श्री दिवाकर बुरसे
विविधा
☆ ‘क्षण सत्याचा’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
(Moment of Truth)
ईश्वर अनादि आहे, अनंत आहे!
कृतांत, काळ ही ईश्वराची ‘विभूति’ आहे.
“अहं कालोस्मि”, ”मी काळ आहे” असे भगवंताने स्वतःच गीतेत म्हटले आहे.
काळ ‘जातो’ हा भ्रम आहे.
काळ जात नाही तर आपणच काळातून जात असतो.
जन्म-बाल्य-तारुण्य-वार्धक्य-मृत्यु हा आपला जीवनप्रवास आहे, काळाचा नाही. काळ आहे तसाच आणि आहे तिथेच आहे, स्थिर, अचल, अपरिवर्तनीय, अपार, अनंत, अवध्य!
ईश्वराखेरीज सर्व वस्तुमात्र आणि जीवमात्र मर्त्य, विनाशी, विघटनशील, विरी जाणारे, वध्य, मिथ्या आहेत.
“यदृष्टं तं नष्टम्” हे श्रुतिवचन आहे. जे दिसते ते नष्ट होते. जे जन्मते, ते मरते आणि जे मरते ते जन्मतेही!
जन्म आणि मृत्यु या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
सर्व दृष्य वस्तूत सतत, प्रत्येक क्षणी, परिवर्तन होत असते.
काळ अदृष्य आहे म्हणून अपरिवर्तनीय आहे.
दोन नजिकच्या परिवर्तनातील अंतर म्हणजे ‘क्षण’.
गेलेला क्षण हा ‘भूतकाळ’, येणारा क्षण हा ‘भविष्यकाळ’ आणि आपण प्रत्यक्ष अनुभवत असतो तो ‘वर्तमानकाळ’ होय.
गेलेला क्षण हातातून पाऱ्यासारखा निसटलाय् परत कधीही वाट्याला न येण्यासाठी! येणारा क्षण कसा असेल, किंबहुना तो अनुभवता येईल याची शाश्वती नाही. म्हणूनच या भूत आणि भविष्यातील क्षणांचा आपल्याला काहीही उपयोग नाही.
मग ज्याचा उपयोग नाही त्याचा का विचार करायचा? त्याचा विचार करणे हा निव्वळ कालापव्यय!
हातातला आत्ताचा, वर्तमानातला क्षण मात्र संपूर्ण आपला आहे. कसाही उपयोगात आणा, कसाही उपभोगा, त्याचे स्वामी तुम्हीच, केवळ तुम्ही.
म्हणून वर्तमानातील हा क्षण म्हणजे “क्षण सत्याचा”. वर्तमान हेच सत्य!
जो हा ‘सत्याचा क्षण’ सत्कारणी लावतो त्याचे जीवन कृतार्थ होते, गंगौघासारखे पवित्र होते.
ज्याने तो वर्तमान गमावला त्याने आत्मघात केला असे निश्चित समजावे.
त्याचे जीवन फुटलेल्या सांडपाण्याच्या नळासारखे. त्यातले दूषित पाणी झिरपून, पाझरून सर्व आयुष्य शेवाळवते, नासवते!
जे वर्तमानात रमून अन् जगून प्रत्येक “सत्याचा क्षण” सत्कारणी लावतात तेच जीवनमुक्त. केवळ त्यांनाच तो सच्चिदानंद प्राप्त होतो!
ओम शांति, शांति, शांतिः!!
🙏🏻
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





