प्रणिता प्रशांत खंडकर
जीवनरंग
☆ अवघा रंग एक झाला… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
पार्लरची वेळ संपली होती. अपर्णा पर्स घेऊन निघण्याच्या तयारीत होती. पण सायली मात्र विचारात गढल्यासारखी खुर्चीवर बसून होती.
“सायली, चल निघूया ना? ” अपर्णा म्हणाली, तशी सायली पटकन आवरून उठली. दोघींनी शटर ओढून पार्लरला कुलूप घातलं आणि घरी निघाल्या आपापल्या वाटेने. सायलीच्या डोळ्यांपुढे तिचा भूतकाळ अवतरला होता.
पाच वर्षांपूर्वी तिचं आणि समीर’चं लग्न झालं. समीर एका सुप्रसिद्ध वाद्यवृंदात गिटारवादक होता. वाद्यवृंद खूपच जोरात चालला होता. एकामागून एक तारखा लागलेल्याच असायच्या. त्यामुळे समीरची कमाईही भरपूर होती.
सायलीनी बारावी झाल्यावर ब्युटी पार्लरचा कोर्स केला होता आणि नववधूच्या मेकअप’च्या ऑर्डर घ्यायला सुरूवात केली होती.
एका मध्यस्था मार्फत समीरचं स्थळ आलं आणि दोन महिन्यात लग्न झालं सुद्धा. दोघंही खुश होती एकमेकांवर. सगळं काही छान चाललं होतं. सासू-सासरेही जीव लावणारे होते. दीड वर्षानी त्यांच्या घरात विशालचं आगमन झालं. नातवाच्या कौतुकात आजी-आजोबा दंग झाले. सायली आणि समीरचाही तो लाडोबा होता.
डहाणूहून कार्यक्रम संपवून समीर आणि त्याचे साथीदार
ट्रॅक्सनी कल्याणला निघाले होते. शीळफाट्या’च्या अलीकडेच एका भरधाव येणाऱ्या ट्रकची धडक बसली त्यांच्या ट्रॅक्सला आणि तो भयंकर अपघात घडला. जागच्या जागीच सारा खेळ संपला होता. समीर आणि रवी त्याचा मित्र दोघेही जागीच. सायलीचं घर या प्रसंगामुळे पार कोलमडून गेलं. जाणारा निघून जातो, पण मागे राहिलेल्याला तर जगणं चालूच ठेवावं लागतं नां.
समीरचं थोडं फार सेव्हिंग होतं. सायलीचे सासरे शिक्षक होते. एक वर्षापूर्वीच ते निवृत्त झाले होते. त्यांना मिळणारं पेंशन घर चालवायला पुरेसं नव्हतं. सासूबाई गृहिणी. सायली जेमतेम पंचवीस वर्षाची आणि विशाल एक वर्षाचा.
सात-आठ महिन्यांनंतर सायली थोडी सावरली. तिचं माहेरही मध्यमवर्गीय. त्यामुळे आर्थिक मदतीची अपेक्षा करणं शक्यच नव्हतं. आई-वडील तिला ठाण्यात माहेरी येऊन रहायला म्हणत होते. पण तिला ते योग्य वाटलं नाही. तिने मग घरातच पार्लर सुरू केलं. सगळ्यांनाच थोडी गैरसोय होणार होती. पण आत्ता दुसरीकडे जागा घेणं परवडणारं नव्हतंच. शिवाय आजी घरात असली तरी विशालकडे’ही तिला लक्ष द्यायलाच हवं होतं.
हळू हळू तिचा जम बसला. एके ठिकाणी अपर्णाची भेट झाली आणि दोघींनी मिळून ही आत्ताची जागा भाड्याने घेतली पार्लरसाठी. जागा मुख्य बाजारपेठेत होती, त्यामुळे पार्लरचे ग्राहक खूपच वाढले होते.
सुधाताईंशी ओळख पार्लर मध्येच झाली. त्या बरेचदा यायच्या तिथे. सायली पार्लरमध्ये नसताना एकदा त्या फेशियल करायला आल्या होत्या. सहज बोलता बोलता अपर्णाने त्यांना सायली बद्दल सांगितले आणि नंतर एकदा त्या दोघींची ओळखही करून दिली.
त्यांना खूप वाईट वाटलं ऐकून, एवढ्या लहान वयात, असा प्रसंग, सायलीने परत लग्न करून संसार थाटावा, आनंदात आयुष्य घालवावं असं त्यांना मनापासून वाटलं.
त्यांच्या मुलाच्या मित्राची, विवेकची त्यांना आठवण झाली. विवेक तिशीचा, एका मल्टिनॅशनल कंपनीत अधिकारी होता. रंगाने सावळा असला तरी रूबाबदार वाटायचा. शिवाय स्वभावही दिलखुलास. दोन वर्षापूर्वी डेंग्यूचं निमित झालं आणि वैदेही, त्याची बायको, विवेक आणि दोन वर्षाची स्वरा यांना मागे ठेवून देवाघरी गेली.
विवेकचं आयुष्य’ही त्यामुळे भरकटलं होतं. नोकरी आणि स्वराचं संगोपन यात त्याची फरपट होत होती. हसणं-बोलणं जणू विसरूनच गेला होता तो, विवेकचे आई-वडील सध्या त्याच्याकडे येऊन राहिले होते. पण कायम इकडे राहणं त्यांना शक्य नव्हतं. गावाकडे घर आणि आंब्याची बागाईत होती, त्याची व्यवस्था कोण बघणार? भावनिक दृष्ट्या आणि शिक्षणाच्या दृष्टीने स्वराला कोकणात पाठवायची विवेकची तयारी नव्हती. विवेकला एक मोठी बहिण होती, ती लग्न होऊन रत्नागिरीला रहात होती.
सायली आणि विवेक तसे समदुःखीच. पण एकत्र आले तर दोघांच्या जीवनात आनंद निर्माण होईल आणि दोन्ही मुलांनादेखील आई-बाबा मिळतील. असा विचार करून सुधाताईंनी विवेकच्या आई-बाबांना सायलीबद्दल सुचवलं. ‘विवेक तयार असेल तर आम्हाला आनंदच आहे’, त्यांनी संमती दर्शविली. कधी स्वतः, तर कधी मुलामार्फत विवेकशी बोलून त्यांनी त्याला तयार केलं.
सायलीचंही मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. पण सासू-सासऱ्यांना सोडून, पुन्हा एकदा लग्न करायचा विचार तिला पटत नव्हता. शिवाय विशालचा ही प्रश्न होताच. अखेरीस सुधाताईंनी ‘त्यांच्याशी मला बोलू तरी दे एकदा’, म्हणून तिची परवानगी मिळवली. आज त्या तिच्या घरी जाणार होत्या.
सुधाताई, सहा वाजता सायलीच्या घरी पोहोचल्या. त्यांनी स्वतःची ओळख सांगून, मूळ विषयालाच हात घातला. सायलीच्या आयुष्याच्या दृष्टीने हे पटत असले तरी, नातवाला आपल्यापासून दूर करण्याचा विचार त्यांना सहन होण्यासारखा नव्हता. तरीही आपण यावर विचार करू, असं आश्वासन त्यांनी दिलं आणि सुधाताई तिथून निघाल्या. म्हणूनच सायलीला घरी जायचं टेंशन आलं होतं.
‘आज सुधाताईंच्या बोलण्यावर विभाताई आणि वसंतरावांची काय प्रतिक्रिया असेल? ‘ तिचं मन सैरभैर झालं होतं. काय झालं होतं. काय करावं हेच तिला कळत नव्हतं.
ती घरी पोहोचली तर घरातलं वातावरण तिला आज वेगळं वाटलं. एक प्रकारचा ताण जाणवत होता. ती मग विशालला घेऊन गॅलरीतल्या झोपाळ्यावर जाऊन बसली. दुपारची भाजी-आमटी शिल्लक होती. त्यामुळे स्वयंपाकाचं जास्त काम नव्हतं. संध्याकाळी चार भाकरी, विभाताईच करायच्या. बाकीचं ती करायची. आज जेवणंही जरा मुकाट्यानेच झाली.
सकाळी उठल्यावर चहा घेताना मात्र त्या दोघांनी तिला पुन्हा लग्न करण्याला त्यांची संमती असल्याचं सांगितलं. विशालला सोडून राहणं त्यांना खूप अवघड होईल हे सांगताना दोघांचे डोळे भरून आले होते. तरीही ‘तू जे ठरवशील त्याला आम्ही होकार देऊ. तुझं आयुष्यही सुखात जावं असं आम्हाला वाटतं’, असं म्हणून विभाताईंनी तिला प्रेमाने जवळ घेतले.
कोणताही निर्णय घेण्याआधी, सायली आणि विवेकची भेट होणं, एकमेकांचे विचार त्यांनी समजून घेणं हे देखील आवश्यक होतंच. मग सगळ्यांनी दुसर्या दिवशी विवेकच्या घरी भेटावं असं ठरलं.
विवेकचा फ्लॅट पाच खोल्यांचा, म्हणजे तसा मोठा होता. त्यामुळे मोठ्यांना एका खोलीत आणि विवेक – सायलीला दुसऱ्या खोलीत बसून मोकळे पणाने बोलणं शक्य होणार होतं. मुलांनाही हाॅलमध्ये खेळायला जागा होतीच.
एकमेकांशी बोलून थोडं सैलावल्यावर, सायलीने तिच्या सासू-सासऱ्यांचं मतही विवेकला सांगितलं. विवेकला सायली आणि तिचं एकूण वागणं-बोलणं आवडलं होतं. सायलीच्या मनात काय आहे, ते मात्र त्याला कळत नव्हतं.
“तुझा काय विचार आहे सायली? हवं तर थोडा वेळ घे अजून आणि मग ठरव” विवेकने तिला आपला होकार देत सुचवले.
ते दोघं बाहेर आले तर स्वरा आणि विशालची छान गट्टी जमली होती. ती दादा-दादा करत त्याच्या मागे पळत होती आणि तोही तिच्याशी छान खेळत होता. वडील मंडळींच्याही दुसर्या खोलीत गप्पा रंगल्या होत्या. या दोघांना आलेलं पाहून त्यात खंड पडला. विवेकचा चेहरा काहीसा ठाम निर्णय घेतल्यासारखा तर सायली मात्र जरा संभ्रमात वाटत होती. तिचा निर्णय अजून होत नव्हता.
विवेक सायलीला म्हणाला, “साॅरी, पण तुला माझी एक अट सांगायची राहिलीच. “
‘कोणती? ‘, सायलीच्या चेहऱ्यावर अजूनच गोंधळल्याचा भाव.
‘जर विशालचे आजी-आजोबा स्वरालाही नात मानून आपल्याबरोबर रहायला तयार असतील, तरच मी तयार आहे लग्नाला. ‘
सायलीचा चेहरा एकदम खुलला होता आणि ती मोठ्या अपेक्षेने आपल्या सासू-सासऱ्यांकडे पहात होती. ती दोघंही चकित होऊन विवेककडे पहात होती. विवेकच्या आई-बाबांचीही या गोष्टीला संमती होती. ती दोघं अधून-मधून येणार होतीच. पण मुलांना आजी-आजोबांचा सहवास रोजच मिळावा, हे त्यांनाही हवे होते.
हो – ना करता करता, वसंतराव आणि विभाताई, नातवंडांच्या प्रेमासाठी या गोष्टीला तयार झाले. विशाल आणि स्वरा टाळ्या पिटत नाचायलाच लागले. सायली आणि विवेक एकमेकांचा चेहेरा वाचण्यात रंगून गेले.
© प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





