मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पत्त्यांचा बंगला… भाग २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पत्त्यांचा बंगला… भाग २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागील भागात आपण पाहिले – पिंपळाच्या पाराला देवत्व आलं. नाग्याचा नागू महाराज झाला.  बघता बघता त्याचा  प्रपंच वाढू लागला. भक्तगण वाढले. शिष्य परिवार वाढला.  आजूबाजूच्या प्रांतात प्रचार होऊ लागला.  दूर दूर ठिकाणाहून लोकं नागूच्या चरणी येऊ लागली. आता इथून पुढे )

विनायक हा असाच भरकटलेला गुन्हेगारी वृत्तीचा युवक होता. दिशाहीन. कलंदर. पण नाग्याने त्यालाही सामावून घेतले.  त्याचे विनायक हे नामकरणही नाग्यानेच केले.

तिच्यावर बलात्कार झाला होता. ती उध्वस्त झाली होती. भयाण अंधार तिच्या आयुष्यात पसरला होता.  समुद्राच्या पाण्यात ती आत आत  चालत होती.  जीवनाकडे  तिने पाठ फिरवली होती.  नाग्याने तिला हात दिला. पाण्यातून बाहेर काढले.  ती रडली. नाग्याच्या छातीवर उद्रेकाने तिने बुक्के मारले.  तिला जगायचंच नव्हतं.

तिला पाहून नाग्याला इंदू ची आठवण झाली. तो मुकाट तिला घेऊन मठात आला. सर्वांना त्याने  तिची काळजी घ्यायला सांगितली.

तीच झाली नाग्याची प्रमुख शिष्या.  प्रभावती.  त्यानंतर तिचे नाव, गाव, ओळख सारेच बदलून गेले.

इंदूने ज्याला नालायक, भडवा म्हणून संबोधले होते तो नाग्या आता लोकांचा देव बनला होता.  आता पाऊले पूर्ण रुतली होती.  मागे वळण्याचा रस्ता नव्हता. लटकी का असेना पण त्याची एक प्रतिमा तयार झाली होती. आणि मुखवट्याच्या आत नागू कोंडला गेला. नागूही या स्थितीत समाधानी होता. 

असं त्याच्याजवळ काय होतं? तसं रूप होतं. त्याच्या आईचं रूप. तो गौरवर्णी, उंचापुरा भारदस्त होताच. त्याच्याजवळ वाणी आणि वक्तृत्व होतं.  ज्ञान नव्हतं पण शब्द भांडार होतं. आणि अभिनय ,नाट्य त्याच्या वृत्तीतच असावं. 

“हेचि दान देगा देवा । तुझा विसर न पडो।।”   तो अशा काही चालीत म्हणायचा की, लोक तल्लीन होऊन नाचायचे. कधी जयघोष ,कधी नाचणं, कधी हसणं तर कधी मोकळेपणानं रडणंही ….मनात येईल ते बोला…असे सगळे प्रयोग त्यांनी लोकांवर केले.  आणि काय आश्चर्य लोक त्यात गुंतून गेले. लोकांना हाच भक्तीमार्ग वाटला.

गू पाहत राहिला. अनुभवत राहिला.

महाराजांच्या वेशात गाडल्या गेलेल्या नागूच्या अस्तित्वाचे कण विरघळत गेले.  देश-विदेशात त्याची कीर्ती पसरली.  पैसा प्रसिद्धी आणि प्रसार झपाट्याने होत गेला.  त्याच्या नावाची पुस्तके ही प्रकाशित झाली. त्याचा प्रचंड खप होऊ लागला.

तसे विरोधी वारेही वाहत होते.  अनेक वेळा आयकर वाल्यांनी धाड टाकली.  अंधश्रद्धा निर्मूलनाच्या लोकांनी तर सळो की पळो केले होते.  महाराजांची बुवाबाजी,  स्त्रियांबरोबर असलेली लफडी, मठात चाललेले अनैतिक  व्यवहार,  खोटेपणा यावरही मीडियाचे रकाने भरत होते.

एका महिलेची मुलाखत टींव्ही. चॅनलवर दाखवली गेली होती. तिचा चेहरा अस्पष्ट धूसर केला होता.

ती सांगत होती…सांगताना रडत होती. “मला महाराजाने फसवले. मीही त्यांच्या कहाण्या ऐकून पुत्रप्राप्तीसाठी त्यांच्या मठात जात असे. एक दिवस त्यांनी मंत्र देण्याच्या निमीत्ताने मला एका अंधार्‍या खोलीत नेले आणि… माझा पैसा, अब्रु ,स्रीत्व सगळं लुटलं…” चॅनलवर ती खूप करवादत होती.  पण लोकांच्या मनातला विश्वास, श्रद्धा भक्ती यावर याचा अंशत:च  परिणाम होत होता.  लोक ऐकत होते. साशंकही होत होते पण तरीही पुन्हा पुन्हा जातच राहिले.

पण  कधीतरी एकांती महाराजाचा मुखवटा त्यांच्याच मनात गळायचा . 

आपण लोकांच्या हळुवार धार्मिक भावनांशी खेळ मांडलाय याचं अपराधीपण जाणवायचं. आपण संत नाही. संतत्वाच्या जवळपासही नाही. आपल्याला पैसा प्रसिद्धी याचा लोभ आहे! लोक भाबडेपणाने आपल्या नादी लागत असल्याचं आत कुठेतरी समाधान वाटायचं. श्रेष्ठत्वाची भावना आपल्याला चिकटलेली आहे . पण हा पत्त्याचा बंगला कधीतरी कोसळेल  आणि मग आपली काय दशा होईल याचं भयही मनात वाटायचं.  पण कुठेतरी असंही वाटायचं की याच लोकांनी आपल्याला हे रूप दिले ना?  त्यांनीच आपल्या अस्तित्वाचं हे बुजगावणं बनवलं ना? आणि तसे म्हटले तर या आभासी, खोट्या, लटक्या दुनियेत अनेक प्रकारची  लोकांची  दुःख समस्या विरघळत चालल्याचा भास तर त्यांनाही होतोच आहे ना? नव्हे त्यांच्यासाठी तो भास नसून सत्यच आहे…

लोक वेडे आहेत.  ते नादी लागतात. ताब्यात जातात. कच्च्या मनाची मडकी आपण फक्त फुंकतो. मग त्यात वाईट काय? चुकीचं काय! त्यांनाही लाभ. आपलाही फायदा. भावनांचा हाही एक व्यवहार. धंदा.

कधीकधी नागूला मनोमन हसूही यायचं. लोकांची कीवही वाटायची.  इतके उच्च शिक्षित,पदवीधारक, काही तर सुवर्णपदक विजेते, यशस्वी उद्योजक .इथे येतात. प्रचंड नैराश्य घेऊन येतात. का भरकटतात ही माणसं… 

करमरकर मास्तरांनी एकदा सहज म्हटलं होतं ते चांगलंच लक्षात आहे .

“सुखाचा शोध न घेणं म्हणजेच दुःखाचा शेवट होणं..”

आपण सारेच भरकटलेले आहोत. मार्ग हरवलेले  आहोत. खोटे आहोत. फसवतो. फसवले जातो.

महाराज विचारात पार डुबून गेले होते.  एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती. मरगळ आली होती. बुरखा काढून टाकावासा वाटत होता. मुखवटा फेकून द्यावासा वाटत होता…बस् झालं…!!

इंदुचे शब्द कानांत घुमत होते. “नालायक..भडव्या..विश्वासघातकी..”ः

प्रभावती महाराजांना विचारत होती,

” काय झालं गुरुवर्य? आज इतके चिंतेत का?”

महाराज गप्प होते.  शांत होते. 

” उद्या मठात कृष्ण जन्माचा सोहळा आहे. मोठा भक्तगण जमणार आहे. भरपूर पावत्या फाडल्यात. देणग्याही खूप आल्यात.  या उत्सवाच्या बातम्या वृत्तपत्रात, टीव्ही चॅनलवर प्रसिद्ध होत आहेत . उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मठात सारे या उत्सवाची तयारी करण्यात गुंतलेले आहेत. जवळजवळ सारी तयारी झालेली आहे. एकदा आपण नजर फिरवावी. काही कमी जास्त असल्यास मार्गदर्शन करावे.”

महाराज नुसतेच “हो” म्हणाले.

पुन्हा प्रभावतीने विचारलं, 

“काय झालं?”

” हे बघ प्रभावती! उद्या सर्व भक्तगणांसमोर मी एक सत्य मांडणार आहे.”

” कोणते सत्य गुरुवर्य ?”

“एक कबुली.”

” कबुली?”

” होय प्रभावती…”

” काय सांगणार तुम्ही त्यांना?”

” उद्या त्या युगंधराची शपथ घेऊन मी खरे बोलणार आहे.  मी नागूची  कहाणी सांगणार आहे..”

प्रभावती गोंधळली  होती. आश्चर्याचा पूर तिच्या चेहऱ्यावर उसळला होता.  पण महाराज शांत होते.

‘ गोपाल कृष्ण! राधे कृष्ण! गोपाल कृष्ण! राधे कृष्ण!…’

एक मुखवटा गळून पडण्याच्या कल्पनेत महाराज मुक्त होत होते.  परिणामाची त्यांना कल्पना होती. पण पर्वा नव्हती. पत्त्याचा बंगला अखेर कोसळणार होता…

नव्हे! ते स्वत:च तो मोडणार होते…

  – समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पत्त्यांचा बंगला… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पत्त्यांचा बंगला… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सभागृह माणसांनी गच्चं भरलेलं होतं. मध्यमवयीन, प्रौढ, वृद्ध तरुण सर्व प्रकारच्या वयांचा एकत्रित समूह तेथे जमला होता. निरनिराळ्या जातीचे, धर्माचे लोक तिथे उपस्थित होते.  इतकी माणसं असूनही एक थंडगार शांती सभागृहात  होती.  कोपऱ्यात उंच पितळेच्या समया तेवत होत्या.  वातावरणात उदबत्यांचे, कापराचे सुगंध दरवळत होते. मोगऱ्याच्या फुलांच्या माळा चहू बाजूला सोडलेल्या होत्या.  त्याचाही दरवळ मनाला प्रसन्न करणारा होता.

थोड्याच वेळात नागू महाराज येतील. त्यांचं हस्तीदंती आसन छान सजवलं होतं. आजूबाजूला सुरेख रांगोळ्या रेखाटल्या होत्या. फुलांच्या कुंड्या ठेवल्या होत्या. आसनाभोवती अत्याधुनिक साऊंड सिस्टिम होती. 

प्रत्येकाच्या प्रश्नाला नागू महाराज उत्तरे देणार होते. सभागृहातले सारेच त्यांच्या दर्शनास आतुरले होते. शिष्य प्रभावती आणि शिष्य विनायक दोघेही व्यासपीठावर आले. त्यांनी श्रोत्यांना वाकून वंदन केले. धुपारत्या उजळल्या. मधुर असा घंटा नाद घुमला. आणि शुभ्र वस्त्रे परिधान केलेले नागू महाराज सभामंडपात अवतरले. केसांचा नीट विंचरलेला जटाभार.  गळ्यात लाल पांढऱ्या मण्यांच्या माळा आणि मुद्रेवर कमालीची शांतता. नजर तीक्ष्ण. विशाल नयन. त्यांनी सभागृहात एक शांत पण धारदार नजर फिरवली. सारे श्रोते  नकळतच उभे राहिले. त्यांचे हात जोडलेले होते. महाराजांनी दोन्ही हात उंचावले आणि त्यांना बसण्याची खूण केली. क्षणात कुजबुजीचा नाद थांबला. आणि पुन्हा शांतता प्रस्थापित झाली. महाराज ही आसनस्थ झाले.

एकेका भक्ताकडून येत असलेला भोग शिष्य विनायक स्वीकारत होता. आणि महाराजांच्या चरणाशी ठेवत होता.  त्यात फळे होती,  मिठाया होत्या, नाण्यांचे, नोटांचे बटवे होते. वस्त्रे होती. दागिने होते. दानपेट्याही  भरत होत्या. महाराजांच्या चरणी भक्ती भावाने वाहिलेल्या भेटींची रास वाढत होती. पुन्हा सारे आसनस्थ झाले.

महाराजांनी डोळे मिटले. ओंकाराचा नाद वातावरणात उमटला. सर्व भक्तांनी त्यांचे अनुकरण केले.  सभागृह ओंकारमय झाले.  आणि मग महाराज बोलू लागले,

“आपण सारी परमेश्वराची लेकरे. या धरतीवर जन्माला आलो ते एक दिवस जाण्यासाठीच. मृत्यू हा अटळ आहे. सत्य आहे.  आपण फक्त कर्म करायचे.  नको फळाची अपेक्षा. दया क्षमा शांती हे आपल्या जीवनाचे तीन खांब ढासळू द्यायचे नाही.  सुख आहे तिथे दुःख आहे. दुःखाचा अनुभव घेतला तर सुखाचा आनंद मिळेल. त्या शक्तीवर विश्वास ठेवा. श्रद्धा आणि सबुरी जीवनाला यशस्वी करी. बोला जय श्री कृष्णा… जय शिवशंकर ..पांडुरंग विठ्ठल.. राम कृष्ण की जय !!गोपाल कृष्ण राधे कृष्ण… गोपाल कृष्ण राधे कृष्ण…”      

सर्व सभागृहात एक धीर गंभीर जयघोष झाला.एव्हाना सारा भक्तगण महाराजांना वश झाला होता. जणूं प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्याशी बोलतोय, याचा भास भाविकांना होत असावा. 

मग प्रश्नोत्तरे सुरू झाली. अनंत समस्या. अनंत अडचणी. नाना प्रकारची दुःखे, निराशा. अपयश, स्पर्धा, शत्रुत्व, तक्रारी, हव्यास अनंत… शेवटच नसणाऱ्या… कुणाला नोकरी हवी तर कुणाला बढती. कुणाला संतान नाही तर कोणाची मुलं म्हातारपणी सांभाळत नाहीत.. कुणाला धंद्यात खोट आली.. तर कुणाचे वादळात घरदार वाहून गेले.. वर्षानुवर्षाच्या व्याधी.. परंपरागत चालत आलेले खटले.. प्रत्येकाच्या पोतडीत भरभरून समस्या. सगळ्यांना यश हवं.  सुख हवं.  एक एक जण आपली एक एक पोतडी महाराजांसमोर ओतत होता. आता महाराजांसमोर जीवनातला सारा चिखल पसरला होता. एक गढुळ समुद्र..

महाराजांच्या इशार्‍यानुसार शिष्य प्रभावती आणि विनायक कुणाला भस्म, कुणाला फळं, कुणाला गंडे, नाणे ताईत कसले कसले मंत्र वाटत होते. भाविक सश्रद्ध मनाने स्वीकारत होते.  क्षणभर का होईना त्यांच्या मनावर आशेची पांघरूणं पसरत होती.  महाराज आहेत ना मग कसली भीती नाही, असा विश्वास वाटून ते अधिकाधिक गुंतत चालले होते. 

सभागृह रिकामे  झाले. त्याची दारे बंद झाली. आणि शिष्यांनी आलेल्या भेटींचा पसारा आवरण्यास सुरुवात केली.  अन्नधान्य, फळे, वस्त्रे, मिठाया, ठिक ठिकाणी वाटण्याची व्यवस्था ठरलेलीच होती. आणि नाण्यांनी नोटांनी भरलेल्या दानपेठ्या मठाच्या तिजोरीत  सांभाळून ठेवल्या गेल्या.  त्या तिघांनी त्या भरगच्च तिजोरीवर नजर फिरवली. आणि एकमेकांकडे बघून हलकेच स्मित केले.

प्रभावतीने महाराजांना वस्त्रे उतरवण्यास मदत केली.

“खूप दमलात तुम्ही! आता थोडा आराम करा.”

विनायकाने एका ग्लासात कसलेसे पेय आणले आणि महाराजांना दिले.

ते पिता पिता च महाराजांची तंद्री लागली.

प्रभावती आणि विनायक पुढच्या मीटिंगच्या तयारीला लागले. हे दोघे खास असले तरी महाराजांचा शिष्य गण खूप मोठा होता. प्रत्येक जण आपापले काम चोख करत होता. त्यांच्यात भांडणे,  वाद होते. मात्र महाराजांकडून मिळणारी बिदागीही  कमी नव्हती त्यामुळेच सारे या समूहाला चिकटून होते. 

महाराजांनी डोळे मिटले.

 एक लहानसं घर. तो. नागेश नाग्या ..आणि त्याची बहीण.रागीट बाप. घर चालण्यापुरतं पैसे देणारा. आजारी आई .आणि अधून मधून विचारपूस करण्यासाठी खाऊ घेऊन येणारी मावशी. खरं म्हणजे घरात कधी राहावं असं वाटलंच नाही. कसलाच आनंद नव्हता. संवाद नव्हता. प्रचंड तुटलेपण होतं एक प्रकारचं..

नाग्याची  शिक्षणात गती नव्हतीच. वाचनालयात जाऊन पुस्तकं मात्र वाचायला आवडायची. पण दहावी बारावी गुणांकन ,भविष्य, महत्त्वाकांक्षा हे काही जमलं नाही. शाळेतली प्रगती पाहून बापाने अनेक वेळा चाबकाचे फटके मारले. बहिण हुशार होती. पण आईच्या आजारपणामुळे आणि बापाच्या धाकापायी घरकामातच तिची हुशारी सडली. एक दिवस कोणा मुस्लिम तरुणाचा हात धरून ती पळून गेली आणि नंतर कधीही दिसली नाही. आधीच वासे नसलेलं घर पूर्ण कोसळलं. त्यातच एक दिवस एका काळोख्या रात्री बापाला मावशीच्या खोलीत जाताना नाग्याने पाहिलं. आई प्रचंड खोकत होती. पाणी मागत होती. म्हणून नागेश उठला होता. आणि घरातलं ते अकल्पित दृश्य पाहून नागेश पुरा भेलकांडला. बापाच्या मस्तकात त्या क्षणी त्याला गोळी घालावीशी वाटली होती.

आईने अखेर शेवटचा श्वास घेतला.

तिचे अंत्य कर्म आवरले आणि तेराव्या दिवशीच बापाने मावशीला घरात आणले. रीतसर लग्न करून.

नागेश ने घर सोडले.

अंधारात तो चालत होता. मार्ग माहित नव्हता. कुठली वाट आपली, तेही कळत नव्हते.  कुठलेच नाते उरले नव्हते. पाश नव्हते. बंध नव्हते. जगण्यासारखं काही शिल्लकही नव्हतं. पण मरायचंही नव्हतं. नाही म्हणायला एक ओला कोपरा होता.   इंदू !

ठसठशीत,  गोल बांध्याची,  गोरी, गुबगुबीत हसरी इंदू! 

एकदा तळ्याच्या काठी असलेल्या निंबाच्या झाडाखाली तिला घट्ट मिठीत पकडले होते. ओठावर ओठ टेकले होते. तिच्या गोल देहाशी  झोंबी केली होती. पण तिने ओरबाडले. किंचाळत ती म्हणाली होती,

‘नालायक! भडव्या! शरम नाही वाटत?’ अंगावर थुंकून  ती पळून गेली होती.

धागे तुटले ते तुटलेच. आपल्याला काहीच जमणार नाही आयुष्यात. प्रचंड दु:खाला सोबत घेऊन सुखाचा शोध घेण्यासाठी कितीतरी दिवस तो चालत होता. कसलीही शुद्ध त्याला नव्हती. अंगावरची वस्त्रेही फाटली होती. पिंपळाच्या पारावर तो बसून होता.. झाडावरची गळलेली पाने जणू त्याची लज्जा राखत असावीत. कोणी दयाळू बेवारशी म्हणून त्याला काही बाही खायला देत. मिळालं तर अन्न नाहीतर ऊपासमार.

दाढी वाढली. केसांच्या अस्ताव्यस्त जटा झाल्या.

एक दिवस त्याच्याजवळ आलेल्या एका वृद्धेला तो सहजच म्हणाला, ” जय राम कृष्ण हरी!! कुणी कुणाचे नसते.  पाशात बंधात अडकू नकोस. तू स्वतःच वृक्ष हो! या पिंपळासारखा. सावली दे.”

वृद्धेला वाटले माझे दुःख याला कसे कळले? हा कोणी योगी वाटतो. सिद्ध पुरुष असावा.

आणि मग गावात धूळ उडाली. आपल्या गावात बाबा आला. सुखदुःख जाणणारा. उपाय सांगणारा. चांगभलं करणारा.

नागू महाराज की जय!!

नाग्या पुढे लोकांच्या रांगा लागू लागल्या. लोकं रडू लागली.  आक्रंदू लागली. त्यांच्या चरणी लागू लागली. नाग्या थोडा भांबावला. पण मग त्याला हेही जाणवलं की जग खूप दुःखी आहे. आपल्याच सारखं.  त्यांचं दुःख हे आपलं भांडवल. 

सुरुवातीला तो प्रत्येकाच्या डोक्यावर नुसते हात ठेवायचा. वाचनालयात केलेलं वाचनही थोडसं उपयोगी पडत होतं.  लोकांना वाटायचं बाबांच्या हातात जादू आहे. शब्दात शक्ती आहे. वाणीत दैवत आहे. 

पिंपळाच्या पाराला देवत्व आलं. नाग्याचा नागू महाराज झाला.  बघता बघता त्याचा  प्रपंच वाढू लागला. भक्तगण वाढले. शिष्य परिवार वाढला.  आजूबाजूच्या प्रांतात प्रचार होऊ लागला.  दूर दूर ठिकाणाहून लोकं नागूच्या चरणी येऊ लागली.

क्रमश: – 1

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अर्धवट जळलेली थोटकं – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ अर्धवट जळलेली थोटकं – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

(मागील भागात आपण पहिले– ज्यांची त्वचा त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी उजळ होती, त्या सगळ्या लोकांवर लिवी आपल्या काळ्या त्वचेचा राग काढत होता. माझ्याशी मात्र त्याचं कोणत्याही प्रकारचं वैर नव्हतं, माझ्याशी तो अगदी मोकळेपणानी बोलत असे. त्याला बहुधा आमच्या दोघांमध्ये काहीतरी साम्य वाटत असावं. म्हणूनच तर तो आपला रागही बेधडकपणे व्यक्त करत होता. आता इथून पुढे)

त्याचं काम मला आवडू लागलं होतं. बाहेरचं काम त्याने दोन दिवसात उरकलं, तेंव्हा मला वाटलं, की घराच्या आत सुद्धा कित्येक वर्षात रंग रंगोटी, सफाई केलेलीच नाहिये. भिंतींचा रंग जाऊन त्यावरची चमक तर कधीचीच गेलेली होती आणि आता तर कुठे कुठे वरचं प्लॅस्टर आणि रंगांचे तुकडे पडून आतली बिनरंगी भिंत दिसू लागली होती. तेंव्हा हेही काम करून घ्यावं. तो जेंव्हा काम उरकून निघाला, तेंव्हा त्याचे आजच्या कामाचे पैसे देऊन मी त्याला घरातल्या रंग-रंगोटी बद्दल बोलले. त्याने एका नजरेत घराकडे बघून  पक्का अंदाज केला, की हे घर तीन बेडरुमचं आहे. घराच्या बाहेरच्या आकाराकडे बघून आतल्या लांबी-रुंदीचा बरोबर अंदाज घेता येत होता त्याला.

त्यानं ते काम करायचं मान्य केलं. दुसऱ्या दिवशी येताना रंगाचे डबे, ब्रश, रोलर हे सगळं सामान घेऊन येण्यासाठी त्याला 500 डॉलर दिले. त्याने ते पैसे त्याच्या खिशात ठेवल्याक्षणी मला वाटायला लागलं, की आता काही हा परत येणार नाही! एकटं रहाणाऱ्या बाईला लुटायची आयती संधीच दिली होती मी त्याला! लीवीवर, त्याच्या कामावर विश्वास बसल्यानंतरही मनात अशी गोष्ट यावी, याचं माझं मलाच आश्चर्य वाटत राहिलं. अशा चेह-यांवर तर सगळं जगच संशय घेतं आणि मी पण या जगातलीच होते ना? मी आपल्याच मनाला समजावत राहिले, की जर तो आलाच नाही तरी काही हरकत नाही, पाचशे डॉलर देऊन मला थोडी अक्कल तरी येईल!

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासूनच त्याची वाट बघायला लागले होते मी! नऊ वाजायला अजून एक तास होता आणि माझ्या मनात धाकधूक सुरु झाली होती. मनाची बेचैनी दूर करावी म्हणून विचार केला, की गल्लीच्या टोकापर्यंत एक चक्कर टाकून यावी. वेळही जाईल आणि मन तो विचार सोडून जरा दुसरीकडे वळेल. चालत जात असताना लक्षात आलं, की रोजच्यासारखी गल्ली साफ दिसत नाहिये. इकडे तिकडे कागदाचे तुकडे, झाडांची पाने आणि खाद्यपदार्थ विखरून पडलेले आहेत. दोन तीन टीम हॉर्टन्सचे कॉफीचे कप पण लवंडलेले दिसत होते. कचऱ्याचे डबे खच्चून भरलेले होते आणि त्यामुळे त्याची झाकणं बंद न झाल्याने घाण वास सगळीकडे सुटलेला होता. आसपास पडलेली सिगारेटची थोटकं न विझवताच फेकलेली दिसत होती. ते बघून माझे पाय एक क्षण तिथेच थांबले. त्या थोटकांमधे मला कधी लीवीचा तर कधी माझा चेहरा दिसत होता. एक काळा आणि एक सावळा, ज्यांना चिरडणाऱ्या पायांना कधी ही जाणीव पण होत नसेल, की आपण एखाद्या माणसाला चिरडतोय, की सिगारेटच्या थोटकाला!

जवळपास अर्धा तास भटकून मी परत आले. चहा नाश्ता घेऊन घड्याळाकडे लक्ष जायच्या आतच बाहेरून काही आवाज आले. खिडकीतून बघितलं, तर लीवीची गाडी येऊन थांबलेली होती. गाडी जागेवर लाऊन त्याच्याबरोबर त्याच्या सारखीच दिसणारी आणखी तीन माणसं दरवाजाकडे येताना दिसली. आत्तापर्यंत तर मी एकट्या लीविलाच घाबरत होते, आणि आता आणखी तीन जण! त्याने बेल वाजवली आणि म्हणाला, की इथलं काम आम्हाला एका दिवसात उरकायचं आहे, म्हणून सगळी टीमच घेऊन आलोय.

ते धडाधड घरात घुसले, तेंव्हा माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. ते चौघं आणि मी एकटी! आता तर मी मुंगी एवढी सुद्धा राहिली नव्हते त्यांच्यासमोर! चौघांनी मिळून एक फुंकर मारली असती, तरी मी उडून कुठल्या कुठे जाऊन पडले असते. बाहेरच्या खोलीपासून काम सुरु केलं त्यांनी. मी विनाकारणच स्वयंपाकघरातून आत बाहेर करत होते. तिरक्या नजरेने, ते लोक काय करतायत याच्यावर नजर टाकत होते. कोणी भिंती घासत होता, तर कोणी खाली कपडा अंथरत होता, तर कोणी डब्यातून रंग काढत होता. ना त्यांनी काही सामान हलवण्यासाठी मला बोलावलं, आणि माझी कशासाठी मदतही घेतली नाही. एकामागून एक रंगांचे डबे रिकामे होत गेले आणि ते लोक एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात राहिले.

मला आश्चर्यच वाटत होतं. इतक्या वेगानं इतकं चांगलं काम होत होतं! खोल्या नवीन रंगामुळे चमकत होत्या. सामानही बरोबर आधीच्याच जागेवर ठेवलं जात होतं. मधे मधे मी त्यांना कोक किंवा चहा कॉफी पाहिजे आहे का, हे विचारत होते. ते लोक खूश दिसत होते. खूप गप्पा मारत होते, जोरजोरात हसत होते. मधे मधे मला पण आपल्या गप्पांमध्ये सामील करून घेत होते. त्यांची स्पष्टवक्तेपणानी बोलायची लकब पाहून मला आपोआपच हसू येत होतं. जेवणाची वेळ झाली तेंव्हा ते अर्ध्या तासासाठी बाहेर गेले. परत आले, तर माझ्यासाठी पिझ्झाची एक स्लाईस घेऊन आले.

मी विचारलं, “मला कशाला?”

लीवी म्हणाला, “कारण, तुम्ही फार चांगल्या आहात.”

ते ऐकून माझी मलाच लाज वाटली. माझ्या अंतर्मनातलं ते सत्य उघड उघड दिसून येत नव्हतं का? की माझा या लोकांवर अजिबात विश्वास नव्हता!

पिझ्झा मला पण आवडतो, पण का कोणजाणे, ही पिझ्झाची स्लाईस मला खावीशी वाटत नव्हती. लीविच्या चांगुलपणाचा आदर वाटला, म्हणून मी ती फ्रीजमधे ठेवून दिली, नंतर फेकता येईल असा विचार करत.

काम खूपच वेगानं चाललं होतं.  मधे दोन वेळा त्यानं आणखी लागणाऱ्या रंगासाठी पैसे मागून घेतले. दर वेळी त्याला पैसे देताना मनात तीच भीति असायची. दर वेळी वाटायचं, की आता काही तो परत येत नाही! तो रंग आणायला गेला, की त्याचे सहकारी बाहेर गवतावर बसून आराम करायचे. काही वेळातच तो हसत हसत परत यायचा. त्याचं ते पांढरे शुभ्र दात दाखवत हसणं मला फार आवडून जायचं आणि माझा त्याच्यावरचा विश्वासही वाढायचा.

त्याचं काम संपता संपता संध्याकाळचे सात वाजले. दोन दिवसांचं काम एका दिवसात संपवून आता ते जाण्याची तयारी करत होते. रंग देऊन झाल्यावर झालेला कचरा, घाण साफ करून हात पाय धूत होते. मी लीविला त्याचे पैसे दिले आणि त्या चौघांना चांगलं जेवण घेता येईल अशी टीपही दिली. काम करणाऱ्याचं आणि करून घेणाऱ्याचं नातं आता सोपं झालं होतं. दिवसभर घर त्या चार जणांच्या हसण्याने दुमदुमून गेलं होतं. मला पण खूप हसवलं होतं त्यांनी. घरातली प्रत्येकच वस्तू लीविसकट चारी जणांनी बघितली होती, पण आता मला तशी काही भीति वाटत नव्हती. का कोण जाणे, पण मला सारखं असं वाटत होतं, की लीवी मला आधी भेटायला पाहिजे होता. कित्येक वेळा अशी छोटी मोठी कामं करवून घेताना मला फार कटकट झालेली होती.

जाताना बाहेरच्या लॉनवर त्याला सिगारेट ओढताना बघितलं, तेंव्हा माझ्या मनात आलंच, की आता तो सिगरेटचं अर्धवट जळलेलं थोटूक पायांनी चिरडतोय की नाही, ते बघायला हवं! त्यानं तो सिगरेटचा तुकडा विझेपर्यंत हातात धरून ठेवला आणि मग जवळच्या कचऱ्याच्या डब्यात फेकून गाडी सुरु करून निघून गेला.

त्याच्या मनात माझ्याबद्दल कोणताही राग नाही, हे बघून मी आनंदाचा निःश्वास सोडला. मी माझ्या मनातली ती गोष्ट लपवून ठेवण्यात यशस्वी झाले होते. मी फ्रीजमधून त्याने आणलेला पिझ्झा काढला आणि तो गरम करून खायला घेतला. जसा काही या खोलीत लीवी हजर आहे, आणि त्याने कौतुकाने माझ्यासाठी आणलेल्या खाण्याचा आदर मी ठेवतेय, हे बघतोय.  आता माझ्या समोर फक्त त्याचे पांढरे शुभ्र दातच नाही, त्याचं पूर्ण व्यक्तिमत्व होतं, जे शुभ्र धवल किरणांपेक्षाही शुभ्र होतं.

मूळ हिंदी कथा : डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अर्धवट जळलेली थोटकं – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ अर्धवट जळलेली थोटकं – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

आज त्याच्या कामाचा दुसरा दिवस होता. मागच्या अंगणातला साचलेला कचरा आणि झाडं-झुडुपं साफ करण्यासाठी मी त्याला बोलावलं होतं. उन्हाळ्यात त्या अंगणात बसून बाहेर बसण्याचा आनंद घेण्यासाठीची ही तयारी होती. पूर्ण सात आठ महिने काकडून टाकणाऱ्या थंडीनंतर हवेत झालेला बदल, मनालाही हवाहवासा वाटत होता. येणाऱ्या उन्हाळ्यात जास्तीत जास्त वेळ बाहेर बसून मोकळ्या हवेत घालवण्यासाठी या स्वच्छतेची गरज होती. कितीतरी लोकांना फोन केल्यानंतर याला निवडलं होतं मी. त्याचं नाव होतं- लीवी.

डॉ हंसा दीप

वेळेचा पक्का होता तो. कालसारखीच आज पण बरोब्बर नऊ वाजता त्याची गाडी आतमधे लागलेली होती. बाजुच्या फाटकातून तो मागच्या अंगणात आला. येताना त्यानं फाटकाच्या आत पडलेलं वर्तमानपत्रही उचलून आणलं. पहिल्याच पानावर “मला श्वास घेता येत नाहिये” अशा शीर्षकाखाली एक मोठा फोटोही छापलेला होता. त्यात एका काळ्या माणसाला खाली पाडून, पोलिसाने त्याच्या गळ्यावर आपला पाय दाबून धरलेला दिसत होता. त्या दिवशीच्या वर्तमानपत्रात वर्णभेदाविरुध्द चालू असलेल्या मोर्च्यांच्या बातम्याच भरलेल्या होत्या.

“यू सी बॅड पिपूल इन दिस वर्ल्ड!”

मी त्याच्या या म्हणण्याला दुजोरा दिला. “जगात वाईट लोकांची कमतरता नाही”, हे मी नेहमीच म्हणत असते. माझ्या मनात असतं, तर दोन सहानुभूतीचे शब्द बोलू शकले असते मी. त्याच्या मनःस्थितीचं भान तर होतं मला, पण आपलं काम करून घेण्याची चिंता जास्त होती. त्याचं लक्ष त्या बातमीत जास्त रमू नये म्हणून मी लगेच त्याच्या हातातून वर्तमानपत्र काढून घेतलं. अनावश्यक चर्चा वाढवून कोणाच्या जखमांवर मीठ कशाला चोळायचं? म्हणून मी आज काय काय करायचं आहे, ते त्याला समजाऊ लागले.

आपल्या सिगारेटचं अर्धवट जळलेलं थोटूक पायांनी चिरडत ऐकत होता तो. त्याचे दात आवळले गेले होते. वर्तमानपत्रातल्या बातमी ळे त्याच्या मनात उसळलेला राग त्याच्या पायात उतरल्यासारखा वाटत होता. ते थोटूक राख होऊन केंव्हाच मातीत मिसळून गेलेलं होतं. पण लीवी अजूनही शांत झालेला नव्हता. त्याचं ते थोटूक पायांनी चिरडणं म्हणजे, त्या थोटकातली उरलेली ठिणगी विझवणं नव्हतं, तर त्यातून बहुदा त्याला आपल्या पायाखाली जगाला चिरडल्याचं समाधान मिळत होतं.

काल जेंव्हा त्याला पहिल्यांदा बघितलं, तेंव्हा बघतच राहिले होते मी. फोनवर बोलताना काही कळलं नव्हतं, कोणाशी बोलतेय मी ते! बोलणाऱ्याचा आवाज जड होता आणि अगदी अदबीनं बोलत होता तो. बरोब्बर नऊ वाजता त्याची गाडी माझ्या घरापाशी येऊन थांबली होती. मी फोनवर त्याला थेट मागच्या अंगणातच यायला सांगितलं होतं. शक्यतो परके लोक घरात आतवर न आलेलेच बरं वाटतं मला. इथे मी, एक बाई एकटीच रहातेय, हे शक्यतो कोणाला कळू नये असा माझा प्रयत्न असतो. छोटी मोठी कामं करून घ्यायची तर येता जाता, इकडे तिकडे बघून लोकांना घराबद्दल बरंच काही कळून येतं. याच कारणासाठी मी जरा जास्तच खबरदारी घेत असते.

समोरून येताना बघितलं होतं मी त्याला. तो काळा होता. काळा रंग आणखी किती जास्त काळा असू शकतो, ते त्याच्याकडे बघून कळत होतं. चांगलाच उंच आणि दणकट होता तो, बघता क्षणीच भीति वाटायला लागली होती त्याची. त्यालाही कळलं असावं ते, या प्रतिक्रियेची सवय झालेली असावी त्याला.

म्हणाला, “माझ्याकडे बघू नका, माझं काम बघा!”

बरोबर बोलत होता तो. असं बोलायची त्याला गरज पडते कारण त्याचं रूप असं आहे, की त्याच्याकडे बघून अविश्वासाचा भावच निर्माण व्हावा! माणूस स्वतःला ओळखत असतो, स्वतःचे गुणावगुण त्याला चांगलेच माहित असतात. याला कळत होतं, की त्याचा चेहरा कोणालाच आवडण्याजोगा नव्हता. काळा रंग आणि मोठमोठ्या नाकपुड्या असलेलं नाक. डोक्याला टक्कल पडलेलं आणि हातात काम करून मळलेले हातमोजे आणि पायात भले भक्कम बूट! त्याच्या त्या भल्या मोठ्या, उंच, दांडग्या देहासमोर बुटकीशी मी, एखाद्या हत्तीसमोर मुंगीने मान वर करून बोलावं, तशी दिसत होते. कुठल्याही क्षणी त्यानं आपल्या पायाखाली चिरडून टाकलं, तर या मुंगीला ओरडायची पण संधि न मिळता बिचारी हे जग सोडून जायची! त्याच्या त्या व्यक्तिमत्वाच्या दडपणाखालून बाहेर यायला काही क्षणांचा अवधी लागला मला. कोण जाणे, कुठल्या देशात त्याची मुळं रुजलेली होती, पण त्याची वृत्ती स्वच्छ दिसत होती. एका कुशल कारागिराची वृत्ती! बेईमानीची खोटी गोड भाषा नाही, तर ईमानदारीची कटू झलक दिसली होती.

“एकदा माझं काम बघा, मग दुसऱ्या कोणाचं काम आवडणारच नाही तुम्हाला!” खरंच बोलत होता तो. त्यानं एका दिवसात जेवढं काम केलं होतं, तेवढं आणि त्याच्यापेक्षा चांगलं कोणी करू शकेल, ही शक्यताच नव्हती! त्याचं काम हीच त्याची ताकद बनवली होती त्यानं. हे कौशल्य काही त्याच्यात जन्मतः नव्हतं, त्यानं ते मिळवलं होतं, हेच त्याला सांगायचं होतं. आपल्या त्वचेचा रंग ठरवणं त्याच्या हातात नव्हतं. आपल्या मोठ्या आणि फुगीर नाकाला आकार देणंही त्याला शक्य नव्हतं. ज्या बाबतीत तो काही करू शकत नाही, ते त्याच्या चांगलं किंवा वाईट असण्याचं प्रमाण कसं ठरू शकेल? त्याचं रूप-रंग त्याच्या आतल्या चांगुलपणाला नाकारू शकत नाही.

आपल्या कामाचे पुरेपूर पैसे घेतो तो, त्यात कोणतीच कुचराई नाही. बोलण्यासाठी तोंड उघडलं, की त्याचे पांढरे शुभ्र दात हसत चमकून उठतात. अगदी शुभ्र मोत्यांची माळ कोणी गुंफलेली असावी, असे दिसतात. त्याचं बोलणं ऐकत असताना त्याच्या दातांच्या चमकदारपणाकडेच नजर खिळून रहाते माझी, डोळ्यांना आणखी कुठली बघण्याजोगी जागा सापडतच नाही! मला कळतंय, असा विचार करणं हा त्याच्यावर अन्याय आहे, आणि मला तो वर्णद्वेषी बनवतो. पण मी तरी काय करू! सफेत रंग कोणाला आवडत नाही? किंवा असंही म्हणता येईल, की डोळ्यांना सफेत (गोरा) रंग चांगला वाटतो, मग तो कागदाचा असो वा त्वचेचा.   

मी पण काही अगदी गोरीपान कुठे आहे? दुधाने न्हायलेली आहे. वाक्प्रचार नाही सांगत, खरंच माझ्या आईनं लहानपणी दुधानी अगदी रगडून, रगडून न्हाऊ घातलं होतं मला! ती जेंव्हा मला दुधानी आंघोळ घालायची, तेंव्हा जितका वेळ माझ्या अंगावर दूध असायचं, तेवढा वेळ प्रेमानं, कौतुकानं बघत रहायची माझ्याकडे. आणि हेच आशीर्वाद द्यायची, की रोज दुधानी न्हाशील तर अशीच दुधासारखी गोरी होशील! दुधानी रोज आंघोळ करूनसुद्धा मी जशी होते, तशीच राहिले, पण आईच्या नजरेत माझा काळेपणा निघून गेला होता. आणि मला सावळा रंग प्राप्त झाला होता. तो रंग मला या परक्या देशात अगदी सुरक्षित ठेवत असे. तपकिरी (सावळं) म्हंटलं जात असे मला. काळ्या रंगावर होणारे अत्याचारही मला सहन करावे लागत नव्हते आणि गोऱ्या रंगाच्या लोकांवर होणारा हुकुमशाहीचा आरोपही माझ्यावर होत नसे. आणि चीनमधून करोना आणल्याचा दोषही मला दिला जात नव्हता!

मला हे पण माहित आहे, की माझ्याशी बोलताना लोकांची नजर माझ्या दातांवरही जात नसेल, कारण लीविच्या दातांसारखे ते काही चमकदार मोत्यांसारखे दिसत नाहीत. चहा आणि कॉफी सतत प्यायल्याने त्यांच्यावर तपकिरी रंग चढलेला आहे. कुठल्याही प्रमाणानं मोजू गेल्यास लीविपेक्षा माझी परिस्थिती दहा टक्क्यांनी अधिक चांगली आहे. मला पण कित्येक वेळा माझ्या समोर उभे असलेले गोरे लोक आपल्यापेक्षा फार उच्च पातळीवर असल्याचं जाणवलं होतं. आणि त्याबद्दल अपराधीपणाची जाणीवही झाली होती. त्या वेळी माझ्या वृत्तीतला ताठा माझ्या कामावरच्या निष्ठेमुळेच होता. आता मी निवृत्त झाले आहे, पण लीवी सारखेच रक्ताचे घोट मीही गिळले आहेत, एकदाच नव्हे, कित्येक वेळा! गायी आणि म्हशींच्या मधे घोड्यांची कातडी घेऊन वावरणारी मी, रंगावरून चाललेल्या कट कारस्थानाचा एक भाग होतेच – गोरे, काळे आणि सावळे! अंतर्मनात, आपल्या देशाचा तो इतिहासही साक्ष देत चमकून जायचा, जेंव्हा आपल्याच देशात आपलेच लोक चिरडले जात असत. गोऱ्या पायांच्या काळ्या बुटांनी केलेलं विनाशाचं तांडव! ती कटुता आजही अंतर्मनात उरलेली आहे!

ज्यांची त्वचा त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी उजळ होती, त्या सगळ्या लोकांवर लिवी आपल्या काळ्या त्वचेचा राग काढत होता. माझ्याशी मात्र त्याचं कोणत्याही प्रकारचं वैर नव्हतं, माझ्याशी तो अगदी मोकळेपणानी बोलत असे. त्याला बहुधा आमच्या दोघांमध्ये काहीतरी साम्य वाटत असावं. म्हणूनच तर तो आपला रागही बेधडकपणे व्यक्त करत होता.

क्रमश: १

मूळ हिंदी कथा : डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बायको आणि गाढव… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ❤️

☆ बायको आणि गाढव… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

उतारवयातही बायकोची कटकट कमी होत नाही, म्हणून कंटाळून त्यानं गावात जाऊन राहायचं ठरवलं. जागा आधी घेऊन ठेवलेली होतीच. तिथे फार्म हाऊस बांधलं. छोटंसं शेत होतं, त्यात भाज्या लावल्या. एक गाय घेतली, एक गाढव घेतलं. एक कुत्रा पाळला.

या सगळ्यांच्या साथीत त्याचा दिवस मजेत जायचा. पुन्हा शहरात यायचं नावही काढायचं नाही, हे त्यानं ठरवलं होतं. मात्र त्याचं नशीब त्याची पाठ सोडायला तयार नव्हतं. बायको तिथेही त्याच्या मागोमाग आलीच. दर रविवारी ती गावात यायची आणि त्याच्या डोक्याशी कटकट करायची.

` ‘हे कुठे खबदाडात घर बांधून ठेवलंय!“

“धड रस्तासुद्धा नाहीये गावात यायला!“

“कशा वेंधळ्यासारख्या पसरून ठेवल्यायंत ह्या वस्तू!“

“काय कपडे घातलेत हे? शोभतात तरी का तुम्हाला?“

“हे गाढव कशाला घेतलंय आणि? काय उपयोग ह्याचा?“

एक ना दोन.

शहरात असताना तेच, आता गावात आल्यावर तेच.

तो पार वैतागून गेला.

इथेही सुटका नाही म्हणजे काय? पण काय करू शकणार होता बिचारा? बायकोला ह्या वयात सोडूही शकत नव्हता.

गाढवावरून तर ती दरवेळी त्याचं डोकं खायची. एके दिवशी ती आली, तेव्हा त्यानंच तिला सांगितलं, “तुला गाढव नको असेल, तर तूच त्याची विल्हेवाट लाव!“

बायकोला हेच हवं होतं. तिनं गाढवाला बाजारात नेऊन विकून टाकायचं ठरवलं.

गाढवाला सोडण्यासाठी तिनं दोरीला हात लावला मात्र, त्यानं मागच्या मागे दोन लाथा मारल्या, तशी बायको कडमडली. भेलकांडत कुठेतरी जाऊन पडली. पाय फ्रॅक्चर झाला, हाताला खरचटलं, पाठही चेचली गेली. डॉक्टरांनी दोन महिने तरी घरातून बाहेर पडायचं नाही, असं सांगितलं. काळजीपोटी त्यानं तिला शहरातल्या घरातच राहायला सांगितलं, दिमतीला एक मदतनीस दिला.

ही दुर्दैवी घटना कळल्यावर जवळची मंडळी भेटायला आली. सगळ्यांनी वेगवेगळ्या वेळी येऊन त्रास देऊ नये, म्हणून त्यानं एकच वार ठरवून दिला होता. सगळे त्याच दिवशी आले.

तो डोक्याला हात लावून बसला होता.

काक्या, मावश्या, आत्या, शेजारणी, ओळखीच्या कुणीकुणी बायका येत, त्याच्यापाशी जात. त्याच्याशी हळू आवाजात काहीतरी बोलत. तो होकारार्थी मान हलवून प्रतिसाद देई.

ओळखीचे काका, मामा, शेजारचे पुरुष, मित्र येत, त्याच्यापाशी जात. त्याच्याशी हळू आवाजात काहीतरी बोलत.

तो नकारार्थी मान हलवे.

त्याच्या एका मित्राची बायको लांबून हा प्रकार बघत होती. न राहवून तिनं आपल्या नवऱ्याला विचारलं, “बायका जवळ येऊन काहीतरी बोलतायंत, तुमचा मित्र होकार देतोय. पुरुष जवळ आल्यावर नकार देतोय. ही काय भानगड?“

मित्र शांतपणे म्हणाला, “बायका जवळ येऊन काळजी व्यक्त करतायंत. काही लागलं तर सांगा, काकूंनी आधीच गावाला जायला नको होतं वगैरे सांगताहेत. त्यांच्या गुणांचं वर्णन करताहेत. हा होकार देतोय.“

“आणि पुरुष?“

“हं…!“ एक दीर्घ उसासा टाकून मित्र म्हणाला, “ते त्याचं गाढव दोन दिवस उधार मागतायंत!“

लेखक – अज्ञात 

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सख्खे भाऊ… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  जीवनरंग ?

☆ सख्खे भाऊ… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

सखाराम वायाळ  मुंबईत कापडाच्या मीलमध्ये कामाला होता.ती बंद पडल्यावर आपलं बिऱ्हाड घेऊन तो गावी आला .  गावातल्या एका किराणामालाच्या दुकानात काम करून तो आपलं घर चालवत होता.त्याची बायको हौसाबाई कुणाच्याही शेतात कामाला जाई.एका पावसाळ्यात कामावरून येताना ती नदीच्या पाण्यात वाहून गेली होती.त्यानंतर सखारामनं सुरेश आणि शशिकांत या आपल्या दोन मुलांना आईची पोकळी जाणवून दिली नाही. शिकून शशिकांत त्या गावच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता.सिनिरीऑरिटी,

कामाचा अनुभव,मेहनत आणि  अंगभूत गुणांमुळे  तो तिथेच मुख्याध्यापक झाला.सुरेशनं गावातील शेतकऱ्यांच्या भाज्या,फळे विकत घेऊन त्यांचे पॅकिंग करून मुंबईत विकण्याचा धंदा सुरू केला.दोघांचीही आपापल्या क्षेत्रात होणारी प्रगती पाहून सखाराम आनंदी होता.वयोमानानुसार तो आता थकला होता.त्याचा ७५ वा वाढदिवस दोन्ही मुलांनी गावात थाटामाटाने साजरा केला.गावातील, तालुक्यातील आणि जिल्ह्य़ातील विविध क्षेत्रातील अनेक मोठी माणसं या सोहळ्याला उपस्थित होती.कार्यक्रमानंतर रात्री जेवताना शशिकांत आपल्या वडीलांना म्हणाला,” दादा,आम्हा दोघा भावंडांची इच्छा आहे की,उद्यापासून तुम्ही कामावर जाणं थांबवावं”.

” पण बाबांनो, घरी बसून मी काय करू ? घर खायला उठंल रे मला” सखाराम उत्तरला.

” मग सुरेशच्या धंद्यात त्याला मदत करा” शशिकांत म्हणाला.

दुसऱ्या दिवसापासून सखाराम सुरेशच्या कामात मदत करू लागला.

सुरेशचं काम हलकं झालं.  गावाकडील सगळी कामं सखाराम पाहू लागल्यानं सुरेश मुंबईला  वारंवार जाऊ लागला.तिथल्या रंगीबेरंगी जीवनाकडे तो आकर्षित झाला.तिथल्या मित्रांसोबत तो दारू पिऊ लागला,बारमध्ये जाऊ लागला.धंद्यावरचं त्याचं लक्ष कमी होऊ लागलं. त्याला पैशाची चणचण भासू लागली.आपले नाद पुरवण्यासाठी तो कुणाकडूनही हातउसने पैसे घेऊ लागला. गावाकडं शशिकांतला 

उत्कृष्ट काम केल्याबद्दल मोठे पारितोषिक जाहीर झाले.राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते हे त्याला मिळणार होते.सुरेशने हे आपल्या मित्रांना सांगितलं.त्यांनी सुरेशचे कान भरले.” अरे तू इथं हाडाची काडं करतो आणि तुझा भाऊ तिकडं काहीच काम न करता मोठमोठी बक्षीसं मिळवतो “.सुरेशला हे पटलं.तो गावी दारू पिऊन आला.शशिकांत घरी नव्हता. सखारामपुढं तो शशिकांतला शिव्या देत राहीला.सखारामनं त्याला आडवलं.” अरे, दारू पिऊन तू काय बडबडतोस ? काय अवदसा तुला आठवली आज ? ” ” तू थोबाड बंद कर थेरड्या ” असं म्हणून त्यानं आपल्या बापाला कोपर्‍यात ढकललं. या घटनेनंतर सखारामनं हाय खाल्ली. त्यानं अंथरूण धरलं.सुरेशचे पायही खोलात चालले.त्याचा धंदाही बसला.आपले चेकने घेतलेले पन्नास हजार रुपये परत केले नाही म्हणून कुणीतरी त्याच्यावर पोलीसात तक्रार केली.त्याला शोधत पोलीस त्याच्या घरी आले आणि त्याला अटक करून घेऊन गेले.हे झालं तेव्हा शशिकांत घरी नव्हता.संध्याकाळी तो घरी आला तेव्हा त्यानं पाहिलं की,सखाराम अंथरूणावर रडत होता.

शशिकांतला त्यानं घडलेलं सगळं सांगीतलं.वडीलांना शशिकांतनं धीर दिला आणि तो तडक पोलीसचौकीत गेला.शशिकांतला पहाताच ड्युटीवरचा हवालदार म्हणाला,” सर  ,तुमच्या भावानं एकाचे पन्नास हजार रुपये घेऊन ते परत दिले नाही अशी कंप्लेंट आली म्हणून त्यांना

आणलंय “.शशिकांतच्या विनंतीवरून ते गृहस्थ चौकीत आले.शशिकांतनं त्यांना पन्नास हजारांचा चेक दिल्यावर त्यांनी केस मागं घेतली.सुरेशला घेऊन शशिकांत घरी आला.

शशिकांतच्या मागोमाग सुरेश घरात आला.मात्र आपल्या वडीलांच्या नजरेला नजर देण्याचं टाळत  होता.अपराधी भावनेनं तो एका कोपर्‍यात उभा राहिला.त्याला असं अवघडलेलं पाहून सखाराम अंथरूणावर कसाबसा उभा राहिला.शशिकांत आणि सुरेशला त्याने आपल्या कुशीत घेतलं.तिघेही रडू लागले.

सखारामच्या पायावर कोसळत सुरेश म्हणाला, ” आबा,चुकलो मी.तुम्हा दोघांना मी दारूच्या नशेत टाकून बोललो.”

” बाळा,आता आसं नको बोलू.तूच म्हंला ना दारू प्युन बोल्ला”

” हा आबा” असं म्हणून त्यानं घरात कुठंतरी ठेवलेली दारूची बाटली दूर फेकून दिली.

” आबा,शशिकांतनं माझे डोळे उघडले.आता तसला मूर्खपना मी कर्नार नाही.माजा धंदा मी पुन्ना  चालू करीन. तुमी काई पन करू नका.फक्त तुमचा आशिरवाद द्या “.

” बाळा,तू परत काम चालू कर्नार. आनी मी काय पडून राहू काय?”

असं म्हणून सखारामनं अंथरूण  बाजूला सारलं.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- sks.satish@gmail.com

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दुसरी बाजू (पाच अ.ल.क.)… सौ. स्मिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

?जीवनरंग ?

☆ दुसरी बाजू (पाच अ...)… सौ. स्मिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

.

आदित्य…आमच्या Society मधला एक उमदा, हरहुन्नरी तरुण…घरच्या उत्तम संस्कारात वाढलेला….

सहा महिन्यापासून अचानक केस वाढवायला लागला.. साहजिकच  लोकांच्या चर्चेला विषय….

हल्ली मुलेही मुलींसारखे केस वाढवतात… छान Bow बांधतात… नवी Fashion आहे… असे काहीबाही कानावर पडत असेच..

परवा  अगदी रात्री उशिरा  भेटला… 

“Hello काकू, कशी आहेस ?”

” मी ठीक.. पण तुला मात्र पटकन ओळखले नाही. .. नव्या रुपात..”

” हो.. सध्या एका संस्थेशी जोडला गेलो आहे… केस दर सहा महिन्यांनी कॅन्सर रुग्णांना दान करतो …

… अजून खूप कमावता नसल्याने आर्थिक लगेच शक्य नाही….. तर जे शक्य आहे तेवढे तरी !!

.

परवा मी बसमधून गावात निघाले होते…

बसला तुफान गर्दी होती… अगदी खचाखच भरलेल्या बसमध्ये नीट उभेही राहता येत नव्हते…

अशातच एक आजोबा S.N.D.T. ला चढले… साहजिकच ते उभेच होते…. 

दहाच मिनिटे झाली आणि एक बाई उठल्या… एका College युवकापाशी गेल्या आणि  जोरात भांडायला लागल्या..

” काय रे, काही समजते का…हे आजोबा उभे आहेत आणि तू आरामात बसला आहेस?… कॉलेज, घरात हेच शिकवतात का तुला ? तुला नाही का उभे राहता येत? “ ….. झालं…सगळी बस त्याच्यावर तुटून पडली…बसच्या वेगापेक्षा लोकांच्या फटकाऱ्याचा वेग खूप जास्त होता ! तो बिचारा निमूटपणे उभा राहिला…..  

थोड्या वेळाने त्याचा स्टॉप आला व जाता जाता त्या बाईंना म्हणाला, ” काकू , पंधरा दिवसांपूर्वी माझे Appendix चे Operation झालेय… आज माझी महत्वाची परीक्षा होती, की जी बुडली असती तर माझे पूर्ण Semester वाया गेले असते… सहज उभारणे शक्य नव्हते म्हणून बसून होतो ! “

एवढे बोलून झरकन उतरून गेला…… 

.

तिच्या आईच्या मते ही पिढीच काहीशी अलिप्त… स्वतःमध्येच गुंग, थोडीशी मतलबी अशीच….. 

तिचा नवीन नोकरीचा पाहिला पगार हातात आला… आज ती घरी आली ती थिरकत्या पायानेच !!

” मावशी, रविवारी सगळया कामावर सुट्टी सांगा.”

” का ग बयो? काय आहे रविवारी?”

“अहो माझा पाहिला पगार झालाय…. तुम्ही , आई आणि मी मिळून मस्त आख्खा दिवसभर लोणावळा फिरून , धमाल करून येऊयात.  माझ्या या यशात तुमच्या दोघींचीही खूप मोठा वाटा आहे !!”

.

तो पक्का नास्तिक… त्यामूळेच ‘ देवपूजेशी ‘ त्याचा दुरान्वयानेही संबंध नाही….

ती ३०…३२ वर्षांची तरुण विधवा…एक ३-४ वर्षांचे छोटे बाळ पदरात… रोज एका ठराविक ठिकाणी ‘ फुले  विक्रीचा ‘  धंदा करत असे…. रोज बाजारातून फुलांची खरेदी करणे, आणलेल्या वेगवेगळ्या फुलांचे ढीग, 

फुलांचे हार, गजरे करणे. सोबतच बाळालाही सांभाळणे या सर्वात गुंतलेली असे….तिचा रोजचा  ‘ One Woman Show ‘ चालू असे…..

संध्याकाळी गिऱ्हाईकं येत असत.. पण हिची जरा सुकलेली, मरगळलेली, तजेला नसलेली अशी फुले, हार बघून दुसरीकडे जात असत.. … हिला बरेचदा गिऱ्हाईकांकडून  फक्त सहानभूती, चुचकारे मिळत असत … शेवटी तिचा  फुलविक्रीचा धंदा हा तिच्या रोजी-रोटीचा प्रश्न होता !

 ….  त्या दिवशी तो तिच्या स्टॉलवर आला… उगीचच थोडी फुले विकत घेतली…. जरासा रेंगाळला आणि पिशवीतून एक स्प्रे बॉटल काढून तिला देत म्हणाला ,” मावशी, यातील थोडे थोडे पाणी  दर दोन तासांनी फुलांवर, हारांवर मारत जा म्हणजे फुले छान टवटवीत राहतील…. सुकणार नाहीत !!”

… आता तिला विक्रीसाठी वेळ अपुरा पडतो…

.

ती नववीमधील गोड मुलगी… जरा खेडेगाववजा गावात राहणारी…

सुधारणेचे वारे कितीही जोरात असले तरी ते शहरी भागात….निमशहरी, खेडेगावात वातावरण थोडे वेगळेच.. तसेच जगतानाचे नियमही…

ही रोज शाळेच्या वेळी शाळेच्या Uniform मध्ये.. तर इतर वेळी अगदी  ठरलेल्या नियोजित पोशाखात… अगदी  चाकोरी आखून घेतल्यासारखे…तिला नातेवाइकांचे सततच टोचून शेरे असत…’ Fashion हा शब्द माहितीच नाही..’, ‘ काकूबाई आहे अगदी..’

परवा गाठ पडल्यावर सहज बोलतांना यावर बोलणे झाले…” काकू , मी पण सगळी Fashion करते.. फक्त ज्यावेळी आम्ही महित्यातून एकदा शहरगावात जातो ना तेव्हा… आई बाबा सोबत असताना…

कारण इथे गावात मी तशी राहिले तर त्याचा त्रास माझ्यापेक्षा आई बाबांना जास्त होईल !! “

लेखिका : – स्मिता कुलकर्णी, पुणे.

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अति लघु कथा…. (अलक)… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? जीवनरंग ❤️

☆ अति लघु कथा… (अलक)… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

लघु कथा  – – १

आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़े मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.

लघु कथा – -२.

शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले त्यात त्याने लिहिले, इथे माझी जेवणाची चंगळ आहे. काळजी करु नकोस. आईने ते पत्र वाचून एक वेळेचे जेवण सोडले कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रुने शाई फुटली होती.

लघु कथा  – -३.

आजोबाच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले, अग हळू हळू आजोबा पडतील ना. आजोबा हसून म्हणाले, पड़ींन बरा, माझ्याजवळ दोन काठया असताना.

लघु कथा  – – ४.

आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत रखवाल दाराने काठी घातली आणि थोडा वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले. का कुणास ठाऊक पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहर आला नाही.

लघु कथा  – -५.

ऑफिसातून दमून आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली, ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात.

लघु कथा  – -६.

वडील गेल्यावर भावांनी सम्पत्तीची वाटणी केल्यावर म्हाता-या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खुप भाग्यवान, माझ्या वाट्याला तर आयुष्य आलय.

लघु कथा  – -७.

काल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस. मला एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले मला .

लघु कथा  – -८.

खूप दिवसांनी माहेरपणाला आलेली नणंद tv सिरीयल पहाता पहाता वहिनीला म्हणाली, “ वहिनी किती मायेने करता तुम्ही माझे. “  तर वहिनी म्हणाल्या, “ अहो तुम्ही पण माहेरी समाधानाचे वैभव उपभोगायलाच येता की. सिरीयल मधल्या नणंदेसारखी आईचे कान भरून भांडणे कुठे लावता . मग मी तरी काय वेगळे करते. “ 

— रिमोटने tv केव्हाच बंद केला होता.

लघु कथा  – -९.

तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये…. तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना बळेबळेच ५००० चे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला. म्हणाला “ लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता. माझा दोस्त बरा झाला की छानसी साडी घ्या.” …… त्या पाकिटापुढे आज सारी प्रेझेंट्स फेल वाटली तिला.

लघु कथा  – -१०.

आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला. ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावतपळत घर गाठले तिने. स्वैपाक खोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या. “ हातपाय धू पटकन, भेळ केलीय आज कैरी घालून. खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.”

लघु कथा  – -११.

तिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या. तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला. सूनबाईच्या केसात फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय, मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती . त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती. देवघरातला खोडकर कान्हा गालात हसत होता.

—  सकारात्मक रहा…सध्या बाहेर इतके नकारात्मक विचार फैलावतायेत की लोकांचा माणसातल्या चांगुलपणावरचा विश्वास उडत चाललाय. अश्यावेळी अश्या सकारात्मक लघुकथांची आणि त्यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याची खरोखर आवश्यकता आहे. जगात सगळेच इतके वाईट नाहीयेत.

—चांगल्या माणसांची संख्या वाईटांपेक्षा खूप जास्त असल्यामुळे हे जग सुंदर झालं आहे —

लेखक : अज्ञात.

प्रस्तुती : शामसुंदर धोपटे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मृगाचा पाऊस… लेखिका : सुश्री कुसुमावती देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ?

☆ मृगाचा पाऊस… लेखिका : सुश्री कुसुमावती देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे

चार दिवसांपासून दुपारचे ढग येत. खूप अंधारी येई. पण लवकरच सोसाट्याचा वारा सुटे व पावसाचें सर्व अवसान कुठल्याकुठे निघून जाई. तिनें दोन दिवस वाट पाहिली. तिसऱ्या दिवशीही तोच प्रकार. घरांतला दाणादुणा संपत आला. उद्यांला खायला कांही नव्हतें, म्हणून ती जिवाचा धडा करून बाजाराकडे निघालीच.

झोंपडीच्या छपराच्या एका झरोक्यांतून मधून मधून उजेडाची एक तिरीप येई. तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पहात तिचा तान्हा कितीतरी वेळ पडून राही. नेहमीप्रमाणे तिनें त्याला टोपलीत घालून त्या ठिकाणी ठेवला. त्याच्या भोवती गुंडाळलेले फडके आणखी नीटनीटकें केलें व ती बाहेर पडली. तिनें झोंपडीला कडी घातली व एकवार घराच्या भोवताली नजर फेंकून ती झपाझप निघाली. तिनें पोराला एकटें टाकले, पण वादळ झाले तर त्याच्या अंगावर घालण्याइतका तिचा पदर तरी कुठे धड होता ?

बाजार गच्च भरला होता. वादळाच्या भीतीनें सर्वांची एकच धडपड चालली होती. आपल्याजवळ छत्री आहे, आपण टांग्यांतून जाऊं – ही चार पैशाचा दाणा घेणारी दुष्काळांतली भुतें कशाच्या आसऱ्याला उभी राहतील, असा विचार कोणाच्या मनांत येणार ? एकच धांदल व एकच कोलाहल उडून गेला होता. तशांत रोजचा वारा सुटला. पण तो आज एकटाच आला नाहीं. पश्चिमेच्या बाजूला पसरलेल्या प्रचंड काळ्याकुट मेघांच्या बाजूने तो आला व त्याची साक्ष म्हणून त्याच्याबरोबर तडातड् मारणारे टपोरे थेंबही आले.

पांच मिनिटांत सर्व जलमय होऊन गेले. मग पहिले अवसान ओसरलें, पण उघाडीचा प्रश्नच नव्हता. पाऊस पडतच राहिला. दोन अडीच महिने जिवाचे रान करून धरणीने वाट पाहिली. पर्जन्यरायाने पहिलीच भेट इतक्या अलोट प्रेमाने दिली. त्यामुळे तिचें मुख प्रसन्नतेनें खुलून गेलें. झाडांना टवटवी आली घरें छपरें स्वच्छ धुवून निघाली. रस्त्याच्या बाजूंनी लहान लहान ओहळ धावूं लागले. मुले बाळे ‘पाऊस- पाऊस’ करीत आपल्या ओसऱ्यातून, खिडक्यांतून गंमत पहात उभी राहिली. मोठ्यांचीही कविहृदये पावसाच्या त्या प्रसन्न, उदात्त दृश्याने फुलून गेली; पाण्याच्या निनादांत तन्मय होऊन गेली.

पण ती ? ती कुठे होती? तिचा बाजार झाला का? वादळाचा पहिला थेंब अंगावर पडतात ती त्या सरी इतक्याच वेगाने धावत निघाली . तिचे छबडे त्या झरोक्याखाली होते ना? एवढ्या प्रचंड झंजावाताने एकादे कौल उडवून दिले तर ? कुठेतरी थोडेसे छिद्र सांपडले की तिथे भगदाड पाडणें हे या राक्षसी वादळाचे कामच . तिला वाटू लागले एखादे कौल ढासळले तर बाळाच्या अंगावर पडायचे. तो रडूं नये म्हणून केवडा मूर्खपणा केला मी ?

तिला घर किती दूर वाटू लागले! जातांना तिला वेळेची जाणीवही झाली नव्हती. आतां तिच्या पायाखालची वाट सरेना. त्यांतच रस्त्यावर पाणी साचलेले. ‘ माझा बाळ निजला असेल का ? झरोक्यांतून गळणाऱ्या पाण्याने भिजला तर पडसें येईल त्याला. ‘

ती विचार करीत होती का चालत होती – रस्त्यावर होती का झोंपडीत बाळापाशी होती हे तिलाच कळत नव्हते. यंत्राप्रमाणे तिचे पाय रस्त्यावरचें पाणी तुडवीत धांवत होते. डोक्यावरचा पदर भिजून चिंब झाला. गालांवर केसावरचे ओघळ वाहू लागले. पाठीवर सारखा पावसाचा मारा बसत होता. झपझप पावलांनी उडणाऱ्या चिखलांनी पोटऱ्या, पाठीकडले लुगडें भरून गेले.

दुरून तिला झोपडी दिसली. दार लागलेलेच होते. बाहेरून तर सर्व व्यवस्थित होतें. जवळपासचे वृक्ष डोलून डोलून थकले होते. पण एकदा गति मिळाल्यावर त्यांच्या लहान फांद्या व पानें अजून नाचतच होती. त्यांचा तो हिरवा नाच तिच्या बाळाला किती आवडे !

तिने दार उघडले. झोपडीत उजेड जास्त झाला होता. एक कौल पडलें होतें. पण तें पलीकडे. बाळापासून दूर चार हातावर त्याचे तुकडे तुकडे झाले होते. तिचा जीव खाली पडला. “निजलं आहे गुणाचं,” असें म्हणून ती चटदिशी जवळ गेली. झरोक्यांतून येणाऱ्या पाण्याने बाळाची टोपली ओली चिंब झाली होती. गारठ्यानें मुठी घट्ट आवळून खूप रडल्यानंतर थकून तो पडला होता. तिनें त्याला चटकन उचलून पोटाशी धरले व ती खाली बसली. किती उत्सुकतेनें तो तिच्या उबेत शिरला ! तिच्या डोळ्यांतूनही आनंदाच्या मृगधारा सुरू झाल्या.

जून १९३१

लेखिका – सुश्री कुसुमावती देशपांडे  

संग्राहिका – सुश्री  माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कारावास… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? जीवनरंग ❤️

☆ कारावास… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

‘होणार सून मी या घरची’ सीरियल संपली.साडेआठचा भोंगा झाला.दारावरची बेल वाजली.टी.व्ही.चे बटण बंद करून काठीचा आधार घेत विमलबाई उठल्या.सावकाश पावले टाकत दारापर्यंत गेल्या.दार  उघडले.जेवणाचा डबा डबेवाल्याकडून घेतला आणि पुन्हा सावकाश जेवणाच्या टेबलापर्यंत गेल्या.डबा ठेवला.काॅटवर झोपलेल्या श्रीधरपंतांना त्यांनी उठवून बसवले.थोडे पाणी प्यायला दिले.

” बरं वाटतं का आता? चार घास भरवू का?” हातानेच बरं वाटतंय.जेवण नको.अशी खूण केली.त्यांचे डोळे खोल गेले होते.औषधाने सारखी ग्लानी येत होती.शरीरापेक्षा मनाने ते जास्त खचले होते.

‘अहो! गोळ्या घ्यायच्या आहेत.चार घास खा ‘ असे म्हणत वरणभाताचे चार घास लहान बाळासारखे बळजबरीने भरवले.तोंड पुसले.पाणी प्यायला  दिले.

स्वत:ला जेवण्यासाठी ताट वाढून घेतले.डोळे भरून आले.समोरचे दिसेनासे झाले.मन भूतकाळात गेले.

सातवी पास झालेल्या विमलाबाई वयाच्या चौदाव्या वर्षी श्रीधरपंताशी लग्न करून सासरी आल्या.घरची श्रीमंती.येण्याऱ्या जाणाऱ्यांचे घर.सासू- सासरे थकलेले.नव्या सुनेच्या हातात घरच्या किल्ल्या देऊन सासूबाई मोकळ्या झाल्या.विमलाबाईचे जबाबदारी पेलण्याचे वय नव्हते.दिल्या घरी असेल तसे रहावे.पडेल ते काम करावे ही माहेरची शिकवण.दुसऱ्या पर्यायच नव्हता.पडेल ते काम आनंदाने करायचे.सासऱ्यांना कुकरमध्ये तयार केलेले जेवण आवडत नसे.चुलीवर किंवा शेगडीवर त्यांच्यासाठी जेवण करावे लागे.रोज घरात वीस-पंचवीस माणसांचे जेवण तयार करावे लागे.तेही सकाळी-संध्याकाळी ताजे. सणवार ,उत्सव,समारंभ, असेल तर शंभर माणसांचा स्वयंपाक विमलबाईनाच करावा लागे.साक्षात अन्नपूर्णा त्या.त्यांनी अनेक जीवांना तृप्त केले.

आपली चार मुले सांभाळत दोन नंदांची लग्ने केली.त्यांची बाळंतपणे झाली.मुले मोठी झाली.जावई आले.सून आली.नातवंडे झाली.

यात किती काळ लोटला हे कळलेच नाही.स्वंयपाकघर मात्र सुटले नाही.

घरचे काम आवरून झाले की त्या घरच्या दुकानदारीत लक्ष घालीत.झोपेचे सहा-सात सोडले तर बाकी सर्व वेळ या बाईचा कामात जाई.आपली मुले शहाणी व्हावीत, सुसंस्कृत व्हावीत, म्हणून त्याबाबत कुठेही तडजोड केली नाही.सगळे आनंदाने सहन केले.घर एकत्र राहावे.घरात सदैव सुख नांदावे म्हणून बऱ्याच गोष्टी निमुटपणे सहन केल्या.त्यांच्या लग्नाला ५६ वर्षं झाली.सून येऊन पंधरा- सोळा वर्ष लोटली. घरात सूप वाजू नये म्हणून बऱ्याच ठिकाणी समजूतदार दाखवला.सुनेला लेकीप्रमाणे वागवले. तिला काय हवे नको ते पाहिले.तिच्या आवडी- निवडी सांभाळल्या. तरी भांड्याला भांडे लागेच.टी.व्ही.बघण्यावरून, मुलांना वळण लावण्यावरून,विकतचे खाद्यपदार्थ मुलांना देण्यावरून,काम करण्यावरून कुरबुर सुरू झाली.विमलाबाईच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला.त्यात श्रीधरपंतांना  अर्धांगवायूचा झटका आला.सत्तरी पार केलेल्या गुडघ्याच्या दुखण्याने बेजार असलेल्या विमलबाईना नवऱ्याची उसाबर करणे शक्य नव्हते.रजा काढून चार दिवस मुलाने सेवा केली.पण आता कायमची सेवा आपल्या करावी लागणार हे जाणून सुनेने भांडण काढले.

दुनियेची रीत आहे.म्हतारपण तरुणपणाला नको असते.म्हतारपणाचा अनुभव हवा असतो,पैसा हवा असतो,मदत हवी असते,सोबत हवी असते.पण नको असते ते म्हाताऱ्यांचे आजारपण,त्यांची सेवा,त्यांचे बोलणे,त्यांचे शहाणपण,शिकवणे.

युज  अॅड थ्रो’ च्या जमाण्यात म्हातारपण म्हणजे केवळ कर्तव्य पूर्ती. सेवा विकत घेणे, आई-वडिलांसाठी केअरटेकर ठेवणे ,औषध-पाण्याचा खर्च करणे त्यांच्या राहण्याची,जेवणाची सोय करणे म्हणजे कर्तव्य संपले असे वाटते.आम्ही त्यांना काही कमी पडू देत नाही.ही त्यांची भावना.

खरं तर म्हातारपणी अन्नाच्या भुकेपेक्षा भुक असते चार प्रेमळ शब्दांची,हवा असतो माणसांचा सहवास, आपुलकीच्या चार शब्दांची हाक आणि आपण कुणाला तरी हवे आहोत ही जाणीव.याचा आज वणवा आहे.

जिथे केवळ कर्तव्य पूर्ती असते तिथे म्हातारपण फुलत नाही.तर जिवंतपणी मरते.

विमलबाई विचार करत होत्या,आपण कुठे चुकलो? इतक्या वर्षात आपण आपल्या आवडीची एक गोष्ट केली नाही,कधी हौसमौज केली नाही,कधी मला हे पाहिजे असा हट्ट केला नाही.सर्व घराचा विचार केला. प्रत्येक वेळी मन मारले.नवऱ्याला साथ दिली.संसार हेच आपले विश्व झाले. तरी मी कुठे कमी पडले?आज चार मुले असूनही मी अनाथ का झाले? मुलांनी वृध्दाश्रमात घातले असते तरी चालले असते.तिथल्या समदुःखी माणसांच्यात मन रमले असते.

सर्व सोयीनियुक्त असलेल्या या एका स्वतंत्र खोलीत आमचा जीव घुसमटतोय.एकटेपणा खायला उठतोय.इथे मरणप्राय यातना भोगतोय, हा कारावास असह्य होतय.कोणत्या न केलेल्या चूकीची शिक्षा भोगतोय? यात दोष कुणाचा?

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares