नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ ओढ माऊलीची… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
पंढरीशी जाता सुख होई फार
भेटते माहेर भक्तालागी !!
*
चंद्रभागा स्नान आनंद सोहळा
भक्ताचाच मेळा वाळवंटी !!
*
चंदनाचा टिळा बुक्का मधोमध
शांत शांत वाटे अंतरंगी !!
*
आता लागे ओढ माऊलीची फार
धावताती पाय राऊळाशी !!
*
राऊळात सार्या वैजयंती गंध
भेटते माऊली परिमळी !!
*
प्रत्यक्ष माऊली भेटता समोर
आनंद विभोर मन होई !!
*
विसरते सारे व्याप ताप मन
भेटते जाऊन माऊलीला !!
*
पावलाचा स्पर्श मनामधे हर्ष
तृप्ततेचा अंश भरलेला !!
*
वाटते जगणे सार्थकी लागले
भेटणे जाहले माऊलीशी!!
*
माहेरचे सुख भेटते भक्ताला
रंगतो सोहळा पंढरीत !!
☆
© नीलांबरी शिर्के
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈





