मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “सोनं…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “सोनं…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

सकाळची वेळ म्हणजे घरात प्रचंड गडबड. घड्याळावर नजर ठेवत सगळी कामं चाललेली. ‘अहो’ऑफिस तर मुलगा, मुलगी कॉलेजला जाण्याच्या तयारीत आणि मी स्वयंपाकात. कधी नव्हे ते उमा वेळेवर आली. जीवात जीव आला. एक टेंशन कमी झालं. धुण्या-भांड्याची काळजी मिटली. इतरवेळी गप्पा मारत काम करणारी उमा आज शांत होती. कामं उरकण्याची घाई चाललेली… चेहऱ्यावरून काहीतरी बिनसल्याचं लक्षात येत होतं. सगळे आपापल्या कामाला गेल्यावर निवांत मोबाइल पाहत बसले. तितक्यात पदराला हात पुसत उमा समोर येऊन उभी राहिली.

 

“ताई, एक काम होतं”

“पैशे सोडून काहीही माग”

“मग राहीलं काय? हजार रुपये पायजे व्हते. पोरींची फी भरायचीये. ”

“एवढे पैसे माझ्याकडं नाहीत. ”

“सगळे परत करीन पण नाई म्हणू नगा. हात जोडते. लय नड होती. ” उमा काकुळतीनं म्हणाली तेव्हा कसंतरीच वाटलं, तरीही यावेळेला पैसे द्यायचे नाहीत. अशी खूणगाठ मनाशी बांधली होती कारण आधीही उमानं काही ना काही कारणासाठी उसने पैसे घेतलेले. थोडे थोडे करून आकडा तीन हजारापर्यंत पोचलेला आणि परतफेड काहीच नाही. घरातल्यांना माहिती नव्हतं म्हणून बरं नाहीतर… माझं काही खरं नव्हतं.

 

तिचं “घेणं” थांबणार नाही म्हणून आपणच “देणं” थांबवायचं असं ठरवलं. पैसे मिळत नाहीत हे लक्षात आल्यावर उमाचा चेहरा केविलवाणा झाला. डोळे भरले. ती खोटं बोलत नव्हती. घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. मजुरी करणारा दारुडा नवरा आणि शाळेत जाणाऱ्या तीन मुली असा संसार. उमाच्या कमाईवर घर चाललेलं. पण उसने देण्याला सुद्धा मर्यादा असते. असो..

 

“ताई, बघा ना काहीतरी.. ” हात जोडत उमाच्या पुन्हा विणवण्या सुरू झाल्या. तेव्हा माझा निश्चय डळमळला.

“नवरात्र चालूयं म्हणून नाराज करत नाही. हे तीनशे घे. ”

“बरं द्या” नाराज उमा पाय आपटत निघून गेली आणि अपेक्षेप्रमाणे पुढचे दोन दिवस कामाला दांडी. खूप चिडचिड झाली पण काही करू शकत नव्हते.

 

दसऱ्याचा दिवस उजाडला. सकाळपासूनच गडबड होती. संध्याकाळी ओवाळून झाल्यावर ‘सोनं’ देऊन मुलं मित्रांना भेटायला गेली अन आम्ही दोघं टीव्ही पाहत बसलो. अचानक उमा कामासाठी आली. आश्चर्याचा धक्का बसला अन रागही आला. पण सणावारी कटकट नको म्हणून गप्प बसले. पटापट कामं संपवून उमा निघाली.

“ताई येते. ”

“थांब जरा”

“अजून दोन घरची कामं राहिलीत”

“माहितीये. फार कामाचीयेस. पोरींसाठी श्रीखंड घेऊन जा “ 

डबा पुढे केला पण उमा काही बोलली नाही. तिला दसऱ्याच्या शुभेच्छा अन सोनं दिलं. ‘सोनं घे अन सोन्यासारखी रहा’ म्हटल्यावर उमा मनापासून हसली.

 

रात्री जेवणं झाल्यावर शतपावली करताना अचानक लक्षात आलं की आपल्या हातात अंगठी नाहीये. काळजात धस्स झालं. आजूबाजूला शोधलं पण अंगठी सापडली नाही. शोधाशोध सुरू झाली. एक तोळ्याची अंगठी हरवल्यानं प्रचंड टेंशन आलं. घरातलं वातावरण तंग. सगळे अंगठी शोधण्याच्या कामाला लागले पण उपयोग झाला नाही. मुलं वैतागली. डोकं भणभणायला लागलं. अहो तर प्रचंड चिडलेले.

“आई, नक्की आठव तूच कुठं तरी ठेवली असशील”मुलगा.

“आईची स्पेशालिटी म्हणजे वस्तू इतक्या सांभाळून ठेवते की वेळेवर सापडत नाहीत. ”

“अंगठी नीट ठेवता येत नाही का? एवढा हलगर्जीपणा!! ”अहो.

“कायम बोटातच असते. संध्याकाळी ओवाळताना काढली होती. ”.. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. लगेच धावत जाऊन ताम्हण पाहिलं पण…..

“ताम्हणात सुद्धा नाही.. मग कुठे गेली. ”.. अहो.

“माहिती असतं तर शोधलं असतं का? ”

“इतका वेंधळेपणा. ”

“त्याविषयी नंतर बोला. आधी अंगठी शोधा. ” 

“तुझं नेहमीचच आहे. स्वतः चुका करायच्या आणि दुसऱ्यांवर डाफरायचं. ”

…. अंगठीचा विषय बाजूला राहून ‘तू तू मै मै’ सुरू झाली. दोघंही तोंड फिरवून बसलो तरी अहोंची बडबड सुरूच. माझी चूक असल्यानं गप्प राहिले. मुलांना मध्यस्थी करावी लागली. पुन्हा शोधकार्य सुरू. घरातला कोपरा अन कोपरा पाहिला अगदी कचऱ्याचा डबासुद्धा.. पण अंगठी सापडली नाही तेव्हा धीर सुटला. खूप रडायला आलं. स्वतःच्या बावळटपणाचा राग आला. या सगळ्या गडबडीत रात्रीचे बारा वाजून गेले. नाईलाजानं सगळे झोपायला गेले पण माझी झोप मात्र उडाली. अंगठीच्या विचारानं रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळीसुद्धा घरात तणावपूर्ण वातावरण होतं. परत शोधलं पण पुन्हा निराशा. इतक्यात दारावरची बेल वाजली. अहोंनी दार उघडलं तर समोर उमा.

 

“ताई!! ” 

“आत आहेत” अहो 

“उमा, तू इतक्या सकाळीच आलीस. आत्ताशी सातच वाजतायेत”

“तुमच्यासाठीच आले”

“म्हणजे.. ”

“ताई, काल दसऱ्याला तुम्ही.. ”

“आता अजून काय झालं. ” मी वैतागले.

“सोनं दिलंत.. ”

“बरं मग, उमा जरा टेंशनमध्ये आहे. डोकं ठिकाणावर नाही. नंतर बोलू. ”.. हे म्हणाले.

“तुमचं काही हरवलयं का? ” 

“तुला कसं माहीत? ”.

“माजा अंदाज बराबर निगाला”

“कसला अंदाज, काय बोलतीयेस. काही कळत नाहीये. ”

“तुमची पण कमाल आहे. पैशे मागितले तर दिले नाहीत आणि.. ”

“आणि काय??? ”

“अहो ताई, काल दसऱ्याच्या सोन्याबरोबर ही खरी सोन्याची अंगठीपण दिलीत. ”

“काय?? ” मी किंचाळले.

“कामं करून घरी गेले. पिशवी रिकामी केली तवा दसऱ्याच्या सोन्याबरबर अंगठी व्हती. काल तुमच्या शिवाय कुणीच सोनं दिल नाय तवा ही अंगठी तुमचीच असणार असं वाटलं. बॅलन्स नव्हता म्हणून फोन केला नाय. तुमी टेन्शनमध्ये असाल म्हणून सकाळच्यालाच आले. ही घ्या. ”

.. उमानं अंगठी पुढे केली. मी एकदम सुन्न झाले. तिला घट्ट मिठी मारली अन जोरजोरात रडायला लागले. पुन्हा पुन्हा आभार मानले.

“उमा, काय बोलू शब्दच नाहीत. ”म्हणत पाचशेच्या दोन नोटा पुढे केल्या पण उमानं घ्यायला नकार दिला.

“ह्याच्यासाठी नाय केलं. तुमची वस्तू परत केली ह्यातच लई मोठा आनंद हाय. ” 

…. हलाखीची परिस्थिती, पैशाची चणचण आणि अत्यंतिक गरज असूनही प्रामाणिकपणा दाखविणाऱ्या उमासाठी खूप आदर आणि कौतुक वाटलं. आजच्या व्यवहारी, स्वार्थी जमान्यात प्रामाणिक असणं वाटतं तितकं सोपं नाहीये. आज खऱ्या सोन्यापेक्षा हे प्रामाणिकपणाचं सोनं मला जास्त मौल्यवान वाटलं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गोलमेज परिषद… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ गोलमेज परिषद… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

गोलमेज परिषद – –  चर्चेचा विषय- “अनघासाठी वर संशोधन

साधारण वीस पंचवीस दिवसच झाले असतील, विवाह संस्थेत अनघाचा फॉर्म जमा करून, रोज मुलांची लिस्ट ची वाट बघणे सुरू होते. तसं संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले होते. तरीही दुसऱ्याच दिवसापासून वाट बघणे सुरू होते. मनात दहा विचारही येऊन गेले. का बरं उशीर होतोय ? आपल्या सारख्या सामान्य परिवार, परिस्थिती असणारी मुलं असतीलच की. फॉर्म तर हरवला नसेल. एकदा जाऊन विचारून यावं का ?? ताईची घालमेल बघून मला तिची उत्सुकता कळत होती. ••••

भाऊजी म्हणाले पण.. “ अग!! हे काम काही एवढं सोपं नाही. त्या संस्थेला आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी बरोबर अभ्यास करून एकमेकांना अनुरूप वर वधूची नावे द्यायची असतात. तुमची माहिती, अपेक्षा, अटी सर्व लक्षात घेऊन त्यांच्याशी मिळती जुळती स्थळ शोधावी लागतात. ” 

ताई म्हणाली, “ बरोबर आहे. सर्व शोधाशोधच आहे. आधी ते शोधतील, मग आपण शोधू. ”

भाऊजी हसले, म्हणाले “अग! प्रत्त्येक कामाची वेळ यावी लागते. कुठे लपलाय ? माहीत नाही. येथेच आहे की अमेरिकेत आहे? हे पण माहित नाही. आजकाल जगातील एक मुलगा शोधायचा असतो. आपल्या वेळेस बरं होतं, एकमेकांच्या ओळखीने स्थळ येत असत. सध्या शेजारच्या मुलांचे स्थळ सांगताना सुद्धा भीती वाटते. सध्या अशा अशा गोष्टी ऐकण्यात येतात, की सहसा मुलं मुली सांगण्याच्या फंदात कोणी पडत नाही. तरी मी माझ्या दोन मित्रांशी याबाबतीत बोललो आहे. ••••

“चट मंगनी पट ब्याह. “असं होत नाही ग. होईल सर्व व्यवस्थित. आत्ता कुठे आपण या कामाला सुरुवात केली आहे. धीर धर ”

बरे असो, •••

सहजच भाऊंजीनी बघितले तर आज पाच मुलांची माहिती आली होती. ताईने लगेच फोन करून मला सांगितले. ••••

आज संध्याकाळी अजय अनिता आॅफिस मधून घरी आले. जेवण झाली. सर्वांना मुलांची माहिती वाचण्याची उत्सुकता होती. •••

“पुन्हा गोलमेज परिषद भरली. ” ••••

बाबा़नी माहिती वाचायला सुरुवात केली. नाव, उंची, शिक्षण, नोकरी, पगार घरातील सदस्य, प्रोप्रटी, स्वभाव, अति विशिष्ठ गुण, म्हणजे उत्तम खेळाडू, तबलावादक, गाण्याची आवड वगैरे वगैरे. पत्रिका बघणे किंवा बघायची नाही. एवढाच काय तो फरक होता. एखादा एकुलता एक तर, एखाद्याला एक बहिण किंवा भाऊ एवढाच परिवार होता. बहिण -भाऊ, आई- वडील सर्वांची माहिती दिलेली होती. एका घरी आजी आजोबा पण आहेत ‌अशी ठोक माहिती कळली. ••••

प्रत्त्येक मुलांची माहिती ऐकून, सर्वच सर्व गुण संपन्न आहेत, असंच वाटलं. •••

त्या नंतर होणाऱ्या बायको बद्दल अपेक्षा लिहिल्या होत्या. ••••

अपेक्षा पण almost सारख्याच होत्या.

मुलगी गोरी, सुंदर, घर सांभाळणारी, समजदार, नोकरी करणारी असेल तर उत्तमच. म्हणजे मुलगी पण सर्व गुण संपन्न, सर्व क्षेत्रात उत्तम, multi-tasker, efficiently घर, आॅफिस सांभाळणारी. वगैरे वगैरे. मुलगी गोरी ही अट किंवा अपेक्षा बहुतेक प्रत्त्येक मुलाची होतीच. ••••

माझ्या सहज मनात आलं, ” देवाचं जरा चुकलंच, काळा सावळा रंग कोणाला दिलाच नसताच तर बरं झालं असतं. “••••

एक स्थळ. – शशांक कुलकर्णी यांच्या अपेक्षा •••• मध्ये मात्र एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट आढळली. ती म्हणजे मोबाईलचा/ social media चा कमीत कमी वापर करणारी मुलगी असावी. अशी अट होती. •••

एक स्थळ -आरव देशपांडे यांच्या अपेक्षामध्ये लिहिले होते •••

” कोणत्याही विषयावर मला तिच्या बरोबर गप्पा मारता येतील, अशी मैत्रीणीच्या रूपात बायको हवी आहे. “••••

माहिती ‘impressive’ वाटली. ••••

माहिती वाचल्यावर भाऊजी म्हणाले, ”आपण दिलेली माहिती तर सामान्यच होती. ही मुलं तर भारी वाटतायेत. “ 

दोन चारदा प्रत्येक मुलाची माहिती वाचून झाली. प्रत्येकाने पुन्हा पुन्हा वाचली. फोन नंबर दिले होते. ••••

कोणाला फोन करावा ?? कुठून सुरुवात करावी ?? कळत नव्हते. •••

तसंही आज फोन करायचा नाही, हे ठरलं होतं. ••••

ताईने लगेच पंचांग काढले, चांगला दिवस, वेळ बघीतली. •••

ताई म्हणाली, ••••• ” उद्या सकाळी करा, चांगला दिवस आहे. अजय अनिताला पण सुट्टी आहे. म्हणजे ते दोघेही घरी असतील. “

कशीबशी रात्र पार पडली. कधी ही न बघितलेले राजकुमार डोळ्यासमोर सारखे दिसत होते. त्यांचे नाव आडनाव आणि इतर माहिती यांचा Mix n Match चा गोंधळ होत होता. उत्साह होताच. कसा response मिळेल ??त्याबद्दल शंकाही होती. चांगले नाही बोलले तर ?? छान response मिळेल का ?? वगैरे वगैरे. ••• ही भीती, anxiety वेगळीच होती. परीक्षेच्या वेळी असायची तशी नव्हती. वेगळंच ‘ feeling ‘ येत होत. मन भिरभिरत होतं. पुन्हा पुन्हा तेच तेच विचार येत होते. स्वतःलाच समजाविणे सुरू होते. मुलाला आणि आपल्या अनघालाही पसंत पडलं पाहिजे. •••••

आज सकाळी फोन करायचे ठरले होते. सर्वजण आपापलं आवरून तयार होते. ताईने चहा नाश्ता जरा लवकरच आटोपला. अजय आणि अनिता वही पेन घेऊन बसले होते. अजय म्हणाला, ” बाबा, फोन स्पीकरवर टाका. आजी साहेब, अनघा पण सर्वांमध्ये बसल्या होत्याच. ••••

सकाळी दहा वाजता ची वेळ ठीक आहे. बहुतेक सकाळची कामं उरकलेली असतात. असं समजून बाबांनी देवाचे नाव घेऊन पहिला फोन ‘श्री देशपांडे’ यांचेकडे लावला. ••••

मुलाचे नाव – आरव देशपांडे 

वडिलांचे नाव. श्री अरविंद देशपांडे.

भाऊजींनी फोन लावला. दोन तीनदा रिंग गेली, कोणी तरी फोन उचलला.

“ हॅलो, नमस्कार. ••• मी आनंद जोशी बोलतोय. मला श्री अरविंद देशपांडे यांचे बरोबर बोलायचे आहे “ नमस्कार, मीच अरविंद देशपांडे. आपण कोण ?? मी ओळखले नाही तुम्हाला. ”

देशपांडे साहेब, ” बरोबर आहे तुमचे म्हणणे, मी आज प्रथमच तुमच्याशी बोलतोय. तुमच्या मुलाचे स्थळ मला विवाह संस्थेकडून कळले. या संदर्भात मी फोन केलाय. या महिन्याच्या अंकात १८० व्या नंबरवर माझ्या मुलीची ‘ अनघा जोशी ‘ ची माहिती आहे. “

“ मी याच संदर्भात आपल्याला फोन केलाय. ” देशपांडे साहेब म्हणाले.

“ हो का ?? ठीक आहे. मी माहिती वाचतो. घरच्यांना ही दाखवतो. त्याप्रमाणे तुम्हाला दोन दिवसांत नक्की फोन करतो” देशपांडे पूढे म्हणाले, “ हे बघा, जोशी साहेब ! गरज दोघांची आहे. लग्न जमेल की नाही माहीत नाही. त्या जोड्या तर देवाने खूप विचारपूर्वक already बनवून ठेवल्या आहेत. आपल्याला ते माहीत नाही म्हणून आपण प्रयत्न करायचे. मी तुम्हाला नक्की फोन करतो. ”

घरातले सगळेच कानात तेल घालून, लक्ष देऊन ऐकत होते. पहिलाच फोन, अनुभव चांगला होता. बोलण्यावरून देशपांडे परिवार चांगला वाटला. कमीत कमी उत्तर सकारात्मक मिळालं. सुरवात चांगली झाली. हेही खूप होतं. असा response मिळाला तरी खूप आहे. जेथे फोन करू तेथे लग्न जमेलच अशी अपेक्षा पण नाही. •••

“गरज दोघांची आहे. ” हे वाक्य ऐकून खरच खूप बरं वाटलं. ••••

अजय म्हणाला, ••• चांगले लोक वाटतायेत. कमीत कमी बोलण्यावरून तरी. बघूया, दोन दिवस वाट बघू 

ताई म्हणाली, ” मग आता दुसऱ्यांना फोन करायचाच नाही का ?? “

“ दोन/ तीन दिवस थांबूया “ भाऊजी म्हणाले… “ असे फोन, लग्नाच्या संदर्भात, तेही अनोळखी घरात, अनेक विचार मनात येतात. कुठेतरी सुरुवातही करायची असते. प्रत्त्येकाचे बोलणे ऐकून त्यांच्या बद्दल काही तरी ‘ impression ‘ करून घेणे, तेही बरोबर नाही. कोणी कमी बोलतात, कोणी दोन तीनदा भेट झाल्यावरच खुलतात. प्रत्त्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. जसे मुलीकडचे विचार करतात, तसेच मुलाच्या वडिलांनाही.. काय बोलावे ?? कुठुन सुरुवात करावी ??? हा प्रश्न पडत असणारच. त्यांनाही काळजी असेलच. एक अनोळखी मुलगी नेहमीसाठी त्यांच्या घरात रहायला येणार आहे. ही जबाबदारीच आहे. हे त्यांनाही समजतच. बरे असो, याबाबतीत बोलणं जेवढं सरळ सोपं मुद्देसूद, असेल तेवढं बरं. दुसरी बाजू ऐकणं पण महत्वाचे. उगीचच गैरसमज व्हायला नको, याची काळजी सगळेच घेत असतील “

ताई म्हणाली, ” त्या जाधव काकू म्हणत होत्या, लग्नाच्या संदर्भात बोलताना सर्व पत्ते एकदम उघडायचे नसतात.

“ म्हणजे काय ??” भाऊजी म्हणाले, “ माहिती पूर्ण द्यायची नाही का ?? नेहमीकरिता संबंध जोडायला निघालो तर घरची पूर्ण माहिती दिलीच पाहिजे. मग ती चांगली असो किंवा नसो. लपवाछपवी येथे चालत नाही. आपले विचार स्पष्ट शब्दात सांगितलेच पाहिजे. नंतर बोलून काही उपयोग नाही. गैरसमज व्हायची शक्यता जास्त असते. बरं, आता या गोष्टींची चर्चा आपल्या मैत्रिणींमध्ये करू नको. या संदर्भात प्रत्त्येक गोष्ट दुसऱ्यांना सांगायलाच पाहिजे असं नाही “ भाऊजीनी ताईला समजाविले.

आता दोन तीन दिवस देशपांड्यांच्या फोनची वाट बघण्यात जाणार. त्यानंतर पूढचे प्लानिंग करायचे 

असे ठरले. असे किती तरी फोन करावे लागणारच आहेत. जसं आपल्याला सर्व पसंत पडत नाहीत, तसेच इतरांच्याही आवडी निवडी असतातच. अपेक्षा अटी असतात. म्हणून काही न काही कारणाने, ••• मग ते पत्रिका जमतं नाही, किंवा अजून काही कारण सांगणारच. म्हणजे पूढचा फोन करणे आलंच. एक साडी/ वस्तू घेताना आपण विचार करतो, हा तर आयुष्याचा मोठा निर्णय आहे. तेव्हा दोन्ही पक्ष भरपूर विचार करणारच.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून चांगलं मिळालं तर बघूया ना. हा मनुष्य स्वभाव आहे. ••••

एवढ्याच पैशात यापेक्षा चांगली साडी मिळाली तर बघूया ना.. असा विचार करून आपण दुसऱ्या दुकानात जातो. ‘ अजून साड्या दाखवा ‘ असं दुकानदाराला म्हणतो. या साडीला लाल ऐवजी मोरपंखी काठ असते तर जास्त चांगले झालं असतं.. काठ थोडे जास्तच मोठे वाटताहेत का ?? अशी चर्चा पण करतो … मुलगी / मुलगा चांगला मिळावा याकरिता पण असंच काहीसं होतं असणार नाही का ?? 

तरी आपल्या अपेक्षा, अटीप्रमाणे तडजोड करून कुठे तरी थांबणं पण जमलंच पाहिजे.

भाऊजी म्हणाले, ” समजा जर नकार आला म्हणजे त्याचा अर्थ माझी किंमत कमी झाली, असा होत नाही. आणि तसा अर्थ घ्यायचाही नसतो.. आपली ‘value ‘ दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार कमी जास्त करायची नसते. ” ••••

म्हणतात ना ••••

“जीवन एक रंगमंच आहे, या रंगमंचावर कोणता कलाकार केंव्हा प्रवेश करेल हे आपल्याला माहीत नसतं. कारण आयुष्याच्या या नाटकाचा दिग्दर्शक स्वतः देव असतो. आपला रोल आपण व्यवस्थित करायचा, एवढंच आपल्या हातात असतं. नाटक यशस्वीपणे पूर्ण करणे ही देवाचीच जबाबदारी आहे, यावर आपण विश्वास ठेवायचा असतो. “••••

म्हणतात ना, ••• 

ईश्वर में आस्था है, और स्वयं पर विश्वास है तो, उलझनों में भी रास्ता हैं।••••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “घास…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “घास…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

ऑफिसमध्ये कामात असताना केबिनच्या दारावर टकटक वाजलं आणि पाठोपाठ अकौटंट आत आले.

“सर, उद्या सुट्टी हवी होती”

“का ओ, काही विशेष”

“पित्र कार्य आहे”

उत्तर ऐकून डोकं सटकलं पण कंट्रोल केला. सुट्टी मंजूर केली. “थॅंक यू”म्हणून ते गेले आणि लगेच त्याच कारणासाठी परचेस डिपार्टमेंटचा एकजण सुट्टी मागण्यासाठी आला.

दिवस उगवल्यापासून आज पित्राचाच विषय चालू होता. सकाळी सौंनी घरात पित्र कार्य करायचं म्हणून सुट्टी घेण्याविषयी आदेश वजा विनंती केली. स्पष्ट नकार दिला. असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही हे चांगलं माहितीयं तरीही तिचा आग्रह सुरूच. हट्टच धरला. खूप समजावलं पण ऐकलं नाही मग कडाक्याचं भांडण. परिणामी बोलचाल बंद. डोकं पार आऊट झालं त्याच तिरमिरीत ऑफिसला आलो तर तिथं पण तोच विषय. खूप चिडचिड झाली नंतर कामाच्या व्यापामुळे आणि पाठोपाठच्या मीटिंगमुळे पित्र विषय मागे पडला. घरी पोचायला अकरा वाजले. खूप थकलेलो. ऑफिसमध्ये खाणं झाल्यानं जेवलो नाही. सौंबरोबर अबोला होताच त्याविषयी सकाळी बघू असा विचार करत कधी झोप लागली कळलंच नाही.

“रघू, ए रघू”

“कोणयं”अर्धवट झोपेतच मी खेकसलो.

“तुझा बाप”

“आप्पा, तुम्ही”

“रघ्या, मला अजून विसरला नाहीस. बरं वाटलं”

“हे सांगायला तुम्ही आलात. ”

“तसं नाही रे”

“आप्पा, तुम्हांला का विसरेल. ”

“मी खूप त्रास दिला ना”आप्पा

“असं काय बोलताय”

“बोलू दे रे. खूप दिवस मनात होतं. गरजेपेक्षा दहा वर्षे जास्त जगलो. शेवटची तीन वर्ष तर अंथरूणावरच तरीही न चिडता, वैतागता तुम्ही दोघांनी माझं खूप केलंत. ”

“आपल्या माणसांसाठी करायचं नाही तर मग कोणासाठी? आणि तुम्हीसुद्धा आमच्यासाठी खूप केलंतच की… ”

“माझ्यामुळं होणारी तुमची ओढाताण बघून खूप वाईट अपराध्या सारखं वाटायचं. ‘लवकर मोकळं कर’ देवाकडं धावा करायचो. त्यानंसुद्धा मागणी पूर्ण करण्यासाठी तीन वर्ष घेतली तोपर्यंत तुमचे खूप हाल झाले. म्हातारे म्हणजे अडगळ असं मानणाऱ्या जमान्यात तुम्ही फार चांगले वागलात. ”

“आम्ही काहीही जगावेगळ केलं नाही. उलट रागाच्या भरात मीच काही वेडंवाकडं बोलून दुखावलं असेल तर माफ करा. टेन्शनमुळे संयम सुटला पण तुमच्याविषयी आदर कायमच आहे. ”

“रघू, माझी काहीही तक्रार नाही. मागच्या जन्माची पुण्याई म्हणून तुझ्यासारखा मुलगा आणि लेकीसारखी सून मिळाली. दोस्तमंडळी माझा हेवा करायची. अनेकांनी तसं बोलूनसुद्धा दाखवलं. ”

“तुमचीच शिकवण आणि संस्कार.! ! ”

“धन्य झालो. मी जिवंत असताना खूप केलस आता काहीही कार्य केलं नाहीस तरी चालेल. ”

“म्हणजे. ”

“आईवडिल असताना विचारायचं नाही आणि गेल्यावर जगाला दाखवण्यासाठी कार्य करणारे अनेक आहेत. ”

“जाऊ द्या. आपल्याला काय करायचं. ”

“ते तर आहेच. अजून एक स्वतःची काळजी घे. जरा धावपळ कमी कर आणि सर्वात महत्वाचं बायकोला जप. फार गुणाची पोर आहे. पोटची पोरगी करणार नाही इतकं माझ्यासाठी केलयं. दोघांनाही खूप खूप आशीर्वाद. ”

एवढं बोलून क्षणार्धात आप्पा नाहीसे झाले अन माझे डोळे खाडकन उघडले.

“अहो, काय झालं. एकदम उठून बसलात”पाण्याचा ग्लास देत सौंनी विचारलं.

“काही विशेष नाही. ” स्वप्नाविषयी सांगितल्यावर तिनं काहीच प्रतिक्रिया दिली नाही पण चेहऱ्यावरून मनात काय चाललयं हे लक्षात आलं.

“तू झोप. मी ठीकयं”असं तिला सांगितलं पण मला काही केल्या झोप येत नव्हती. पहिल्यांदाच आप्पा स्वप्नात आले. त्यांचं आजारपण सौंनं एकटीनं निभावलं. मी ऑफिसच्या निमित्तानं तरी बाहेर जायचो पण ती घरीच असायची. पाच वर्ष हेच रुटीन होतं. आप्पांचं खाणं, औषधांच्या वेळा कधीच चुकवल्या नाहीत. खूप तडजोडी केल्या पण एकदाही तक्रारीचा सुर काढला नाही. आप्पांचासुद्धा तिच्यावर खूप जीव. नंतर नंतर ती लेक आणि मी जावई झालेलो.

आठवणींचे फोल्डर फटाफट उघडल्यानं विचारांची गर्दी झाली. गाढ झोपलेल्या सौ ला पाहून विनाकारणच तिच्याशी वाद घातला असं वाटलं. सकाळी लवकर उठलो. चहा करून सौंच्या हातात दिल्यावर दिला तिला आश्चर्याचा धक्का बसला.

“काल उगीचच भांडलो. सॉरी! ! ”

“जाऊ द्या. ऑफिसला जायचंय. तुम्ही आवरा मी स्वयंपाक करते. ” 

“ऑफिसला दुपारी जाईन”

“का? ”

“पित्रकार्य करायचंय”मी बोलताच सौंनी डोळे वटारले.

“अचानक काय झालं. एवढा मोठा बदल? ”

“असंच. आप्पांच्या पोरीला दुखवायचं नाहीये. मला पटत नाही पण केवळ तुझ्यासाठी….. ”

“रोज अनेक गोष्टी मनाविरुद्ध करतो. तसंच हेही.. फक्त नमस्कार केलात तरी चालेल. ”

“तरीही.. ”

“अंधश्रद्धा, कर्मकांड वगैरेच्या चष्म्यातून न बघता याकडे वेगळ्या दृष्टीनं पहा. रुटीनमध्ये पूर्वजांची आठवण फारशी येत नाही. या निमित्तानं त्यांचं स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीही चूक नाही. त्यांच्या नावे घास ठेवल्यानं काहीही बिघडत नाही. ”

“पण लॉजीकली पटत नाही”

“भावना महत्वाची. नाहीतरी आयुष्य म्हणजे सगळा भावनांचा खेळ. लॉजिकचं म्हणाल तर ते आपल्या सोयीनं वापरायचं असतं. ”

“येस मॅडम. यावेळी घास ठेवायला मी जातो”

“जोडीनं जाऊ” 

बायको किचनमध्ये गेली. नैवेद्य घेऊन टेरेसवर गेलो. मनात खूप सारे विचार घोळत होते. ज्या हातांनी भरवलं, शिकवलं, मोठं केलं. त्यांच्या नावानं घास ठेवताना खूप भरून आलं. घरी आल्यावर आई-आप्पांच्या फोटोकडं पाहताना डोळ्यातले थेंब कधी फोटोवर पडले कळलचं नाही. कितीही वय झालं तरी आई-वडिल नसण्याची वेदना कमी होत नाही. पोरकेपण जाणवतंच…

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गेट टुगेदर… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

 

?जीवनरंग ?

☆ गेट टुगेदर — भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

(या सर्व परिस्थितीत माझ्या मुलाचं शिक्षण सुरु होतं. यात भरीस भर म्हणून माझ्या नवऱ्यानी कंपनी बंद पडली. नवरा घरी, पण त्याला पहिल्यापासून घरचे काही करायची सवय नव्हती. आता सांगितले तर चिडचिड होत होती.) – इथून पुढे — 

त्या काळात मी पहाटे चार वाजता उठत होते, आई चिरून कातून द्यायची.. मग मुलाचा डबा.. मग घरचे जेवणं.. पाणी दूध तापवणे.. सकाळची न्याहारी करणे.. चहा.

सारे करून आणि डबा घेऊन मी आठला बाहेर पडायचे.. मग गाडीची गर्दी.. दादरला जिने चढून पश्चिमरेल्वे ला धावत जायचे, तिथे परत रेल्वे.. पुन्हा बस पकडून कंपनी.. तिथली रोजची टेन्शन.

सायंकाळी पुन्हा उलट प्रवास.. मुंबईची मोठी गर्दी.

त्यात नवऱ्याची कंपनी बंद.. म्हणजे नोकरीं सोडू शकत नाही. सायंकाळी मुलाचा अभ्यास. आई बाबांना औषधे देणे. रात्रीचे जेवणं.. शाकाहारी मावसाहारी..

रात्री पाठ टेकायला बारा वाजत, परत पहाटे चार चा गजर.

मग पुढील काही वर्षात कोण ना कोण आजारी, जास्त आजारी..

सिरिअस.. हॉस्पिटल.. नर्सिंग सुरु झाले.

मग सासरे गेले. मग वडील गेले. आई गेली, सासूबाई गेल्या.

दरम्यान नवऱ्याला दुसऱ्या कंपनीत नोकरीं मिळाली. मुलगा बारावीनंतर मरीन इंजिनीरिंगला गेला.

आता मला थोडी शांतता मिळेल असे वाटतं असताना, अचानक या आजाराने गाठले. मग तपासण्या, सोनोग्राफी, एमआरआय, केमो.. न संपणारी साखळी. एकदा बरा होतोय आजार म्हणता म्हणता पुन्हा त्याने गाठलेच.

मी नोकरीं सोडली, रजा तरी किती घेणार? नवऱ्याची नोकरीं आहे.. मुलगा नोकरीला लागला. आता पैशाची ओढाताण्ड नाही पण माझे स्वास्थ्य?

आता दिवस दिवस मी घरात एकटी, बाई येऊन फरशी पुसून, भांडी घासून जायची.. मग मात्र मी एकटी. मग सगळ्या आठवणी पिंगा घालायच्या. आयुष्यात सुख मिळालेच नाही.. फक्त धावपळ.. मुंबई नावाच्या मगरिच्या तोंडात सापडले.. स्वतः च्या मुलाकडे लक्ष देता आले नाही.

आयुष्यात ऍडजस्ट करण्याचा स्वभाव, कुणाला न दुखावण्याचा स्वभाव.. त्याचा इतरांनी फायदा घेतला.. दोन्ही दिरानी, जाऊंनी आपल्या आईवडिलांना माझ्याच संसारात ठेवलं आपण मस्त वेगळा संसार, ट्रिप्स, नाटक सिनेमे केले. माझी बहीण पण नशीबवान, तिने लग्न केले आणि आईवडिलांना ती विसरली, आपल्या हौसमजा करत राहिली. दुर्दैवी मीच..

आता थोडी उसंत घयावी तर हा जीवघेणा घाणेरडा आजार.. आयुष्याच्या अंताकडे नेणारा..

यात आनंद मिळाला तो शालेय जीवनात.. त्या शाळेची.. त्या बाल मित्रांची हल्ली वारंवार आठवण होते.. अर्जुन, यशवंत, यमुना, चित्रा, मनोज. कुठे असतील हे सर्व? ती वर्षे खुप आनंदाची होती, किती मजा केली या सर्वाबरोबर.. शाळेत जाताना..

पुराच्या पाण्यात एकमेकांचे हात पकडून पलीकडे जाताना.. बोडू, करवंदे, जांभळे खाताना.. एकमेकांचे डबे उघडून खाताना.. ते प्रेम, तो जिव्हाळा परत मिळालाच नाही. या सर्वाना आयुष्याच्या या टप्प्यावर भेटावेसे वाटते.. आपले आयुष्य फार थोडे राहिले आहे.. या सर्वाना एकदा भेटावेसे वाटते.. एकदाच.. एकदाच.

 असे विचार मनात येत असताना अर्जुन काल तुझा लेख पेपर मध्ये पाहिला, त्याखाली तुझा फोन होता, त्या फोन वर तुला फोन केला आणि आज तू आलास.

शालिनी उठून आत गेली आणि तिचा भूतकाळ ऐकून मला वाईट वाटले. चांगल्या स्वभावाचा लोक फायदा घेतात तो असा. सर्वांनीच तिचा फायदा घेतला. शालूने आत जाऊन चहा आणला. एक कप माझ्या हातात दिला, एक कप आपण घेतला.

मी -मग तुझी बहीण अरुणा, ती कधी चौकशी करत नाही?

शालू -मघापासून मी माझ्या घरच्या गोष्टी सांगत बसले अजून माहेरच्या गोष्टी तुला ऐकायच्या आहेत.

मी -माहेरच्या गोष्टी? तूझ्या माहेरी म्हणजे तुझी बहीण अरुणा..

शालू -होय, अरुणाने दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न जमवले म्हणून बाबांनी तिच्याशी संबंध तोडले हे मी तुला सांगितलं पण अरुणाला माझ्या सर्व गोष्टी कळत होत्या. बाबा गेले, मग आई गेली हे तिला कळले. गेली दोन वर्षे ती आईचे दागिने मागते आहे.

मी -काय? आईचे दागिने?

शालू -माझ्या या व्हाट्सअप वरील तिचे मेसेज वाच म्हणजे तुला खरे वाटेल.

शालूने अरुणा या नावाचा व्हाट्सअप उघडून माझ्या हातात मोबाईल दिला. मी नजर टाकली, अरुणाने खालच्या भाषेत दागिन्याची मागणी केली होती. मी वाचून तिच्या हातात मोबाईल दिला.

मी -मग? तू काय ठरवलेस?

शालू -अर्जुन, मला दागिन्याचा मोह नाही.. खरं तर आईने हे दागिने आमच्या गावच्या काकांच्या मुलाच्या लग्नात त्याच्या बायकोच्या अंगावर घालायला सांगितले होते. म्हणून मी जपून ठेवलेत.. पण आता मी ठरवलय, अरुणाला हे दागिने देऊन टाकायचे.. पण मी तिला बोलावून तिची आईवडिलांची जबाबदारी तिने पार पडलेली नाही, हे सुनावणार आहे आणि मगच हे तिला देईन.

अर्जुन, मी निराश झाले आहे. सर्व जवळच्या माणसानी मला निराश केले आहे. यावेळी मला आपल्या शाळेतील मित्र मैत्रिणीची आठवण येते आहे. माझे आयुष्य कमी आहे, कदाचित सहा महिने किंवा जास्तीत जास्त वर्ष.. अर्जुन, मला आपल्या वर्गातील मित्रांना भेटायचं आहे..

या करिता तुला शोधत होते.

सुदैवाने तुझा नंबर मिळाला, तू इतरांना शोधून काढ आणि आपण एकदा भेटू.. कदाचित ही शेवटची.

मी -हा, शालू पुढे बोलू नको.

आपण शक्य होतील तेव्हढे भेटू.. लवकरच. मी येतो, तुला कळवितो.

मी बाहेर पडलो.

मी शालूच्या घरातून बाहेर पडलो, आता मला वर्गातील इतर सावंगड्यांचा शोध घ्यायचा होता. मनोजचा फोन माझ्याकडे होता, मी त्याला फोन लावला आणि त्याचेकडे अजून कुणाचे नंबर आहेत का आणि जास्तीत जास्त मंडळींना जमवायचा प्रयत्न कर असे सांगितले.

यमुना आणि चित्रा गावात रहात होत्या, मी माझ्या पुतण्याला सांगून त्त्यांचे नंबर मिळविले, त्यानी आणखी चार नंबर दिले. म्हणता म्हणता आठ दिवसात वर्गातील पंधरा वर्गमित्राचे नंबर मिळाले आणि मी व्हाट्सअप ग्रुप तयार केला.

शालू पण व्हाट्सअपवर होतीच, पंधरा सोळा शाळा सोबती खुप दिवसांनी भेटत होते, मग काय चेष्ठा, मस्करी यांनी उत आणला. शालू यात हिरीरीने भाग घेत होती, हे मी पहात होतोच. शाळेत असताना तिच्या मैत्रिणी तिला “, डोंगळो ‘म्हणायच्या, डोंगळो म्हणजे मोठी काळी मुंगी, ती साखर दिसली की धावते, शालूला साखर आवडायची, तिच्या डब्यात रोज साखर असायची आणि ती आवडीने खायची.

यमुनेने तिला “काय डोंगळ्या? कसा आसास? असे विचारले आणि सर्व जणं तिला “डोंगळो ‘म्हणू लागल्या. शालूला ते आवडायचे.

मी जास्तीत जास्त वर्गमित्र मैत्रिणी एकत्र करण्याच्या प्रयत्नात होतो.

आता मला गेटटगेदर जमवायचे होते, दिवस थोडे होते, डॉक्टरनी शालूला जास्तीत जास्त एक वर्षाचे आयुष्य दिले होते.

आपल्या शाळेत पुन्हा मुलांनी जमावे असे मला वाटतं होते, मी शालूला तुला प्रवास जमेल का असे विचारले. तिची इच्छा होती, एकदा शाळा, आपला वर्ग डोळेभरून पहाण्याची.

मी आम्हांला शिकविलेल्या शिक्षकांचा शोध घेतला, त्यातील वझे बाई, सामंत बाई, प्रभू सर, वालावलकरबाई येऊ शकत होत्या.

मग 26 जानेवारी हा दिवस ठरविला. शाळेतील सर्व व्यवस्था यमुना, चित्रा, मनोज सांभाळणार होते.

मी 24 जानेवारीला चांगली इनोव्हा गाडीत शालू, तिचे यजमान, मी, माझी पत्नी निघालो. चार तासाने थांबत थांबत रात्री माझ्या गावच्या घरी पोहोचलो. घरी सर्व तयारी होतीच. जवळ जवळ चाळीस वर्षांनी शालू या गावात आणि माझ्या घरी येत होती. या परिसरात तिचे लहानपण गेले होते, ती खूश झाली.

तिला रात्री छान झोप लागली.

दुसऱ्या दिवशी शाळेत तीस वर्गमित्र मैत्रणी जमले होते. कितीतरी वर्षांनी एकमेकाला भेटत होती. सर्वांनी शालूची म्हणजे “, डोंगळो ‘ची खुप काळजी घेतली. माझे लक्ष शालूकडे होते, पण ती मजेत होती..

हसत होती.. खिदलत होती..

मस्करी करत होती.

मग एक एक शिक्षक वर्गात आले. वालावलकरबाईंनी कविता शिकवायला सुरवात केली.

“खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एव्हड्या ‘.

बाईच्या डोळ्यात पाणी होते, चाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या, आम्ही सर्व सदगदित झालो. माझे शालूकडे लक्ष होते, ती पण डोळे पुसत होती.

मग वझे बाई आल्या. संस्कृत शिकवायला लागल्या 

“हसतास्य भूषण दानम, सत्य कंठस्य भूषणम ‘….

सर्वाना आठवणी.. डोळे पाणावलेले.

कंठ दाटलेले..

दुपारी सर्वाना जेवणं, मग करमणूकीचे कार्यक्रम.. यमुनाने आणि चित्राने “मुंगळा.. मुंगळा ‘या गाण्याच्या चालीवर “डोंगळा.. डोंगळा म्हणत जोरात नाच केला आणि शालूला हस हस हसवले.

सायंकाळी निघताना मी जाहीर केले, आता पुढील भेट पुढील जानेवारीत, शालूच्या मुंबईतील घरी. तेंव्हा या भागातील मंडळींनी मुंबईत यायचे.

शालू कावरीबावरी होऊन माझ्याकडे पहात होती आणि हाताने “नाही.. नाही म्हणत होती, माझ्या लक्षात आले, पुढील जानेवारीत मी नसेन, असे तिला सांगायचे होते, पण मी हातानेच तिला गप्प केले.

दुसऱ्या दिवशी आम्ही शालूच्या चुलत भावाला भेटलो, आईच्या दागिन्यातील अर्धे दागिने तिने भावाला दिले, मग कणकवलीजवळ अरुणाला भेटलो आणि आईचे निम्मे दागिने तिला दिले.

पुढील वर्षी शालूच्या मुंबईतील घरी पुन्हा आम्ही भेटलो. पुढील वर्षी माझ्या घरी.

जास्तीत जास्त एक वर्षाचे आयुष्य असलेल्या शालूने दोन्ही कार्यक्रमाची मजा घेतली.

आम्ही पहिल्यांदा भेटलो त्याला चार वर्षे झाली, वर्गमित्र भेटल्याने शालूची जीवनाची आसक्ती वाढली, मध्ये छोटे ऑपरेशन झाले, ते तिने सहन केले आणि आता ती वाट पहात आहे, पुढील वर्षाच्या गेटटूगेदरची.

– समाप्त –  

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गेट टुगेदर… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ गेट टुगेदर… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

माझ्या मोबाईलवर अनोळखी नंबरचा कॉल आला, मी असे फोन टाळतो पण का कोण जाणे मी फोन घेतला.

“हॅल्लो, अर्जुनचा नंबर काय?

कुणीतरी स्त्रीचा आवाज पलीकडे होता.

“होय मी अर्जुन, आपण कोण?

“अरे अर्जुन, मी शालू.. शालिनी नाईक.. वर्गातली.

“अगो शालू तू? किती दिवसांनी?खय आसत?

“अरे मी मुलुंड मध्ये रवतंय, तू खय रवत?

“मी वांद्रा, तुका माजो नंबर कोणी दिलो, ?

“इच्छा आसली म्हणजे मार्ग सापडता म्हणतात, गेली दोन वरसा मी तुजो पत्तो शोधताय, आज नवशक्ती मधी तुजो लेख इलोवा ना छापून, त्याच्या खाली तुजो नंबर होतो ‘.

बरा बरा, छान वाटला शाळेतल्या सुंदरीचो फोन इलो म्हणून ‘.

“सुंदरी खयची बाबा, ता सगळा संपला.

“म्हणजे?

“तुझ्याशी बोलाचा होता, तुझी मदत होयी माका, एकदा ये इकडे, जास्त दिवस नाय माझ्याकडे.

“म्हणजे? काय बोलतस?

“ये वेळ काढून.. तुका खुप सांगाच आसा. पत्तो पाठ्वतय व्हाट्सअपवर, मी तसा घरातच आसतंय, तरी हॉस्पिटलमध्ये गेलंय तर म्हणून फोन करून ये ‘.

फोन बंद केला आणि माझ्या डोळ्यसमोर शालू आली, शालिनी नाईक. आम्ही एका वर्गात होतो सातवी ते दहावी पर्यत. तिचे वडील पोस्टमास्टर म्हणून आमच्या गावात बदलून आले, मूळचे ते तिकडे आरोंदा शिरोडा भागातील, शालू आणि तिची लहान बहीण अरुणा. अरुणा शालू पेक्षा दोन वर्षांनी लहान.

तिच्या वडिलांनी त्त्यांचे बिऱ्हाड आमच्या वाडीत केले कारण पोस्ट आमच्याच वाडीत होते, वेळी अवेळी एसटी ने टपाल यायचे, पोस्टमन हजर नसला तर शालूचे बाबा स्वतः टपाल उतरवून घेत.

आमची शाळा थोडी लांब होती, वाटेत मोठा ओढा होता, पावसाळ्यात त्याला पूर येई. वाटेत जाग पण फारशी नव्हती, त्यामुळे शालू आणि तिची बहीण अरुणा आम्हा मुलासामवेत शाळेत जाईत आणि येईत.

शालू हुशार आणि शांत, अरुणा अभ्यासात कच्ची आणि भांडखोर. अरुणा नेहेमी वर्गातल्या मुलामुली बरोबर भांडणे काढी आणि शालू त्या मिटवी. त्यान्च्या आईची शालू जास्त आवडीची होती तर बाबांना अरुणा आवडे.

शालूची आई माझ्याआईकडे नेहेमी येई मग दोघी जोडीने महिला मंडळात जात, सायंकाळी देवळात जात. भाजी आणायला, किराणा आणायला एकदम जात.

शालू वर्गात आली आणि तिने माझा पहिला नंबर घेतला आणि मी दुसरा. अरुणा माझ्या बहिणीच्या वर्गात होती, ती काशिबशी पास होतं होती. त्या वयात मला शालू आवडत होती, पण माझे एकतर्फे प्रेम ते. शालू नेहेमी आपले आईवडील, अभ्यास आणि धाकटी बहीण या विश्वात असायची.

एकदा अकरावीच्या दोन मुलांनी शालू ला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी तिने मला त्याची तक्रार सांगितली होती आणि मग आम्ही मित्रांनी त्या मुलांना चोप दिला होता, हे आता आठवले. दहावी नंतर तिच्या बाबांची बदली वेगुर्लेला झाली आणि ती मंडळी इथून गेली. मग फारश्या भेटी नाहीतच.

तिच्या बाबांनी दोघी मुलींना कॉलेजसाठी सावंतवाडीला ठेवल्याचे कळले.

आज जवळजवळ चाळीस वर्षांनी शालूचा फोन आला, भेटायला ये म्हणून, पण ती आपले थोडेच दिवस राहिले असे का म्हणाली?

शनिवारी ऑफिस सुटले की शालूकडे जायचे असे मी ठरवले.

शालूने व्हाट्सअपवर तिचा पत्ता पाठवला, मी शनिवारी ऑफिस सुटल्यावर तिच्या घरी जायला निघालो. शोधत शोधत तिच्या घरी आलो, बेल वाजवताना छातीत धडधडत होते, चाळीस वर्षे मध्ये गेली, दहावीत असतानाची शालू डोळ्यसमोर येत होती.. शाळेच्या ड्रेसमधली, निळा स्कर्ट.. पांढरा ब्लाउज, पायात सॅन्डल्स.

दार उघडल आणि एका कृश स्त्रीने “ये ‘म्हंटल.

मी आत आलो, लख्ख प्रकाशात मला शालू दिसली.. तिच्याच घरात आलो म्हणून मला समजले ती शालू आहे म्हणूंन.. माझ्यसमोर केस गेलेली, कृश झालेली, चेहेऱ्याची रया गेलेली अंदाजे साठ सत्तर वयाची बाई उभी होती.

“मला ओळखणार नाही तू, आजाराने माझी रया गेली रे ‘.

मी दोन क्षण गप्प झालो, मग हळूच म्हंटले “, कसला आजार?

“माझ्या केमो सुरु आहेत, त्यावरून काय ते ओळख ‘.

“ओहो, सॉरी, केंव्हापासून?

“सहा वर्षे झाली, ट्रीटमेंट सुरु आहे, चार महिने बरे जातात.. परत सुरु ‘.

“घरी कोणकोण असत तूझ्या?

“माझे मिस्टर, मुलगा शिप्सवर असतो, सध्या जपानच्या बाजूला आहे, आता तीन महिन्यांनी येईल’.

“मग घरी तू एकटीच?

“केअरटेकर आहे, आता दुपारी जरा घरी गेली, पाच वाजता येईल, नवरा सहावाजता येतो ‘.

“तुझे आईबाबा, अरुणा?

“तुला सर्व सांगायचेच आहे, म्हणून मुद्दाम तुझा नंबर मिळताच तुला फोन करून बोलावले ‘.

“सांग, मी वेळ काढून आलोय, माझा फोन बंद करतो ‘

असं म्हणून मी फोन बंद केला, आतमध्ये जाऊन शालूने पाणी आणुन दिले.

शालिनी 

.. खुप दिवसापासून वाटतं होतं.. कुणाशी तरी बोलाव… आपलं मन मोकळ करावं.. मनात साचलेलं, त्याचा निचरा करावा.. अर्जुनची आठवण येत होती.. सातवी ते दहावी पर्यंतचा वर्गमित्र अर्जुन.. त्याच्या शेजारीच आम्ही रहायचो. शाळेत जाताना यशवंत, मनोज, यमुना, सरोज, विलास आम्ही सर्वजण मजा मजा करत जायचो. एकमेकांवर पाणी उडवायचो, जांभळे, करवंदे खायचो. दुपारचा डबा पण एकत्र उघडायचो, त्यात लीडर असायचा अर्जुन. शाळा सुटली मग कॉलेज, पण तसें मित्र मैत्रिणी मिळाल्याच नाहीत.

बाबांची वेगुर्ले मध्ये बदली झाली आणि ही मित्रमंडळी भेटायची बंद झाली. मग कॉलेज, नोकरीं आणि लग्न करून मुंबईत. कोकणातल्या मुलींची दिशा ठरलेली असते, त्याच प्रमाणे.

अरुणा ने मात्र नर्सिंग केल आणि ती जिल्ह्यातच राहिली. तीच लग्न त्यान्च्याच डिपार्टमेंटमधील तिनेच ठरवले आणि दुसऱ्या जातीतील. बाबांना ते पसंत नव्हते, खुप वादविवाद झाले, रडाराडी झाली पण अरुणा ऐकली नाही, त्यामुळे बाबांनी तिचे नाव टाकले.

मी लग्न करून मुंबईत आले, सासऱ्यांचे घर माहीममध्ये होते. माझे मोठे दीर आधीच वेगळे बोरिवलीत राहायला गेले होते, ती दोघ नोकरीं करत होती, माझा धाकटा दीर लग्नाचा होता. माझे सासरे कटकटी, फटकलं, त्यामुळे त्यांच्याशी कुणाचे पटायचे नाही, माझी मोठी जाऊ पण तोडीस तोड, त्यामुळे दोघ समोरासमोर आली, की तू.. मी.. तू. मी व्हायचंच. माझी कंपनी जोगेश्वरीमध्ये, त्यामुळे मला माहीमहुन कंपनीत जाणे बरे पडायचे. मी तोंड मिटून असायची, त्यामुळे सासू सासरे मला बरी म्हणायचे. माझा नवरा केमिकल कंपनीत, त्याच्या शिफ्ट असायच्या. पण तो कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही.. नाकासमोर बघून चालणारा.

पण धाकट्या दिराचे लग्न ठरले आणि आम्हाला जागा शोधावीच लागली, मग मुलुंडच्या या जागेची बातमी समजली आणि दोघांनी कर्ज काढून ही जागा घेतली.

मुलुंडला आलो खरे पण मला रोज कंपनीत जाणे त्रासदायक होऊ लागले. मुलुंडहुन दादर आणि दादर हुन दुसरी ट्रेन पकडून कंपनीत जायचे. त्यात कंपनीत माझ्यावर मोठी जबाबदारी. त्यात मला दिवस गेले आणि अभयचा जन्म झाला. माझी खूपच धावपळ, याकाळात माझी आई आणि बाबा माझ्याकडे आले. कारण बाबा निवृत्त झाले होते. आणि माझ्या बहिणीबरोबर त्यानी संपर्क ठेवला नव्हता. या काळात माझा आईने मला मोठी साथ दिली. तिच्या विश्वासावर मी अभयला सोडून नोकरीला जाऊ लागले.

अभय मोठा होतं होता, माझे वडील त्याला शाळेत सोडायचे, आणायचे.

माझी छोटी जाऊ नोकरीं करणारी, तिचे आणि सासूबाईचे एक मिनिट पटेना. सासऱयांचे कुणाशीच पटत नव्हतेच. मोठया दिराने आणि जाऊने आधीच हात वर केलेले. त्यामुळे माझी सासूसासरे माझ्याकडे येऊन राहिले.

आता छोटया घरात चार ज्येष्ठ माणसे. लहान मुलगा. नवऱ्याच्या शिफ्ट्स. माझी लांब नोकरीं. माझे खुप हाल होतं होते, माझ्या सासऱ्यांना रोज मासे हवे असायचे तर माझे बाबा शाकाहारी जेवणारे. सासूबाई देव देव करणारी तर आईला त्यात रुची नव्हती.

चार वेगळ्या स्वभावाची माणसे एका घरात राहत होती, मी रात्री आले की प्रत्येकाची एकमेकांची तक्रार.

माझ्या नवऱ्याने आपल्या भावांना आईवडिलांना काही काळ तरी न्यायला सांगितले पण ते दुर्लक्ष करत होते शिवाय माझे सासरे पण त्याच्याकडे जायला तयार नव्हते.

नंतर तर माझ्या अडचणी वाढल्या. सासऱ्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यानी बेड पकडला. त्यान्च्या सुश्रुशेसाठी एक माणूस घरी येऊ लागला. त्त्यांचे सर्व जाग्यावर असल्याने घरात दुर्गंधी पसारायची त्यामुळे माझे आईवडील चिडायचे.

यात भरीस भर म्हणून आईचा दमा वाढू लागला. वडिलांना हार्ट अटॅक आला, हॉल मध्ये दोन बेड वर दोन पेशन्ट. सासूचे गुढगे दुखतं होतेच. माझ्या सुट्टीच्या दिवशी मी कुणाला न कुणाला हॉस्पिटल मध्ये नेत होते आणत होते.

या सर्व परिस्थितीत माझ्या मुलाचं शिक्षण सुरु होतं. यात भरीस भर म्हणून माझ्या नवऱ्यानी कंपनी बंद पडली. नवरा घरी, पण त्याला पहिल्यापासून घरचे काही करायची सवय नव्हती. आता सांगितले तर चिडचिड होत होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ यशोदा का नंदलाला… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ यशोदा का नंदलाला… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

(बाळ आधीच जन्मले असल्याने त्याची काळजी घेणं सुरू होतं, पण धोका नव्हता. तिचा आनंद गगनात मावेना. ती आई झाली होती… पण तिला आणि त्याला कुठे ठाऊक होतं की त्यांच्या पुढ्यात अजून बराच खडतर प्रवास मांडून ठेवला होता ते …) – इथून पुढे — 

हैदराबादच्या डॉ नम्रता यांच्या IVF क्लिनिकमधील यशस्वी उपचारांनंतर, लग्नानंतर सात आठ वर्षांनी, surrogate pregnancy द्वारा, ती आई झाली होती. बाळाचा जन्म सातव्याच महिन्यात झाला, उपचार सुरू होते आणि बाळ सुखरूप होते.

तिचा आणि त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. पहिल्या फ्लाईटने दोघंही हैदराबादला रवाना झाले. बाळ ज्या इस्पितळात होतं तिथं पोचले. भरपूर जावळ असलेल्या, आणि जरी सातोळा (सातव्या महिन्यात जन्मलेला) असला तरी त्या मानाने खूपच छान प्रकृती असलेल्या त्या कृष्णकन्हैयाला तिनं उचलून घेतलं. तिला उचंबळून आलं.

.. .. .. तिचं बाळ !

किलोभर पेढे घेऊन ते दोघंही डॉ नम्रतांकडे गेले. सीझेरियन शस्त्रक्रिया आणि त्यातील गुंतागुंत यामुळे दोन लाख रुपयांचं जास्तीचं बिल झालं होतं, पण अपत्यप्राप्तीच्या आनंदापुढे ते या दोघांच्याही खिजगणतीत नव्हतं.

डॉ नम्रता कागदपत्रांची पूर्तता करत होत्या. जन्मदाखला वगैरे सोपस्कार पार पडले होते. हे बाळ या दोघांचेच आहे हे सिद्ध करणारे DNA चाचणीचे निकाल यायचे बाकी होते. पण त्याची वाट न पहाता हे दोघं आपल्या शहरी परतले.

दिसामासांनी कृष्ण वाढत होता, त्याच्या बाळलीला पाहण्यात – अनुभवण्यात दिवस कधी सुरू व्हायचा आणि कधी संपायचा हे तिला उमगतही नव्हतं.

तेवढा DNA चाचणीचा निकाल अजून बाकी होता, पण ती औपचारिकता ते जवळपास विसरलेच होते.

आज तो आनंद, आनंद !

एके दिवशी, याच्या डोक्यात आलं, भले डॉ नम्रतांकडून रिपोर्ट आला नसेल, पण बाळ तर इथेच आहे, आणि आपण दोघेही इथेच आहोत, मग इथे आपल्या शहरातच करून घेऊ या की DNA चाचणी.

त्यांनी चाचणी करून घेतली, रिपोर्ट आला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बाळाचा DNA आणि त्या दोघांचे DNA यात काहीच साम्य नव्हतं, हे त्यांच्या शुक्राणू आणि बीजांडापासून निर्माण झालेलं बाळ नव्हतंच.

सुन्न होऊन तो रिपोर्ट ते बघत असतानाच त्यांना हैदराबादहून फोन आला. फोन करणाऱ्याने आपण हैदराबादमधील पोलिस स्टेशनमधून बोलत असल्याचं सांगितलं.

“वो डॉ नम्रताको अरेस्ट हुवा है. वो फ्रॉड है. पहलेभी २०२१ में उनका लायसन्स कॅन्सल हुवा था, लेकीन फिरभी वो क्लिनिक चालू रख्खी थी.”

हे दोघं मटकन खालीच बसले.

तिथून फोनवर तो इन्स्पेक्टर सांगत होता. काही ग्राहकांच्या तक्रारीवरून जेव्हा त्या क्लिनिकवर धाड घातली गेली, तेव्हा बनावट जन्मदाखले, बनावट कागदपत्रं यांचे गठ्ठेच्या गठ्ठे तिथे सापडले. लिंगनिदान करण्याची बेकायदा उपकरणंही तिथे सापडली.

गर्भधारणा झालेल्या गरजू दाम्पत्याला पकडायचं, त्यांच्याशी नाममात्र रकमेत करार करायचा आणि त्यांची बोळवण करायची, खोटेनाटे रिपोर्ट छापून आईवडिलांची फसवणूक करायची असे अनेक गोरखधंदे डॉ नम्रता करत होती.

“तिचा मुलगा वकील आहे, तो तिला कायदेशीर पळवाटा शिकवतो,” इन्स्पेक्टर सांगत होता. “कस्टमर से ट्रीटमेंट के नाम से पैसा लिया जाता था, लेकीन कुछ ट्रीटमेंट दिया नहीं जाता था. असली खेल केवल बच्चोंके माता पिताको चार पैसे देकर चूप कराना और वो बच्चा किसी और को उन माता पिता के IVF से पैदा हुवा बच्चा कहकर थमा देना इतनाही था… ..

.. .. आपको दिया गया बच्चा IVF से नहीं हुवा है, न ही वो आपका बच्चा है. न ही वो सातवे महिने में पैदा हुवा है. वो पुरा नौ महिने के प्रेग्नन्सी के बाद पैदा हुवा है. किसी औरसे बच्चा खरीदकर उसे आपको आपका बच्चा कहकर थमा दिया है. आपका बच्चा जिनसे खरीदा उनको मात्र ९०,००० रुपये दिये गये….”

तो ऐकत राहिला. यांच्याकडून आत्तापर्यंत तब्बल ३० लाखांच्यावर रुपये डॉ. नम्रताने घेतले होते. पण त्याच्यासमोर दुसरंच वादळ घोंघावत होतं.

तिला आपल्या रक्तमांसाचं नसलेलं बाळ कधीच दत्तक घ्यायचं नव्हतं. म्हणून तर ते दोघं IVF ट्रीटमेंटच्या मागे लागले होते, आणि आता तो गोडू कृष्णकन्हैया त्यांचं बाळ नसल्याचं उघड झालं होतं.

त्यानं प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे पाहिलं… त्याच्या नजरेतला प्रश्न तिला कळला.

त्या गोडुल्याला कवटाळून घेत, त्याच्या जावळातून हात फिरवत ती म्हणाली, “आपण याला कध्धी कध्धी सोडणार नाही, अंतर देणार नाही. हे आपलं बाळ नसलं म्हणून काय झालं, यशोदेने नाही का नंदलालाला वाढवलं ? हा आपला नंदलालाच आहे.”

त्याने सुटकेचा निःश्वास सोडला, त्यालाही बाळाचा लळा लागला होता. डॉ नम्रताचं काय होईल ते होईल, यांच्या घरात मात्र गोकुळ उभं राहिलं होतं, नंदलाला घर पधारे थे…

– समाप्त –

(सत्य घटनेवर आधारित)

 श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ यशोदा का नंदलाला… भाग १  ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ यशोदा का नंदलाला… भाग १  ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

तो आणि ती.. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेले. सात वर्षांपूर्वी लग्न झालं होतं त्या दोघांचं, पण जणू आजही एकमेकांकडे इतक्या प्रेमाने पहायचे की जणू कालच लग्न झालं असावं.

परीकथेतील राजा राणीच होते ते दोघं.

पण परीकथेत राजा राणीला शाप असतो, तसाच या दोघांनाही होता. अजून संसारवेलीवर फूल उमललं नव्हतं.

.. आधी “प्लॅनिंग” आहे म्हणून बाळ होत नाहीये अशी मनाची समजूत करून घेतली गेली, मग डॉक्टर, वैद्य आणि त्यानंतर अगदी गंडेदोरे, बुवा, उपासतापास सगळं करून झालं. ‘तुम्ही दोघंही अगदी नॉर्मल आहात, कधीही बाळ होऊ शकतं’ यापासून ‘त्याच्यात दोष आहे, तिच्यात दोष आहे, तुम्हाला कधीच बाळ होऊ शकत नाही’, इथवर सगळी उत्तरं ऐकून झाली.

तिच्या मैत्रिणीने बाळ दत्तक घ्यायचं सुचवलं, पण तिला काही तो पर्याय रुचला नाही.

अशात त्यांना एकाने हैदराबादच्या एका in vitro fertilization clinic चे नाव सुचवलं.

वैद्यकीय दृष्ट्या शक्य असेल तर त्याचा शुक्रजंतू/शुक्राणू (sperm) आणि तिचं बीजांड (egg/ovum) यांचं कृत्रिमरीत्या फलन (fertilisation) केलं जातं, IVF यशस्वी ठरले की भ्रूण आईच्या किंवा surrogate आईच्या गर्भाशयात ठेवला जातो आणि पुढे बाळाचा जन्म होतो अशी ही IVF ची प्रक्रिया.

बुडत्याच्या काडीचा आधार घेत हे दोघं हैदराबादला पोचले. ६० – ६५ वर्षांच्या, क्लिनिकच्या प्रमुख डॉ नम्रता यांनी या दोघांना आश्वस्त केलं. मात्र त्यांच्या वैद्यकीय फाईल्स बघताना त्यांचा चेहरा गंभीर होत गेला.

“हं! आव्हानात्मक आहे,” शेवटी त्या म्हणाल्या, पण लगेच चेहऱ्यावर पुन्हा स्मित खेळवत त्या म्हणाल्या, “पण चिंता करू नका, यापेक्षाही अवघड केसेसमध्ये आपण यश मिळवलं आहे. थोडा खर्च जास्त होईल अन्य क्लिनिकपेक्षा, पण तुम्ही आई झाल्याशिवाय आपण हार मानणार नाही.”

या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, आशेचा किरण दिसू लागला होता.

मग सुरू झाले ट्रीटमेंटचे सोपस्कार.

प्रत्येक मासिक पाळीला स्त्री एकच बीजांड तयार करते. IVFची पूर्वतयारी म्हणून औषधोपचारांनी, हार्मोन उपचारांनी, दर पाळीच्या वेळी जास्त बीजांडं तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्याची वीर्य तपासणी करण्यात आली, त्याला काही औषधं देण्यात आली.

बीजांड फलनाचे पहिले दोन प्रयत्न निष्फळ ठरले, आशानिराशेच्या हिंदोळ्यावर चार पाच महिने असेच गेले, खर्च वाढत होता, पण त्यापेक्षाही मातृत्वाची भूक अपूर्ण राहण्याचा सल जास्त बोचरा होता.

तिसऱ्या वेळच्या IVF वेळी मात्र, निकाल सांगताना डॉ नम्रतांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू होतं. तिचे दोन्ही हात हाती घेऊन, बहुप्रतिक्षित असलेलं वाक्य त्या म्हणाल्या, “अभिनंदन, हे fertilisation यशस्वी झालेले आहे.”

मग पुढच्या चाचण्या सुरू झाल्या. दोन तीन चाचण्यांचे नकारात्मक निकाल, तिचं वाढतं वय आणि वाढता रक्तदाब या सगळ्या गोष्टी ध्यानात घेता, तो, ती आणि डॉक्टर पुन्हा एकदा चर्चेस बसले.

“चांगली बातमी ही आहे, की भ्रूण अतिशय healthy आहे, त्याची वाढ छान आहे. परवा fertilisation यशस्वी झालं, पाचवा दिवस हा त्या भ्रूणाचे गर्भाशयात प्रत्यारोपण करण्यासाठी अगदी योग्य असतो. पण तुझे रिपोर्ट्स आपल्याला अनुकूल नाहीत,” डॉ नम्रता सांगत होत्या, “त्यामुळे आपण धोका न पत्करता, surrogate pregnancy चा मार्ग अवलंबूया का? तुमचा गर्भ आपण एका धट्ट्याकट्ट्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढवू या आणि एका healthy बाळाला जन्म देऊया.”

डॉक्टरांनी त्या दोघांचं मन वळवलं, त्यांनी संस्थेमार्फत ताबडतोब एका महिलेशी संपर्क साधला आणि तिच्याशी surrogate pregnancy (गर्भाशय भाड्याने देण्या) चा करार केला. या कराराद्वारे, त्या महिलेचा या बाळावर कोणताही कायदेशीर हक्क राहणार नसतो.

भ्रूण प्रत्यारोपणाची प्रक्रिया यशस्वी झाली.

इतके दिवस ते दोघंही हैदराबादेतच तळ ठोकून होते. तो वर्क फ्रॉम होम करत होता. आता इथे राहण्याची गरज संपली होती. ते दोघं आपल्या शहरी परतले. नियमितपणे डॉ नम्रतांचे फोन त्यांना येत होते आणि गर्भवती मातेच्या प्रगतीची खुशखबर त्या देत होत्या.

मात्र, सातव्या महिन्यात, त्यांनी अचानक फोन करून सांगितलं, की त्या आईची प्रकृती अचानक बिघडली, बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला, त्यामुळे तडकाफडकी C section (सीझरीयन) शस्त्रक्रियेने प्रसूती करावी लागली. खुशखबर ही होती की बाळ सुखरूप होतं आणि आईच्याही जीवाचा धोका आता टळला होता.

बाळ आधीच जन्मले असल्याने त्याची काळजी घेणं सुरू होतं, पण धोका नव्हता.

तिचा आनंद गगनात मावेना. ती आई झाली होती… पण तिला आणि त्याला कुठे ठाऊक होतं की त्यांच्या पुढ्यात अजून बराच खडतर प्रवास मांडून ठेवला होता ते…

– क्रमशः भाग पहिला 

(सत्य घटनेवर आधारित)

 श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “गजरा स्कॉलरशीप” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “गजरा स्कॉलरशीप” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

बहुसंख्य विद्यार्थी मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गातले असलेली शहरातील मराठी-सेमी इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये सुप्रसिद्ध उद्योगपती अनिलराव यांचा सत्कार व मुलाखतीचा कार्यक्रम होता.मुलं,पालकांच्या उपस्थितीनं हॉल खचाखच भरलेला.शाळेचे माजी विद्यार्थी असलेले अनिलराव आता करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या कंपनीचे मालक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेलं दानशूर व्यक्तिमत्व.त्यांनी सुरु केलेल्या ‘गजरा’ या जरा हटके नावाच्या स्कॉलरशीप विषयी सर्वाना फार आकर्षण होतं.फक्त गरीब,गरजू पण हुशार मुलांना ही स्कॉलरशीप मिळायची. गेल्या पाच वर्षात शाळेतील १०० विद्यार्थ्यांनी स्कॉलरशीपचा लाभ घेतलेला. म्हणूनच अनिलरावांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले.मुलाखत घ्यायचं काम माझ्याकडं होतं.सत्कारानंतर मुलाखतीचा कार्यक्रम सुरू झाला.

“नमस्कार सर,आपल्या शाळेतर्फे सत्कार स्वीकारताना कसं वाटलं.”प्रश्न ऐकून अनिलराव हसले.माइक हातात घेतला पण काही वेळ तोंडातून शब्द फुटले नाहीत.थोडा वेळानं अनिलरावांनी सुरवात केली.

“माफ करा.हा क्षण माझ्यासाठी खूप भावनिक आहे म्हणून जरा..”

“सर,तुम्ही जे अफाट यश मिळवलं त्यात खारीचा वाटा या शाळेचासुद्धा आहे.”

“खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे.पुढील आयुष्याचा पाया या वास्तूतच घातला गेला.”

“प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मेहनत,हुशारी,अंगी असलेलं कौशल्य यामुळे तुम्ही अफाट यश मिळवलंत.एवढा मोठा व्यवसाय असूनही सामाजिक जबाबदारी विसरला नाहीत.हे कसं काय?”

“आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच थोडंफार यश मिळवू शकलो.सामाजिक जबाबदारी विषयी बोलायचं तर अनेक गुणी विद्यार्थी केवळ आर्थिक कारणामुळे शिक्षण घेऊ शकत नाही.अशांसाठी आम्ही स्कॉलरशीप सुरू केली.त्यामध्ये आठवी ते बारावीपर्यंत शिक्षणाचा खर्च केला जातो अर्थातच त्यासाठी अट ती म्हणजे दरवर्षी गेल्या वेळेपेक्षा जास्त मार्क मिळवायचे.”टाळ्यांचा कडकडाट झाला.अनिलरावांनी पुढे म्हणाले “तेव्हा आणि आता कार्यरत असणारे शाळेचे सर्व आदरणीय शिक्षक,कर्मचारी यांचे मन:पूर्वक आभार आणि बापुकाकांचे तर विशेष आभार!!”

“बापुकाका कोण??”मी विचारलं.

“ज्यांच्यामुळे मी घडलो.इथं येऊन पोचलो ती व्यक्ती म्हणजे बापुकाका.असामान्य काम करणारा एक सामान्य माणूस.”

“त्यांचं अन तुमचं नातं?”

“माणुसकीचं”

“म्हणजे”

“आमची साधी ओळख पण नव्हती.माझं बालपण फार म्हणजे फारच गरिबीत गेलं.दुष्काळात तेरावा म्हणतात ना तसं काहीसं म्हणजे आधीच घरात दोन वेळचं खायला मिळणं मुश्किल.मजूरी करणारे वडील अचानक अपघातात गेल्यावर आमची अवस्था अजूनच बिकट झाली.आम्ही तीन भावंड,घर चालवण्यासाठी आईनं धुण्या-भांड्याची काम करायला सुरवात केली.थोरला असल्यानं आईची ओढाताण लक्षात आली.आईला मदत म्हणून शाळा सुटल्यावर मी गजरे विकायला सुरवात केली.मित्राकडून सायकल घेतली अन टेकडीच्या रस्त्यावर सगळे फिरायला जातात तिथं “गजरा,गजरा” ओरडत चकरा सुरू झाल्या.मित्र हसायचे.लोकसुद्धा चमत्कारिक नजरेनं बघायचे.सुरवातीला कसंतरी वाटलं पण नंतर सवय झाली.पाच दिवसानंतर पहिला गजरा विकला गेला.एक रुपयाचा फायदा झाला.पहिल्या कमाईचा आनंद काही औरच.”

“तिथचं बापुकाकांची भेट झाली का?”

“हो.काकूंसोबत रोज फिरायला यायचे.दोन-तीनदा गजरे घेण्याविषयी विचारलं पण त्यांनी नकार दिला परंतू माझी रोजची धडपड ते बघत होते. एकदिवशी त्यांनी सगळे गजरे विकत घेतले.फार आनंद झाला.त्यादिवशी रात्री घरी आम्ही खूप दिवसांनी वडापाव खाल्ला.”

“तिथून बापुकाकांची ओळख वाढली.”

“हो.संध्याकाळी भेटलो तर  हसायचो.हळूहळू बोलायला लागलो.एके दिवशी बापुकाकांनी थांबवून विचारपूस केली.घरची माहिती घेतली.फी बाकी असल्यामुळे परीक्षेला बसता येणार नाही हे कळल्यावर काही बोलले नाहीत पण दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन माझी फी भरली.त्याविषयी मला शाळेतल्या सरांकडून कळलं.तेव्हा वर्ष वाया जाणार नाही याचाच खूप आनंद झाला अन भरूनही आलं. बापुकाकांना भेटण्यासाठी संध्याकाळी आईला घेऊन गेलो.फी विषयी विचारल्यावर बापुकाका फक्त हसले.आईनं हात जोडले अन रस्त्यातच मी नमस्कारासाठी वाकलो तेव्हा बापूकाका अडवत म्हणाले. नमस्कार होत राहतील.फी भरली ही मदत नाही तर स्कॉलरशीप आहे असं समज.याविषयी कुठंही बोलू नकोस.विसरून जा आता फक्त मन लावून अभ्यास कर,खूप खूप शिक.मोठा माणूस हो आणि सगळ्यात महत्वाचं हे गजरे विकणं बंद करू नकोस कारण त्यामुळे कष्टाची सवय आणि परिस्थितीची जाणीव जिवंत राहीलं.जमिनीशी नातं तुटणार नाही.ते ऐकून माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला.”

“बापुकाकांनी कमी शब्दात खूप काही सांगितलं.”

“माझी बारावीपर्यंतच्या फीची व्यवस्था बापूकाकांनी करून ठेवलेली तरीही ग्रॅज्युएट होईपर्यंत गजरे विकत होतो नंतर नोकरी करून मास्टर्स केलं नंतर स्वतंत्र व्यवसाय सुरू केला अन एकेक यशाची पायरी चढत गेलो आणि आज तुमच्यासमोर आहे.”

“आजकाल फुटकळ मदतीचा मोठा गाजावाजा केला जातो.फोटो सेशन केलं जातं.तात्पुरत्या प्रसिद्धीसाठी हपापलेल्या जमान्यात तुम्हां दोघं वेगळा विचार करता.खूप कौतुक वाटतं”

“तीसुद्धा बापुकाकांचीच कृपा!!त्यांच्या मदतीविषयी कधी,कुठं बोलणार नाही हे वचन पंचवीस वर्षांनंतर मोडतोय.आज मनापासून वाटतंय की बापुकाकांविषयी लोकांना कळायला पाहिजे कारण त्यांच्या प्रेरणेतूनच हुशार,गरजू विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशीप सुरू केली.”

“या स्कॉलरशीपचं नाव फार वेगळंयं.”

“गजरा विकण्याच्या निमित्तानं आमची भेट झाली म्हणून ‘गजरा स्कॉलरशीप’ असं नाव बापूकाकांनीच सुचवलं.तेच नाव मी पुढे कायम ठेवलं.”

“बापूकाकांना भेटायला आवडेल”

“समोरच बसलेत,वय वर्ष ८५ फक्त.”सर्वांच्या आग्रहावरून अनिलराव बापूकाकांना स्टेजवर घेऊन येईपर्यंत टाळ्यांचा गजर सुरू होता. उत्सवमूर्ती बापुकाका मात्र निर्विकार होते.सर्वांचे आभार मानत अनिलराव म्हणाले “बापुकाकांचे तत्व होतं की केलेली मदत विसरून जायची.जाहीर वाच्यता तर अजिबात करायची नाही.माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी मदत केलीय पण एका शब्दांनं सांगितलं नाही.आयुष्याची गंमत कशी पहा.चांगलं काम ठरवून विसरणाऱ्या बापुकाकांना विस्मरणामुळे बरंच काही आठवत नाही.आताशा फार बोलत पण नाही.ओळखी विसरत आहेत परंतु आजही गजरा पाहिला की चेहऱ्यावर ओळखीचं हसू उमटतं.”दोन गजरे  अनिलरावांनी हातात देत नमस्कार केला तेव्हा बापुकाकांच्या डोळ्यात चमक आली आणि चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आठवण माहेरची… ☆ सुश्री स्नेहल अखिला अन्वित ☆

सुश्री स्नेहल अखिला अन्वित

? जीवनरंग ?

☆ आठवण माहेरची… ☆ सुश्री स्नेहल अखिला अन्वित ☆

“तरी मी तुम्हाला सांगितलं होतं, सगळं घर धुऊन काढू नका म्हणून. पोरींच्या लग्नापायी कंगाल करून ठेवलत!! राहतं घर विकून टाकलत आणि या भाड्याच्या घरात सगळं डोईजड झालंय आता…

पोरी पैसे देतात तेही घेत नाहीत, नुसत्या पेन्शनवर काय काय भागवायचं आपण? ती तरी कुठे आहे एवढी? घरभाड्यालाच जाते निम्म्याच्यावर.

काय झालं असतं एवढं, स्वतःचं घर राहू द्यायचं होतं हो डोक्यावर…”

चित्राताईंचा त्रागा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. म्हातारपणाची दुखणी खुपणी सुरू झाली होती, आणि पैसा सगळ्यालाच अपुरा पडत होता.

नेहमीप्रमाणे आजही त्या कुरकुरत होत्या, आणि आप्पा आपले शांतपणे पेपर वाचत बसले होते.

दहा तारीख होती, घरमालकाचा कालपासून दोनदा फोन येऊन गेला होता. आज तो प्रत्यक्षात येईलच याची चित्राताईंना खात्रीच वाटत होती. म्हणून सकाळपासून त्याच्या तोंडाचा पट्टा अखंड सुरू होता. त्यात आप्पा; बघतो मी, बघतो मी करून गपगार बसून होते. त्याने आणखी त्रास होत होता चित्राताईंना. हात पाय हलवायचे, पोरींना पैशाच्या मागणीसाठी फोन करायचे सोडून पेपर वाचन चाललंय यांचं, चित्राताईंचा आतल्या आत भडका उडाला होता.

“यावेळी दवाखाना लागला म्हणून टंचाई झाली जास्त, पोरींना कळेल की ते, लावा की फोन. कधीतरी लावला तर चालतो, नेहमी मागतो का आपण?,” चित्राताई पुन्हा पुन्हा आप्पांना डिवचून बघत होत्या, पण आप्पा होईल सर्व नीट एवढंच एकच म्हणत होते.

“काय होणार कप्पाळ माझं,” बोलता बोलताच चित्राताईंनी कपाळाला हलकं बडवून घेतलं. वीट आला होता त्यांना या परिस्थितीचा.

खरंतर मुलींची लग्न ठरवायच्या वेळीच त्या आप्पांना सांगत होत्या, आपली परिस्थिती स्पष्ट सांगा दोन्हीकडच्यांना, आम्हाला एवढ्यातच जमेल, थोडक्यातच करू बोला. पण आप्पांना घर दिसत होतं, आपण काय दोघं राहू कुठेही असा विचार करून त्यांनी काही कमतरता न ठेवता मुलींची लग्न बऱ्यापैकी थाटात लावून दिली. सगळ्या हौशीमौजी केल्या त्यांच्या. चित्राताईंच्या तोंडावर सतत हात ठेवला.

आता सगळा घोळ होऊन बसला होता त्यामुळे मात्र……….

जेवणाची वेळ झाली तरी चित्राताईंचं तोंड काही सरळ झालंच नव्हतं. तसच वाकड्या तोंडानी त्यांनी कार्यक्रम उरकला. आप्पा पोटभर जेवले पण चित्राताईंना चार घास कमीच गेले. घरमालक संध्याकाळचा येणार, आणि त्याला आता नाही जमणार थोडे दिवस द्या, हे सांगायला लागणार, हे त्यांना कमीपणाच वाटत होतं.

जेवण झालं आणि दोघं थोड्यावेळ लवंडले. आप्पा आडवे पडले तसे दुसऱ्या सेकंदाला घोरायला लागले. चित्राताईंना काही केल्या झोप येतच नव्हती, सारखं मेलं त्या घरमालकाचं तोंड समोर दिसत होतं.

आप्पांकडे बघून त्यांना वाटलं, “नक्की कोणावर आपल्या चिंता टाकून झोपलाय हा माणूस? अजब आहे बुवा सारं!!”

अख्खी दुपार सगळी आढ्याकडे बघतच काढली चित्राताईंनी.

बरोबर साडेचार वाजता बेल वाजली. चित्राताईंचे ठोके वाढले. त्यांनी गदागदा हलवून निश्चिंतपणे घोरणाऱ्या आप्पांना उठवलं. “अहो उठा, आला बघा तो मालक,आता तरी उघडा त्याच्यासमोर तोंड जरा, मी काही येणार नाही समोर. मला फार लाजिरवाणं वाटतं, दारही उघडा तुम्हीच,” म्हणत त्या तरातरा स्वैपाकघरात निघून गेल्या.

तेवढ्यात बेल अगदी नॉनस्टॉप वाजू लागली. आप्पांनी पट्दिशी चूळ भरली,आणि लगबगीने दरवाजा उघडला आणि समोर न बघता वाकून म्हणाले, या या साहेब.

“आप्पा, झोप अजून गेली नाही की काय? आम्ही काय साहेब दिसतो होय तुम्हाला,” त्यांच्या दोन्ही  मुली रिद्धी सिद्धी हसत घरात शिरता शिरता म्हणाल्या.

“अगं तुम्ही कशा आता यावेळी?,”आप्पांनी अचंबित होऊन विचारलं.

“का? माहेरी यायची काय ठराविक वेळ आहे का काही?,” त्यांच्या मोठ्या मुलीने रिद्धीने त्यांनाच उलट प्रश्न केला. “एकाच शहरात म्हटल्यावर वाटेल तेव्हा येऊ जाऊ शकतो ना आपण?”

“तसं नाही ग, अचानक न कळवता आलात ना म्हणून म्हटलं आपलं,” मुलीशी बोलतच आप्पा निवांतपणे दिवाणावर विसावले.

“आई, अगं आई, ये बाहेर लवकर,” सिद्धीच्या जोरजोरात हाका ऐकून चित्राताई घाईतच बाहेर आल्या. मालक येणार होते, ते मुली आल्या. आता तो मालक आला तर सगळा घोटाळा यांच्यासमोर. देवा मालकाला अडवून ठेव जरा, मनात त्यांचा धावा चाललाच होता.

दोन्ही मुली म्हणाल्या, “चला चला आवरा पटापट. आपल्याला बाहेर जायचय.”

“आता कुठे? आता नको,” चित्राताई भांबावून म्हणाल्या. मालक यायचाय, तो आला आणि टाळं दिसलं घराला तर बरं नाही ते, त्यांच्या मनात तेच चालू होतं.

पण मुलींनी कोणाचं काही चालवू दिलं नाही, दोघांनाही पटापट आवरायला लावून घराबाहेर काढलं.

जायला बूक केलेली गाडी आली, आईवडिलांना दोघींनी त्यात घुसवलं. दोघही कुठं जायचय कुठं जायचय करत होते, त्यांना ठिकाण आलं की कळेल एवढं एकच उत्तर सतत दिलं.

गाडी थांबवून उतरले ते ठिकाण त्यांच्या ओळखीचं होतं. “अरे, इथे का आलो आपण, मागच्या आठवड्यात तर शेजारच्याकडे फेरी झालेली आमची, इथेच यायचं होत तर सांगायचं, त्याचा डबा परत करायचा होता, तो आणला असता,” चित्राताई म्हणाल्या तशा दोन्ही मुली एकमेकींकडे बघून हसल्या.

थोडं पुढे गेल्यावर त्यांचं जूनं घर लागलं. त्याच्याच थोडं पुढं नवीन चार बिल्डिंगची सोसायटी होती. पोरींच्या लग्नाच्या वेळीच नुकतच तिचं बांधकाम पूर्ण झालं होतं.

मुली त्या सोसायटीत शिरल्या, तसे आप्पा म्हणाले, “पोरींनो इकडे कुणाकडे जातोय आपण?”

पोरी म्हणाल्या, “आहेत एक ओळखीचे. तुमची भेट घडवून आणायचीये त्यांच्याशी.”

पहिल्याच मजल्यावरच्या एका ब्लॉकचं लॅच रिद्धीने उघडलं. चित्राताई आणि आप्पा आत आले तसे दोघींनी टाळ्या वाजवून त्यांना वेलकम केलं आणि म्हणाल्या, हे घर तुमचं स्वतःचं आहे आई- आप्पा!!

तुमच्या मुलींनी तुमच्यासाठी घेतलेलं. बघा बरं फिरून तुम्हाला आवडतंय का?

चित्राताई आणि आप्पा जिथल्यातिथे आखडल्यासारखे उभे राहिले. त्यांनी अशी काही कल्पना स्वप्नातसुद्धा केली नव्हती. चित्राताईंना तर अगदी ह्या घरात पाऊल ठेवेपर्यंत तो घरमालकच समोर दिसत होता. तो येऊन गेला असेल तर काय म्हणत असेल आम्हाला, शरीर इकडं अन् मन त्या मालकाकडं होतं त्यांचं.

तिथल्या हॉलमधल्या फ्रेंच विंडोच्या कठड्यावर दोघं बसले. सिद्धीने त्यांना पर्समधली बॉटल काढून पाण्याचे घोट घ्यायला लावले. ते घेतल्यावर त्यांना जर बरं वाटलं.

“काय हे? हे का केलंत पोरींनो?,” आप्पांनी कळवळून विचारलं.

“तुम्ही तर विचारूच नका आप्पा का ते? स्वतःच्या डोक्यावरचं एकुलतं एक राहतं घर आमच्यासाठी विकलत, आम्हाला ताकास तूर नाही लावून दिला अजिबात,” रिद्धी दटावूनच बोलली.

“नाहीतर काय? लग्न झाल्यावर आम्हाला कळलं सारं. आम्ही भले तशाच राहिलो असतो पण घर नसतं विकू दिलं. तुम्हाला विचारलंही होतं आम्ही, कुठून आले पैसे? तर काय म्हणालात, तुमच्या लग्नासाठी पै पै करून साठवले होते.

एका मांडवात आमचं लग्न लावून नंतर मात्र भाड्याच्या घरात बस्तान मांडलत?” सिद्धीला पुढे बोलवलच नाही.

“आई एवढी भडाभडा बोलणारी तू पण गप्प बसलीस?”, रिद्धीने आईकडे मान वळवली.

“तुमच्या आप्पांनी तोंड दाबलं होतं माझं. पोरींचं लग्न झोकात व्हावंसं वाटत होतं त्यांना. त्यांची इच्छा नाही डावलावी वाटली मला. पूर्ण आयुष्यात एकदाच काहीतरी बोलून दाखवलं ग मला त्यांनी…”

“पण आम्हाला कळलं तेव्हा आमच्या जीवाला किती चटका बसला माहिती आहे तुम्हाला? आई बापाला घराबाहेर काढणारं लग्न नको होतं आम्हाला. टोचणी बसली जीवाला किती?” रिद्धीला प्रत्येक शब्दाला भरून येत होतं.

“आप्पा कळलं तसं, आम्हीही ठरवलं मग, जेव्हा आईबापाला त्यांच्या स्वतःच्या घरात आणू, तेव्हाच सुखाची झोप घेऊ”, सिद्धीच्या म्हणण्याला दुजोरा देत रिद्धीही म्हणाली, “खटपट करत होतो खूप पण तरी दोन वर्ष गेली. ती कशी घालवली, ते आमचं आम्हाला माहीत.

मान मोडून काम केलं ऑफिसमध्ये फक्त तुमच्यासाठी, धीटपणे घरी बोललो सर्व. सगळ्यांनी सहकार्य केलं. दोघींना कर्ज मंजूर झालं. आता आमचे पगारही चांगले आहेत, कष्टाचं फळ मिळालं आम्हाला. आमची ऐपत आहे हप्ते हसत हसत फेडण्याची. जूनं घरच परत घ्यायचं होतं आम्हाला, पण ते नाही मिळालं. म्हणून तुम्ही इतके वर्ष राहिलेल्या तुमच्या ओळखीच्या माणसांच्या एरियातच घर निवडलं तुमच्यासाठी. तुमच्या हक्काचं आहे हे.”

“आई, इथे घरमालक नाही येणार बरं का डोक्यावर बसायला. आता येणाऱ्या शनिवारी गणेशपूजन करायचं आणि रविवार पासून आपल्या घरात सुखाचा श्वास घ्यायचा. त्या तुमच्या मालकाचा हिशोब पण आम्ही चुकता करू सगळा, तुम्ही आवराआवर करायला घ्या फक्त आता”

“काय आप्पा?”

आप्पांनी चश्मा काढून डोळे पुसले आणि म्हणाले, “निशब्द झालोय मी आज. माझ्यासारख्या कफल्लक माणसाच्या डोक्यावर पुन्हा स्वतःचं घर असेल असा विचार माझ्या मनाला आतापर्यंत कधी शिवला पण नव्हता.”

“विचारही शिवला नव्हता, आणि कसली चिंताही शिवली नाही कधी. मला नेहमी यांना पाहून वाटायचं, कुणाच्या जीवावर हे कुठल्याही परिस्थितीत एवढे शांत राहतात. आता कळालं, त्यांच्याही नकळत तुम्ही दोघी पोरींनी त्यांचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला होता. ज्या बापाने आपल्यासाठी स्वतःचं घर विकलं, त्या बापाला कधी काही कमी नको पडायला, हे तुमचंच इच्छासामर्थ्य त्यांना सर्व विवंचनेपासून दूर ठेवत होतं बहुतेक…

बाप तशा बेट्या निघाल्या निःस्वार्थी, मी आपली उगाच सगळ्याला दूषणं देत काढली दोन वर्ष.

होतं त्यापेक्षा कितीतरी सुंदर घर आलं माझ्या वाट्याला माझ्या पोरींमुळे. आयुष्यातला भाग्याचा दिवस उजाडला आज, न मागता सर्वकाही मिळालं.” चित्राताईंनी अभिमानाने पोरींकडे पाहिलं, नकळत त्यांचे हात जोडले गेले. दोन्ही पोरी क्षणात आईकडे झेपावल्या आणि तिला घट्ट मिठी मारून एवढ्या वेळ अडवलेले आनंदाश्रू टपाटपा गाळून आईचे दोन्ही खांदे चिंब भिजवून टाकले.

आप्पांनी स्वतःला सावरलं, तीन खोल्यांचं घर त्यांनी फिरून बघितलं. घरातल्या सर्वांच्या डोक्यावर आशीर्वादाचा अदृश्य हात ठेवणाऱ्या देवाची जागा आणि सासरी गेल्या तरी मनात माहेरची जाण आणि आठवण सतत तेवत ठेवणाऱ्या दोन पोरींंच्या हसऱ्या फोटोची जागा त्यांनी पहिल्या प्रथम फिक्स करून टाकली…!!

© सुश्री स्नेहल अखिला अन्वित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ओव्हरलोड – अतिरेक… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ ओव्हरलोड – अतिरेक… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

त्याचा मित्र नंदू घरी आला होता. आणि तो, आपण जीवतोड मेहनत घेऊनही, आपली मुलगी कशी साथ देत नाही, कसा अभ्यास करत नाही असा तक्रारीचा पाढा मित्रासमोर वाचत होता.

त्याला वाटलं नंदू त्याचं कौतुक करेल, ती साथ देत नाही म्हणून तिच्यावर टीकेचा भडीमार करेल, पण झालं उलटंच.

“तुझ्या सांगण्यावरून दोन तीन गोष्टी समजत आहेत, बघ, बरोबर आहेत का,” एखाद्या विशेष मंद विद्यार्थ्याला समजावताना वर्गात प्राध्यापक ज्या आविर्भावात सुरुवात करायचे, तशी नंदूने सुरुवात केली, “आपण हॉस्टेलला असतानाही, अभ्यासाची योग्य वेळ सकाळी लवकरची चांगली का रात्री उशीराची चांगली यावरून आपले वाद व्हायचे.

तू पहाटे उठून अभ्यास करणारा, आणि मी निशाचर. शास्त्रीय दृष्ट्या काय चांगलं काय वाईट ते बाजूला राहू दे एक वेळ, पण कधी असा विचार केला आहेस का की कदाचित तुझ्या मुलीला माझ्याप्रमाणे रात्री अभ्यास करणं  जास्त आवडत असेल?

दुसरा मुद्दा तासन् तास अभ्यास करण्याचा. राजा, अभ्यासाची quality महत्त्वाची असते रे, फक्त quantity नाही. तू हातात छडी घेऊन बसलास म्हणून ती डोळ्यासमोर पुस्तक पकडून बसेलही कदाचित, पण त्यातलं डोक्यात किती जाणार आहे?

शहरात राहून आणि बँकेत नोकरी करून तुझी शेती सध्या कुंडीतल्या तुळस, गुलाब आणि जास्वंदीवरच सध्या थांबली आहे, म्हणून त्याचंच तुला उदाहरण देतो. जर कुंडीत आधीच भरपूर ओलावा असेल, आणि तरी अट्टाहासाने आपण त्या कुंडीत पाणी ओतायचा प्रयत्न केला, तर ते पाणी उपयोगी ठरत नाही, वाहून जातं, आणि जाताना मातीसुद्धा वाहून नेतं.

तसं मनाविरुद्ध तासन् तास बसल्याने पुढचं पाठ आणि मागचं सपाट होत नाहीयेना हे बघायची काळजी घ्यायला नको का?

मुलांनी अभ्यास करावा याचा आपण अतिरेक तर करत नाही ना हे तपासायला हवं. आणि आपल्या अतिरेकाने मुलांची अभ्यासाची गोडी तर नाहीशी होत नाही ना, उर्मी तर नष्ट होत नाही ना ही काळजीही घ्यायला हवी.

मुलांनी अभ्यास केलाच पाहिजे, खूप जीवघेणी स्पर्धा आहे हे मलाही मान्य. पण त्यासाठी विचारप्रक्रिया त्यांच्या मनापासून झाली पाहिजे, आपण लादलेली विचारप्रक्रिया असली की ती फारशी लागू पडत नाही.

तुझ्या मुलीच्या बाबतीत पुढचं वाक्य लागू होत नाही. पण काही वेळा मुलांची बौद्धिक कुवतच मर्यादित असते. अशा वेळी त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवणं योग्य नसतं.

असो, बघतो मी थोड्या गप्पा मारून तिच्याशी.”

जेवताना नंदूने त्याच्या आफ्रिकेतल्या शेताचे वार्षिक नियोजन, जमाखर्च याबद्दलच्या गमतीजमती सांगितल्या, सुरुवातीला त्याच्या काही लहानमोठ्या चुकांमुळे शेती कारभाराच्या नियोजनात त्याची कशी फजिती झाली हे त्यानं सांगितलं.

त्याची लेक रस घेऊन हे सगळं ऐकत होती.

नवीन शहरात, परदेशात गेल्यावर – खाणं पिणं, रहाणं, करमणूक, औषधं, बचत, घरी पैसे पाठवणं यासाठी कशी तारेवरची कसरत करावी लागत होती हे नंदू सांगत असताना, अचानक संपदा उद्गारली, “पण काका, हे सगळं तर बाबा मला आजच शिकवत होते. तुमच्या वेळी नव्हतं का हे अभ्यासात? तुम्ही बाबांना तेव्हाच विचारलं असतं तर तुमची अशी पंचाईत झाली नसती.

आणि या नियोजनाचे भविष्यात असे फायदे आहेत, असे उपयोग आहेत हे आता लक्षात आल्यावर तर आणखीनच detail मध्ये मी त्याचा अभ्यास करेन.”

नंदूने आपल्या मित्राकडे सहेतूक पाहिले – औषधाची मात्रा मित्राच्या लेकीला तर नक्की लागू पडली होती, मित्राला लागू पडली आहे का नाही, याची तो खात्री करत होता.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares