श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “डोक्यावर पडलाय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
काही वाक्यांचा अर्थ कसा निघतो नं……. डोक्यावर पडलाय….. हे वाक्य सहज जरी ऐकलं तरी आपण थोडा विचार करतो, आणि असं समजतो कि वातावरण थोडंस तापलेलं आहे, आणि काहीतरी चूक झालेली आहे.
पण एखादा खरोखरच पडला असेल, आणि त्यावेळी डोक्याला अगदीच थोडसं लागलं असेल. म्हणजेच गंभीर नसेल व नंतर सगळं वातावरण निवळल्यावर हेच वाक्य म्हटलं तर….. त्यावेळी या वाक्यामुुळे गंमत तर होतेच. पण गमतीतही नंतर ते वाक्य कायम वापरायचा अधिकार मिळतो.
काय झालं,….. आम्ही मित्रमंडळी आपापल्या कुटुंबासह पावसाळी सहलीसाठी एक दिवस बाहेर फिरायला गेलो होतो. काही देवस्थानं पाहण्यासाठी ही सहल होती.
तिथे पोहोचल्यावर देेवदर्शन झाल्यावर, निसर्ग सौंदर्य बघत चेष्टा, थट्टा, मजा, खाणं अशा सहलीत अपेक्षित आणि हव्या असलेल्या सगळ्यागोष्टी खेळीमेळीने सुरु होत्या. त्याच वेळी एका ठिकाणी झाडाच्या आडव्या असलेल्या फांदीवर सगळ्यांनी बसून फोटो काढावा असं ठरलं. जमीनीवरच पाय टेकवून सगळ्यांंना सहज बसता येईल इतकी खाली ती फांदी होती. फांदी कसली खोडचं होत ते.
या फांदीवर बसून फोटो काढून झाल्यावर माझा आणि एका मित्राचा एकमेकांना धक्का लागला. आणि हा धक्का लागल्यावर मी त्या आडव्या फांदीसमोरच जमीनीवरच आडवा झालो. मी आणि फांदी यात खालच्या बाजूला जास्त कोण आडवा होऊ शकतो याची जणूकाही स्पर्धाच लागली होती. स्पर्धा मीच जिंकली. पडला म्हणजे पराभव झाला असं आपण म्हणतो. पण इथे आडवं होण्यात मीच आडवा झालो, म्हणजे पडलो तरी जिंकलो होतो. सुदैवाने मी आडवा होत असतांना कोणी मधे आलं नाही. नाहीतर त्याला सुुध्दा नाईलाजाने आडव्या हातानेच घ्यावं लागलं असतं.
पडतांना मी आधी खांद्यावर पडलो, आणि मग डोकं आपटलं. डोक्यावरचा भार खांद्यावर याचा अनुभव मी पडता पडता घेतला.
पडल्यावर थोडावेळ वातावरणात गंभीरपणा आला होता. रेेल्वेेस्टेेशनवर जशी एकामागूून एक माहिती व सुुचना ऐकू येतात त्याच पध्दतीने, अरे ऊठवा त्याला,…. थोडावेळ बसू द्या,…. पाणी द्या,…
गर्दी करु नका,…. मोकळी हवा येऊ द्या…… अशी अनेक काळजी घेणारी वाक्यं पटापट ऐकायला आली. यात मला ऊठवून बसवलं केव्हा, आणि ऊभं केलं केव्हा हे लक्षातच आलं नाही.
तेवढ्या गदारोळातसुध्दा पाण्याबरोबर एक पेन कीलरची गोळी माझ्या पोटात विसावली. सहलीत खाण्यापिण्याच्या गोष्टींसोबत आंबटगोड चवीच्या चघळायच्या गोळ्यांबरोबरच अशा डोळे मिटून गिळायच्याही गोळ्या असतात हे काहीवेळा बरं असतं.
कुठून फोटोसाठी त्या आडव्या फांदीच्याफंदात पडलो असाही विचार आला. किंवा त्याला खोड म्हणावं तर खोडावर बसून फोटो काढायची खोड जिरली असं म्हणावं लागेल. पण पडल्यावर काही झालं नाही या बद्दल सगळ्यांनीच समोरच्या देवासह जो देव आठवेल त्याचे आभार मानले. देवाचीच कृपा असं म्हणत घेतलेला प्रसाद परत एकदा खाऊन झाला.
अगोदर घेतलेली पेन किलर आणि आता ग्रहण केलेला प्रसाद या मुळे पडतांना लागलेलं ग्रहण हळूहळू सुटत असल्याच जाणवलं. पण संध्याकाळपर्यंत खांदा आणि हात दुखायला लागला होता.
नंतर पुढची देवस्थान पण पाहिली, पण हाताला काही होऊ देऊ नको, हिच विनंती हात दुखत असतांना हात जोडून केली.
दुसर्या दिवशी सकाळी डाॅक्टरांकडे. त्यांना कालचा सगळा प्रसंग सांगितला. ते म्हणाले चला. काल रंगीत फोटो काढलाय, आज आता फक्त हाताचा आणि खांद्याचा काळा फोटो एक्स रे काढू. पण त्या काळ्या फोटोत सुध्दा काही काळेबेरे दिसले नाही.
पण त्या दिवसापासून मी त्याच मित्रांमधे काय कुठेही काही चुकीचं बोलतोयं असं बायकोला वाटलं तर ती ठामपणे आणि खरं बोलते, मनावर घेऊ नका, ते जरा डोक्यावर पडले होते.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈



