श्री नागेश शेवाळकर
विविधा
☆ सामाजिक माध्यमं: साद- प्रतिसाद! ☆ श्री नागेश शेवाळकर ☆
सामाजिक माध्यमातील फेसबुक नंतर व्हाट्सअप समूह हा सर्वांचाच आवडता प्रकार आहे. व्हाट्सअपचा वापर करणारे, त्यावर व्यक्त होणारे लाखो रसिक असतील परंतु प्रकाशित होणाऱ्या पोस्टवर प्रतिसाद देणारे वाचक फार कमी आहेत.
व्हाट्सअप समूहाचे काही प्रकार अस्तित्वात आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे सर्व सदस्यांना स्वतःचे मत व्यक्त करता येणारा समूह. यात काही उपप्रकार आहेत. अनेक समूहावर सुप्रभात ते शुभरात्री असे अभिवादनाचे प्रकार, विशेष दिनी किंवा विशिष्ट कामगिरीसाठी अभिनंदन, शुभेच्छा तर दुःखदायक घटनांसाठी त्या प्रकारचे संदेश पाठविण्याची मोकळीक या समूहात असते. तसेच काही समूहांवर लेख, प्रतिसाद यांची मांदियाळी असते. काही समूहांमध्ये कुठल्याही प्रकारच्या शुभेच्छा, संवेदना यांना बंदी असते. अशा समूहांवर फक्त लेख, पुस्तक परिचय अशा गोष्टींना परवानगी असते परंतु अनेकदा नियमावलीत नसणाऱ्या गोष्टींचाही भडिमार होत असतो. समूह प्रमुखांनी वेळोवेळी केलेल्या सूचना, प्रसंगी दिलेली ताकीद याकडे कानाडोळा करून समूहाच्या नियमावलीत नसणाऱ्या गोष्टी सररास पोस्ट केल्या जातात त्यामुळे समूह प्रमुख काही सदस्यांना समूहाच्या बाहेर करतात. शेवटचा उपाय म्हणून समूह ‘ओन्ली फॉर ॲडमीन’ केल्या जातो. त्यामुळे सर्व सदस्यांच्या साद-प्रतिसादाला वाव नसतो.
अनेक समूह यापेक्षा स्वतःचे वेगळेपण राखून असतात. अशा ठिकाणी कादंबरी, कथा, पुस्तक परिचय, कविता, चारोळ्या असे साहित्य पोस्ट केल्या जाते. काही समूहांवर केवळ पुस्तक परिचय करून देण्याची संधी असते. यामुळे नवीन, जुन्या पुस्तकांचा परिचय होतो. गाजलेल्या पुस्तकांची माहिती मिळते.
अशा विशिष्ट समूहांवर इतर गोष्टी कटाक्षाने टाळल्या जातात. विविध साहित्य प्रकाराचे लेखन वाचायला मिळते, त्या लेखनास प्रतिसाद देण्याची संधी असते. अनेक लेखक -वाचक प्रकाशित साहित्यावर साधकबाधक चर्चा करतात, त्या मंथनातून अक्षर-अमृताचे घट समोर येतात. ज्यातून उपयुक्त माहिती मिळते, ज्ञानात भर पडते. विविध समूहांवर सातत्याने लेखन करणारे अनेक लेखक आहेत. त्यांच्या लेखनावर मिळणारा प्रतिसाद कुठे नगण्य असतो तर कुठे भरभरून मिळतो. जे लेखक इतर लेखकांच्या पोस्टवर स्वतःचं मत, अभिप्राय देतात त्यांना त्यांच्या लेखनावर चांगला प्रतिसाद मिळतो. जे लेखक स्वतः भरपूर पोस्ट टाकतात परंतु इतरांच्या लेखनावर व्यक्त होत नाहीत त्यांना अल्प प्रतिसाद मिळतो. असा अल्प प्रतिसाद मिळणाऱ्या लेखकांचे असे मत होते की, त्यांच्या लेखनावर जाणूनबुजून अल्प प्रतिसाद मिळतो तर इतर लेखकांना त्यांच्या लेखनावर उदंड प्रतिसाद मिळतो. हा प्रकार म्हणजे ‘पेराल तसे उगवेल’ असा असतो. टाळी एका हाताने वाजत नाही किंवा ‘एक हात से दीजिए, दूसरे हाथ से लीजिए।’ असा प्रकार असतो. त्यामुळे मला भरभरून प्रतिसाद मिळावा असे वाटत असेल तर मीही इतरांना तसाच प्रतिसाद दिला पाहिजे. काही लेखक-वाचक यांना जो लेखन प्रकार आवडतो त्यावर ते निश्चितपणे व्यक्त होतात. जसे ज्यांना विनोद आवडतो, जे स्वतः विनोदी लेखन करतात ते विनोदी लेखनावर व्यक्त होतात. कुणाला कविता, कुणाला चारोळ्या आवडतात ते त्या प्रकारच्या साहित्यावर व्यक्त होतात.
व्यक्त होण्याचे प्रकार म्हणजे अंगठा दाखवणे, विविध प्रकारच्या इमोजी पाठवणे ह्या गोष्टी खूप जण वापरतात. आजकाल रेडिमेड संदेश टाकण्याचे छंदही वाढताहेत. परंतु स्वतःच्या शब्दांमध्ये दिलेल्या प्रतिसादामध्ये एकप्रकारची आपुलकी असते, जवळीक निर्माण होते. त्यामुळे शाब्दिक प्रतिसाद देणे महत्त्वाचे असते. अनेक सदस्य असतात, जे स्वतः काही पोस्ट टाकत नाहीत इतरांच्या पोस्टवर कधीच व्यक्त होत नाहीत. काही सदस्य आले, वाचले, पुढे ढकलले अर्थात इतरांच्या पोस्ट फॉरवर्ड करण्याचे काम इमानेइतबारे करतात.
बहुतांश व्हाट्सअप समूहांवर साधकबाधक चर्चा होतात, विनोदाच्या फुलझडी उडतात, समोरासमोर कधीही न भेटता ही मैत्रीचे बंध निर्माण होतात, काही समूह दरवर्षी समूहातील लेखकांसाठी दिवाळी अंक, ई दिवाळी अंक प्रकाशित करतात. काही समूह दरवर्षी गेट टुगेदरचे आयोजन करतात इत्यादी चांगल्या बाबीही व्हॉट्सअपच्या माध्यमातून होतात. ही बाब महत्वाची आहे…
‘लिहा, वाचा, भरभरून प्रतिसाद द्या. साधकबाधक चर्चा करा. ‘ हा मुख्य मंत्र असायला हवा.
००००
© श्री नागेश शेवाळकर
पुणे
मोबा. ९४२३१३९०७१
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




