श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “साफसफाई…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

गणपती बाप्पांचा मुक्काम संपला. आणि दरवर्षीप्रमाणेच परत एकदा वेध लागले ते साफसफाईचे. गणपतीच्या आधी ती झाली होती असं म्हणण्यापेक्षा त्यावेळी अडगळ काही प्रमाणात लपवली होती. आता मात्र नवरात्र व पुढे येणारी दिवाळी यासाठीच मोहीम उघडली जाणार होती ती साफसफाईची. थोडक्यात लपवलेली अडगळ झटकून परत नीट लपवायची होती.

ग्रहणाच्या आधी वेेध लागतात, आणि यावेळी मंदिरांची दारं म्हणजे कपाटं दर्शनासाठी बंद करतात. तसेच साफसफाईचे पण वेध लागतात, आणि असे वेध लागले की घरातल्या माळावरच्या, दिवाणाखाली केलेल्या, व इतर कपाटांची दारं उघडतात. चारधामच्या क्षेत्रांची दर्शनासाठी कपाटं उघडण्याचा जसा एक ठराविक कालावधी असतो, तस्साच घरातली काही कपाटं उघडण्याचा कालावधी असतो. आणि या काळात लपवलेल्या अडगळीचं सहकुटुंब शक्य झालं नाही, तर सपत्नीक दर्शन घडतं.

ग्रहण काळात नामस्मरण करायच असतं. तर साफसफाईच्या काळात मागच्या वर्षी काय आवरलं होतं, आणि आवरलेलं कुठे, कसं ठेवलं होतं याच्या (काम) स्मरणात काही काळ जातो. बर्‍याच आवरलेल्या वस्तू नेमक्या याचवेळी आपल्याशी लपंडाव खेळत असतात.

अशी साफसफाई करतांना उंच स्टूल, छोटी पण सहज हलवता येईल अशी शिडी याची जमवाजमव करावी लागते. आपल्याकडे असेल तर ठिक. पण शेजारची मागायची असेल तर त्यांच्याकडचे याच कामासाठिचे वेध कधी लागणार याचा वेध घेतला जातो. आणि आपल्याकडची शेजारचे मागणार आहे असा अंदाज आला तर….. आपले साफसफाईचे वेध त्यांच्या वेळातच लागण्याची शक्यता जास्त असते. कारण आपण मागच्या अनुभवाचे देतो.

आपल्याकडे उंच स्टूल किंवा शिडी नसेल तर मग घरात असणारी (प्लास्टीकची) खुर्ची, त्यावर जेमतेम मावणारा जूना स्टूल अशी व्यवस्था करत दहिहंडीसारखा अनुभव घ्यावा लागतो. अशा अनुभवात खुर्ची त्यावर स्टूल आणि स्टूलवर आपण, यात वर चढल्यावर आपले लटपटणारे पाय, आणि स्टूलचे डुगडूगणारे पाय सौं.नी हलक्या हाताने घट्ट धरलेले असतात. आणि खालूनच वर मान करून तीच्या हुकूम दिल्यासारख्या सुचना सुरु असतात.

यात साफसफाई किती, कशी, आणि केव्हा होते याचा विचार तेवढा नसलातरी एक आंतरिक समाधान दोघांना असतं. एकतर तीने आपले पाय धरलेले असतात. यात आपलं समाधान. आणि ती तोंड वर करून बोलते यात तीला समाधान.

अशा सामानात मग पुढच्यावेळी लागतील म्हणून आठवणीने ठेवलेल्या, पण पुढच्यावेळी हमखास न सापडलेल्या पणत्या, प्लास्टीक फुलांचे हार, दारावर लटकवायची तोरणं, रंगीत रांगोळ्यांच्या पुड्या सापडतात. नवीन पायपुसणं ते देवाचं आसन सगळ जवळपास सारख्याच अवस्थेत असतं. यावेळी त्या प्लास्टीक फुलांचे बारीक तुकडे हातात येत असल्याचं लक्षात येतं. थोडक्यात आपल्या व्यवस्थित ठेवण्यापेक्षा व्यवस्थित राहण्यात त्या फुलांच्या हाराने हार मानलेली दिसते. आणि रांगोळ्यांच काय….. त्या पुड्या फुटून एकत्र झालेल्या असतात. व्यवस्थित ठेवण्याच्या नादात आपण नकळत किंवा काहि होत नाही या फाजील आत्मविश्वासाने त्यांच्यावर जड वस्तू ठेवत त्यांची रंगपंचमी साजरी केलेली असते. आणि आता त्याची राखरांगोळी झाली असते. आणि तोरणांच काय….. ते दारावर लटकवण्याच्या ऐवजी स्वत:च कशाच्यातरी आधारावर लटकलं असल्यासारखं वाटतं.

अशावेळी रांगोळीची झालेली राखरांगोळी पाहून होणारी चिडचिड वेगळ्या पध्दतीने व्यक्त होते. कारण नेमक्या त्याच वेळेस आपल्या काही आपणच लपवलेल्या गोष्टी समोर येतात. आपण मग सारवासारवी करतो….. हं….. ती….. ती बाटली नं…… ती दिवाळीत बाण उडवण्यासाठी आणली होती. पण आपला बाण फुसका ठरल्याचं लक्षात येतं. कारण ऊत्तर येत,

ती बाण उडवायची बाटली मोठी आणि रिकामीच होती…… या बाटलीत जे काही शिल्लक आहे ती बाणातली आहे का… आणि बाणात अशी पातळ वापरतात का…. आणि बाण पेटवायला सिगारेट कधीपासून वापरतात……

अरे ती…… ती….. ते माझं नाही. त्या बाळ्याचं आहे….. ठेवायला दिलंय…..

बाळ्याचं…… ठेवायला दिलंय…… का त्याच्या घरात जागा नाही….. आणि बाळ्याला सांगा…. नावा प्रमाणेच बाळ्या रहा. तेवढ्यावर प्रकरण थांबत. जास्त वाढत नाही. खरंतर चढत नाही.

आणि परत एकाचवेळेस गोष्टीची नासाडी होते. अशा सगळ्या ठेवलेल्या वस्तूंची नासाडी झालेली पाहिली की त्या व्यवस्थित ठेवलेल्या वस्तू व्यवस्थित बाहेर येतात, आणि यावर्षी काहि वेगळ आणि नवीन घेऊ म्हणून एक तोंडी यादी तयार होते.

मग पुढचा नंबर असतो तो लागतील म्हणून घेऊन ठेवलेल्या भांड्यांचा. यात काही भांडीतर लागतील म्हणून जी घेऊन ठेवली आहेत ती आजपर्यंत लागलीच नाहीत. आवरतांना फक्त हातालाच लागली. ती तशीच ठेवलेली सापडतात. फक्त त्यांची जागा काहीवेळा बदलते. या भांड्यांवरुन बोलतांना काहीवळा भांडणाचा सुर जाणवतो. त्यामुळे ती लवकर आवरावी लागतात. त्या बाबतीत अरेरावी चालत नाही.

इतक आवरुन झाल्यावर आपला ऊत्साह संपतो. पण इथूनच त्यांच्या ऊत्साहाची सुरुवात होते. कारण पुढचा नंबर असतो तो कपड्यांच्या कपाटाचा. हे कपडे कधी घेतले, कोणी, केव्हा दिले याचा सगळा इतिहास त्यांच्या लक्षात असतो. या इतिहासात काही कडूगोड आठवणीपण असतात. आणि यातले आता कोणते होत नाही यावरून अप्रत्यक्ष स्वत:च्या भूगोलाची प्रगती सांगितली जाते.

यातले काही कपडे काढून टाकू असं म्हणत थोडी जागा रिकामी केली जाते. पण या जागेवर काय ठेऊ या विचारात नवीन कपडे कोणते घ्यावे याचा विचार सुरु होतो.

आणि मग सुरु होते पुढच्या वर्षी आवराआवर कराव्या लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदिची तयारी…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted