श्री जगदीश काबरे
☆ “आधी मातृभाषा तरी नीट शिकवा…” ☆ संकलन व प्रस्तुती : श्री जगदीश काबरे ☆
(डॉ. तारा भवाळकर यांच्या भाषणाचा गोषवारा)
(’आधी मातृभाषा तरी नीट शिकवा…’ हा डॉ.तारा भवाळकर लिखित लेख रविवार विशेषमध्ये लोकसत्तेत प्रसिद्ध झालेला आहे. तो पूर्ण लेख वाचनीय झालेला आहे. शासनाने आणि मराठी माणसाने हा लेख वाचावाच आणि त्यावर चिंतन, मनन करावे. या लेखातील हिंदीच्या सक्तीमुळे बालमनावर होणारा परिणाम आणि शासनाचा निर्णय लादण्याची एकूणच पद्धत कशी अन्यायाची आहे, हे विशद करणारा लेखातील महत्त्वाचा अंश या पोस्टमध्ये श्री जगदीश काबरे यांनी संकलित केलेला आहे. तो असा…)
महाराष्ट्र शासनाचे धोरण म्हणून सध्या त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार सरकार सध्या करत आहे आणि त्यानुसार इयत्ता पहिलीपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवल्या जाव्यात अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. त्याचा महाराष्ट्रातील सर्व स्तरातून निषेध होत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य महामंडळ, नाट्य परिषद आणि इतर अनेक संस्थांनीही याला विरोध केला आहे. म्हणजे पहिलीपासून तीन भाषा शिकवायला या सगळ्यांचा विरोध आहे, कारण हे धोरण पूर्णपणे अशैक्षणिक आहे, आणि बाल-मानसशास्त्राच्या आणि लहान मुलांच्या शारीरिक क्षमतेच्या विरोधात आहे. पहिल्या वर्गात मूल येते, त्यावेळी ते केवळ सहा वर्षाचे असते, या वयात मुलगा वा मुलगी असली तरी शाळा हीच त्यांच्यासाठी नवीन गोष्ट असते आणि शाळेमध्ये सगळे विषय आणि इतिहास, भूगोल, व्याकरण, अमूक, तमूक, वगैरे त्यांची नावेसुद्धा त्यांना नवीन असतात.
अशा स्थितीत तीन निरनिराळ्या भाषा शिकवायच्या हे म्हटले तर त्याच्या मानसिकतेच्या आणि बौद्धिकतेच्या, शारीरिक क्षमतेच्या विरोधात आहे. पहिलीमध्ये प्रवेश घेणारी छोटी मुले असतात, त्यांना इतक्या विषयांची ओळख होणे, मुख्य म्हणजे तीन चार तास एका ठिकाणी बसणेही शारीरिकदृष्टया अवघड आहे, त्यांना मानसिकदृष्ट्या न झेपणारे आहे, आणि अशा वेळेला तीन तीन भाषा शिकायला लागणे हे अशैक्षणिक व अन्यायकारक आहे, त्यांच्यावर दबाव टाकणारे आहे. शिक्षक म्हणून माझे मत असे आहे की इयत्ता चौथीपर्यंत सर्व विषय मातृभाषेतच शिकवायला पाहिजेत, त्या त्या प्रदेशातील भाषा असेल तर त्या भाषेत शिकवायला हवे. दुसऱ्या कुठल्याही भाषेचा मुलांच्या शिक्षणात प्रवेश तेव्हा होता उपयोगी नाही. खासगी जीवनात ज्या भाषा बोलत असतील ते असतील, पण बालक ज्या शाळेत जाते, तिथले शिक्षण मातृभाषेेत पाहिजे, कारण पहिल्या चार वर्षात शाळेची सवय होते, शारीरिक क्षमता वाढते, आकलनाचा पाया भक्कम होतो, मातृभाषेमुळे सर्व विषयांचे चांगले आकलन होते, मध्येच दुसरी भाषा आली तरी ग्रहण करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, नव्हे तो होतोच.
प्रत्येक विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक वेगवेगळा असतो, क्षमता वेगवेगळी असते आणि अशा वेळेला सर्वसामान्यपणे जी पातळी असते, त्याला झेपेल त्याप्रमाणेच विषय शिकवले पाहिजेत, त्यात एकच भाषा म्हणजे तीही मातृभाषाच आवश्यक आहे, हे मत आचार्य शंकरराव जावडेकर आणि विनोबाजी भावे अशा विचारवंतांचे आहे. तरच त्याला आकलनात गती प्राप्त होते. कोणत्याही टप्प्यावर मातृभाषेत शिक्षण घेतले तर त्याला नकळत भाषेच्या सर्व क्षमता लक्षात येतात. व्याकरण व भाषेचा पाया पक्का होतो. त्याला व्याकरणात काय म्हणतात हे माहीत नसले तरी वाक्य कसे असावे हे कळते. त्यामुळे व्याकरणाच्या दृष्टीने लिंग, वचन समजते. बोलता येते. यादृष्टीने शब्दसंग्रह, विशेषण हे बोलता बोलता नकळत पक्के होते. आपली मातृभाषा चांगल्या दृष्टीने समजली तर दुसरी भाषा समजणे अवघड नसते. कारण जो बुद्ध्यांक असतो, तो कुठल्याही विषयात सारखाच गतिमान असतो. त्या मुलाला भाषेत गती असेल, तर दुसऱ्या भाषेतही गती येऊ शकते. यामुळे चौथीपर्यंत माध्यम भाषा मातृभाषाच असली पाहिजे. दुसरी भाषा मध्ये आली, कुठलीही आली तर त्याच्या आकलनात, भाषिक आकलनात घोटाळे होतात. नेमके काय बोलावे, कसे बोलावे हे त्याला कळेनासे होते.
प्राथमिक शाळेतील अनेक शिक्षक व पालक असे सांगतात, की दोनही भाषा शिकवल्याचा दुष्परिणाम दोन्ही भाषांच्या आकलनावर होतो. त्यांना धड मराठीही येत नाही, इंग्रजीही धड येत नाही. अनुभव असा आहे की, आपल्याला असे वाटते की, किंवा काही शिक्षण शास्त्रज्ञ म्हणे असे सांगतात, की मुलांना लहान वयात जास्त भाषा आकलन करण्याची क्षमता असते, पण हे पूर्णपणे सत्य नाही, याचे कारण त्यांनी त्या वर्गातील मुलांना शिकवलेले नाही. जे शिकवणारे आहेत, शिकवणाऱ्या शाळा आहेत, त्यांचे मत येथे विचारात घेतलेले नाही. शिक्षण शास्त्रज्ञ आपल्या कक्षात बसून निर्णय घेत असतात, आणि काही पुस्तकात वाचून सिद्धांत मांडत असतात. पण प्रत्यक्षात अनुभव वेगळा असतो, कारण शब्दसंग्रह, लिंग-वचन भेद कळणे, दोन भाषेत उच्चारदृष्ट्या त्यांना साम्य, भेद कळणे अवघड असते. पुष्कळदा दोन भाषा जवळच्या वाटल्या तरी त्यामध्ये उच्चारानुसार अर्थबदल असतो. आज आग्रह असा चाललेला आहे, की हिंदी तिसरी भाषा शिकवावी, म्हणजे मातृभाषा म्हणून मराठी, परकीय भाषा म्हणून इंग्रजी आणि देशातील तिसरी भाषा म्हणून हिंदी. आता गंमत अशी होते, की दोन भाषांच्यामध्ये उच्चारदृष्ट्या एकच शब्द असतो, परंतु त्यांचे अर्थ पूर्णपणे भिन्न असतात, हे भाषा शिकविणाऱ्यांना माहीत आहे. इतरांच्या कोणाच्या लक्षातही येत नाही. मग मुलांचे गोंधळ होतात. साधे उदाहरण द्यायचे झाले तर एक साधा शब्द म्हणजे चेष्टा, मराठीमध्ये चेष्टा म्हणजे टिंगलटवाळी, आणि हिंदीमध्ये प्रयत्न म्हणजे येथे दोन वेेगवेगळे अर्थ होतात. कुठे टिंगलटवाळी, आणि कुठे प्रयत्न असा अर्थ होतो हे मुलांच्या लक्षात येत नाही. मुलांच्या डोक्यात हा घोटाळा वयाच्या सहाव्या वर्षात सुरू झाला तर त्याला कुठल्याही भाषेचे आकलन नीट होऊ शकत नाही. असे अनेक शब्द आहेत आणि सध्या तर मराठी भाषेवर अनेक वेळा असे अतिक्रमण होत असल्याचे दिसत आहे.
गेली ४५ वर्षे सीमाप्रदेशात राहत असल्याने अनेक माणसे द्विभाषिक असतात, त्या दोन भाषांमध्ये एकच शब्द, एकच उच्चाराच्या दृष्टीने समान असला तरी अर्थ पूर्णपणे वेगळा असू शकतो. उदाहरणार्थ भंगार या शब्दाचा मराठीतील अर्थ मोडक्या वस्तू असा काहीसा असतो तर कन्नडमध्ये भंगार याचा अर्थ सोने असा आहे. आता हे आकलन होणे मोठ्या माणसांनाही कठीण जाते आणि मुलांना तर ते अशक्य ठरते. प्रत्येक भाषेच्या उच्चारणाची शैली वेगळी आणि उच्चारांनुसार अर्थही वेगळा होतो. म्हणजे विरामचिन्हे, आरोह, अवरोह त्यानुसार होणारे अर्थ हे सगळे एकमेकांत गुंतलेले असतात. म्हणून अर्थ परस्पराच्या दृष्टीने पूर्णपणे वेगळा असू शकतो, आणि त्याचे आकलन मुलांना होत नाही. म्हणजे मातृभाषेचा उच्चार, लेखन हे पक्के झाले की मग दुसरी भाषा शिकणे सोपे जाते. मग ती दुसरी कोणतीही भाषा असली तरी त्या दुसऱ्या भाषेचे सहज आकलन होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मातृभाषेशिवाय एखादी परकीय भाषा शिकवायला लागले, तर मुलांना आपल्या मनातील आशय सलगपणे व्यक्त करणे अवघड जाते, म्हणजे मातृभाषेतही व्यक्त करणे सोपे जात नाही. काही प्राथमिक शिक्षक असे सांगतात, की चौथीपर्यंतच्या मुलांना सरळ दहा वाक्येही मातृभाषेतून बोलता येत नाहीत. लिहिणे तर दूरच.
भाषा शिकवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. स्वत:ची भाषा शिकवण्याची, म्हणजेच मातृभाषा शिकवण्याची पद्धती आणि इतर भाषा शिकवण्याच्या पद्धती या शिक्षण शास्त्रदृष्ट्या वेगवेगळ्या आहेत, हे एक शिक्षिका म्हणून नमूद करावेसे वाटते. या सगळ्याचे आकलन शिक्षकांना झाले नसेल तर नेमक्या प्रशिक्षणाच्या अभावामुळे ती भाषा आत्मसात होऊ शकत नाही.
लोकांना एका वेळी अनेक भाषा आल्या पाहिजेत असे मानले जाते. यामुळे प्रगल्भता येते असा समज आहे. पण हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळी तुम्हाला एक भाषा चांगल्या पद्धतीने आकलन होते. ज्यावेळी तुम्हाला एका भाषेचे नीट आकलन होत असेल तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला दुसऱ्या भाषा शिकण्यास अवघड जात नाही. कारण आकलन क्षमता चांगली झालेली असते. ते आकलन नसताना नुसती भाषा शिकवणे उपयोगाचे नाही.
आपण महाराष्ट्राचा अभिमान बाळगतो असे म्हणतो, शिवाजी महाराजांनी अरबी, फारसी भाषेतील शब्दांना पर्यायी मराठी शब्द कसे निर्माण करता येतील यासाठी विद्वजनांची बैठक बोलावून राज्यव्यवहार कोष तयार केला होता. आपल्याला मराठीचा, इतिहासाचा, ज्ञानेश्वरांपासून आतापर्यंत आलेल्या साहित्य परंपरेचा, शिवाजी महाराजांचा खरोखरच अभिमान असेल तर आधी आपल्याला भाषेचा अभिमान बाळगावा लागेल. त्या भाषेचे आकलन नीट व्हावे यासाठी इयत्ता चौथीपर्यंत सर्व विषय मातृभाषेतूनच म्हणजे मराठीतूनच शिकवायला हवेत. पाचवीमध्ये विद्यार्थी गेल्यानंतर त्याला दुसरी भाषा आणि आठवीमध्ये तिसऱ्या भाषेचे ज्ञान द्यावे, कारण तोपर्यंत त्याची शारीरिक क्षमता वाढलेली असते. सहा वर्षांच्या मुलावर तीन-तीन भाषांचे आणि बाकीच्या विषयांचे ओझे लादणे अन्यायकारक व अशैक्षणिक आहे. म्हणून सहा वर्षांच्या मुलाला मातृभाषा, तीन वर्षांनी दुसरी भाषा आणि मूल १२ वर्षांचे झाल्यानंतर तिसरी भाषा अशीच पद्धत हवी. म्हणून मराठीचा आणि मराठी संस्कृतीचा अभिमान बाळगत असताना परप्रांतीय भाषेची अप्रत्यक्ष सक्ती होणं हेही तितकंच अन्यायकारक आहे.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




