श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३१६
☆ पेढे वाटू गावा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
अधरावरती ओठ टेकता मधुर च्युइंगम व्हावा
या ओठांनी त्याच ठिकाणी कायम आश्रय घ्यावा
*
त्या मुरलीची घून ऐकुनी वेडी झाली राधा
मला वाटते तिच्याचसाठी शिकून घ्यावा पावा
*
ओठ तसा तर मिटून आहे काही बोलत नाही
तरी अंतरी श्वास कसा हा तिचाच करतो धावा
*
प्रीत सागरी संगम व्हावा याच्यासाठी आम्ही
नदी किनारी दिल्या सोडुनी दोन कागदी नावा
*
पलंगासही आज लगडुनी मस्त चांदणे आले
मधुचंद्राच्या रात्री आम्ही कलश दुधाचा प्यावा
*
वर्षभरातच हलो पाळणा चैतन्याचा येथे
उदरामधुनी तुझ्याच सखये छावा जन्मा यावा
*
तुझ्या नि माझ्या अस्तित्वाची खूण वाढते आहे
आगमनाच्या नंतर आपण वाटुन खाऊ मावा
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





