श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “मामाच पत्र हरवलं…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

अगोदर काही गोष्टी छापूून आलेल्याच वाचाव्या लागत होत्या. आताही वाचतोच. पण आत्ताच्या गोष्टी या सहसा वेगवेगळ्या माध्यमातून पोस्ट केल्या आहेत अस म्हणतो. अशीच एक पोस्ट पोष्टाच्या पेटीबद्दल वाचली. अखेरचा हा तुला दंडवत….. असा मथळा होता.

०१ सप्टेंबर २०२५ पासून पोष्टाच्या पेट्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पेटीबरोबरच काही गोष्टी आठवणींंच्या पेटीत (कदाचित कायमच्या) बंद होणार आहेत. या मुळेच अशाच एका (जवळपास बंंद होत जाणाऱ्या) गोष्टीची आठवण झाली.

शाळेत असतानाची आठवण. हो तेव्हा ती शाळाच होती. नंतर शाळेेचा के. जी., स्कूल व पुढे इंटरनॅशनल स्कूल असा प्रवास किंवा प्रगती झाली, हल्ली ग्रामपंचायत असलेल्या गावात इंटरनॅशनल स्कूल असते. पण माझी आठवण शहरातल्या शाळेतलीच आहे.

तेव्हा शाळेत खेळाच्या वेळेत एक खेळ खेळायचो. माझ्या मामाच पत्र हरवलं…. आम्हाला नाही सापडलं….. किंंवा शेवटी… ते आम्हाला सापडलं….. असा तो खेळ होता. या खेळात मामाच पत्र असा ऊल्लेख असला तरी प्रत्यक्षात एक रुमालच वापरला जायचा. पत्र तिथेही नव्हतच.

आता असं पत्र ज्या पेटीतून यायचं तीच पेटी बंद करायचं ठरलंय. त्यामुळे आधीच काळाच्या पडद्यामागे जाऊ लागलेला हा मामाच्या पत्राचा खेळ सुध्दा बंद होईल अस वाटतं. (कदाचित झालाही असेल.) कारण असं हरवणार पत्र येणार कशातून आणि मामा टाकणार कशात हाच प्रश्न आहे. आता कोणी म्हणेल कुरीयर आहे की. पण त्यामुळे खरा प्रश्न सुटणार नाही. कारण….. कारण पुढे समजेलच.

पण आता असा खेळ खेळायचा तास तरी कुठे शिल्लक आहे. असलाच तर तो पी. टी. चा तास असतो. आणि ज्या दिवशी असा तास असतो तो सहसा स्पोर्ट्स डे असतो. आणि त्यात असे पत्रांचे खेळ नसतात.

पत्राची पेटी बंद करण्याची वेळ आत्ता आली असली तरी याची कारणं बर्‍याच आधीपासूनच जाणवली नसली तरी हळूूहळू पुढे सरकत होती. कदाचित हि अतिशयोक्ती वाटेल पण त्यात तथ्य नाहीच असही नाही.

हल्ली बर्‍याचशा कुटुंबात एकच मुलगा किंवा मुलगी असते. जिथे एकच मुलगा आहे तिथे आत्या, किंंवा काका. आणि एकच मुलगी आहे तिथे मामा किंवा मावशी हे नातं येणार कुठून. सध्या कदाचित चुलत, मावस, आत्ये, मामे भाऊ बहीण असतीलही. पण पुढे… ती असतीलच का……

आणि मग मामाच नाही, तर मामाच पत्र येणार कुठून, आणि येणारच नसेल तर ते हरवेल कशाला….. आणि मामाच नाही, पत्रच नाही तर मामाच पत्र हरवलं हा खेळ तरी कसा राहील……

त्यामुळेच केवळ पोष्टाची पेटीच नाही, तर या पेटीत पडणारं पत्र, आणि काही नाती या सगळ्याच बाबतीत अखेरचा हा तुला दंडवत असं म्हणावं लागेल.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted