श्री जगदीश काबरे
☆ “गर्भसंस्काराचा सापळा” ☆ श्री जगदीश काबरे ☆
गर्भसंस्कार केल्यामुळे मूल सुसंस्कारी जन्माला येते. कारण गर्भाला आवाज ऐकू येतो, असे समर्थन करणारे हे शिक्षित असतात आणि ते अवैज्ञानिक पद्धतीने या भंपक कर्मकांडाचे समर्थन करत असतात. गर्भसंस्काराला महाभारतातील अभिमन्यूच्या कथेची सांगड घालून धार्मिकतेचे वलय दिल्यामुळे या अज्ञानी मंडळींना आपण काही चुकीचे करत आहोत असे वाटतच नाही. गर्भाला आवाज ऐकू येतात, गर्भ वेगवेगळ्या आवाजांना वेगवेगळा प्रतिसाद देतो, हे वैज्ञानिक सत्य आहे. पण त्याला शब्द कळतात, त्याचे अर्थ कळतात, हे मान्य नाही. कारण त्यासाठी भाषा अवगत असावी लागते. गर्भाला जर गर्भातच भाषा कळत असती तर बाळ जन्माला आल्यानंतर त्याला भाषा शिकवण्याची गरज पडली नसती. पण गर्भ आवाजाला प्रतिसाद देतो म्हणजे त्याला सगळे कळते असे समजून गर्भसंस्काराचे मूढ समर्थक सुतावरून स्वर्ग गाठत असतात आणि चुकीच्या पद्धतीने म्हणजेच छद्म वैज्ञानिक पद्धतीने समर्थन करत असतात. असे समर्थन करणे म्हणजे ख्राईस्ट हा कृष्ण या शब्दाचा अपभ्रंश आहे म्हणून मागच्या जन्मी येशू हा कृष्ण होता असे म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे. तेव्हा खऱ्या अभ्यासाची गरज या शिक्षित विचारशत्रूनाच आहे.
खरे संस्कार तर आयुष्यभर करावे लागतात. कौटुंबिक संस्काराबरोबर सामाजिक संस्कारही महत्त्वाचे असतात. त्याची सांगड धर्म, अध्यात्म याच्याशी फारशी घालू नये. गर्भवतीच्या भावनिक कमजोरीचा गैरफायदा घेऊ नये. संस्कार हा फार मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. आपल्याला रोज येणारे अनुभव डोळसपणे पाहिले, त्याबद्दल विचार केला तर आपल्यावर नकळतपणे अनेक संस्कार होत राहतात. अनुभव हाच मोठा शिक्षक असतो. जी माणसं समाज बदलण्याचं काम करतात, लढे उभारतात, माणसांना चांगल्या कामाची स्फूर्ती देतात, निःस्वार्थीपणे काम करणाऱ्यांच्या फौजा उभ्या करतात, अशा माणसांवर कोण संस्कार करतं? त्यांच्या म्हणण्यानुसार, लहानपणी पालक, शिक्षक, आणखीही कोणी जवळची माणसं यांचं मार्गदर्शन होतं. पण ते काही काळच असतं. त्यांच्याकडून एक गोष्ट घडते की, या माणसांचे मन टिपकागद बनतो. आजूबाजूच्या घटना त्याच्यावर परिणाम करतात. ते संवेदनशील बनतात आणि त्या संवेदनेला प्रामाणिक प्रतिसाद देत ते मोठे होत जातात. गांधीजी म्हणत, ‘माझं जीवन हाच माझा संदेश आहे. ‘ त्यांनी स्वतः सफाईपासून राजकीय लढा उभारण्यापर्यंत सर्व कामं केली. सर्व कामं ते जीव ओतून करत, ते त्यांच्या आईवर कोणी कुठल्याही प्रकारचे गर्भसंस्कार केले नाहीत तरीही…
हातातलं काम जीव ओतून आणि चांगलंच करायचं हा संस्कार आपण मुलांवर करू शकतो. घरातलं काम करताना हे काम मुलाचं आणि हे काम मुलीचं असा भेद न करण्याचा संस्कार आपण घरातच करू शकतो. तसं घरात वातावरण असलं तर मुलांनाही ती सवय लागते. आई तिचं काम नीटनेटकं करते, तिच्या मनात उद्याचं प्लॅनिंग असतं. ‘डबा करायला विसरलेच! ‘, असं ती म्हणत नाही, बाबा त्यांचं काम मनापासून, जबाबदारीने करतो हे घरात पाहणारं मूल तसाच विचार करणार. मनापासून, जबाबदारीने याबरोबर ‘वेळेवर’ हेही महत्त्वाचं असतं. वेळेवर पोचण्यासारखे इतरही अनेक किरकोळ वाटणारे पण अतिशय उपयोगी संस्कार असतात. संस्कार साधेपणाचे असतात, कामाबद्दलचे असतात, पर्यावरणा-बद्दलचे असतात, साफसफाईचे असतात, पैसे योग्य प्रकारे वापरण्याचे असतात, माणसांशी वागण्याचे असतात, काटकसरीचे असतात, व्यायामाचे असतात, भाषेचेही संस्कार असतात. महत्त्वाची कागदपत्रं नीटनेटकी ठेवण्याचे असतात. पण लक्षात कोण घेतो?
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






