श्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३२ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
गीतांजलीतील मृत्यूची परिकल्पना…
गीतांजलीतील बहुसंख्य कवितांमध्ये मृत्यूचा उल्लेख या ना त्या प्रकारे आलेला दिसतो. याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर दोन शक्यता आढळतात.
पहिली शक्यता ही की, रविंद्रनाथांनी त्यांच्या तरुणपणीच, त्यांच्या अगदी जवळच्या, प्रिय व्यक्तींचे मृत्यू फार जवळून पाहिले किंवा अनुभवले म्हटलं तरी चालेल. ते फक्त १३ वर्षांचे असताना त्यांचं मातृछत्र हरपले. नंतर ते २२ वर्षांचे असताना त्यांची जिवलग मैत्रीण, त्यांचे प्रेरणास्थान असलेली, त्यांच्या साहित्याची प्रथम वाचक, श्रोता व टीकाकार असलेली त्यांची समवयस्क वहिनी, कादंबरी देवींचा अनपेक्षित व अनैसर्गिक मृत्यू रविंद्रनाथांना उध्वस्त करून गेला.
यानंतर तर काळाची वक्रदृष्टीच त्यांच्या कुटुंबावर पडली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांची पत्नी मृणालिनी देवी ऐन तारुण्यात, पाच मुले मागे सोडून, १९०२ साली त्यांना एकटं करून गेल्या. या धक्क्यातून बाहेर येण्यापूर्वीच फक्त ९ महिन्यांच्या अंतरालानंतर, त्यांची मुलगी रेणुका टी बी च्या संसर्गामुळे अवघ्या १३ व्या वर्षी मृत्यू पावली. त्यानंतर एक वर्षाच्या आतच रविंद्रनाथांच्या वडिलांचा मृत्यू (१९०५) झाला. त्यांचा धाकटा मुलगा समींद्रनाथ ११ वर्षांचा असताना कॉलरा होऊन देवाघरी गेला (१९०७). पाठोपाठ सतीशचंद्र नावाचा त्यांचा तरूण, बुद्धिमान सहकारी, जो कलकत्त्यातील आपलं सगळं वैभव सोडून शांतिनिकेतनाच्या कार्यात रविंद्रनाथांना मदत करण्यासाठी आला होता तो अचानक वारला. अशा प्रकारे १९०२ ते १९०८ या सहा वर्षांत त्यांनी पाच जवळच्या व्यक्तींना गमावलं. यानंतर १९२३ साली बंधू सत्येंद्रनाथ व १९२५ ला बंधू ज्योतिरिंद्रनाथ स्वर्गवासी झाले.
रविंद्रनाथांना मृत्यूविषयी वाटणारा जिव्हाळा, जो त्यांच्या गीतांजलीतील कवितांमधून जाणवतो त्याचं दुसरं कारण असू शकतं, ते म्हणजे त्यांचा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास! या अभ्यासामुळे आत्मा अमर आहे व एक शरीर नष्ट झालं तरी दुसरं शरीर धारण करून तो पृथ्वीवर येतच असतो; या जन्ममृत्यूच्या चक्रावर त्यांचा दृढ विश्वास होता व म्हणूनच या चक्राचा उल्लेख अगदी पहिल्याच कविते पासून गीतांजलीत वारंवार आलेला दिसतो.
त्यांच्यातला कवी मृत्यूला कधी घाबरत नाही किंवा टाळण्याची इच्छाही व्यक्त करत नाही, उलट तो मृत्यूचं स्वागत करताना दिसतो.
ते म्हणतात, मृत्यूला का भ्यायचं? मरण म्हणजे दोन जन्मांमधली फक्त छोटीशी विश्रांतीच तर आहे.
आपण जन्म घेऊन जसे या जगात आलो, तसेच मृत्यू नंतर दुसऱ्या जगात प्रवेश करणार असतो. ते जग आपल्याला अनोळखी असतं म्हणून भीती वाटते म्हणावं तर जन्माआधी आपल्याला हे जग तरी कुठे माहीत होतं!
ज्या परमात्म्याच्या भेटीसाठी आपण जन्मभर तळमळतो, मृत्यूनंतर त्याचा चिरंतन सहवास आपल्याला मिळू शकतो, त्याच्याशी एकरूप होण्याची संधी आपल्याला मिळू शकते. या मर्त्य जगातून त्याच्या अमर्त्य जगात आपल्याला प्रवेश मिळतो. या सगळ्याचा टागोरांना अतिशय आनंद होतो. पतीगृही निघालेल्या नव्या नवरी प्रमाणे त्यांना त्या अमर्त्य जगाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. तिकडे जाण्याबद्दल आतुरता आहे.
तरूण वयातच मृत्यूच्या तांडवामुळे भावविश्वाच्या चिंध्या झाल्यानंतर, रविंद्रनाथांच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली, पण मृत्यूच्या या अनुभवानेच त्यांना मृत्यू विषयी विचार करायला भाग पाडले असणार आणि मग त्यांचा मृत्यू कडे बघण्याचा दृष्टीकोनच पूर्णपणे बदलला असावा. प्रियजनांच्या कायमच्या वियोगामुळं, त्यांचं लौकिक गोष्टीत गुंतलेलं मन मुक्त झालं आणि त्यांना पटलं की मृत्यूच्या चष्म्यातून जीवनाकडं बघायला हवं तरच जीवनाचं सत्य लक्षात
येईल.
—–
☆ गीत : ९४ ☆
AT this time of my parting, wish me good luck, my friends! The sky is flushed with the
dawn and my path lies beautiful.
Ask not what I have with me to take there. I start on my journey with empty hands and
expectant heart.
I shall put on my wedding garland. Mine is not the red-brown dress of the traveller, and though there are dangers on the way I have no fear in my mind.
The evening star will come out when my voyage is done and the plaintive notes of the
twilight melodies be struck up from the King’s gateway.
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत : ९४ ☆
☆
घेऊनि तुमच्या शुभ कामना।
निरोप घेत मी जरी यातना॥
*
लाली उषेची गगन भूषवी।
वाटचाल ती रम्य भासवी॥
*
असती माझे रिक्तच हस्तक।
परी ठेविते नत मी मस्तक॥
*
मनी असे उत्सुकता भारी।
पतीदेवाच्या जाईन दारी॥
*
पाठवणीची साडी पिवळी।
हृदयी असे ती मूर्त सावळी॥
*
अज्ञाताचा प्रवास अवघड।
नसे भीती, करि तो सवघड॥
*
स्वागत करण्या तारे गगना।
सायं गीते गातील ललना॥
*
वेशीपासुनि मिरवित नेतील।
सासरी माझे कवतिक होईल॥
*
रूप सावळे पाहीन जेधवा।
विरुनि जाईन त्यांमधे तेधवा॥
☆
भावानुवाद © मंजिरी येडूरकर
संपर्क: ९४२१०९६६११
—–
☆ गीत : ९५ ☆
WAS not aware of the moment when I first crossed the threshold of this life.
What was the power that made me open out into this vast mystery like a bud in the
forest at midnight!
When in the morning I looked upon the light I felt in a moment that I was no stranger in
this world, that the inscrutable without name and form had taken me in its arms in the form of my own mother.
Even so, in death the same unknown will appear as ever known to me. And because I
love this life, I know I shall love death as well.
The child cries out when from the right breast the mother takes it away, in the very next moment to find in the left one its consolation.
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत : ९५ ☆
कसे का अन् कधी
जगती पडले मम पाऊल कलंदर
घनदाट अरण्यी
माध्यान्ह रात्री
जणू उमलते कलिका सुंदर
शक्ती कोणती
भक्ती कुणाची
जी भासे मज गूढ निरंतर
क्षणात कळले
मज जाणवले
अनंग व्यापे मम मातेचे अंतर
प्रिय मज जीवन
हरीप्रीत साधून
तसाच कवळीन मृत्यू शुभंकर
माता करविता
दुग्धपान बालका
पयोधर ती बदले जेंव्हा तद्नंतर
कांही क्षण त्या
दुग्ध न मिळता
रडे मूढ ते, जीवन मिळते मृत्यू नंतर
☆
भावानुवाद © मंजिरी येडूरकर
संपर्क: ९४२१०९६६११
—–
☆ गीत : ९६ ☆
WHEN I go from hence let this be my parting word, that what I have seen is unsurpassable.
I have tasted of the hidden honey of this lotus that expands on the ocean of light, and
thus am I blessed ⎯ let this be my parting word.
In this playhouse of infinite forms I have had my play and here have I caught sight of him that is formless.
My whole body and my limbs have thrilled with his touch who is beyond touch; and if the end comes here, let it come ⎯ let this be my parting word.
—-
☆ मराठी भावानुवाद : गीत : ९६ ☆
☆
चाललो मी चाललो
अनंत यात्रेला॥
*
भोगिले मी भोगिले
अत्युच्च सुखांना॥
*
चाखिला मी चाखिला
मधु दैवी पुष्पांचा॥
*
अभिनित केली मी केली
भूमिका त्याने दिलेली॥
*
पाहिले मी पाहिले
रूप अरूपाचे॥
*
स्पर्शिले मी स्पर्शिले
जे स्पर्शापार असे॥
*
रोमांचित झालो मी झालो
अनुभूती घेतांना॥
*
त्यागिले मी त्यागिले
मर्त्य जीवनाला॥
*
बोललो मी बोललो
अंतिम बोलांना॥
*
चाललो मी चाललो
अनंत यात्रेला॥
☆
– क्रमशः भाग ३२..
मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.
भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





