श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२८
☆ पाळतात साप… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
आज वावरत आहे, किती रुबाबात साप
कात टाकुन कोडगे, काही फिरतात साप
*
पाय जपुन टाकावा, जंगलात फिरताना
पाय चुकीचा पडता, येथे डसतात साप
*
जात बहिरीच त्यांची, भाषा समजत नाही
काठी पाहुन बिळात, सारे शिरतात साप
*
असो सागर वा भूमि, न्याय सर्व जगी एक,
छोट्या सापास सहज, मोठे गिळतात साप
*
किडा सावध नसावा, घात म्हणूनच झाला
दबा धरूनच येथे, काही असतात साप
*
गावामध्ये शिरतात, काही घुसखोर साप
फकिराच्या वेषातच, काही फिरतात साप
*
फार विषास मागणी, काळ्या बाजारी ह्या
नसतात ते गारुडी, तरी पाळतात साप
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





