श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “इमोशनल इन्टेलिजन्स” – लेखक : डॅनियल गोलमन – अनुवाद : डॉ. कमलेश सोमण ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : इमोशनल इन्टेलिजन्स 

लेखक : डॅनियल गोलमन 

अनुवाद : डॉ. कमलेश सोमण 

पृष्ठ: २५५

मूल्य: रु. २९९ /-

व्यक्तिमत्त्वाची परिपूर्ण जाणीव करुन देणारे पुस्तक – – – 

सातत्याने धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये आपल्यापैकी प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या आव्हानांना सामोरा जात असतो. शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्तरावर संघर्ष करत असतो. त्या-त्या वेळची परिस्थती पाहून आपण निर्णय घेतो. मग ते शिक्षण, करिअर, जीवनातील अनेक प्रश्न असतील, त्यांना सामोरे जाताना अनेकदा आपण संवेदनाहिन होउन जातो. मात्र, या संवेदना म्हणजे भावना आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतात या स्व भावनांची ओळख झाल्यास जीवन सुसह्य आणि आनंदी कसे होउ सकते, हे इमोशनल इन्टेलिजन्स या पुस्तकातून प्रभावीने मांडले आहे.

स्व भावनांची यथायोग्य जाणीव होणं, स्वतःची व इतरांचीही आंतरिक मनस्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता, म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय, अशी व्याख्या लेखकाने आपल्या अभ्यासाच्या अनुभवावर केली आहे. स्वतःच्या भावनांवर आणि त्यांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवता येणं, आपल्या जवळील व्यक्तींसोबत सुसंवाद साधता येणं, स्वयं प्रेरणेतून व जीवनात ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार कार्य करणं, वागण्यात व स्वभावात लवचीकपणा असणं व सर्व गुणात्मक मिश्रणाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात. विचार न कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता भावनिक बुद्धिमत्ता होय.

सर्वप्रथम चाल्स रॉबर्ट डार्विन याने भावनिक बुद्धिमत्तेबद्दल आपले विचार मांडले. निरोगी, समतोल व्यक्तीमत्वाशिवाय संतुलन येत नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिकता बदलत बदलत जाते. मुले, प्रौढ, महिला, वृद्ध या सर्वांमध्ये भावनांचे दोन घटक महत्त्वाचे असतात, ते म्हणजे भावनिक स्थैर्य, भावनिक परिपक्वता. भावना ही मानवी मनाची व्यमिश्र अवस्था आहे. तिचे शारीरिक व मानसिक असे दोन पैलू आहेत. तर्कनिष्ठ निर्णयांसाठी भावना आवश्यक असतात. त्याचबरोबर संगतीची ताकद प्रचंड असते. तिला कधीच कमी लेखू नका. आपण ज्यांच्या संगती मध्ये दिवस घालवतो, त्यांच्या वागण्याच्या प्रतिमा भावनिक संसर्गामुळे आपल्या मज्जापेशी वर उतरतात. त्यातून आपल्या व्यक्तीमत्त्वाला आकार मिळत असतो, अशा भावनिक बुद्धीमत्तेविषयी अनेक वस्तुनिष्ठ तथ्ये या पुस्तकात मांडली आहेत. त्यातून अनेकांना आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.

निकोप नातेसंबंध ही जीवनातील एक सुंदर आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. ते जोपासण्यासाठीही तरल भावनांची आवश्यकता असते. भावनाविवश असणेही चुकीचे आहे. ते कमकुवतपणाचे, अविवेकाचे, संयमाच्या अभावाचे, निराशेकडे जाण्याचे लक्षण आहे. याकडे लेखकाने लक्ष वेधले आहे. या पुस्तकातील काही भाग मुलांसाठी तर काही भाग मोठ्‌यांसाठी आहे. कुटुंबव्यवस्था आणि वाढते घटस्फोट या विषयांवर लेखकाने आपले निष्कर्ष साध्या, सोप्या शब्दांत मांडले आहेत.

केवळ बुद्धीवादी माणसाशी संवाद साधणं अशक्य असतं. एखाद्या बुद्धीवादी व्यक्तीशी बोलताना अनेक अडथळे येतात. त्यामुळे प्रत्येकवेळी बुद्धीला हृदयाच्या सेवेत गुंतवले पाहिजे, हा मानसशास्त्र म्हणून लेखकाने मांडलेला विचार खरोखरच मौल्यवान आहे. मेंदूची मनाची जोपासना आपल्याला करता आली पाहिजे. जीवनाच्या अंत्यंबाह्य सर्व अंग उपंगांची एकात्मता साधता आली पाहिजे. त्यातूनच व्यक्तीमत्त्वाच्या सौंदर्याच्या शोध लागतो. भावनिक कौशल्ये नेमकी काय आहेत, बोधात्मक आणि वर्तनात्मक कौशल्ये काय आहेत? याविषयीचे सखोल विवेचन या पुस्तकात केले आहे. केवळ पुस्तक वाचून आपल्यामध्ये बदल घडेलच असे नाही. पण, त्याविषयाचे ज्ञान असल्याने कुठेतरी आपल्या अजाणत्या मनात असल्यास त्याचा आपल्याला उपयोग नक्कीच होतो. त्यादृष्टीने हे पुस्तक अभ्यासले पाहिजे. पुस्तकामध्ये काही ठिकाणी केवळ उपदेशात्मक विचार मांडले आहेत. एखाद्या ते कंटाळवाणे वाटू शकते. त्याच्या जोडीला काही उदाहरणे किंवा ते गोष्टीरुपात मांडले गेले असते तर, अधिक प्रभावी झाले असते असे वाटून जाते. मात्र, तरीही स्व-मदत गटातील हे इमोशनल इन्टेलिजन्स या विषयाला वाहिलेले एकमेव पुस्तक अनेक गोष्टी तुम्हाला शिकवते.

शेवटी, महत्त्वाचे काय? तर, भावनाशून्य असणे हे जितके नुकसानकारक आहे, त्याप्रमाणे भावनातिरेक आणि भावनांचा कल्लोळ तुम्हाला चुकीच्या विचार किंवा कृतीच्या दरीतही ढकलू शकतो. त्याचा परिणाम बरा-वाईट परिणाम संपूर्ण आयुष्यावर होतो. त्यामुळे इमोशनल इन्टेलिजन्स जाणून घेणे आणि त्याचे नीति-नियम समजून घेणे महत्त्वाचे ठरते. लेखक असे मानतो, की प्रत्येक मनुष्य हा परिपूर्ण आणि प्रगल्भच असतो. केवळ त्याला त्याची जाणीव होणे आवश्यक असते. त्यादृष्टीने दिशा दाखवणारे हे पुस्तक व्यक्तीमत्त्वाची उंची आणि खोली वाढविण्यासाठी निश्चितच सर्व वयोगटातील प्रत्येकाला मार्गदर्शक ठरणारे आहे, यात शंका नाही !

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments