मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 104 ☆ जखम ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 104 ?

☆ जखम ☆

ठेच लागलेल्या बोटाची जखम

चिघळून ठसठसावी

 तशाच ठसठसतात ना आठवणी?

खरं तर कारणच नव्हतं–

ठेच लागण्याचं,

पण एखादा निसरडा क्षण

ठेऊनच जातो कायमचा व्रण!

 

वेळीच

भळभळणा-या जखमेवर

भरली असतीस

चिमूटभर हळद,

तर जखम झालीही नसती

इतकी गडद!

 

धूळभरल्या वाटेवर

दुख-या बोटानं

अनवाणी चालत राहिलीस

बेफिकीर!

 

धूळच माखून घेतलीस

मलम म्हणून !

आता ती ठेचच बनली आहे ना,

एक चिरंजीव वेदना,

आश्वत्थाम्याच्या जखमेसारखी!

 

अशा जखमा भरतही नाहीत औषध पाण्याने अथवा

ब-याही होत नाहीत

रामबाण उपायाने—

आणि करता ही येत नाही,

त्या ठसठसत्या आठवणींवर शस्त्रक्रिया!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रार्थना गणेशास… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ जलचक्र.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆

स्वच्छ पांढऱ्या जलदां ची,

  निळ्या आभाळी होती वर्दळ!

कधि त्यांनी प्राशून घेतले,

  बाष्पातुन ते जल निर्मळ!

 

काळ्याकुट्ट ढगांची मैफल,

 भरली होती आकाशात !

वाटत होते जलभरले ढग,

  उतरतील कधी या भूतलात!

 

सौदामिनी चा लखलखाट,

 अन्  ढगांचा गडगडाट !

ढगाळलेल्या आभाळाला,

  वाऱ्याने ही दिली साथ!

 

झरझर झरझर धारा आल्या,

 तप्त धरेला भिजवू लागल्या!

धरतीच्या कुशीतील बीजांना,

  जीवन रस पुरवाया गेल्या!

 

रंग बदलला, हवा बदलली,

  ओढ लागली दानाची!

जिथून घेतले तिथेच देऊ,

  जल धाराही पुण्याची !

 

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 105 ☆ डोंगर ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 105 ☆

☆ डोंगर ☆

 

आठवणींचा डोंगर होता प्रचंड मोठा

मनात आले मारुन यावे सैर सपाटा

 

दुरून डोंगर छान वाटला म्हणून चढलो

ठेच लागली पाय घसरला आणिक पडलो

पाय ठणकतो त्यात मोडला हिरवा काटा

आठवणींचा डोंगर होता प्रचंड मोठा

 

गाभुळलेल्या चिंचा होत्या झाडावरती

मनात ठसली ती तर होती शेंड्यावरती

गोट्यासोबत भिरकवला मी एक लखोटा

आठवणींचा डोंगर होता प्रचंड मोठा

 

उभ्या पिकातच शिरली होती दोन पाखरे

येउन गेले होते वारे इथे बोचरे

त्यांनी केला गावोगावी मग बोभाटा

आठवणींचा डोंगर होता प्रचंड मोठा

 

आठवणीच्या वाटे वरुनी खूप धावलो

अजून मजला कळले नाही कुठे पोचलो

वयासोबती धुरकट झाल्या साऱ्या वाटा

आठवणींचा डोंगर होता प्रचंड मोठा

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पर्यटन दिन विशेष – ट्रीप…. ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 

? कवितेचा उत्सव ?

पर्यटन दिन विशेष – ट्रीप…. ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

ट्रिप  ट्रिप ट्रिप, जणू

रोजच्या जगण्यावर मिळालेली टीप ||

 

कुणा हवे धार्मिक स्थळ, कुणी म्हणे नदी घाट

कुणा हवे किल्लेदुर्ग  कुणी म्हणे सागरीकाठ ||

 

ठिकाण ठरवताना होतो काथ्याकूट

एकमत होताच बूक करतात सूट ||

 

सामान जमविण्यासाठी होते धावाधाव

नव्या नव्या बेतांची गाडी सुटते भरधाव ||

 

हळू हळू जमतात सगळे उत्साहाने भारलेले

मस्तीभऱ्या कल्पनांचे मनात ईमले बांधलेले ||

 

गप्पा गाणी गोष्टींनी आनंद सगळीकडे फैलावतो

हास्याच्या लकेरीबरोबर ताणतणाव सैलावतो ||

 

ऑफिस असो वा घरकाम घाण्याला जुंपल्यासारखे होते

एकसुरीपणातून ट्रीपमुळे थोडीशी सुटका होते ||

 

बदलामुळे फ्रेश होऊन प्रत्येक जण परततो

पुढच्या ट्रिपचा बेत आखतच गाडीतून उतरतो ||

 

मनुष्य असो की निसर्ग चैतन्याची उधळण हवी

पुन्हा नव्याने फुलण्यासाठी

ट्रिप हवीच हवी

ट्रिप हवीच हवी ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 49 ☆ किंमत अन्नाची… ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 49 ? 

☆ किंमत अन्नाची… ☆

कण कण अन्नाचा

किती आहे महत्वाचा

केव्हा कळेल याची किंमत

दिवस तो कधी उगावायचा…

 

श्रीमंती आहे म्हणून

पार्ट्या कुठे रंगतात

तिथे जेवणारे गर्विष्ठ

अन्न वाया घालवतात…

 

कधी कळेल मर्म अन्नाचे

समजेल कधी महत्व त्यांना

माज द्रव्याचा भिनला अंगी

घालतात ऐसा, हा धिंगाणा…

 

करावी किंमत अन्नाची

ती गरज, आहे नेहमीची

श्रीमंती नसतेच कायमची

सावली पहा, मध्यानाची…

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनं पाखरू! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक 

? कवितेचा उत्सव ?

⭐ मनं पाखरू!….. ? श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

मनं पाखरू पाखरू

पर हलके पिसागत

जाई साता सुमद्रापार

क्षणी विलक्षण वेगात

 

          मनं पाखरू पाखरू

          सारा सयीचा खजिना

          इथे दुःखी जखमांना

          कधी जागा अपुरी ना

 

मनं पाखरू पाखरू

घर बांधे ना फांदीवर

नेहमी शोधित फिरे

वृक्ष साजिरा डेरेदार

 

          मनं पाखरू पाखरू

          पंख याचे भले मोठे

          दृष्टी आडचे सुद्धा

          क्षणात कवेत साठे

 

मनं पाखरू पाखरू

वारा प्याले वासरू

बसे ना त्या वेसण

सांगा कसे आवरू ?

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मैत्री ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ मैत्री ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

 

ना किनारा समुद्राचा

ना क्षितिज आकाशाचे

ना हसू आनंदाचे

ना रडू दुःखाचे

ना तमा कशाची

ना भान जगाचे

स्वतःतचं हरवलेली

खोल खोल समुद्रासारखी

मुक्त आकाशात भरारी घेणारी

अविरत अशी जळणारी

जळून पण मागे

धूर व राख ठेवणारी

आठवणींच्या धुराने पाणी आणणारी

सोबत असते वर्तमानात

जोडून ठेवते भूत- भविष्याला

अस्तित्वातचं मनसोक्त रमणारी

मैत्री… !!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अप्रूप ☆ श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

अल्प  परिचय 

अनेक कविता अनेक दिवाळी अंक,मासिके, वृत्त पत्रे यातून प्रकाशित.

‘बंद मनाच्या दारावर’ हा कविता संग्रह प्रकाशित. ‘काफला’ या प्रातिनिधिक गझल संग्रहात गझलेचा सामावेश.

? कवितेचा उत्सव ?

☆ अप्रूप ☆ श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर ☆ 

देवू नयेच मोका कोणास सांत्वनाचा

राखावया हवा त्या सन्मान आसवांचा

 

साधाच वाहणारा वारा नको म्हणू हा

अंदाज लागतो ना केंव्हाच वादळांचा

 

आहे सुखात सांगू त्यांना; टिपून डोळे

दाटून कंठ आहे प्रत्येक माणसाचा

 

दारात चांदण्यांची तिष्ठून वेळ गेली

डोईवरी उन्हाळा आता सहावयाचा

 

बोलाविल्याविनाही भेटून दुःख जाई

नाही निरोप आला केंव्हा सुखी क्षणांचा

 

बाहेर..आत..आहे वैशाख हा जरीही

तू भेटताच होतो आभास श्रावणाचा

 

ऐकून हाक माझी ना थांबले कुणीही

ती माणसेच होती का खेळ सावल्यांचा?

 

दारी वरात येते थाटात त्या सुखांची

आवाज वेदनेच्या येतो न पावलांचा

 

जोजावले सुखाला मांडीवरी जसे मी

केला तयार खोपा दुःखास काळजाचा

 

तोही लबाड कावेबाजातला निघाला

जो भासवीत होता सात्विक आसल्याचा

 

वाटे मलाच माझे अप्रूप आज याचे

होता निभावला मी रे संग आपल्यांचा

 

प्रत्येक माणसाचा आधार होत गेलो

दुःस्वास सोसला मी होता जरी जगाचा

 

वाटे सरावलेले जीणे तुझ्याविना ही

जातोच तोल आहे अद्यापही मनाचा

 

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 73 – मंद वारा सुटला होता ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 73 – मंद वारा सुटला होता ☆

 

मंद वारा सुटला होता, गंध फुलांचा दाटला होता।

आज तुझ्या आठवांनी कंठ मात्र दाटला होता।।धृ।।

 

हिरव्या गार वनराईला चमचमणारा  ताज  होता।

मखमली या कुरणांवरती मोतीयांचा साज होता।

चिमुकल्यां चोंचीत माझ्या,तुझ्या चोंचिचा आभास होता।।१।।

 

पहाटेलाच जागवत  होतीस , झेप आकाशी घेत होतीस ।

अमृताचे कण चोचीत ,आनंदाने भरवत होतीस।

आमच्या चिमण्या डोळ्यांत ,स्वप्न  फुलोरा फुलत होता ।।२।।

 

आनंद अपार होता, खोपा स्वर्ग बनला होता।

विधाताही लपून  छपून , कौतुक सारे पाहात होता।

आज कसा काळाने वेध तुझा घेतला होता।।३।।

 

आता बाबा पहाटेला ऊठून काम सारं करत असतो।

लाडे लाडे बोलत असतो गाली गोड हसत असतो।

आज त्याच्या डोळ्यांचा कडं मात्र ओला होता।।४।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 90 – हरवलेले प्रेम जेव्हा .. . . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 90 – विजय साहित्य ?

☆ ✒ हरवलेले प्रेम जेव्हा .. . . ! ✒  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

हरवलेले प्रेम जेव्हा

तुला मला हसू  लागते

तुझ्या माझ्या काळजाला

पुन्हा चूक डसू लागते. . . . !

 

हरवलेले प्रेम जेव्हा

नवी वाट चालू लागते.

जुन जुन प्रेम देखील

नव नवं रूसू लागते. . . . !

 

हरवलेले प्रेम जेव्हा

एकट एकट राहू लागते

तुला मला  एकदा तरी

वाट त्याची दिसू लागते. . . . !

 

हरवलेले प्रेम जेव्हा

आठवणींचे मेघ होते

ओठांमधले नकार  सारे

शब्दांमध्ये फसू लागते. . . . . !

 

हरवलेले प्रेम जेव्हा

तुझी माझी झोप पळवते

नकळत आपल्या डोळ्यात

नवे स्वप्न वसू लागते. . . . !

 

हरवलेले प्रेम जेव्हा

तुला मला शोधू लागते.

काळीजदारी उंबरठ्यावर

वाट बघत बसू लागते.

 

हरवलेले प्रेम जेव्हा

वळवाची सर होते

जपून ठेवलेले वादळवारे

पाऊस होऊन  बरसू लागते. . . . !

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares