मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३३७ ☆ भावनेचा कोपरा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३७ ?

☆ भावनेचा कोपरा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

☆

चंद्र होता सोबतीला लाजरा

साथ त्याला धुंद देतो मोगरा

*

तार होती वादकाने छेडली

स्पर्श होता देह झाला बावरा

*

पावसाची वाजता ही पावले

मी मनाचा मोर पाही नाचरा

*

शांत का ही होत नाही वादळे

ती म्हणाली या मनाला सावरा

*

ओठ व्हावे का तिचेही तांबडे

मी विड्याचा चावताना तोबरा

*

तृप्त झालो एवढा होतो तरी

एक कोरा भावनेचा कोपरा

*

चंद्र आहे रात्र सारी जागतो

ही सकाळी झोप येते पामरा

☆

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बरसात… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ बरसात… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

☆

क्षितिजकरांनी शिंपित जीवन, गगन धरेवर झुकले रे

किती दिसांनी आभाळाला, फुटला ऐसा पाझर रे! ..

*

लोट धुळीचे आले उडवित, घोंघावत वादळवारे

बघता बघता होय नभांगण, काजळकाळे सारे रे

 वीजशलाका अजस्र कडकड, लखलख उजळत अंबर रे!

*

गगनघोष तो कृष्णघनांचा, दुमदुमतो दाहि दिशांना

पुण्यात्म्याच्या कंठामधली, दिव्यभव्यचि जणु प्रार्थना

 जीवनगाणे जयनादाचे, चराचरातुन झंकृत रे!

*

मुकुट धुक्याचे लेवुन सजली, उन्नत पर्वत शिखरे ती

दरीदरीतुन तुषार उडवित, निर्झर सारे झुळझुळती

 रुजला अंकुर नवसृजनाचा, उरी धरेच्या गंधित रे!

*

तुडुंब ओहळ, तुडुंब शेते, तुडुंब भरली तळी तळी

भरुन दूथडी नद्या वाहती, दिशान्त बुडले सर्व जळी

 येत दर्पणी जलाशयाच्या, इंद्रधनू सतरंगी रे!

*

सुदुर हासती प्रसन्न हिरवी, चिंब भिजूनी वने वने

प्राशून अमृत धारांमधले, झाली हिरवी रणे रणे

 अभिषेकामधि मम प्राणांचे, गोकुळ अवघे न्हाले रे!

 *

 (वृत्त : हरिभगिनी)

 (माझ्या ‘ऐलपैल’या कवितासंग्रहातून)

☆

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मी ओळखून आहे ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मी ओळखून आहे ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

पादून हासणे अन् हासून हे पादणे

मी ओळखून आहे, कोठूनचे चणे

*

नाकातल्या केसांना का त्रास व्हावा 

जळताच वासांनी अन् उग्र असावा 

हे प्रश्न जीवघेणे, स्मरती ते दुखणे 

मी ओळखून आहे, कोठूनचे चणे

*

स्वार्थी मनुष्य असा त्याला कसे कळावे 

नाकात वास ज्याच्या त्यालाच दुःख ठावे 

चोरटा कटाक्ष खुळा, आम्हा कठीण जिणे

मी ओळखून आहे, कोठूनचे चणे

*

जाता समोरून दिवसा चमके तारा 

क्लेशातूनी झुळूकांच्या दुर्गंधीत वारा 

खात्रीत पादण्यांच्या संपती सारे वाटाणे

मी ओळखून आहे, कोठूनचे चणे

*

पादून हासणे अन् हसून हे पादणे

मी ओळखून आहे, हे कोठूनचे चणे

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माणसांनी कष्ट घ्यावे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ माणसांनी कष्ट घ्यावे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

☆

माणसानी माणसावर लाख केले वार त्यांचे

मीच मोठा मानण्याचे खूप झाले येथे त्यांचे

* 

नाव आहे गाव आहे मानवी अंदाज आहे

आत्मप्रौढी मिरवण्याचे ढोंग आहे फार त्यांचे

 *

टोळक्यांचा मेळ होता कार्य सिद्ध होत जाते

मदतकरण्या खास जमती पाळलेले मोर त्यांचे

 *

नेककेली साधना तर लाभही होणार आहे

संस्कृतीच्या आडदडले भाग्य आहे थोर त्यांचे

 *

वावड्या लढवून काही व्हायचा उपयोग नाही

माणसांनी कष्ट घ्यावे संपवाया घोर त्यांचे

 *

एकट्याने होत नाही काम मोठे जोखमीचे

पाठराखी मिळविण्याला बोलवावे यार त्यांचे

 *

माणसांनी व्हायचे नसते कधीही नामधारी

ध्येय अंती गाठण्याचे हेच आहे दार त्यांचे

 *

योजणे आहे खुबीने योजनांची रूप रेषा

सिद्ध व्हावे माणसानी उचलण्याला भार त्यांचे

☆

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

☆

नभाच्या अथांग नीलपटलावर

काळ्या मेघांनी स्वप्नांची शाई

सांडली क्षितिजाच्या शांत ओठांवर

पावसाची पहिली कविता उमटली

एकेक थेंब अलगद उतरला

आकाशाचे अश्रू नव्हते

धरतीच्या विरहाला लाभलेले

प्रेमाचे निःशब्द उत्तर होते

मातीच्या गंधात मिसळून गेली

ऋतूंची अनामिक कहाणी

झाडांच्या पानोपानी दाटली

हिरवाईची नवी चांदणी

नदीच्या लाटांनी गुणगुणले

मेघांच्या अंतरीचे गूज

वाऱ्याने उलगडून दाखविले

निसर्गाच्या मनातील सूक्ष्म सूज

पाऊस म्हणजे केवळ जलधारा नव्हे

तो सृष्टीच्या हृदयाचा स्पंदनस्वर आहे

कोरड्या आयुष्याच्या वाळवंटात

उमलणाऱ्या आशेचा अंकुर आहे

थेंबांच्या चिरंतन लयीमध्ये

जीवनाचे तत्त्व दडलेले असते

झिजून विरघळून वाहत राहण्यातच

खरे अस्तित्व फुललेले असते…

☆

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ही जणू स्वर्गाचीच वाट… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ ही जणू स्वर्गाचीच वाट… ☆ नीलांबरी शिर्के ☆

☆

नागमोडी ही सुंदर वाट

हिरव्या समृद्धीतुन जाते

डोंगरावरील धुक्यातुन

स्वर्गातच खचीत जाते!!

*
स्वर्गासुखाकडे जाता

डोळे भरून निसर्ग पाहू

आनंदी सुखी तृप्त मन

भारावलेले तसेच राहू!!

☆

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे श्रावणा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ हे श्रावणा... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

☆

हे श्रावणा, मनभावना, शब्द माझे ऐक ना

मोहविते रुप तुझे, तूच का रे कृष्ण कान्हा

* 

डुलशी पाचूतुनी तू, स्त्रवशी धारेतुनी तू

पानातुनी, रानातुनी, दिसशी मला तूच तू

 *

किरण होशी कोवळे पांघरिशी मेघमाला

बासरीचा सूर येतो वाहताना रानवारा

 *

या फुलांचा गंध आणि लाभले रुप तुजला

पक्षीगण हे धावले गीत तुझे गावयाला

 *

जातसे रंगुनी मी हे रंग सारे पाहताना

घालीशी अन् मोहिनी तू लोभविसी या मना

हे श्रावणा… मन भावना

 ☆

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # ३०४ – शब्द‌ सौंदर्याचा साज…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # ३०४– विजय साहित्य ?

☆ शब्द‌ सौंदर्याचा साज…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

☆

नव्या युगाचे पोवाडे

बिजलीचा न्यारा बाज

सैन्य चाललेले पुढे

शब्द सौंदर्याचा साज…! १

 *

अतींद्रीय प्रतिमांची

नादवती शब्दकळा

साधनेचा सपादक

लावी‌ रसिकांसी लळा..! २

 *

राष्ट्रसेवा दल आणि

साने गुरूजींनी साथ

साहित्यिक प्राध्यापक

मूळ नाव विश्वनाथ..! ३

 *

दिशा अकरावी दिली

काव्य सकीना मानसी

शिंग फुंकले रणी ते

शब्द तेजसी राजसी..! ४

 *

सामाजिक विषमता

हाताळली शिताफिने

आंग्ल,‌संस्कृत‌ बंगाली

भाषा गुंफिली खुबीने..! ५

 *

चळवळ स्वातंत्र्याची

केले भारत दर्शन

शब्द लावण्याचा ऋतू

जाणिवांचे संकर्षण…! ६

 *

बारा गावच्या पाण्यात

संकलित लोककला

अभिजात शृंगारीक

बहरला शब्दमळा..! ७

 *

जन जागृती करोनी

दिले विचारांचे दान

गाजविली अकादमी

काव्य दर्शनाची खाण…! ८

 *

बाल साहित्यात ठसा

नेले परीच्या‌ राज्यात

फुलराणी गिरकीने

चंगामंगा साहित्यात..! ९

 *

सामाजिक‌ सांस्कृतिक

साहित्यिक योगदान

परीपक्व मितभाषी

नैसर्गिक शब्दखाण..!१०

 *

पुरस्कार विभुषीत

लाभे अध्यक्षीय मान

नाम वसंत‌ बापट

काव्य दर्शनाची शान…!११

 *

लावणीच्या लावण्यात

रमे वसंत लेखणी

शारदीय सारस्वती

सेतू संपदा देखणी..!१२

☆

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आनंदी श्रावण आला दारी… – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

अलका ओमप्रकाश माळी

?  कवितेचा उत्सव ?

☆ आनंदी श्रावण आला दारी… – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

☆

आनंदी श्रावण, आला ग श्रावण

कधी सोन पिवळे उन पडे..

कधी सर सर सरी वर सरी..

थेंब टपोरे बरसती..

आनंदी श्रावण आला ग दारी..

 

सण वार घेऊन सोबती..

येई हासरा हा श्रावण..

नाग पूजेचा हा वसा

जपे पंचमीचा सण..

 

जिवतीचे करू पूजन..

मागू सौभाग्याचे वरदान

भावा बहिणीच्या नात्याची

विण घट्ट करी रक्षाबंधन..

 

मंगळागौरीचे ग खेळ..

रोज रंगती मनात..

उंच उंच झुले झुलती..

सोन पिवळ्या उन्हात..

 

यथेच्छ सात्विक मेजवानी

मैत्रिणींची गप्पा गाणी..

खेळ रंगतो सख्यांसोबत..

घेऊन माहेरच्या ग आठवणी..

 

श्रावण सरीनी रोज

भिजते अंगण..

समईच्या उजेडात

करू शिवाचे ग पूजन..

 

कधी उतरते उन,

कधी सर पावसाची..

चाहूल लागता श्रावणाची..

होई बरसात मांगल्याची..

 

निसर्ग करी मुक्त हस्ते

सौंदर्याची उधळण..

पाहता सृष्टीचे रूप देखणे..

फिटे डोळ्याचे ग पारणे..

☆

© अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जीवघेणी स्पर्धा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जीवघेणी स्पर्धा! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

तू मोठ्ठा की मी मोठ्ठा 

लागे स्पर्धा खड्ड्यांत

पाहिलं बक्षीस ठेवलं 

अजून बळी फुकटात

 *

उघड गटार बाजूचं 

ऐकत होतं संभाषण 

मला पण घ्या स्पर्धेत 

मी पण मारले अनेकजण

 *

युती होताच दोघांची 

एकमताने ठराव केला 

एक वॉर्ड ऑफिसरच 

परीक्षक म्हणून नेमला

 *

किती देणार “मानधन” 

त्याने घरून प्रश्न केला,  

खाल्ले ते कमी नाहीत कां 

एक “दादा” खड्डा उत्तरला

 *

देण्याघेण्या वरून दोघांचं 

दरवर्षीप्रमाणे बिनसलं 

थुकपट्टीच्या कामामुळे 

यंदा ही नशिबी मरण आलं

यंदा ही नशिबी मरण आलं

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares