सुश्री तृप्ती कुलकर्णी
विविधा
☆ शोध गुरुचा… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
अनेक जणांचे गुरुबाबतचे अनुभव ऐकताना, वाचताना गुरुबद्दल एक वेगळीच प्रतिमा माझ्या मनात तयार झाली. ती मांडण्याचा हा प्रयत्न.
विश्वामध्ये जन्माला आल्यानंतर मी कोण, माझे उद्दिष्ट काय, माझ्या आजूबाजूचं जग कसं आहे, ते असं का आहे, ते तसं का नाही असे अनेक प्रश्न प्रत्येक मनुष्य जीवाला पडतात. कारण त्याच्याजवळ ‘विचार’ ही एक वेगळी शक्ती आहे. या प्रश्नांची उत्तरे शोधताना गरज असते ती ‘गुरु’ची. मग आता गुरु कोण? तो कसा शोधावा? याबाबत जीवाची धडपड सुरू होते.
या धडपडीत जाणवलं ते म्हणजे गुरु शोधण्याचा हा प्रवास हीच खरी मज्जा आहे म्हणजे आनंद या अर्थाने. कारण या प्रवासात गुरुपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला जाणून घेण्याचं, शोधण्याचं कामच आपल्याला करावं लागतं. म्हणजेच स्वतःवर काम केल्याशिवाय गुरु मिळत नाही. आणि आपण अगदीच कोरडे राहून त्याच्यापुढे गेलो तर लाभत नाही.
हे काम करताना आपण जगत असलेल्या आणि आपल्या जगण्यात अभाव आहे, असं वाटत असलेल्या गोष्टींच्या मूल्याची जाणीव होते. थोडक्यात आपले ज्ञानचक्षु जागृत होतात. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव होणं, त्याचं मूल्य समजणं, एखाद्या गोष्टीतला नको असलेला भाग काढून टाकता येणं म्हणजेच एक प्रकारचं ज्ञान मिळवणं आहे. ही जाणीव या प्रवासात निर्माण होणं आणि त्यातून प्रेरित होऊन असे ज्ञानाचे कण कण गोळा करायला आपण प्रवृत्त होणं ही गुरूच्या जवळ जाण्याची पहिली पायरी असावी असं मला वाटतं.
ज्ञानचक्षुंच्या जागृतीमुळे हा प्रवास सातत्याने, विश्वासाने करत राहिल्यावर आपल्याकडे असे छोटे छोटे ज्ञान बिंदू जमा होत जात असतील. आणि समान गोष्टी एकमेकांना आकर्षित करत राहतात या न्यायाने आपण हळूहळू गुरुच्या जवळ जाण्याच्या मार्गावर राहातं असू. हा प्रवास दिर्घपल्ल्याचा आहे. त्यामुळे त्यावर असणारे अनेक मोह हेच खाचखळगे आहेत. याच घसरत्या वाटा आहेत. पण त्या वेळेला गुरुचा सूक्ष्म अंश आपल्याला मार्गदर्शन करतो आणि तो सूक्ष्म अंश म्हणजे आपलं अंतर्मन. हे अंतर्मन आपल्याला सूचना देऊन पुन्हा आपल्या मूळ मार्गाकडे मार्गस्थ करत राहतं. अनेक अडचणीच्या प्रसंगी पहा आपल्या अंतर्मनाला अनेक धोक्याच्या सूचना मिळालेल्या असतात किंवा अचानक समस्येवर उत्तर सापडलेल असतं तेव्हा हे अंतर्मनच आपल्या मदतीला धावून आलेलं दिसतं. तर हे अंतर्मन म्हणजे गुरुचा सूक्ष्म कण आपल्या मदतीसाठी आपल्याबरोबर आलेला आहे.
असा प्रवास करत जेव्हा प्रत्यक्षात गुरु भेटतो तेव्हा नक्की काय घडत असेल? मला वाटतं जर ज्ञान ही गोष्ट गुरु स्वरूपात मानली, तर ज्ञानाच्या मोठ्या साठ्यात ज्ञानाचे असे छोटे छोटे ओहोळ येऊन मिसळले तर जे काय होईल ते घडत असेल. ज्ञान ज्ञानात मिसळून जात असेल. आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तरं असतातच आणि प्रश्न म्हणजे न संपणारी समस्या नसून उत्तरांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग असतो ही शहाणीव निर्माण होत असेल.
असा गुरुचा शोध घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न कळतनकळत चालू असतो. तो सफल व्हावा आणि प्रत्येकाला गुरु मिळावा याच गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!
© सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





