श्री ‘दादासाहेब दापोलीकर

? विविधा ?

☆ “वटपौर्णिमा: एका नवीन दृष्टिकोनातून!!” ☆ श्री दादासाहेब दापोलीकर (सुमंत जुवेकर) ☆

वटमूले स्थितो ब्रह्मा, वटमध्ये जनार्दनः ।

 *

वटाग्रे तु शिवो देवः सावित्री वटसंश्रिता ।।

वटानि वेष्टयति मूलेन वृक्षांतरमिति वटे ।

*

आज आहे वटपौर्णिमा!

आर्यांच्या भार्यांचा सौभाग्य दिवस!

धार्मिक पार्श्वभूमी परंतु वैचारिक पाया असलेल्या, आर्यांच्या अनेक श्रीमंत पुराणकथांप्रमाणे ही एक कथा- सत्यवान सावित्रीची!

पाश्चात्य अशा कथांना ‘मायथॉलॉजी’ म्हणतात. आम्ही तो अंधपणे वापरतो. किती चुकीचा शब्द!  

इंग्रजी Myth हा शब्द संस्कृत मिथ्या या शब्दावरूनच आला असण्याची दाट शक्यता आहे.

ऑक्सफर्ड शब्दकोश सांगतो- myth म्हणजे दंतकथा किंवा अशी कल्पना किंवा गोष्ट ज्यावर लोक विश्वास ठेवतात. पण ती अस्तित्वात नसते किंवा सत्य नसते. मिथ म्हणजे पुराणकथा असाही दुसरा अर्थ ऑक्सफर्ड शब्दकोश आपल्याला सांगतो.

आपल्या अत्यंत समृद्ध परंपरेमध्ये अनेक गोष्टी आणि अनेक कथा, परंपरेने गेली सहस्त्रावधी वर्षे एका पिढीकडून पुढील पिढीला सोपवल्या गेल्या आहेत. त्यांना काल-परवापर्यंत ‘myth’ असं म्हटलं जात होतं, त्याला आता शास्त्रीय आधार मिळू लागला आहे. आपल्या ज्या अनेक गोष्टींना मिथ्या म्हणून हिणवलं गेलं त्या सत्य आहेत, असं हळूहळू प्रतिपादित होत आहे.

आजची सत्यवान सावित्रीची, सती सावित्रीची, वटसावित्रीची कथा ही अशीच एक सत्यकथा आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. त्याच्यात थोडी अतिशयोक्ती असेल, नाही असे नाही. परंतु ते संपूर्णत: मिथ्या नाही यावर विश्वास ठेवा. विराट वटवृक्षाच्या शास्त्रीय गुणांकडे किंवा मानवी आरोग्याला या वटवृक्षापासून जे काही लाभ होत असतात त्याच्या खोलात शिरण्याचा या लेखाचा उद्देश नाही.

वटपौर्णिमेच्या सणाकडे आम्ही आज एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहोत.

ज्येष्ठाचा महिना नावाप्रमाणेच सर्व महिन्यांमध्ये ज्येष्ठ आहे. याचं कारण वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू संपून ज्येष्ठामध्ये वर्षा ऋतू सुरू होतो. वर्षा ऋतू म्हणजे समृद्धीचा, संपन्नतेचा, सुखवर्षेचा, जलवर्षेचा ऋतू. वसंतातले शृंगार संपलेले आहेत. ग्रीष्माचा दाहक उन्हाळा संपत आलेला आहे. वातावरण कोरडं आहे. पृथ्वी अतृप्त आहे. तृषार्त आहे. ही तहानलेली वसुंधरा आता आपल्या प्रियकराची अधीरतेने वाट पाहत आहे! मेघांची कृष्णवस्त्रे परिधान करून, लखलखीत सौदामिनीचे तेजस्वी अलंकार अंगाखांद्यावर मिरवत, मरुत रथावर आरूढ होऊन गडगडाटी वाद्यांच्या जयघोषात वरुणाने गरजत, बरसत, नैऋत्येकडून वेगाने यावं आणि आवेगाने आपल्यावर वर्षावं, बरसावं, चिंब भिजवावं या प्रतीक्षेत सूर्यमालिकेतील ही सम्राज्ञी आहे! भूमिरूपी शरीरावरील रंध्र आणि रंध्र वरुण राजाने स्वर्गातील देण्याने भरून टाकावे, आणि मग त्याच रोमारोमांतून, जीवनाचे नवीन हरित अंकुर आकाशाकडे झेपावावे, पुन्हा नवीन जीवन आपल्या कुशीत जन्म घ्यावं हे स्वप्न उराशी बाळगून ही शुष्कअधर धरा सख्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे.

आणि तो येतोच! दिग्गजाच्या दिमाखात! रुद्राच्या रुबाबात! धरित्रीला कडकडून भेटतो, बरसतो, शांत होतो. आणि ती पण शांत होते. या मीलनातून नवं जीवन जन्म घेतं! पृथ्वी मोहरून जाते. मातृत्वाचा महोत्सव सुरू होतो. हा नुसता मातृत्वाचा महोत्सव नव्हे! हा अमरत्वाचा पण महोत्सव!

जोपर्यंत पृथ्वी आहे, जोपर्यंत वरून वरुण कोसळत राहणार आहे तोपर्यंत पृथ्वी आणि पृथ्वीवरचं जीवन अमर असणार आहे याची ही ग्वाही आहे! ती सावित्री हे आमच्या पृथ्वीचे प्रतीक आहे! आणि आमच्या माताभगिनी हे त्या सावित्रीचे प्रतीक आहेत! जोपर्यंत या माता-भगिनी आहेत तोपर्यंत नवजीवन उमलत राहणार आहे, त्यांच्या कुशीमध्ये नवे अंकुर जन्म घेत राहणार आहेत, तोपर्यंत मानवता अमर असणार आहे!

हा विशाल वटवृक्ष पृथ्वीतूनच वरती आला आहे आणि त्याच्या पारंब्या परत पृथ्वीकडे झेपावत आहेत. स्त्रीच्या उदरातून जन्मणारा पुरुष पुढे स्त्रीच्याच प्रसवशील उदरातून मानवतेचा निर्झर पुढे अखंड वाहता ठेवण्यासाठी कणभर का होईना, योगदान देतो. वटवृक्ष हे त्याचंच प्रतीक!

वटवृक्ष विशाल आहे. परंतु पृथ्वीपेक्षा मोठा नाही. पुरुष श्रेष्ठ आहे. परंतु स्त्रीपेक्षा मोठा नाही, हेच यातून सांगायचं आहे. बरं, आमच्या माता भगिनींचं हृदय इतकं विशाल की, पुरुषानं दिलेल्या कणभर योगदानाचं त्या शंभर नंबरी सोन्यात रूपांतर करतात, अवघ्या नऊ महिन्यात! तरी यत्किंचितही आसक्ती नाही की गर्व नाही! ‘नवजीवनाचा अंकुर स्त्रीचं नाही तर पुरुषाचं कुलनाम लावतो! ‘इदम् न मम’ या निष्काम वृत्तीने आमच्या माता भगिनी अक्षरशः जिवावर उदार होऊन, यातना सोसून मानवतेला अमर करण्यासाठी झिजत राहतात. नवांकुर निपजवत राहतात!

क्षण एक पुरे प्रेमाचा

वर्षाव पडो मरणांचा!

या आचार्य अत्र्यांच्या अजरामर सुभाषिताचे मूर्त स्वरूप म्हणजे आमच्या माता भगिनी!

साऱ्या हालअपेष्टा सोसूनसुद्धा आपल्या पतीची अत्यंत प्रेमाने, निर्व्याज भावाने सेवा करण्यात माता-भगिनींना पराकोटीची धन्यता आणि कृतकृत्यता वाटते. संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये, चढउतारांमध्ये, पतीचा त्यांना खचितच वटवृक्षासारखा आधार असतो. पतीच्या छातीवर डोकं ठेवल्यावर, दिवसभराचे श्रम स्त्री एका क्षणात विसरून जाते! जणू काही वटवृक्षाखाली बसलेला पांथस्थ! स्त्रीची रीतच काही वेगळी! ज्या वटवृक्षाखाली ती बसते तो वटवृक्ष एकेकाळी तिच्याच उदरातून निपजलेला असतो! असं हे परस्पर जीवाभावाचं नातं!

वटवृक्ष पांथस्थाकडे जात नाही, पांथस्थ वटवृक्षाकडे येतो! नदी सागराकडे जाते! स्त्री पतीकडे जाते! या साऱ्याचं उदात्त प्रतीक म्हणून वटवृक्षाजवळ जाऊन स्त्रिया हा स्त्री-पुरुष नात्याचा भव्य दिव्य आणि अनंत काळपासून चालत आलेला सोहळा साजरा करतात. त्यामुळे घरात वडाची फांदी आणून हा भव्य दिव्य सोहळा साजरा करू नका. कोजागिरी पौर्णिमेला खोलीतील ट्यूबलाइटखाली बसून दूध पिण्यासारखे आहे ते!

निसर्गाकडे जा! वटवृक्षाखाली जा. सूत गुंडाळत असताना त्याच्या अथांग पानांकडे पहा, त्याच्या भक्कम खोडाकडे पहा. त्याच्या साजिऱ्या गोजिऱ्या पारंब्यांकडे पहा! डोळे भरून पहा.

वटवृक्षाच्या भोवती गुंडाळले गेलेले सूत म्हणजे स्त्रीचे पुरुषाभोवती असलेले प्रेमपाश आहेत! ते जोपर्यंत भक्कम आहेत तोपर्यंत काय इकडे तिकडे जाईल पुरुष, त्याची बिशाद! असा सगळा हा प्रेमाचा, विश्वासाचा, श्रद्धेचा आणि मानवतेचा मामला आहे!

वटपौर्णिमा हा या अशा स्वर्गीय, दैवी नात्याचा महोत्सव आहे! स्त्री आणि पुरुष यांचं परस्परांवरील प्रेम, त्यांची एकमेकांवरची नितांत श्रद्धा आणि पवित्र असे विवाहबंध, यांचा हा त्रिवेणी संगम वरून प्रेमाचे साक्षात प्रतीक असलेला निशिकांत चंद्र मोठ्या कौतुकाने पाहत आहे! पौर्णिमेचा चंद्र! सुखाची पौर्णिमा! ती ही वटपौर्णिमा!!

परिचय : श्री दादासाहेब दापोलीकर (सुमंत जुवेकर) 

https://dadasahebdapolikar. wordpress. com या ब्लॉगवर वाचनासाठी उपलब्ध आहें.

संपर्क – ९९६७८४०००५ ईमेल – dadasahebdapolikar@gmail. com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted