श्री जगदीश काबरे

☆ “एकावर एक फ्री ‘ चे वेड☆ श्री जगदीश काबरे ☆

छोट्याशा गावात अन्नपूर्णाबाईंची पुरणपोळीची गाडी होती. ही गाडी केवळ चवदार पूरणपोळ्यांसाठीच नाही, तर “मेंदूला खाऊ” देण्यासाठीही प्रसिद्ध होती, असे गावातील लोक हसत म्हणत. कारण अन्नपूर्णाबाई फक्त पुरणपोळ्या विकत नव्हत्या, तर प्रत्येक खरेदीमागे लपलेला विचारही लोकांच्या लक्षात आणून देत असत. ती गाडी म्हणजे जणू चालती-बोलती प्रयोगशाळाच होती. सकाळी शाळेत जाणारी मुलं, दुपारी शेतातून परतणारे शेतकरी, संध्याकाळी कामावरून थकून येणारे नोकरदार, सगळ्यांच्याच तोंडात एकच वाक्य असायचं, “बाईंची पुरणपोळी म्हणजे मऊसूत, जिभेवर विरघळणारी! ” 

गावातल्या जिल्हा परिषद शाळेत त्या वर्षी विज्ञान मेळावा भरवायचं ठरलं. नेहमीसारखी पोस्टर्स, चार्ट्स, मॉडेल्स, फुगे हे सगळं असणारच होतं. पण विज्ञान शिक्षकांनी यावेळी वेगळा प्रयोग करायचं ठरवलं. “विज्ञान म्हणजे फक्त प्रयोगशाळेतली काचभांडी नाही, ” ते म्हणाले, “… तर ते आपल्या रोजच्या आयुष्यात आहे. ” म्हणून त्यांनी अन्नपूर्णाबाईंना खास निमंत्रण दिलं.

मेळाव्याच्या दिवशी शाळेच्या मैदानात रंगीबेरंगी स्टॉल लागले. एका बाजूला सौरऊर्जेचे मॉडेल, दुसरीकडे पाण्याचा दाब दाखवणारी नळी, एका कोपऱ्यातून मात्र घमघमाट सुटलेला होता. कारण तिथे अन्नपूर्णाबाईंचा पुरणपोळीचा स्टॉल लागलेला होता.

मुलांना वाटले, वा! विज्ञान मेळाव्यात पुरणपोळी! पण अन्नपूर्णाबाई हसून म्हणाल्या, “ही फक्त पुरणपोळी नाही, हा एक विज्ञानाचा प्रयोग आहे. ” बाईंनी फळ्यावर तीन पर्याय लिहिले. ४० सेमी व्यासाची मोठी जंबो पुरणपोळी, ३० सेमी व्यासाची मध्यम पुरणपोळी, आणि २० सेमी व्यासाची छोटी पुरणपोळी.

४० सेमी व्यासाची एक पुरणपोळी चाळीस रुपयाना, ३० सेमी व्यासाची एक पुरणपोळी तीस रुपयाना आणि २० सेमी व्यासाची एक पुरणपोळी वीस रुपयाना आहे. पण ऑफर अशी आहे की, ४० रुपयात एक ४० सेमी व्यासाची पुरणपोळी मिळेल किंवा ४० रुपयात ३० सेमी आणि २० सेमी व्यासाची अशा दोन पुरणपोळ्या मिळतील किंवा ४० रुपयात २० सेमी व्यासाच्या तीन पुरणपोळ्या मिळतील.

आता सांगा मुलांनो, “तुम्ही कोणती ऑफर स्विकाराल की ज्यामुळे तुम्हाला जास्त पुरणपोळी खायला मिळेल? ” असा अन्नपूर्णा बाईंनी प्रश्न विचारला.

राघव म्हणाला, “आजी, सगळ्या पुरणपोळ्यांची किंमत वेगवेगळी का? ” अन्नपूर्णाबाई म्हणाल्या, “कारण विज्ञानात फक्त वस्तू महत्त्वाची नसते, तिचं प्रमाण, क्षेत्रफळ आणि उपयोग महत्त्वाचा असतो. तेव्हा आज खाण्याआधी विचार करा! ”

मुलं हसली. “आजी, खाण्याआधी विचार कसा करायचा? ” एक मुलगा विचारला.

बाई हसून म्हणाल्या, “आज पोट भरायचंयच, पण त्याआधी डोकं भरायचं आहे. ”

बाईंनी तीन प्रकारच्या पुरणपोळ्या समोर मांडल्या होत्या. एक मोठी—जंबो, एक मध्यम आणि एक छोटी. त्या म्हणाल्या, “ या पुरणपोळ्या लहान मोठ्या आकाराच्या असल्या तरी प्रत्येकीची चव तीच आहे, बरं का. ” 

मग बाईंनी गोल पुरणपोळी शेजारच्या फळ्यावर काढून दाखवली. “ही पोळी गोल आहे. आता मला सांगा, गोलाचं म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढतात? ” 

सायली पटकन म्हणाली, “πr² या सूत्रानुसार… ” 

बाईंनी टाळी वाजवली. “मग बघा, ४० सें. मी. व्यासाची जंबो पोळी म्हणजे मोठं क्षेत्रफळ. पण तीन छोट्या पोळ्यांचं एकत्रित क्षेत्रफळ किती होईल, याचा विचार केलात का? ”

मुलांनी कागद-पेन्सिली काढल्या. कोणीतरी गणित केलं, कोणीतरी अंदाज बांधला. मग लक्षात आलं की तीन छोट्या पोळ्या एकत्र केल्यावर मिळणारा ‘खाण्याचा आनंद’ जंबो पोळीपेक्षा वेगळा आहे. कुणाला जास्त तुकडे हवेत, कुणाला एक मोठी पोळी हवी, तर कुणाला मध्यम आणि छोटी अशी जोड हवी.

तेवढ्यात बाईंनी एक गुपित सांगितलं. “ही सगळी ऑफर म्हणजे मानसशास्त्र आहे, ” त्या म्हणाल्या. “लोकांना ‘एकावर एक’ किंवा ‘जास्त मिळतंय’ असं वाटलं की ते खूश होतात. पण खरा वैज्ञानिक विचार असा असतो की, आपल्याला काय हवंय, किती हवंय आणि त्याची खरी किंमत काय आहे? ”

मुलांना अचानक जाणवलं की हा फक्त खाण्याचा प्रश्न नाही, तर विचार करण्याचा आहे. राघव म्हणाला, “मला तीन छोट्या पोळ्या हव्यात, कारण मला मित्रांबरोबर वाटून खायचं आहे. ” सायली म्हणाली, “मला मध्यम आणि छोटी, कारण दोन्ही चवीचा अनुभव मिळेल. ” एक शांत मुलगी मीरा म्हणाली, “मला जंबो पोळी हवी, कारण मला मोठी पोळी तोडत बसायला आवडतं. ” अन्नपूर्णाबाई हसल्या. “बस्स! हेच विज्ञान. एकाच माहितीवर वेगवेगळे निर्णय. योग्य-चूक असं काही नाही, फक्त समजून निवडणं महत्त्वाचं. ”

मुलांना वाटलं, यात काय विज्ञान? पैसे दिले, पोळी घेतली, खाल्ली—सोपंय. पण बाईंची ऑफर ऐकून त्यांच्या मनाचा गोंधळ उडाला. कुणी म्हणालं, “तीन छोट्या जास्त! ” कुणी म्हणालं, “एक मोठीच बरी. ” तर काही जण म्हणाले, “ऑफरमध्येच फायदाच असतो. ”

तेव्हाच बाईंनी पहिला वैज्ञानिक प्रश्न टाकला. “पोळी म्हणजे काय? ”

“खाण्याची गोष्ट! ” कुणीतरी ओरडलं.

“आकार कोणता? ”

“गोल म्हणजे वर्तुळाकार! ”

“मग वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढतात? ”

सायली नावाच्या हुशार मुलीने हात वर केला आणि पटकन म्हणाली, “πr² या सूत्राने! ”

“शाब्बास, ” बाई म्हणाल्या, “आता आपण उकल करू. ”

बाईंनी फळ्यावर खडूने तीन मोठे गोल काढले. एकावर २० सें. मी. , एकावर ३० सें. मी. , आणि एकावर ४० सें. मी. , अशी संख्या लिहिली. “हे ह्या पुरणपोळ्यांचे व्यास आहेत, ” त्या म्हणाल्या. “आता प्रत्येक पुरणपोळीचे त्रिज्या किती होईल सांगा बरं. ” मुलांनी झटपट गणित केलं. छोटी पोळी—त्रिज्या १० सें. मी. , मध्यम—१५ सें. मी. , जंबो—२० सें. मी.

मग मोजमाप सुरू झालं.

छोटी पोळी— वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr² 

म्हणजेच छोट्या पोळीचे क्षेत्रफळ = ३. १४ × १०² = ३१४ चौ. से. मी.

मध्यम पोळीचे क्षेत्रफळ = ३. १४ × १५² = ७०६ चौ. से. मी.

जंबो पोळीचे क्षेत्रफळ = ३. १४ × २०² = १२५६ चौ. से. मी.

हे आकडे बघून मुलांच्या भुवया उंचावल्या. कारण फरक प्रचंड होता.

“आता खरी गंमत बघा, ” बाईंनी सांगितलं. “रु. ४० मध्ये एक जंबो पोळी घेतली, तर तुम्हाला १२५६ चौ. से. मी. क्षेत्रफळ मिळतं. पण त्याच रु. ४० मध्ये तीन छोट्या पोळ्या घेतल्या, तर ३१४ × ३ = ९४२ चौ. से. मी. ”

“म्हणजे जंबो जास्त! ” एक मुलगा आश्चर्याने ओरडला.

पण बाईंनी लगेच हात वर केला. “थांबा. अजून संपलं नाही. ”

त्यांनी मध्यम + छोटीचा पर्याय घेतला. “७०६ चौ. से. मी. + ३१४ चौ. से. मी. = १०२० चौ. से. मी. ”

“म्हणजे हा पर्याय तीन छोट्यांपेक्षा चांगला, पण जंबोपेक्षा कमी, ” मुलांनी निष्कर्ष काढला.

आता मुलांना मजा यायला लागली. कारण आता फक्त पोळी खाणं नव्हतं तर तो एक गणिती खेळ झाला होता… आकड्यांचा, विचारांचा, निवडींचा.

मुलं विचार करत आहेत तेवढ्यात बाईंनी आणखी एक वेगळाच प्रश्न विचारला. “रु. ३० मध्ये काय घ्याल? ”

“दोन छोट्या! ” बहुतेकांनी उत्तर दिलं.

“की एक मध्यम? ” बाईंनी शंका उपस्थित केली.

मुलं गप्प झाली.

बाईंनी पुन्हा गणित मांडलं. दोन छोट्या पुरणपोळ्यांचं क्षेत्रफळ = ३१४ × २ = ६२८ चौ. से. मी. आणि एक मध्यम पुरणपोळीचं क्षेत्रफळ = ७०६ चौ. से. मी.

“म्हणजे? ”

“मध्यम जास्त! ” सगळ्यांनी एकदम उत्तर दिलं.

आता मुलांच्या डोक्यात प्रकाश पडू लागला होता. ऑफर म्हणजे नेहमी फायदा नसतो. जास्त नग म्हणजे जास्त मूल्य नसतं. दिसतं तसं नसतं. मुलं मंत्रमुग्ध झाली. विज्ञान अचानक रोमांचक झालं.

शेवटी बाईंनी निष्कर्ष सांगितला. “जर तुम्हाला जास्त खाण्याचं मूल्य हवं असेल, तर रु. ४० मध्ये जंबो पोळी सगळ्यात फायदेशीर. रु. ३० मध्ये मध्यम पोळी सर्वात शहाणी निवड. म्हणजे फक्त ‘जास्त नग’ दिसत आहेत म्हणून तीन छोट्या पोळ्या नेहमीच जास्त फायद्याच्या असतात असं नाही. आणि ‘एकावर एक’ हा शब्द ऐकून भुलायचं नाही. प्रश्न विचारायचा—खरंच किती मिळतंय? ”

त्या दिवशी मुलांना एक मोठा धडा शिकायला मिळाला. जाहिरातीच्या ऑफर –‘एकावर एक’ या सगळ्या गोष्टी डोळ्यांना भुलवतात; पण विज्ञान डोळ्यांपलीकडचं पाहायला शिकवतं. अन्नपूर्णाबाईंच्या पुरणपोळ्यांच्या ऑफरमुळे मुलांच्या मनात एक नवीन वैज्ञानिक दृष्टी तयार झाली, ती म्हणजे काहीही निवडण्याआधी “खरंच किती मिळतंय? ” हा प्रश्न विचारण्याची. आणि हाच तर विज्ञानाचा खरा गोडवा आहे. त्या दिवशी मुलांनी पुरणपोळी खाल्लीच, पण त्याहून जास्त ते शिकले की गणित फक्त पुस्तकातच नसतं, विज्ञान प्रयोगशाळेतच नसतं, आणि शहाणपण म्हणजे फक्त स्वस्त नाही तर योग्य निवड करणं असतं. अन्नपूर्णाबाईंच्या गाडीवरची पुरणपोळी संपली, पण मुलांच्या डोक्यातलं विचारांच गोड पुरण मात्र बराच काळ रेंगाळत होतं. मेळावा संपला. मुलं घरी गेली. त्या रात्री अनेकांच्या घरी चर्चा सुरू होती. बाबा म्हणत होते, “आपण तर जाहिराती पाहूनच वस्तू घेतो. ” आई म्हणत होती, “आता भाजी घेतानाही विचार करायला हवा. ”

अन्नपूर्णाबाईंची गाडी दुसऱ्या दिवशीही उभी होती. पण आज मुलं पोळी घेताना विचार करून घेत होती. कोणीतरी जंबो घेतली, कोणीतरी मध्यम. पण सगळ्यांच्या डोळ्यांत एकच चमक होती—समजून उमजून निवड केल्याची.

©  श्री जगदीश काबरे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted