सकाळ झाली. रोजच्या सारखे गुरुजी पूजा करण्यासाठी देवळात निघाले. पूर्वी देऊळ साधेसुधे होते. आता भव्य बांधले होते. पायरीला नमस्कार करून गुरुजी आत आले. अजून चार गुरुजी त्यांच्याबरोबर होते. ते पाचजण मिळून पूजा करत असत. चांदीचा भला मोठा दरवाजा उघडला होता. समोरच सोनं, मोती, हिऱ्याच्या दागिन्यांनी सजलेली देवाची मूर्ती होती. नमस्कार करून त्यांनी पूजा सुरू केली. प्रथम काळजीपूर्वक एकेक दागिना काढायला सुरुवात केली. दुसरे गुरुजी ते दागिने पेटीत ठेवायला लागले. प्रत्येक वाराचे दागिने वेगळे होते.
शुद्ध पाण्याने देवाचे स्नान झाले. चांदीच्या पाच भांड्यात पंचामृत होते. ते घातले.. नंतर कोमट पाण्याने देवाला स्नान घातले. पंचाने देवाला पुसले. पितांबर नेसवला. अंगरखा घातला. शेला पांघरला. आणि नेहमी प्रमाणे दागिने घालायला सुरूवात केली.
सर्वात मोठा सोन्याचा हार देवाच्या गळ्यापाशीं नेला आणि काय झालं कळलं नाही… हार गळून पडला..
“फासा तुटला का काय” एक गुरुजी म्हणाले
हातात घेऊन बघायला लागले तर तो नीट होता. परत त्यांनी हार घेतला आणि घालायला लागले तर तो खाली घरंगळला… ” अरेच्च्या अस काय होतय.. ” गुरुजींनी हार बाजूला ठेवला. आणि हिऱ्याची कंठी घेतली. ती घालायला लागले तर ती पण खाली आली. दुसऱ्या गुरुजींनी प्रयत्न केला तरी तसंच…
तिसरे गुरुजी देवाजवळ आले. त्यांनी मोठी मोत्याची माळ घालायचा प्रयत्न केला तर.. ती अचानक तुटलीच. मोती विखरून पडले. आता मात्र सगळे घाबरले. आज कुठलाही दागिना देवाला घालता येत नव्हता.
काहीतरी विपरीत घडते आहे याची जाणीव झाली. हे बघून सगळेजण घाबरले. ताबडतोब ट्रस्टींना फोन केला. ते धावत आले. त्यांनी वेगवेगळे दागिने घेऊन घालायचा प्रयत्न केला पण आज एकही दागिना मूर्तीवर टिकत नव्हता.
गुरुजींना काय वाटले कोण जाणे.. त्यांनी शेवंतीच्या फुलांचा हार देवाच्या गळ्यात घातला. तो मूर्तीवर स्थिर राहिला. हे काय गुढ आहे हे कोणाला उमगेना…
ही वार्ता लगेचच गावात पसरली. देवाला बघायला खूप गर्दी झाली. आज देवाचे मूळ रूप सर्वांसमोर होते.
जवळ राहणारी म्हातारी काठी टेकत निघाली. ” मला देवाला बघु दे.. ” म्हणायला लागली.
लोकांनी तिला वाट करून दिली. जवळ जाताच म्हातारीला रडू आले. ती देवाशी बोलायला लागली.. म्हणाली.. ,
” किती दिवसांनी दिसलास रे. सोन्या, मोत्यांच्या, हिऱ्यांच्या दागिन्यात पार बुडून गेला होतास. तुझ्या ह्या रूपाचं दर्शन घ्यायला डोळे आतुरले होते रे.. आज माझा जीव सुखावला. माझा देव दिसला… मला भेटला… “
म्हातारीच बोलणं ऐकून लोकांचे डोळे भरून आले…
प्रसादासाठीचे पेढे, बर्फी, लाडू यांनी भरलेले चांदीचे मोठे बाऊल बाजूला होते. म्हातारीने हातातले मूठभर शेंगदाणे देवाच्या तोंडाशी नेले… खा रे देवा… देव तिच्याकडे बघून हसला…
असा तिला भास झाला. अत्यंत प्रेमाने देवाकडे बघत म्हातारीने हात जोडले..
दागिन्यांची ही अतर्क्य गोष्ट सर्वांसमोर घडली होती. अवाक् होऊन गुरुजी बघत होते. जे घडत आहे त्याचा अर्थ काय असेल… याचा सगळे विचार करायला लागले. तो उमगायला थोडा वेळ जावा लागला. देवाला दागिने नको आहेत का? असाच प्रश्न मनात आला.
देव भावाचा भुकेला आहे. त्याला हे दिखाऊ सुंदरपण नको… तर निर्मळ मन हवं आहे. हे त्यांच्या लक्षात आले. देवाच देवपण सोन्या चांदीत नाही… दगडातल्या त्या… देवपणाच दर्शन आज भाविकांना झालं.
देवाला दागिने घालायची हौस आपल्याला आहे. तो निर्गुण निराकार आहे. त्याच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेऊन सर्व भाविकांना मनोमन आनंद होत होता. प्रत्येकजण सुखावला होता… विचार विनिमय.. चर्चा करत आपापसात लोक बोलत होते.
त्यांना समजलं की देवानी आज आपल्याला हे लक्षात आणून दिलेले आहे. आता आपण प्रत्येक कृती करताना विचारपूर्वक करायला हवी आहे. मी जे करतो आहे ते देवाला आवडेल का? हे प्रत्येकानी स्वतःच्या मनाला विचारायला हवे आहे. आपले वागणे संयमपूर्वक हवे.
पटलं का तुम्हाला.. तुम्ही सुज्ञ आहात. ही कथा का लिहिली… हे तुम्हाला कळले असेलच. ते अंतःकरणापासून जाणून मात्र घ्या.. आणि मुख्य म्हणजे तस वागायचा प्रयत्न करा… श्रद्धा ठेवा पण त्याबरोबर विवेकाची साथ असू दे.
काल देशमुख परिवार थोडा disturbed च होता. कारण कालच पल्लवी ने सर्वांना प्रतीक बद्दल माहिती सांगितली. प्रतिक सिंह तिच्या च कंपनीत काम करणारा तिचाच कलीग. उत्तर भारतीय, हिंदी भाषी.
साधारण सहा महिनेच झाले असतील, दोघे बरोबर काम करतायेत. दोघांची ओळख होऊन. एकाच प्रोजेक्टवर रोज आठ दहा तास काम करतात, त्यामुळे ओळख मैत्रीत व मैत्री प्रेमात झाली. गोष्टी लग्न करण्यापर्यंत पोहचल्या.
पल्लवी ने आई बाबांना याबाबत सांगितले.
तसे आजकाल अशा सर्व गोष्टी म्हणजे नवीन, वेगळं असं काही वाटत नाही. दुसऱ्यांच्या बाबतीत आपण ऐकून,
हो का!! असं म्हणून लगेच थांबतो. आणि काही वेळानंतर विसरतोही. परंतु तीच गोष्ट आपल्या घरात जेंव्हा ऐकतो, तेंव्हा स्तब्ध होतो. क्षणभर आपण ऐकलेली गोष्ट खरी का?
हा विचार येतो, त्या मागोमाग अनेक प्रश्न डोक्यात येतात. त्या प्रश्नांमध्ये भीती, आश्चर्य, शंका कुशंका असतात. अस्वस्थता असते. काल्पनिक सुनामी येते. आजूबाजूला घडलेली अनेक intercaste marriages लक्षात येतात. अनेक चांगल्या पेक्षा वाईट बातम्या पुन्हा पुन्हा आठवतात. अनेक प्रश्न त्याची अनेक उत्तर मनात येतात. टीव्ही वरही या संदर्भातील अनेक बातम्या आपणं ऐकतो. फसवाफसवी ची किती तरी उदाहरण वर्तमानपत्रात वाचतो. आता तर अशा बातम्यांना ऊत आला आहे की काय? ? असं वाटतं.
जेंव्हा आपल्यावर वेळ येते तेंव्हा जीव घाबरतो. तेंव्हा स्वतः लाच समजावयाचे, स्वतः लाच सांगायचे की आजकाल तर हेसहज घडतंय. मग मी एवढी अस्वस्थ का होतेय? ? आपण शोधलेला मुलगा चांगलाच असेल कशावरून? कोणाच्या चेहऱ्यावर काही लिहिलं असतं का? आणि
महाराष्ट्रातला चांगला आणि दुसरी भाषा बोलणारा असला तरी पण मुलगा च आहे ना.
आता हा प्रतीक सिंह ही चांगला असूच शकतो ना.
चांगला शिकलेला तर आहेच. नोकरी पण चांगलीच आहे. पल्लवी ने काही तरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल ना.
फक्त थोडी घाई करतेय का? सहा महिने काळ एखाद्या ला समजायला पूरेसा आहे का? ? तसं ३६ गुण मिळालेल जोडपं पण आयुष्य भर आनंदाने संसार करतातच असं नाही. वेगवेगळ्या परिस्थितीत स्वभावाचे वेगवेगळे रंग नेहमी दिसतच असतात.
वगैरे वगैरे.
आपणही जो मुलगा शोधणार आहोत / होतो, तो पण नवीनच असेल ना.
घरातील आई पदावर बसलेली व्यक्ती जास्त अस्वस्थ होते.
पल्लवी ने प्रतीक बद्दल सांगायला सुरुवात केली.
पल्लवी म्हणाली,
आई बाबा!! तो हुषार आहे. कॉलेज चा Topper होता. त्यांचे future bright आहे. त्याचे बाबा सरकारी नोकरीत आहेत. आई बॅंकेत नोकरीला आहे. एक बहिण आहे. तिचे लग्न झाले आहे. आपल्या सारखाच मध्यम परिस्थिती चा परिवार असावा बहुतेक.
बाबा म्हणाले,
अग?! आपण श्रीमंत मुलांच्या शोधात तसाही प्रयत्न करत नव्हतोच. तो प्रश्नच नाही.
Intercaste marriages लाही आमचा विरोध नाहीच.
फक्त प्रतीक हुषार बरोबर शहाणा आहे का? हे महत्वाचे.
अग! कॉलेज मध्ये टॉप करायला हुषारी लागते पण जोडीदारा बरोबर समाधानी आनंदी आयुष्य काढायला शहाणपण लागत. येथे IQ पेक्षा EQ महत्वाचा असतो.. लग्नाबद्दल त्यांचे विचार मला समजून घ्यायचे आहेत. कारण
लग्न करणे आणि संसार करणे म्हणजेच
Wedding आणि marriage दोन्हीत खूप अंतर आहे. Wedding नंतर दुसऱ्याच दिवशी पासून संसार सुरू होतो.
तसं बघितलं तर लग्न म्हणजे एक दिवसाचा सोहळा आहे. पण marriage म्हणजे पूर्ण आयुष्य भराचा साथ, सहवास commitment आहे. त्यात विश्वास असावा लागतो, भीती नाही. शाश्वती असावी, अनिश्चितता नाही.
जमलं तर जमलं नाही तर ड्रायव्हर्स हे option आहेच. अस नको.
माझ्या मते या विचाराला तर स्थान नाहींच.
तू नही तो औरसही. हा असा विचारही नसावा.
लग्न म्हणजे emotional connection.
तुम्ही कार्पोरेट मध्ये काम करणारी मुलं आमच्या पेक्षा खूप स्मार्ट, हुषार, प्रॅक्टीकल आहात. academics, knowledge, professionally हिशोब करण्यात एक नंबर आहात. इतर गोष्टीतही perfect असता.
Pre wedding shoot पासून संगीत, मेहंदी and what not सर्व नवीन रितीरिवाज जीव ओतून पार पाडता. पण Pre wedding responsibilities, pre wedding training, pre wedding coaching, marriage concept हा विषयसमजूनघेणे जास्त आवश्यकआहे.
मला हा प्रश्न आजच्या २५ ते ४० वयोगटाच्या सर्व मुलांनाच विचारायचा आहे.
Wedding च्या दुसऱ्या दिवशी पासून संसार सुरू होतो. नातं कसं सांभाळायचं? ? हे दोघांनाही समजावं लागेल, शिकावं लागेल.
नात्यातला जिव्हाळा मोजमाप करायला कोणतंही मशीन नाही किंवा स्केलपट्टी, तराजू नाही, तो वागण्या बोलण्यात जाणवला पाहिजे.
तेकायहोऊन जाईल असं म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही.
लग्नानंतर togetherness ची भावना असावी.
हे साध गणित आहे की दोन वेगवेगळ्या घरातील मुलगा मुलगी एकत्र रहायला सुरुवात करतात. संस्कार वेगळे, सवयी खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या. विचार करायची, खर्च करायची पद्धत वेगळी, मग एकत्र रहायला लागल्यानंतर हुषारी बरोबर शहाणपण पण लागतच.
कुठे, काय, किती बोलायच? ? बोलायचं की नाही? हे शिकावं लागतं. संयंम लागतो. त्यात दोन चार वर्ष सहज निघून जातात. तेवढा patience ठेवायला हवा. दोन्ही कडचे आई वडील महत्वाचेच, त्यांचा हात सोडायचा नाहीच पण तुम्ही दोघांनी दोन्ही हात घट्ट पकडून ठेवणे. येणाऱ्या प्रत्येक दिवसाचा सामना करणे, चर्चा करून एकमताने निर्णय घेणे. मग ती कोणतीही छोटी मोठी गोष्ट असो. कोणी दुसऱ्यां व्यक्तींच्या बोलण्याचा तुमच्या वर किती प्रभाव पडतो? ? हा पण महत्वाचा मुद्दा आहे.
कारण कोणाच्या ही बोलण्याचा स्वतः वर परिणाम करून घेणारी व्यक्ती मनाने कमजोर असते. थोडक्यात कच्च्या कानाचे नसावे.
दोघांनी एकमेकांच्या मान ठेवणे, एकमेकांना सांभाळणे, आपले प्रश्न दोघांमध्येच सोडविणे हे महत्वाचे. म्हणजे पल्लवी तुझ्या आईने सूद्धा तुमच्या मध्ये मध्ये केलेले मला आवडणार नाही. चालणार तर अजिबात नाही.
म्हणून प्रतीक ला समजून घे.
मी माझ्यापरीने चौकशी करणारच आहे.
प्रतीक चांगला असेलही. पण मला माझी जबाबदारी व्यवस्थीत पूर्ण करायची आहे. खात्री करून घ्यावी लागेल.
पल्लवी म्हणाली, बाबा! तो खरच चांगला आहे. इतर मुलांसारखा नाही.
बाबा म्हणाले,
अग!! हो तो चांगला असेलही. चेहरा नेहमी भोळाच असतो ग. चेहऱ्याला बघून काय कळते? मनातलं कळत का? ? माणसाचा खरा स्वभाव विपरीत परिस्थितीत, राग आल्यावर कळतो. या परिस्थितीत प्रत्येक मुलीला
मेरा वाला वैसानहीं हैं । वो बहुत अच्छा हैं ।
असच वाटत.
चौकशी करण गरजेचे आहे ग।
अग!! तुम्ही भेटत रहा. त्याला घरी घेऊन ये. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.
अजून थोडा वेळ घ्या. घाई करू नका. स्वतः बद्दल मोकळेपणाने बोला. फक्त स्वतः चे चांगले गुणच नाही तर वाईट गुणांची, आवडी निवडी बद्दलही चर्चा करा.
हं! अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यावर चर्चा करा. ती म्हणजे तुम्ही दोघे professionals आहात. दोघांच्या नोकरीत ups and downs येतील. कधी तू पूढे असशील तर कधी तुमच्या दोघांपैकी कोणाला तरी दोन पावले मागे पण घ्यावी लागतील. तेंव्हा तुमचा ego मध्ये यायला नको. या सर्व गोष्टी लक्षात घ्या.
जीवनाची सुरुवात करताना दमदार पाऊल पडलं पाहिजे.
त्यात विश्वास, आधार, आपुलकी, सहनशीलता, एकमेकांबद्दल आदर सन्मान असावा. तेंव्हा च आयुष्यात येणाऱ्या समस्यांना तुम्हाला धैर्याने तोंड देणे जमेल
Boy friend आणि girl friend चे casual relationship नसाव. तर त्यात commitment असावं लागतं. Dating करताना आपल्या values, boundaries लक्षात असू द्याव्यात.
हे माझे सद्य परिस्थिती बघता अनुभवाचे बोल आहेत.
पल्लवी तुझ्या मतांचा, मी मान ठेवतो. कोणतेही चूकीचे पाऊल तू उचलणार नाही याची खात्री आहे मला.
सर्व व्यवस्थित होईल.
प्रतीक ला घरी घेऊन ये. आपण त्यांच्या घरी पण जाऊ. भरपूर गप्पा करू. एकमेकांना समजायचा वेळ देऊ आणि घेऊ.
म्हणतात ना,
Alone you can attack, together you have powerful defence.
Alone you can win the match, together you can win the tournament.
आयुष्याची Tournament जिंकायला, नेहमी एकत्र असणं, एकमेकांना समजण आवश्यक आहे.
“विजय, अरे, हे काय? किराणा सामान कुठे आहे? ” दुकानातून रिकाम्या हाताने येणाऱ्या मुलाकडे आश्चर्याने आणि अविश्र्वासाने बघत अनसूयेने विचारले. अनसूयाच्या नवऱ्याचे निधन झाले होते. विजय तिचा एकुलता एक मुलगा. यंदा दहावीत होता. साधा – सरळ स्वभावाचा.
एका बिस्कीट फॅक्टरीत अनसूया पॅकिंग विभागात नोकरी करायची, आणि काटकसरीने संसार करायची. लेक सत्शील होता. आईला मदत करायचा, मनापासून अभ्यास करायचा. आज आईने महिन्याभराच्या सामानाची यादी आणि दोन हजार रुपये देऊन त्याला बाजारात पाठवले होते, आणि तो खाली हाथ परतला होता.
“आई, सोनादीदी भेटली होती, चेहरा रडवेला होता तिचा. तिच्या घरी तिच्या ताईच्या सासरची माणसं येणार आहेत, आणि तिचे पैसे हरवले म्हणत होती. ” विजय.
“तिनं सांगितलं, तू ऐकलंस आणि सगळे पैसे तिला देऊन टाकलेस? ” कपाळावर हात मारत अनसूया म्हणाली. “अरे, तू गेल्या वेळीही तिला असेच पैसे दिले होतेस, ते अजून तिने परत केलेले नाहीत, आणि तू आणखी देऊन बसलास! तू चल माझ्याबरोबर, आणि तुझ्या डोळ्यांनी बघ. “
अनसूया त्याचा हात धरून, त्याला जवळजवळ खेचतच सोना ज्या चाळीत रहात होती, तिथे घेऊन गेली. सोनाच्या घराबाहेर, व्हरांड्यात उभे राहून मायलेक कानोसा घेत होते. सोनाच्या घरातून पक्वानांचा दरवळ येत होता, आणि जोरजोराने हशाही ऐकू येत होता.
“सोना, तू तर अगदी जंगी पार्टीच दिलीस आज, मला तर वाटलं होतं गेल्या वेळसारखे वडापाव खायला घालणार तू. ” सोनाची मैत्रीण.
“काय सांगू अग तुला? तो बावळट विजय भेटला नसता तर वडापावसुद्धा देणं शक्य नव्हतं. पण मी दोन थेंब अश्रू ढाळले त्याच्यासमोर, त्याला खोटंच सांगितलं ताईच्या सासरकडची माणसं येत आहेत म्हणून. ते येडं विरघळलं अन् दोन हज्जार रुपये काढून दिले त्यानं. “
विजय गोरामोरा झाला.
“दुसऱ्यांना मदत करावी, पण नीट विचार करून करावी, बेटा. ” अनसूया हिरमुसल्या विजयला समजावत होती.
काही दिवसांनंतरची गोष्ट. पुढच्या आठवड्यापासून बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार होत्या, पण विजय काहीसा चिंतेत दिसत होता.
“नाही ग आई, अभ्यास ठीक चालला आहे माझा. थोडी गणिताची भीती वाटते. तो रमेश म्हणाला की माझा भाऊ भन्नाट गणित शिकवतो. मी त्या भावाला भेटलो, तो म्हणाला – हजार रुपये दे, मी तुला स्पेशल शिकवतो. मी चार वेळा गेलोसुद्धा, पण काही ना काही कारण काढून त्याने मला काहीच शिकवलं नाही. आज गेलो, तर म्हणाला, तू बिनधास्त परीक्षा दे, मी तुझे मार्क वाढवतो. मला काहीच उमगत नाहीये, म्हणून मी गोंधळलो आहे, इतकंच. “
अनसूयेने पुन्हा एकदा कपाळाला हात लावला. “अरे, बोर्डाच्या परीक्षेत असे परस्पर कसे मार्क वाढवेल तो? तुझा पेपर कुठल्या गठ्ठ्यातून कोणाकडे तपासायला जाणार हे त्याला थोडीच कळणार आहे? त्याने फसवलं बाळा तुला.
तू पैसे द्यायच्या आधी मला विचारायचे तरी होतेस. आणि एवढे पैसे आले कुठून तुझ्याकडे? “
“आई, माझ्या पिगी बँकेतून घेतले होते. मस्त मार्क्स मिळवून तुला surprise द्यायचं होतं, म्हणून नव्हतं सांगितलं, ” विजयचा आवाज आणि चेहरा, दोन्ही पडला होता.
विजय मनाने खूप चांगला होता, पण त्याच्या या भोळसरपणाने या जगात त्याचा कसा निभाव लागणार हे त्याच्या आईला लागलेली मोठ्ठी काळजी होती.
यथावकाश विजयची बोर्डाची परीक्षा पार पडली. पेपर चांगले गेले होते. सध्या विजय आईबरोबर तिच्या कंपनीत प्रशिक्षणार्थी (apprentice) म्हणून काम करत होता. वेळ चांगला जाईल, चार पैसे गाठीशी लावता येतील हे तर हेतू होतेच, पण अनसूयेला त्या निमित्ताने विजयची दुनियेशी ओळख करून द्यायची होती, त्याला शहाणपणाच्या चार गोष्टी समजावून द्यायच्या होत्या.
आज तो कंपनीत कामाला येऊ लागला त्याला दोन महिने होऊन गेले होते. अचानकच आई विजयला म्हणाली, “विजय, बाळा, अरे त्या नलिनीला पैश्यांची गरज आहे रे. महिनाभरासाठी दहा हजार रुपये मागते आहे, काय करू रे? “
“अग आई, कालच नलूमावशी पेढे वाटत होती ना तिच्या मुलीचा पहिला पगार झाला म्हणून. तू जरा नीट चौकशी करतेस का? म्हणजे, खरंच काही अडचण असेल तर देच तू पैसे… “
अनसूयेच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं.
“तुझा रिझल्ट लागला की गणितासाठी लगेच तू त्या रमेशच्या भावाची शिकवणी लाव, म्हणजे ऐन वेळी धावाधाव नको, ” अनसूया विजयला सुचवत होती.
“कप्पाळ! अग, त्या रमेशला स्वतःलाच यंदा बोर्डाच्या परीक्षेत गणिताच्या पेपरला कॉपी करताना पकडलं. त्याचा भाऊ गणित चांगलं शिकवत असता, तर रमेशवर ही पाळी का आली असती? उलट मीच त्याच्याकडून माझे हजार रुपये परत घेऊन आलोय. ”
हळूहळू अनसूया विजयबाबतीत निर्धास्त होऊ लागली होती. एवढ्यात शेजारच्या इमारतीतील सोनादीदी धावतच आली.
“काकू, मला जरा हजार रुपये उसने देता का? ताईच्या सासूबाई इथे घरी आल्या होत्या, त्यांना चक्कर आली आहे, डॉक्टरांनी औषधं आणायला सांगितली आहेत. ”
“हे बघ सोना, तू माझ्या विजयला दोनदा फसवलंस, पण मी नाही हो बधायची. तू इथून जा बघू कशी. ” अनसूयेने करडेपणाने सांगितले.
पाहिलं तर विजय मात्र शेजारी नव्हता. दहा पंधरा मिनिटांनी स्वारी घामाघूम होऊन आली. आईच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे बघून त्याने सांगायला सुरुवात केली.
“मला या वेळी दीदी खरंच घाबरलेली वाटली, म्हणून मग खात्री करून घ्यायला मी तिच्या घरी गेलो. तिच्या ताईच्या सासूबाई खरंच आल्या आहेत आणि त्यांना खरंच बरं नाहीये. मग मी डॉक्टरांची औषधाची चिठ्ठी घेतली.
केमिस्टकडे औषधं महाग पडतात, म्हणून मग मी पुढच्या चौकातील जेनेरिक केमिस्टकडे गेलो. तिथे तीच औषधं मला स्वस्त मिळाली. ती घेऊन मी दीदीच्या घरी गेलो, आजींना औषधं कशी घ्यायची ते समजावून सांगितलं आणि घरी परत आलो.
मी ते रमेशच्या दादाकडून माझे पैसे परत घेतले होते ना, आई, त्यातले वापरले मी पैसे. आणि आता दीदी परत आली ना, की मी तिला लांडगा आला रे आला गोष्ट सांगणार आहे, बरं का… ” विजय अव्याहतपणे बोलत होता.
आणि या निरागस बालपणाला नीरक्षीरविवेक बुद्धी आलेली पाहून माऊली सुखावत होती.
माझ्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवशी एक पाकीट हातात ठेवत बाबा म्हणाले “निवांत झाल्यावर हे बघ. तुझ्यासाठी स्पेशल गिफ्टयं. ” दिवसभरातल्या गडबडीत पाकीटाविषयी विसरून गेले. रात्री झोपायच्या तयारीत असताना एकदम आठवलं. उत्सुकतेपोटी घाईघाईत पाकीट फोडलं तर त्यात एक पोस्टकार्ड होतं. लग्नाच्या आधी कामानिमित्त दुसऱ्या शहरात राहत होते तेव्हा आईनं पाठवलेलं पत्र होतं.
“प्रिय प्रिय सोनी..
अनेक अनेक आशीर्वाद!!
उद्या तुझा पंचविसावा वाढदिवस त्यानिमित्तानं आभाळभरून शुभेच्छा आणि थोडं मनातलं सांगावसं वाटलं म्हणून हे पत्र. तू माझ्यासाठी काय आहेस हे शब्दात सांगता येणार नाही. तुझ्यामुळे जगणं सुंदर झालं. तू आलीस अन माझं अवघं विश्व व्यापून टाकलस.
तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण हा सर्वोच्च आनंदाचा होता आणि कायमच राहील.
बघता बघता काळ चटकन सरला. तू मोठी झालीस. खूप शिकलीस. नोकरी मिळवून कमावतीसुद्धा झालीस. खूप छान वाटतयं आणि आता दोन महिन्यांनी तुझं लग्न…
बापरे!!
अजूनही खरं वाटत नाही. कालपरवा पर्यंत धडपडत पाउलं टाकणारी माझी छोटी बाहुली आता चक्क बोहल्यावर चढणार. तुला पसंतीचा, हवा तसा जोडीदार मिळाला. याचं मोठं समाधान आहे.
आता या क्षणी डोळ्यात आनंदाश्रू आहेत त्याचवेळस तू दुरावणार म्हणून हुरहूरही वाटतेयं. मुलीच्या आईला या अवघड प्रसंगाला सामोरं जावचं लागतं. असो…
तू हुशार आहेस, हिकमती, हिमती आहेस पण खूप घाई करतेस आणि आता राग कंट्रोल करायला शिक. आई ऐकून घेते म्हणून सासू ऐकलच असं नाही. नवरोबा तर नाहीच नाही. तेव्हा एकदम एक्साईट किवा इमोशनल होणं आता कमी कर. बाकी तू घरी आल्यावर बोलूच.
पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा!!
आई..
—
पंचवीस वर्षांपूर्वीचं आईचं पत्र. पुन्हा पुन्हा वाचलं. क्षणभर वाटलं की आई माझ्यासमोर बसून बोलतेय. शब्दा शब्दात असलेला आपलेपणा, काळजी थेट काळजाला भिडलं. खूप भरून आलं. आईला कडकडून मिठी मारावीशी वाटली पण शक्य नव्हत. तिला जाऊन पंधरा वर्ष झाली. आईची खूप आठवण आली. ती आत्ता सोबत असायला हवी असं खूप आतून वाटलं आहे. हातातल्या पत्राकडं एकटक बघताना लक्षात आल की माझं अक्षरही बरचसं आईसारखचं आहे. गंमत वाटली. त्या पत्रानं आठवणींची एकेक फोल्डर पटापट उघडली. मोबाइलमधला आईच्या फोटोकडे पाहताना डोळे कधी वहायला लागले कळलंच नाही.
—
एका साधंसं पत्र पण त्यानं दिवस माझा अविस्मरणीय केला. आठवणीतली आई पत्ररूपानं माझ्यासोबत होती हे फार मोलाचं होतं. पूर्वी मोबाइल, ईमेल, सोशल मीडिया वगैरे नव्हतं हे एका दृष्टीने चांगलंच होतं. पत्राद्वारेच विचारल्या जाणाऱ्या ख्याली खुशालीचा आपलेपणा टाइप केलेलं वाचताना जाणवत नाही. एवढं मात्र खरं…
☆ अनुभव… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆
त्या पावसाळी रात्री कोट्याधीश उद्योगपतीची एकुलती एक मुलगी ऑपरेशन थिएटरमध्ये जीवन-मरणाच्या सीमारेषेवर झुंज देत होती. बाहेर प्रसार माध्यमांच्या गाड्यांची रांग लागली होती, पण आत एका वृद्ध सुरक्षा रक्षकाचे शब्द ऐकायला कुणाकडे वेळ नव्हता…
पुण्यातील नामांकित “आरोग्यम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल”च्या सातव्या मजल्यावर एकच गोंधळ उडाला होता. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभे होते देशातील प्रसिद्ध उद्योगपती राघव देशमुख. कोट्यावधींचे साम्राज्य उभे करणारा तो माणूस त्या रात्री पूर्णपणे हतबल दिसत होता. आत त्याची २८ वर्षांची मुलगी अन्विता आयुष्यातील सर्वात मोठी लढाई लढत होती.
अन्विता आठ महिन्यांची गर्भवती होती. अचानक तिला तीव्र वेदना सुरू झाल्या आणि तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले – “बाळाची नाळ गळ्याभोवती अडकली आहे. आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका आहे. “
देशातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावण्यात आले. एक नाही… दोन नाही… पूर्ण नऊ तज्ज्ञ डॉक्टर! पण प्रत्येक नवीन रिपोर्ट आधीपेक्षा अधिक चिंताजनक होता.
“ब्लड प्रेशर कमी होत आहे. “
“बाळाला ऑक्सिजन कमी मिळतोय. “
“आता जास्त वेळ थांबता येणार नाही. “
संपूर्ण टीम तणावाखाली होती. त्याच वेळी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये ६८ वर्षांचे सुरक्षा रक्षक गणपत काका बसले होते.
पांढरी दाढी, वाकलेली पाठ आणि जुना चष्मा… गेली १५ वर्षे ते रात्रीची ड्युटी करत होते. सगळे त्यांना प्रेमाने “गणपत काका” म्हणत.
पण फार थोड्या लोकांना माहिती होतं की सुरक्षा रक्षक होण्यापूर्वी ते कोकणातील एका गावात प्रसिद्ध वैद्य होते. शरीरातील नसांचे ज्ञान, दाबबिंदू आणि पारंपरिक उपचारांची विद्या त्यांनी आपल्या वडिलांकडून शिकली होती. पण आधुनिक जगात त्यांच्याकडे ना पदवी होती, ना प्रमाणपत्र… म्हणून लोक त्यांना फक्त एक साधा सुरक्षा रक्षक समजत होते.
अचानक एका नर्सचे शब्द त्यांच्या कानावर पडले- “बाळाची हृदयाची गती सतत कमी होत आहे! “
गणपत काका सावध झाले.
काही वेळाने दुसरी नर्स म्हणाली- “नाळ इतकी घट्ट अडकली आहे की बाळ खाली सरकत नाही. “
गणपत काकांच्या डोळ्यांसमोर ३५ वर्षांपूर्वीची एक घटना चमकून गेली. ते हळूहळू ऑपरेशन थिएटरकडे गेले. दाराजवळ उभ्या असलेल्या डॉक्टरांना त्यांनी नम्रपणे सांगितले – “मुलीला डाव्या कुशीवर ठेवू नका. “
डॉक्टर चकित झाले. “काय म्हणताय तुम्ही? “
गणपत काका शांतपणे म्हणाले – “ज्या बाजूने नाळ दाबली जातेय, त्या बाजूचा भार वाढतोय. तिला दुसऱ्या बाजूला वळवा. “
डॉक्टरांचा चेहरा लाल झाला. “तुम्ही सुरक्षा रक्षक आहात की सर्जन? “
आजूबाजूचे काही लोक हसू लागले. गणपत काका काहीच बोलले नाहीत. ते शांतपणे मागे फिरले. पण त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती.
तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचे दार उघडले. एक डॉक्टर धावत बाहेर आला. “आता तातडीने निर्णय घ्यावा लागेल. आई किंवा बाळ… दोघांपैकी एकालाच वाचवता येईल. “
हे ऐकताच राघव देशमुख यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांची पत्नी सुमन रडू लागली. पहिल्यांदाच त्या श्रीमंत कुटुंबाला जाणवलं की काही लढाया पैशाने जिंकता येत नाहीत.
तेवढ्यात मागून एक शांत आवाज आला- “दोघांनाही वाचवता येईल. “
सगळ्यांनी मागे वळून पाहिले. ते गणपत काका होते.
राघव चिडून म्हणाले, “तुम्ही इथे काय करताय? “
गणपत काका शांतपणे म्हणाले, “बाळाला रस्ता नको आहे साहेब… त्याला श्वास हवा आहे. “
संपूर्ण कॉरिडॉर शांत झाला.
गणपत काका पुढे म्हणाले, “माझं चुकलं तर मला लगेच बाहेर काढा. पण एकदा माझं ऐका. “
डॉक्टरांनी अनिच्छेने त्यांचा सल्ला मान्य केला. अन्विताची स्थिती बदलण्यात आली. सगळ्यांचे डोळे मॉनिटरवर खिळले होते.
एक सेकंद…
दोन सेकंद…
पाच सेकंद…
आणि अचानक बाळाची हृदयगती स्थिर होऊ लागली! एक नर्स आनंदाने ओरडली – “सर! हार्ट रेट वाढतोय! “
डॉक्टर अवाक् झाले. तासन्तास न समजलेली गोष्ट एका वृद्ध सुरक्षा रक्षकाने ओळखली होती. त्यानंतर ऑपरेशन सुरू झाले. दीड तासाच्या तणावानंतर ऑपरेशन थिएटरचे दार उघडले.
नर्सच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.
“अभिनंदन! आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. “
राघव देशमुख यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. काही वेळानंतर त्यांनी पहिला प्रश्न विचारला – “गणपत काका कुठे आहेत? “
पण गणपत काका शांतपणे आपल्या जागेवर परत गेले होते. जणू काही घडलंच नव्हतं.
दुसऱ्या दिवशी अन्विताला सर्व घटना सांगण्यात आली. तिने ताबडतोब म्हटले, “मला त्यांना भेटायचं आहे. “
गणपत काकांना बोलावण्यात आले. ते आत येताच अन्विताने आपल्या नवजात बाळाला त्यांच्या हातात दिले. गणपत काकांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांनी थरथरत्या हाताने बाळाच्या डोक्यावरून हात फिरवला.
अन्विता म्हणाली, “आज माझं बाळ श्वास घेतंय, ते तुमच्यामुळे. “
गणपत काका हसले. “नाही ग बाळा, देवाने वाचवलं. मी तर फक्त निमित्त ठरलो. “
तेवढ्यात राघव देशमुख आत आले. काही क्षण ते गणपत काकांकडे पाहत राहिले. आणि अचानक… देशातील त्या मोठ्या उद्योगपतीने सर्वांसमोर वाकून गणपत काकांचे पाय स्पर्श केले.
संपूर्ण खोली स्तब्ध झाली. “मला माफ करा काका. काल मी तुम्हाला फक्त सुरक्षा रक्षक समजलो. “
गणपत काकांनी त्यांना उठवत म्हटलं, “बाळा, माणसाचं काम लहान-मोठं असू शकतं… पण त्याचा अनुभव कधीच लहान नसतो. “
हे शब्द प्रत्येकाच्या मनात घर करून गेले.
काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये मोठा समारंभ आयोजित करण्यात आला. राघव देशमुख यांनी घोषणा केली की ग्रामीण वैद्यकीय ज्ञान आणि पारंपरिक अनुभवांवर संशोधन करणारे नवीन केंद्र सुरू करण्यात येईल.
त्या केंद्राला नाव देण्यात आले- “गणपत प्रसाद मानव सेवा केंद्र” टाळ्यांच्या कडकडाटात गणपत काकांना मंचावर बोलावण्यात आले.
त्यांनी माईक हातात घेतला आणि फक्त एवढंच म्हणाले—
“आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली आहे. पदवी ज्ञानाचा पुरावा असू शकते, पण अनुभव हे ज्ञानाचं मूळ असतं. ज्या दिवशी आपण गरीब, वृद्ध किंवा साध्या दिसणाऱ्या माणसाला कमी लेखणं सोडू, त्या दिवशी समाज खऱ्या अर्थाने मोठा होईल. “
संपूर्ण सभागृह उभं राहून टाळ्या वाजवत होतं. समोर बसलेलं ते छोटंसं बाळ हसत होतं. त्याला माहीत नव्हतं की त्याच्या जन्माने फक्त एका कुटुंबाचं नव्हे, तर अनेकांच्या विचारांचाही पुनर्जन्म घडवला होता…
संदेश : कधीही एखाद्या व्यक्तीची किंमत त्याच्या कपड्यांवर, पदावर किंवा पैशांवरून ठरवू नका. अनेकदा सर्वात मोठं ज्ञान आणि अनुभव हे सर्वात साध्या दिसणाऱ्या माणसांकडे असतात.
– समाप्त –
लेखक : अनामिक
प्रस्तुती : मेघ:श्याम सोनवणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “सरिता वहिनी आणि पेकाडे भाऊजी…” भाग – २ ☆ सुश्री शीला पतकी☆
नमस्कार वहिनी नमस्कार… सुहास भाऊजी आत येत म्हणाले. सरिता वहिनी म्हणाल्या, ” या पेकाडे भाऊजी अहो पाहिलंत का कोण आलयं… तुमचे परममित्र सुहास पेकाडे आले आहेत”… नवरा बाहेर आला आणि म्हणाला, ” ये ये सुहास अरे किती दिवसांनी? … आणि लंगडायला काय झालं तुला? . “” अरे काही नाही परवा विमानतळावर गेलो होतो मुख्यमंत्री येणार होते ना… वृत्त संकलनाला मला पाठवले होते. गर्दीमध्ये जरा चेंगराचेंगरीत पाय पडला आणि… ” इतक्यात सरिता वहिनी म्हणाल्या, ” आणि तुमचे पेकाड मोडले…! भाऊजी कशाला करता ती पत्रकारिता… एवढी मोठी शेती… गावाकडे जाऊन करा ना… “” सरिता आता तो विषय नको”, नवऱ्याने तिला दटावले अर्थात प्रेमानेच आणि म्हणाला, ” फक्कड दोन कप चहा टाक..! तुझ्या हातचा चहा सुहासला आवडतो… “. ती म्हणाली, ” हो हो करते “.. सुहास म्हणाला, ” कराल हो वहिनी बसा… बाकी कसे आहात तुम्ही? … आणि प्रगती आणि विकास काय म्हणतोय? “… ” भाऊजी मी छान आहे! “मी छान नसायला काय झालं सरकारची लाडकी बहीण आहे ना! … मी फुकट खाऊ… प्रगती मात्र खुंटली आहे आणि विकास उडाण टप्पू निघाला त्यामुळे तो भकास झालाय”… “वहिनी असं कोड्यात बोलू नका ना…! ” अगबाई! कोड का काय हे भाऊजी मी सरळ सरळ सांगते… मला सांगा प्रगती खुंटली आहे का नाही? पेपर मध्ये खोटे आकडे देऊन सरकार, न परवडणारी आश्वासन देऊन अमिषं दाखवून सत्ता मिळवतात आणि बळकट करतात त्यानंतर देशाची किती छान प्रगती झालेली हे तुम्ही लिहिता आणि विकासाचे खोटे खोटे आकडे देता… हे बांधलं ते बांधलं… ते उभं केलं… अहो… सगळी तरुणाई बेकार फिरते… गुटक्याच्या थुंक्याने रस्ते रंगलेत… त्या भ्रष्ट नेत्यांच्या मागे बोंबलत फिरते तरुणाई… देशाचा विकास म्हणजे बिल्डिंगा नाहीयेत… आपल्या तरुण मुलांचा विकास झाला पाहिजे… सोलापुरात एक उद्योग धंदा नाही एक उद्योजक हे इथे यायला तयार नाही… का तर दहशतवाद…! इथली माणसं गुंड आहेत… मुंबई धडा धडा गोळ्या घालतात ते चालते काय? इथल्या माणसाना पोटाला खायला.. द्या हाताला काम द्या… त्यांच्या लेकरा बाळांना चांगले शिक्षण द्या… हो आणि यातलं फुकट काही देऊ नका. या सगळ्या फुकट्यांमुळे तरुण मुलांचं फावले काम नाही धंदा नाही मोकाट फिरतात गाव सोडून काम सुरू झाले गेलेत पोरं आणि फिरत आहेत पुढाऱ्यांच्या मागे म्हाताऱ्यांचा गाव झाले आमचं… हा आता विकासाच म्हणत असाल तर झालाय ना खूप झालाय… नगरसेवकांचा झालाय.. सरपंचाचा झालाय.. त्यांच्या पोरा बाळांचा झालाय… आमची गुलामगिरी ची मानसिकता जोपासण्यात ही सगळी मंडळी हुशार झालेत. पिढ्यान पिढ्या तीच माणसं खुर्च्यांवर बसली पाहिजेत त्यांच्याच घरातले सगळे सत्तेत हवेत अण्णासाहेब दादासाहेब मग भैय्यासाहेब ताईसाहेब मग बाळासाहेब आम्हाला आमच्या पोराबाळाना… कोणाला काही स्वप्न नाही.. कोणाला इच्छा नाही… हुशार हुशार पोरं गुजरेगिरी करण्यात आपला आयुष्य घालवतायेत.. आणि त्या पुढार्यांची बावळट कार्टी कुठलाही अभ्यास नाही… बापाच्या, आज्याच्या, आईच्या नावावर सत्तेवर बसतात आणि लगेच कोट्याधीश…? आणि तुम्हा पत्रकारांना एकालाही विचारवसं वाटत नाही का हो.. की बाबा रे तू नगरसेवक होऊन एक वर्ष झालं तू आमदार होऊन एक वर्ष झालं… तुझ्या नावावर एवढा पैसा कुठून आला? ते धाडस काय फक्त नाना पाटेकरांनी करायचं का? तुम्ही काय करणार? … तुमच्या वृत्तपत्रातनं मारा की बोंबा जरा… पण ते नाही, सगळी भलावण करायची… तुम्ही सगळे कुणाच्यातरी दावणीला बांधलेले… भाऊजी तुम्हाला पत्रकारांना दिसत नाही का हे सगळं? महात्मा गांधी म्हणाले होते. “खेड्याकडे चला” तर बरोबर उलटे झाले खेडी ओस पडायला लागलीत सगळे पळतायेत… मुंबई पुणे…! शहरालगत असलेल्या शेतकऱ्यांनी तरी आपल्या जमिनी करून विकून टाकल्या मग आलेल्या पैशातून तरी काही चांगलं केलंय? नाही.. व्यसनात आणि चैनीत घालून कफ्फलक झालेत… कसला बोडक्याचा विकास आणि काय? ” अहो वहिनी, भावजी म्हणाले” मी आपल्या प्रगती आणि
विकास बद्दल बोलतोय”… हो हो मला कळतं ते… मीही आपल्याच प्रगती आणि विकास बद्दल सांगितले तुम्हाला हे लक्षात घ्या! … ” सरिता जाऊ दे ना ग विचारा खूप दिवसांनी आलाय त्याला एक कप चहा दे ना करून”… “समीर म्हणाला. ” हो देणार देणार अगदी छान कडक चहा देणार आणि झणझणीत चिवडा सुद्धा…
बघू काय तिखटपणा येतोय का आज लेखणीला…! ” असं म्हणत सरिता वहिनी आत गेल्या समीर म्हणाला, “जाऊ दे लक्ष देऊ नको तिच्याकडे” “नाही रे समीर, लक्ष देण्यासारखंच बोलल्या त्या चूक काय आहे त्यांचं? आम्हालाही असा विचार करण्याची मुभा असती आणि लिहिता आल असत तर फार छान झालं असतं. “चल छोड यार तुझं कसं चाललंय… अशा गप्पा चालू असताना सरिता वहिनी चहा आणि चिवडा घेऊन आल्या चहा चिवड्या वर ताव मारून पेकाडे भाऊजी सरिता वहिनींचा निरोप घेऊन गेले. जाताना म्हणाले, ” वहिनी उद्या येतोय परत नवीन विषय घेऊन… तुमचे आशीर्वाद घ्यायला.. ” हो हो या या भाऊजी नक्की या मी बसले आहेच आशीर्वाद द्यायला” सगळेच हसत हसत निरोप घेऊन कामाला लागले.
प्रवाश्यांचा प्रवास सुखकर, आरामशीर करणाऱ्या सगळ्या अडचणींना तोंड देत हंसतमुखाने, जबाबदारीने सामोरं जाणाऱ्या राघवची, वाहनचालकाची ही कथा आणि व्यथा आहे.
जागरणामुळे तांबारलेले डोळे, कमालीचा थकवा आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या शरीराला सांभाळत राघव घरात शिरला सीता काळजीने पुढे येत म्हणाली, “अहो काय झालं? तब्येत बरी नाही का?
“हे बघ सीता आधी अंथरूण घाल मला शांतपणे झोपू दे आणि हो! आईने शिवलेल्या गोधडीची मला आता खूप आवश्यकता आहे “स्वारी दमली आहे हे समजून तिने सासूबाईंची गोधडी त्याच्या अंगावर घातली.
आणि मग आईच्या मायेच्या, गोधडीच्या उबेत तो शांत शांत झोपला. डे ड्युटी, नाईटड्युटी करून सतत वाहन चालवताना राघवच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं, आई बाबांना गावाकडे औषध पाण्याला दरमहा पैसे पाठवायचेत. त्यांना सुखात ठेवायचं आहे. मुलांना शिकवायचय आणि काटकसरीने संसार करणाऱ्या बायकोसाठी सोन्याचं साधसं मंगळसूत्र आणायचेय. तिच्या डौलदार मानेवर एखादं गंठण किती शोभून दिसेल नाही का! दर वेळी काळे मणी ओऊन ती अगदी साध्या वाट्यांचं मंगळसूत्र वापरते.
विचार करताकरता तो झोपेच्या अधीन झाला पुरेशी झोप झाल्यावर उठला. नित्यनेमानी डायरी लिहिण्यासाठी पुढे सरसावला. मनातलं शब्दात उतरवताना जणू काही महामंडळच त्याच्या पुढे उभं आहे आणि तो महामंडळाचं लक्ष वेधून घेत होता, त्यांना विनवणी करीत होता असंच वाटलं. तो मनात म्हणत होता साहेबजरा आमच्याकडेही बघा आमची कथा आणि व्यथाही जाणून घ्या ना सरकार.
काय सांगू तुम्हाला कालच्या काय, आधीच्या वस्तीच्या, मुक्कामाच्या ठिकाणाच्या रात्री अतिशय क्लेशदायी ठरल्यात.
रहाण्याची असुविधा. पांघरुणाचा अभाव आणि डासांची वाढती, संख्या, सोबतीला जीवघेणी थंडी. आम्ही एस. टी. वाहक आणि चालक, प्रवाशांना जबाबदारीने त्यांच्या घरी पोहोचवतो पण शेवटचा स्टॉप, रात्र झाल्याने आमचं ‘मुक्काम पोस्ट’ते गावचंअसतं.
मान्य आहे आमचा विचार करून आम्हा कर्मचाऱ्यांना, महामंडळाकडून आधी पांघरायला चादर मिळायची. पण 2019 पासून तीही रद्द करण्यात आली. मग सांगा बरं कडाक्याच्या थंडीत घरून नेलेली पांघरूणे पण अपुरी पडल्यावर आम्ही कसं करावं? पलंग नाही गैरसोईच्या खोलीत डासांचा मारा चुकवत आम्ही रात्र संपण्याची वाट बघत बसतो.
पहाटे जरा कुठे डुलकी लागली तर वेळेवर गाडी सोडायच्या ड्युटी मुळे खडबडून जागे होऊन एस. टी. बसकडे धाव घेतो कारण स्टॉप वर प्रवासी आमची वाट बघत बसलेले असतात.
आबाल वृद्धांना, आईच्या कुशीत झोपलेल्या बाळांना दमल्या भागल्या बायाबापड्यांना, वेळेवर घरी पोहोचवायचं असतं मग त्यांचे हाल होऊ नयेतं, त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून आळस झटकून ड्युटी साठी आम्हाला चंद्रबळ आणून होशियार व्हावचं लागतं पण खरं सांगू! देह थकला, @ना की मनही अस्थिर होतं पण वाहन चालवताना जागरूक राहून वाटेत येणारे अनपेक्षित अडथळे टाळून, प्रवाशांना सुखरूप मुक्कामी सोडायचं असतं, त्यामुळे आपली ड्युटी जागरूकतेची जबाबदारीची आहे याची जाणीव ठेवून आम्ही थकलो असलो तरी सीटवर बसून स्टेअरिंग हातात घेतो. आणि ड्युटी साठी सज्ज होतो.
राज्यात थंडीचा कडाका वाढलाय विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्र गोठलाय आमची हालत काय सांगू राव! गावांमधून काही ठिकाणी झोपायला जागा नसते कडाक्याच्या थंडीमुळे अंगण ओसरीचा पण आधार घेता येत नाही. मग काय झोपतो गाडीतच. पण तिथेही सैरावैरा इकडून तिकडे धावणारे डास आमच्यावर हल्ला करतात,
झोपण्याची सोय नाही, शौचालय नाही उघड्यावर नैसर्गिक विधी पार पाडावे लागतात.
पण आमचे हाल बघून एखादी आजी, एखादी वहिनी, ताईमाई आम्हाला प्रेमाने आलं, दारचा गवती चहा टाकून तुटक्या कानाच्या कपातून घोटभर गुळाचा चहा देते. तेव्हा मात्र आम्ही कृतकृत्य होतो.
आणि तो अतिशय मायेने अगत्याने दिलेला चहा आमच्यासाठी अमृत ठरतो. एखादी मावशी दारच्या वालाच्या, भुईमुगाच्या शेंगा, पेरू, सीताफळं भरभरून देते. तेंव्हा मनात येतं गरिबीतही यांच्यात एवढी दानशूरता येते कुठून?
महामंडळानेही ह्यांचा आदर्श उचलावा. सरकारने सोयी केल्यात ना मग आम्हालाही गणवेशाचे कापड, शिलाई, उलन ब्लॅंकेट, गरम जर्सी, पावसाळ्यासाठी रेनकोट छत्री द्या ना राव!
मनातले भाव शब्दात उतरवून राघवने डायरी बंद केली आणि जुना झालेला गणवेश घालून तो ड्युटीसाठी सज्ज झाला.
एसटी स्टँड कडे पळत जाणाऱ्या त्याला सीता सूचना देत होती, “अहो डबा वेळेवर खा. पाण्याच्या दोन बाटल्या दिल्यात बाहेरचं पाणी पिऊ नका. थकल्यावर थर्मास मधला चहा घ्यायला विसरू नका हं ” खळखळून हसत राघव म्हणाला अग हो हो! किती सुचना! तिकडे आई-बाबांचे वेगळच, आई म्हणत होती, “सुनबाई देवापुढे दिवा लाव सांजच्याला पोरगं सुखरूप घरी येऊ दे. ” बाबा ओरडून सांगत होते, “सांभाळून गाडी चालव रे बाबा प्रवासी सुखाने त्यांच्या घरी पोहोचू देत. ” असं हे आई-बाबांच्या मायेचं बायकोचा प्रेमाचं गाठोडं सांभाळत राघव त्याच्या रथावर एसटी बसवर आरुढ झाला.
आता तो कुणाचा लेक नव्हता बायकोचा नवरा नव्हता तर फक्त भगवद्गीतेचा अर्जुनाचा सारथी झालेला श्रीकृष्ण होता अशा ह्या आजच्या काळातील श्रीकृष्णाला, वाहन चालकाला माझा सादर प्रणाम
☆ तिकीट प्रवासाचं.. एका आशेचं… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
रेल्वे स्टेशनवर दररोज एक वृद्ध व्यक्ती एकच तिकीट खरेदी करायची… पण कधीच ट्रेनमध्ये बसायची नाही. २५ वर्षांनंतर त्याचे कारण समजले.
सकाळचे ठीक ७ वाजून १० मिनिटे झाले होते. स्टेशनवर चहावाल्यांचा आवाज, हमालांची धावपळ, शिट्टीचा आवाज आणि याच गर्दीत पांढरा कुर्ता-पायजमा घातलेला एक वृद्ध माणूस तिकीट खिडकीवर सर्वात आधी उभा असायचा. “एक सिंगल तिकीट… शिवपूरपर्यंत. “
क्लर्क तिकीट द्यायचा, वृद्ध माणूस खिशातून पैसे काढायचा, तिकीट अशा प्रकारे हातात धरायचा जणू ती कोणती मौल्यवान ठेव आहे…
त्यानंतर प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या सर्वात शेवटच्या बाकावर जाऊन बसायचा. ट्रेन यायची… दरवाजे उघडायचे… लोक चढायचे- उतरायचे… पण तो कधीच ट्रेनमध्ये बसायचा नाही. ट्रेन निघून जायची… तो तिकीट हळूच आपल्या खिशात ठेवायचा आणि शांतपणे घरी परतायचा.
हा घटनाक्रम एक-दोन दिवस नाही… पूर्ण पंचवीस वर्षे सुरू होता. स्टेशनच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याला पाहिले होते. लोक त्याची थट्टा उडवायचे. ‘बाबांचे डोके फिरले आहे असे वाटते, ‘ कोणीतरी म्हणायचे, ‘एवढ्या पैशांत महिनाभराचे रेशन आले असते. ‘ पण त्याने कधीच कोणाला उत्तर दिले नाही.
मग एक दिवस स्टेशन मास्टर बदलून नवीन अधिकारी आला. त्याचे नाव होते निखिल. पहिल्याच आठवड्यात त्याने त्या वृद्धाला पाहिले. दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहिले. तिसऱ्या दिवशीही तेच. आता त्याच्याने राहवले नाही. ट्रेन निघून गेल्यावर तो त्या वृद्धाजवळ जाऊन बसला. “बाबा… जर वाईट वाटणार नसेल, तर एक गोष्ट विचारू? “
वृद्ध हसले. “विचार बेटा. “
“तुम्ही रोज तिकीट खरेदी करता… पण कधीच जात नाही. का? “
वृद्ध काही क्षण शांत राहिले. त्यांचे डोळे प्लॅटफॉर्मच्या रुळांवर स्थिरावले. मग त्यांनी खिशातून जुन्या तिकिटांचे एक बंडल काढले. इतके जाड की हाताची मूठ भरून जावी. “यात प्रत्येक दिवसाचा हिशोब आहे… “
निखिल थक्क झाला. “पण कसला हिशोब? “
वृद्धांनी दीर्घ श्वास घेतला. “आजपासून पंचवीस वर्षांपूर्वी… याच प्लॅटफॉर्मवर माझा दहा वर्षांचा मुलगा रोहन माझ्यापासून दुरावला. त्या दिवशी स्टेशनवर खूप गर्दी होती. त्याने म्हटले होते- ‘बाबा, तुम्ही तिकीट घेऊन या… मी इथे बाकावर बसलो आहे. ‘
मी पाच मिनिटांत परतलो… बाक रिकामे होते. पूर्ण स्टेशनवर शोधले. पोलीस आले. अनाउन्समेंट झाली. वृत्तपत्रांत फोटो छापले गेले. पण माझा मुलगा… कुठेच सापडला नाही. “
वृद्धांचा आवाज थरथरू लागला. “त्या दिवशी जाताना त्याने मला एक गोष्ट सांगितली होती- ‘बाबा… जर मी कुठे हरवलो… तर तुम्ही मला घ्यायला नक्की या. ‘
निखिलचे डोळे पाणावले.
वृद्धांनी तिकीट छातीशी धरले. “बस बेटा… त्याच दिवशी मी स्वतःला वचन दिले की, मी रोज तिकीट खरेदी करेन… जेणेकरून जर माझा रोहन कधी परत आला… तर त्याला वाटावे की त्याचे बाबा आजही त्याला घ्यायला आले आहेत. मला असे वाटते की एक दिवस तो परत येईल… आणि मी तेव्हा तिथे नसेल असे होऊ नये. “
पूर्ण प्लॅटफॉर्म जणू काही काळासाठी थांबला होता. दुसऱ्या दिवशी निखिलने स्टेशनचे जुने रेकॉर्ड्स तपासले. धुळीने भरलेल्या फाईल्स… पिवळे पडलेले कागद… एक बेपत्ता झाल्याची तक्रार. एक अंधूक फोटो. आणि खाली लिहिले होते- ‘रोहन… वय १० वर्षे. ‘
निखिलने तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्याला स्वतःलाही अपेक्षा नव्हती की काही होईल. पण तीन दिवसांनंतर… स्टेशनच्या कंट्रोल रूममध्ये एक फोन आला. “काय… त्या मुलाचे वडील अजून जिवंत आहेत? “
फोन करणारा माणूस स्वतः पंचावन्न वर्षांचा होता. त्याने सांगितले, “फोटोतील मुलगा माझ्याकडे आहे. ”
मग रोहने फोन घेऊन थरथरत्या आवाजात म्हटले – “माझ्या हातावर लहानपणापासून भाजल्याची एक खूण आहे… आणि मला फक्त इतकेच आठवते की, मी माझ्या बाबांना ‘बाबूजी’ म्हणायचो… आणि रेल्वे स्टेशनवर हरवलो होतो. “
डीएनए टेस्ट झाली. रिपोर्ट आला. आणि सत्य समोर होते. तो खरोखरच रोहन होता.
ज्या दिवशी दोघांची भेट झाली… संपूर्ण स्टेशन पाहण्यासाठी जमा झाले होते. रोहन हळूहळू वृद्धासमोर पोहोचला. दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. पंचवीस वर्षे… डोळ्याचे पाते लवते न लवते तोच जणू परत आले. रोहन ढसाढसा रडू लागला. “बाबूजी… माफ करा… मी तुम्हाला शोधू शकलो नाही. “
वृद्धांनी त्याला मिठीत घेतले. “वेड्या… चूक तुझी नव्हती… मला माहित होते… तू नक्की येशील. म्हणूनच मी रोज तिकीट घेऊन तुझी वाट पाहत होतो. “
रोहने थरथरत्या आवाजात विचारले- “बाबूजी… ती सर्व तिकिटे कुठे आहेत? “
वृद्ध हसले. “घरी एक लोखंडी पेटी आहे… त्यात तुझ्या प्रतीक्षेची पंचवीस वर्षे ठेवली आहेत. “
काही महिन्यांनंतर वृद्धाचा मृत्यू झाला. रोहने ती पेटी उघडली. आत हजारो तिकिटे नीटनेटकी ठेवलेली होती. सर्वात वर एक चिठ्ठी होती. त्यावर लिहिले होते- “जर तू ही चिठ्ठी वाचत आहेस… तर समजून घे की तू परत आला आहेस. आता मला काहीही दुःख नाही. बेटा, मी तिकीट कधी प्रवासासाठी खरेदी केले नाही… मी ती आशा जिवंत ठेवण्यासाठी खरेदी केली होती.
लक्षात ठेव… जगात सर्वात लांब प्रवास रेल्वेचा नसतो, तर कोणाची तरी वाट पाहण्याचा असतो. “
त्या दिवशी रोहने ती सर्व तिकिटे आपल्या वडिलांच्या चितेसोबत जाळली नाहीत… तर स्टेशनवर एका काचेच्या फ्रेममध्ये लावली. खाली फक्त एक ओळ लिहिली होती- ‘काही लोक मजल गाठण्यासाठी तिकीट खरेदी करतात… आणि काही लोक आपल्या नात्यांना जिवंत ठेवण्यासाठी. ‘
त्या फ्रेमसमोरून जाणारा प्रत्येक प्रवासी काही क्षण थांबतो… आणि न समजता आपले डोळे पुसून पुढे निघून जातो…
**
लेखक : अज्ञात.
प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज दिवसभर ढगांमुळे अंधारलेलेचं होतं. गार वारे वाहात होते. धुळीचे लोट उठत होते. कोणत्याही क्षणी पाऊस कोसळणार होता. आईनं चूल पेटवून संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली होती. गरम गरम ज्वारीच्या भाकरीचा सुगंध सुटला होता. पातेल्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं, लसूणाची फोडणी तडतडली व तिने त्यात पाणी वगारलं तसा चर्र चर्र आवाज झाला. खमंग दरवळला तसं माझ्या तोंडाला पाणी सुटलं. ” माय, काय बनवते. ” ” पिठलं बनवतेय. मग गरम गरम पिठलं भाकरी खाऊन घेशील. ” इतक्यात पावसाच्या सरी कोसळू लागल्या. ” अरे, प्रकाश सपर्यात पाणी जाऊ नये म्हणून अंगणातला ओंडका आडवा लावून देशील. कपिलेला चारा दिलास ना
रे. ” होय माय दिला. ” ” आणिक एक कर बेटा, कोंबड्या खुराडात बंद कर. पाण्याची वडसाड लागू नये म्हणून ओट्यावर बारदानाचा पडदा ओढून घेशील. “ रात्री पावसानं बराच जोर धरला. तसा बाप काळजीत पडला. आता भरात हंगाम होता. जोंधळ्यात टपोरे दाणे भरले होते. जोडीला हरभरा पेरला होता. दोन्ही पिके अगदी निकोप व जोमानं वाढली होती. हा पाऊस थांबला नाहीतर ? मोठं नुकसान होणार होतं. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार होता. बाप विमनस्कपणे पावसाकडे पाहात होता व हा पाऊस त्याच्या डोळ्यातून गालावर झिरपू लागला. ” शेवंता, मी शेताकडे जाऊन येतो. ” ” अहो, एवढ्या पावसात कसं जाता येईल. ? जाऊनही पिकांचं रक्षण कसं कराल ? ” शेवंता बोलतच होती कि पावसानं भिजल्यानं व पाण्याच्या लोंढ्यानं सपर्याची एक भिंत कोसळली. गाई, बैलं हंबरु लागली. बापानं ( महादेव ) त्यांच्या पाठीवर थोपटून शांत केलं, व कोसळलेल्या भिंतीचा मलबा फावड्यानं गोळा करून पाण्याच्या लोंढ्याला अटकाव केला.
रात्रभर पावसाचा जोर वाढतचं होता. अगदी खवळून रात्रभर बरसतंच होता. गावाजवळून वाहणार्या पूर्णा नदीलाही पावसामुळे प्रेमाची भरती आली होती. ती ही दुथडी भरुन वाहू लागली. सगळे गावकरी, शेतकरी आता धास्तावले. गावाच्या उत्तरेकडे असलेला तलावही आता ओसंडून वाहू लागला. पावसाचा जोर, वार्याचा जोर आणि पुराचाही जोर सगळीकडे हाहाःकार उडवू लागला. कोणाच्या छपराची कौले फुटली, कोणाच्या घरावरील पत्रे उडाली, कोठे भिंत कोसळली तर कोठे घरात पाणी शिरले. काय आज हा पाऊस वारा, वीजे समवेत एवढा उधाणला होता.
पाऊस चोवीस तास झाले तरी थांबत नव्हता. सगळेच आता हतबल झाले होते. दुसर्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. अवघ्या अठ्ठेचाळीस तासात 1000 मि. मी. एवढी पावसाची नोंद झाली. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून शेतात प्रवेश केला होता. दोन्ही तिन्ही दिवस हिच परिस्थिती होती. डोंगर माथ्यावरुन येणारे पाणी नद्यांमध्ये येऊन पाणी धोक्याच्या पातळीच्या कितीतरी वर चढले होते. पाऊस जरी थांबला तरी नदीतील वाढलेले पाणी, धरणातील पाण्याचा विसर्गाने पुराचे पाणी ओसरण्याचा वेग मंदावला. जवळ जवळ 96000 हेक्टर जमिनीवरील पिके आठ ते दहा दिवस पाण्याखाली होती. माती, चिखलात असल्याने सडली होती. कुजली होती.
घरा दारातही पाणी शिरल्यानं अन्न धान्य, कपडालत्ता, सामानाची वाट लागली होती. आता सरकारी यंत्रणा कार्यरत झाली होती. लोकांना सुरक्षित स्थळी हलविले होते. कॅम्प उभारले होते. खाण्याची पाकिटे वाटली जात होती. आरोग्य यंत्रणा कार्यरत झाली होती. सर्दी, पडसं, ताप व साथरोगाने डोके वर काढले होते.
बापाच्या डोळ्यातील अश्रू खंडत नव्हता. दोन वर्षाचा कोरडा दुष्काळ आणि हा आताचा ओला दुष्काळ, वाया गेलेलं बि बियाणं, लागवडीचा खर्च, त्यासाठी काढलेलं कर्ज, त्याचं तर जणू या ओझ्यानं कंबरडंच मोडलं होतं. या उधाणलेल्या बेधुंद पावसानं होत्याचं नव्हतं केलं होतं. भरीस आलेला हंगाम, दाण्यांच्या राशि, त्यातून हाती येणारा पैसा, फिटलेलं कर्ज, खाऊन पिऊन हाती उरलेले दोन पैसे, त्याचं असं उधाणलेलं मन क्षणात उंचावरुन खाली कोसळलं होतं.
“बाबा, रडू नका ना तुम्ही, मी बाबांच्या गळ्यात पडलो होतो. बापाला अधिकच भडभडून आलं. त्याचे उष्ण श्वास व हुंदक्यांनी धपापणारी छाती मला तीव्रतेनं जाणवत होती. माय आमच्या दोघांच्याही अंगावरुन हात फिरवत होती.
” प्रकाश, खूप शीक माझ्या लेकरा, मोठा हो. आॅफीसर हो, इंजिनियर हो पण या बिन भरवशाच्या शेती व्यवसायात नको राहशील “
बाहेर वारा उधाणला होता. पाणी उधाणलं होतं आणि आत बापाचं मन उधाणलं होतं चिंतेनं, फिकीरीनं.
बाबा माझ्या शिक्षण्यासाठी पै पै जमवित होते. मला शैक्षणिक साहित्य व इतर अत्यावश्यक गोष्टी स्वतः अर्धपोटी राहून पुरवित होते.
शेती करतांना जमिनीचा पोत, त्याची तपासणी, त्यानुसार त्यावरील उपाय व मार्गदर्शन, सेंद्रिय शेती, त्याचे फायदे, जैविक खतांचा वापर, सुधारीत व संकरीत बि बियाणे, शेताच्या एका बाजुला शोषखड्डा, त्यात पावसाळ्यात जल पुनर्भरण, त्यायोगे रब्बी पिकाला होणारा फायदे, सहकार तत्वावरील धान्य गोदामांची व्यवस्था, त्यायोगे धान्याचे रक्षण, आधुनिक यंत्र सामुग्रीचा वापर इ. इ. कृषी पदवी अभ्यासक्रमात मी शिकलो. आणि गावी परतलो. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन सेंद्रिय शेती करू लागलो.
बाबा थोडे नाराज झाले, ” शेतीच करायची होती तर एवढं शिक्षण कशासाठी घेतलं ” ” बाबा रागावू नका, शिक्षणही मी आपल्या शेती व्यवसायाचंच घेतलंय. जेणे करून आपल्या याच शेत जमिनीतून भरघोस पिक निघेल. मी आपली तर शेती प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून कसेनच पण गावातील माझ्या कृषिमित्रांनाही हे प्रगत तंत्रज्ञानाची माहिती देऊन शेती कसण्यास मदत करीन. ” ” विचार चांगला आहे तुझा पण लहरी निसर्गाचं काय ?
बाबा त्यावरही उपाय आहे, शेतीत ठिबक सिंचन, पावसाळ्यात शेततळ्यांची निर्मिती, विहीर पुनर्भरणाने कोरड्या दुष्काळावर मात करता येते.
कमी पाण्यात येणार्या व कमी कालावधीत पिके तयार होणार्या वाणांची निवड करता येते. एकाच पिकावर अवलंबून न राहाता मिश्र पिके किंवा आंतरपिक घेता येतं. पारंपारीक पिकात बदल करून पेरू, डाळींब, सिताफळ यासारख्या हवामान सहन करणार्या फळबागाही लावता येतात.
बाबा महावेध’ किंवा इतर सरकारी हवामान ॲप्सचा वापर करून पावसाचा अंदाज घेता येतो आणि त्यानुसार पेरणी/कापणीचे नियोजन करणेही आजकाल शक्य झाले आहे. शिवाय भाजीपाला आणि फुलांच्या शेतीसाठी हरितगृह (Greenhouse) किंवा शेडनेटचा वापर करून पिकांचे वादळ-पावसापासून रक्षण करणे सुलभ झाले आहे. तसेच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि तण नियंत्रणासाठी मल्चिंग तंत्रज्ञान वापर केल्यास फायदा होतो.
बाबा यदा कदाचित निसर्गाची साथ नाही मिळाली तरी कुटुंबाचा खर्च चालविण्यासाठी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालन (Poultry) सुरू करता येते. बाबा आजकाल
नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ (PMFBY) शासनाने सुरू केली आहे. तसेच हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घेता येतो ज्यायोगे आर्थिक नुकसान भरुन निघते.
यावर्षी मी डाळिंब व सीताफळाची लागवड सुधारीत तंत्रज्ञानाने केली होती. चार एकरातील फळांनी लगडलेली बाग पाहून आई बाबा खुश होते. डोळे भरुन आपली बाग न्याहाळत होते. यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील कृषी अधिकारी नयनाचीही मला खूप मदत झाली होती. कृषी क्षेत्रातील नयनाचे ज्ञानही वाखाणण्याजोगे होते.
बाबा पुढच्या आठवड्यात फळांचा पहिला हप्ता मी मार्केटला नेईन. ” होय बेटा, आता आपली सगळी आर्थिक चणचण मिटेल.
आज पावसाचा भर बराच होता. घरी आलो. ओट्यावर छत्री ठेवली. व बाथरूम मध्ये हातपाय धुवून कपडे बदलले. ” केस पूस रे प्रकाश, अर्धा भाग पूर्ण ओला झाला आहे. आणि उद्या तिला मला भेटायला सांग जिच्यामुळे तू अर्धा ओला झाला आहेस. आता आयुष्याची जवाबदारीही अशी अर्धी अर्धी वाटून घ्या. ” ” काय आई, तुझं भलतंच ” ” भलतंच तर भलतंच, मला सून हवीय रे बाबा. आता उशीर नको “.
एका शुभ मुहूर्तावर नयनाने माझ्या जीवनात प्रवेश केला. उधाणलेल्या या वारा व पावसानं माझ्या जीवनातही प्रेमाला उधाण आणलं होतं.
राघव – पन्नाशी उलटून गेली होती त्याची. मान खाली घालून आजवर नोकरी केली, बाकी कधी काही छानछौकी केली नाही, पण आयुष्यात एकदातरी कैलास–मानसरोवरला जायचंच अशी त्याची तीव्र इच्छा होती.
… आणि यावर्षी, अचानकपणे, ध्यानीमनी नसताना, ही त्याची इच्छा पूर्ण होण्याची संधी आली होती. पार्ल्याच्या जोशीकाकांच्या ग्रुपतर्फे त्याचा मित्र जाणार होता, पण वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला जमणार नव्हतं, त्यानं राघवला विचारलं, आणि, राघव, अर्थात, एका पायावर तयार झाला. पासपोर्ट – व्हिसाचे सोपस्कार पूर्ण झाले आणि त्याने पत्नी मीराला सांगितलं, “मी यावर्षी मानसरोवरला जाणार आहे.”
मीरा काही क्षण शांत राहिली. “एकट्यानं? ”
“यात्रेचा ग्रुप आहे. काळजी करू नकोस.”
मीरा त्याच्याकडे पाहत हसली. “तुम्ही इतक्या दूर चाललात… आणि मी तुमची काळजी करायची नाही? ”
राघव हसला. “अगं, खुद्द महादेव आहेत ना सोबत.”
मीरा काही बोलली नाही. तिने कपाट उघडलं. तिने हळूच एक छोटासा फोटो काढला. त्यात राघव, मीरा, त्यांची मुलगी, जावई आणि छोटासा नातू होता. तिने तो फोटो राघवच्या बॅगेच्या पुढच्या कप्प्यात ठेवला.
राघवने ते पाहिलं.
“हा फोटो कशाला? ”
मीरा काहीच बोलली नाही, फक्त मंद हसली.
राघव हसला. “तुला माहिती आहे ना? मी परत येणार आहे.”
मीरा त्याच्याकडे काही क्षण पाहत राहिली. मग फक्त एवढंच म्हणाली, “कैलासाला जाऊन आल्यावर माणूस बदलतो.”
राघव निघाला. नेपाळमधून कैलासकडे जाणारा प्रवास सुंदर होता. डोंगर… धुकं… बर्फ… आणि त्या भव्य हिमालयाच्या कुशीतून जाणारा, वळणावळणाचा छोटासा रस्ता.
राघव अधूनमधून मोबाईलमध्ये फोटो काढत होता. एकदा त्याने मीराला व्हिडिओ कॉल करण्याचा प्रयत्न केला. नेटवर्क मिळालं नाही. त्याने मेसेज टाइप केला, “इथले पर्वत खूप सुंदर आहेत. तुला आवडले असते.”
मेसेज गेला नाही.
राघव हसला. “घरी गेल्यावर दाखवतो.”
तेव्हा त्याला ठाऊक नव्हतं की हा त्याचा साधा विचार त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार बनणार होता.
२६ ऑगस्ट २०२६.
सकाळची वेळ. नाश्ता करून नुकताच बसचा प्रवास सुरू झाला होता त्यांचा.
… आकाश अचानक काळवंडलं.
पावसाचा जोर वाढला.
गाडीतील लोक अस्वस्थ झाले.
आणि अचानक…
दूरवरून एक भयानक आवाज आला.
गर्जना.
जणू संपूर्ण पर्वत तुटून खाली येत होता.
ड्रायव्हरने गाडी थांबवली.
“बाहेर पडा! जीव वाचवा! पळा! ”
लोकांना काहीच समजत नव्हतं.
पण पुढच्या क्षणी त्यांनी जे पाहिलं…
ते दृश्य ते आयुष्यभर विसरू शकणार नव्हते.
वरून पाण्याचा एक महाकाय लोंढा येत होता. बर्फ, दगड, झाडं, माती – त्या लोंढ्याच्या कचाट्यात जे सापडत होतं त्याला फरफटत नेत होता तो. रस्त्यावरची वाहनंही त्या पुरात खेळण्यांसारखी उलटत होती, इमारती कोसळत होत्या.
हे बघितलं, आणि सगळ्यांना परिस्थितीच्या भीषणतेची जाणीव झाली. लोक जीवाच्या आकांताने पळू लागले.
राघवही धावत होता.
पण एका क्षणी त्याचा पाय घसरला.
तो खाली पडला. पाठीवरची बॅग दूर फेकली गेली.
आणि त्याच क्षणी पाण्याचा जोरदार प्रवाह आला.
राघवने बॅग पकडण्याचा प्रयत्न केला.. पण ती त्याच्या हातातून निसटली.
आणि त्या बॅगेत होता… मीराने दिलेला तो फोटो.
राघव दूर जाणाऱ्या त्या बॅगकडे पाहत राहिला. “मीरा…”
लोकांनी त्याला ओढून उंच जागेवर नेलं.
रात्र झाली.
वाचलेले लोक एका छोट्या इमारतीत आश्रयाला होते.
.. बाहेर पाऊस.
.. आत भीती.
मोबाईल नेटवर्क नव्हतं, इलेक्ट्रिसिटी नव्हती. कुणाचा फोन लागत नव्हता. कुणाला आपल्या कुटुंबाची खबर नव्हती.
.. एक आई आपल्या मुलाला छातीशी धरून बसली होती.
.. एक वृद्ध माणूस सतत प्रार्थना करत होता.
आणि राघव…
एका कोपऱ्यात सुन्न बसला होता.
त्याच्या हातात मोबाईल होता.
त्याने पुन्हा नंबर लावला.
मीरा…
कॉल लागला नाही.
पुन्हा.
काहीच नाही.
त्याने मोबाईल बंद केला. डोळे मिटले.
आणि त्याला आठवलं – मीरा त्याला विमानतळावर निरोप देताना म्हणाली होती, “लवकर या.”
राघवच्या डोळ्यांत पाणी आलं.
त्याने दोन्ही हात जोडले.
“महादेवा…”
काही क्षण तो गप्प राहिला.
मग कुजबुजला,
“नको मला कैलासाचं दर्शन…”
त्याच्या आवाजात हुंदका होता.
“नको मानसरोवराचं…”
त्याने डोळे घट्ट मिटले.
“मला फक्त…”
आवाज तुटला.
“…माझ्या मीराकडे परत जायचं आहे, मला घरी जायचं आहे. इथले फोटो मीराला दाखवायचे आहेत.”
पुढचा दिवस आणखी भयानक होता.
हिमस्खलनाचा धोका होता.
आणखी एक मोठा पूर येण्याची भीती होती.
बचावकार्यात असंख्य अडथळे येत होते.
सगळे जण जणू मृत्यूची वाट पाहत बसून राहिले आहेत असं वाटत होतं.
राघव एका दगडावर बसला होता.
त्याच्या शेजारी एक तरुण नेपाळी मुलगा होता.
तो म्हणाला, “अंकल, घाबरू नका. हेलिकॉप्टर येईल.”
राघव हलकंसं हसला.
“तुला खात्री आहे? ”
मुलगा म्हणाला,
“हो.”
“कशी? ”
मुलगा काही क्षण शांत राहिला.
मग म्हणाला,
“कारण माझी आई म्हणते… देव माणसांना एकटं सोडत नाही.”
राघव त्या मुलाकडे पाहत राहिला.
… आणि त्याला अचानक मीरा आठवली.
ती सुद्धा असंच म्हणायची.
“देवावर विश्वास ठेव.”
काही तासांनी…
दूरवर हेलिकॉप्टरचा आवाज आला.
सगळे बाहेर धावले.
हेलिकॉप्टर वरून गेलं.
थांबलं नाही.
लोकांच्या चेहऱ्यावरची आशा पुन्हा मावळली.
राघव खाली बसला.
त्याने डोळे मिटले.
तेवढ्यात पुन्हा आवाज आला.
धड्… धड्… धड्…
… हेलिकॉप्टर परत येत होतं.
यावेळी ते खाली उतरलं.
बचाव पथक धावत आलं.
एकामागून एक लोकांना बाहेर काढलं जाऊ लागलं.
राघवही उठला.
तेवढ्यात त्यांच्या यात्रा कंपनीतल्या एका तरुण कर्मचाऱ्याने त्याला आवाज दिला.
“साहेब, ये आपका है क्या? “
राघव वळला.
त्या तरुणाच्या हातात एक वस्तू होती.
राघवचे डोळे मोठे झाले.
ती त्याची बॅग होती. पुराच्या पाण्यात वाहून गेलेली. मातीने माखलेली… त्याने थरथरत्या हाताने ती बॅग उघडली, मीराने दिलेला फोटो त्यात होता, मातीने माखलेला, कडांनी फाटलेला.
पण…
मीराचा चेहरा अजूनही त्यात स्पष्ट दिसत होता.
राघवने तो फोटो दोन्ही हातांनी धरला.
काही क्षण तो त्याच्याकडे फक्त पाहत राहिला.
मग फोटो छातीशी धरून तो ओक्साबोक्शी रडू लागला.
तो तरुण म्हणाला, “बॅग दगडांमध्ये अडकलेली होती.”
राघव काहीच बोलला नाही, त्यानं आकाशाकडे पाहिलं, हात जोडले.
हेलिकॉप्टर वर उडू लागलं.
खाली दिसणाऱ्या दरीकडे राघव पाहत राहिला.
रस्ते गायब झाले होते.
पूल वाहून गेले होते.
सगळीकडे नुसते चिखलाचे साम्राज्य पसरलं होतं.
नद्या आपला रौद्र चेहरा दाखवत होत्या.
आणि त्या सगळ्याच्या मध्ये…
हिमालय शांत उभा होता.
राघवच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू आले.
तो फोटो हातात धरून म्हणाला,
“महादेवा… मी तुम्हाला भेटायला आलो होतो.”
त्याने फोटोतला मीराचा चेहरा पाहिला.
“पण तुम्ही मला परत पाठवलंत.”
मुंबईत विमानतळावर मीरा त्याची वाट पाहत होती.
राघव बाहेर आला.
दोघांची नजरानजर झाली.
मीरा काही क्षण तिथेच उभी राहिली, स्तब्ध, थबकलेली.
… मग ती धावत त्याच्याकडे गेली.
राघवने तिला घट्ट मिठी मारली.
इतकी घट्ट…
जणू पुन्हा कधीही सोडणार नव्हता.
.. मीरा रडत होती.
.. राघवही रडत होता.
काही मिनिटं दोघंही एक शब्दही बोलले नाहीत.
शेवटी मीरा कुजबुजली,
“कैलासाचं दर्शन झालं? ”
राघवने तिच्या डोक्यावर हात ठेवला.
“नाही.”
“मानसरोवर? ”
“नाही.”
मीरा त्याच्याकडे पाहत राहिली.
राघवने खिशातून तो फाटलेला, चिखलाने माखलेला फोटो काढला.
तो तिच्या हातात ठेवला.
“पण…”
त्याचा आवाज भरून आला.
“मला माझं मानसरोवर सापडलं.”
मीरा काही न समजल्यासारखी त्याच्याकडे पाहत राहिली.
राघव म्हणाला,
“मी देवाला भेटायला गेलो होतो.”
तो थांबला.
“पण मृत्यूच्या त्या क्षणी मला देव नको होता.”
.. त्याने तिचा हात घट्ट धरला.
“मला फक्त तू हवी होतीस, तुम्ही सगळे हवे होतात.”
मीराच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.
राघव हळूच म्हणाला,
“त्या दिवशी समजलं… देव कुठे असतो.”
“कुठे? ”
“आपल्या घरी, आपल्या माणसांत. जिथे कोणीतरी आपली वाट पाहत असतं.”
त्या रात्री राघवने तो फाटलेला फोटो देवघरात ठेवला.
मीराने त्याच्या शेजारी एक छोटासा दिवा लावला.
दोघे काही वेळ शांत बसून राहिले.
राघवने हात जोडले. त्याच्या डोळ्यांसमोर कैलास नव्हता… मानसरोवर नव्हतं.
होता…
एक छोटासा घराचा दरवाजा.
आणि त्या दारात उभी असलेली मीरा.
त्याने डोळे मिटले. आणि मनात म्हटलं—
“महादेवा, आयुष्यभर तुमच्यापर्यंत पोहोचण्याची इच्छा होती…
पण आता एकच प्रार्थना आहे—
माझ्या माणसांपासून मला कधीच दूर करू नका.”
कारण कधी कधी…
तीर्थयात्रा आपल्याला देवापर्यंत घेऊन जात नाही.
ती आपल्याला आपल्याच आयुष्याची किंमत समजावून सांगते.
कधी कधी…
हिमालय आपल्याला घाबरवतो, पूर आपल्याला वाहून नेतो, मृत्यू आपल्याला कवटाळतो…
आणि तरीही…
एखादा अनोळखी हात आपल्याला वाचवतो.
एखादा छोटासा फोटो पुरातून परत येतो.
आणि एखादी व्यक्ती विमानतळावर उभी राहून म्हणते—
“तुम्ही आलात… आता मला काही नको.”
तेव्हा जाणवतं…
कैलास कितीही उंच असो, मानसरोवर कितीही पवित्र असो…
आपल्या माणसाच्या मिठीत परत येण्यापेक्षा मोठी तीर्थयात्रा या जगात दुसरी नाही.
आणि कदाचित…
देवाकडे जाण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे—
आपल्या माणसांकडे परत येणं.
(नेपाळ – चीनमध्ये अडकलेले सर्व श्रद्धाळू सुखरूप घरी पोहोचोत, ही प्रार्थना.)