मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारताच्या ‘विस्मृत’ वीरांना मान्यता! – लेखिका : मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.) ☆ प्रस्तुती : गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ भारताच्या ‘विस्मृत’ वीरांना मान्यता! – लेखिका : मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.) ☆ प्रस्तुती : गौरी गाडेकर ☆

भारताच्या ‘विस्मृत’ वीरांना मान्यता!  – – पहिले महायुद्ध

मागच्याच आठवड्यात बातमी आली की पहिल्या महायुद्धात लढणाऱ्या ब्रिटिश इंडियन आर्मीमधल्या ९,९०९ सैनिकांच्या बलिदानाला पुराव्यानिशी मान्यता देण्यात आली… भारतीय सैनिकांनी रक्ताने दिलेल्या बलिदानाला एका शतकानंतर शाईच्या काही थेंबांनी दिलेला हा न्याय समजायचा का? इतिहासाच्या पानांमधून या सैनिकांचं अस्तित्त्वच पुसून टाकणाऱ्या एका अन्यायकारक धोरणाबद्दल कबुली देत Commonwealth War Graves Commission(CWGC)ने या भारतीय हुतात्म्यांची नांवं त्यांच्या डेटाबेसमध्ये नुकतीच समाविष्ट केली. अथक संशोधनाच्या अंती घडवून आलेली ऐतिहासिक कागदपत्रांमधली ही सुधारणा दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी दुरुस्ती मानली जात आहे. नेमकं कोणतं धोरण कारणीभूत होतं या विस्मृतीला?

‘The great War’- भारताचं योगदान – 

‘…the war to end all wars’ असं व्यापक (!) उद्दिष्ट ठेऊन जुलै १९१४ मध्ये सुरू झालेलं महायुद्ध चांगलंच पेटलं. ब्रिटिशांनी भारताचा सहभाग गृहीत धरून इंडियन आर्मी मधलं सैन्य तिथे पाचारण केलं. या महायुद्धात ब्रिटिशांसाठी अखंड भारतातून (आजचा भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश) सुमारे १४ लाख सैनिक लढले होते. यापैकी एकट्या पंजाब प्रांतातून ५ लाख सैनिक भरती झाले होते. घोडदळ, पायदळ, तोफखाना अशा कितीतरी गोष्टींचा यात समावेश होता. या सैन्यात कोवळ्या वयातल्या म्हणजे अगदी १० वर्षे वयाच्या मुलाचाही समावेश असल्याचे पुरावे आहेत!

सुरुवातीला सैन्यभरती आणि प्रशिक्षण यात ब्रिटिश गुंतलेले असतांना, जर्मन सैन्याचं मोठं आक्रमण भारतीयांनी थोपवलं.

फ्रान्स, गॅलीपोली(तुर्कस्थान), बेल्जियम, इजिप्त, पॅलेस्टाईन, पूर्व आफ्रिका… किती ठिकाणी भारतीय सैन्य आत्यंतिक शौर्याने लढलं! युरोपमधल्या जीवघेण्या, भीषण खंदकांनी किती भारतीयांचे जीव घेतले! अपरिचित युद्धभूमी, त्रस्त करणारं थंड हवामान, चालून येणारा क्रूर शत्रू, अपुरी साधनं, प्राण कंठाशी आणणारी लांबच लांब पायपीट, उपासमार, साथीचे रोग… कशाकशाशी लढले भारतीय? आणि कशासाठी? तिथे जिवाची बाजी लावण्यासाठी भाग पाडणारी, स्वतःला ‘सैनिक’ म्हणवून घेत लढण्यासाठी उद्युक्त करणारी कोणती प्रेरणा होती? स्वातंत्र्याची? मुळीच नाही!

ब्रिटिश इंडियन आर्मीमधल्या ७४,१८७ एवढ्या सैनिकांनी युद्धभूमीवर आपला जीव गमावला असा औपचारिक आकडा आहे, तेवढेच गंभीर जखमीही झाले. १. ७ लाख प्राणी (उंट आणि खेचर यांच्यासह मुख्यतः उमदे घोडे), ३. ७ लाख टन एवढा अन्नधान्याचा पुरवठा, १३० करोंड जुट सॅंडबॅग्स (खंदकांमद्धे वापरतात तशा), सुती कपडा, शस्त्रास्त्रं, रणगाडे… आणि मुख्य म्हणजे भारतीय संस्थानांचा तसंच लादलेल्या करांच्या द्वारे लुटलेला प्रचंड पैसा… ही वाढत जाणारी यादी डोळे विस्फरणारी आहे! भारताच्या सहभागाशिवाय स्वतःच्या जिवावर जर्मनीला आव्हान देण्याची, वाढत गेलेलं हे युद्ध लढण्याची ब्रिटनची तयारी होती का? याचं उत्तर मिळतं. त्यामुळे काहीही संबंध नसतांना, स्व-बांधवांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या ब्रिटिशांसाठी इंडियन आर्मीमधलं हे सैन्य प्राणपणाने लढत होतं.. गुलाम म्हणून!

अन्यायकारक वागणूक

वर्षानुवर्षे ब्रिटिश सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यात पगार,रहाण्याच्या सोयी, नोकरीचे नियम,इतर सवलती अशा बहुतांश बाबतीत उघड उघड भेदभाव होताच. मानवतेला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना या युद्धादरम्यान देखील घडल्या. जखमी झालेल्या तसंच winter kit न पोहोचल्यामुळे आजारी पडलेल्या,साथीच्या रोगाने पिडलेल्या भारतीय जवानांना ब्रिटिश परिचरिकांकडे उपचार करवून घेण्यास बंदी होती. उपचारांविना त्यात कित्येकजण गेले. घोंघावणाऱ्या मृत्यूला समोर बघत अनेकांनी घरी (शेवटची) पत्रं लिहिली पण ती तपासली (सेन्सॉर) केली जात असत. कारण युद्धाविषयी कोणतीही माहिती पत्रात लिहिण्याची सक्त मनाई होती. दिशाहीन युद्धनीती आणि अपुऱ्या साधनांमुळेही हजारो सैनिक बळी गेले.

बलिदान नाकारण्यासाठी नवा निकष 

पहिलं महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटिश सरकारने भारतीय सैनिकांसाठी एक अन्यायकारक निकष लावला: “जे सैनिक थेट युद्धभूमीवर लढतांना मृत्युमुखी न पडता, तिथल्या जखमांमुळे किंवा आजारपणामुळे (operational zones च्या) बाहेर मृत्यू पावले, त्यांना ‘युद्ध शहीद’ (war dead) मानलं जाणार नाही. ” या निकषामुळे हजारो सैनिकांची नांवं हुतात्म्यांच्या यादीत लिहून पुढे मुख्यालयात पाठवण्यात आलीच नाहीत. ब्रिटिश साम्राज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता मानायची सोडा पण दोन ओळींची तार करून त्यांच्या मृत्यूची बातमी घरी कळवण्याची तसदीही ब्रिटिशांनी घेतली नाही ही केवढी टोकाची कृतघ्नता! या एका तांत्रिक नियमामुळे कित्येक वीर सैनिकांचा त्याग इतिहासातून बेदखल झाला. केवळ ‘बेपत्ता’ सैनिक एवढीच त्यांची ओळख मागे राहिली!  

 कुणाचा मुलगा,कुणाचा भाऊ,पती… अनेकजण घरी कधीच परतरले नाहीत! आज काही बातमी कळेल, उद्या कळेल… ते जिवंत आहेत की धारातीर्थी पडले? की शत्रूने डांबून ठेवले? एक पिढी… दुसरी पिढी… वाट बघता बघता कितीतरी डोळे कायमचे मिटले! अनाथ मुलं गरिबीत पिचत राहिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या सैनिकांविषयी काहाही कळलं नाही… गावांगावांमधलं ते औदासिन्य कधीच सरलं नाही आ णि दुर्दैव म्हणजे भारतीय वीरांची हजारो नावं इतिहासाच्या पानातून पुसली गेली!

युद्धानंतर… वचनभंग!

युद्ध संपल्यावर आम्ही ‘अर्ध स्वातंत्र्य’ (dominion status) देऊ असं भारतीय नेत्यांना कबूल करून ते सपशेल नाकारत इंग्रजांनी महायुद्धानंतर भारताला कृतज्ञतेपोटी काय दिलं? तर अत्यंत जाचक असा Rowlatt Act, १९१९ साली पारित करण्यात आला. याअंतर्गत बंडखोरीचं कारण दाखवत कोणालाही वॉरंटशिवाय अटक करता येत होती, नेत्यांना ट्रायल न घेताच तुरुंगात डांबता येत होतं… बरंच काही भयंकर घडत होतं! .. आणि जे सैनिक प्राणपणाने लढले त्याच पंजाबच्या पवित्र भूमीवर अत्यंत निर्घृण पद्धतीने एप्रिल १९१९ मध्ये जनरल डायरने घडवून आणलेलं रक्तरंजित जलियनवाला हत्याकांड! होय.. हेच फलित होतं महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढणाऱ्या हजारो जिवांच्या समर्पणाचं…!  

‘पंजाब रजिस्टर्स’ प्रकल्प आणि पुढील संशोधन प्रक्रिया 

Commonwealth War Graves Commission (CWGC), Uk Punjab Heritage Association (UKPHA) आणि ग्रीनविच विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नांनी २०२१ साली ‘पंजाब रजिस्टर्स’ हा प्रकल्प आकाराला आला. पुढे पाच वर्षे अथक मेहनत मोठं संशोधन केलं गेलं. लाहोरमधल्या संग्रहालयात जतन केलेल्या युद्धविषयक हस्तलिखितांचा अभ्यास आणि त्याची संगणकात नोंदणी केली गेली. या कागदपत्रांमध्ये पंजाबमधील सुमारे ३,२०,००० सैनिकांची नावं आणि त्यांच्या सेवेचा सविस्तर तपशील नोंदवलेला आहे. तिथे मिळालेली मुख्य यादी पडताळून ९,९०९ सैनिकांची नावं इतर पुराव्यानिशी हुतात्मा यादीत समाविष्ट करण्यात आली. ब्रिटीश साम्राज्यासाठी लढलेल्या हजारो भारतीय सैनिकांच्या बलिदानाची काही थेंबांच्या शाईने का होईना पण अखेरीस नोंद झाली आणि अंशतः त्यांची गौरवगाथा, समर्पण जगासमोर आलं.  

कौटुंबिक वारसा आणि अस्तित्त्वासाठी संघर्ष 

लेस्टरमधील (Uk) दंतवैद्य डॉ. सनी पलाही यांच्यासारख्या हजारो लोकांसाठी त्यांचे पूर्वज शोधण्याचा हा भावनिक प्रवास आहे. त्यांचे पणजोबा केसर सिंग युद्धात शहीद झाले, पण त्यांची कुठेही नोंद नव्हती. केवळ बेपत्ता एवढीच माहिती. आता अधिकृत नोंद झाल्यामुळे, “माझा पूर्वज अत्यंतिक शौर्याने लढला” हा अभिमान पुराव्यासह त्यांच्या पुढच्या पिढीला मिळेल. असे अनेक जण या प्रकल्पाशी भावनिक धाग्याने जोडले गेले आहेत.  

भारतीय शौर्याचा अविभाज्य भाग आणि अखंड भारताचा वारसा

अनेक दशके पहिल्या महायुद्धाचा इतिहास केवळ युरोपीय दृष्टिकोनातून पाहिला गेला. भारतीय सैनिकांना केवळ ‘भाडोत्री’ मानले जात होते. पण हे संशोधन सिद्ध करतं की, हे युद्ध केवळ फ्रान्स किंवा बेल्जियमच्या रणक्षेत्रात नव्हे, तर पंजाबच्या खेड्यापाड्यातही लढलं गेलं. या सैनिकांचा त्याग हा भारतीय शौर्याचा एक अविभाज्य भाग आहे.

लाहोर संग्रहालयात जपून ठेवलेली जुनी कागदपत्रं म्हणजे भारत-पाकिस्तानच्या फाळणीपूर्वीचा, दोन्ही देशांना जोडणाऱ्या एका सामायिक इतिहासाचा पुरावा आहे. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

सीडब्ल्यूजीसी (CWGC) च्या महासंचालिका क्लेअर हॉ्र्टन (Claire Horton) यांनी सांगितलं की “पहिले महायुद्ध संपून एक शतकाहून अधिक काळ लोटला असला तरी आमचं शोध अभियान अजून सुरूच आहे. राष्ट्रकुल (Commonwealth) देशांच्या सेवेत बलिदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला योग्य तो सन्मान आणि आदर मिळावा यासाठी हे प्रयत्न आहेत. ‘पंजाब रजिस्टर्स’ प्रकल्प हा या मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या ९,९०९ नावांच्या शोधामुळे जगाच्या इतिहासातील गहाळ झालेली पाने पुन्हा भरून येण्यास मदत होत आहे. हे एक अजरामर स्मरणपत्रं आहे, ही केवळ त्यांना श्रद्धांजली नसून तो एक प्रकारे त्यांचा कौटुंबिक वारसाही आहे. युद्धासाठी दिली गेलेली ही मोठी किंमत आहे. ” 

हा दृष्टिकोन ठेऊन इतिहासातली मोठी त्रुटी भरून काढण्याचा हा प्रयत्न स्वागतार्ह आहे. संशोधनासाठी घेतली गेलेली अथक मेहनत स्तुत्य आहे. मात्र याला न्याय म्हणता येईल का याविषयी शंका आहे. हा रक्तरंजित इतिहास पुसून टाकता येणार नाही.  

स्वातंत्र्यानंतर प्रचंड मोठं अंतर कापत आज विश्वबंधुत्त्वाच्या तत्त्वावर सर्वांशी भारत मैत्रीपूर्ण व्यवहार करत असला तरी हा शोषणाचा इतिहास दोन्ही देशांच्या पुढच्या पिढ्यांना तसंच जगभरात पुढे सांगितला जाणार! ते ऐकून त्यांच्या मनांत काय भावना असतील, माहित नाही. मात्र दुसऱ्यांना गुलाम करून वर्षानुवर्षे त्यांचं शोषण करणाऱ्या देशांच्या यादीत ‘माझ्या राष्ट्राचं – भारताचं’ नांव नाही याचा आपल्याला आणि येणाऱ्या पिढ्यांनाही सदैव अभिमान वाटेल, याची खात्री आहे!

मा. अटलजींच्या ओळी किती समर्पक आहेत – 

“होकर स्वतंत्र मैंने कब चाहा है कर लूं मैं सबको गुलाम

 मैंने तो सदा सिखाया है करना अपने मन को गुलाम |

मैं तेज:पुंज तमलीन जगत में फैलाया मैंने प्रकाश |

जगती का रच कर विनाश, कब चाहा है निज का विकास?

शरणागत की रक्षा की है, मैंने अपना जीवन दे कर|

विश्वास नहीं यदि नहीं आता तो साक्षी है इतिहास अमर |”

जय हिंद!

 –

लेखिका : मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (नि.)

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक  संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८१ आणि ८२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८१ आणि ८२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ८१ – – 

मना मच्छरे नाम सांडू नको हो ।

अती आदरे हा निजध्यास राहो ।

समस्तांमधे नाम हे सार आहे ।

दुजी तूळणा तूळिता ही न साहे ।।८१।।

अर्थ : हे मना, कोणत्याही प्रकारच्या मत्सराच्या आहारी जाऊन देवाचे नामस्मरण कधीही सोडू नकोस. इतरांचा हेवा करण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी, अत्यंत आदराने व निष्ठेने भगवंताच्या नामाचा अखंड ध्यास घे. देवाचे नामस्मरण हेच सर्व श्रेष्ठ साधन आहे. त्याची तुलना अन्य कशाशीही करवत नाही.

(मच्छरे – मत्सराने, सांडू नको – सोडू नको, निजध्यास – मनाला ध्यास/ओढा लागणे, समस्तांमधे – ईश्वरप्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये, दुजी – दुसरी, तूळिता – तुलना करता)

विवेचन : या श्लोकातही समर्थ नामाचा महिमा आपल्याला सांगतात. आधीच्या श्लोकात निर्धारपूर्वक ज्या मत्सराचा त्याग करायला समर्थांनी आपल्याला सांगितले, त्याचा उल्लेख या ठिकाणी पुन्हा येतो. मानवी स्वभाव असा आहे की जी गोष्ट आपल्याकडे नाही पण दुसऱ्याकडे आहे असे पाहिल्यावर त्या व्यक्तीबद्दल पहिली प्रतिक्रिया मनात येते ती म्हणजे मत्सर. हा मत्सर वाढत गेला की अनर्थ घडतो. नको त्या गोष्टी माणसाच्या हातून घडतात. गीतेत सांगितल्याप्रमाणे ‘ मत्सर ‘ हा आसुरी गुण आहे. मागील काही श्लोकात हिरण्यकश्यपूचे उदाहरण आपण पाहिले आहे. हिरण्यकश्यपू राजा होता, सामर्थ्यवान होता, स्वतःच्या शक्तीचा त्याला गर्व होता, इथपर्यंत सर्व ठीक आहे. पण जेव्हा लोक त्याची स्तुती करायची सोडून परमेश्वराची स्तुती करतात, तेव्हा मात्र त्याच्या मनात भगवंताच्या नामाविषयी मत्सर निर्माण होतो. मग प्रजेने आपलेच नाम घ्यावे, भगवंताचे नाम कोणी घेऊ नये असा आदेश तो काढतो. पण त्याचा स्वतःचा मुलगाच विष्णुभक्त असतो. शेवटी मत्सर आणि द्वेषामुळे हिरण्यकश्यपूचा नाश होतो हे आपल्याला माहिती आहे.

काही लोकांना नकळत नामाबद्दलही द्वेष असतो. नामाने असे काय होणार आहे? त्याला कशाला एवढे महत्व द्यायचे? मग नकळत नामाबद्दल मनात मत्सर निर्माण होतो. नाम घ्यायला सुरुवात केली असेल तरी मग असा मनुष्य नाम घेणे सोडून देतो. म्हणून समर्थ म्हणतात की बाबारे, मत्सराच्या अधीन होऊन नाम घेणे सोडू नकोस.

मत्सराच्या अधीन झालेल्या माणसाला नामाचे महत्वच कळलेले नसते. महत्व कळण्यासाठी नामाचे सामर्थ्य माहित असावे लागते. त्यासाठी संतांचा उपदेश मनापासून ऐकावा लागतो. तो उपदेश नुसता ऐकून चालत नाही तर तो पटला पाहिजे. इथे बळजबरी उपयोगाची नसते. हे महती जेव्हा पटते, तेव्हा भगवंताबद्दल, नामाबद्दल आदर निर्माण होतो. म्हणून भगवंताचे नाम आदरपूर्वक घेतले पाहिजे. त्यात प्रेम हवे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा ध्यास लागला पाहिजे. आपल्या आवडीची एखादी गोष्ट असते. मग तिचा आपल्याला ध्यास म्हणजेच छंद लागतो. हा छंद लागला म्हणजे मन पुन्हापुन्हा तिकडे ओढ घेते. कोणी सांगावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ” गोविंद गोविंद, मना लागलिया छंद. ” एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाची आवड निर्माण झाली की त्याला कोणी अभ्यास कर म्हणून सांगावे लागत नाही. साधकाला नामाची गोडी लागली की मग नाम घ्या असे त्याला सांगावे लागत नाही.

परमेश्वर प्राप्तीची अनेक साधने आहेत. अनेक मार्ग आहेत. पण त्या सर्वांमध्ये ‘ नाम ‘ हे साधन श्रेष्ठ आहे. त्यासाठी कोणतीही उपाधी, कोणतेही साधन लागत नाही. जपमाळ नसली तरी चालते. आपले काम करताना देखील नाम जपता येते. ‘ हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।। असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात. त्याचे तात्पर्य हेच आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद असे ते सांगतात ते याचसाठी. समर्थही आपल्याला हीच गोष्ट सांगतात. संतांच्या उपदेशात एकवाक्यता असते. लोककल्याणाची तळमळ आढळते. शब्द भलेही वेगळे असतील पण तात्पर्य एकच असते.

तेव्हा हे मना, कोणत्याही परिस्थितीत तू नाम घेणे सोडू नकोस. ते अत्यंत आदरपूर्वक घे. समस्त साधनांमध्ये ते सारभूत आहे. त्याची महती एवढी की त्याची तुलना अन्य कशाशीही होऊ नाही. ‘ नामपरते तत्व नाही रे अन्यथा. ‘ हे लक्षात ठेव.

स्वसंवाद : 

१. माझ्याकडे जे नाही आणि इतरांकडे आहे, ते पाहून माझ्या मनात नकळत ‘मत्सर’ किंवा हेवा निर्माण होतो का? त्यामुळे माझे मनस्वास्थ्य हरवते का?

२. संतांनी सांगितल्याप्रमाणे, माझ्या मनाला संसार किंवा इतर भौतिक गोष्टींऐवजी कधी भगवंताच्या नामाचा ‘निजध्यास’ (छंद) लागला आहे का?

३. नाम घेताना भगवंताबद्दल आदर आणि प्रेम माझ्या मनात असते का?

४. माउलींनी सांगितल्याप्रमाणे “नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा” यावर माझा पूर्ण विश्वास बसला आहे का? की माझे मन अजूनही इतर साधनांच्या गराड्यात फिरत असते?

===== 

श्लोक क्र. ८२ – – 

बहू नाम या रामनामी तुळेना ।

अभाग्या नरा पामरा हे कळेना ।

विषा औषध घेतले पार्वतीशे ।

जिवा मानवा किंकरा कोण पूसे? ।।८२।।

अर्थ : रामनामाची तुलना अन्य कोणत्याही नामाशी होऊ शकत नाही. परंतु जी माणसे पारमार्थिक दृष्ट्या अभागी असतात, त्यांना (रामनामाचे हे महत्व) कळत नाही. अहो, प्रत्यक्ष भगवान शंकरांनी विषाचा दाह शांत करण्यासाठी रामनाम हे औषध म्हणून घेतले. मग आपल्यासारख्या सामान्य जीवांची त्यासमोर किंमत काय?

(तुळेना – तुलना होऊ शकत नाही, अभागी नर – पारमार्थिक दृष्टया दुर्दैवी व्यक्ती, पार्वतीशे – भगवान शंकर/ पार्वतीचे पती, किंकर – चाकर/दास)

विवेचन : या श्लोकामध्ये देखील अन्य श्लोकांप्रमाणे समर्थ रामनामाचे महत्व आपल्या मनावर ठसवत आहेत. श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत. त्यामुळे साहजिकच त्यांना रामनामापुढे अन्य नामाचे महत्व वाटत नाही. रामनामाची तुलना अन्य कशाशीही होऊ शकत नाही असे त्यांना वाटते. आणि त्यांना असे वाटणे हे अगदी बरोबर आहे. रामरक्षेचा समारोप करताना बुधकौशिक ऋषींनी रामनामाचे महत्व सांगताना, ” सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ” असे म्हणतात. अर्थात या श्लोकात भगवान शंकर पार्वतीला रामनामाचे महत्व सांगताना म्हणतात की राम राम या नामातच माझा जीव रमतो. रामनाम हे विष्णूच्या सहस्त्र नामांची बरोबरी करणारे आहे. खरे तर रामनामाचे महत्व स्पस्ट करणारे एवढे मोठे उदाहरण दिल्यानंतर अन्य काही सांगण्याची आवश्यकताच राहत नाही. पण तरीदेखील माता जशी तळमळीने आपल्या मुलाला एखादी गोष्ट समजावून सांगते, तसेच समर्थ आपल्याला सांगत आहेत.

आपली ज्या देवतेवर श्रद्धा असेल, त्या देवतेचे नाम हे अत्यंत श्रेष्ठ आहे असे आपल्याला वाटले पाहिजे. आपण जर शंकराची भक्ती करीत असू तर ‘ ओम नमः शिवाय ‘ या मंत्रावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. आपण जर विष्णूचे भक्त असू तर ‘ ओम नमो भगवते वासुदेवाय ‘ या मंत्रावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. तसेच रामनामाचे महत्व श्रीरामाच्या भक्तांना वाटले पाहिजे. ते सांगण्यासाठीच समर्थांची एवढी तळमळ!

पण समर्थ म्हणतात,” जी माणसे पारमार्थिक दृष्टया अभागी असतात त्यांना रामनामाचे हे महत्व (सांगूनही) कळत नाही. म्हणूनही असे जीव अभागीच आहेत. मुखामध्ये रामनाम यायला किंवा त्याची गोडी वाटायला देखील काही तरी पूर्वसंचित हवे. मुखात रामनाम येणे किंवा रामनाम घ्यावेसे वाटणे हे खरोखरच भाग्याचे लक्षण आहे. ज्यांना तसे वाटत नाही ते जीव अभागी!

देवांनी आणि राक्षसांनी मिळून समुद्रमंथन केले. त्यातून दिव्य अशा चौदा रत्नांसोबतच हलाहल (जहाल विष) देखील बाहेर आले. त्यामुळे सर्व प्राणिमात्रांच्या आणि सृष्टीच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न झाला. भगवान शंकरांनी हे हलाहल प्राशन करून सर्व सृष्टी आणि प्राणिमात्रांचे रक्षण केले. पण त्यांचा अंगाचा तीव्र दाह होऊ लागला. तो कशानेच शांत होईना. त्या हलाहलाने त्यांचा कंठ निळा झाला. ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. विषाचा दाह शांत होण्यासाठी त्यांनी शीतल चंद्र मस्तकी धारण केला. गंगेला देखील मस्तकी धारण केले. पण शेवटी रामनामानेच त्यांचा दाह शांत झाला.

जालीमातील जालीम विषाचा देखील ज्या औषधाने दाह शांत होतो, असे औषध म्हणजे रामनाम आहे. सर्व भव म्हणजे संसाराचे भय हरण करणारे, दुःख दूर करणारे असे हे औषध आहे. ज्याप्रमाणे श्रीरामाचा बाण अचूक शरसंधान करतो, तसे रामनाम म्हणजे रामबाण औषध आहे. आधुनिक विज्ञानाने देखील रामनामाचे महत्व मान्य केले आहे. आजचे मानसशास्त्र आणि न्यूरो सायन्स रामनाम हे प्रभावी साउंड थेरपी आणि ध्यान पद्धतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे स्पष्ट करतात. तणावमुक्तीसाठी रामनाम ऊर्जा प्रदान करणारे असल्याचे ही आधुनिक शास्त्रे मान्य करतात.

प्रत्यक्ष भगवान शंकर जेव्हा रामनामाच्या आश्रय घेतात तेव्हा आपल्यासारख्या सामान्य नराची काय कथा? संत तुलसीदासजी म्हणतात, ” रामनाम में पावत पावन, रवी तेजोमय चंद्र सुधा धन. ” रामनाम हे पावन करणारे आहे. ज्याप्रमाणे सूर्याचा तेज आणि चंद्राची शीतलता आपल्याला जीवन प्रदान करते, तसेच हे रामनाम सर्व सुख, परम शांती आणि ऊर्जा देणारे आहे.

स्वसंवाद :: 

१. ज्याप्रमाणे भगवान शंकरांनी विषाचा दाह शांत करण्यासाठी रामनामाचा आश्रय घेतला, तसा मी माझ्या आयुष्यातील राग, मत्सर किंवा चिंतेचा दाह शांत करण्यासाठी नामस्मरणाचा आधार घेतो का?

२. “मुखामध्ये रामनाम येणे किंवा त्याची गोडी वाटणे हे भाग्याचे लक्षण आहे,” हे लक्षात घेऊन मी माझ्या या परम भाग्याचा रोज सुयोग्य वापर करतो का?

३. माझ्या आराध्य दैवताच्या नामावर आणि मंत्रावर माझी संपूर्ण आणि अनन्य श्रद्धा आहे, की माझे मन अजूनही डळमळीत होत असते?

४. संत तुलसीदासांनी म्हटल्याप्रमाणे, रामनामातील सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता अनुभवण्यासाठी मी दिवसातून काही क्षण तरी शांत चित्ताने नाम घेतो का?

– क्रमशः श्लोक श्लोक ८१ आणि ८२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ही तर एक ‘सुवर्णकथा’… लेखक : श्री संदीप चव्हाण ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ही तर एक ‘सुवर्णकथा’… लेखक : संदीप चव्हाण ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ. पांडुरंग खानखोजे

यंदाच्या फुटबॉल विश्वचषकाचा उद्घाटनीय सामना रंगला, तो मेक्सिको सिटीत. यजमान मेक्सिकोसह अमेरिका आणि कॅनडाही या स्पर्धेचे सहआयोजक आहेत. तब्बल ३२ तासांचा प्रवास करून मी अखेर या उद्घाटन सामन्याच्या वार्तांकनासाठी मेक्सिकोत पोहोचलो.

फुटबॉलची मजा काही औरच असते. मैदानावर चेंडू फिरत असताना जितका थरार असतो, त्यापेक्षाही अधिक जल्लोष सामना संपल्यानंतर स्टेडियमबाहेर उसळतो. जणू तो एक बेधुंद करणारा कार्निव्हल असतो.

सामना संपताच, मीही त्या कार्निव्हलचा भाग झालो. पोटात भूक होतीच; पण स्टेडियमबाहेर सर्वत्र लागलेल्या मक्याच्या स्टॉलने ती आणखीच भडकावली. एका स्टॉलवर मी थांबलो. उकडवलेले टपोरे मक्याचे दाणे, त्यावर खास मेक्सिकन तिखट मसाल्याचा पहिला घास घेताच, जिभेवर मेक्सिको उतरल्यासारखे वाटले. माझ्यासोबत काही स्थानिक मेक्सिकन पत्रकार होते. त्यातील एकजण सहज म्हणाला,’Did you know Pandurang Khankhoje? The man from India. This crop is his gift. ‘

क्षणभर माझा घास अडकला. डोळ्यांसमोर फुटबॉलचा जल्लोष होता, हातात मेक्सिकन मका होता आणि कानांवर आलेले नाव होते, पांडुरंग खानखोजे!

स्वातंत्र्य लढ्यात ‘गदर पार्टी’ स्थापन करणार्‍या क्रांतिकारकांपैकी एक पांडुरंग सदाशिव खानखोजे महाराष्ट्रातील वर्ध्याचे होते, इतके जुजबी ज्ञान होतेच. पण मेक्सिकोच्या फुटबॉल कार्निव्हलमध्ये, मक्याच्या त्या स्टॉलपाशी, एका मेक्सिकन पत्रकाराकडून त्यांचे नाव ऐकणे, हा माझ्यासाठी आयुष्यभर जपावा, असा क्षण होता.

मेक्सिकोच्या हरित क्रांतीत महाराष्ट्रात जन्मलेल्या या सुपुत्राचा मोलाचा वाटा होता. मेक्सिकन टाको जितके प्रसिद्ध, तितकाच येथील मका लोकांच्या जगण्याचा भाग आहे आणि त्या मक्याच्या समृद्धीमागे एका मराठी माणसाचे संशोधन, परिश्रम आणि दूरदृष्टी आहे, ही गोष्ट अंगावर रोमांच उभे करणारी आहे.

१९२० साली खानखोजे मेक्सिकोत आले आणि मग जणू मेक्सिकोचेच झाले. वयाच्या १६व्या वर्षी लोकमान्य टिळकांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी घर सोडले. जपानमार्गे अमेरिका गाठली. मजूर म्हणून काम केले. त्याचबरोबर शिक्षण घेतले. वॉशिंग्टन विद्यापीठातून पदवी संपादन केली. लष्करी प्रशिक्षण घेतले. तेथेच लाला हरदयाल यांच्याशी त्यांची भेट झाली आणि ‘गदर चळवळी’चा प्रवास सुरू झाला.

क्रांतीच्या कार्यामुळे भारतात परतणे त्यांना शक्य नव्हते. अशा वेळी मेक्सिकन शेतकर्‍यांच्या ओळखीने त्यांनी मेक्सिको गाठले. तेथे राष्ट्रीय कृषी विद्यापीठात त्यांनी नोकरी स्वीकारली आणि सुरू झाला, एका मराठी क्रांतिकारकाचा दुसरा अवतार, अन्नक्रांतीचा, शेतीक्रांतीचा, माणुसकीच्या सेवेत झोकून देणार्‍या शास्त्रज्ञाचा!  

मेक्सिकोतील हवामानात मक्याच्या उत्पादनात होणारी घट त्यांना अस्वस्थ करीत होती. त्यांनी त्यावर अथक संशोधन केले. मक्याचे नवे वाण विकसित केले; ते पुढे जगभर स्वीकारले गेले. त्यांच्या संशोधनामुळे मेक्सिकोतील असंख्य शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले. एका परक्या देशात आलेल्या मराठी माणसाने तेथील मातीत स्वतःला मिसळून घेतले आणि त्या मातीतून लाखो लोकांच्या पोटाची भाकर उगवली.

मेक्सिकोनेही या ऋणाची जाण ठेवली. मेक्सिकोच्या शिक्षण सचिवालयाच्या इमारतीत खानखोजेंच्या सन्मानार्थ खास म्युरल साकारण्यात आले आहे. महान चित्रकार दिएगो रिव्हेरा यांनी ‘लास्ट सपर’च्या धर्तीवर हे म्युरल चितारले. त्यात खानखोजे मेक्सिकोच्या सामान्य शेतकर्‍यांसोबत मका आणि भाकरीची मेजवानी करताना दिसतात. हा केवळ चित्राचा सन्मान नाही; तो एका भारतीयाला, एका महाराष्ट्रीयाला, एका मराठी माणसाला मेक्सिकोने केलेले कृतज्ञ अभिवादन आहे.  

एक मराठी क्रांतिकारक विचारांनी जपान, पॅरिस, अमेरिका फिरत मेक्सिकोत येतो, तिथे स्थिरावतो आणि गरीब शेतकर्‍यांचा अन्नदूत बनतो, ही कथा छाती अभिमानाने फुलवणारी आहे. “खानखोजे माझ्या महाराष्ट्रातील आहेत,’ असे त्या मेक्सिकन पत्रकाराला सांगताना माझ्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या. त्याक्षणी मला वाटले, ही मेक्सिकोवारी सार्थकी लागली.  

खानखोजे यांच्या कृषिक्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मेक्सिकोच्या ‘चॅपिंगो’ विद्यापीठात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा केवळ दगडाचा नाही; तो मराठी कर्तृत्वाचा, भारतीय प्रतिभेचा आणि सीमांच्या पलीकडे जाणार्‍या मानवतेचा साक्षीदार आहे!

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर खानखोजे सहकुटुंब भारतात परतले. महाराष्ट्राच्या भूमीत, नागपुरात दि. २२ जानेवारी १९६७ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सक्रिय राजकारणापासून ते शेवटपर्यंत दूर राहिले; पण त्यांनी केलेले कार्य कोणत्याही राजकीय पदापेक्षा मोठे होते. त्यांनी एका देशातील शेतकर्‍यांचे जीवन बदलले. त्यांनी भुकेशी लढणार्‍या माणसांच्या हातात आशेचा दाणा दिला.

मेक्सिकोत सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात भारत नाही. जागतिक क्रमवारीत भारत १३९व्या क्रमांकावर आहे. भारत फुटबॉल विश्वचषक कधी जिंकेल, हे माहीत नाही. पण १०० वर्षांपूर्वी एका मराठी माणसाने मेक्सिकोच्या मातीवर येऊन येथील लोकांची मने जिंकली, ही नोंद आचंद्रसूर्य राहील, हे नक्की!

फुटबॉलच्या जल्लोषात, मक्याच्या एका साध्या घासातून मला महाराष्ट्राची ही सुवर्णकथा भेटली. मेक्सिकोत खानखोजे आजही जिवंत आहेत, शेतकर्‍यांच्या स्मृतीत अन् मक्याच्या प्रत्येक दाण्यात! पांडुरंग खानखोजे यांची ही यशोगाथा अनुभवण्यासाठी एकदा तरी मेक्सिकोला आलेच पाहिजे.

धन्यवाद

लेखक : संदीप चव्हाण

प्रस्तुती : डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७९ आणि ८० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७९ आणि ८० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ७९ – – 

मना पावना भावना राघवाची ।

धरी अंतरी सोडी चिंता भवाची ।

भवाची जिवा मानवा भूलि ठेली ।

नसे वस्तूची धारणा वेर्थ गेली ।

अर्थ : हे मना श्रीरामांचे स्मरण पवित्र करणारे आहे. त्यांचे स्मरण कायम आपल्या अंतरात म्हणजे म्हणजे मनामध्ये ठेव. संसाराची चिंता सोडून दे. या संसाररूपी मायेची भूल मानवाला पडते. जी गोष्ट अस्तित्वातच नाही, अशा गोष्टीची कास धरणे व्यर्थ आहे.

(पावना – पवित्र, भावना- विश्वास/स्मरण, धरी – धारण कर, भवाची – संसाराची, भूलि – भ्रम, वेर्थ – व्यर्थ)

विवेचन : आधीच्या श्लोकात आपल्याला समर्थांनी देह, संसाराची व्यर्थ चिंता वाहू नका असे सांगितले. या श्लोकात ते आपल्याला हा संसार कसा नश्वर आहे ते सांगत आहेत. आपल्या मनामध्ये नेहमीच या संसाराबद्दल एक आंतरिक ओढ किंवा ममत्व असते. शिक्षण, नोकरी, विवाह, मुलेबाळे, पैसा, जमीनजुमला यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे असे आपल्याला वाटते. माणूस आयुष्यभर त्यासाठी धडपडत राहतो. परंतु या संसाराची व्यर्थता त्याला शेवटी लक्षात येते. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते.

राघवाचे स्मरण, त्याच्यावरील दृढ श्रद्धा मनाला पवित्र करणारी आहे. कारण तो पतितांना पावन करणारा आहे. आपल्या अंतरात अनेक बऱ्या वाईट भावना, वासना ठाण मांडून असतात. परंतु भगवंताच्या नामाने वासना शुद्ध होत जाते. म्हणूनच समर्थ म्हणतात की हे मना पवित्र करणाऱ्या राघवाची श्रद्धा अंतर्यामी बाळग. त्यासाठी ‘ धरी अंतरी ‘ हे शब्द समर्थांनी वापरले आहेत. अंतर्यामी काय धारण करायचे?  तर राघवाचा विश्वास. आणि काय सोडायचे?  तर ‘ चिंता भवाची ‘ आपण संसारात असताना एवढे त्यात गुंतलेले असतो, की पुढे माझे कसे होईल, म्हातारपणी मुले मला विचारतील ना?  एक ना दोन अशा अनंत चिंता मन करीत राहते. संसाराची व्यर्थ चिंता करून उपयोग नाही. म्हणूनच ही चिंता टाकून द्यावी असे समर्थ सांगतात.

ही चिंता का टाकून द्यायची?  कारण जी गोष्ट मुळात नाहीच आहे, तिच्याबद्दल चिंता करून काय उपयोग?  मोहमायेमुळे हा संसार आपल्याला खरा वाटतो. त्याची भूल आपल्याला पडते. पण खऱ्या सत्यापासून आपण लांब जातो. वाळवंटातील तहानलेल्या माणसाला मृगजळ दृष्टीस पडते. तिथे आपल्याला नक्कीच पाणी मिळेल या आशेने तो त्याच्या शोधात पुढे पुढे जात राहतो. शेवटी त्याला लक्षात येते की आपल्याला जे पाणी वाटले होते, ते तर केवळ मृगजळ! मृगजळ म्हणजे भ्रम. पाणी नाही हे सत्य. त्याप्रमाणेच हा संसार! खरा वाटतो पण अखेरीस त्याची व्यर्थता लक्षात येते. खरी वस्तू एकच. ती म्हणजे भगवंताचे नाम. ते नाम पवित्र करणारे आहे. सत्याची जाणीव करून देणारे आहे. संसाराची व्यर्थता लक्षात आणून देणारे आहे. म्हणून हे मना, असे पवित्र नाम तू हृदयात धारण कर आणि संसाराची व्यर्थ चिंता सोडून दे. जी गोष्ट मुळात नाहीच तिची चिंता करण्यात काय अर्थ?

तुकाराम महाराज म्हणतात, “हेचि थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. “ भक्ती करणे म्हणजे जी गोष्ट आपल्याला अत्यंत प्रिय असते, ती परमेश्वराला अर्पण करावी. संसार, मुलेबाळे या गोष्टी आपल्या अत्यंत प्रिय असतात. त्यांच्यावर आपले जीवापाड प्रेम असते. हेच प्रेम भगवंताला अर्पण करावे. आणि भगवंताचे प्रेम अंतर्यामी धारण करावे.

स्वसंवाद :: 

१. ज्या शिक्षण, नोकरी, संपत्ती किंवा नात्यांना मी माझ्या ‘जीवनाचे सार्थक’ मानून बसलो आहे, ते खरंच चिरंतन सत्य आहे की केवळ एक तात्पुरता भ्रम (मृगजळ) आहे?

२. “म्हातारपणी माझे कसे होईल?  मुले मला सांभाळतील ना? ” अशा भविष्यातील ‘भवाच्या’ (संसाराच्या) व्यर्थ चिंतांमध्ये मी माझा आजचा दिवस आणि मनाची शांतता गमावत आहे का?

३. माझ्या अंतर्मनात साचलेला बऱ्या-वाईट वासनांचा कचरा साफ करण्यासाठी मी ‘पतितांना पावन करणाऱ्या’ राघवाच्या नामाचा आश्रय किती वेळा घेतो?

४. तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, मी प्रपंचातील माझी सर्व आसक्ती आणि प्रेम भगवंताच्या चरणी अर्पण करून ‘निर्वासन’ भक्तीचा अनुभव घ्यायला तयार आहे का?

===== 

श्लोक क्र. ८० – – 

धरा श्रीवरा त्या हरा अंतराते ।

तरा दुस्तरा त्या परा सागराते ।

सरा वीसरा त्या भरा दुर्भराते ।

करा नीकरा त्या खरा मछराते ।।८०।।

अर्थ : हे मना, श्रीमहादेवांच्या अंतर्यामी वसलेल्या सीतापती श्रीरामांना आपल्या हृदयात धारण कर. श्रीरामांना अखंड हृदयी धारण करून पार करण्यास अतिशय कठीण असा संसाररूपी सागर तरून जा. जे कितीही भरले तरी अपूर्णच राहते अशा पोटाला (संसाराला)विसरून जा. मत्सराशी निग्रहपूर्वक झगडून साधुसंतांनी सांगितलेल्या मार्गाने जा.

(श्रीवरा – सीतापती श्रीराम /लक्ष्मीपती विष्णू, हरा अंतराते – महादेवांच्या अंतर्यामी वसलेल्या, दुस्तर – कठीण, परा – मोठा, सरा – अंश/छटा, दुर्भर – भरण्यास अतिशय कठीण, नीकरा – प्रयत्नपूर्वक/हट्टाने, खर – गाढव, मच्छराते – मत्सर)

विवेचन : या श्लोकाची रचना भाषिक दृष्टया फार सुंदर आहे. ‘ र ‘ या अक्षराची पुनरावृत्ती झाल्याने अनुप्रास अलंकार साधला गेला आहे. त्याशिवाय रचनेत सहजता आहे. श्रीवर म्हणजे भगवान विष्णू. श्री म्हणजे लक्ष्मी. राम हाही विष्णूचाच अवतार असल्याने येथे सीतापती राम असा देखील अर्थ घेता येतो. अशा या भगवंताला आपल्या हृदयात प्रत्यक्ष महादेव धारण करतात. त्या भगवंताला आपणही आपल्या हृदयी धारण करावे. श्रीरामांची योग्यता किंवा महती एवढी थोर की प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव त्यांना आपल्या हृदयात स्थान देतात. त्यांचे ध्यान करतात. त्यामानाने आपण तर सामान्य माणसे! तेव्हा अशा या भगवंताला आपण देखील आपल्या हृदयात स्थान द्यावे.

समर्थ संसाराला संसार सागर म्हणतात. एक वेळ एखादी नदी पोहून पार करणे सोपे पण सागर पार करणे महाकठीण. हनुमंत सागर पार करून लंकेला पोहोचला होता. त्याने हृदयात रामनाम धारण केले होते. रामनाम ही एक अशी नौका आहे की जी आपल्याला हा महाकठीण असलेला भवसागर पार करण्यासाठी साहाय्यभूत ठरते. जो या नौकेत बसला, तो हा भवसागर तरून गेला.

पण हा भवसागर म्हणजे एक मायाजाल आहे. ते भल्याभल्यांना सोडवत नाही. भगवंताची माया अत्यंत प्रबळ आहे. एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात मासे अडकावेत तसा माणूस या मायेच्या जाळ्यात अडकतो. रामकृष्ण परमहंसांनी याबाबत बोलताना एका ठिकाणी अतिशय सुंदर दाखला दिला आहे. ते म्हणतात जे मासे कोळ्याच्या अवतीभवती असतात, ते जाळ्यात अडकतात. पण जे मासे कोळ्याच्या पायाजवळ असतात, ते मात्र जाळ्यात अडकत नाहीत. आपण संसारी माणसे म्हणजे या संसारसागरातील मासे. मायारूपी जाळ्यात आपण अडकतो. पण आपण जर भगवंताच्या पायाशी राहिलो, त्याचे चरण जवळ केले तर मायेच्या जाळ्यातून आपण सहीसलामत सुटू शकतो.

देवाने आपल्याला पोट दिले आहे. पोट ही अशी गोष्ट आहे की ती कधी भरतच नाही. अग्निमध्ये आहुती टाकल्यानंतर अग्नी आणखी प्रज्वलित होतो. तसेच हे आहे. संसाराची आसक्ती देखील अशीच आहे. ती कधीच संपत नाही. म्हणून ती थोडी का होईना पण विसरण्याचा प्रयत्न करावा. ते सोपे नाही. पण भगवंत प्राप्ती करून घ्यायची असेल तर ती बाजूला ठेवता आली पाहिजे.

आपली संसाराची हाव कधी संपत नाही. ‘ हवेपण ‘ सुरूच राहते. त्यातून मग एखादी गोष्ट नाही मिळाली आणि ती दुसऱ्याकडे असेल तर मत्सर किंवा द्वेष निर्माण होतो. मत्सराला काही कारण लागत नाही. म्हणून त्याची तुलना समर्थ गाढवाशी करतात. परमार्थात तर मत्सर अतिशय हानिकारक. तेव्हा अशा मत्सराचा निकराने म्हणजे सर्वशक्तीनिशी सामना करायला हवा. त्यासाठी विवेक आणि वैराग्य ही दोन प्रभावी शस्त्रे आहेत. मत्सर आणि संसाराची आसक्ती टाकून देऊन श्रीरामाला हृदयी धारण करा म्हणजे हा भवसागर तरून जाल असे समर्थांचे सांगणे आहे. ‘ नाम आहे आदी अंती, नाम सर्व सार, आहे बुडत्याला नौका ठेवली आधार. ‘

स्वसंवाद :: 

१. मी या संसारसागरात ‘मायेच्या जाळ्यात’ अडकलो आहे हे मला जाणवते का?

२. “कितीही दिले तरी न भरणारे हे दुर्भर पोट (आसक्ती)” याच्या मागे धावताना, मी कधी समाधानाचा अनुभव घेतला आहे का?

३. जेव्हा मला एखादी गोष्ट मिळत नाही आणि ती दुसऱ्याकडे दिसते, तेव्हा माझ्या मनात नकळत ‘मत्सर’ निर्माण होतो का?

४. संसाररूपी जाळ्यातून सहीसलामत सुटण्यासाठी माझ्या ठायी भगवंताप्रती अनन्य शरणागती आहे का?

– क्रमशः श्लोक श्लोक ७९ आणि ८०

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तो दिवस होता ६ डिसेंबर १७३५! – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ तो दिवस होता ६ डिसेंबर १७३५! – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

साल असावं १७३५…लंडनमधले संध्याकाळचे पाच वाजले होते.. सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या दगडी भिंतींना थंडीनं जणू गोठल्या होत्या पण बालविभागातून येणारा आरडाओरड्याचा आवाज मात्र थांबण्याचं नावच घेत नव्हता..

“मला मरायचं नाही.. आई.. मला वाचवऽऽऽ” अकरा वर्षांचा कोवळा विल्यम ब्लॅकमन बेडवर वेदनेनं अक्षरश: तडफडत होता..

त्याचा चेहरा जणू आगीच्या भट्टीतून आल्यासारखा लालबुंद झाला होता, डोळे पांढरेफटक पडले होते आणि पोटात बेंबीच्या खाली उजव्या बाजूला भयंकर वेदना होत होत्या..

पोट कडक झालं होतं, जिथं दुखत होतं तिथं एक कडक गठ्ठा तयार झाला होता, हात लावायचा उशीर बंदुकीतून गोळ्या निघाव्या तश्या उलट्या सुरू..

एव्हाना तापही १०४ वर पोहोचला होता, प्रत्येक श्वास घेताना त्याच्या तोंडून नुसता आक्रोश बाहेर पडत होता..

बाहेर व्हरांड्यात उभ्या असलेल्या शल्यचिकित्सकांनी खाली मान घालत नकारात्मकपणे हलवली;हर्निया बर्स्ट झालाय..

वेदनेचा शेवटचा टप्पा.. हा थोड्याच वेळचा पाहुणाय.. ”

तेवढ्यात गर्दीतून एक माणूस पुढं आला. लांब काळा कोट, काळी हॅट, डोळ्यात चमक असलेला क्लॉडियस एमॅंड..

राजाचा वैयक्तिक शल्यचिकित्सक, युद्धभूमीवर शेकडो गोळ्या काढणारा, हातं कापणारा पण कधीही मागं न हटणारा.. एखाद्या योद्ध्यासारखा..

तो फक्त एक वाक्य बोलला, ”त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये न्या.. मी बघतो.. ” 

सर्व एकमेकांकडं बघू लागले.. ”पण सर… ही केस हाताबाहेरंय.. आतडं फिरलंय.. कुणीही हात लावत नाहीये.. ”

क्लॅाडियसनं डोळे वटारले, ”मी म्हणालो ना, मी करतोऽऽ”

ऑपरेशन थिएटरमधे फक्त तेव्हाच्या मंद दिव्यांचा पिवळा प्रकाश पसरला होता.. विल्यमला लाकडी टेबलावर बांधलं गेलं.. त्याचे हात-पाय घट्ट दोरीने बांधले आणि तोंडात कापडाचा बोळा ठासून दिला म्हणजे ओरडताना जीभ चावणार नाही आणि ओरडण्याचा आवाजही येणार नाही आणि भूल??  तेव्हा भूलशास्त्र विकसित झालं नव्हतं, फक्त एक मोठा ग्लास अफूचं पाणी पाजलेलं होतं आणि नातलगांनी देवापुढं हात जोडले होते..

क्लॅाडियसन् चाकू हातात घेतला. त्याचे सहाय्यक जाम घाबरले होते, भर थंडीत त्यांना घाम फुटला होता.. ”पण.. सर.. जर आतडं फाटलं तर…” कुणीतरी चाचरत पुटपूटलं..

“मग मरू द्या दोघंही.. पण मी हार मानणार नाही. ”

पहिला चीरा पडली आणि रक्ताची चिळकांडी उडाली. चाकू खोलवर गेला होता.. आत जे काही दिसलं ते बघून सगळे जागीच थिजले..

एक हर्नियाचं पाऊच आणि त्यात अडकलेला अन् सुजून टम्म झालेला काळानिळा ॲपेंडिक्स.. आणि फक्त एवढंच नव्हतं..

त्यातून चमकली एक चंदेरी पिन.. या पठ्ठ्यानं कधीतरी खेळता-खेळता गिळलेली..

पिन थेट ॲपेंडिक्समध्ये घुसली होती आणि तिथं प्रचंड संसर्ग झाला होता.. ॲपेंडिक्स फाटून हर्नियात अडकला होता.. मृत्यूचं परफेक्ट जाळं तयार झालं होतं..

क्षणभर क्लॅाडियसचाही हात थरथरला.. फक्त एक सेकंद तो दात-ओठ खात म्हणाला.. हा भागच कापायचाय..

पूर्ण.. शेवटपर्यंत..

चाकू फिरला.. ॲपेंडिक्स बाहेर काढलं गेला.. त्याच्यातून ग्लासभर पस निघाला त्याची दुर्गंधी पसरली अन् एक सहाय्यक बेशुद्ध होऊन खाली कोसळला..

शेवटचा टाका पडला…रक्त थांबलं…विल्यम अजून श्वास घेत होता.. हळूहळू.. पण घेत होता..

रात्रभर क्लॅाडियस त्या मुलाच्या बाजूला बसला राहिला..

सकाळचे सात वाजले तेव्हा विल्यमने डोळे किलकिले केले आणि हळू आवाजात म्हणाला, ”मला.. दुखत नाहीये आता…”

क्लॅाडियसच्या डोळ्यात पाणी तरळलं.. त्यानं आवंढा गिळत फक्त मान हालवली..

ती रात्र आणि तो चीरा वैद्यकीय इतिहासात कायमचा कोरला गेला.. जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी..

एका अकरा वर्षांच्या कोवळ्या मुलानं आणि एका धाडसी शल्यचिकित्सकानं मृत्यूला चक्क मागं लोटलं होतं..

आज आपण जेव्हा ॲपेंडिक्सचं ऑपरेशन म्हणतो तेव्हा हसतो.. पण त्या रात्री लंडनच्या त्या अंधाऱ्या खोलीत खरंच एक युद्ध झालं होतं अन् त्या युद्धात माणूस जिंकला होता..

तो दिवस होता ६ डिसेंबर १७३५!

#Doctors_Diary

***

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मूकं करोति वाचालं!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ मूकं करोति वाचालं! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

☆

मूकं करोति वाचालं!

 – – – एका साधू हृदयी सैनिकाची अजरामर कहाणी!

ती केवळ पाच-सात वर्षांची अजाण बालिका… कोणत्याही काश्मिरी कन्येसारखी छान, सुंदर आणि निष्पाप! रुक्साना तीच नाव… रुखसाना म्हणजे गुलाबी गालांची मुलगी! त्या रात्री तिच्या घरातले सर्वजण निद्रेच्या अधीन असतानाच घराच्या दारावर थाप पडली… तिच्या बाबांनी दरवाजा उघडला. एवढ्या रात्री कोण आलं असावं याचं आश्चर्य वाटून डोळे किलकिले केलेली रुक्साना एके-४७ रायफलींच्या गोळीबाराच्या भयावह आवाजाने खडबडून जागी झाली… ती उठून दाराकडे धावली आणि वडीलांना रक्ताच्या प्रचंड थारोळ्यात पडलेली पाहून जागीच थिजली… जणू बर्फाचा एखादा कडा! रुक्सानाच्या वडिलांचा अतिरेक्यांनी खून केला होता… ते भारतीय फौजेला साहाय्य करतात अशा संशयातून. गोष्ट आहे वर्ष १९९८ ची. या प्रचंड मोठ्या मानसिक धक्क्याने रुक्साना अशी अबोल झाली जणू जन्मत:च मुकी!

इकडे याच महिन्यात एक तरुण लष्करी अधिकारी, विजयंत थापर नेमणुकीस आला होता. विजयंत यांच्या रूपाने थापर कुटुंबातील चौथा पुरुष भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल झाला होता… वय केवळ २१ वर्षांचं. डॉक्टर कॅप्टन कर्ताराम थापर पणजोबा, आर्मी ऑफिसर जे. के. थापर आजोबा आणि कर्नल वीरेंद्रनाथ थापर वडील आणि आता लेफ्टनंट विजयंत थापर अशी ही वंशवेल होती. मातोश्री तृप्ता या गृहिणी होत्या. वडील १९९९ मध्ये सेवानिवृत्त व्हायचे होते त्याआधी १९९८ मध्ये विजयंत सेनेत दाखल झाले… एक परंपरा पुढे पाऊल टाकीत होती!

बारकुड्या पण देखण्या, तरतरीत सरळ नाक असलेल्या विजयंतला वडिलांनी ‘रॉबिन’ हे लाडाचे नाव दिले होते… विजयंत होताच तसा रॉबिन पक्षासारखा दिसायला नाजूक पण अत्यंत उत्साही… मृदू काळजाचा. अगदी लहानपणापासून विजयंतच्या वर्तनात एखाद्या साधूची झलक दिसे. कधी कुणाला दुखावणे नाही की शब्दांनी घायाळ करणे नाही. जवळच्या वस्तू आनंदाने दुस-याला देऊन मोकळे होणे त्याला सहजी जमायचे. घरी पाळलेल्या श्वानांचे लाड करणे त्याला आवडायचे. पण हाच नाजूक विजयंत त्याच्या हातात सैनिकी बंदूक आली की एकदम निराळा अवतार धारण करी. तो मोठ्या भावाला ‘पाकिस्तान’ व्हायला लावायचा आणि स्वत: ‘हिंदुस्तान’ बनत युद्धात ‘पाकिस्तान’वर मात करायचा… थापर घराण्यातील आणखी एक तरुण सैनिक होण्याच्या मार्गावर अग्रेसर होत होता! लहानपणी म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षी विजयंतने त्याच्या वडिलांच्या मांडीवर बसलेला असताना त्यांचे पिस्टल अचूकपणे फायर करून दाखवले होते!

सैनिकी शाळेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून विजयंत प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला, पुणे येथे सैनिकी अधिकारी प्रशिक्षणास पात्र ठरले. मांसाहार, मद्यपान, धुम्रपान यांपासून आयुष्यभर दूर राहण्याचा संकल्प केलेले, विजयंत हे इंद्रदेवाचे नाव धारण केलेले, धार्मिक उपासनेत रत असणारे विजयंत व्यायाम करून शरीर संपदा कमावण्यात मात्र खूप गंभीर असत. त्यामुळे बारीक चण असली तरी त्यांची शारीरिक क्षमता अतिशय उत्तम होती. त्यामुळे एन. डी. ए. आणि पुढे इंडीयन मिलिटरी अकदामी, देहराडून येथून ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यांना खरेतर लढाऊ वैमानिक व्हायचे होते पण २, राजपुताना रायफल्स या पायदळ विभागात त्यांची कारकीर्द घडायची होती… ते वडिलांच्या पावलावर पाऊल टाकीत लढाऊ सैनिक बनले. वडील मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिकारी होते!

२, राजपुताना त्याच वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या बंदोबस्तासाठी पाठवली गेली. पंजाब राज्यातील रुपनगर मधल्या नांगल येथे बालपण गेलेला विजयंत नावाचा तरुण आता थेट बर्फाळ प्रदेशात आला होता. कुपवाडा येथे नेमणूक असताना रुक्सानाची घटना घडली. कोमल हृदयाच्या विजयंत यांची आणि रुक्सानाची योगायोगानेच गाठ पडली आणि त्यांचे अबोल मैत्र जुळले! तिच्या घरच्यांनी आता रुक्साना कायमची मुकी झाली, असेच गृहीत धरले होते. मात्र विजयंत साहेबांनी हा समज खोटा ठरवला… आणि चमत्कार करून दाखवला.

धकाधकीच्या लष्करी कारवाया आणि अन्य कामांतून वेळ काढून विजयंत साहेब रुक्सानाची भेट घ्यायचे.. तिला खाऊ द्यायचे आणि तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचे… दुस-या महिन्यात रुक्सानाची वाचा परत आली… देवाची कृपा असेल तर ‘मुकं करोति वाचालं… हा श्लोक खरा ठरला होता!

१९९९. मे महिन्याच्या आरंभी भारत-पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्ध सुरु झाले… भारतीय हद्दीत विश्वासघात करून घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याला हाकलून लावण्यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ हाती घेतले!

युद्धात पराक्रम गाजवण्याची मनोमन इच्छा असलेल्या कॅप्टन विजयंत थापर यांना हे युद्ध म्हणजे lifetime opportunity म्हणजे नशीबाने मिळणारी संधी वाटली नसती तरच नवल.

वीरचक्र विजेते कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. बी. रबिन्द्रनाथ साहेबांच्या नेतृत्वात आणि कंपनी कमांडर मेजर पद्मपाणी आचार्य यांच्या सोबत विजयंत तोलोलिंग पर्वत पाकिस्तानी सेनेकडून हिसकावून घेण्याच्या कामगिरीवर निघाले. १२ जून, १९९९ची रात्र. मेजर मोहित सक्सेना साहेबांनी चढवलेल्या हल्ल्याला अपेक्षित यश मिळालेले नव्हते, आपली बरीच हानी झालेली होती. पर्वतावर ‘बर्बाद’ नावाचा एक बंकर (खंदक) होता. यात बसून पाकिस्तानी सैनिक भारतीय सैनिकांवर तुफान हल्ला चढवत होते. त्यामुळे पुढे जाण्याचे आपले सर्व प्रयत्न फोल ठरत होते. मग निकराचा प्रयत्न म्हणून याच बंकर वर एकाच वेळी अनेक बोफोर्स तोफांनी तुफान मारा करण्यात आला… आणि त्याच्या आडोशात भारतीय सैनिकांची तुकडी त्या बंकरच्या दिशेने निघाली… समोरून स्वयंचलीत आधुनिक रायफलीमधून अचूक गोळीबार सुरु होता… दगडांचा जमेल तसा आडोसा घेत विजयंत साहेब आणि त्यांचे सहकारी त्या गोळीबाराच्या वर्षावात भिजत पुढे गेले… काहीजण धारातीर्थी पडले! विजयंत साहेबांवरही तुफान गोळीबार झाला… पण ते बचावले… आणि त्यांनी खंदकात झेप टाकली… दोन पाकिस्तानी सैनिकांशी त्यांची झटापट झाली… पण विजयंत यांनी त्यांना यमसदनी धाडले… खरं तर त्यांची शत्रूला जिवंत पकडायची इच्छा होती… पण बाकीचे शत्रूसैनिक पळून जाण्यात यशस्वी ठरले! विजयंत यांनी त्याच रात्री आपल्या रोजनिशीमध्ये या लढाईची थरारक हकीकत लिहिली… दोन शत्रू टिपले… पण शत्रूला जिवंत पकडण्याची मनीषा अपुरी राहिली! पण या चकमकीतील Point 4590 वरील विजय कारगिल लढाईला भारताच्या बाजुने झुकवून गेला! इथे कशमिरी अतिरेकी नव्हते.. संपूर्ण पाकिस्तानी फौज होती… त्यांनी कित्येक महिने आधी तयारी करून ठेवली होती. त्यांच्यापर्यंत पोहोचायला भारतीय सैनिकांना अगदीच चिंचोळी जागा होती… त्यांच्या तोफखान्याच्या मा-यातून पुढे जावे लागत होते… उंच चढण होती, थंडी होती… खाली खोल द-या होत्या!

तोलोलिंग वर भारतीय ध्वज फडकवल्यावर विजयंत साहेबांनी आईशी फोनवर संवाद साधून तिला त्याच्या कामगिरीची खबर दिली होती.

अनेक बलिदाने द्यावी लागली पण आता यशही मिळू लागले होते… भारतीय फौजेचा आत्मविश्वास खूप वाढला होता. २८ जून. आता आणखी मोठी कामगिरी २, राजपुतानाकडे आली. थ्री पिंपल्स, नोळ आणि लोन टेकडी भाग ही तीन महत्त्वाची ठिकाणे काबीज करायची होती. पौर्णिमेची रात्र होती. शुभ्र चांदणे पडले होते.

हल्ल्यावर निघण्यापूर्वी विजयंत यांना काही तरी जाणवले… बहुदा या मोहिमेतून आपण जिवंत परतू शकणार नाही आहोत… कारण त्यांचे अनेक सहकारी माघारी येऊच शकले नव्हते… लढाई थांबणार नव्हती जिंकल्याशिवाय! त्यांनी घाईघाईत एक पत्र लिहायला घेतलं… विजयंत साहेब कारगिल युद्धात लढायला गेले आहेत… हे त्यांच्या घरी ठाऊक नव्हते.

अतिप्रिय पपा आणि आई,… आणि आज्जी!

तुमच्या हाती हे पत्र लागेल तेंव्हा मी स्वर्गातील सुंदर अप्सरांचा पाहुणचार घेत घेत आकाशातून तुमच्याकडे पहात असेन!

मला माझ्या आयुष्याबाबत कोणतीही खंत नाही. खरं तर, पुन्हा मानव देह मिळाला तर मी पुन्हा भारतीय फौजेत भरती होईन आणि मातृभूमीसाठी लढेन!

आपल्या सैनिकांनी जिथे देह ठेवले, ती जागा तुम्हांला शक्य झाल्यास इथे प्रत्यक्ष भेट देऊन एकदा पहा… बघा… देशाच्या भविष्यासाठी तरुण सैनिकांनी त्यांचा सुंदर वर्तमानकाळ कसा अर्पण केला ते!

नवीन सैनिकांना या बलिदानांबद्दल माहिती द्यायलाच हवी. मला आशा आहे, माझे छायाचित्र माझ्या ए कंपनीच्या मंदिरात लावले जाईल… हुतात्मा विजयंत थापर! कारगिल युद्ध, १९९९!

माझे शक्य होतील ते अवयव दान करावेत! अनाथश्रमांना शक्य होतील तेवढ्या देणग्या द्याव्यात. आणि हो… रुक्सानाला दरमहिना रोख रक्कम पाठवीत रहा माझ्यातर्फे… ती आता आणखी छान बोलायला लागली असेल! आणि योगी बाबांचीही भेट घ्या.. त्यांना चरणस्पर्श सांगा माझा!

सैनिकांचे बलिदान विसरू नका! पपा, तुम्हांला माझा अभिमानच वाटेल… तुम्हीही सैनिकच होता. तुम्हांला न मिळू शकलेलं सैन्य शौर्य पदक मला मिळेल…!

आई, तू ——–ला भेटलंच पाहिजे हं! तिची माझी प्रेमकहाणी पूर्ण होऊ नाही शकली या जन्मी. तिला माझ्या शुभेच्छा सांग! तिच्यावर माझं जीवापाड प्रेम होतं!

चला, आता माझ्या डझनभर मित्रांन सोबत घेऊन लढाईला निघायची वेळ झाली आहे… सर्वांना शुभेच्छा… राजा सारखं जगा!

तुमचा रॉबिन…

आणि मरणावर स्वार व्हायला दल निघाले… पाकिस्तानी तोफखाना आग ओकत होता… मग १२० भारतीय तोफा अचूक गोळाबारी करू लागल्या… धुराचे लोट, आगीचा डोंब उसळत होता… विजयंत साहेब त्यातून पुढे निघाले… त्यांचा प्रिय सहकारी शिपाई जगमल सिंह धारातीर्थी पडला… काही वेळाने कंपनी कमांडर पद्मपाणी आचार्य साहेब हुतात्मा झाले… आता विजयंत यांच्या तळपायाची आग मस्तकी गेली! नाईक तिलक सिंग यांना हाताशी घेत ते त्या गोळीबाराच्या वर्षावात सरळ पुढे घुसले! आता शत्रू आणि त्यांच्या केवळ १५ मीटर्स एवढेच अंतर उरले होते… दोन मशीनगन्स यांच्याच दिशेला फायर करीत होत्या… लपायला नीट जागा नव्हती… गोळीबाराला तशाही स्थितीत उत्तर दिले जात होते… यात दीड तास गेला! आता मात्र विजयंत साहेबांचा संयम संपला… आता माघारी फिरणे तर शक्य नव्हतेच… पुढेच जावे!

गोलियां आणि गालियां यांचेही आदान-प्रदान सुरु होते दोन्ही बाजूंनी. पाकिस्तानी म्हणत होते… काफरांनो, तुम्ही काय लढणार आमच्याशी? यावर विजयंत साहेब म्हणत… तुमची इथून पळून जाण्याची संधीही आता निघून गेली आहे… आता आम्हीच तुमचे जनाजे काढू!

त्यांनी पुढे मुसंडी मारली… एवढ्यात मशीनगनचा एक मोठा फायर आला आणि साहेबांच्या मस्तकाचा वेध घेऊन गेला… साहेब त्यांच्या सहका-याच्या बाहुपाशात कोसळले… लहानगा रॉबिन पक्षी आसमंतात कायमचा उडून गेला होता… कधीही न परतण्यासाठी! पुढे भारताने शत्रूला यमसदनी धाडले! पण आपले मोती विखुरले गेले होते… मातीत मिसळून गेले कारगिलच्या पर्वतांवरच्या!

कॅप्टन विजयंत थापर यांच्या वडिलांनी लेकाचा शब्द लक्षात ठेवला… वाढते वय… बिघडणारी प्रकृती यांची तमा न बाळगता… ते तोलोलिंगची चढण चढत त्यांचा लेक जिथे धारातीर्थी पडला त्या ठिकाणाला भेट देतात… दरवर्षी… आई तिथे जाऊ शकत नाही… पण तिच्या मनात मात्र तिचा रॉबिन अजून भरारी घेतच असतो…! मरणोत्तर वीर चक्र देऊन देशाने कॅप्टन विजयंत थापर साहेबांचा गौरव केला आहे. साहेबांच्या आठवणी त्यांच्या कुटुंबाने, मित्रांनी आणि त्यांच्या दलाने मोठ्या प्रेमाने जतन करून ठेवल्या आहेत. तोलोलिंगवर त्यांच्या स्मृती एक छोटे मंदिर उभारून जतन केल्या गेल्या आहेत… आणि त्यांच्या ए कंपनी मंदिराच्या भिंतीवर एक छान, सुरेख तैलचित्र लावलेले आहे… हुतात्मा कॅप्टन विजयंत थापर… दी रॉबिन!

१९९९ मध्ये अर्थात युद्धासाठी कारगिल येथे जाण्यापूर्वी लेफ्टनंट वैजयंत थापर यांनी आपल्या दैनंदिनीमध्ये आयुष्याची रूपरेषा लिहून ठेवली होती… स्वत:शीच काही गोष्टी ठरवून ठेवल्या होत्या…

मी भारताचा ध्वज सतत उंचावत राहीन. मला माझ्या आई-वडिलांचा खूप अभिमान आहे. मी मरणोत्तर नेत्रदान करेन, अवयवदानही करेन. मी धुम्रपान करणार नाही, मांसाहार करणार नाही, अंडी खाणार नाही. मी माझ्या सैनिकांसमवेत राहीन. मी स्वत:ला खाली बघायला लागेल असे वर्तन करणार नाही. मी आयुष्यात एका तरी अनाथ मुलाचा शिक्षणाचा आणि इतर सर्व खर्च करीन… आणि मी मरताना राम स्मरेन!

कॅप्टन विजयंत थापर यांच्या सारखे, वयाच्या एकविसाव्या-बाविसाव्या वर्षी एवढे स्पष्ट विचार, ज्ञान, चारित्र्य कमावलेला सैनिकी अधिकारी आपल्याला आणखी खूप वर्षे लाभायला हवे होते… असे राहून राहून वाटते. त्यांच्या शौर्याच्या कथा काही लोकांना ठाऊक आहेत… पण त्यांची ही वैचारिक बाजू तशी कमी प्रकाशात आलेली आहे. कॅप्टन विजयंत थापर डॉट कॉम या संकेतस्थळावर साहेबांच्या आयुष्याचा अतिशय सविस्तर आणि सुंदर आलेख मांडण्यात आला आहे. इंटरनेटवर साहेबांच्या पालकांनी अनेक विडीओज मधून खूप छान माहिती दिली आहे. कुणाला ना कुणाला तरी देशसेवेसाठी पुढे यावेच लागेल… असेही विजयंत साहेबांचे वडील नेहमी म्हणतात! वरील बरीचशी माहिती मी तिथूनच घेतली आहे. छायाचित्रे साभार. आणखी खूप काही लिहायचे होते. विशेषत: त्यांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या वडिलांविषयी. पण त्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सेप्टोलेसेंट म्हणजे काय?…” – लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “सेप्टोलेसेंट म्हणजे काय?…” – लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

☆

सेप्टोलेसेंट म्हणजे ७० वर्षांवरील पुरुष किंवा स्त्री, जी वृद्धत्वाचा स्वीकार पारंपरिक पद्धतीने करत नाही, तर जीवनाबद्दलच्या उत्साहासह एक वेगळी जीवनशैली निवडते.

त्यांची वैशिष्ट्ये:

१) ते नेहमी सक्रिय असतात. ते काम करू शकतात, अभ्यास करू शकतात किंवा एखादा नवा उपक्रम निर्माण करू शकतात, ज्यामुळे त्यांना विचार करावा लागतो आणि तो उपयुक्त वाटतो.

२) त्यांचे किमान तीन चांगले मित्र असतात. ते त्यांच्याशी कॉफी, पाणी किंवा वाईनसाठी वारंवार भेटतात.

३) ते आलिशान गोष्टींपासून दूर राहून प्रवास करतात आणि नवीन ठिकाणे व संस्कृती अनुभवतात. पण जीवनातील चांगल्या गोष्टींचा आनंद घेणे ते सोडत नाहीत.

४) ते आपल्या जोडीदार, मुले, नातवंडे आणि नातेवाईकांशी प्रेम, आदर आणि परस्पर सहारा यावर आधारित नाती जोपासतात.

५) ते आशावादी आणि उत्साही असतात. त्यांच्या मनात नेहमी एखादा नवा प्रकल्प किंवा ध्येय असते आणि ते जीवनात अडकून न पडता पुढे जातात.

६) ते आपल्या आरोग्याची काळजी घेतात. ते आजारपणाला जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारतात. ते दररोज किमान २० मिनिटे चालतात आणि निरोगी अन्न खातात.

७) त्यांना छोट्या गोष्टींत आनंद मिळतो. तो वाढदिवस असू शकतो, एखादा सोहळा, एखादी आवडती मालिका किंवा एक नवा दिवस. ते दररोज देवाचे आभार मानतात.

८) ते दिवसभरात मिळालेल्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असतात. ते इतरांचे चांगले करण्याचा प्रयत्न करतात.

९) ते दररोज हसतात. कारण त्या अनेक सुंदर गोष्टींचा आनंद घेतात, ज्या इतरांना दिसत नाहीत किंवा महत्त्वाच्या वाटत नाहीत.

१०) ते आपल्याकडे जे आहे त्यात आनंदाने राहतात, जे नाही त्याची चिंता न करता. म्हणूनच ते स्वतःला करोडपती मानतात.

मी तुम्हालाही “सेप्टोलेसेंट” होण्याचे आमंत्रण देतो.

“वृद्धत्व थांबवणे अशक्य आहे. पण वृद्धत्वाचा सन्मान आणि आदराने स्वीकार करणे हे पूर्णपणे आपल्या हातात आहे.”

☆

लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात 

संग्राहिका आणि प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शास्त्रस्तुती ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ शास्त्रस्तुती ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

 शास्त्रस्तुती

 – – – ज्ञान, अनुशासन आणि मुक्तीचा दिव्य प्रवास

शास्त्र म्हणजे काय?

शब्दाचा उगम आणि अर्थवैभव– – 

‘शास्त्र’ या शब्दात ‘शास’ हा मूळ धातू आहे. संस्कृत भाषेतील ‘शास’ धातूला ‘ष्ट्रन्’ प्रत्यय लावून ‘शास्त्र’ हा शब्द निर्माण झाला आहे. ‘शास’ या धातूचा अर्थ— उपदेश करणे, शासन करणे, अनुशासित करणे असा आहे.

म्हणूनच ‘शास्त्र’ म्हणजे—

जे मार्गदर्शन करते, अनुशासन घडवते आणि जीवनाला योग्य दिशा देते ते शास्त्र.

शास्त्राची तात्त्विक व्याख्या

भारतीय वैचारिक परंपरेनुसार शास्त्र म्हणजे केवळ संग्रहग्रंथ नव्हे; तर ते क्रमबद्ध, सुसूत्र आणि जीवनदर्शी ज्ञान आहे.

प्राचीन व्याख्या सांगते—

“शासनात् शंसनात् शास्त्रम्”

म्हणजे जे अनुशासन करते आणि ज्ञानाची ओळख करून देते ते शास्त्र. तसेच—

“शास्ति च त्रायते च शास्त्रम्”

म्हणजे जे योग्य-अयोग्याचा निर्णय शिकवते आणि अज्ञानापासून रक्षण करते ते शास्त्र.

शास्त्र : ज्ञानाचे संरचित रूप

कोणत्याही विषयाचे क्रमबद्ध, तर्कसुसंगत आणि अनुभवाधिष्ठित ज्ञान म्हणजे शास्त्र.

या अर्थाने शास्त्रे अनेक असली तरी भारतीय तत्त्वज्ञानात विशेष मान्यता असलेली षट्दर्शने अशी आहेत—

न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत (उपनिषदे)

यांखेरीज—

वेद, पुराणे, स्मृतिग्रंथ, तसेच अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र, नाट्यशास्त्र, छंदशास्त्र, आयुर्वेद इत्यादींचाही शास्त्रांत समावेश होतो; परंतु त्यांचे प्रामाण्य हे श्रुति आणि वेदांताधिष्ठित तत्त्वांवर आधारित असणे आवश्यक मानले गेले आहे.

शास्त्रांचे प्रामाण्य : अनुभव, तर्क आणि आचार

भारतीय तत्त्वज्ञानात शास्त्र हे आंधळ्या श्रद्धेचे नव्हे, तर प्रज्ञेच्या जागृतीचे साधन आहे.

शास्त्रांचा पाया उभा आहे—

श्रुति (अध्यात्मिक परंपरा)

युक्ति (तर्कबुद्धी)

अनुभूति (प्रत्यक्ष अनुभव)

शास्त्र सांगते, पण त्याची सत्यता आचरणातून अनुभवल्याखेरीज ज्ञान परिपूर्ण होत नाही.

म्हणूनच शास्त्र हे—

वाचनापुरते नसून, जीवन जगण्याची कला शिकवणारे मार्गदर्शक आहे.

शास्त्र आणि विवेकबुद्धी

शास्त्राचा खरा उद्देश मनुष्याला विचारस्वातंत्र्य आणि विवेक प्रदान करणे हा आहे, अंधानुकरण नव्हे.

ते शिकवते—

सत्य आणि असत्य यातील भेद.

नित्य आणि अनित्य यातील भेद

आत्मा आणि अनात्म याची ओळख

परंतु—

शास्त्राचा अभ्यास जर केवळ वादासाठी झाला, तर तो ज्ञान न राहता अहंकाराचे साधन बनतो.

म्हणूनच शास्त्राध्ययनासाठी आवश्यक आहेत—

विनय, श्रद्धा आणि चिंतनशीलता

शास्त्र आणि साधकाची भूमिका

नम्र विद्यार्थ्याने, ज्ञानेच्छु साधकाने आणि सूज्ञ व्यक्तीने शास्त्रांचा आदर करावा. त्यांचा सखोल अभ्यास करावा. उथळपणे त्यांना नाकारू नये. एखादा विचार पटला नाही तर

शास्त्राला दोष देण्यापूर्वी स्वतःच्या तर्काची चिकित्सा करावी.

बहुधा दोष आपल्याच आकलनात असतो, आणि सखोल विचारांती हे उमगते आणि मन नम्रतेने शास्त्रापुढे नतमस्तक होते.

कालपरत्वे शास्त्रांचे पुनर्वाचन

काळ बदलतो, परिस्थिती बदलते; परंतु शास्त्रातील मूलतत्त्वे शाश्वत असतात. त्यातील काही दृष्टांत, उदाहरणे, तपशील कालबाह्य होऊ शकतात; परंतु तत्त्वे मात्र चिरंतन सत्य असतात.

म्हणूनच प्रत्येक युगात शास्त्रांचे

नव्या दृष्टिकोनातून पुनर्वाचन आवश्यक ठरते.

शास्त्र : कुमार्गापासून सन्मार्गाकडे

थोडक्यात—

जे ज्ञान माणसाला कुमार्गापासून दूर नेऊन सन्मार्गावर आणते, त्याचे कल्याण करते—तेच शास्त्र.

शास्त्र हे—

जीवनाला दिशा देते

मनाला स्थैर्य देते

बुद्धीला स्पष्टता देते

समारोप : प्रकाशाचा अखंड स्रोत

शास्त्र म्हणजे केवळ अक्षरांचा संग्रह नाही; ते जीवनाचा दीपस्तंभ आहे.

शास्त्र —

अज्ञानातून ज्ञानाकडे नेते

अस्थिरतेतून स्थैर्याकडे नेते

मर्यादिततेतून अमर्यादतेकडे नेते

म्हणूनच—

शास्त्र हे नुसते वाचायचे नसते—ते जगायचे असते,

ते नुसते समजायचे नसते—ते आत्मसात करायचे असते.

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘तो एक धडा’ – लेखिका : ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ ‘तो एक धडा’ – लेखिका : ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

ती फक्त दहा वर्षांची होती. स्मिथ फॅमिली मधे जन्मलेली एक लहान मुलगी! नाव होतं टिली स्मिथ!

इंग्लंडमधील सरे नावाच्या गावांत ती रहात होती.

टिली नेहमीप्रमाणे त्या दिवशी शाळेत गेली..

टिलीचे भूगोलाचे शिक्षक मिस्टर कार्नी वर्गात आले. भूगोलाचा तास सुरू झाला. सर सुनामी म्हणजे काय हे मुलांना शिकवत होते..

सरांनी १९४६ मध्ये हवाईला उद्ध्वस्त करणाऱ्या भयानक सुनामीचं कृष्णधवल फुटेज मुलांना दाखवलं..

सुनामी येण्यापूर्वी समुद्रात काय काय बदल दिसतात हे उलगडून सांगितलं…

समुद्र अनैसर्गिकरीत्या कसा मागे मागे जातो, त्याचं पाणी कसं फेसाळतं, आणि समुद्राचं वर्तन कसं विचित्र होत जातं हे सगळं सर उत्तम प्रकारे शिकवत होते..

आणि टिली जीवाचे कान करून ऐकत होती..

दोन आठवड्यांनी ख्रिसमसची सुट्टी सुरू झाली. टिली अतिशय आनंदात होती कारण तिचे आई बाबा तिला सुट्टीसाठी थायलंडला घेऊन गेले होते. हा तिचा पहिलाच परदेश प्रवास होता.

ते फुकेट मध्ये पोचले. फुकेट हे थायलंड देशाच्या दक्षिण भागातील एक अतिशय सुंदर आणि लोकप्रिय बेट आहे. तेथील पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा आणि निसर्गरम्य अशा माई खाओ नावाच्या बीचवर ते पोचले..

साधारण शंभर लोकांना सामावून घेईल असा तो बीच होता व पूर्णपणे भरला होता..

हवा अतिशय छान होती..

पण टिलीला काहीतरी बरोबर नाही असं वाटू लागलं..

तिच्या लक्षात आलं..

समुद्राचं पाणी अजिबात शांत नव्हतं..

ते आत-बाहेर न करता फक्त आत आतच जात होतं..

समुद्र फेसाळला होता..

“बिअरवर जसा फेस येतो तसा समुद्र फेसाळला आहे.. ” ती आई बाबांना म्हणाली.. समुद्र अनैसर्गिकरीत्या मागे जाणं, फेसाळ पाणी, समुद्राचं विचित्र वर्तन सारं काही ती दोन आठवड्यांपूर्वीच भूगोलाच्या वर्गात नुकतीच शिकली होती..

“सुनामी येणार आहे…सुनामी येणार आहे” ती जोरजोरात ओरडू लागली..

पण तिच्या आई-बाबांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही कारण त्यांना समुद्रात एकही लाट दिसत नव्हती. आकाश स्वच्छ होतं. बीच शांत होता.

“मी जाणार आहे इथून.. सुनामी येतय.. ” टिली घाबरून गेली होती.

तिच्या कापऱ्या आवाजातील भीती तिच्या बाबांना जाणवली व त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवण्याचे ठरवले. शिवाय तिथे बीचवर एक जपानी माणूस उभा होता त्याने टिलीचे बोलणे ऐकलं. तो बाबांना म्हणाला, “तुमची मुलगी बरोबर सांगते आहे! सुमात्रामधे भूकंप झालाय ही बातमी मला नुकतीच मिळाली आहे! ”

टिलीच्या बाबांनी ते ज्या हॅाटेलमधे रहात होते त्या स्टाफला सुनामीबद्दल सांगितलं. त्यांनी लगेच बीच रिकामा करायला सुरुवात केली.

सारे बीचवरून बाहेर पडण्यासाठी धावू लागले..

आई, बाबा, टिली पण धावत होते..

टिलीची आई मागे पडली होती. पाणी तिच्या मागून प्रचंड वेगाने येऊ लागलं तेव्हा तिला पळू लागली.. आपण आता मरणार असं वाटत होते पण ती पळत राहिली..

नशीबानं ते त्या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचले.

आणि मग ती प्रचंड लाट आली…३० फूट उंच.

बीचवरील सारं काही.. खुर्च्या, नारळाची झाडं, कचरा.. सारं काही वाहून गेलं.

२६ डिसेंबर २००४ च्या सुनामी मध्ये १४ देशांतील २३०, ००० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले.

फुकेतच्या प्रत्येक बीचवर हजारो लोक मरण पावले.

पण

माई खाओ बीचवर एकही जीव गेला नाही…

कारण 

एका दहा वर्षांच्या मुलीने भूगोलाचा धडा वर्गात लक्ष देऊन ऐकला होता.

टिलीला “एंजेल ऑफ द बीच” म्हणून गौरवण्यात आलं. तिला मरीन सोसायटीचा थॉमस ग्रे स्पेशल अवॉर्ड, “चाइल्ड ऑफ द इयर” घोषित केलं. युनायटेड नेशन्स मध्ये तिचं भाषण ठेवलं गेलं.. आज टिली ३० वर्षांची आहे. ती लंडनमध्ये राहते आणि याट चार्टरिंगमध्ये काम करते.

ती आजही तिच्या भूगोलाच्या सरांचे आभार मानते. “मिस्टर कार्नी नसते तर मी आणि आई बाबा आज जिवंत नसतो. ”

दोन आठवडे..

एक धडा..

शंभर जीव..

हे वर्गात लक्ष देऊन ऐकण्यातलं सामर्थ्य आहे.. शिक्षणातील सामर्थ्य आहे..

शाळेतला एक साधा धडा..

जीवन आणि मृत्यू साठी कारणीभूत ठरला..

“वर्गात लक्ष दे” माझी आई मला रोज शाळेला जाताना सांगायची. वर्गात शिकवलेलं किती लक्षात आहे ते पण नेहमी विचारायची..

आपणही मुलाबाळांना “वर्गात लक्ष दे” सांगण्यास विसरू नका!

(सत्य घटना) 

लेखिका : ज्योती रानडे

सौजन्य : कथाविश्व – गोड कथांचे अनोखे विश्व (2026 Jyoti Ranade. All rights reserved.) 

प्रस्तुती – मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मला आवडलेले एक व्यक्तिमत्व : डॉ. वसंतराव डोक्रस ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मला आवडलेले एक व्यक्तिमत्व : डॉ. वसंतराव डोक्रस ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

“माणूस असावा तर असा आणि एखाद्या संस्थेचा प्रमुख असावा तर असा” —

असं वाटायला लावणारी माणसं आयुष्यात फार क्वचित भेटतात. अशाच थोडक्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे डॉ. वसंतराव डोक्रस. व्यक्तीचित्र म्हटलं की सहजपणे पु. ल. देशपांडे यांनी रंगवलेली अंतू बरवा, हरी तात्या, सखाराम गटणे यांसारखी अजरामर पात्रं डोळ्यांसमोर उभी राहतात. पुलंनी माणसांच्या स्वभावरेषा ज्या सूक्ष्मतेने आणि जिवंतपणे रेखाटल्या, ती उंची गाठणं अवघडच. तरीही इतर लेखकांच्या लिखाणातही अशी काही व्यक्तीचित्रं आढळतात, जी वाचकाच्या मनात कायमची घर करून राहतात.

अशाच लक्षात राहणाऱ्या व्यक्तीचित्रांपैकी एक म्हणजे डॉ. विजय देशपांडे यांनी आपल्या ‘माणूस नावाची शाळा’ या पुस्तकात रेखाटलेले डॉ. वसंतराव डोक्रस यांचे व्यक्तिचित्र. ते वाचताना क्षणोक्षणी असं वाटत जातं की नेतृत्व, विद्वत्ता आणि माणुसकी यांचा सुरेख संगम म्हणजे डॉ. डोक्रस.

डॉ. वसंतराव डोक्रस हे नागपूरच्या विश्वेश्वरय्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज (व्हीआरसीई) चे माजी प्राचार्य. आज हेच महाविद्यालय विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT) म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे, त्यांच्याबद्दल लिहिणारे डॉ. विजय देशपांडे हेही याच संस्थेतील प्राध्यापक होते. त्यामुळे हे व्यक्तिचित्र अनुभवांच्या प्रामाणिक मातीवर उभं राहिलेलं आहे.

डॉ. डोक्रस यांच्या कर्तृत्वाचा पाया त्यांच्या विद्यार्थीदशेतच रचला गेला होता. अमरावतीच्या किंग एडवर्ड कॉलेजमधून सुरू झालेला त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यानंतर त्यांना प्रतिष्ठित आय. आय. एस. (IISc – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) मध्ये एम. एस्सी. साठी शिष्यवृत्ती मिळाली. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी एम. एस्सी. ‘डिस्टिंक्शन’सह उत्तीर्ण करण्याचा पराक्रम केला होता. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेमुळेच १९४० च्या दशकात त्यांना अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून एम. एस. (MS) आणि पी. एचडी. (Ph. D) साठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांचा त्या काळातील शोधनिबंध आजही गुगलवर उपलब्ध आहे, जो त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीची साक्ष देतो.

डॉ. डोक्रस मोजकंच, पण नेमकं आणि मार्मिक बोलत. एकदा ते आणि डॉ. विजय देशपांडे राष्ट्रीय प्रयोगशाळेतील एका उपसंचालकांना भेटायला गेले. पद मोठं होतं, खुर्चीही मोठी होती; पण त्या पदावर बसलेली व्यक्ती मात्र सातत्याने आपल्या अडचणींचा पाढा वाचत होती. आपल्याला अपेक्षित असलेलं काही साध्य होणार नाही, हे लक्षात येताच दोघे बाहेर पडले. तेव्हा डॉ. डोक्रस सहज म्हणाले—

“खुर्च्या मोठ्या केल्या तरी त्यात बसणारी माणसं मात्र खुजीच राहतात. ”

त्यांचे हे उद्गार म्हणजे नेतृत्वाच्या संकल्पनेवरची कठोर पण खरी आणि मार्मिक अशी टिप्पणी होती.

डॉ. डोक्रस हे शिस्तप्रिय होते, पण ती शिस्त जाचक नव्हती. एकदा व्हीआरसीईच्या विद्यार्थ्यांनी एका काश्मिरी पंडित विद्यार्थ्याच्या नेतृत्वाखाली हॉस्टेलच्या जेवणावरून संप पुकारला. डॉ. डोक्रस यांनी त्यांना समजावून पाहिले, पण विद्यार्थी ठाम होते. तेव्हा त्यांनी एक अनोखा मार्ग निवडला. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले, “जर मेस बंद झाली, तर तुम्ही जेवणार कुठे? ” विद्यार्थ्यांकडे उत्तर नव्हते. अशा वेळी डॉ. डोक्रस यांनी आपल्या पत्नीला घरी स्वयंपाक करायला सांगून तो डबा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. काही दिवसांतच विद्यार्थ्यांचा रोष निवळला आणि तो विद्यार्थी नेता चक्क डॉ. डोक्रस यांच्या पत्नीचे आभार मानायला त्यांच्या घरी पोहोचला. विद्यार्थी हा त्यांचा खरा ‘वीक पॉईंट’ होता. चिडलेल्या विद्यार्थ्यांशी ते असं काही भावनिक संवाद साधत, की क्षणात वातावरण बदलून जाई.

त्यांची तत्वनिष्ठा केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही दिसून आली. १९६७ मध्ये इराणचे शहा मोहम्मद रझा पहलवी यांच्या राज्याभिषेकासाठी त्यांना खास निमंत्रण होते. त्यांचे पुत्र डॉ. उदय डोक्रस सांगतात की, हे निमंत्रण शहांच्या थेट ओळखीमुळे नव्हे, तर इराणी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षांशी असलेल्या मैत्रीमुळे होते. याच काळात इराणच्या एका मंत्र्याच्या मुलाला (जो अभ्यासात कच्चा होता) पास करण्यासाठी डॉ. डोक्रस यांच्यावर दबाव आला, पण त्यांनी त्याला कसलीही मदत केली नाही. परिणामी त्या मुलाला रिकाम्या हाती इराणला परतावे लागले. डॉ. डोक्रस हे पूर्णपणे प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त होते.

डॉ. डोक्रस हे विद्वान तर होतेच; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते एक उमदं, सकारात्मक व्यक्तिमत्त्व होते. मध्य प्रदेशात त्यांनी केलेल्या यशस्वी कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची व्हीआरसीईच्या प्राचार्यपदी नेमणूक केली. त्यांनी जो मार्ग प्रशस्त केला, त्यावरून पुढे चालणं नंतरच्या प्राचार्य आणि विद्यार्थ्यांसाठी सुकर झालं.

कामाचा उरक प्रचंड होता. टेबलावर आलेली प्रत्येक फाईल निकाली काढूनच ते घरी जात. डॉ. विजय देशपांडे यांनी एकदा त्यांच्या कामाच्या पद्धतीचं रहस्य विचारलं, तेव्हा ते सहज म्हणाले—

“अरे, कसलं आलंय रहस्य! सारं काही सवयीन जमतं. सवय लावून घ्यायला थोडी बुद्धी, काम करताना लागणारं कसब आणि मुख्य म्हणजे कोणतंही काम पूर्ण करण्याची मानसिक तयारी—या तीन गोष्टी जवळ असल्या की बाकी सगळं आपोआप जमतं. ”

डॉ. उदय डोक्रस सांगतात की, वडील कायम कामात आणि प्रवासात असायचे. पण त्यांच्या लोकप्रियतेची खरी जाणीव त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी झाली. नागपूरच्या धंतोली भागातील रस्ते शोकसागरात बुडालेल्या जनसमुदायाने गच्च भरले होते.

प्रत्येक माणसाला जन्म असतो, तसा शेवटही असतो. माणसाचं मोठेपण त्याच्या पदात नसतं; पदाला मोठं करणारी त्याची उंची असते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचं संस्थापक सदस्यत्व ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्व—अशा अनेक सन्मानांनी त्यांचं कर्तृत्व अधोरेखित झालं. त्यांच्यातील ‘वसंत’ सदैव बहरलेलाच राहिला. ज्या ज्या निर्जीव खुर्च्यांवर ते बसले, त्या त्या खुर्च्यांनाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे उंची मिळत गेली.

असा हा हिमालयाएवढ्या उंचीचा माणूस!

… व्यक्तीचं जीवन कसं असावं, याचा हा एक जिवंत आदर्श.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares