मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नाती गुंतागुंतीची… भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ नाती गुंतागुंतीची… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(“अनुजा, ये उद्या जेवायलाच. भावाच्या घरी आमंत्रण लागतं हो ग?ये बघू रहायलाच. ”.. प्रेमाने अनुजाला दटावत प्राची म्हणाली.) इथून पुढे – – 

अनुजा प्राचीकडे सकाळपासूनच आली.

“ आजही केतनभाईची ड्यूटी का? कधी भेटायचा ग हा मला?”

“ थांब आता तू इथंच. येईल घरी संध्याकाळी. आज एका पार्टीला आमंत्रण आहे. मिसेस चित्रेच्या मुलीचं लग्न झालं ना, तर एका प्रख्यात गायिकेचं गाणं ठेवलंय त्यांनी. मला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही. पण आता तू आली आहेस तर चल आमच्याबरोबर. माहीत आहे मला, तुला खूप आवडतं शास्त्रीय संगीत.

कोणीतरी फार नावाजलेल्या करुणा मिश्रा म्हणून आहेत बघ ”… प्राची मनापासून आग्रह करत होती तिला.

“ अग काय सांगतेस प्राची? किती मोठ्या महान गायिका आहेत त्या. याच दिल्लीकडच्या बाजूच्या आहेत म्हणे. मग तर मी येणारच. फार सुंदर गातात ग त्या. महाराष्ट्रात फारशा होत नाहीत त्यांच्या मैफिली. पण इकडे अगदी दुर्मिळ आहे बरं त्यांना भेटणंसुद्धा. चल जाऊया आपण. ”

प्राची केतन आणि अनुजा तिघेही कारने हॉलवर पोचले. अतिशय अभिरुचीपूर्ण सजवलेल्या हॉलमध्ये चित्रे कुटुंबाने त्यांचे मनापासून स्वागत केलं.

“ करुणाबाई येतीलच इतक्यात. आम्ही खास निवडक रसिकांसाठी हा गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे “. अदबीने चित्रे म्हणाले.

हॉल पूर्ण भरला. बाईंचे साथीदार वाद्यांची जुळवाजुळव करू लागले. मागून बाई आल्या. श्रोत्यांना अदबीने नमस्कार करून स्थानापन्न झाल्या… अतिशय भारी सुंदर काठापदराची साडी, कानात लखलखणाऱ्या हिऱ्याच्या कुड्या आणि फक्त हिऱ्याचे लांब मंगळसूत्र त्यांना फार शोभून दिसत होतं. बाई नुकतीच साठी पार केलेल्या वाटतच नव्हत्या.

… गंभीर आवाजात बाईनी षड्ज लावला.

“ मी आता सावनी कल्याण रागातली बंदिश पेश करणारआहे. संध्याकाळ सरत आली आहे. ही बंदिश माझी आई म्हणायची. स्वतः मोगुबाई कुर्डीकरांनी तिला ती शिकवली होती. ” असं म्हणत श्रोत्यांना नम्रपणे नमस्कार करून बाईनी सुरुवात केली,

‘ देव देव सत्संग श्रीरंगा… ‘

सगळं सभागृह त्यानंतर होणाऱ्या अमृतसुरांनी चिंब झालं.

बाईनी दोन तासांनी भैरवीने गाण्याचा समारोप केला. श्रोते त्या स्वर्गीय सुरातून अजून बाहेरच आले नव्हते.

… दुसऱ्या रांगेत बसलेली प्राची मात्र अस्वस्थ होती. यांना मी बघितलं आहे का यापूर्वी ? आणि त्यांचा हा आवाज इतका ओळखीचा का वाटतोय?…

तिच्या कानाशी लागून अनुजा म्हणाली, ” प्राची, अग या बाई रजनी तर नव्हे ? मला तर यांच्या चेहऱ्यात रजनीच दिसतेय. तुला नाही का वाटत?”

– – प्राचीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ”अनुजा, ही नक्की रजनी आहे. करुणा मिश्रा असेलही, पण ही आपली रजनीच वाटतेय मला… येस.. खात्री आहे माझी. “ 

 श्रोत्यांची गर्दी कमी झाल्यावर प्राची आणि अनुजा बाईना भेटायला अंत गेल्या. नमस्कार करून प्राचीनं विचारलं,

“ बाई, एक विचारू? तुम्ही पूर्वीच्या रजनी तर नव्हे?” 

बाई हसल्या आणि म्हणाल्या, “ प्राची मी तुला मगाशीच ओळखलं ग. आणि अनुजा तुलाही. ”

… प्राचीनं पुढे होऊन त्यांना घट्ट मिठी मारली. ‘ रजनी.. रजनी.. ’ दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले

“ रजनी, का?का गं असं केलंस त्या वेळी? माझी जराही विचार आला नाही का ग तुझ्या मनात ? “ 

रजनीच्या डोळ्यात पाणी आलं.

“ प्राची, इथं नको. मी ताजमध्ये उतरलेय. उद्याही आहे मी आणि माझे यजमान. तिकडे तुम्ही दोघी या. याल का? मग सगळं सांगते… किती वर्षांचं बोलायचं राहिलंय ना. ”

.. बाई गेल्या. रात्रभर प्राचीला झोप आली नाही. अनुजा गाढ झोपली पण प्राची कितीतरी वेळ तळमळत होती. कधीतरी उशीरा झोप लागली तिला.

सकाळी सगळं आवरून, रजनीसाठी खूप पूर्वी आईने तिच्याजवळ दिलेला सोन्याचा हार, खूप मिठाई घेऊन अनुजा आणि प्राची हॉटेलवर पोचल्या

.. रजनी त्यांची वाटच बघत होती. “ या ग या. ” रजनीने अत्यंत प्रेमाने त्यांचं स्वागत केलं.

प्राची म्हणाली, “ आत्या! मला आईनं सगळं सांगितलं ग, पण किती उशिरा. माझ्या बाळंतपणासाठी ती आली होती तेव्हा सांगितलं. अगं किती वाईट वाटलं मला ते ऐकून. आईलाही फार पश्चाताप झाला ग.. ती फारसं चांगलं नाही वागली तुझ्याशी म्हणून.. मी क्षमा मागते तुझी. ” प्राची रजनीच्या पायाशी वाकली.

“ अगं प्राची.. वेडे, हे काय? अजूनही अशीच भाबडी आहेस बघ. तेव्हाही मला पाठीशी घालणारी, माझी बाजू घेणारी होतीस तू. तर आता ऐक….. “

 – – – “ माझी आई गोवेकरीण होती. अत्यंत सुन्दर आणि उत्तम गाणारी. पण माझे बाबा मला माहीतच नव्हते. आईने कधी मला सांगितलं नाही की मीही विचारलं नाही तिला. मी गोव्याला शिकत होते.

आईकडे भरपूर पैसा होता. माझी आजी पण गाणारीच. आमचं एक मोठं घर अजूनही आहे गोव्याला. पण अचानक दृष्ट लागावी तशी घरातली मोठी माणसं एका पाठोपाठ एक मृत्युमुखी पडली. माझ्या आईला कॅन्सर झाला. आणि मग या जगात मी एवढीशी लहान मुलगी एकटी पडले. नाईलाजाने माझ्या आईने माझ्या वडिलांना पत्र पाठवलं. पण ते आधीच गेलेले होते….. तुझी आजी किती धीराची बघ. गोव्याला आली, माझ्या आईला, म्हणजे तिच्या सवतीला भेटली. म्हणाली, ‘ मी रजनीला जन्मभर अंतर देणार नाही. आपल्या दोघींचा नवरा तर गेला. पण मी हिला घेऊन जाते. विश्वास ठेव माझ्यावर. ’ तेव्हा आई जराशी सावरली.. पण नंतर काही दिवसात गेलीच. तुझ्या आजीने मला वाढवलं. पण मग तीही फार आजारी पडल्यावर मात्र तिने तुझ्या वडिलांना म्हणजे माझ्या सावत्र भावाला मला न्यायला सांगितलं….. किती फरपट व्हावी ग माझी. ”

रजनीच्या डोळ्यात पाणी आलं. “ तेव्हा दादा मला म्हणाला होता की, तुझ्या वहिनीला हे अजिबात आवडणार नाहीये. जास्त अपेक्षा ठेवायच्या नाहीत. आणि हो.. मला दादा म्हणायचं नाही. प्राची म्हणते तसे मला बाबा आणि हिला वहिनी नाही.. तर आईच म्हणायचं. मला नसते घोळ आणि लोकांचे सतरा प्रश्न नकोत. ”…

“ मग मी जराशी भीतभीतच तुमच्या घरी आले. वहिनीनं मला कधीच वाईट नाही ग वागवलं. पण कायम एक अंतर मात्र आमच्या दोघीत राहिलं. मी तिच्या नवऱ्याची खूप लहान सावत्र बहीण हेच नातं मनात जपलं होतं तिनं. मला खायला कपड्याला कशाला कमी नाही केलं तिनं. हे त्यांचे उपकारच कायम स्मरते मी.

आणि दादाचीही परिस्थिती फार काही वेगळी नव्हती. देवाने मला बाकी काही नव्हतंच दिलं. पण माझ्या गळ्यात मात्र त्याने गाणं रुजवूनच पाठवलं होतं. दादाच्या ते लक्षात आलं होतं आणि म्हणून त्याने मला गाण्याच्या क्लासला घातलं… तिथे अगदी मनापासून रमले होते मी….. आणि तिथेच भेटला मला हा उमेश पाटील.. तोही माझ्याच गुरुजींकडे गाणे शिकायला यायचा. खूप सुंदर आवाज उमेशचा. आणि त्याचीही परिस्थिती काही फार वेगळी नव्हती… पण माझ्याहून बरी इतकंच… “ रजनी क्षणभर थांबली आणि सांगू लागली…

“ मी नकळत प्रेमात पडले उमेशच्या… आणि तोही माझ्या. पण घरी कोणत्या तोंडाने सांगू मी हेच मला कळत नव्हतं. तसा उमेश घरचा बरा होता. मुख्य म्हणजे चांगला शिकलेला होता. पण त्याच्या आईवडिलांनी त्याला माझ्याशी लग्न करायची परवानगी जन्मात दिली नसती याची खात्री होती त्याला.

म्हणून मग आम्ही पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं. आणि आपल्या घरात तरी दादा वहिनीने हो म्हटलं असतं याची मला खात्री वाटत नव्हती. पण मी कसंतरी धीर गोल केलं आणि तुझ्या बाबांना हे 

सांगितलं. त्याने वहिनीला न कळू देता गुपचूप मला परवानगी दिली. इतकंच नाही तर माझ्या आणि उमेशच्या हातात बरेच पैसे ठेवले. आम्ही गोव्याला जाऊन लग्न करणार म्हटल्यावर तो नंतर तिकडे आला आणि त्यानेच माझं आणि उमेशचं लग्न मंगेशीच्या देवळात लावून दिलं… किती मोठं मन गं त्याचं. आम्ही अगदी मनापासून त्याला नमस्कार केला.. आणि अजूनही मी देवासमोर हात जोडते तेव्हा देवाबरोबर माझ्या दादालाही नमस्कार करते.

“ मी आणि उमेश गोव्यात सात आठ वर्षे राहिलो. मी एका विख्यात गायकाकडे गाणं शिकले. सोपं अजिबातच नाही ग गेलं आम्हाला हे काही. पण माझ्या आईच घर होतं ना रहायला. उमेशने नोकरी केली.

मग मी हळूहळू स्वतंत्र छोटे प्रोग्रॅम्स करायला लागले. गुरुजी नेहेमी म्हणायचे मला की, ‘रजनी, उत्तम गातेस तू. माझी सगळी विद्या तुला दिली आहे मी. तू दिल्लीकडे जा. तिथे तुझ्या कलेचे खरे चीज होईल. ’

… यावर आम्ही दोघांनी खूप विचार केला आणि दिल्लीला जाऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. लवकरच उमेशला दिल्लीला छान नोकरी मिळाली. मी गोव्याचं घर विकून टाकलं, त्याचे खूप पैसे आले आम्हाला. इथे मला ओळखणारं कोणी नव्हतं. मी ‘करुणा मिश्रा’ असं नाव घेतलं. हळूहळू ‘ एक चांगली गायिका’ म्हणून माझं नाव व्हायला लागलं. मी मग रेडिओ स्टार झाले. इथल्या मानाच्या कार्येक्रमात मला सन्मानाने बोलावणी येऊ लागली. प्राची अगं मी आपल्या पुण्यातल्या सवाई गन्धर्वलाही येऊन वाहवा मिळवून गेलेय. तेव्हा खूप खूप वाटलं.. तुम्हा सगळ्यांना भेटावं.. न सांगता अचानक घर सोडून निघून गेल्याबद्दल पाय धरून माफी मागावी.. तिथून गेल्यानंतरचा माझा सगळा प्रवास सांगावा.. पण घरी यायचं धैर्यच नाही झालं गं मला… अत्यंत कष्ट केले आम्ही त्या काळात. उमेशची मला कायम साथ होती या सर्व प्रवासात.. आणि आता अगदी शांत.. स्वस्थ आयुष्य जगते आहे मी. ”… रजनीने थकून जाऊन डोळे मिटले.

तितक्यात आतून एक अत्यंत रुबाबदार पुरुष बाहेर आला… “ मी उमेश मिश्रा. तुमच्या आत्याबाईंचा नवरा. ”

प्राचीने त्यांना नमस्कार केला.

“ आता मी काय बोलू हे कळतच नाहीये बघ मला.. हे सगळंच किती अनपेक्षित आहे माझ्यासाठी.. तुला असं अचानक भेटून मला खरंच फार फार आनंद झालाय् रजनीताई… हो तू अजूनही ताईच आहेस माझी.. पूर्वीसारखी. ”.

“ हो गं.. आणि तू माझी तीच लहानशी बहीण. आणि दादा-वहिनी कसे आहेत गं ? माझी आई झालेली माझी वहिनी कशी आहे ?मी तिची आभारी फार फार आहे खरंच. मला तिने आधार दिला. नाहीतर मी काय केलं असतं या जगात? माझा तिच्यावर अजिबात राग नाही ग प्राची. आता तुझ्याकडे ते आले की मला नक्की फोन कर. मी न्यायला येईन त्यांना माझ्या घरी. आता तू दिल्लीत आहेस तर कायम भेटत राहू आपण. मी दिल्लीपासून दूर रहाते जरा. तिथे माझं छानसं घर आहे… नक्की म्हणजे नक्की ये त्यांना घेऊन माझ्या घरी.. मी आत्तापासूनच वाट बघायला लागले आहे बघ त्यांची.. ” असं म्हणत तिने प्राचीला घट्ट मिठी मारली.

– – प्राचीने बरोबर आणलेला सोन्याचा हार, सुंदर साडी आणि मिठाई तिच्या हातात ठेवली. “ हा हार तुझ्या दुसऱ्या आईने.. म्हणजे माझ्या आजीने तुझ्यासाठी ठेवलेला होता. घे… नाही म्हणू नको. ” दोघींचे डोळे पाणावले..

जराशाने प्राची म्हणाली, “ ताई किती गुंतागुंतीची आपली नाती ग. देवदयेने तुझं फार चांगलं झालं. मला अतिशय आनंद झाला हे पाहून.. आणि हो.. तुझं स्वर्गीय गाणं ऐकूनही. आता आईबाबा आले की नक्की भेटू आपण. त्यांनाही खूप आनंद होईल तुला भेटून.. ” 

पुन्हा एकदा रजनीला घट्ट मिठी मारून डोळे पुसत प्राची घरी जायला निघाली.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १०३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १०३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- माझ्या स्वेच्छानिवृत्ती नंतरच्या काळातलेसुध्दा ‘त्या’चा अलौकिक स्पर्श अनुभवास आलेले अनेक प्रसंग आहेत. ताईच्या संदर्भातला हा प्रसंग त्यातलाच एक प्रातिनिधिक प्रसंग म्हणता येईल. यानंतरचा पुढे कांही वर्षांनी आलेला असाच उत्कट अनुभव देणारा प्रसंगही माझ्या मनावर कोरला गेलेला आहे!)

एका जीवघेण्या अशा सार्वत्रिक संकटाच्या पार्श्वभूमीवरचा तो प्रसंग! जितका भयावह तितकाच चित्तथरारक!

सांगली-कोल्हापूर सारख्या नदीकाठी वसलेल्या शहरांबरोबरच नदीपात्रा जवळच्या अनेक खेडेगावांना उध्वस्त करून गेलेल्या २००५ सालच्या महापुराचा भयावह अनुभव इतिहासजमा झालाय हे गृहीत धरलेल्या आम्हा सर्वांना पुढे अनेक वर्षांनी त्यापेक्षाही जास्त हादरवून सोडलं ते २०१९ सालच्या महापुराने!

६ ऑगस्ट२०१९ ची ती काळरात्र मी कधीच विसरणं शक्य नाही.

कोयना धरण होण्यापूर्वी नद्यांना येणारे पूर ही नदीकाठच्या गावांसाठी त्याकाळी नित्याचीच बाब असे. धरण झाल्यानंतर मात्र नदीचं पाणी वाढलं तरी पुराने घातलेला हैदोस आणि त्याची भयावहता तशी कालबाह्यच झाली होती. त्यानंतर जवळजवळ सहा दशकांचा मधला प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर २००५ साली अतिवृष्टीमुळे आलेला महापूर आम्हा सांगलीकरांना हादरवून गेला होता खरा पण तो आमच्या दृष्टीने अपवादात्मकच ठरला. कारण त्यानंतर पुढची सलग १४ वर्षे तो कधीच इकडे फिरकला नव्हता. त्याने अचानक घाला घातला तो खूप नंतर थेट २०१९ च्या पावसाळ्यांत!

तरीही या वेळचा पाऊस २००५ सारखा अतिवृष्टी सदृश नसल्याने आणि तो आधीचा अनुभव गाठीशी असल्याने त्याचं फारसं दडपण लगेच जाणवलं नव्हतं हे खरं, पण पाणीपातळीत कणाकणाने होणारी वाढ हळूहळू वातावरण तापवू लागलीच. २००५ साली काळ ठरलेला जून महिनाही यावेळी उलटून गेला, पावसाचा जोरही अधून मधून कमी होऊ लागला त्यामुळे आता स्थलांतर करायची वेळ तरी येणार नाही असंच वाटत होतं.जुलै संपत आला तेव्हापासून मात्र एक दोनदा येणारी उघडीपही नाहीशी झाली. ४ ऑगस्टपासून धुवांधार पावसामुळे वातावरणाबरोबरच मनातली स्वस्थताही गढूळ होऊ लागली. तरीही ५ आॅगस्ट उजाडला तेव्हाही हरिपूर रस्त्याच्या अलिकडून सांगलीहून हरिपूरला वाहणारं नदीचं पात्र बऱ्यापैकी खोल असल्याने पाणी अद्याप पात्राबाहेर पडलेलं नव्हतं.ते बाहेर पडेल तेव्हा बराच चढ चढून हरिपूर रोडला पाण्याने स्पर्श करण्याइतकी पाण्याची पातळी वाढण्यासारखी परिस्थिती तोवर तरी निर्माण झालेली नव्हतीच.आता पाऊसही अधून मधून ओसरू लागला होता.पावसाची तीव्रताही कमी झालेली.पण धरण क्षेत्रात मात्र जोरदार पाऊस सुरू झाला, धरणातून अतिरिक्त पाणी सोडले जायची शक्यता निर्माण झाली, प्रशासनाकडूनही धोक्याच्या सूचना दिल्या गेल्या आणि अचानक ५ ऑगस्टची ती मध्यरात्रच काळरात्र ठरली!!

हरीपूर रोडवरील विनायकनगर येथे आमचा बंगला रोडपासून थोडा आत ४ थ्या गल्लीत होता. त्यातील ग्राऊंड फ्लोअरवर किचन, देवघर आणि आमची बेडरूम. दोन्ही नाती आणि अनघा/सलिल यांच्या बेडरुम्स् पहिल्या मजल्यावर. सर्वांची रात्रीची जेवणं आवरली. निजानीज झाली आणि आम्ही गाढ झोपेत असतानाच सलिलच्या हाकांच्या आवाजाने आम्ही दचकून जागे झालो.

“बाबा, हरिपूर रोड क्राॅस करून नुकतंच पाणी पुढं आलंय. कॉलनीतले आम्ही बरेच जण जागे राहून थोड्या थोड्या वेळाने आळीपाळीने पुढंपर्यंत जाऊन बघून येत होतो.आपण आता शक्य तितक्या लवकर इथून निघायला हवंय. तुम्ही दोघेही फ्रेश व्हा. सोबत घ्यायचं सामान बघून बॅग भरुन तयार ठेवा. तोवर आम्हीही आमचं आवरतोय.” तो म्हणाला.

पहाटेचे तेव्हा तीन वाजून गेले होते.कां, कसं वगैरे विचारत बसायची ती वेळ नव्हती. वाईटातली चांगली अशी एकच गोष्ट म्हणजे बाहेर पडून जायचं कुठं? हा प्रश्न आमच्यापुरता आधीच सुटलेला होता. सलिलच्या मावशीचा सुसज्ज फ्लॅट पूरक्षेत्राबाहेर असलेल्या विश्रामबागच्या वाटेवरच्या गुलमोहर काॅलनीत होता.त्यांचं सध्याचं वास्तव्य पुण्यात मुलाकडे असल्याने फ्लॅट बंदच होता. त्याची एक किल्ली आमच्याकडेच होती. मावशीला इथल्या परिस्थितीची कल्पना होती आणि सलिलशीही तिचं फोनवर याबाबत बोलणं झालंच होतं.सलिल/अनघाने अचानक यावंच लागलं तर गैरसोय नको म्हणून दोन दिवस आधीच तिथे जाऊन तो फ्लॅट झाडून स्वच्छ करून ठेवला होता. आमच्या बॅगा भरून झाल्या तेव्हा पहाटेचे सहा वाजत आले होते. त्यापूर्वीच आम्हा सर्वांच्या टू व्हिलर्स त्या दोघांनी दोन हेलपाटे घालून त्या फ्लॅटच्या पार्किंगमधे नेऊन ठेवल्या होत्या. आणि आता आम्हा सर्वांना कारने तिथे सोडून ते दोघे बाकीची जमेल तेवढी आवराआवर करायला पुन्हा इथे परत येणार होते.

आम्हाला फ्लॅटवर पोचवून ते दोघे लगेच परत निघाले तोवर मधे फार तर पंधरा-वीस मिनिटेच गेली असतील. ज्या रस्त्याने आम्ही इकडे आलो होतो तोच रस्ता नेहमीच्या रस्त्यापेक्षा अधिक सुरक्षित असल्याने त्यांची कार त्याच रस्त्याने परत निघाली होती. त्या पंधरा मिनिटांच्या अवधित मघाशी कसंबसं पाऊल बुडेल एवढंच पाणी असणाऱ्या त्या रस्त्यावर आता कारची निम्मी चाकं बुडली जातील एवढं पाणी वाढलं होतं. घरापर्यंत गेल्यावर पाहिलं तर हरिपूर रोड ओलांडून विनायकनगरमधे घुसलेल्या पाण्याने हळूहळू पुढे यायला सुरुवात केली होती.

‘आता बाकी कांही आवराआवर करत न बसता आतील जिन्याखालच्या मोकळ्या जागेत मागे सरकून ठेवलेले नुकत्याच घेतलेल्या जास्तीच्या गव्हाचे डबे तेवढे वर नेऊन ठेवू आणि लगेच परत निघू ‘ असं दोघांनी ठरवलं आणि कुलूप उघडून घाईघाईने आत धाव घेतली.दोन डबे वर नेऊन ठेवल्यानंतर बाकीचे डबे आणायला खाली उतरत असताना सलिलला खिडकीतून पुराचं पाणी आमच्या शेजारच्या रिकाम्या प्लाॅटवर घुसल्याचं लक्षात आलं. अशा परिस्थितीत आता जास्त वेळ तिथं थांबणं धोक्याचं ठरणार होतं. बाकीचे तीन डबे थेट वर नेऊन ठेवण्याऐवजी त्यांनी घाईघाईने जिन्यातल्या वळणानंतर असलेल्या पॅसेजमधेच ठेवून ते दोघे बाहेर पडले. तोपर्यंत रस्त्यावरचं पाणी वीतभर वाढलेलं होतं जे थोडा उशीर झाला असता तर कारच्या बंद खिडक्यांना सहजपणे टेकू शकलं असतं.

त्या दोघांचा हा अनुभव पुढे होऊ शकणाऱ्या वाताहातीची कल्पना यायला आम्हाला पुरेसा होता. आता होईल ते स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्यानंतरचे पहिले चारही दिवस सकाळी लवकरच ब्रेकफास्ट करून बाहेर पडलेले सलिल/अनघा रात्री खूप उशिरा परत येत असत. संपूर्ण दिवस आम्ही दोघे आणि आमच्या नाती घरी असू. पुरामुळे सलिलचं ऑफिस आणि अनघाचे क्लासेस् परिस्थिती निवळेपर्यंत बंदच रहाणार असल्याने घरी न थांबता त्या दोघांनी सांगलीत युद्धपातळीवर सुरु असलेल्या, पूरात अडकून पडलेल्या निराधारांचं रेस्क्यू ऑपरेशन आणि गरजू पूरग्रस्तांच्या रहाण्या-जेवणाची व्यवस्था अशा सामाजिक उपक्रमांशी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून स्वत:ला जोडून घेतलं होतं!

त्या दरम्यानचे त्यांचे ऐकतानाही अंगावर कांटा यावा असे भयानक अनुभव हा एका प्रदीर्घ अशा स्वतंत्र लेखाचाच विषय होईल. तरीही अशी अवेळ येते तेव्हा जात, पंथ, धर्म, राजकीय पक्षांशी असणारी बांधिलकी असे सगळे भेद विसरुन माणुसकीच्या धाग्याने सगळेजण कसे एकजूट होऊ शकतात याचंही तेच अनुभव म्हणजे एक अनोखं उदाहरण होतं! यासाठी सरकार, स्थानिक प्रशासन यांचं सहाय्य होतंच शिवाय रा.स्व.संघाने स्वत:च्या हिंमतीवर सुरू केलेल्या या अभियानाला असा सर्व स्तरातून मिळालेला सक्रीय पाठिंबा मला नक्कीच कौतुकास्पद वाटला होता! पाऊस कमी होत गेला तसं सर्वदूर पसरलेलं पुराचं पाणी हळूहळू माघार घेत पूर्णत: ओसरायला आम्ही घर सोडल्यानंतरचा पाचवा दिवस उजाडला. तरीही लगेच सर्वांनी परत न जाता “तिथं काय परिस्थिती आहे ते आम्ही दोघे आधी बघून येतो आणि मग आपण ठरवू.” असं सलिल म्हणाला. दोघेही तिथली परिस्थिती पाहून परत आले तेव्हा ते सगळं घरी कसं सांगावं याच विवंचनेत होते!

स्टॅंडवरून पुढे हरिपूर रोडला लागल्यानंतर घरापर्यंत जाणाऱ्या संपूर्ण रस्त्यावर पाण्याबरोबर वहात आलेले कपडे, अन्न, फळं, सगळ्यांचे ढीगच्या ढीग कुजून त्यांच्या असह्य दुर्गंधीने त्या परिसरालाच उकिरड्याचं किळसवाणं विद्रूप प्राप्त झालं होतं! पूर्ण नियोजनपूर्वक परिसर सफाईचं काम सुरू करायला प्रशासनाला अजून एखादा दिवस लागणार होताच. तशाच घाणीतून पुढे जात घराची अवस्था पहावी म्हणून ते दोघे घरापर्यंत जाऊन पोहोचले तेव्हा घराभोवतालची परिस्थितीही यापेक्षा फारशी वेगळी नव्हती. बरेच प्रयत्न करुनही घराचं कुलूप निघेना तेव्हा कुलूप फोडून दार ढकलायचा प्रयत्न केला तेव्हा ते कणभरही हलायला तयारच नव्हतं. प्रचंड शक्ती लावून दोघांनी दार ढकललं तेव्हा कुठे दाराला थोडी फट पडली. त्यातून आलेला दुर्गंधीचा भपकारा आणि दाराला चिकटून आत संपूर्ण हाॅलभर पाय घट्ट रोवून उभ्या राहिलेल्या, पाण्याने स्वत:बरोबर वहात आणलेल्या चिखलाच्या कमरेपेक्षाही उंच अशा अभेद्य भिंतीचं ओझरतं दर्शन त्यांना झालं तेव्हा त्यांना धक्काच बसला.त्या चिखलामुळेच दार पूर्ण उघडलं जात नाहीय हे लक्षात आलं. मग नाईलाजाने दार तसंच ओढून घेऊन ते परत आले होते.अशा परिस्थितीत त्या घरी सर्वांनी लगेच परत जाणे शक्यच नव्हते. नंतर त्यांनीच पुढाकार घेऊन घरसफाईचं तत्परतेने योग्य नियोजन केलं. पुढे सलग दोन दिवस आणि दोन रात्री अथक कष्ट करून निदान त्या घरातला वावर थोडा तरी सुसह्य होईल इतपत स्वच्छता झालीय याची खात्री होईपर्यंत आमचा पुनर्गृहप्रवेश तेवढे दिवस पुढे ढकलायचा असं ठरवून ते दोघे कामाला लागले.पहिल्या दिवशी होईल तेवढी कामे मार्गी लागल्यानंतर रात्री खूप उशीरा ते दोघे परत आले तेव्हा प्रचंड थकलेले तर होतेच पण त्याहीपेक्षा आतून खूप अस्वस्थ असल्यासारखे बराच वेळ गप्प गप्पच होते. पुढे नाईलाजाने सांगणंच आवश्यक होतं ते मोजक्या शब्दात त्यांनी सांगितलं खरं पण त्या अल्पाक्षरातूनही स्पष्टपणे जाणवलेलं आमच्या संपूर्ण घराचंच नव्हे तर आजूबाजूच्या घरांचं चित्रही किती विदारक असेल या कल्पनेनेच आम्ही क्षणभर कां होईना मनोमन धास्तावलोच होतो!

सलिल आणि अनघा आमची प्रतिक्रिया अजमावत वाट पहात असल्यासारखे बसून होते. आम्ही नुसतं ऐकूनच इतके अस्वस्थ झालोय. या दोघांना ते सगळे प्रत्यक्ष पहात दिवसभर तिथे वावरताना किती त्रास झाला असेल हा विचार मनात आला आणि मी भानावर आलो. स्वतःला सावरलं. खरंतर या दोघांना याक्षणी आपल्या आधाराची गरज आहे हे लक्षात येताच मी शांतपणे त्यांना सांगितलं.. ‘ आपण सगळे हातीपायी धड आहोत आणि या संकटाला तोंड द्यायला आर्थिक दृष्ट्या सक्षमही आहोत. ही परमेश्वराची कृपाच म्हणायची. त्यामुळे नशिबाला दोष देत बसायचं नाही. हे बघा, जे नुकसान झालंय ते भरून काढण्याची शक्ती आधी ‘त्या’नेच आपल्याला दिलीय आणि मग हे संकट आणलंय. मग घाबरायचं कशाला? आता यातून बाहेर कसं पडायचं याचा आपण विचार करुया.” सलिलने चमकून माझ्याकडं पाहिलं.

“हो बाबा. हे आम्हीही मनापासून स्वीकारलंय.पण ते तेवढंच असतं तर कांहीच प्रश्न नव्हता बाबा. पण…”

“पण काय..?”

“बाबा..तुम्ही सहन करूच शकणार नाही अशी एक गोष्ट आहे आणि ती तुम्हाला आत्ताच सांगणं आवश्यक आहे. पण तुम्ही त्रास करून घेणार नसलात तरंच सांगेन…” तो कसंबसं म्हणाला. पण घडलंय त्यापेक्षा अधिक धक्कादायक काय असणार? असंच मला वाटतं राहिलं.

“नाही त्रास करून घेणार. बोल तू. काय झालंय?” मी आत्मविश्वासाने म्हणालो.

त्याने पुढे जे सांगितलं ते ऐकून मी सून्नच झालो!अक्षरश: गोठून गेल्यासारखा क्षणभर बसून राहिलो. तो जे म्हणाला होता ते खरंच होतं.पैशाने ज्याची भरपाईच होऊ शकणार नाही असं बरंच कांही मी गमावून बसलो होतो…!!

क्रमश:…  (दर गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नाती गुंतागुंतीची… भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ नाती गुंतागुंतीची… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

प्राचीला आज केतन बरोबर पार्टीला जायचं होतं. खरंतर प्राची या असल्या पार्ट्यांना अगदी कंटाळून गेली होती. पण तिचा इलाजच नव्हता. केतन आर्मीत असल्याने तिला हे सगळं आता अंगवळणी पडलं होतं. आवड नसूनही तिला जावं लागायचं.. नाईलाजास्तव.

खरं तर ती एक उत्तम शिक्षिका. पीएचडी करून दिल्लीत नामांकित कॉलेजमध्ये ती प्रोफेसर होती.

केतनच्या होणाऱ्या बदल्या, मुलांच्या शाळा यामुळे प्राचीला इतकी वर्षं कायम एका ठिकाणीच नोकरी करता आलीच नव्हती. पण आता मात्र केतनने दिल्लीतच शेवटचं पोस्टिंग मागून घेतलं आणि त्यामुळे आता प्राची या कॉलेजमध्ये छान जॉब करत होती. दोन्ही मुलं मोठी झाली होती… परदेशात सेटल झाली होती. प्राचीचं लग्न खूप लवकर झालं होतं आणि मुलंही पाठोपाठ झाली होती. त्यामुळे आता प्राची पन्नाशीतच सुटवंग झाली होती..

मे आणि दिवाळीच्या सुट्टीत कॉलेजला सुट्टी मिळाली की प्राची मुलांकडे जाऊन येई. सुना मुलंही खूष होत आईबाबा आले की.

… चार दिवसांपूर्वी अचानकच प्राचीला अनुजाचा फोन आला.

“ प्राची, अगं मी अनुजा बोलतेय. मी दिल्लीत आलेय. येऊ का तुला भेटायला? क्षमाकाकूंनी तुझा नंबर दिलाय आणि तुला द्यायला खाऊसुद्धा दिलाय. कधी येऊ मी ? आणि फक्त एकच आठवडा आहे बरं का दिल्लीत.. मग पुण्याला परत जाणार आहे. ”

इतक्या दिवसांनी अनुजाशी बोलून प्राचीला खूप आनंद झाला.. ती भेटणार याचा आनंद तर काय वर्णावा.

… तिचं मन एकदम खूप वर्ष मागे गेलं आणि पोहोचलं ते पार नातू वाड्यात.

– – – त्या वाड्यातली ती गुण्या गोविंदाने राहणारी बिऱ्हाडं, मधलं मोठं अंगण. खेळायला भरपूर जागा.

नातू काकूकाका फार छान होते. सगळ्या मुलांना त्यांचा धाकही होता आणि आदरही होता. त्याच वाड्यात प्राची आणि अनुजाचं बिऱ्हाड अगदी शेजारी शेजारी होतं.

… किती घट्ट मैत्रिणी होत्या त्या दोघी. त्यांना इतर मैत्रिणी लागायच्याच नाहीत खरं तर.. चोवीस तास दोघी एकत्र… शाळेत जाता-येता एकत्र, डबा खायलाही एकत्रच.

अनुजाची आई म्हणायची, ” मला मुलगा असता तर सून करून घेतली असती हो प्राचीला. ज्याच्या नशिबात ही असेल तो बेटा खरंच भाग्यवान. ” 

अनुजा भाट्यांची एकुलती एक मुलगी. प्राचीचे वडील जरा चांगल्या हुद्द्यावर होते. सहसा फारसे कोणात मिसळत नसत ते.

… त्या दिवशी अचानक ते एका तेरा चौदा वर्षाच्या मुलीला घरी घेऊन आले. आईने विचारलं, “ अहो. ही कोण?” 

उद्वेगानेच प्राचीचे बाबा म्हणाले, “ सांगतो गं बाई.. त्याचसाठी माझ्या आईचा फोन नव्हता का आला मागच्या आठवड्यात ? ऐक.. ही रजनी. आईने आम्हाला कधीच काहीच सांगितलं नाही.. पण ही आमच्या बाबांची मुलगी आहे. आम्हाला हे काहीच माहीत नव्हतं.. अधूनमधून आई-बाबांची धुसपूस ऐकायला यायची, पण आम्ही लहानच होतो तेव्हा. ”..

“ ऐक.. बाबांचे एका गोव्याकडच्या बाईशी संबंध होते. आणि त्यांनी ते कधीच नाकारले नाहीत. त्या बाईंची ही मुलगी… म्हणजे माझी सावत्र बहीणच झाली… त्या बाईंना कॅन्सर झाल्याचं निदान झालं. बाबांना त्यांनी लगेच काही सांगितलं नाही. पण दुखणं सीरियस झाल्यावर त्यांनी बाबांना बोलावून घेतलं आणि त्यांच्या कडून रजनीला संभाळण्याचं वचन घेतलं. रजनी आता तेरा वर्षाची आहे. आपल्या प्राचीहून सात आठ वर्षांनीच मोठी. काही दिवसांनी माझे बाबा गेले आणि आता रजनीची आई पण गेली.

मग माझी आई गोव्याला जाऊन रजनीला घेऊन आली. कमाल आहे आमच्या आईची पण – – आणि आता माझी आईच आजारी आहे म्हटल्यावर मी हिला आपल्या घरी घेऊन आलोय. माझी ऐपत नाही हिला कुठे हॉस्टेलवर वगैरे ठेवायची. आता तू सगळ्याना असंच सांग की ही तुझी लांबची भाची आहे म्हणून. ” 

अर्थातच प्राचीच्या आईला हे अजिबात आवडलं नाही. पण रजनीला घरात घ्यावंच लागलं. रजनी बिचारी कानकोंडी झाली. दिसायला सुरेख होती. गाणी तर इतकी सुंदर म्हणायची… तिला कॉर्पोरेशनच्या शाळेत घातलं. ‘ रजनीला ताई म्हणायचं’ असं सांगितलं प्राचीला तिच्या आईनं. वाड्यात सगळ्याना सांगितलं,

”अहो माझ्या कोकणात रहाणाऱ्या लांबच्या बहिणीची मुलगी हो ही. माझी भाची. बिचारीचे आईवडील गेले म्हणून आली आमच्या घरी. बिचारी अनाथ पोर आता राहील आमच्या प्राचीबरोबर. ”.. आईने प्रकरणावर पांघरुण घातलं.

रजनी अभ्यासात यथातथाच होती. कशीबशी पास व्हायची. तिला गोव्याची आठवण यायची. कितीतरी वेळा मागच्या पायरीवर एकटीच बसून रडत असायची रजनी.

.. आईला ती कधीच आवडली नाही. रजनीला तिने खायला प्यायला, कपड्यालत्त्याला कमी केलं नाही. पण ते तितकंच..

रजनी घरात निमूट वावरायची. तशीही ती लहानच होती. आपण या घरात आश्रित आहोत ही भावना कायम असायची तिच्या मनात. केवढा उरक होता तिला कामाचा. न बोलता कितीतरी काम उरकून टाकायची ती.

तिचा आवाज अतिशय सुंदर होता. तिला बाबांनी हौसेने गाण्याच्या क्लासला घातलं. प्राचीला मात्र अजिबात आवाज नव्हता आणि आवड तर त्याहून नव्हती. पण रजनी हौसेने गाणं शिकायची. मग आई धुसपूस करायची… ” हो. वळणाचं पाणी वळणालाच जाणार. कमाल झाली हो आमच्या सासऱ्यांची. बरी सुचली ही थेरं. स्वतः गेले मरून आणि आमच्या बोकांडी हे पाप बसवलं… “

आई स्वतःशी बडबड करायची. पण प्राचीच्या बाबांसमोर हिम्मत नव्हती त्यांची बोलायची.

प्राचीला मात्र ही रजनीताई फार आवडायची.. ती विचारायची सुद्धा आईला..

“ का ग आई तू तिच्याशी अशी वागतेस?तिला आई नाही म्हणून अशी वागतेस हो? बिचारी माझी रजनीताई. ” रजनीचे डोळे भरून यायचे. प्राचीला जवळ घेऊन ती आपले डोळे पुसायची.

रजनी दहावी पास झाली. “ मला कॉलेजला नाही जायचं. मला गाणंच शिकायचं आहे पुढे. “ तिने प्राचीच्या बाबांना सांगितलं. निमूटपणे बाबांनी तिला क्लास लावला. स्वतः जाऊन चौकशी करून आले. आणि रजनी गाणं शिकू लागली.

“ आता रजनीच्या लग्नाचं बघा म्हटलं.. पुरे झाली गाणी बजावणी. ” आई चिडून म्हणायची.. “ बघा एखादा गरीब होतकरू मुलगा. आपण देऊ लग्न करून. ”

एक दिवस अचानक रजनी क्लासहून घरी आलीच नाही. प्राची जाऊन बघून आली तर क्लासला कुलूप होतं. सगळीकडे शोधलं पण रजनी कोणालाच दिसली नाही.

– – एक पैसा न घेता रजनी घर सोडून निघून गेली.

आज आठ दहा वर्षे घरी राहिलेली मुलगी न सांगता निघून जाते याचं फार वाईट वाटलं तिच्या आईबाबांना.. त्याहून जास्त अपमान वाटला होता खरंतर 

“ जाऊ दे. आपल्याच हाताला यश नाही “ असं म्हणत ते दोघे गप्प बसले.

– – या गोष्टीला आता अनेक वर्षे झाली होती. सुरुवातीला वाड्यातले लोक बोलबोल बोलले आणि मग गप्प बसले. रजनीला सगळं जग विसरून गेलं.

यथावकाश प्राचीचं अनुजाच्या चुलत भावाशी लग्न झालं. अगदी घरच्यांच्या पसंतीने, मागणी घालून.

केतन आर्मीमध्ये होता आणि एकदम पसंत पडण्यासारखाच होता. प्राचीला तर आवडलाच होता तो. तिच्या आईवडिलांनी हौसेने तिचं लग्न करून दिलं.

.. प्राची सासरी निघाली तेव्हा आईच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. आणि का कोण जाणे पण आज इतक्या वर्षांनंतर तिला रजनीच्या आठवणीनेही गहिवरून येत होतं.

डोळे पुसत ती म्हणाली होती, “ कुठे असेल रजनी? वनवासी पोर हो ते. सुखी असो कुठेही असेल तिथे. ” पोटात माया होतीच त्यांच्या तिच्याबद्दल. अखेर म्हणालीच होती आई की ‘ दिलं असतं की हो नीट लग्न करून रजनीचं. पळून कशाला जायचं म्हणते मी. सुखात राहो बापडी ‘. बाबांच्या आईने रजनीच्या नावचे थोडे दागिने बाजूला ठेवले होते ते बाबांना दिले तिने.. आली कधी तर देऊया असं ठरवलं होतं त्यांनी.

न राहावून आई बाबांना म्हणाली होती.. ‘ मुलगी चांगलीच होती हो. पण तो माझ्या सासऱ्यांचा, तुमच्या वडिलांचा इतिहास आठवला की माझं डोकंच सटकायचं. पण तिचा काय दोष होता त्यात?”

ही गोष्ट अजून प्राचीला माहीत नव्हती. रजनी आपली लांबची बहीणच आहे असंच समजत होती ती.

पुढे प्राचीच्या बाळंतपणासाठी आई तिच्याकडे गेली. केतनचं पोस्टिंग होतं पार लांब साऊथ मध्ये. आपण नसलो तर केतनचे जेवणाचे हाल होतील म्हणून प्राचीने आईलाच तिकडे बोलावून घेतलं.

मायलेकी नेहमी रजनीची आठवण काढायच्या. शेवटी एक दिवस आई तिला म्हणाली, “ प्राची. आता सांगते तुला सगळं. बहीण कसली ग ती तुझी?आत्या लागते ती तुझी… सावत्र आत्या… तुझ्या आजोबांची ठेवलेल्या बाईची मुलगी. आणि आता तू समजू शकतेस की काय वाटलं असेल आम्हाला हे लपवून ठेवताना आणि तिला आपल्या घरात आणताना? मला समजायचं ग की तिचा काहीच गुन्हा नाहीये यात. पण माझं डोकं फिरायचं तिला बघून. पण आता मात्र खरंच तिच्याबद्दल वाईट वाटतं ग प्राची. मी तिला काही कमी नाही केलं, पण मायाही नाही केली कधी. असेल तिथं सुखात राहो बिचारी ”. खऱ्या कळवळ्याने आई म्हणाली.

– प्राची हे ऐकून स्तंभितच झाली. “ तरी आई, तुझं चुकलंच. म्हणूनच ती घर सोडून गेली असेल. ” प्राची म्हणाली.

प्राचीला गोड गोंडस मुलगा झाला. आई तीन महिने राहिली होती तिच्याकडे.

पुन्हा दुसऱ्या बाळंतपणाला मात्र प्राची आईकडे पुण्यात आली. कारण तेव्हा केतनचं पोस्टिंग खूपच लांबच्या आणि अवघड ठिकाणी होते.

दुसराही मुलगाच झाला प्राचीला.

काळाची पानं भराभरा उलटत गेली. प्राचीचे मुलगे मोठे झाले. खूप शिकून परदेशी निघून गेले. प्राचीचेआईबाबाही थकले. अनेकवेळा दिल्लीला लेकीकडे येऊन राहू लागले.

… आत्ता अनुजाचा फोन आल्यावर हा सगळा चित्रपट प्राचीच्या डोळ्यासमोरून झरझर सरकून गेला.

“अनुजा, ये उद्या जेवायलाच. भावाच्या घरी आमंत्रण लागतं हो ग? ये बघू रहायलाच. ”

प्रेमाने अनुजाला दटावत प्राची म्हणाली.

क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चार अनुवादित लघुकथा – रथयात्रा / अंधाऱ्या गल्लीतील प्रकाश / असीम प्रेम / आव्हान – मूळ हिन्दी लेखिकाएं : मीरा जैन / समीरा पत्रावाला / हेमलता मिश्र ‘मानवी’ / ज्योत्स्ना कपिल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ चार अनुवादित लघुकथा – रथयात्रा / अंधाऱ्या गल्लीतील प्रकाश / असीम प्रेम / आव्हान – मूळ हिन्दी लेखिकाएं : मीरा जैन / समीरा पत्रावाला / हेमलता मिश्र ‘मानवी’ / ज्योत्स्ना कपिल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

१) रथयात्रा – –

काही विदेशी पर्यटक भारत भ्रमण करण्यासाठी आले होते. ते एका प्रेक्षणीय स्थळाकडे निघाले होते. वाटेत यांना एक मोठी रथयात्रा दिसली. मोठा, सजवलेला रथ होता. रथात एक काचेची पेटी होती. तीही फूलमाळांनी सजवलेली होती. त्या पेटीतही एक सजवलेला कलश होता. त्या कलशात लाल माती होती. लोक गावातले असोत की शहरातले असोत, मोठ्या श्रद्धेने त्या काळाशाला नमन करत होते. कलशाशेजारी एक दानपेटी ठेवलेली होती. त्या रथामागे प्रचंड जनसागर लोटला होता. लोक आपआपल्या शक्यतेनुसार त्या दानपेटीत पैसे टाकत होते.

विदेशी पर्यटकापैकी एक जण आपल्या साथीदाराला म्हणाला, ‘इंडियन्स अजूनही मागासलेले आणि अंधश्रद्धाळू आहेत. जसा काही तो कलश त्यांच्या मनोकामना पूर्ण करणार आहे. ’

एवढं ऐकून त्यांच्याबरोबर जाणारा गाईड म्हणाला, ‘ सॉरी सर! तो कलश, त्यातली लाल माती निर्जीव दिसत असली, तरी आम्हा सगळ्यांसाठी ती सजीव आहे. सगळ्या देशवासीयांच्या माना त्या निर्जीव वाटणार्‍या शो केसपुढे श्रद्धेने लवताहेत, कारण त्या शो केसमध्ये असलेल्या कलशामधील लाल माती आमच्या देशाच्या सरहद्दीवरील आटी आहे. ती देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या रक्ताने लाल झाली आहे. सरहद्दीवर लढणार्‍या आमच्या सूर-वीर सैनिकांच्या बलिदानाची ती निशाणी आहे. त्या काळाशाशेजारी ठेवलेल्या दानपेटीतील रकमेचा विनियोग त्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांसाठी केला जाणार आहे. ’

हे स्पष्टीकरण ऐकता ऐकता मगाशी टीका करणार्‍या त्या विदेशी पर्यटकाचे डोळे भरून आले.

तो म्हणाला, ’ खरोखरच भारत महान आहे.’


मूळ हिन्दी कथा : भक्ति का सैलाब

मूळ लेखिका – मीरा जैन मो. 9425918116 

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454

२) अंधार्‍या गल्लीतील प्रकाश – –

घरात जन्मलेल्या नव्या नातवाच्या खुशीत, गीतांजली काही कीन्नरांना मिठाई आणि पैसे देत होती, ते पाहून राजू आश्चर्यचकित झाला. हीच आहे का ती गीतांजली, जी प्रत्येक सामाजिक मुद्यावर आपली कडक आणि ठाम मते मांडते आणि नेहमीच तिची कुणाशी ना कुणाशी जुंपते.

एक घटना राजूच्या डोळ्यासमोर जीवंत होऊन साकार झाली…

तो आणि गीतांजली, पौर्णिमाच्या लग्नासाठी जात होते. सिग्नलशी गाडी थांबते न थांबते, तोच एक किन्नराने टाळ्या वाजवत गीतांजलीच्या पुढे हात पसरण्याचं दु:साहस केलं. बस! मग काय? गीतांजली सुरू झाली. खूप वेळ त्याला समजावत राहिली, की असं धड-धाकट असताना भीक मागणं चुकीचं आहे. यात समाजाचे नुकसान आहे. वगैरे… वगैरे…

किन्नरही काही कमी नव्हता. त्याने सरळ सरळ विचारले, ‘आम्हाला कामावर ठेवणार कोण?’

गीतांजली लगेच म्हणाली, ‘ मी ठेवीन. माझी कपड्यांची शो-रूम आहे. आजपासूनच तुला कामावर ठेवते. तुला वीस हजार रुपये महिना मिळतील!’

किन्नरने जोरात टाळी वाजवली नि हसत हसत म्हणाला, ‘बस! इतकेच? महिन्याचे साठ हजार तर मी मागून कमावतो. तुला काम पाहिजे, तर सांग! तसं मागण्याचं काम सोपं नाही. तुझ्याच्याने नाही होणार!’ त्याच्या उत्तराने गीतांजलीला गप्प बसवलं.

– – त्या दिवसांनंतर गीतांजलीच्या मनात या समुदायाविषयी जवळ जवळ घृणाच निर्माण झाली. त्यामुळेच आज ती जे करत होती ते पाहून राजूच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या चेहर्‍यावर उमटलेले प्रश्नचिन्ह पाहून गीतांजली म्हणाली, ‘माझ्यात झालेल्या बादलाचं कारण जाणून घ्यायचय, हो ना!’

राजूने होकारार्थी मान हलवली.

गीतांजली संथपणे हळुवार आवाजात सांगू लागली, ‘ परवा कामासाठी भाईंदरला गेले होते. संध्याकाळी काहीशा उशिराच एका अंधार्‍या गल्लीजवळ रिक्षाची वाट पाहत उभी होते. तिथे थोडीशी गर्दी जमली होती. एक हट्टा-कट्टा गुंड एका शालेय मुलीला त्रास देत होता. तो जवळ जवळ तिला ओढूनच नेत होता. मी हटकलं नसतं, तर त्याने तिला नेलंही असतं. ‘

ती थोडा वेळ थांबली. मग म्हणाली, ‘माझं म्हातारं शरीर त्याला थांबवू शकत नव्हतं. इथे हजर असलेली तरुण मुले मात्र त्या गुंडाच्या धिप्पाड शरीराकडे बघून, जसे काही जमिनीत गाडले गेले होते. मी मदतीसाठी आरडा-ओरडा केला. माझा आवाज ऐकून एक किन्नर आला. काय घडते, हे लक्षात येताच त्याने जोरात आवाज केला आणि काही क्षणातच तिथे अनेक किन्नर एकत्र झाले आणि सगळ्यांनी मिळून त्या मुलीला वाचवले. ‘

गीतांजली दूर जाणार्‍या किन्नरांकडे बघत राहिली, मग हळुवार स्वरात म्हणाली, ‘न जाणे आपण कधीपासून पौरुषत्वाला, हिमतीच्या ऐवजी शरीराने मोजणं सुरू केलं! त्यामुळे आपण कधी कधी लोकांना समजण्यात चुका करतो. ’

राजूच्या मनात अजूनही अनेक प्रश्न निर्माण होत होते, पण त्याला सध्या तरी गीतांजलीचं हे बदललेलं रूप आवडलं होतं.

मूळ हिंदी कथा – ‘ अँधेरी गली की रोशनी’ 

मूळ लेखिका – समीरा पत्रावाला मो. 9867546293

अनुवाद – उज्ज्वला केळकर मो. – 8369252454 

३) असीम प्रेम – –

‘नाही! मी तुझ्याकडून हे फूल घेऊ शकत नाही. नाही स्वीकारू शकणार मी हे फूल! अमन, तुझ्या प्रेमाचे निवेदन मी स्वीकारू शकत नाही. ’

‘का बरं?’ तू आणखी कुणाची वाट बघते आहेस का? कोण आहे तो नशीबवान?’

‘माझ्या हृदयाने कायम अमनचीच कामना केलीय. ’

‘तरी पण आजच्या प्रेम दिवशी तू माझं फूल स्वीकारायला नकार देतेयस. तुझ्या मनात दूसरा कुणी भऱलाय का?’

‘ इतका मोठा आरोप तू माझ्यावर करू नकोस. मी केवळ अमन आणि अमनचीच कामना केलीय! पण काय करू? कसं सांगू? मी आता तुझ्यायोग्य राहिले नाही. तू मागच्या सुट्टीत चंदीगडला गेला होतास, तेव्हा सीमा पार करून काही आतंकवादी आमच्या गावात आले. त्यांनी गावातल्या काही मुलींना आपल्या वासनेच्या शिकार बनवल्या. मी अभागीही त्यांच्यापैकी एक होते अमन. आता तूच सांग. पायतळी चुरगाळलेलं फूल ईश्वराला अर्पण करत नाहीत ना!’ बोलता बोलता स्फुंदून स्फुंदून स्नेहा रडू लागली. अमन क्षणभरासाठी स्तब्ध झाला. दुसर्‍या क्षणी त्याच्यातील सुरक्षा रक्षक जागा झाला.

हुंदके देणार्‍या निर्दोष स्नेहाला गळामिठी घालत अमन एकच वाक्य बोलला, ‘त्या नापाक लोकांचे पाय आमच्या पवित्र धारणीला लागले, म्हणून काय आपण आपल्या धरणीला अपवित्र मानायचं? नाही नं? मग त्या जंगली जनावरांच्या अभद्र हरकतीमुळे तू कुठे मलीन झालीस?तू तर या पवित्र धरेसारखी पवित्र आहेस,

जी नेहमीसाठी अमनचीच इच्छा धरून आहे. विसरून जा सगळं. तू माझीच आहेस. नेहमीसाठी. आता त्या जंगली जनवरांसाठी माझ्या बंदुकीतल्या गोळ्या आणखीनच निर्मम होतील. बघच तू!

– – आणि प्रेमदिवाणी स्नेहाने आपले डोळे अमनच्या पावन इच्छेवर ओवाळून टाकले. त्या अपरिभाषित प्रेमदिवशी.

मूळ कथा – ‘अछोर प्रेम’ 

मूळ लेखक – हेमलता मिश्र ‘मानवी’ मो. ९325855263

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो– 8369252454

४) आव्हान – – 

जूनागड संस्थानच्या वार्षिक गायन स्पर्धेची घोषणा झाली होती. संगीत प्रेमींमध्ये खूप उत्तेजना निर्माण झाली होती. उस्ताद जाकिर खान आणि पंडित ललित शास्त्री दोघेही बेजोड गायक होते, पण त्यांच्यात तीव्र स्पर्धा होती. राष्ट्रीय संगीत आयोजन स्पर्धेसाठी दोघेही आपली सर्व ताकद पणाला लावून, जिवाची बाजी लावून रियाज करत होते. दोघांच्याही शागीर्द, शिष्यात हाणामारीची वेळ येत असे. दोघांचेही शिष्य आपापले गुरू श्रेष्ठ असल्याचे सांगत.

खानहेब एखादा आलाप घ्यायचे, तेव्हा लोक शुद्ध-बुद्ध हरपून ऐकत राहायचे. इकडे शास्त्रीजींच्या एका आरोह-अवरोहाच्या प्रवाहात लोक श्वास रोखून, त्यांना ऐकत राहत. दोघांचाही रियाज ऐकून स्पर्धेत विजेता होण्याचा गौरव कोण प्राप्त करेल, हे सांगणे मोठे मुश्कील काम होते. त्यांच्यात कोण विजेता होईल, याबद्दल मोठ मोठया पैजा लागत.

शास्त्रीजींची बोटे सतारीवर थिरकत होती. ते आपल्यातच मग्न होऊन स्वरांच्या लहरी विखरत होते. पशू-पक्षी ते सूर ऐकता ऐकता सगळं विसरून गेले होते. एवढ्यात त्यांचा एक शिष्य पळत पळत त्यांच्याकडे आला. म्हणाला, ‘आपण संगीताच्या दुनियेतील सम्राट होऊन रहाल. आपल्याला यापुढे कधीच कुणीच आव्हान देऊ शकणार नाही.

‘का बरं?’

‘गुरुजी, आत्ता आत्ताच बातमी कळली, की आज रियाज करता करता खानसाहेबांचा अंतकाळ झाला. ’ अतिशय उत्तेजित आवाजात त्यांचा शिष्य सांगत होता.

– – हे ऐकताच शास्त्रीजींचं तोंड उघडं ते उघडंच राहिलं. मग डोळ्यात अश्रू तरळले. मग त्यांनी सतार उचलली. ती गवसणीत घालून नेहमीच्या जागी ठेवली. मग देवी सरस्वतीला प्रणाम केला. मग शून्य नजरेने आभाळाकडे बघत भरून आलेल्या आवाजात म्हणाले…

‘आज माझी उमंग, उत्साह, मनोबळ सरलं… आता मी जीवनात कधीच गाऊ शकणार नाही.

मूळ हिन्दी कथा – ‘ चुनौती ‘

मूळ लेखिका – ज्योत्स्ना कपिल.. मो. 9412291372

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो– 8369252454

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वर्गीय निर्भया…  ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

श्री नागेश शेवाळकर

अल्प परिचय

सेवानिवृत्त शिक्षक. राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहे.

गेली तीस वर्षांपेक्षा अधिक काळ साहित्य लेखन सुरू आहे. धार्मिक, कादंबरी, कथा, बालकथा नि कादंबरी, चरित्र, पत्र, पुस्तक परिचय, विविध विषयांवरील लेख अशा लेखन विभागात पन्नासपेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत.

कर्मण्येवाधिकारास्ते मा फलेषु कदाचन याप्रमाणे साहित्य सेवा सुरू आहे.

? जीवनरंग ?

☆ स्वर्गीय निर्भया…  ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

हळूहळू तिने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न करुनही डोळे किंचितही उघडले नाहीत. कसेतरी मोठ्या मुश्किलीने डोळे किंचितसे उघडताच तिने इकडेतिकडे पाहिले. सारेच कसे नवीन होते. सुकलेल्या अश्रूंचा एक थर गालावर दिसत होता. असह्य वेदना होत होत्या. मूक आक्रोश कुणाला ऐकू जात नव्हता. तिला अचानक काहीतरी आठवले. ती जीवाच्या आकांताने ओरडली. परंतु तिचा आवाज तिलाच ऐकू आला नाही.

“म… म… मम्मी… ” तिच्या आवाजाला ‘ओ’ मिळाला नाही. ती पुन्हा पुन्हा ओरडत होती. तिथे तिची मम्मी नव्हतीच तर तिला प्रतिसाद कसा मिळेल?

 कुणीतरी तिच्या अंगाला स्पर्श केला. पण तिला हवा असलेला तिच्या मम्मीचा तो स्पर्श नव्हता. स्पर्श कोमल असला तरीही तिला तो स्पर्श अनंत यातना देत होता. तशाही परिस्थितीत ती स्पर्श ओळखत होती. तरीही त्या हातांनी तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. जे हात तिला सावरण्याचा प्रयत्न करीत होते, त्या शरीराचेही भूतकाळात कधीतरी निर्दयपणे लचके तोडले होते. त्या जखमा पुरत्या कोरड्या होत नव्हत्या. वासनांकिताच्या घाणेरड्या कृत्याला बळी पडलेली कुणीतरी ‘निर्भया’ दररोज येतच होती. तिचे ओरबाडलेले शरीर पाहून अगोदर पोहोचलेल्या निर्भयाच्या आठवणी ताज्या होऊन जखमा ठसठसत, डोळे पाझरत असले तरीही त्यात संतापाची आग धगधगत होती. हाताच्या मुठी आवळल्या जात परंतु दुसऱ्याच क्षणी स्वतःची, आलेल्या नवागत बालिकेची, तरुणीची नि अधूनमधून येणाऱ्या वृद्ध महिलेची हतबलता लक्षात येताच शरीर जणू निष्प्राण होत असे. डोळ्यातील अंगार अश्रू रुपाने वाहत असत, थरथरणारे हात लकवा झाल्याप्रमाणे स्थिर होत.

 नुकतीच आलेली ती बालिका… नव्हे निर्भया केवळ तीन वर्षांची होती. अनेक दिवस उपाशी असलेल्या एखाद्या व्यक्तिसमोर अन्नाचे ताट येताच ती व्यक्ती जशी त्या अन्नावर तुटून पडते तसा तो नराधम (खरंतर नराधम, राक्षस, दानव, गुंड इत्यादी विशेषणं थिटी पडावीत) त्या बालिकेवर तुटून पडला होता. अजून जगाची सोडा परंतु स्वतःच्या शरीराचीही ओळख न झालेल्या त्या कन्येचा आक्रोशही त्याने दाबून टाकला होता.

 तशाच जखमी अवस्थेत, त्या जखमा शरीरावर घेऊन त्या साऱ्या ज्यांना समाजाने ‘निर्भया’ ही पदवी बहाल केलीय त्या तिथे वावरत होत्या. स्वर्ग म्हणवणाऱ्या ठिकाणी त्या नरकाप्रमाणे राहत होत्या. पृथ्वीवर नरकीय यातना भोगल्या नंतर थेट स्वर्गात प्रवेश मिळाला होता. सुदैव म्हणावे की दुर्दैव? कदाचित पृथ्वीवर जे भोगले होते कदाचित ते नरकयातनेपेक्षा अधिक होते.

 तिथे अनेक निर्भयांच्या जखमा त्या नवागत चिमुकल्या बालिकेला पाहून ठसठसत होत्या. आपापसात चर्चा सुरू झाली. एकजण म्हणाली,

“अजून बिचारीच्या ओठांवरचे दुध सुकले नाही तर त्या कोवळ्या ओठांनी राक्षसी, विखारी दंश कसे सहन केले असतील? बिचारीची दशा पाहवत नाही. “

“अगं, तिकडे पृथ्वीवर हिच्या आईच्या छातीतील दुधही बाहेर पडण्यासाठी तळमळत असेल. दुर्देव, दुर्भाग्य, ससेहोलपट, कमनशिबी असे शब्दही कमी पडावेत अशी अवस्था झाली आहे बाळाची. “

“जखमा त्या जखमाच, अत्याचार ते अत्याचारच परंतु वयाप्रमाणे सहनशक्ती महत्त्वाची असते. आपली प्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे आपण सुरुवातीला विरोध तरी केला असेल दुर्दैवाने तो यशस्वी झाला नसेल परंतु ही बिचारी तर सुरुवातीला ओरडण्याशिवाय काहीही करू शकली नसेल. “

“बरोबर आहे. आताही ती फक्त मम्मीच म्हणत आहे… ” असे म्हणत ती त्या बालिकेजवळ पोहोचली. तिने बालिकेच्या चेहऱ्यावरील जखमा आणि त्यावर सुकलेले अश्रू पाहताच तिचे स्वतःचे डोळे पाझरू लागले. तिने हलकेच तिच्या गालावर बोट ठेवले. ती चाहूल लागताच त्या मुलगी दचकली. त्या अनिष्ट गोष्टीची तिला आठवण आली असावी. तिने शरीर आकसून घेतले. तिचे शरीर थरथरत होते. ओठही हलत होते. त्यातून थकलेला आवाज निघत होता. ती ‘मम्मी… मम्मी… ‘ असे म्हणत होती. तिला आधार देऊ पाहणाऱ्या निर्भयाने बाजूला पाहिले. इतर निर्भया तिला ‘थांब… ‘ असा इशारा करत होत्या.

“थांब! थोडा वेळ होऊ देत. सावरेल ती… “

“सावरेल? असं झालं असतं तर किती छान झालं असतं? अत्याचाराला बळी पडून आपल्यापैकी कुणाला पाच वर्षे, दोन वर्षे, कुणाला सात… कुणाला दहा वर्षे झाली आहेत. किती जणी सावरल्या आहेत? किती जणींच्या जखमा भरल्या आहेत? … “

“कसं सावरावं? जखमा भरतीलच कशा? रोज इथे कुणीतरी नवीन निर्भया येतीय, तिच्या‌ शरीरावरील जखमा पाहिल्या की, आपल्या वेदना तीव्र होतात. आपल्या डोळ्यासमोर आपण अनुभवलेला प्रसंग जशास तसा उभा राहतो. डोळे पाणावतात, अंग थरथरते. शरीरात संतापाचा आगडोंब उसळतो. पण, तेव्हाही आपण काही करू शकलो नाही. आताही काही करू शकत नाही ही जाणीव होताच आत्मा निष्प्राण होतो. “

“हो ना. तो अत्याचारी एकदा अत्याचार करून मोकळा होतो, कदाचित तो विसरूनही जात असेल की, आपण कुणावर, किती जणींवर शारीरिक, मानसिक हल्ले केले आहेत. होय, ते हल्लेच असतात. किती जणींचे विकृत वासनेच्या हव्यासापोटी बळी घेतले आहेत. इथे आपण तर त्याच जखमा शरीरावर घेऊन वागत असतो… “

“एक गोष्ट आपण सगळ्या जणींनी अनुभवलेली आहे. आपला छळ करून तो दानव निघून जाताच आपल्या जखमांवर मीठ नव्हे तीखट टाकण्याचे काम आपले कुटुंब, नातेवाईक, परिचित, समाजकारणी, राजकारणी करतात… “

“माझ्या मनातील बोललीस बघ. तो नराधम निघून जाताच पीडितेला तासनतास पोस्टमार्टमसाठी दवाखान्यात खितपत ठेवले जाते. बाहेर आपले कुटुंबीय हतबल, सर्वस्व गमावलेल्या अवस्थेत बसून असतात. तेव्हा कुणीतरी पुंगी वाजवतो, अपराध्याला पकडल्याशिवाय अंत्यसंस्कार होऊ द्यायचे नाहीत… “

“अगदी बरोबर आहे. मी हे अनुभवलं आहे. तीन दिवस माझा मृतदेह बेवारशी अवस्थेत पडून होता. तेव्हा एका मोठ्या राजकीय व्यक्तिशी संबंध असलेला तो नीच कुठेतरी लपून बसला होता. तीन दिवसांनंतर माझे अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी मला करकचून बांधून ठेवले होते. ना मला आईबाबा, भाऊ बहिणी यांचे दर्शन झाले ना त्या कुणाला माझा चेहरा पाहता आला… “

“हेच दुर्दैव माझ्याही नशिबी आले. दुसरे म्हणजे त्या दुष्ट माणसाच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मेणबत्ती मोर्चे निघाले. माझे फोटो आणि त्याभोवती पेटविलेल्या मेणबत्त्या! त्या मेणबत्त्यांच्या प्रकाशाने माझ्या जखमांची आग अजून धगधगत होती. अनन्वित छळ माझा झाला, मी विकृत वासनेची बळी ठरले आणि राजकारणी लोक माझ्या भळभळत्या जखमांवर स्वतःच्या मतांची पोळी भाजून घेण्यासाठी सरसावत होते. माझे कुटुंबीय सांगून सांगून थकत होते. माझी आई त्याच त्याच गोष्टी वारंवार सांगून, इतर कुणी सांगत असताना चक्कर येऊन पडत होती. पण तिचा कुणी विचार करत नव्हते… “

“हो ना. तिकडे तो क्रुरकर्मी मोकळा हिंडतो किंवा पोलीस ‘संरक्षणात’ असतो. नावाला तुरुंगात असतात. तिथे तो ऐषो आरामात लोळत असतो. त्या अत्याचारानंतर आपल्या देहाची विल्हेवाट लावली जाते. आत्मा इथे येतो. तो म्हणे अमर असतो. काय करायचे अशा अमरत्वाला? आत्मा जसा अमर असतो तशा आपल्या जखमाही अमरच असतात, म्हणून तर आपण त्या जखमा मिरवत जगत असतो. खरंतर आपल्यासारख्यांच्या आत्म्याला ‘अमर’ हा शापच असावा, उःशाप नसलेला! “

 “किती स्वप्नं पाहिली असतील हिच्या कुटुंबाने त्यातही आईनं! एका क्षणात स्वप्नांचे इमले ध्वस्त झाले असतील. “

“का गं? पुनर्जन्म असतो का गं? “

“कशाला पुनर्जन्मचा विचार करतेस? या जन्मी जे भोगलं ते विसरतेस का? “

“ते विसरता तर येत नाही ना, जर खरेच पुनर्जन्म असेल तर पुन्हा जन्म घेऊन त्या राक्षसाला अद्दल घडवताना त्याचे डोळे बाहेर काढले असते, त्याचे लिंग छाटले असते त्यामुळे ना त्याने पुन्हा दुसऱ्या महिलेसोबत सोड पण स्वतःच्या बायकोकडेही सात जन्मं पाहिले नाही पाहिजे… “

“हे तुझे स्वप्नं आहे. तेही बरोबर आहे म्हणा, अशी स्वप्ने पाहिले की, क्षणभर का होईना पण, गिधाडाने कुस्करलेले मन शांत होते… “अशी चर्चा होत असताना तिथे एका यमदूताचे आगमन झाले. त्याने एक आत्मा खाली उतरवल्याचे पाहून अनेक जणी किंचाळल्या,

“पुन्हा एक निर्भया.. बालिका? “

“निर्भया नाही… निर्भय म्हणा! मुलगा आहे… तीन वर्षांचा! एका राक्षसाच्या विकृत वासनेचा बळी… ” असे सांगून तो यमदूत स्वर्गातील ‘निर्भया’ दालनातून बाहेर पडला…

© श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जिंदगी, एक सफर, है सुहाना! ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ जिंदगी, एक सफर, है सुहाना! ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

२१ जानेवारी…

वडोदरा (बडोदा) रेल्वे स्टेशनवरची एक आळसावलेली सकाळ. सकाळी ८ वाजता अपेक्षित असलेली जोधपूर – हडपसर (पुणे) एक्सप्रेस दोन तास उशीरा धावत होती.

लोकं थोडेसे कंटाळलेले, उशीर होतोय ही तक्रार तर होतीच, पण “पु लं”च्या म्हैस कथेत म्हटल्याप्रमाणे, बस उशीरा येणार हे आधीच ठाऊक असतं, तर तासभर जास्त झोपलो असतो, हा सूर जास्त होता.

AC III मध्ये १७ ते २४ क्रमांकामधले उतरणारे प्रवासी उतरले होते, नवे प्रवासी चढून स्थिरावत होते, सामान जागेवर लावलं जात होतं, आणि त्या वेळी, “त्या दोघींचं” तिथे आगमन झालं.

त्यातली छोटी – पियू – गुलाबी दुपट्यात गुरफटलेली होती, भरतकामाने दुपट्यावर तिचं नाव मोठ्या झोकात लिहिलेलं होतं. पण लक्ष वेधून घेत होती ती तिची आई – रसिका. ती गुजराती होती, माहेर सुरतचं, सासर बडोद्याला, आता भाऊ IT कंपनीत पुण्याला नोकरीला असतो म्हणून ती आणि पियू मामाच्या गावाला निघाले होते.

ही सगळी माहिती आम्हाला कळण्याचे कारण रसिका स्वतःच होती. डब्यात शिरल्याशिरल्याच, आम्ही कोणीही न विचारताच, तिने ही माहिती आम्हा सर्व सहप्रवाश्यांना मोठ्या उत्साहाने सांगितली होती.

खिडकीत बसलेले पन्नाशीचे गृहस्थ कोणत्या तरी कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर असावेत, दोन तास आधी अहमदाबादला ते गाडीत चढले होते, आणि आल्यापासून कॉम्प्युटर उघडून काम करत बसले होते. बाळ आलेलं पाहिल्यावर त्यांच्या कपाळावर आठ्या चढल्या, बाळाच्या रडण्याने त्यांच्या कामात व्यत्यय येईल अशी त्यांची रास्त शंका होती.

रमणिकभाई आणि ज्योत्स्नाबेनसुद्धा बडोद्याहूनच पुण्याला निघालेले, आजी आजोबा कॅटेगरीतील या दोघांना या अनोळखी मायलेकींबद्दल प्रेम आणि कुतूहल.

Gen z ची रमोना हेडफोन लावून इतरांना न ऐकू येणाऱ्या संगीतात मग्न, पण तिनंही या दोघींना पाहिलेलं, या दोघींची दखल घेतलेली.

आणखी एक सहप्रवासी कोल्हापूरकडच्या भामाकाकू, एक पुण्याचा घारागोरा तरुण – जोशी किंवा गोखले आणि साईड बर्थला वरती स्थानापन्न झालेला मी – असे त्या १७ ते २४ क्रमांकाचे आम्ही तात्पुरते सहप्रवासी.

बाळाच्या कपड्यांच्या ढीगाने भरलेली मोठ्ठी पिशवी, खाण्याचा मोठा डबा, आणि पर्समधून डोकावणारी “बाल संगोपना”ची माहिती देणारी पत्रकं – अशा आयुधांनी रसिका सज्ज होती.

पियू झोपलेलीच होती, पण गाडीने स्टेशन सोडलं, आणि रसिकाच्या मोबाईलमधून “हा लू लू लू, हाला रे हाला” या प्रसिद्ध गुजराती अंगाईगीताचे सूर ऐकू येऊ लागले. रेल्वेत अचानक मिळालेल्या या संगीतसेवेने आम्ही सगळेच जण चमकून एकमेकांकडे बघू लागलो. कॉम्प्युटरवाल्या काकांनी घाऱ्यागोऱ्याकडे बघून “हे असं काहीतरी होईल असं मला वाटलंच होतं”, असं सांगणारा मुद्राभिनय केला, घाऱ्यागोऱ्यानेही नजरेतूनच त्याला दुजोरा दिला.

हे गाणं म्हणजे रमणिकभाई ज्योत्स्नाबेनचं होम पीच – त्यामुळे ते दोघं मात्र त्या तालासुरात हरवून आणि हरखून गेले.

पियूने झोपेत आळोखेपिळोखे दिले, हातवारे केले किंवा काही कुरकुरली, की रसिका लगेच त्याचे वेगवेगळे अर्थ आम्हाला, न विचारताच, संदर्भासह स्पष्ट करून सांगे. “बघा ना, माझी चहाची वेळ झालीये, असं सांगतीये ती. सगळं कसं बरोब्बर लक्षात असतं तिच्या! ” म्हणत रसिकाने पोतडीतून एक थर्मास काढला आणि आम्हा सगळ्यांच्या हातात रिकामे कप कोंबत त्यात वाफाळता चहा ओतू लागली. “मसाला चहा – चाय गरम. नाही म्हणायचंच नाही! ” तिनं कॉम्प्युटरवाल्या साहेबांना ठणकावून सांगितलं.

चहा फर्मास होता, कॉम्प्युटरवाल्या साहेबांचा चेहरा फ्रेश झाला, कपाळावरची एखाद आठी कमी झाल्यासारखी वाटली.

एव्हाना सूरत स्टेशन आलं होतं, पाच मिनिटं ट्रेन थांबणार होती. पियूला भामकाकूंच्या मांडीवर ठेवून रसिका दारात उभी राहिली. आणखी खाण्याचं सामान घेऊन तिचे आई बाबा आले होते. गाडी सुटल्यावर आम्हा सगळ्यांना “मेरे माँ के हाथोंसे बनाये” हुवे सुरती उंधियू दिले गेले. या चवीला रमोनानेसुद्धा हेडफोनसह दाद दिली.

पियूचे घोराख्यान सुरूच होतं.

उंधियू पाठोपाठ तोंड गोड करण्यासाठी “फ्रूट मठ्ठो” नावाने फ्रुट श्रीखंड आलं. “तमे खबर छे? पियू का पहला सॉलिड खाना यही था” मग इथून पुढे काही काळ पियूच्या वेगवेगळ्या “पहिल्या गोष्टी” ऐकण्यात गेला. पहिलं smile, पहिली ढेकर, पहिल्यांदा तिनं आईचं बोट धरलं, आणि अशा अनेक कथा!

स्वतःबरोबर आणलेल्या खाण्याव्यतिरिक्त येणाऱ्या जाणाऱ्या फेरीवाल्याकडून भेळ, समोसे, वडापाव यावर ती मनसोक्त ताव मारत होती. तिने दिलेले खारे शेंगदाणे आम्ही सगळे कुडूम कुडूम आवाज करत खात होतो आणि भरूचचे शेंगदाणे, नारळ पाण्यात भिजवलेले शेंगदाणे या विषयांवरच्या परिसंवादात सहभागी होत होतो. “नारळपाण्यात भिजवलेले शेंगदाणे गोड होतात, त्यामुळे त्यांना खारे शेंगदाणे का म्हणावे? ” असा अस्मितेचा प्रश्न घाऱ्यागोऱ्याने उपस्थित केला.

जेवणखाण्याचे आदानप्रदान केले गेले, आणि मग मोबाईलमध्ये गजर लावून, “चला, पियू झोपली आहे, जेवणानंतर तुम्ही सगळेसुद्धा अर्धा तास झोपा पाहू” असं फर्मान सोडत, गाडीत शिरल्यापासून पहिल्यांदाच, रसिकाचा लाऊडस्पीकर शांत झाला.

आता आमच्या १७ – २४ मध्ये, गाडीचा लयबद्ध आवाज आणि त्याला विसंवादी भामाकाकूंच्या घोरण्याचा खर्ज एवढे दोनच आवाज भरून राहिले होते. घोरण्याला लय सापडली, काकू समेवर आल्या, आणि नेमका रसिकाच्या फोनचा गजर खणखणला, “चलो, wake up, wake up. जादा सोना सेहत के लिये हानीकारक होता है”, रसिकाची टकळी पुन्हा नव्या जोमाने सुरू झाली.

मग कर्जतचे वडे आले, रसिकाने दिलेले फाफडा – खाकरे खाणं झालं, कॉम्प्युटरवाल्या सरांनी सगळ्यांना कॉफी पाजली.

बघता बघता चिंचवड यायची वेळ झाली. रसिका इथे उतरणार होती, तिचा भाऊ हिंजवडीला नोकरीला होता, तिथे जायला चिंचवडला उतरणं जास्त सोयीचं होतं.

उतरण्यापूर्वी, रसिकाने आम्हा सगळ्यांना हाताने चित्र काढलेली छान छान ग्रीटिंग कार्डं दिली – ती त्या पियूच्या नावाने होती – प्रवासात तिच्यामुळे काही त्रास झाला असला तर त्याबद्दल खूप सॉरी म्हणणारी.

चिंचवड आलं, स्टेशनवर रसिकाचा भाऊ तिला घ्यायला आला होता. प्रवासात बहुतेक वेळ झोपलेली पियू आता मात्र जागी झाली होती. आम्हा सगळ्यांना टाटा करत ती मामाच्या कडेवर जाऊन बसली.

प्रवासात पियू तर छान झोपली होती, तिचा काहीच त्रास झाला नव्हता. पूर्ण प्रवासभर तिच्या आईचीच – रसिकाचीच चिवचिव सुरू होती. पण त्यामुळे एरवी संभावित सौजन्याचे पोशाखी मुखवटे घालून प्रवास करणाऱ्या आम्हा सहप्रवाशांचा प्रवास मात्र “जिंदगी, एक सफर, है सुहाना” होऊन गेला होता.

(काल्पनिक कथा)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दमलेल्या बाबाची गोष्ट… — भाग – २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ दमलेल्या बाबाची गोष्ट…  — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मी जेवण न करता उशीत डोकं खुपसून रडू लागले, अरुण येरझाऱ्या घालत होता. त्याच्या मनात केवढा कल्लोळ माजला असेल याची मला कल्पना होती. काही वेळानंतर अरुण फोनवर बोलल्याचे मला ऐकू येत होते.. निश्चितच तो अमिताशी बोलत असणार.) इथून पुढे – –

सकाळी अरुण मला म्हणाला, पुढील महिन्यात अमिता आणि जॉन भारतात येत आहेत. आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रमंडळी साठी परत एकदा त्यांचे लग्न करू. दुसऱ्या दिवशी लग्नाचे रिसेप्शन ठेऊ. आपल्याला उसना उत्साह दाखवावाच लागेल.”

मी गप्प राहिले, मला चहा करण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती, अरुण ने सकाळी चहा केला, आपल्यासाठी आणि माझ्यासाठी नाश्ता बनवला. मग अरुणेच धावपळ करून एक छोटा हॉल ठरवला. 50 माणसांसाठी लग्नाची तयारी केली, जुहू मधील एका मोठ्या हॉटेलात रिसेप्शन ठेवले. शंभर पत्रिका छापल्या. जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पत्रिका आणि काहींना फोन करून आमंत्रण दिले. सर्वांनाच धक्का बसला, माझी आई, बहिणी, अरुणची बहीण, भाचा, भाची सर्वजण आश्चर्यचकित झाले. कोणाला काही अंदाजच नव्हता. अरुण गावी जाऊन देवांना आणि घरच्या माणसांना आमंत्रण देऊन आला.

लग्नाच्या आधी दोन दिवस अमिता आणि जॉन आले. जॉन मला भेटायला आला. मला तो मुळीच आवडला नाही. वाढवलेले केस, दाढी, ढगळ कपडे, तोंडात सतत इंग्लिश मध्ये शिव्या, भारताला कमी लेखणे. पण मी असाहाय्य होते, माझ्या मुलीने त्याच्याशी लग्न केले होते, अरुण ला पण तो आवडला नव्हता हे कळत होते, पण अरुण तोंड मिटून गप्प होता.

यावेळी माझी मुलगी मला अनोळखी वाटली, तिचे प्रेम आटून गेले की काय अशी मला शंका आली. ती तिच्या बाबांना स्पष्टपणे म्हणाली, “अमिता – बाबा, आता मी फारशी भारतात येणार नाही, तुम्हा दोघांना वाटल्यास तुम्ही अमेरिकेत या. जॉन हा अमेरिकेतील मोठा पॉप सिंगर आहे. त्याच्या गाण्याचे त्याला खूप पैसे मिळतात. मी पण नोकरी सोडणार नाही. मला अमेरिकेत डॉलर्स मध्ये पैसे मिळतात. त्यामुळे यापुढे माझ्यासाठी पैसे जमवू नका. आता दोघांनी आराम करा. व्यवसाय कोणाकडे तरी सोपवून मोकळे व्हा. “

तिचे हे बोलणे ऐकून तिचा बाबा गप्पच झाला. आमच्या समाधानासाठी अमिता आणि जॉन यांचे आमच्या पद्धतीने छोटेसे लग्न लावले. दुसऱ्या दिवशी जुहू मधील मोठ्या हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवले. माझ्या माहेरील सर्वजण हजर होते, अरुण च्या घरची मंडळी पण उपस्थित होती. सर्वजण अभिनंदन करत होते, कौतुक करत होते, पण मला कळत होतं काही काही लोकांच्या डोळ्यात कुचेष्टा होती, काहींच्या सहानभूती. प्रत्येकाच्या डोळ्यात मी वाचत होते, एकुलती एक मुलगी आई-वडिलांना न जुमानता निघाली असल्या धेंडा बरोबर लग्न करून.

दोन दिवस मुंबईत राहून अमिता आणि जॉन अमेरिकेला निघाले. मला वाटले होते जाताना तरी अमिता माझ्या गळ्यात पडेल, मला मिठी मारून रडेल, बाबाला सावरेल… पण तसे काहीच झाले नाही. ती अतिशय आनंदात तिच्या जॉन बरोबर अमेरिकेला गेली.

गाडीतून परत येताना अरुण गप्प गप्प होता. तो तसा मनस्वी, मनातील खळखळणारा समुद्र जाणवू न देणारा. मी मात्र सुन्न झाले होते. कशासाठी आणि कोणासाठी ही सर्व धडपड.?

घराचे दार उघडून आम्ही दोघे घरात आलो आणि अरुण ओक्साबोक्सी रडू लागला. “आपली लेक आपल्याला परकी झाली गं, मुंबईत आली चार दिवस पण परक्यासारखी वावरली. जन्म दिला आपण, लहानाचे मोठे केले आपण, शिक्षण दिले संस्कार दिले आपण आणि त्या जॉन पुढे आपण तिला परके झालो”.

मग मी पुढे झाले, त्याला जवळ घेत मी म्हणाले, “खूप धडपडलास तू आमच्यासाठी, मुंबईत आलास तेव्हा तुझ्याकडे काहीही नव्हतं. आपलं लग्न झालं तेव्हा तू मामाकडे राहत होतास. मग छोटासा व्यवसाय सुरू करून यश मिळवलंस. मग अमिताचा जन्म झाल्यानंतर तू आणखी धडपडलास, स्वतःची जागा घेतलीस, ऑफिस साठी जागा घेतलीस, मग पुण्याला एक फ्लॅट घेतलास, घर, गाडी, फर्निचर, सर्व झालं, पण हे कुणासाठी? माझ्यासाठी आणि त्यापेक्षा लाडक्या लेकीसाठी, किती धडपड करशील रे…? कुणाला त्याची काही किंमत तरी आहे का? ती आपली लेक सांगून गेली, ‘आता सर्व कमी करा’ मग करा ना कमी सर्व, आपणा दोघांसाठी कितीसं काही लागणार आहें?

तुमच्या गावात तुमच्या चुलत भावाबरोबर कोर्टात केस? दहा गुंठे जमिनीसाठी? दहा वर्षे झाली त्या केसला, अजून काही निकाल लागत नाही, कशाला हवी गावची जमीन? तुमचा चुलत भाऊ झाला तरी तो तुम्हा मांजरेकर कुटुंबापैकीच आहे ना? म्हणजे तुझे आणि त्याचे आजोबा एकच. मग मिळू दे त्या मांजरेकर कुटुंबातील माणसाला. दुसऱ्यांनी जमीन खाण्याऐवजी तुझ्या कुटुंबातील एकाला मिळाली तर का नको? घेऊन टाक ती केस मागे, सर्व मांजरेकर कुटुंब एक होऊ दे.

तुझ्या मित्राचा मुलगा तुझ्याबरोबर व्यवसायात आहे, गेली कित्येक वर्षे इमाने इतबारे काम करतोय, हळूहळू त्याच्या हातात सर्व धंदा दे. पुण्यात तुझ्या बहिणीचा मुलगा अश्विन आहें, त्याला जागा नाही आहें, त्याला म्हणावं आपल्या फ्लॅटमध्ये राहा, हळूहळू सर्व काही कमी करायला हवं रे, जिच्यासाठी राखून ठेवलं होतं तिला त्याची गरज नाही, मग ज्यांना गरज आहे त्यांना का देऊ नये?

सांभाळ स्वतःला, आम्ही बायका रडत असलो तरी आतून खंबीर असतो, लहानपणापासून अनेक त्याग करायची सवय असते बायकांना.

आपल्या आई-वडिलांना, भावा बहिणींना सोडून आम्ही नवऱ्याच्या घरी जातो, आमचं नाव सुद्धा विसरतो आम्ही, पण तुम्ही पुरुष बाहेरून कणखर दाखवता पण मनातून मेणा सारखे मऊ असता. आपली लेक आपल्याला टाटा करून गेली, तिच्या मनातही आलं नाही की आपल्या आई-वडिलांच्या मनाची काय अवस्था झाली असेल.

नटसम्राट नाटकात गणपतराव बेलवलकर बोलून गेलेत, “आपण उगाच समजतो, आपण आई झालो, बाप झालो, खरं तर आपण कुणीच नसतो. अंतराळात फिरणारा एखादा आत्मा वासनेच्या जिन्याने खाली उतरतो, आणि आम्ही समजतो आई झालो, बाबा झालो’.

अरुण, आपली पोर आपल्यासाठी तीस वर्षांपर्यतच होती असं म्हणायचं, आणि गप्प राहायचं. त्या पेक्षा तूझ्या ऑफिस मधील शरद सतत तुझी काळजी करतो, तुला किंवा मला बरं नसतं तर त्याचा जीव कासावीस होतो, तो जवळचा नाही का?

“अरुण, पुरे झालं हे शहर, इथे धड श्वास घायला मिळत नाही, पुरे झाले पैशासाठी धावणे… आता इथला पसारा कमी करून तूझ्या गावी जावू, जुने घर आहें, ते नवीन बांधू, तुम्ही मांजरेकर एक व्हा, पुन्हा पूर्वी सारखे सण साजरे करूया. “

माझे बोलणे अरुणला पटले असावे बहुतेक, डोळे पुसत तो मान हलवत होता, मी त्याला थोपटता थोपटता सलील कुलकर्णी म्हणतो ते गाणे गुणगुणु लागले.

सांगायचे आहें माझ्या सानुल्या तुला,

दमलेल्या बाबाची कहाणी तुला,

तूझ्या जगातून बाबा हरवेल का गं,

मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं

ना.. ना… ना, ना.. ना.. ना…

 – समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दमलेल्या बाबाची गोष्ट… — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ दमलेल्या बाबाची गोष्ट…  — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळूसकर

नवरा ऑफिसमध्ये गेला आणि माझी आवराआवर सुरू झाली. आज अंथरुणं पांघरुणं धुवायला काढायची असं मी म्हणत होते, एवढ्यात मोबाईल वाजला म्हणून मी फोन घेतला, कन्येचं नाव दिसलं म्हणून मी खुश झाले. गेल्या महिन्याभरात किमान दहा स्थळांचे फोटो मी पाठवले होते. तिचे एवढे फोन आले पण कुठल्या स्थळाबद्दल तिने होकार कळवला नव्हता. पण माझा अंदाज होता एक दोन दिवसात ती निश्चित कळवेलच, कदाचित त्यासाठीच तिचा अचानक फोन असेल ह्या उत्सुकतेने मी फोन उचलला.

“मग काय, आज सकाळी सकाळीच फोन, म्हणजे भारतात सकाळ गं, नाहीतर तुझा रात्रीचा फोन ठरलेला. हाच फक्त सकाळी आला. आईशीच काही बोलायचे का? कुठला फोटो आणि कुठलं स्थळ तुला पसंत सांग लवकर?”

“अगं आई, त्या करताच मी फोन केला. तू मला एवढ्या स्थळांचे फोटो पाठवू नकोस, माझ्या लग्नाची तयारी पण करू नकोस, आम्ही लग्न ठरवलंय. ‘

लग्न ठरवलं हे ऐकून माझा श्वासच अडकला. “अगं आम्ही म्हणजे कोणी?”

“मी आणि जॉन ने. “

मी घाबरून किंचाळले, “अगं कोण हा जॉन?”

“अग आई, मागे मी तुला फोटो पाठवलेला ना जॉनचा. “

“अगं असे तुझ्या मित्र-मैत्रिणींचे फोटो तू नेहमीच पाठवतेस, माझ्या कसं लक्षात राहील जॉन कोण आणि कोणता ते. “

“अगं जॉन, जॉन विली त्याचं नाव, पॉप गायक आहे तो. “

” केवढा धक्का दिलास तू अमिता, मी तुझ्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती, तुझ्या बाबाला आता केवढा धक्का बसेल माहिती आहे? आणि काकांना मावशी ना काय सांगू गं मी?”

मी रडू लागले. फोन बंद करून खुर्चीत बसले. केवढ्या अपेक्षा या मुलीकडून ठेवल्या होत्या आम्ही? तिच्या लग्नाच्या तयारीसाठी काय काय जमवत होते मी. तिचा बाबा तर तिच्या बाबतीत खूपच सेन्सेटीव्ह, एकुलती एक मुलगी, त्यात पहिल्यापासून हुशार. तिच्या बाबाला गर्व होता की आपल्यासारखी हुशार म्हणून.

नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेली पण आज ना उद्या भारतात परत येईल ही आशा आम्हाला होतीच. तिची आता तिशी जवळ आली तशी आम्हाला आता जास्त काळजी वाटायला लागली. कुठून कुठून तिच्यासाठी स्थळं येत होती, त्यातील चांगल्यात चांगलं स्थळ तिच्यासाठी आम्ही निवडणार होतो पण…

मला माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याची, अरुणची जास्त काळजी वाटायला लागली. मी निदान रडून तरी दाखवीन, तो बाहेरून दाखवायचा नाही पण आतल्या आत कोसळून जाईल. एकुलत्या एक मुलीसाठी आयुष्यभर झटतोय, अजून उमेदीने व्यवसाय वाढवतोय, या वयात आठवड्यातून एकदा तरी दुसऱ्या शहरात व्यवसायासाठी धावतोय, कुणासाठी हे सर्व?

मी दिवसभर कॉटवर झोपून राहिले. काही करायची इच्छाच मला होईना, एवढी एवढी छोटी अमिता, शाळेत जाणारी अमिता, टेनिस खेळायला जाणारी अमिता, इंजिनीरिंग ला जाणारी अमिता आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी अमेरिकेत जाणारी अमिता मला आठवत राहिली. अमेरिकेत जायला माझा विरोध होताच पण तिच्या बाबाचा तिला पाठिंबा होता.

सायंकाळी अरुणला कसं सांगायचं याचा मी विचार करत होती, कदाचित तिने बाबाला फोन केला पण असेल, मी तिचा फोन कट केला तसा बाबा फोन कट करणार नाही, तो शांतपणे तिचं म्हणणे ऐकून घेईल, आतून कोसळेल पण बाहेर दाखवणार नाही. मला माझ्या नवऱ्याची अरुणची पद्धत माहिती होती. तॊ जेव्हा जास्त टेन्शनमध्ये असेल तेव्हा जास्त हसेल, गडबड करेल. आपलं टेन्शन दुसऱ्याला दाखवणार नाही. आतल्या आत आपणच ते सहन करील.

आज रोजच्या पेक्षा लवकर अरुण घरी आला. येताना माझ्या आवडीचे गुलाब जामुन घेऊन आला. तेव्हाच मी ओळखले याला सर्व कळले आहे. माझा तणाव घालवण्यासाठी याने मुद्दाम गुलाबजामून आणलेत. हाच तो माझी जास्त चेष्टा करेल, गमती जमती सांगेल. मनातल्या मनात रडत असेल पण बाहेर दाखवायचा नाही.

माझ्या हातात गुलाबजाम देऊन तो म्हणाला, “चल आज कुठेतरी फिरून येऊ”.

“आज एवढा खुशीत का, लाडक्या लेकीचा फोन आलेला दिसतो. “

“हो ना, तिनं लग्न ठरवलंय म्हणे, जॉन बरोबर. “

“मग झापलं नाहीस तिला, का खूप आनंद झाला जॉन बरोबर लग्न ठरवले म्हणून, एवढे गुलाबजामून आणलेस म्हणून विचारले. “

“विरोध करून काही उपयोग नसतो गं, उगाच आपल्या मुलीच्या मनातून आपण उतरतो, ती आता तिशीची झाली, तिचे बरे वाईट तिला कळते. “

“म्हणून काही उघड्या डोळ्यांनी आपण लग्न लावून द्यायचं? मी आई आहे तिची, कोण कुठला तो जॉन, ना ओळखीचा ना पाळखीचा, आपल्या मुलीच्या शरीराचा मनाचा तो मालक होणार, आपण उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं?”

” मग काय करू शकतो आपण? तिने लग्न करू का हे विचारलेले नाही, तिने याआधीच त्याच्याशी लग्न केले आहे ना”

“काय म्हणतोस?” मी किंचाळत विचारले.

“होय, तिने त्याच्याशी रजिस्टर लग्न केले आहे, दोन महिन्यापूर्वी. “

“आणि ती आता आम्हाला सांगते? आपली मुलगी एवढी परकी होते?”

“हे असंच असतं, तिला तिचा साथीदार मिळाला की तिचे आई-वडील पण परके होतात, तेव्हा तिला कसलाही विरोध न करता त्यांना आशीर्वाद देणे हेच योग्य”.

“पण अरुण, मी दुखावले गेले आहे रे, माझ्या मुलीकडून मलाही अपेक्षा नव्हती. मी तिला माफ करू शकणार नाही”.

“काय करू शकतो आपण? आपण तिला मोठ्या मनाने माफ करायला हवे, आपल्याला आपल्या मुलीला गमवायचे नसेल तर आपण तिला माफ करायलाच हवे”.

“पण तिने या आधीच लग्न करून ती मोकळी झाली, आणि ही गधडी आत्ता सांगते लग्न केले म्हणून? आपले संस्कार कुठे कमी पडले का? आणि आम्ही आमच्या नातेवाईकांना काय सांगायचे? तिने दोन महिन्यापूर्वी लग्न केले म्हणून? माझी आई काय म्हणेल? माझ्या बहिणी, भाऊजी, तुझे गावचे भाऊ, काय उत्तर द्यायचे त्यांना?”

“उत्तर हे द्यावेच लागेल, लग्न याआधी झाले हे कळवायचे नाही कुणाला, मी अमित शी बोलतो, तिला म्हणतो तुम्ही दोघेही भारतात या, आपण त्यांचे परत इथे लग्न लावूया, एखादे रिसेप्शन ठेवूया, त्याला सर्वांना बोलऊया, आणि एक लक्षात ठेव, people’s memory is always short, कोणाला फारसे आठवणार पण नाही काही दिवसांनी. “

मी जेवण न करता उशीत डोकं खुपसून रडू लागले, अरुण येरझाऱ्या घालत होता. त्याच्या मनात केवढा कल्लोळ माजला असेल याची मला कल्पना होती. काही वेळानंतर अरुण फोनवर बोलल्याचे मला ऐकू येत होते.. निश्चितच तो अमिताशी बोलत असणार.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आनंदाचा कंद… ☆ राधिका माजगावकर पंडित ☆

राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ आनंदाचा कंद… ☆ राधिका माजगावकर पंडित

रिटायर्ड कर्नल सुभाष म्हणजे ग्रेट, शौकीन, हंसी मजाक माणूस. बंदुकीच्या गोळ्या निधड्या छातीवर झेलल्या त्यांनी. अनेक ठिकाणी जखमा झाल्या त्यांना पण त्या जखमांचे व्रण ते कुरवाळत नाही बसले, उलट अभिमानाने ते सांगतात ही माझी गर्वाने मिरवावी अशी प्रशस्तीपत्रकेच आहेत.

सकारात्मक दृष्टिकोनातला हा राजा माणूस मला फार आवडतो माणसांचा संग्रह त्यांच्या जवळ आहेच पण विविध देशातली नाणी, तिकिटे, प्रत्येक देशाची प्रतीके, निशाणे सर्वधर्म एक आहे हा समन्वय साधून त्यांनी संग्रह केला आहे. मी एकेक वस्तू न्याहाळत होतो एका काचेच्या कपाटात व्यवस्थित टांगलेले प्लॅस्टर बघून मी चमकलो आणि तिथेच थबकलो. बँडेज? प्लॅस्टर?आणि इतकं कसं जपून ठेवलेय आणि ते कां बरं? हा कोणता आनंदी छंदाचा प्रकार? 

माझ्या चेहऱ्यावरच्या गोंधळ पहात ते गडगडाटी हंसत म्हणाले, “नवल वाटलं ना हा शोपीस बघून? प्लॅस्टर काढण्यासाठी लोकं कासावीस होतात. काढल्यावर ते फेकून देतात. मी तर ते मौल्यवानपणे जपलय म्हणून, गोंधळालास ना तू? अरे या प्लॅस्टरमुळेच मला संकटात धावून येणारी माणसे भेटली आणि प्रसंगाने माणसांची परीक्षा झाली त्यांच्या सेवाभावाची खूण, मला पटली. त्यांची आठवण म्हणूनच मी हे जपलंय नजरेसमोर ठेवलय.

माझं कुतूहल जागं होऊन मी म्हणालो, ” नक्कीच ह्या मागे काहीतरी इतिहास असणार आहे, होना कर्नल साहेब?

“बरोब्बर ओळखलंस वेळ असेल तर ते गुढरहस्य ऐकवतो तुला. ऐकायचंय?

“हे काय बोलणं झालं का साहेब! तुमच्याकडच्या गुण गौरवकथा ऐकायला आम्ही नेहमीच अग्रेसर असतो. मी त्यांच्या सोफ्यावर मांड ठोकून प्लॅस्टर रहस्य ऐकण्यासाठी उत्साहाने खाली बसलो.

हळूवारपणे एखादं कोडं उलगडावं तसे ते सांगू लागले,

“आयष्यात सुख आले, ते मी अनुभवले दुःखही झेलले यश आल्यावर त्यावर स्वार झालो पण स्वदेशीयांकडून अपयश आल्यावर मात्र मी खचलो, अस्थिर झालो. देशासाठी देशबंधूंसाठी आम्ही आमचं आयुष्य पणाला लावतो पण तेच देशबंधू आमच्याशी गद्दारीने वागले तर मात्र आम्ही उद्विग्न होतो. “

मला रहावलं नाही म्हणून मी विचारले, “परतून मायदेशी आल्यावर काही अनुभवलंत का तुम्ही? काय घडलं असं?”

“काय घडलं?अरे दगडाच्या काळजाची माणसं भेटली मला, पण हो! हो! त्यातही एक माणुसकीचा झरा पण होता. “

कर्नल साहेब तुमचा अनुभव ऐकायला मला आवडेल. सांगा ना काय घडलं असं? माझी उत्सुकता बघून गोष्टीवेल्हाळ कर्नल सांगू लागले, “आतापर्यंत तू माझ्या लढाईवरच्या कथा ऐकल्यास पण त्या घटनेमुळे मात्र माझ्या एकाकी आयुष्याला कलाटणी मिळाली. पाकिटातला फोटो मला दाखवत ते पुढे म्हणाले “त्याआधी हा बंड गुंडाचा, माझ्या नातवाचा फोटो बघ. ” 

फोटोतलं गोडुल, गोबरं गोजिरवाणं पोरगं हंसत होतं. बाजूला गोरीघारी त्याची आई आणि शेजारी बाबा उभे होते. प्रत्येकाच्या फोटोवर बोट ठेवून ते सांगू लागले, ” हा माझा राजबिंडा लेक आनंद, हीमाझी गोरी परी म्हणजे माझी सून आणि हा बघ, हा राजपुत्र माझा नातू आहे. ” 

त्यांना मध्येच आडवत मी म्हणालो, “पण तुम्ही तर.. “

“हो हो खरंय बिनापाश अविवाहीत, ना घरका ना घाटका असा मी सडाफटिंग माजी सैनिक आहे मग मी आजोबा कसा झालो असंचं म्हणायचंय नां तुला?पण मित्रा इथे मात्र मी गुंतत गेलो. माझ्या आईने मला लहानपणी कान मंत्र दिला आहे माणसं जोड. जोडलेल्यांना कधीही तोडू नकोस. तुझ्या व्यक्तिगत आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे, तेव्हा ही जोडलेली गांठ कायम पक्कीच राहू दे. “

“साहेब तुमच्या आईचं प्रत्येक वाक्यनवाक्य मोलाचे आहे म्हणूनच तुम्ही जगमित्र आहात. पण सांगा ना तो प्रसंग. काय घडलं असं?

“अरे नेहमीप्रमाणे मी मस्तीत एका पायाने गाडी चालवत होतो तुला माहीतच आहे एक पाय मी रणांगणावर सोडून आलोय ते !तर काय सांगत होतो वाटेत कुत्र्याचं पिल्लू आलं. त्याला वाचवायला म्हणून मी करकचून ब्रेक दाबला ते पिटुकलं वाचलं रे! पण मागच्या कारवाल्यांनी मला उडवलं. माझा फुटबॉल झाला आणि फुटपाथवर मी आदळलो. मला सांवरायला जवळ यायच्या ऐवजी माझे हे देशबंधू लांब पळाले. मला उठवायला कुणाचाही हात पुढे येईना, रक्तस्राव झाला नव्हता पण कमरेचं हाड कटकन मोडल होतं लढाईत निधड्या छातीने गोळ्या झेलणारा मी इथे मात्र हरलो. कारवाला तर केव्हाच पळाला होता. “

बापरे फारच अवघड प्रसंग. “अहो!ज्यांच्यासाठी अहोरात्र तुम्ही रणांगणावर तळहातावर शीर घेऊन लढलात ती माणसंच माणुसकी विसरली. ही कृतघ्नता आहे”.

“हो ना! पण त्या पळून जाणाऱ्या लोकांतही एक जण देवदूता सारखा थांबला. पेपर विकणारा छोकरा होता तो. त्या छोकऱ्याचा छोटा हात माझ्या मदतीला पुढे झाला. वर्तमानपत्राचा गठ्ठा आणि सायकल मित्राच्या स्वाधीन करून तो माझ्याकडे धावला होता. मी वेदनेने तडफडत होतो कुणीतरी मला सोडलं होतं पण कुणीतरी माझ्या मदतीला धावलं होतं. तब्बल पंधरा दिवस मी हॉस्पिटलला होतो भानावर आलो तेव्हा मला कळलं माझ्या एका पायाला प्लॅस्टर घातलय. ” 

“पण मग कर्नलसाहेब तुमचा हॉस्पिटलचा ऑपरेशनचा खर्च, जेवण खाणं कसं आणि कुणी ?

“अरे तो देवदूत छोकरा म्हणजे आजचा माझा मानसपुत्र आनंद आहे आणि त्याची आई कांताबेन माझी मानस भगिनी आहे. आनंदचे वडील परलोकवासी झाले पण जातांना त्यांनी आठवण म्हणून त्यांच्या नावाचं पदक असलेली चेन कांताबेनच्या गळ्यात घातली होती. तो तिचा अमूल्य ठेवा होता. माझा पहिल्या दिवसापासूनचा खर्च भागवण्यासाठी माऊलीने चेन गहाण ठेवली. मला कुणीच नाही असं कळल्यावर ती माझी धर्माची बहीण झाली. नवऱ्याच्या आठवणीचं पदक काळ्या दोऱ्यात ओऊन गळ्यात बांधलं. मला फारशी दुखापत झाली नव्हती पण पाय फ्रॅक्चर मध्ये होता मी बँडेजचे ओझं वाहात होतो तर खर्चाचा भार त्या मायलेकानी माझ्यासाठी, मागील जन्माचे ऋणानुबंध असल्यासारखा उचलला होता. तुला सांगतो मित्रा त्या काळात डॉ. वैशंपायन, सिस्टर फरीदा, इतर नोकर, सफाई वर्ग अहो रात्र माझ्या सेवेला तत्पर होता. आपल्या देशासाठी सीमेवर लढणारा देशप्रेमी हीच भावना माझ्या बाबतीत प्रत्येकाच्या मनात होती आणि तो सेवक वर्ग सेवेला तत्परतेने पुढे झाला. अरे! सख्खे नातेवाईक काय ठेवतील इतकी माझी बडदास्त त्यांनी ठेवली. त्या सेवेची खूण त्या काळातली निस्वार्थी माणुसकी ती सेवाभावी माणसं त्यांच्यामुळेच तर मी लवकर बरा झालो आणि एका पायावर उभा राह्यलो. बंदुकीच्या गोळ्यांच्या खाणाखुणा मी शरीरावर वागवल्या. त्या बघून माझ्या देश प्रेमाच्या आठवणी उफाळून येतात. तशीच आठवण या माझ्या जोडलेल्या माणसांची मनात कायम राहावी त्यांच्या प्रेमाचं प्रतीक माझ्या डोळ्यासमोर रहावं म्हणून मी हे प्लॅस्टर काचेच्या कप्प्यात आणि मनाच्या कोपऱ्यात जतन करून ठेवलं आहे. मी बरा झालो तेव्हा कांताबेनची चेन सोडवून आणली तिने जपून ठेवलेल्या आनंदच्या वडिलांच्या प्रेमाचं प्रतीक असलेला बदामी फोटो चेनमध्ये घालून मी तिला वचन दिलं, आज पासून तू माझी वडील बहिण आहेस आणि आनंद माझा मानसपुत्र आहे कांताबेननी ते नातं मानलं आणि शेवटपर्यंत निभावलं. ”

“आनंद मुळातच हुशार होता परिस्थितीमुळे त्याचं अडलेलं शिकायचं स्वप्न मी पूर्ण करण्याचं वचन बेनला दीलं. आज आनंद परदेशात मोठ्या हुद्द्यावर आहे जेनी सारखी गोड सून आणि नातू त्याच्यामुळे मला आणि कांता बेनला मिळालाय. मागच्या जन्मीच्या ऋणानुबंधाच्या गाठी आहेत ह्या. दुसऱ्या नातवाची चाहूल आम्हाला लागलीय. तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी लवकरच आम्ही अमेरिकेला जाणार आहोत. आणि बरं का मित्रा सामानाच्या पॅकिंग मध्ये हे प्लॅस्टर असणार आहे. तिथे ते मिरवून सगळ्यांना ही प्लॅस्टर कथा मी ऐकवणार आहे कारण अरे, त्याच्यामुळेच तर माझ्यासारख्या भटक्या माणसाला बहिण मिळाली पुत्र, सून, नातू मिळाला आहे ना!आता सांग आहे की नाही माझं संग्रहालय प्रेक्षणीय?”

कर्नल साहेबांची प्लॅस्टर प्रेम कहाणी ऐकून मी अवाक झालो म्हणालो, “मानलं मानलं कर्नल तुम्हाला!असं म्हणत मी त्यांना आणि त्यांच्या प्लॅस्टरला कडक सॅल्यूट ठोकला.

© राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाटणी – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ वाटणी – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ उज्ज्वला केळकर

डॉ. हंसा दीप

(प्रत्येक करकरणार्‍या भीतीमागे आईची मजबूत नजर होती. त्याच्यावर आजपर्यंत कुणी दृष्टी टाकू शकलं नाही. तिच्या नालायक मुलांनाही ते जमलं नाही. किती वर्षांपासून आईच्या जाण्याची वाट पाहत होते, कुणास ठाऊक? जितकी त्यांची बेचैनी वाढायची, तितकी आईची जीवनेच्छा वाढायची.) 

इथून पुढे – 

तिघे भाऊ अधून मधून घरी यायचे आणि टोमणे मारायचे, ‘दादा रोज फोन करत असेल. रोज गप्पा मारत असेल. ‘

‘सगळे आशीर्वाद त्यालाच देऊन झाले असतील. काही शिल्लक असेल, तर मलाही दे. ’

आईला हे सगळं ऐकायची सवय झाली होती. कधी जर कुणी चक्कर मारली आणि टोमणे नाही मारले, तर ते नातवंडांना हळूच विचाराची, ‘तुझ्या बाबांची तब्बेत ठीक नाहे ना!’ दुसर्‍या दिवशी पुन्हा कनी न कुणी येऊन टोमणे देऊन गेलं की आईला वाटायचं, ‘चला! सगळं ठीक-ठाक आहे. मधला, धाकटा, मुन्ना, सगळे जसे काही एका मातीचे बनले होते.

आईने बिछाना धरलाय, या अपेक्षेने जेव्हा ते बघायला जायचे, तेव्हा स्वाईपाकघरातून शुद्ध तुपातील शिर्‍याचा किंवा आंब्याच्या बर्फीचा वास दरवळत असायचा. खाण्याच्याच आवडीने तिला जीवंत ठेवलं होतं खरं तर! किंवा असंही म्हणता येईल की खाण्याच्या आवडीमुळे आई सक्रीय राहायची. नव्वद वर्षापर्यंत खूप गोड खाऊन ती गोड राहिली. अखेर निघून गेली. किती काळ थांबणार? मुलांचे पांढरे केस म्हणू लागले की आम्ही थकलो पण ही आई काही थकत नाही. आपली भाकरी अजूनही स्वत: बनवून खाते. फिरत फिरत नातवंडं, आजी काय करतेय, बघायला येत. तिच्याकडून काजू, बदाम, बेदाणे घेऊन खात. सुका मेवा किंवा ताजी मिठाई खाण्याची लालसा आजीच्या घरी चक्कर मारायला लावी. त्यांना कळायचं नाही की आजी एकटीच का रहाते. त्यांना तर आजी खूप चांगली वाटायची. आजी देखील त्यांच्याकडून घरातल्या सगळ्या गोष्टी वदवून घ्यायची. ‘तुझी मम्मी काय म्हणाली? मग त्यावर पापा काय म्हणाले? जास्त भांडण तर झाला नाही ना? मिठाई खायची आहे ना? मग सांग लवकर!’ मुलं मग सगळं सांगायची. करपलेली भाकरी खावी लागली किंवा मग मम्मी-पापा दोघेही खूप रागावले. आई हसायची. सीसीटीव्ही कॅमेर्‍याशिवाय घराचं चित्र आईपुढे उभं राहायचं.

सगळच जाणून, समजून असल्यामुळे आई मृत्यूपत्र करून गेली नाही. कदाचित तिला माहेत असावं, ही तिघं मुलं असताना कागदाच्या तुकड्याला काही महत्व नाही. त्यांच्यात इतकी ताकत होती की ते आईकडून काहीही लिहून घेऊ ते प्रमाणित करू शकले असते. किती तरी वर्षांपूर्वीचं जुनं सामान तिचे डोळे मिटताच गायब झालं. उरलं होतं, ते वडिलोपार्जित घर. त्याची किंमत कोटींमधे होती. चार मुळे, सुना, नातवंडे एव्हा परिवार असूनही आई एकटी राहिली होती. सगळ्यात धाकट्या मुलाचं लग्न झालं, तेव्हा तिला वाटलं होतं, हा तरी घरात टिकेल. पण काही दिवसांनी तोही बाहेर पडला. म्हणाला, ‘मी माझ्या भावांचं अनुकरण करतोय. ’

माझ्या डोक्यातून आईचं ते मृत्यूपत्र जात नव्हतं. त्यात मी कुठेच नव्हतो पण माझ्या आईचा मुलगा तर होतो. कदाचित त्या तिघांपेक्षा अधीक जवळचा होतो. माझ्या खुर्चीवरील सेलफाट आईचा फोटो आहे. माझ्या प्रत्येक कामानंतर तिचा हास्य अधिकाधिक रुंद होत जातं. घरात आमच्या क्रमानुसार आमहाच्या नावाने आम्हाला पुकारलं जायचं. मोठा, मधला, धाकटा आणि मुन्ना. मोठा मी होतो. केवळ वयाने मोठा होतो असं नाही, तर प्रत्येक बाबतीत मोठा होतो. आईच्या प्रेमाच्या बाबतीत, घरच्या भिंतीं बाबतीतआणि आकाशाची उंची मोजण्याच्या बाबतीतही. आईलाही मी मोठं केलं होतं. तिच्या इच्छा-आकांक्षांना खूप ऊंची दिली होती मी. एअरपोर्टवरून टॅक्सी घेऊन मी गावात पोचलो, की माझ्या आस-पास खूप गर्दी जमायची. घर असं काही चमकायचं, प्रकाशमान व्हायचं, जशी काही एखादी जत्राच सुरू आहे. परदेशातून मुलगा आलाय. माझ्या स्वागतासाठी घरात उत्सव सुरू व्हायचा. भेटायला येणार्‍यांची चढाओढ लागायची. प्रत्येकाला भेटीची लालसा असायची. आई म्हणायची, ‘थोडं थोडं प्रत्येकाला दे. कुणी या आपल्या इज्ल्हयाच्या बाहेर नाही गेलं आणि तू तर परदेशात जाऊन आला आहेस. आशा असणारच ना सगळ्यांना. माझ्यासाठी काही आणू नकोस पण या सगळ्यांना दे. ’

तिघं भाऊ टोमणे मारायचे, ‘आईचा मोठा मुलगा आलाय. ब्घूयात, काय काय माल बाहेर पडतोय. तू ना आई सगळ्यात जास्त त्याच्यावर प्रेम करतेस आणि तो… तुला सोडून जातो. ’

यावर आईचं उत्तर तयार असे. ‘ मग, तुम्ही आधी यायचात. तुमच्यावर जास्त प्रेम केलं असतं. मीच त्याला पाठवलय… पुढे जाण्यासाठी… तुमचा बाप निघून गेला. तुमच्याकडे लक्षही त्यानेच पुरवलय. तो शिकत होता. तुम्हाला शिकवत होता. ’

‘शिकवत नव्हता. या निमित्ताने सगळ्यांना छड्या मारत होता. त्याला स्वातंत्र्य मिळालं होतं.

मी सगळं ऐकायचो पीएन प्रतिवाद कधी केला नाही. आखडूपानाशी कितीही टक्कर घेतली, तरी जखमा होतातच. आईच्या अतिरिक्त प्रेमाचा खूप फायदा घेतला मी. आईला बरोबर घेऊन जाण्याबद्दल मात्र कधी बोललो नाही. घबराट होतो. हो म्हणाली तर… तिथे राहील कशी? माझी इटालियन पत्नी तिच्याबरोबर काशी राहू शकेल? जिथे आसापासचे लोक एकमेकांना ओळखतसुद्धा नाहीत, त्या वातावरणात काशी रुळू शकेल ती? मनाची पक्की धारणा करून घेतली होती की आई आपली जमीन-माती कधी सोडणार नाही. कुठल्याही प्रकारे का होईना, मी तिला तिकडे घेऊन जाऊ इच्छित नव्हतो. तिकडे नेऊन तिचं मन दुखवू इच्छित नव्हतो. एकटेपणाचं ओझं उचलणं, तिच्यासाठी सोपं झालं नसतं.

इथे आलो की छोट्या छोट्या गोष्टी तिला किते आनंद देत. हिरवे हरभरे भाजून दाणे काढून द्यायची. ‘शिकला- सावरलेला आहे. सूट बूट खराब व्हायला नको. ’ मक्याच्या कानसतले दाणेदेखील काढून द्यायची. ‘हात घाण करू नको. ’ माझे कपडे धुण्यासाठी धोबिणीला कधी द्यायची नाही. म्हणायची, ‘महागातले कपडे आहेत. हलक्या हाताने धुवीन. ‘ माझे ते कपडे धुताना तिला आमच्या लहानपणाची आठवण येत असावी. तेव्हा ते छोटे छोटे कपडे धुताना तिला अपार आनंद होत असे. तेव्हा तर बाबाही होते. एक सुखी आणि सापन्न असा घर होतं आमचं. आईला आकापाठोपाठ एक मुले होत गी, तिकडे बाबा दूर होत गेले.

‘मोठ्या मुलाला मोठा मान मिळतोच. याने तर सगळ्या गावा मन मिळवून दिलाय. ’ आईचा चेहरा जितका तेजाळायचा, तितका भावांचा चेहरा विझत जायचा. हळू हळू सगळ्यांच्या बायका आल्या. आईला मारले जाणारे टोमणे आता तिप्पट झाले.

मला चांगलं आठवतय, एकदा मधल्याच्या बायकोने भाजीत मिरची जास्त घातली होती. ते घशात अडकली. इकडे मी खोकत होतो, तिकडे आईचा जीव वर खाली होत होता. स्वाईपाकघरात जाऊन सुनेला रागावली. म्हणाली, ‘तुला माहीत आहे नं, त्याला जास्त तिखट चालत नाही. इतक्या दुरून तो येतो, ते तुम्हा लोकांना भेटण्यासाठी. त्याच्यासाठी तुम्ही योग्य असं जेवणही बनवू शकत नाही. ’ असे अनेक क्षण. मोठ्यासाठी ते सगळे सन्मानाचे क्षण असायचे. परंतु तिघे भाऊ आणिक त्यांच्या बायका मात्र कुढत राह्यच्या.

मोठा नावालाच आहे. याने खरं तर सांभाळायला हवं आईला, पण सांभाळतोय आम्ही. धाकटे असून आमचं कर्तव्य पार पडतोय. ‘

‘मोठ्याबद्दल प्रेमाचे उमाळे खूप येताहेत. करून घे माया. आज आहे, उद्या निघून जाईल. ’

अशी अनेक कडवट बोलणी माझ्या मनात गुंजात रहातात. आज प्रत्येकाला एक तृतीयांश वाटणीत सगळा वाटा घेतलाय भावांनी. तो चौथा, जो आईसाठी पाहिला होता, तो कुठेच उरला नाही आता.

आईचा चेहरा डोळ्यापुढे येतोय. ती असताना, तिच्यासमोर कुणी माझा हिस्सा घेतला असता, तर त्याची काय परिस्थिती झाली असती. जेव्हा ती दूध आटवून मावा मिठाई बनवायची, तेव्हा माझ्या वाटणीची कुलपात ठेवली जायची कारण मी अभ्यासात गुंतलेलो असायचो.

गाता काळाच्या आठवणी येता येता अनेकदा हात फोनपाशी गेला. वाटलं, तिघा भावांना विचारावं, या वटणीत मी कुठे आहे?’ पण धीर झाला नाही. वर असलेला आईचा फोटो दिसतो. टी म्हणत असते, ‘ मी तुला खूप दिलाय बेटा. पहिला मायेचा वर्षाव तुझ्यावर केलाय. तूच तर मला मातृत्वाच्या सुखाची जाणीव करून दिलीस. मी तर आहे ना तुझ्याबरोबर!’

‘त्यांना पैशाची गरज आहे. ते फार शिकलेले नाहीत. ’

‘ते शहाणे नाहीत. समजदार नाहीत. तू तुझ्या हुशारीने पैसे कमावशील. ’

‘ते तुझे धाकटे भाऊ आहेत. त्यावेळी वाटणी रोज होत होती. त्यावेळी तुला जास्त प्रेम, माया मिळत होती. त्यावेळी त्यांनीही प्रश्न विचारले होते. त्यांनाही उत्तर देऊ शकले आणि आता तुलाही… एक रत्तीभर, टोला, मासा, काही तरी तुझ्यासाठी जास्तीचं होतंच ना!’ 

आईचा तो हात, जो मोठ्याच्या डोक्यावर आधी ठेवला जायचा, तोच हात विदेश गमनांनंतर हजारो मैलांवरून आशीर्वाद देत असायचा. तिचा तो हात आजदेखील माझ्या डोक्यावर आहे. त्या हाताचा स्पर्श माझ्या केसविरहित, टक्कल पडलेल्या डोक्यावर जाणवतो. मोठ्या मुलाच्या नुसतं नाव घेण्यानेही तिच्या चेहरा दुप्पट प्रकाशमान व्हायचा. ‘आज सगळे भाऊ समान खूश आहेत. तर तू तीनच्या खुशीत साथ दे. आज सगळ्यांना आपला योगी हक्क मिळाला आहे.

वाटणी तर पैशांची झाली होती. माझ्यापाशी गेल्या अनेक वर्षांपासून जे होतं, ते आजही सुरक्षित आहे. माझा हिस्सा पूर्ण. एकास एक. त्यात वाटणी नाहीच. मी वर बघितलं. आईचा चेहरा जरा जास्तच हसरा दिसत होता.

भावांना मी फोन लावलाच.. पण हे सांगण्यासाठी की तुमच्या निर्णयाने मी खूप खूश आहे.

– समाप्त –

मूळ लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा 

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 + 647 213 1817  ईमेल  – hansadeep8@gmail.com

मराठी भावानुवाद : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares