याळ असते. आपले शरीर सर्केडियन लयीला प्रतिसाद देत असते. या वेळी शरीरात मेलाटोनीन संप्रेरक तयार व्हायला सुरुवात झालेली असते. ते तंद्री आणते आणि झोपेसाठी आपले शरीर तयार करते. पण आपली झोपेची वेळ झालेली नसते. म्हणून या वेळी बरेचदा उदास, एकटे, चिंताजनक वाटणे, हुरहूर वाटणे अशा भावना निर्माण होतात. प्रत्येकाची त्या भावनांना प्रतिसाद देण्याची, विचार करण्याची पद्धत वेगळी असते.
त्यामुळे प्रत्येकाच्या मनात विविध भावभावना निर्माण होत असतात. दिवसभर काम करुन शरीर दमलेले असते. आणि आपल्या विसाव्याच्या ठिकाणी जायला आतुर झालेले असते. हा प्रत्येकाचा विसावा भिन्न असतो. म्हणूनच आपल्याला विविध मूड असलेली सांजवेळची गाणी लाभली आहेत.
काही कवींनी ही वेळ थेट उतार वयाशी जोडली आहे. पण त्यातूनही मधुघट सारखे उत्तम काव्य निर्माण केले आहे. हे उतारवय पण असेच असते. कर्तव्याची पूर्तता झालेली असते. जरा स्थिरता आलेली असते. पैलतीर दिसू लागलेला असतो.
मुले बाळे आपल्या विश्वात रमलेली असतात. कधी कधी आपली गरज कोणाला आहे का? असेही वाटून जाते. पण याच वेळी भोवती नातवंडे असतील तर उदास विचार दूर होतात. आणि आपले बाल्य त्यात गवसते.
आपले पूर्वज किती हुशार होते याचा आपण नेहेमी अनुभव घेतो. या सगळ्या भिन्न भावभावना नष्ट व्हाव्यात आणि चांगले विचार मनात यावेत या साठी यावेळी घरातील सर्वांनी एकत्र येऊन दिवा लावणे, काही स्तोत्रे म्हणणे. एकत्र वेळ घालवणे यातून सर्वांचीच मनस्थिती बदलते. आणि घराला घरपण येते. दमलेल्या, एकाकी वाटणाऱ्या मनाला उभारी देते. माझी कोणीतरी वाट बघत आहे ही भावना खूप महत्वाची असते. म्हणूनच ही वेळ सर्वांनी घरी परतण्याची असते.
म्हणूनच असे वाटते, ये शाम मसतांनी आणि कोणीतरी खेचल्या प्रमाणे घराकडे पावले ओढली जातात. अशी विविध रंगाने नटलेली संध्याकाळ आपण लोभस, सुंदर आणि हवीहवीशी करु या. आणि त्या नंतर येणाऱ्या व तनमनाला विश्रांती देणाऱ्या रात्रीचे स्वागत करु या. रात्र शांत झोपेची गेली तर उद्याचा उष:काल प्रसन्न होतो.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






