सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ वायुतत्व… ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

सर्व भौतिक जग ज्या तत्वांपासून निर्मिल गेले आहे, ती पाच तत्वे म्हणजे – पृथ्वी, आप (जल), तेज, वायू आणि आकाश. यांना ‘पंचमहाभूते’ असे म्हणतात हे बहुतेकांना माहिती असते. ‘वायुतत्व’ हे यातील एक महत्त्वाचे तत्व. वायू – वात – वारा – हलणारी हवा अशी अनेक नावे या तत्वाबद्दल बोलतांना सामान्यत: वापरली जातात. पण नाव कुठलेही वापरले, तरी तत्व एकच – “वायुतत्व”.

या तत्वाचे महत्त्व वेगवेगळ्या संदर्भात, पण विशेषत्त्वाने सांगता येते. माणसाच्या अस्तित्त्वाशी निगडीत असणारा ‘प्राण-वायू’ हा वायूचा अतिमहत्त्वाचा विशेष… शरीरात प्राण तेवता ठेवण्यासाठी अत्यावश्यक असतो तो ‘प्राण-वायू’– आणि तो मिळेनासा झाला, तर प्राणाचा अन्त– अशी याची थोडक्यात महती सांगता येईल. माणूस श्वास घेतो, म्हणजे नाकातून हवा शरिरात ओढतो, आणि उच्छवासातून ती बाहेर टाकतो… पण इथे सर्रास ‘हवा’ असे म्हटले जाते, ते मात्र “म्हणायला सोपे” म्हणून असावे. कारण नुसती हवा सर्वत्र असली, तरी ती आपणहून कोणतीच हालचाल करत नाही. तिला हलवले की मग तिलाच वायू.. वारा म्हटले जाते. म्हणूनच “वारा अर्थात वायू म्हणजे हलणारी हवा” अशी कुणालाही समजेल अशी सोपी व्याख्या केली जाते. अर्थातच, श्वास म्हणजे खरे तर नाकाद्वारे शरीरात ओढून घेतलेला वायूच —शरीरात चालू असणाऱ्या प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या वायूमार्फत सुरु असणाऱ्या क्रिया –म्हणजे शरीरातील वायुतत्वाचे पाच भाग मानले जातात, ज्यांनाच ‘ पंचप्राण ‘ म्हटले जाते, आणि ते शरीराच्या संपूर्ण कार्यप्रणालीला जणू इंधन पुरवतात. “वायू म्हणजे गती” हे सर्वज्ञातच आहे. श्री समर्थांनी दासबोध-ग्रंथात वायूचे असे वर्णन केले आहे की —

चैतन्य आणि चंचळ ।

तो हा वायोजि केवळ ।।

या पंचतत्वांचा संबंध माणसाच्या पंचेंद्रियांशी असतो हे तर खरेच. आणि ही पाचही तत्वे शरीरात संतुलित राहणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यकच असते. पण श्वसनक्रियेसाठी अव्याहत कार्यरत असणारे ‘वायुतत्व’, त्याद्वारे शरीरातील सर्व कार्ये निरोगी ठेवण्याचे काम प्रामुख्याने करते असे म्हणणे वावगे ठरणार नाही —-”श्वास थांबला-माणूस संपला” असेच तर म्हटले जाते नेहेमी.

योगशास्त्रात मानवी शरीरातील जी सात योगिक-चक्रे सांगितली आहेत, त्यातील ‘अनाहत’ चक्राशी (याला ‘हृदयचक्र’ असेही म्हटले जाते) हे वायुतत्व संबंधित असते. हे अनाहत चक्र मुख्यतः हृदय आणि फुप्फुसे यांचे कार्य नियंत्रित करते. त्यामुळे अर्थातच ‘प्राणवायू’च्या रूपाने ‘वायुतत्व’, हाच या कामासाठी अत्यावश्यक असणारी शक्ती देणारा अत्यावश्यक घटक असतो. या तत्वाचा उपयोग योग्य प्रमाणात, योग्य प्रकारे शरिरासाठी होत असेल, तर पर्यायाने शरीर निरोगी रहाण्यास मोठाच हातभार लागतो. अन्न-पाण्यावाचून माणूस काही दिवस जिवंत राहू शकतो, पण ‘प्राणवायू’वाचून तो फार तर ३ ते ५ मिनिटेच जिवंत राहू शकतो. म्हणूनच मानवी देहाच्या बाबतीत, वायुतत्व हे सर्वात जास्त सामर्थ्यवान आहे असे म्हटले जाते. शरीराला पुरेसा प्राणवायू मिळाला नाही, तर एखादे दुखणे कसे जिवावरच उठते, हे तर सध्या आपण बघतोच आहोत…करोनासारख्या साथीच्या आजारांच्या निमित्ताने. अशावेळी तर प्राणवायूचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित होते. सगळ्या जगाला व्यापून राहिलेले हे वायुतत्व, अशावेळी माणसांना चांगलाच धडा शिकवते, हे नक्कीच लक्षात येते. याचबरोबर, शरीरात चुकीच्या जागी वायू किंवा ‘हवा’ म्हणूया, साठून रहाणे किती त्रासदायक ठरू शकते हे सांगण्याची गरज नाही.

या संदर्भाने इथे एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटते की, योगसाधनेने प्राणवायूवर प्रभुत्व मिळवता येते हे आता सर्वमान्य झालेले आहे. योगसाधना म्हणजे संयम… अनेक बाबतीतला संयम… ज्यामुळे… मन जास्त संतुलित रहाते, ज्यामुळे आयुष्य जास्त संपन्न – समृद्धरित्या जगण्यास मोलाची मदत होते. इतकेच नाही तर मानसिक समस्याही कमी होतात. कारण या साधनेतील प्राणायामामुळे परिणामत: वायुतत्वाचा प्रभाव वाढवता येतो, आणि संतुलन सहजरित्या वाढते.

हे झाले प्राणवायूच्या रूपातील वायुतत्त्वाचे महत्त्व. आता वाऱ्याच्या रूपातल्या वायू-तत्वाबद्दल— याबाबत तर बरेच काही सांगता येण्यासारखे आहे. या रूपातला त्याचा एक विशेष गुणधर्म हा आहे की, वाऱ्याला ‘सरळ-वाकडं’ यातला फरक कळतच नाही. जशी दिशा मिळेल, जिथे जागा मिळेल, तिथे तो वहात जातो – वहात राहतो. थोडक्यात, ‘सारासार-विचार’ हा प्रकार त्याच्या बाबतीत नसतोच असे गंमतीने म्हणावेसे वाटते….मग कुठे ‘आला आला वारा…संगे पावसाच्या धारा…’ असं प्रसन्नपणे म्हणावंसं वाटतं, तर कधी–‘थंडगार ही हवा—’असं म्हणत तो अनामिक हुरहूर लावून जातो –शांतपणे झुळझुळत, जणू गुणगुणत आला, तर तो कधीच लांब जाऊ नये, इतका हवाहवासा, इतका आपलासा वाटायला लागतो. माणसाच्या चित्तवृत्ती आपोआप प्रसन्न होऊ लागतात, उष्णतेचा दाह शमायला लागतो… ‘पाऊस आला, वारा आला… पानं लागली नाचू’… असं काही सुचायला लागतं.

… पण कधीकधी मात्र तो इतका वेडावाकडा, इतका नकोश्या वेगाने येतो, की त्याला ‘वारा’ न म्हणता ‘वादळ’ असंच म्हणावं लागतं. कुठे हवेचा कमी दाबाचा पट्टा –कुठे जास्त दाबाचा पट्टा अशा स्वतःच स्वतःला उपाध्या देत हे वायुतत्व मग ‘वादळ’ या नावाने बरेचदा खूप मोठं नुकसान करणारं ठरतं, नकोसंच वाटतं. थोडक्यात ‘भीक नको पण कुत्रा आवर’ – अशी अवस्था होते. फक्त मानवाचीच नाही, तर सगळ्याच सजीवांची, सुंदर निसर्गाची जोपासना, निगराणी आणि संवर्धन जिव्हाळ्याने करणारे हे तत्व, बघताबघता संहारक होते आणि जणू निसर्गाला आणि त्याचसोबत इतर सजीवांनाही उन्मळून- उखडून टाकते.—–आणि याउलट जिथे ते स्वतःचा मागमूसही ठेवत नाही तिथे तर सजीवांचे अस्तित्वच संपते— सगळीकडून गच्च बंद असणाऱ्या खोलीत एखाद्या रोपाची कुंडी ठेवली तर दोन दिवसात ते रोप मरून जातं. बघा ना … म्हणजे खोलीत हवा असते पण हे “वायुतत्व” नसतं. याच्या विरुद्ध उदाहरण असं की वाफेच्या रूपातला वायू कोंडून ठेवून त्याचा दाब निर्माण करून त्यावर अनेक डबे जोडलेल्या आगगाड्या चालवून माणसाने कौतुकास्पद कामगिरी केली खरी. पण वायूचा असाच दाब जेव्हा प्रचंड वाढून अनावर होतो तेव्हा त्याचा स्फोट होतो — हाच वायू विध्वंसक होतो, आणि माणूस हतबल होतो——- अर्थात, या पंचमहाभूतांपैकी कोणावरच कुठल्याही सजीवाचे नियंत्रण नसते. ‘वायूतत्व’ हे त्यातलेच एक ‘महाभूत’… गंमतीचा भाग सोडून देऊ. पण अशावेळी या मूळ तत्वांचे सामर्थ्य, आणि मानवाची अगतिकता प्रकर्षाने जाणवते, हे खरे.

वाऱ्याचा आणखी एक विशेष गुणधर्म म्हणजे, त्याला ‘सुगंध आणि दुर्गंध’ यातला फरकच कळत नाही. याबाबतीत ‘सर्वधर्मसमभाव’ या गुणवैशिष्ट्यानुसार तो आचरण करतो, अशी समजूत करून घेतलेली बरी असते. ‘वाऱ्यावरती गंध पसरला… नाते मनाचे’… असं सुगंधाच्या बाबतीत म्हणता येतं – दुर्गंधाच्या बाबतीत नाही. पण तरीही दुर्गंधाचे खापर माणूस सहसा वाऱ्यावर फोडत नाही, हे त्याचे भाग्यच म्हणायला हवे. कारण या रूपातले वायूतत्व फक्त वहाण्याचे काम करते… सुगंध आणि दुर्गंध – निर्मितीचे काम वारा कधीच करत नाही; म्हणून त्या दोन्हीतला फरकही त्याला कळत नाही.

वैयक्तिक पातळीवर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारे हे वायूतत्व, मानवजातीच्या भौतिक प्रगतीसाठीही खूप मोलाचे ठरले आहे. हवेच्या, पर्यायाने वाऱ्याच्या सक्रीयतेच्या प्रक्रियेचा अभ्यास करून मानवही पक्ष्यांसारखा हवेत उडू लागला आहे… पॅरा-ग्लायडिंग, स्काय डायव्हिंग असे प्रयोग यशस्वीपणे करू लागला आहे. विमाने, रॉकेटस्, अवकाशाला गवसणी घालणारी वेगवेगळी याने, ही सगळी याचीच तर उदाहरणे आहेत. पण ‘वायूतत्व’ जाणून घेतल्यानेच हे शक्य झाले आहे.

… तर असे हे सजीव-सृष्टीचा जीव जोपासणारे अतिशय महत्त्वपूर्ण वायुतत्व…जे सजीवाला जगण्यासाठी थेटपणे आवश्यक असते. एक दिवस जरी या तत्वाने असहकार पुकारला, तर साऱ्या सृष्टीत केवढा हाहा:कार माजेल, संपूर्ण जगावर किती दुर्दशा ओढवेल…खरे तर सगळे सजीव जगच कसे मरणाच्या खाईत कोसळेल, याची कल्पना करणेही भीतीदायक आहे. म्हणूनच आपण या वायुतत्वाचे कायमच अगदी मन:पूर्वक ऋणी असायलाच हवे.

– – – या संदर्भात माणसाने आवर्जून लक्षात घ्यायलाच हवी अशी एक गोष्ट आहे — ती म्हणजे ऋण फेडण्याची —- एखाद्या बीजात या तत्वाने प्राण फुंकले, की पहाता पहाता त्या बीजाचा सुंदर वृक्ष होतो, जो न मागताही माणसाला सुखद गार सावली देतो–न मागताच आपली फुले त्याच्या ओंजळीत टाकतो –फळांनी फक्त त्याची भूकच नाही, तर ताकदही वाढवतो. आणि या सगळ्यापेक्षाही महत्वाचे आहे ते हे सत्य की, वायुतत्वाने त्याच्या बीजात फुंकलेल्या जराशा प्राणवायूबद्दल कृतज्ञता व्यक्त करत तो वृक्ष अगदी निरपेक्ष भावनेने त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने प्राणवायूचे उत्सर्जन करतो–वायुतत्वाचा समतोल राखण्यासाठी मोलाची कामगिरी बजावतो…आणि आपण माणसे? अतिशय स्वार्थी, क्षूद्र हेतूने प्राणवायूचा तो स्रोतच बेफामपणे वृक्षतोड करून बंद करून टाकतो. चोंच कितीही वासता येत असली तरी पोटापुरतेच घ्यावे हा पोंच इवल्याश्या पाखरांनाही असतो. पण स्वतःला सर्व प्राणिमात्रांमध्ये सर्वात जास्त बुद्धिमान समजणाऱ्या माणसाला तो नसावा, ही बाब फक्त काळजी किंवा खंत वाटावी आणि सोडून द्यावी अशी नाही. तर असे वागणाऱ्याचा संतापच यायला हवा–आणि त्याला रोखायलाच हवे. आणि फक्त वायुतत्वच नाही, तर पाचही मूलतत्वांचा गैरफायदा कुणीही कधीही घ्यायचा नाही असा कडक निर्बंध प्रत्येकाने स्वतःच स्वतःला घालून घ्यायलाच हवा.

म्हणूनच सर्वात महत्वाचे हे की, जागतिक पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून या पंचमहाभूतांचे मूळ स्वरूप आणि प्रमाण, तसेच त्यांचे संतुलन अबाधित राखण्याचा जाणीवपूर्णक प्रयत्न करणे आणि त्यायोगे निसर्गाचे संतुलन राखणे, हे माणसाच्या सुखी आणि आनंदी जगण्यासाठी अत्यंत गरजेचे असणारे मूलभूत कर्तव्य आहे, आणि ते पार पाडण्यासाठी प्रत्येकानेच सदैव स्वतः डोळस प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे — अगदी श्वास घेण्याइतकेच अत्यावश्यक…

©️ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Aparna
0

अतिशय उद्बोधक चिंतन
प्राणतत्वच उलगडले आहे..