मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ”घराचे Alignment…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

☆ “घराचे Alignment ☆ संध्या बेडेकर ☆

कधी कधी घरच्या प्रमूख व्यक्तीला घराचे Alignment करणे आवश्यक असते.

आज प्रविण जरा शांतच बसले होते. या मागच्या दोन चार महिन्यांत घरात घडलेल्या गोष्टींचा, झालेल्या संवादांचा विचार करत होते.

 मी जे बघतोय, ऐकतोय ती सुरुवात आहे पूढे घडणाऱ्या संभाव्य अप्रिय घटनांची. सध्या छोटे मोठे खटके उडतायेत. सध्या तरी भाषेवर सर्वांनी कंट्रोल ठेवला आहे. संवादाचे texture बरे आहे. पण एकदा का ही धुसफूस वाढली तर मर्यादा ओलांडायला वेळ लागणार नाही. आणि मग महाभारत घडायलाही वेळ लागणार नाही.

मी घरचा प्रमूख या नात्याने माझी जबाबदारी आणि कर्तव्य तटस्थपणे मला पार पाडावेच लागेल.

प्राची किंवा प्रिया, प्रथमेश आणि मला सुध्दा 

What is my role in Family?? हे नेहमी लक्षात ठेवावेच लागेल.

प्रवीण स्वभावाने मिश्किल असला तरी त्याचे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थीत लक्ष असते. He can read between the lines. पूढे येणाऱ्या संभाव्य समस्येचा तो अंदाज लावू शकतो. गाडी रूळावरून घसरण्यापूर्वीच त्यांचे overoiling करणे, servicing करणे जमते त्याला.

आज रविवार ची सकाळ चहा घेताना त्याने प्रथमेश आणि प्राचीला विचारले,

आज काय कार्यक्रम तुमचा??

आज जेवण घरी की बाहेर? आज दिवाळी ची shopping आहे का??

तुमचा कार्यक्रम काहीही असू दे आज संध्याकाळी मात्र तुम्ही दोघे घरात असावेत असं मला वाटतं. वेळेचे बंधन नाही, तुम्ही रात्री जेवायला असाल, तर तसं आधी सांगा म्हणजे आज दिवाळीचा विशेष बेत ठरवू.

घरातील स्वच्छता बऱ्यापैकी झालेली आहे, काही गोष्टींची राहिली आहे. ती वरून दिसत नाही पण वेळेवर स्वच्छ करणे आवश्यक आहे.

प्रिया लक्ष देऊन ऐकत होती. तिच्या अनुभवी मनाने या बोलण्याचा गूढ अर्थ ओळखला. पंचेचाळीस वर्षे संगतीचाच परिणाम होता तो.

आज प्रविण चे लेक्चर ऐकायचे आहे. हे तिने ओळखले. मधून मधून हे असं घडतच. आणि हे लेक्चर म्हणजे घरांचे Alignment असते. जबाबदारी, कर्तव्य, वागणूक, सवयी, पैशाचा अंधाधुंद वापर यावर प्रविणचे भाषण म्हणजे सर्वांना विचार करायला लावणारा एक धडा असतो. overall analysis असते ते.

हे सर्व प्रथमेश आणि प्रियाला माहीत आहे. पण प्राचीची यावर कशी प्रतिक्रिया असेल?? तिच्या साठी हे‌ नवीन आहे. प्रिया विचारात होती.

संध्याकाळी प्रथमेश प्राची shopping करून घरी आले. आज प्रविण ने सांगितल्या प्रमाणे प्रियाने पनीर बटर मसाला, दाल फ्राय, जीरा राईस घरी केले तंदूरी रोटी, नान, व्हेज मंचुरियन बाहेरून मागविले. दिवाळीचा फराळ, गोड वस्तू भरपूर होत्याच. सर्वांच्याच आवडीचा मेन्यू होता.

प्राची खूप खुश होती. आधी shopping आणि घरी आल्यावर काहीही कष्ट न करता आवडीचे जेवण. मॅडम एकदम Happy होत्या.

प्रथमेश मात्र बाबांच्या भाषणाची वाट बघत होता.

प्राची ने विचारले,

बाबा! झाली का स्वच्छता?

बाबा म्हणाले,

अग!! नाही. थोडी व्हायची आहे. त्यात मला सगळ्यांचीच मदत हवी आहे.

अग!! प्राची घरातील कचरा निघाला ग. पण आपल्या मनातला कचरा पण वेळेवर स्वच्छ करणे आवश्यक आहे. ती स्वच्छता सगळ्यांसाठी जास्त गरजेची आहे.

या कचऱ्याचा डोंगर होण्यापूर्वीच त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. कचरा कोणताच चांगला नाही घरातला आणि मनातला.

प्राची बाबांकडे बघतच राहिली.

बरे असो.

मला वाटतं, घरचा प्रमूख म्हणून माझे काही कर्तव्य आणि जबाबदारी आहे. मी काय सांगतोय ते नीट ऐका.

प्रिया तू पण ऐक.

आपण नंतर यावर चर्चा करू शकतो. माझ म्हणण तुम्हाला पटेलच असंही नाही.

बाबा पूढे म्हणाले,

प्रिया माझी अर्धांगिनी आहे. आजपर्यंत तिनेच घर सांभाळले. मी बाहेरच सांभाळले. आता मी तर रिटायर्ड झालो. माझी आॅफिसची जबाबदारी संपली. आता मी थोडी बहुत घरची जबाबदारी घ्यायला तयार आहे. प्रियाचे आॅफिशियल retirement as such नाहीच. याबद्दल तिचे किंवा माझे काही म्हणणेही नाहीच. परंतु कामाचे दडपण कंपल्शन नसावे. पंचेचाळीस वर्षानंतर आता थोडा निवांत वेळ मिळाला आहे. तेंव्हा तिच्या बरोबर क्वालिटी टाइम घालवावा, सकाळी फिरायला जावं, एकत्र बसून चहा प्यावा, वर्तमान पत्र वाचावे. संध्याकाळी जेष्ठ नागरिक संघाचे कार्यक्रम अटेंड करावे, सहलीला जावं, सिनेमा, नाटक बघावे असे मला वाटत. आजपर्यंत नोकरी करताना, असा निवांत वेळ मिळाला नाही. आता तिला तिच्या मनासारखं जगू द्यावं. कामाचं दडपण नसावं. तिला आराम मिळावा, हे बघणं पण माझी जबाबदारी कर्तव्य आहे. आणि तिचा अधिकारही आहे.

आमच्या पिढीच्या बहुतेक सर्वांचेच आतापर्यंत असेच आयुष्य गेले असेल.

मी फक्त आमच्या दोघांचाच विचार करतोय असं नाही. मला तुमच्या दोघांची पण काळजी आहे. तुमचे पण रोजचे आॅफिस, दगदग आम्ही बघतोच. तुमच्या वयाच्या सर्वांचीच थोड्या फार फरकाने हीच दैनंदिनी आहे /असेल.

देवाच्या दयेने आज ची पीढी आमच्या पेक्षा financially चांगल्या परिस्थितीत आहे.

कामावरून घरात वादविवाद नको, ते आपण टाळू शकतो. जसा प्राचीला वेळ मिळत नाही तसंच प्रिया ला पण आता तिला तिचा छंद जोपासायला वेळ मिळावा असं मला वाटतं. आतापर्यंत घडाळ्याच्या काट्या प्रमाणे काम करणाऱ्या प्रियाने आताही असेच वागावे अशी तिच्याकडून अपेक्षा करणे चूक आहे.

उगीच छोट्या छोट्या गोष्टींसाठी मनात कटूता यायला नको. कारण आपण चांगल्या गोष्टी पेन ड्राईव्ह मध्ये सेव्ह करतो. आणि कटूता मनात. हे बरोबर नाही. माझी आणि प्रथमेशची फरफट व्हायला नकोय.

पुरूषांना बायको आणि आई दोघांपैकी एकीची निवड करायला भाग पाडू नये. प्रिया आणि प्राची दोघीही महत्वाच्या.

हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे.

मी कशाचेही स्पष्टीकरण देत नाहिये.

जसे प्रश्न पत्रिकेत MCQs 

असतातत म्हणजे एका प्रश्नाचे Multiple choice options असतात. तेंव्हा चार उत्तरांपैकी एक बरोबर उत्तर निवडायचे असते.

तसेच आपले घर सुव्यवस्थित चालावे. आपण सर्वांनी शांत, आनंदी राहून जीवनाचा आनंद घ्यावा. यासाठी वेगवेगळे options आहेत. म्हणून सर्वांनी मिळून एक उत्तर शोधणे महत्वाचे आहे.

Options हे आहेत।

१. आपापली जबाबदारी समजून काम वाटून घ्यावी.

२. पूर्ण वेळ कामासाठी बाई ठेवावी. मग ती जे जसं करेल ते सहन करायची तयारी ठेवावी. तिला स्पष्ट instructions द्यावे लागतील. म्हणजे अन्न वाया जाणार नाही. अन्न वाया गेलेले प्रिया ला आवडत नाही.

खर्च फक्त तुम्हीच करावा असंही नाही. मी खर्च करायला तयार आहे.

३. आपण वेगळे राहण्याचा ही विचार करू 

शकतो. आमच्या साठी मात्र हा शेवटचा पर्याय असेल. पण तुमच्या दोघांची इच्छा असेल तर आम्हाला मान्य आहे.

४. किंवा प्राचीचे आईवडील तुमच्या जवळ येऊन राहू शकतात. प्राची ला त्यांच्या सोबत जास्त मोकळीक मिळेल. अस प्राची ने बरेचदा बोलून दाखविले आहे. प्राचीला space हवी असते.

यातही आम्हाला काही प्रोब्लेम नाही.

बाबांचे विचार ऐकून प्राची बाबांकडे बघतच राहिली.

बाबा म्हणाले,

प्राची!! तुला एक महत्वाचे सांगायचे आहे. तुम्ही socializing करू नये. पार्टीला जाऊ नये. इतक्या जून्या विचारांचे आम्ही नाही. परंतु मागच्या आठवड्यातील घटना बघून आम्हाला वाईट वाटले. काळजी वाटली आणि हो रागही आला. तुझ्या ड्रिंक्स मध्ये कोणीतरी काहीतरी मिसळत आणि त्याचा तुला दुसऱ्या दिवशी पर्यंत त्रास होतो हे बरोबर नाही. ही घटना चांगली नाही. तुला याबाबतीत सतर्क, सचेत, सावधान राहणे आवश्यक आहे.

शिस्त आणि बंधन गरजेचे आहे. मला वाटतं तुझ्या आईबाबांनाही हे आवडणार नाहीच. तेंव्हा विचार कर. पुन्हा हे असं होता कामा नये.

तुम्ही दोघे आई बाबां होण्याचे स्वप्न बघत आहात, तेंव्हा आधी तुम्ही physically and mentally तयार व्हा. शिस्त पाळा.

बरे असो.

माझे बोलणे झाले आहे. सध्याची परिस्थिती बघता मला जे योग्य वाटल ते मी बोललो. तुम्ही सर्व शांत मनाने आजचा आणि भविष्याचा विचार करा. काही घाई नाही. माझ्या बरोबर फ्रिली बोला. मग निर्णय घ्या.

We both are ready for anything and everything.

आज प्रणव ने सवयी प्रमाणे सर्वांना सद्य परिस्थिती व त्यांचे भविष्यात होणारे परिणाम थोडक्यात पण परखडपणे सांगितले.

प्रथमेशला मनातल्या मनात समाधान वाटले. प्रिया ला पण अशीच काहीशी अपेक्षा होती.

प्राचीला मात्र बाबांचे हे वेगळेच रूप बघायला मिळाले.

दिवाळी च्या मुहूर्तावर बाबांनी घरातील सर्वांना एक संदेश दिला 

जसे आपण धूळ, अडगळ, कचरा, जाळ्या जळमट, रद्दी, जूने कपडे सारे सारं काही आपण काढतो, त्यांची योग्य विल्हेवाट लावतो. घर स्वच्छ लखलखीत झाले की मोकळं आनंदी वाटू लागतं. घर सजवायलाही उत्साह येतो.

तसेच घराबरोबर मनही स्वच्छ कराव.

मनातील विचारांची अडगळ दूर करावी. मनात मनःशांती ची, आनंदाची ज्योत चेतवावी.

बरोबर आहे.

म्हणतात ना,

विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासाठी आहे. तेंव्हा काळजी करत बसण्यापेक्षा स्पष्ट संवाद साधणे केंव्हाही चांगलेच नाही का??

आज प्रवीणने प्रियाची बाजू मांडून आपल्या पत्नीचा ही मान राखला. ज्या घरात नवरा बायकोचा मान ठेवतो, त्या घरातील बाईचा अपमान करायची हिम्मत कोणी दाखवत नाही.

वेळेवर स्पष्ट बोलायला धाडस लागतं हे नक्की पण बोलणही गरजेचेच असते. घरातील प्रत्येकाचा मान ही असायला हवा. एखाद्या ला granted घेऊन चालत नाही. नात्यामध्ये ही मर्यादा असायलाच हवी.

प्रवीण च्या बोलल्या नंतर एक वेगळीच शांतता पसरली. प्रत्येक जण विचारात होता. शांतपणे आपल्या खोलीत निघून गेला.

आज नरकचतुर्दशीच्या दिवशी बाहेरच्या उजेडापेक्षा अंतर्मन उजळून निघाले होते.

बरोबर आहे.

आपलं कुठे चुकतंय?? हे शांतपणे सांगणार कोणी तरी आयुष्यात असले की एकतर चूका कमी होतात किंवा त्या वेळेत सुधारता येतात.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “वारी दोन बहिणींची…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

☆ “वारी दोन बहिणींची…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

 (एक सत्यकथा)

माईची खूप दिवसांपासून इच्छा होती.. एकदा तरी आळंदी.. पंढरपूर पायी वारी करावी. तो सोहळा डोळे भरून पाहावा. दोन मुलं, दोन मुली.. त्यांची शिक्षणं, लग्न, सणंवार.. वारीचा विचार सुध्दा मनात आणता येत नव्हता. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता माईच वय झाल होत.. आता कुठलं वारीला जायला जमणार… पंढरीची वारी आपल्या नशिबात नाही. असं म्हणून ती गप्प बसायची. घरीच नाम घेत स्वस्थ बसावं झाल… अशी तिने स्वतःच मनाची समजूत काढली होती.

वारी जवळ आली होती.. त्यामुळे ते दुःख अजूनच जाणवत होते.

मुलाला ती म्हणाली,

“वारी करायची इच्छा अपुरी राहिली.. माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही बघ… दर्भाचा करून लावावा लागेल”

 आईच बोलण त्यानी हसून गंमत म्हणून सोडून दिलं. ती आजारी पडेल, तिला झेपणार नाही, त्रास होईल म्हणून घरातले तिला पाठवत नव्हते. तशी ती बऱ्याच वेळा पंढरपूरला बसने गेली होती. पण माईला एकदा तरी पायी वारी करायची होती.

त्या दिवशी रोजच्यासारखी ती संध्याकाळी रामरक्षा म्हणत बसली होती. तिच्या बहिणीचा ठकुचा फोन आला. मुलाने तो उचलला “काय म्हणतेस मावशी बरी आहेस ना”

” हो रे मी बरी आहे. एक आनंदाची बातमी आहे. मी काय सांगते ते नीट ऐक.. माझे अचानक इथल्या दिंडी बरोबर पायी वारीला जायचे ठरले आहे. त्यांनी सगळी सोय केलेली आहे. पाय दुखले तर ट्रक मध्ये बसायची सोय आहे. बरीच वर्ष ते जात आहेत. त्यांना अनुभव आहे. मी माईला पण माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. त्यासाठी फोन केला आहे. “एका दमात तीने सांगितले.

मुलगा गोंधळून गेला.

अचानक मावशीनी हे कस काय ठरवल.. त्याला कळेना. ठकुनी पूर्ण माहिती सांगितली. तो म्हणाला.. , “आई-बाबांशी बोलतो आणि मग तुला परत फोन करतो “

त्यांनी मावशी काय म्हणाली ते सगळं सांगितलं. माईला तर खूपच आनंद झाला होता… पण नवरा काय म्हणेल ही चिंता होती..

पंढरीनाथांनी ठकुला फोन लावला म्हणाले, “आता वय झालं माईचं.. तिला कसं झेपेल?”

ठकु म्हणाली, “भाऊजी ती जबाबदारी माझी. आजपर्यंत तिने तुमच्याकडे काही मागितलं नाही. ही तिची शेवटची इच्छा अस समजून.. तिला पाठवा ना हो. “

यावर त्यांना काही बोलता येईना..

“बरं तू इतकी त्या दिंडीच्या लोकांची खात्री देतेस म्हणून पाठवतो. आणि एक सांगतो. पहिल्यांदा जाताय सतत चालणं होणार नाही. ऊगीच थोडं चाला.. मग ट्रकमध्ये बसा. तरच परवानगी देतो. “

“हो.. हो.. “ती म्हणाली.

ते ऐकून माईचा आनंद गगनात मावेना. लहान मुलासारखा तिचा चेहरा फुलला. दोन दिवसात तयारी करून मुलगा तिला मावशीकडे घेऊन गेला.

दारातच तिने ठकुला मिठी मारली दोघींचा गळा दाटून आला. परत जाताना मुलाने बजावले,

” काही त्रास झाला तर कळव. मी तुम्हाला न्यायला येईन” 

ठकुच्या सुनेने त्यांची पूर्ण तयारी करून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांची दिंडी निघाली. तासाभरात ते आळंदीला पोहोचले. भगव्या पताका फडकत होत्या. पायजमा, पांढरा शर्ट, टोपी, गळ्यात, तुळशीमाळा, टाळं, कपाळावर बुक्का, गंध… असे वारकरी पाहिल्यावर माईला समाधान वाटले. तिच्यासारखा अनेक बायकाही त्यात होत्या. ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाचं लांबून दर्शन झालं.

माऊलींची पालखी निघायची वेळ झाली होती. ठकु म्हणाली, ” कळसाकडे लक्ष ठेव. पालखी उचलली की तो हलतो असे म्हणतात “

माई स्वतःच आतून हलली होती. देहभान विसरली होती.

 “कळस हलला.. कळस हलला “

अस सगळे ओरडले. तिला नीट दिसल नाही. तिने कळसाकडे हात करून नमस्कार केला.

 दिंडीप्रमुखांनी भगवा झेंडा उभा केला.

” पुंडलिक वरदे हारी विठ्ठल 

श्री ज्ञानदेव तुकाराम 

पंढरीनाथ महाराज की जय” 

असा जय जय कार करत वारकरी त्यांच्या मागून निघाले.

माई ठकुची वारी सुरू झाली..

” पाऊले चालती पंढरीची वाट 

सुखी संसाराची सोडुनिया गाठ “

अभंग, गाणी गात गात.. वाट सरत होती. पावसाची सर येऊन गेली. वारकरी अजून ताजेतवाने झाले. भराभर निघाले. माईच्या दिंडीत एक लेकुरवाळी.. पोरग कडेवर घेऊन निघाली होती. माईला रहावलं नाही तिने विचारलं,

” एवढं लहान लेकरू घेऊन कशी निघालीस ग?”

ती म्हणाली,

“सासूबाईंनी याच्यासाठीच नवस बोलला होता. आळंदी ते पुणे करणार आहे. आणि मग याला एकदम पंढरपूरलाच घेऊन येणार आहे”

काजळ तीट लावलेलं ते सावळं पोरगं माईकडे बघून हसलं..

माईला वाटलं हे किती भाग्यवान.. त्याला लहानपणी वारी घडते आहे.. त्याच्या गालावरून तिने हात फिरवला त्याची पापी घेतली. ते पोरग म्हणजे विठ्ठलाचे छोटे सावळ ध्यान असल्याचा भास तीला झाला. माईला आता विठुरायाचा ध्यास लागला होता.

डोक्यावर पितळी तुळशी वृंदावन घेतलेल्या बाईने.. पाणी पिताना वृंदावन माईच्या हातात दिले. माईच्या मनात आलं एवढं ओझं घेऊन ही म्हातारी चालतीय.. आपल्याला तर मोकळं चालायच. सहज जमेल.. माईच्या पेक्षा म्हाताऱ्या बायका, पुरुष दिंडीत होते. माईला हुरूप आला. ती भराभर पाय उचलायला लागली.

फुलांनी सजवलेल्या रथामागे विठुरायाचा गजर करत चालेले वारकरी… एका मागोमाग एक निघालेल्या दिंड्या सगळ्यांची आस एकच होती. त्या विठुच्या पंढरीला जायचं.. माईच्या डोळ्याचे पारणं फिटलं. पहिला मुक्काम पडला. वारकऱ्यांच्या स्वागताला असंख्य लोक जमले होते. दिंडी प्रमुखांनी स्वयंपाकाची व्यवस्था करून ठेवली होती. झाडाखाली पंगत बसली. पत्रावळी वरच्या त्या साध्या जेवणाला अमृताची चव होती. माई दोन घास जास्तच जेवली. रात्री कशी गाढ झोप लागली.

पहिल्या दिवशी पाय थोडे दुखले. तिकडे लक्ष द्यायला सवड नव्हती. पालखी पुढे जात होती. पाय आपोआप वाट चालत होते.

दोघींनी ठरवले की मधून मधून एक, दोन टप्पे ट्रक मध्ये बसून जायचे. म्हणजे पुढचा आनंद घेता येईल. घरच्यांनाही काळजी नको.

एकदा पहाटेच माईला जाग आली. वारकऱ्यांची लगबग सुरू झाली होती. माई पालखी जवळ गेली. भक्तीभावानी तिनी पादुकांवर डोकं टेकवलं. त्या क्षणी तिचं देहभान हरपलं होतं. हे अनुपम सुख डोळे भरून पहायला मिळाले जवळून दर्शन झाले… शांतपणे एकटक बघत ती उभी होती…

याच्यापुढे आता काही नको असे तिला वाटत होते…

” भेटी लागी जीवा लागलीसे आस” म्हणत वारी पुढे चालली होती. पंढरी राया जवळ येत चालला होता. रिंगण बघण्यासारखं असतं. हे इतके दिवस माई नुसत ऐकून होती. आज प्रत्यक्ष बघणार होती. गळ्यात हार घातलेला पांढराशुभ्र अश्व तयार होता. वारकऱ्यांनी रिंगण तयार केलं. इशारा झाला.. त्या क्षणी अश्वांनी पळायला सुरुवात केली. त्यांचा रुबाब, वेग बघण्यासारखा होता. टाळांचा गजर सुरू होता. रिंगणभर फिरून अश्व थेट पालखी समोर जाऊन उभा राहिला.

त्याच्या पायाखालची माती बुक्या सारखी वारकऱ्यांनी कपाळाला लावली. त्यादिवशी सर्वांना ऊत्साह वाटत होता. जल्लोष सुरू झाला. वातावरण चैतन्यमय झाले होते.

बायकांनी फुगड्या घालायला सुरुवात केली. एक जण म्हणाली,

” बहिणाबाई उठा.. नुसत्या काय बसलाय.. घाला फुगडी”

माईनी ठकुचा हात धरून तिला उठवलं आणि दोघींनी खूप वर्षांनी फुगडी घातली. निर्मळ, सात्विक आनंद बहिणी घेत होत्या.

बायका घरदार, संसार ताप दुःख, विसरल्या होत्या. घराबाहेर मोकळ्या रानात मुक्तपणे गात होत्या. त्या विठ्ठलाने बायकांच्या मनावर गारुड केलं होतं.

दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामात टाळ आणि चिपळ्यांच्या साथीवर वारकऱ्यांनी भजनं म्हणायला सुरुवात केली.

” विठ्ठल विसावा सुखाची सावली प्रेमे पान्हा घाली भक्तावरी, रूप पाहता लोचनी, संपत्ती सोहळा न आवडे मनाला लागला टकोळा पंढरीसी.. “

माई आणि ठकु रंगून गेल्या होत्या. रात्र झाली तशी ठकु म्हणाली,

 ” माई तू झोपतेस का? अजून बरंच चालायचं आहे. “

” ऐकू दे ग… घरी गेल्यावर झोपायचंच आहे.. काही होत नाही मला”. खरोखर माईला देहाचा विसर पडला होता.

वाखरीला पालखी पोचली.

पंढरपूर जवळ आल होतं. चंद्रभागेत स्नान झालं… कृतकृत्य वाटलं.

लांबून सर्वांनी कळसाचं दर्शन घेतलं. जणु विठुरायाच भेटला असे सर्वांना वाटले. प्रत्येकाचे डोळे भरून आले होते.

गच्च गर्दीत माई स्वतःशी हरवली होती. वारीची सांगता झाली होती. हुरहुर वाटत होती. मन इथेच अडकलं होतं. संसारात जायला नको म्हणत होतं. अजून काही दिवस इथेच राहावं असं तिला वाटत होतं. जाताना मुलगा न्यायला येणार होता.

दिंडीप्रमुख आले. निरोपानिरोपी सुरू झाली. बायका तर एका कुटुंबातल्या सारख्या झाल्या होत्या. लेकुरवाळी पोराला घेऊन आली होती. माईनी लेकराला जवळ घेतले. पोरगं खुशीत हसत होतं.. त्याची आई म्हणाली,

” माई आता पुढच्या वारीला येताल तेव्हा माझा ज्ञानोबा चालायला लागला असेल. “

“हो ग.. ” 

तुळशी वृंदावन घेतलेली म्हातारी म्हणाली, ” माऊली आता आपली भेट एका वर्षानी. किती छान झाली आपली वारी. पुढच्या वर्षी पण आपण असच एकत्र जायचं.. “

बोलताना तिचा गळा दाटून आला होता.

त्यांचं बोलणं ऐकून माईला आतून हलल्यासारखं झालं…

म्हणजे…

वारी संपली कुठे होती? आता तर सुरू झाली होती…

अरे.. खरचं की

माई म्हणाली,

” ठकु आता होईल तोपर्यंत वारी करायची.. जमेल तेवढं चालायच.. दमलो तर ट्रकमध्ये बसायच… “

ठकुनी माईला जवळ घेतलं…

दोघींचे डोळे वाहत होते…

 ” मन शांत होता पुन्हा लागे ओढ” 

या अवस्थेत दोघी बहिणी घरी निघाल्या…

 पुढच्या वर्षी वारीला यायचं हे ठरवूनच…

© नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ श्रीमंती मोजायची ताकद… लेखक : अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

🔆 जीवनरंग 🔆

☆ श्रीमंती मोजायची ताकद… लेखक : अज्ञात ☆ अंजली दिलीप गोखले

“मॅडम, तुमची फ्लाईट दोन तासात आहे… ” पीएने आठवण करून दिली. ईशाने डोळ्यावरचा चष्मा काढला. लंडनच्या ५० व्या मजल्यावरून खाली बघताना तिला आज खूप रिकामं वाटत होतं. तिच्या वडिलांचं, सदाशिवरावांचं काल रात्री पुण्यात निधन झालं होतं. ईशा एक यशस्वी बिझनेस वूमन होती. पण गेल्या १० वर्षांत ती एकदाही वडिलांना भेटायला भारतात आली नव्हती. कारण? कारण होता तो १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ दिवस.

ईशाला अमेरिकेतल्या मोठ्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली होती. फी होती २५ लाख रुपये. सदाशिवराव एक साधे कारकून. ईशाने हट्ट धरला होता, “बाबा, लोन काढा, घर गहाण ठेवा, पण मला अमेरिकेला जायचंच आहे. “

सदाशिवरावांनी स्पष्ट नकार दिला होता.

“ईशा, आपली ऐपत नाही ग. मी घर गहाण ठेवू शकत नाही. तुझं लग्न, तुझा भाऊ, म्हातारपण… मी रिस्क घेऊ शकत नाही. “

ईशा संतापली होती.

“तुम्ही भित्रे आहात! तुम्हाला माझ्या प्रगतीची जळजळ होते. मला तुमची मुलगी म्हणवून घ्यायची लाज वाटते. “

असं म्हणून ईशाने घर सोडलं होतं.

तिने रागाच्या भरात एका ट्रस्टकडून स्कॉलरशिप मिळवली आणि ती अमेरिकेला निघून गेली.

जाताना तिने बापाच्या तोंडावर पाहिलंही नव्हतं. गेल्या १० वर्षात तिने स्वतःला सिद्ध केलं, करोडो रुपये कमावले, पण बापाला एक फोनही केला नाही.

वर्तमान:

ईशा पुण्यात पोहोचली. जुनाट वाडा तसाच होता. दारात मोजकी लोकं होती. सदाशिवरावांचा देह अंगणात ठेवला होता. ईशाने पाहिलं, बापाच्या अंगावरचा सदरा जुनाच होता, जो १० वर्षांपूर्वी तिने पाहिला होता.

तिला रडू आलं नाही, फक्त एक विचित्र ओझं वाटलं. विधी उरकले. लोकं पांगली. शेवटी घरात ईशा आणि सदाशिवरावांचे जुने मित्र, वकील देशपांडे काका उरले. देशपांडे काकांनी ईशाच्या हातात एक जुनी, फाटकी डायरी आणि एक पासबूक दिलं.

“ईशा, सदाने हे तुझ्यासाठी ठेवलंय. “

ईशाने उपहासाने विचारले, “काय असणार यात? हिशोब? की मी किती वाईट वागले याच्या तक्रारी? “

काका गंभीर झाले. “वाच तू. तुला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. “

ईशाने डायरी उघडली. हळूहळू वाचू लागली.

काहीवेळाने आलं ते पान – तारीख १० वर्षांपूर्वीची.

“आज ईशा रागावून गेली. ती मला भित्रा म्हणाली. पण तिला कसं सांगू, की ज्या घराला गहाण ठेवायला ती सांगत होती, ते घर तर मी तिच्या इंजिनिअरिंगच्या वेळीच विकलं होतं. आता आम्ही भाड्याच्या घरात राहतोय, हे तिला कळलं असतं तर तिला गिल्ट (अपराधीपणा) वाटला असता. म्हणून मी खोटं बोललो. “

ईशाच्या हाताला कंप सुटला. तिने पुढचं पान उलटलं. “आज ईशाला अमेरिकेच्या ‘ज्ञानदीप ट्रस्ट’ ची २० लाखांची स्कॉलरशिप मिळाली. ती खूप खुश आहे. तिला वाटतंय तिच्या हुशारीवर मिळाली. बरंच झालं. तिला हे कधीच कळू नये की ‘ज्ञानदीप ट्रस्ट’ मध्ये मी माझ्या PF चे सगळे पैसे, आणि गावी असलेली वडिलोपार्जित जमीन विकून जमा केलेत. तिला वाटेल बापाने मदत नाही केली, ती माझा तिरस्कार करेल… पण चालेल. माझा तिरस्कार करून का होईना, पण ती जिद्दीने शिकेल. ती माझ्या उपकाराखाली दबली असती तर आकाशात उडू शकली नसती. “

ईशाच्या पायाखालची जमीन सरकली. ती ज्याला ‘स्कॉलरशिप’ समजत होती, ते तिच्या बापाचं रक्त आणि घाम होतं?

ज्या बापाला तिने ‘भित्रा’ आणि ‘कंजूस’ म्हटलं होतं, त्याने स्वतःचं म्हातारपण विकून तिचं भविष्य विकत घेतलं होतं?

ती रडत रडत शेवटच्या पानावर आली. तारीख – २ दिवसांपूर्वीची.

“ईशा, आज डॉक्टर म्हणाले माझ्याकडे २ दिवस आहेत. तू खूप मोठी झाली आहेस. टीव्हीवर तुझा फोटो बघतो तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. बाळा, तुझा राग अजून गेला नसेल, पण एक सांगतो… मी तुला पैसे दिले नाहीत असं नाटक केलं, कारण तुला ‘बापाच्या पैशावर जगणारी मुलगी’ नाही, तर ‘स्वतःच्या हिंमतीवर उभी राहिलेली स्त्री’ व्हायचं होतं. तू जिंकलीस बाळा. मी हरलो, पण मी आनंदाने हरलो.

फक्त एक खंत आहे… मरताना एकदा तुला डोळे भरून बघायचं होतं.

तुझा ‘कंजूस’ बाबा. “

ईशाने डायरी छातीशी कवटाळली. ती जमिनीवर कोसळली आणि ओक्साबोक्शी रडू लागली.

“बाबा… बाबा उठा ना… मला माफ करा… मी चुकले… “

तिचा आक्रोश त्या रिकाम्या घरात घुमत होता. आज तिच्याकडे करोडो रुपये होते, जगातल कुठलंही सुख ती विकत घेऊ शकत होती.

पण ज्या माणसाने स्वतःची राख करून तिला प्रकाश दिला होता, त्या बापाची एक ‘भेट’ आता ती जगातल्या कुठल्याच दौलतीने विकत घेऊ शकत नव्हती. बाहेर देशपांडे काका डोळे पुसत होते.

त्यांना माहिती होतं, सदाशिवरावांनी शेवटचे १० वर्षे फक्त ‘चटणी-भाकरी’ खाऊन दिवस काढले होते, जेणेकरून ईशाला परदेशात कधी पैशाची कमी पडू नये म्हणून ते गुपचूप तिच्या खात्यात पैसे पाठवत होते.

ईशाला आता कळलं होतं…

बाप कधीच गरीब नसतो, फक्त त्याची श्रीमंती मोजायची ताकद आपल्याकडे नसते.

आई-वडिलांच्या नकारामागे अनेकदा असा त्याग लपलेला असतो, जो आपल्याला उशिरा समजतो. जोवर ते आहेत, तोवर त्यांची कदर करा. कारण एकदा वेळ निघून गेली, की पश्चातापाशिवाय हाती काहीच उरत नाही.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “मोक्षाच्या शोधात…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शोभा जोशी☆

शोभा जोशी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “मोक्षाच्या शोधात…” – मूळ मल्याळी लेखक : अज्ञात – मराठी अनुवाद : रामदास पाटील खानिवलीकर ☆ प्रस्तुती – शोभा जोशी

मी माझ्या आजारी वडिलांना काशीतील मुक्ती भवनात घेऊन चाललो होतो, या अपेक्षेने की ते तिथे लवकरच निधन पावतील.

माझी तिथे जाण्याची इच्छा होती म्हणून नव्हे. पण वडिलांचे सततचे आजारपण, त्यांची दुर्बलता आणि औषधं व उपचारांवरील न संपणारा खर्च यामुळे मी पूर्णपणे खचून गेलो होतो. त्यांच्या देखभालीवर मी आधीच खूप खर्च केला होता, आणि आता असंच पुढे चालू ठेवणं मला शक्य नाही असं मला वाटू लागलं होतं.

तेव्हाच एका जवळच्या मित्राने मला काशीतील मुक्ती भवनाबद्दल सांगितलं.

तो म्हणाला की हिंदू श्रद्धेनुसार, काशीत मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो, आणि मुक्ती भवन ही अशा सर्वात प्रसिद्ध जागांपैकी एक आहे जिथे लोक त्यांचे शेवटचे दिवस घालवतात. “तू तुझ्या वडिलांना तिथे नेलंस, तर तुला शांती मिळेल आणि तुझ्या वडिलांना मोक्ष मिळेल. “

आणि म्हणून, एके दिवशी मी वडिलांना घेऊन रेल्वेत बसलो. माझे वडील खिडकीजवळ बसून बाहेर पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याची चिन्हे होती, पण डोळे शांत होते.

“आपण कुठे चाललो आहोत, बाळा?” त्यांनी विचारलं.

“काशीला. “

“काशीला? अरे, माझ्या महादेवा! ही यात्रा करायची इच्छा मला कित्येक वर्षांपासून होती. “

त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद माझ्या हृदयाला भिडला. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं.

संपूर्ण प्रवासात माझे वडील भूतकाळाबद्दल बोलत राहिले. लहानपणी मला ताप आला होता तेव्हा ते रुग्णालयात माझ्यासोबत कसे थांबले होते. माझी शाळेची फी भरण्यासाठी माझ्या आईने तिच्या बांगड्या कशा विकल्या होत्या. मला हवी असलेली सायकल घेण्यासाठी ते रात्री उशिरापर्यंत ऑटो-रिक्षा कसे चालवायचे.

मी ऐकत होतो.

पण माझ्याकडे बोलायला फार काही नव्हतं.

खूप लांबच्या प्रवासानंतर आम्ही वाराणसीला पोहोचलो आणि मुक्ती भवनात आलो.

मला भयाण शांतता अपेक्षित होती, मृत्यूची शांतता.

पण मी जे पाहिलं ते वेगळंच होतं.

लहान खोल्या. पांढऱ्या भिंती. जुने छताचे पंखे हळू हळू फिरत होते. मृत्यूची वाट पाहणाऱ्यांसाठी प्रार्थना म्हणत साधू कॉरिडॉरमधून फिरत होते.

मी वडिलांना आम्हाला दिलेल्या खोलीत नेलं.

“मी खूप थकलोय, बाळा. मला जरा पडू दे. “

मी मान हलवली.

ते झोपलेले पाहताच, मी टेबलावरून माझी बॅग उचलली आणि बाहेर पडलो.

मागे न पाहता घाईघाईने निघालो असताना, एका खोलीचा दरवाजा थोडा उघडा दिसला आणि मी आत डोकावलं.

एक वृद्ध गृहस्थ खिडकीजवळ बसून बाहेर पाहत होते. त्यांच्या हातात एक जुना फोटो होता—कदाचित त्यांच्या पत्नीचा किंवा मुलाचा. अधूनमधून ते फोटोकडे पाहून हसत होते.

दुसऱ्या खोलीत, एक वृद्ध स्त्री डोळे मिटून हातात माळ घेऊन प्रार्थना करत बसली होती. तिच्या शेजारी कोणीही नव्हतं.

पण ती एकटी नव्हती.

तिच्या आठवणी तिच्यासोबत होत्या.

कॉरिडॉरच्या शेवटी, एक वृद्ध वडील बिछान्यावर पडले होते. त्यांच्या शेजारी एक तरुण त्यांचा हात धरून बसला होता.

“बाबा, मी इथेच आहे, ” तो सारखं म्हणत होता. “घाबरू नका. “

त्या वृद्धाला ते ऐकू येत होतं की नाही माहीत नाही.

पण मुलाच्या आवाजात प्रेम होतं.

तिथे प्रत्येकजण मृत्यूची वाट पाहत होता.

तरीही मला वाटलं की त्यांच्यापैकी बरेचजण दुसऱ्याच कशाची तरी वाट पाहत आहेत.

एक फोन कॉल.

एक भेट.

मुलाचे दिलासा देणारे शब्द.

मुलीची “बाबा”अशी हाक.

त्याचीच ते खरं तर वाट पाहत होते.

तिथल्या एका कर्मचाऱ्याने मला पाहिलं आणि म्हणाला:

“इथे येणारे बहुतेक लोक मृत्यूला घाबरत नाहीत, साहेब. त्यांना जास्त दुःख होतं ते या विचाराने की त्यांचे प्रियजन त्यांना विसरले आहेत. ते म्हणतात इथे मृत्यू आल्याने मोक्ष मिळतो, पण आपल्या मुलांमध्ये शांतपणे मरणं आणि इथे एकटं मरणं यात खूप मोठा फरक आहे. “

तो पुढे म्हणाला:

“इथे येणारे बरेच लोक लवकर मरतात—आजारीपणामुळे नाही, तर त्यांची मुलं त्यांना सोडून गेली आहेत हे कळल्यावर त्यांचं हृदय फाटतं म्हणून. “

त्या शब्दांनी मला हादरवून सोडलं.

मी आजूबाजूला पाहिलं.

काही डोळे दाराकडे रोखलेले होते—

कोणीतरी येण्याची वाट पाहत.

काही डोळे आकाशाकडे वळलेले होते—

कोणीतरी फोन करेल याची वाट पाहत.

आणि काही डोळ्यांत तर आशाच उरली नव्हती.

फक्त वाट पाहणं.

अचानक मला माझ्या वडिलांची आठवण झाली.

मी मागे वळलो आणि धावलो.

जेव्हा मी खोलीत शिरलो, तेव्हा माझे वडील बिछान्यावर उठून बसले होते, घामाने न्हाऊन निघाले होते, अशक्त दिसत होते.

तेही उघड्या दाराकडे पाहत होते.

मला पाहताच त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

आणि मी विचार केला:

जर मी आता निघून गेलो, तर उद्या माझे वडील त्या दाराशी वाट पाहणारा आणखी एक चेहरा बनणार नाहीत का?

त्या क्षणी, मुक्ती भवन मला फक्त एक इमारत वाटली नाही.

ते एक शांत जग वाटलं जिथे आयुष्यभर इतरांची काळजी घेणारी माणसं प्रेमाच्या एका शेवटच्या स्पर्शाची वाट पाहत होती.

मी या विचारांत हरवलो असताना, मला वडिलांची हाक ऐकू आली.

“बाळा… “

“हो, बाबा?”

“तू गेला नाहीस?”

“मी कुठे जाईन?”

“मला माहीत आहे तू मला इथे सोडायला आणलंस. “

ते थांबले.

“पण मी तुला दोष देत नाही. आई-वडील म्हातारे झाले की ते कधी कधी मुलांसाठी ओझं होतात. कदाचित मीही तुझ्यासाठी ओझं झालो असेन. “

मग त्यांनी माझा हात घट्ट धरला.

“पण एक गोष्ट लक्षात ठेव, बाळा… “

“आई-वडिलांसाठी सर्वात मोठा मोक्ष काशीत मरणं हा नाही. तो मुलांच्या हृदयातून काढून टाकलं न जाणं हा आहे. “

“कृपा करून माझा तिरस्कार करू नकोस, बाळा. मी गेल्यावर माझे विधी कर. “

त्या शब्दांनी माझं हृदय विदीर्ण झालं.

“इथे जास्त वेळ थांबू नकोस, बाळा. जा. पण जाण्यापूर्वी तुझ्या वडिलांना एक मिठी मार आणि एक पापी दे. मला तुला पुन्हा एकदा जवळ घ्यावंसं वाटतंय. “

त्यांची शेवटची इच्छा.

“बाबा… “

मी ढसाढसा रडलो.

वर्षानुवर्षांचा स्वार्थ आणि हिशेब माझ्या अश्रूंमध्ये विरघळून गेले.

त्या रात्री, मी मुक्ती भवनातील खोलीत वडिलांजवळ झोपलो.

झोपलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पाहताना मला एक सत्य कळलं:

माझ्या आयुष्यातील सर्वात सुरक्षित जागा कधीतरी या माणसाचा खांदा होती.

मी घाबरलो तेव्हा त्यांनीच मला धरलं होतं.

मी पडलो तेव्हा त्यांनीच मला उचललं होतं.

मी अपयशी ठरलो तेव्हा ते माझ्या पाठीशी उभे राहिले होते.

मग मी त्यांना त्यांच्या शेवटच्या वर्षांत कसं सोडून देऊ शकतो?

दुसऱ्या दिवशी सकाळी, मी घरी परतण्याची तिकिटं बुक केली.

आम्ही निघायची तयारी करत असताना, मुक्ती भवनातील कर्मचाऱ्यांनी माझ्या वडिलांच्या शांत मृत्यूसाठी प्रार्थना करण्यासाठी साधूंना बोलावलं.

मी त्यांना थांबवलं.

“आता त्याची गरज नाही, ” मी म्हणालो.

“माझ्या वडिलांना मोक्ष मिळालेला नाही.

मोक्ष मला मिळाला आहे. “

माझ्या वडिलांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं.

“तुला काय म्हणायचंय, बाळा?”

मी त्यांचा हात धरला.

“चला बाबा, घरी जाऊया. पण आधी, गंगेत डुबकी मारून प्रभूचं दर्शन घेऊ. “

“मग, मला इथे राहावं लागणार नाही?” त्यांनी विचारलं.

“का राहावं लागेल?”

“ज्याला मुक्तीची गरज होती ते तुम्ही नव्हता.

माझं मन होतं—ते मन जे स्वतःच्या वडिलांना ओझं समजलं होतं. “

माझ्या वडिलांच्या डोळ्यांत अश्रू भरून आले.

त्या क्षणी, काशीच्या मंदिरातील घंटानादापेक्षा अधिक पवित्र होता त्या वृद्धाच्या चेहऱ्यावरून ओघळणारा तो मूक अश्रू.

सर्व मुलांना आणि सर्व वडिलांना समर्पित.

 

मूळ मल्याळी कथालेखक : अज्ञात

स्वैर अनुवाद : रामदास पाटील खानिवलीकर

प्रस्तुती : शोभा जोशी 

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “चहावाल्याची डायरी…”  लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “चहावाल्याची डायरी…”  लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

पुणे स्टेशन, 2018. 

पुणे स्टेशनच्या बाहेर एक चहाचा स्टॉल होता. मालक होते रमेश अण्णा. वय 62. एका पायाने अपंग. रोज सकाळी 5 ला स्टॉल उघडायचा… रात्री 11 ला बंद. चहा एक कप 5 रुपयाला… आणि त्यासोबत एक गोष्ट मोफत – “चेहर्‍यावरचं हसू”.

लोक यायचे… चहा प्यायचे… 10 मिनिटं बोलायचे… आणि मन हलकं होऊन जायचे. कोणी म्हणायचं, “अण्णा, तुम्ही मानसोपचारतज्ज्ञ आहात. “

अण्णा हसायचे, “नाही रे बाळा, मी फक्त चहावाला आहे. पण दुःख बघितलंय ना… म्हणून चहात साखर कमी आणि माया जास्त टाकतो. “

एकदा एक 25 वर्षाचा मुलगा आला. इंजिनिअर. सुटाबुटात… पण डोळे सुजलेले. रात्रभर रडल्यासारखे. म्हणाला, “अण्णा, एक कटिंग. कडक. “

अण्णांनी चहा दिला. मुलाने तो एका घोटात संपवला. खिशातून 100 ची नोट काढली, टेबलवर ठेवली… आणि म्हणाला, “अण्णा, उरलेले पैसे तुम्ही ठेवा. हा माझा शेवटचा चहा आहे. “

अण्णांचे हात थरथरले. ते कप धुतांना थांबले. म्हणाले, “बाळा, कुठे निघालास?” 

मुलगा हसला… कोरडं हसू… “ट्रेनखाली. जॉब गेला. गर्लफ्रेंड सोडून गेली. घरावर कर्ज. जगून तरी काय करू?”

अण्णा स्टॉलबाहेर लंगडत लंगडत आले. मुलाचा हात हातात धरला… आणि त्याला स्टॉलच्या मागे नेलं. तिथे एक जुनी, फाटकी डायरी होती. अण्णा म्हणाले “वाच. “

|| अण्णांच्या डायरीतलं पहिलं पान || 1985 ||

 “आज माझा पाय ट्रकखाली आला. डॉक्टर म्हणाले ‘कापावा लागेल’. बायको 8 महिन्याची गरोदर होती. घरात फक्त 23 रुपये होते. रात्री हॉस्पिटलच्या गच्चीवर गेलो… उडी मारणार होतो तेवढ्यात बायकोचा फोन आला, ‘अहो, बाळ लाथ मारतंय. म्हणतंय बाबा लढा. ‘ 

 मी रडलो… आणि परत आलो.

 दुसऱ्या दिवशी पाय गेला… पण हिंमत नाही गेली. स्टेशनबाहेर 2 भांडी, 1 किटली घेऊन बसलो. ‘चहाऽऽऽ’ ओरडलो. पहिला दिवस- 17 रुपये कमावले. रडलो… पण जगलो. “

|| डायरीचं दुसरं पान || 1993 ||

“आज बायको कॅन्सरने गेली. हातात 6 वर्षाचं पोर. लोक म्हणाले ‘पोरगं अनाथाश्रमात टाक’. मी म्हणालो, ‘माझा एक पाय गेला… पण बापपण नाही जाऊ देणार. ‘ दिवस-रात्र चहा विकला. पोराला शिकवलं. इंजिनिअर केलं. आज तो अमेरिकेत आहे. म्हणतो ‘बाबा तिकडे या’. मी म्हणतो – ‘बाळा, माझे ग्राहक कोण सांभाळेल? त्यांचं दुःख कोण ऐकेल?'”

|| डायरीचं शेवटचं पान || 2018 ||

 “आज 62 वर्षांचा झालो. एक पाय नाही. बायको नाही. पोरगं लांब. पण रोज 200 लोक मला ‘अण्णा’ म्हणतात. त्यांचं दुःख ऐकतो… चहा पाजतो… आणि सांगतो – ‘जग रे बाळा’.

 मला देव भेटला नाही… पण माणसातला देव रोज भेटतो. म्हणून मी अजून जिवंत आहे… आणि आनंदी आहे. कारण माझ्याकडे ‘देण्यासारखं’ फक्त चहा आणि वेळ. ” आहे.

 मुलगा डायरी वाचून लहान मुलासारखा रडू लागला…. अण्णा म्हणाले, “बाळा, तुझे 2 हात आहेत… 2 पाय आहेत… डिग्री आहे… आणि तरी तू मरायला निघालास? माझ्याकडे काय होतं? 23 रुपये आणि एक तुटलेला पाय. पण मी ‘नसलेलं’ रडत बसलो नाही… ‘असलेलं’ वापरत राहिलो. तू पण तेच कर. नोकरी गेली? दुसरी शोध. पोरगी गेली? चांगली येईल. पण जीवन गेलं… तर परत येत नाही रे राजा. “

 अण्णांनी त्याला 100 रुपये परत दिले… आणि एक फुकट चहा. म्हणाले, “हा ‘जिंदगीचा चहा’ आहे. एकदम संपवू नकोस… घोट घोट पी. “

 तो मुलगा आज बेंगलोरला मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे. दर महिन्याला अण्णांना फोन करतो आणि पुण्याला आला की पहिलं अण्णांच्या स्टॉलवर जातो. दोन चहा घेतो – एक स्वतःसाठी… एक अण्णांसाठी. आणि म्हणतो – “अण्णा, तुमच्या 5 रुपयाच्या चहाने माझं 50 लाखाचं जीवन वाचवलं. “

या सत्य कथेतून 5 बोध मिळतात. ते मनात जपून ठेवा.

1. || समस्या सगळ्यांनाच असते… प्रॉब्लेम नाही, पर्स्पेक्टिव्ह असतो ||

अण्णांचा पाय गेला… पण नजर नाही गेली. तुझी नोकरी गेली… पण आयुष्य नाही गेलं. “गेलेलं” मोजू नकोस… “उरलेलं” वापर.

  1. || आत्महत्या करणारा ‘कमजोर’ नसतो… तो ‘एकटा’ असतो ||

 त्या मुलाला फक्त “ऐकणारा” हवा होता. अण्णांनी 10 मिनिटं दिली… त्याने 10 वर्षं दिली. कधी कधी 1 कप चहा = 1 जीव वाचवू शकतो. ऐकायला शिका.

  1. || देव मदत करायला ‘माणूस’ बनून येतो ||

 अण्णांच्या रूपात स्वामीच आले होते. मंदिरात जाण्याआधी माणसातला देव ओळखा. तो चहावाला, रिक्षावाला, पोस्टमन… कोणाच्याही रूपात असेल.

  1. || “देणारा” कधीच गरीब नसतो || 

 अण्णांकडे एक पाय नाही… पण रोज 200 लोकांना हसवतात. तुझ्याकडे सगळं आहे… पण तू एकालाही हसवत नाहीस. श्रीमंती खिशात नसते… वागण्यात असते.

  1. || शेवटचा चहा कधीच नसतो ||

 जोवर श्वास आहे… तोवर “नवीन सुरुवात” आहे. “End” म्हणणं तू ठरवायचं… देवाने अजून “Interval” लिहिलंय.

 || अण्णांचा शेवटचा संदेश || तुमच्यासाठी ||

“बाळांनो, जीवन कटिंग चहासारखं आहे… कधी कडू लागेल… कधी गोड लागेल… पण संपवू नका… घोट घोट प्या… कारण शेवटचा घोट सगळ्यात गोड असतो… त्याला ‘अनुभव’ म्हणतात.

रमेश अण्णा आजही पुणे स्टेशनबाहेर आहेत. 5 रुपयाचा चहा… आणि फुकटचा जीवन-पाठ. कधी गेलात तर भेटा… सांगा ‘स्वामींनी पाठवलं’ ||

|| जय श्री स्वामी समर्थ ||

ही कथा वाचून कोणासाठी तरी “अण्णा” व्हा? आणि आज एका दुःखी माणसाला फक्त 10 मिनिटं द्या… त्याचा “शेवटचा चहा” तुमच्यामुळे “पहिला चहा” होईल.

हीच खरी स्वामीसेवा आहे.

(जीवनावर आधारित हृदयस्पर्शी बोधकथा. ही फक्त कथा नाही. ही प्रत्यक्षात घडलेली सत्यकथा आहे. पुणे स्टेशनबाहेर आजही तो चहाचा स्टॉल आहे.) 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “गोष्ट इंग्लिश बोलण्याची…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “गोष्ट इंग्लिश बोलण्याची…” ☆ श्री मंगेश मधुकर

 झालं असं की,

रुटीन वर्किंग डे, केबिनमध्ये साहेब लॅपटॉपवर काम करत होते. इतक्यात दारावर टकटक झाली.

“सर, आत येऊ”

“कोण !! शांतामावशी, या या, बरेच दिवसांनी… ”

“नमस्कार सर, बरे हात ना”

“मस्त, मजेत, नेहमीसारखा. तुम्ही कशा आहात. ”

“बरी हाय. रिटायर झाले. रिकामं बसून करमत नाही. हापिसची लय आठवण येते. ”

“चालायचंच, आज इकडं काय काम?”

“या बाजूला आलते म्हणून समद्याना भेटायला आले. ”

“चांगलं केलंत. चहा घेणार”

“थोड्या टायमानं. नवीन बाई झाडूपोचा, साफसफाई नीट करती ना”

“हो, करतीये पण तुमच्याइतकी चांगली नाही. हळूहळू शिकेल. ” 

“तुमचे आनी हापिसचे लई उपकार हायेत. माज्यासारक्या अडण्याच्या हाताला काम दिलं. इत तीस वर्स काम केलं. चुका झाल्या तरीबी सांबाळून घेतलं. या कामानं घर चाललं. पोरी शिकल्या. नोकरीलापण लागल्या. ”

“तुम्ही सुद्धा फार मेहनत घेतलीत. आता आराम करा. पोरी काळजी घेतील. ”

“सर, धाकटी सोबत आलीये”

“मग बोलवा की आत”मावशीनी मुलीची ओळख करून दिली.

थोडया वेळानं निरोप घेऊन निघालेल्या मावशी परत आल्या – – 

“सर, माजी पोरगी इंग्लिस बोलते”

“अरे वा, चांगलयं की”

“तसं न्हाई. यक इनंती. नाय म्हणू नगा”

“मावशी, बोला!!”

“तुमी माज्या पोरीशी इंग्लिसमध्ये बोला. ” 

मावशींची अनपेक्षित मागणी ऐकून साहेबांना हसायला आलं. मुलगी मात्र गडबडली. प्रचंड ऑकवर्ड झालेल्या तिनं आईकडं पाहत डोळे वटारले.

“रिलक्स, आईसाठी आपण बोलू या. टेंशन घेऊ नकोस. टेल मी अबाऊट युवरसेल्फ”साहेबांच्या बोलण्यानं मुलीला धीर आला. तिनं अडखळत इंग्लिशमध्ये सुरवात केली. साहेबांच्या सोप्या प्रश्नांना आत्मविश्वासानं उत्तरं दिली. हे इंग्रजी संभाषण चालू असताना अचानक मावशी जोरजोरात टाळ्या वाजवायला लागल्या. साहेब आणि मुलगी दोघंही आश्चर्याने मावशीकडे पाहत होते.

“मावशी, पोरगी हुशार आहे. इंग्लिश चांगलं बोलते. ”साहेब म्हणाल्यावर मावशीचे डोळे घळघळा वहायला लागले.

“माप करा, सर. जरा येडयासारखी करतेय. ”मावशी 

“असं काही नाही. ”साहेब.

“जास्त येळ घेत नाई. माज्यासाठी आजचा दीस लई मोठा हाय. समदा जनम गरीबीत. दारुड्या नवऱ्याचा नावापुरता आधार. पोरींना शिकवून हापिसर बनवायचं हेच डोक्यात व्हतं. आज पोरीला इंग्लिस बोलताना पाहिल्यावर लई लई भारी वाटलं. ”मावशीना खूप भरून आलं. घाईगडबडीत नमस्कार करून बाहेर गेल्या. मोठ्या साहेबांसोबत पोरगी इंग्लिस बोल्ली म्हणून सगळ्या ऑफिसला मावशींनी समोसा-बर्फीची पार्टी दिली.

… तसं पहायला गेलं तर खूप साधी घटना परंतु मावशींसाठी आयुष्याची लढाई जिंकल्याची भावना होती. स्वप्नपूर्तीचा आनंद फार मोठा असतो.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “या गोजिरवाण्या घरात…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? जीवनरंग ?

☆ “या गोजिरवाण्या घरात…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

महेश अन् लीना. वय वर्ष 65 अन् 61. दोघंही रिटायर्ड. खरं तर, आजी आजोबा व्हायला हवेत एव्हाना. बहुधा झालेही असतील. कुणास ठावूक?

तुम्हाला माहीत नाहीये बहुतेक. रोहन त्यांचा एकुलता एक. नूमवी, एस. पी. आणि सोओईपी. आता तिकडे असतो. सातासमुद्रापार.

इंजिनीअरिंगचं शेवटचं वर्ष. घरात आनंदी आनंद. कॅम्पसमधनं सिलेक्ट झालेला. एका मोठ्या MNC कंपनीत. बर्‍याचदा त्याच्या मित्रमैत्रिणींचा घोळका यायचा घरी. त्यात तीही असायची म्हणे. तेव्हा, असं काही असेल…? वाटलंच नव्हतं.

काॅलेज संपलं. एक वर्ष दिल्लीत जाॅब. तिथं सुद्धा ती होतीच त्याच्याबरोबर.

एक दिवस अचानक. दोघं इथं. पुण्यात. आपल्या घरी. “मला हिच्याशी लग्न करायचंय… ” दारातूनच रोहननं बाॅम्ब टाकला.

नीट निरखून बघितली दोघांनी तिला. काळी सावळीच. हुश्शार.. असेल कदाचित. अखंड बडबड. आल्या आल्या स्वतःची जुजबी ओळख. घरभर हुंदडून आली. मोकळी ढाकळी. अल्लडच वाटत होती अजून. थोडीशी टाॅमीश. मराठी सुद्धा धड येत नव्हतं तिला. दुसऱ्या राज्यातली.

गॅलरीत गेली. खाली बिल्डींगमधली पोरं क्रिकेट खेळत होती. सहावी सातवीतली असतील. “यार रोहन, बहोत दिन हुऐ क्रिकट खेले हुऐ. तुम लगे रहो.. मै आती हूँ एक सेंच्युरी मार के.. ” जाता जाता तिनं, रोहनच्या पाठीत दणकन् धपाटा घातला. गुऽऽल. धाडधाड जिना ऊतरून खाली.

महेश -लीनानं, रोहनकडे आख्खा क्वेश्चनपेपर दिला. रोहननं नुसतेच खांदे उडवले. अर्ध्या तासानं ती घामाघूम होवून परत. “रोहन, मजा आया. ” 

हात पाय धुवून हाॅलमधे. फतकल मारून लीनाशेजारी बसली. “आंटी, आप वो फेवरीट मराठी डिश खिलाओ ना! पोहा… बहोत बहोत भूख लगी है. “

लीना जीवावर आल्यासारखी उठली.

तिचा मोर्चा महेशकडे. “पाॅप्स, निकालो आप का व्हायोलीन. बजावो कुछ गजल वजल. रोहन ने मुझे बोला है. आप बहोत अच्छा बजा लेते हो. “

महेशनं कपाटातून व्हायोलीन काढलं. पण आज सूर लागलाच नाही. काहीतरी बिनसलेलं. नाही जमायचं.

हे प्रकरण घराला जड जाईल. ती अजूनही गॅलरीत. गल्ली क्रिकेटमधे हरवलेली. आतल्या खोलीत तिघांच्या वाटाघाटी. रोहन काकुळतीला आलेला. फिस्कटल्या… तासाभराच्या फ्लाईटनं दोघं दिल्ली.

नंतर…? काही नाही. दोघांनी रजिस्टर्ड मॅरेज केलं. आता तिकडे असतात म्हणे. फ्लोरीडाला. तिच्या घरीही पसंत नव्हतं म्हणे. दोन घरं तोडली. लग्नानं दोन घरं जोडली जातात म्हणे? काहीही..

महेश आणि लीनानं तो विषय संपवलाय कधीच.

ललित. रोहनचा फा फे. त्याच्याकडनंच कळते, तिकडची हालहवाल.

महेश आणि लीना. दोघंच दोघं पुण्यात. ललित मात्र आठ पंधरा दिवसातून, चक्कर मारतोच मारतो. त्याची बायकोही साधीच. पियू… त्याची लेक. नातवंडी प्रेमाचा आठवडी बाजार. महेश आणि लीना. तिच्यावरच उधळतात आपला.. आजोळी प्रेमाचा न संपलेला स्टाॅक.

ललित खूप मागे लागलेला. म्हणून ही दोघं इथं आलेली. आसूद बागेत. दाबक्यांच्या घरी. होम स्टे.

‘गारंबीचा बापू’ महेशचा फेवरीट. रोज सकाळी लक्ष्मी केशवाचं दर्शन. सुपारीच्या बागा. पळतं नागमोडी पाणी. तोच साकव. विठोबा शोधणारी महेशची नजर. संध्याकाळी मुरूडच्या देवीचं दर्शन. अन् मावळतीला समुद्र दर्शन. दोन दिवस मजेत गेले. राहूयात, अजून चार दिवस इथेच. लीनाही खूष.

आजची प्रसन्न सकाळ. समोरच्या खोलीत हालचाल. एक पंजाबी कपल. महेश आणि लीनाच्याच वयाचे. गुडमाॅर्नींगचे सोपस्कार झाले. बोलका स्वभाव. पंजाबी माणसं, जरा जास्तच मोकळीढाकळी. सहज मैत्र जुळलं.

ती दोघंही आली. डोंगर चढून चौघं मंदिरात. लक्ष्मी केशव प्रसन्न. अखंड गप्पा. ती दोघं पहिल्यांदाच कोकणात आलेली. इथला नजारा पाहून, वेड लागलेलं. जेवायला खाली परत. बिरड्याची उसळ. उकडीचे मोदक. साजूक तुपाच्या बरसत्या धारा. दाबक्यांचा पाहुणचार जबराटच. चौघं जण खूष.

सरदारजी जालंधरचे होते म्हणे. रिटायर्ड पुलिस अफसर. पोलीस लाईफमधले किस्से, रंगवून सांगायचे. मजा यायची ऐकायला. पंजाबी काकूही तेवढ्याच बोलक्या. त्या दोघांशी बोलताना महेश लीनाची फेफे. जीवघेणं पुणेरी हिंदी. भाषेवाचून फारसं काही अडायचं नाही.

दुपारची वेळ. पडवीतल्या झोपाळ्यावर गप्पा रंगलेल्या. अचानक सरदारजी ईमोशनल. एकुलत्या एका लेकीची आठवण. तो जावई म्हणून पसंत नव्हताच त्यांना. तिनं पळून जावून केलेलं लग्न. निघालेल्या खपल्या. अश्रूंची साथ.

महेशनं सरदारजींच्या खांद्यावर हलकेच थोपटलं. ‘ट्रॅव्हलींग इन सेम बोट. ऑल ऑफ अस… ‘

दुःख हलकं झालेलं. मनं मोकळी झालेली. तरीही वाटून गेलंच. एवढं ताणायला नको होतं… एका भेटीत माणूस जोखायचा नसतो कधी. जान दो.

संध्याकाळी चौघं जणं मुरूडच्या बीचवर निघालेली. एकदम दाबक्यांच्या घरी किलबिलाट. दोन गोड पऱ्या. मोठी दहा वर्षाची. धाकटी सहाची. जस्सी आणि सुमी.

“माझ्या नाती. मोठ्या मुलाच्या. तो तिकडे अमेरिकेत असतो. मुलगा सून अजून मुंबईलाच थांबलेत. त्यांचा काका घेवून आलाय दोघींना. “

एल्डर्स क्लब खुश. पुणे जालंदर एक्सप्रेस सुसाट. बीचवर यायला पऱ्या एका पायावर तयार. दोघींना इंग्लिश बोलता यायचं. मोडकं तोडकं हिंदी अन् मराठी समजायचं. पण बोलता यायचं नाही.

सहा जणांची टीम समुद्रावर. पिकली पाने आणि कोवळी मने. वाळूत किल्ले बांधून झाले. पकडापकडी खेळून झाली. पोएम्स म्हणून झाल्या. बनाना बोट रायडींग झालं. मज्जा आ गया.

दिवेलागणीला घरी परत. पत्ते कुटले. घोस्ट स्टोरीज सेशन झालं. दोन पोरी, या नव्या आजीआजोबावर जाम खूष. एक एक पोर वाटून घेतली. आजी आजोबांच्या कुशीत स्वप्नाळू झोप. दुसऱ्या दिवशी एक्सेंज.

महेश लीना. मिस्टर अँन्ड मिसेस कौर. नातवंडांची भूक संपवण्याचा दुबळा प्रयत्न. चौघांचा मुक्काम अजून दोन दिवस लांबला. जस्सी आणि सुमी, दाबकेआजोंबांना विसरलेल्या.

शेवटी जायचा दिवस उगवला. चौघं जण निघाले. एकाच गाडीतून चिपळूणपर्यंत जाणार होते. जड बॅगा. जड मनं. पोरींचा आसूभरा सेंडऑफ. गाडीच्या खिडकीतून मागे बघवेना.

.. सरप्राईज. गाडी जागेवरच थांबलेली. पुढं जाईचना. पोरींनी चौघांना खेचून बाहेर काढलं. गाडीबाहेर रोहन आणि निहारिका उभे.

दाबक्यांचा गौप्यस्फोट. “गले लग जाओ. तुमच्याच नाती आहेत त्या. “

यकीन नही होता. झाले मोकळे आकाश. सगळ्या भिंती जमीनदोस्त. बस प्यार ही प्यार… रोहन, निहारिका, जसविंदर आणि सुस्मिता. चौघांचं चौघांना पायलागो.

एकदम मुरूडच्या समुद्राच्या पाण्याची लेवल वाढलेली. खारं पाणी गोड झालेलं.

… अचानक ललितची एन्ट्री. हा सगळा ललितचा प्लॅन. रोहन आणि निहारिका कायमचे परत येतायेत भारतात. सगळ्यांनी एकत्र रहायचं. मिस्टर आणि मिसेस कौर. तेही लवकरच पुण्यात सेटल होतील. मधेच तुटलेली ती सिरीयल. या गोजिरवाण्या घरात… आज पुन्हा सुरू झालेली… न संपण्यासाठी.

लक्ष्मी केशव प्रसन्न ||

 

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कंजूस ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ कंजूस… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

गावातील सर्वात कंजूस माणूस मेला… पण त्याच्या जुन्या लोखंडी पेटीत पैसे नव्हते, तर ४१७ अपूर्ण माफीनाम्यांची पत्रे होती. “

“गणपत काका गेले…! ” पहाटे पाच वाजताच ही बातमी संपूर्ण गावात पसरली. पण कोणाच्याही चेहऱ्यावर दुःख नव्हते.

पारावर बसलेले ज्येष्ठ म्हणाले, “बरं झालं… देवाने उशिरा का होईना न्याय केला. “

कोणी उपहासाने म्हणाले, “आता त्याच्या पेटीतून लाखो रुपये निघतील… आयुष्यभर कुणाला एक रुपयाचीही मदत केली नाही. “

बायका कुजबुजत होत्या, “असा कंजूस माणूस आयुष्यात पाहिला नाही. “

“फाटकी बनियन शिवून घालायचा… पण कुणाला मदत करायची नाही. “

लहान मुलंही त्याला पाहून रस्ता बदलायची.

सगळं गाव त्याला एका नावानेच ओळखत होतं – ‘गणपत कंजूस. ‘

गणपत काकांची अंत्ययात्रा अंगणात तयार होती. पण त्यांना खांदा द्यायला चार माणसंही तयार नव्हती. शेवटी ग्रामपंचायतीने चार मजूर बोलावले.

इतक्यात त्यांचे जुने वकील दयानंदराव धावत आले. ते मोठ्याने म्हणाले, “अंत्ययात्रा पाच मिनिटे थांबवा. “

सगळे चकित झाले. “आता अजून काय बाकी आहे? “

वकिलांनी एक जुना लिफाफा काढला. “गणपत काकांची शेवटची इच्छा होती-

‘जोपर्यंत माझी लोखंडी पेटी संपूर्ण गावासमोर उघडली जात नाही, तोपर्यंत माझी अंत्ययात्रा काढू नका. ‘”

लोक हसू लागले. “मेला तरी पैसा सोडत नाही. “

“नक्की सोनं लपवलं असेल. “

“नोटांच्या गड्ड्या असणार. “

त्यांची खोली उघडली गेली. एका कोपऱ्यात जुनी लोखंडी पेटी होती. धुळीने पूर्ण माखलेली. वकिलांनी कुलूप उघडलं. सगळ्यांचा श्वास रोखला गेला पण… पेटीत ना सोनं होतं… ना चांदी… ना पैशांच्या गड्ड्या… फक्त जुने कागद. शेकडो कागद. प्रत्येक वेगळ्या लिफाफ्यात. प्रत्येकावर गावातील कुणाचं ना कुणाचं नाव. आणि लाल शाईने लिहिलेला एकच शब्द- “माफ करा… “

मोजणी झाली. एक… दोन… दहा… पन्नास… एकूण… ४१७ लिफाफे. संपूर्ण गाव शांत झालं.

“हे काय आहे? ” सरपंचांनी विचारलं.

वकील म्हणाले, “ही गणपत काकांची शेवटची इच्छा आहे. त्यांनी सांगितलं होतं – ‘माझ्या चितेला अग्नी देण्याआधी यातील पहिली पाच पत्रं वाचून दाखवा. ‘”

पहिलं पत्र होतं- ‘भिमा लोहार’

भिमा पुढे आला. हसत म्हणाला, “पाहूया… आता काय लिहून ठेवलंय. “

वकील वाचू लागले – “भिमा, मला माफ कर. वीस वर्षांपूर्वी तुझ्या मुलीच्या लग्नासाठी तू माझ्याकडे पैसे मागायला आला होतास. मी सगळ्यांसमोर तुला रागावून हाकलून दिलं. पण त्याच रात्री तुझ्या दारात नाव न सांगता पन्नास हजार रुपये ठेवले होते. समोरून दिले असते तर तू घेतले नसतेस. म्हणून वाईट माणूस होणं स्वीकारलं… पण तुझ्या मुलीचं लग्न मोडू दिलं नाही. तू मला आयुष्यभर कंजूस समजलास… तीच माझी शिक्षा होती.

— गणपत. “

भिमाच्या हातातून पत्र खाली पडलं. तो रडत म्हणाला, “त्या रात्री खरंच पैसे दारात ठेवले होते… मी आजपर्यंत समजलो होतो… देवाने पाठवले. ” तो ढसाढसा रडू लागला.

दुसरं पत्र— ‘रुक्मिणी काकू’

त्या थरथरत पुढे आल्या. पत्रात लिहिलं होतं- 

“रुक्मिणी काकू, तुमच्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी तुम्ही माझ्याकडे आलात. मी तुम्हाला हाकलून दिलं. पण त्या रात्री शहरातील रुग्णालयात तुमचं संपूर्ण बिल मीच भरलं. तुम्ही माझे पैसे परत करण्यासाठी जमीन विकू नये म्हणून माझं नाव लपवलं. मला तुमचा मुलगा वाचावा इतकंच हवं होतं. माफ करा.

— गणपत. “

 रुक्मिणी काकू रडतच अर्थीजवळ बसल्या. “बाळा… ” एवढंच त्यांच्या तोंडून निघालं.

तिसरं पत्र होतं— ‘देशमुख गुरुजी’. गावातील निवृत्त शिक्षक पुढे आले.

“गुरुजी, तुम्हाला वाटायचं मी शिक्षणाचा विरोधक आहे. कारण शाळेसाठी वर्गणी मागितली तेव्हा मी एक रुपयाही दिला नव्हता. पण शाळेच्या वाचनालयासाठी शहरातील ट्रस्टने दिलेली सर्वात मोठी देणगी माझ्याच नावाने स्थापन केलेल्या ट्रस्टकडून होती. मला मुलांनी माझं नाव नाही… पुस्तकं लक्षात ठेवावीत असं वाटलं. माफ करा.

— गणपत. “

गुरुजींच्या हातातील काठी खाली पडली. ते अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले, “मी आयुष्यभर मुलांना सांगत राहिलो… ‘गणपतसारखं कधी बनू नका. ‘ आज वाटतं… मलाच गणपतसारखं व्हायला हवं होतं. “

तेवढ्यात गर्दीतून आवाज आला— “जर तो इतका चांगला होता… तर आयुष्यभर सत्य का लपवलं? “

वकीलांनी पेटीच्या तळाशी असलेला जाड लिफाफा बाहेर काढला. त्यावर लिहिलं होतं— “हे शेवटीच वाचा… हीच माझी खरी शिक्षा आहे. “

पत्रात लिहिलं होतं- “जर हे पत्र वाचलं जात असेल… तर कदाचित पहिल्यांदाच गाव मला ऐकायला तयार झालं आहे. मी जन्मतः कंजूस नव्हतो… मला तसं व्हावं लागलं.

बावीस वर्षांपूर्वी माझा दहा वर्षांचा मुलगा ‘मोहन’ हृदयाच्या आजाराने त्रस्त होता. डॉक्टरांनी तीन लाख रुपये मागितले. मी संपूर्ण गावात हात जोडले. पण कुणीही मदत केली नाही. त्या रात्री माझा मुलगा माझ्या कुशीतच गेला.

त्या दिवसापासून मी ठरवलं – या गावात पैशाअभावी कोणाचंही मूल मरू देणार नाही. मी कमी खाल्लं… जुने कपडे घातले… सण साजरे केले नाहीत… कारण मला पैशांचा नव्हे, दुसऱ्यांच्या अश्रूंचा भय वाटत होतं.

मोहनने शेवटच्या श्वासात मला एकच गोष्ट सांगितली होती –

‘बाबा… कुणाची मदत कर… पण त्याला कधीही उपकाराची जाणीव होऊ देऊ नको. ‘

मी ते वचन आयुष्यभर पाळलं. म्हणून प्रत्येक मदतीबदल्यात मी माझी बदनामी स्वीकारली.

लोक मला कंजूस म्हणत राहिले… आणि मी शांत राहिलो.

कारण एखाद्याची अब्रू वाचवण्यापेक्षा मोठी कमाई दुसरी नाही. माझ्या मृत्यूनंतर माझ्या चितेवर फुले चढवू नका. त्या पैशातून एखाद्या गरजू मुलाची शाळेची फी भरा. माझा मोहन त्याच्या हसण्यात पुन्हा जिवंत होईल.

— गणपत. “

संपूर्ण गाव ढसाढसा रडू लागलं. सकाळी ज्यांच्या अर्थीला चार खांदे मिळत नव्हते… त्या गणपत काकांच्या अंत्ययात्रेला संपूर्ण गाव खांदा द्यायला उभं राहिलं.

कोणी म्हणालं, “पहिला खांदा मी देणार. “

दुसरा म्हणाला, “नाही… आधी मी. “

शेवटी गावातील ज्येष्ठ म्हणाले, “आज गणपतला चार नव्हे… संपूर्ण गाव खांदा देईल. “

आणि खरंच… श्मशानापर्यंत प्रत्येकाने एकदा तरी त्या अर्थीला खांदा दिला.

तेराव्याच्या दिवशी ग्रामपंचायतीने चौकात एक नवी पेटी ठेवली. त्यावर लिहिलं होतं— “गणपत मदत पेटी. खाली एक छोटी ओळ- “ज्या दिवशी कुणाची मदत कराल… त्या दिवशी त्यावर तुमचं नाव लिहू नका. “

आजही म्हणतात… त्या पेटीत दर महिन्याला कुणीतरी गुपचुप पैसे टाकून जातं. कोण टाकतं, हे कुणालाच माहीत नाही.

कदाचित…

गणपत काकांची खरी संपत्ती त्यांचे पैसे नव्हते… तर त्यांचं चारित्र्य होतं. आणि चारित्र्याचं खरं वैशिष्ट्य असंच असतं- 

माणूस निघून जातो… पण त्याची माणुसकी लोकांच्या हृदयात कायम जिवंत राहते.

*माणुसकी हेच जीवनसत्य… * 

**

लेखक : अज्ञात.

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मदर्स’ डे… ☆ स्वप्ना मुळे (मायी) ☆

स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ मदर्स’ डे… ☆ स्वप्ना मुळे (मायी)

“गप्प बैस ग काय कटकट लावली आहेस सकाळपासून, इथे आधीच टेन्शन कमी आहे का,..? तुला जी भाजी वाटते ती कर… मी काही म्हणणार नाही…” तो खेकसला तिच्यावर तशी आवंढा गिळून बळच हसु चेहऱ्यावर आणत ती स्वयंपाक घरात आली… “चालेल त्यांना भोपळ्याची भाजी..” असं कापऱ्या आवाजात म्हणाली.

सासुबाईला बाहेरचा त्याचा कडाडणारा आवाज ऐकू आलाच होता. त्याचा चहा घेऊन त्याच बाहेर गेल्या. त्याच्या जवळ बसत म्हणाल्या, “सध्याच्या परिस्थितीमुळे आर्थिक ताण आहेत ह्याची तिलाही जाणीव आहे, म्हणून तर गेल्या दोन महिन्यात तुला रुपया न मागता स्वतःच्या भिशीचे पैसे ती घरात वापरतीये. पैठणी भिशीतून तरी घेऊ म्हणत अगदी रंग देखील ठरवला होता तिने, पण तुझ्यावरचं आर्थिक संकट बघुन माघार घेतली, तो पैसा घरात वापरला. तिची छोटीशी सन्मानाची नोकरी ह्या कोरोनाने गेली, नाहितर हातभार लावतच होती ना ती संसाराला.. आणि अगदी रस्त्यावर, उघड्यावर येण्यासारखी परिस्थिती नाही झाली ए आपली… हम्म, सगळे शानशोक बंद झाले पण ते तसे अन्न, वस्त्र,निवारा ह्या तीन गरजांव्यतिरिक्त होते… मग आहे त्यात समाधान मानायचं सोडून चिडचिड करून जगण्यातली मजा का घालवतोस रे….?” म्हणत आई जरा रागावली त्याला.. 

तितक्यात राजुचा फोन वाजला. तो उठून बाल्कनीत गेला. मिस कॉलच होता तो. आता त्याला कॉलबॅक करणं आवश्यक होतं, कारण बांधकामाच्या साईटवरचा तो अगदी खास माणुस होता. पण गेल्या दोन महिन्यापूर्वी एका साईटवर काम करताना हॅण्डग्रँडर हातातुन निसटून पूर्ण गुढघ्याला वळसा घालून गेलं होतं. रक्ताची कारंजी उडाली होती, आणि राजू त्यादिवसापासून कामावर नव्हता… बायकोने फतवाच काढला होता.. लंगडत, धडपडत कामावर जायचं नाही, तर पूर्ण बरं वाटेल तेंव्हाच जायचं.. त्यामुळे ह्या दोन महिन्यांत भेट नव्हती… त्याची खरंतर फार गरज होती कामावर, खुप विश्वासू होता.. बहुतेक हा कामावर येईल आता म्हणूनच फोन असेल.. असा विचार करत त्याला कॉलबॅक केला, “हॅलो बोल राजू,.. येतोस कामावर आज??”

तिकडून आवाज आला..”सर कामावर दोन दिवसात येईल, पण आज मला थोडे पैसे पाहिजे.. उद्या मदर्स डे आहे.. पोरगा त्याच्या आईसाठी भेटकार्ड बनवत होता तेंव्हा मला कळलं. मला आईला साडी घ्यायची आहे. थोडे पैसे देता का,..?”

त्याचं वाक्य पुर्ण होण्याच्या आत हा हसायला लागला… “अरे राजा, तूझ डोकं आहे ना ठिकाण्यावर, अरे.. तुझी आई दोन वर्षांपूर्वी वारली ना, मग कोणाला गिफ्ट घेतो तू,..?”

राजू तिकडून म्हणाला, “हसु नका साहेब, ह्या दोन महिन्यात माझी बायको माझी आई झाली होती.. लहान लेकरासारखं तिनं माझं सगळं केलं… अगदी खाऊ सुद्धा घातलं.. तिनं पाच पाच घरं जास्त भांडे घासायची कामं घेतली… माझ्या कमाईची तिनं भरपाई केली… मला कुठलाही ताण घेऊ दिला नाही… आता मी पूर्ण बरा झालोय सर… आपल्या त्या साईटचं काम मीच पूर्ण करील, पण मला थोडे पैसे द्या.. बायकोला सेमी पैठणी घेऊन देतो.. पैठणी नाही पण सेमिपैठणी तरी घालायची आहे तिला, आणि खुप फोटो काढायचे स्वप्न आहे तिचं… मित्राचं घरगुती दुकान आहे, म्हणाला, ‘तू ये, देतो तुला..’ मला तीन हजार द्या सध्या… आपलं काम पन्नासच ठरलेलं आहे ना, मी नक्की करीन ते पूर्ण, आणि आईला नाही कधी साडी घेऊ शकलो पण आता ह्या बाईत गावलेल्या आईला तरी घेऊ द्या… साईटवर येऊ का पैसे घ्यायला..?”

गडबडत हा म्हणाला, “हो तासाभरात ये..” म्हणत याने फोन ठेवला.. आणि सहज बाल्कनीत नजर फिरवली… छोट्या छोट्या कुंड्यात, वाफ्यात बराच भाजीपाला लावलेला होता.. वेलाला दोडकी, कारली लटकत होती… कडीपत्ता हवेवर डोलत होता.. आपण एकदिवस ओरडलो होतो… ‘किती खर्च करता त्या भाजीपाल्यावर,..?’ त्याचं हे उत्तर होतं. त्याकडे आपलं लक्ष पण नाही, राजु सारखा माणुस तिची किती किंमत करतो आणि आपण हिला किती गृहीत धरतो… आई म्हणते तसं इतकीही आपली परिस्थिती बिकट नाही, फक्त मन बाहेरच्या परिस्थितीने गडबडलं आहे… आपण उगाच ह्या घरच्यांना धारेवर धरतोय…

तो विचार करत होता तेवढ्यात आईने हाक मारली… “डबा तयार आहे रे….”

निघताना तो हळूच आईला म्हणाला, “हिने भिशी कोणत्या रंगाच्या पैठणीसाठी लावली होती गं?… आणि तुझ्याकडे होती ना एक पैठणी..” 

आई म्हणाली, “अरे मला मेलीला आता ह्या कॉटन शिवाय काही सहनही होत नाही म्हणून तुझ्या ताईने पळवली ती तुझ्या लग्नाआधीच, नाहीतर हिला दिलीच असती की मी… आणि माझी जांभळी होती रे, तिला हिरवीगार पैठणी घ्यायची आहे… आता कधी योग येतो की बिचारीला,….?”

साईटवर राजु वाटच बघत होता… ह्याने पैसे दिले आणि म्हणाला, “राजा मलाही घेऊन चल ना त्या दुकानात… मलाही बघू दे साडी, आईला आणि बायकोला घेतो…”

सेमीपैठणीतून राजाने लाल रंग निवडला. ह्याने पण हिरवा रंग घेतला. आईला कॉटनची साडी घेतली. दुकानाबाहेर पडताना त्याने पाणावलेल्या डोळ्यांनी राजाचे आभार मानले, “आई तर आहेच माझी, पण बायकोतली आई शोधून दिलीस तू,..”

दुसऱ्या दिवशी दोघी सोफ्यावर बसवल्या.. औक्षण करून त्यांच्या डोक्यावर फुलं टाकत म्हणाला… “हॅप्पी मदर्स डे.. मला माहित आहे आई तुला हि पाश्चिमात्य पद्धत आवडत नाही, मनात प्रेम तर असतंच पण मला वाटतं प्रेम व्यक्त करायला ठरवलाय एखादा दिवस तर काय हरकत आहे ना, आणि तो हि आईसाठी आहे… सेलिब्रेशन घरात तर करतोय…” म्हणत त्याने साड्या दोघींसमोर धरल्या… 

तिला तर खूपच आवडला तो हिरवागार रंग… आईचे तर डोळे पाणावले, “अरे मला कशाला आणत बसला..?”

त्याने आईला जवळ घेतलं, “आई, सुनेसाठी मला समजवणारी ग्रेट आई आहेस तू,.. तुला तर पाहिजेच, आणि राणीसरकारची भिशी सगळा घराचा खर्च पेलतीये तर त्यासमोर तर हि छोटीशी भेट आहे… पण पुढच्या वेळी अगदी ओरिजनल पैठणी घेईल मी तिला.. आणि ते हि ‘मदर्स डे’ ला,.. कारण बघ ना, ती बायको असली तरी… मला मुलासारखं समजुन तर पटकन सावरून धरलंय तिने… आपले अहंकार बाजूला सारून जी बाई नवऱ्यावर प्रेम करू शकते ना आई ती त्याची बायकोतली आई असते…”

आईने त्याच्या डोक्यावर हात फिरवला… “अरे प्रत्येक स्त्री मध्येच हे आईपण असतं रे…”

तितक्यात राजुने व्हिडीओ कॉल केला. “साहेब तुमचे आभार. आमची आई एकदम खुश आहे बघा…”

ती कष्टाने रापलेली त्याची बायको त्या साडीत आनंदी दिसत होती… आईने तिचं फोनवर कौतुक केलं. नवऱ्याने आपला समाजात वाढवलेला सन्मान बघुन ती आणखीनच खुलली…

फोन ठेवला तर समोर ती पैठणी नेसुन आली. त्याला ती आताही आपल्या आईसारखी दिसली, अगदी शांत, समाधानी, आनंदी… गॅलरीत बहरलेल्या हिरव्यागार बागेसारखी .. .. 

© स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संस्थापक् संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हे देवा म्हाराजा…- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ हे देवा म्हाराजा…- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(त्याने मुलाला हाक मारली “झिला, हो धंदो काय चालणा नाय, इतक्या माणसाक दोन वेळा तोंडात घालूक व्हया कायतरी, काय तरी धंदो पाणी करूंक व्हयचं. तू असा कर, मी तुका भाजी घेऊन देताय, तुझ्याकडे होयत्त फुरफ़ुरा आसा, तेच्या पाठी भाजी बांध आणि सगळे बाजार कर. येताना मिरची, कोथिंबीर, टमाटे, आला आणलंस, की हय मी विकीन, तुजा काय मत ‘.

सतीश म्हणाला ” होय बाबानू, मी माज्या गाडयेर भाजी घेऊन जाईन, त्या पैशातून थोडी मिरची, कोथिंबीर आणीन बाकीचे पैसे परत तुमच्यकडे, परत भाजी घेऊक होई मा ‘.) 

इथून पुढे – – 

प्रभाकरने मनावर घेतलेच. गावात फिरून बाराशे रुपयाची भाजी खरेदी केली, सतीशने भाजी गाडीच्या मागच्या बाजूला बांधली आणि गाडीला किक मारून निघाला.

प्रभाकरला अंदाज होता अंदाजे सतराशे अठराशे रु यायला पाहिजेत. त्यातील दोनशे रु पेट्रोल खर्च वजा केले तरी चारशे रु फायदा. तीन चार बाजार केले तर आठवड्याला पंधराशे रु मिळायला हरकत नाही, म्हणजे माहिन्यला सहा हजार रु कमीतकमी. पुढे अजून भाजी खरेदी करू…

प्रभाकर पानपट्टी स्टॉलवार बसून झिलाची वाट पाहत होता.

चार वाजता मुलगा आला, गाडी घेऊन.

” काय भाजी खपली सगळी, मी म्हंटलाय ना, आमच्या गावच्या भाज्येक खुप मागणी आसा म्हणून, पैसे किती इले?

सतीशने खिशातून सहाशे रु काढून दिले.

“अरे इतकेच, बाकी भाजी रवली की काय ‘.

” नाय हो बाबानू, वासू गावलो, तो म्हणालो बिअर पिऊया, म्हणून चार बाटले बिअर पिलव, तेका आठशे रु सरले, तरी चकण्याचे पैसे वासून दिले ‘. ” म्हणजे भाजीच्या पैशाची दारू पिलात,?

” नाय हो बाबानू, बिअर म्हणजे दारू न्हय, काळ्या बाटलीतून गार पाणी असता, डोक्या हलक्या होता, तुमका एक बाटली हाडलंय, देव..

” अरे… च्या, भाजयचे पैसे सरवलंस तू, आणि वार सांगतंस, बिअर म्हणजे दारू न्हय, आता भाजी घेतलंय, तेंका काय देव मी ‘.

आणि प्रभाकर रडू लागला.

प्रभाकर परत चिंतेत पडला, संसार कसा चालवावा? पैसे कसे मिळवावे? कुठल्याही धंद्यात यश नाही त्यात मुलगा बेजबाबदार. त्याला कशाचे काही पडलेले नाही, व्यसनी झाला आहें, किती शिव्या घातल्या तरी निर्लज्ज. मोहिनी च्या लग्नाचे बघायला हवे म्हणून बायको डोके खाते आहें, भाऊ किरण आपल्यावर विसंबून, त्याची बायको मात्र मेहनती,. एवढ्या माणसांना शिजवायचे काय..

प्रभाकरला रात्र रात्र झोप येत नव्हती, एक दिवस सकाळी पाच वाजता कोणी दार ठोठवले म्हणून प्रभाकरने दार उघडले, तर वाडीतला गणू.

” काय रे, सकाळी सकाळी खय?

“अरे रात्री सादेव गेलो.

“अरे, मग माका कसा कळवलात नाय ‘. “रात झालेली, त्यात तुका हल्ली झोप नसता म्हणून म्हंटला पहाटे कळविया ‘. बरा बरा, मी येतय ‘

प्रभाकरने मुलाला हाक मारली आणि सहदेव गेला असे सांगून तू लाकडे तोडायला जा, असे सांगून तो खान्द्यावर टॉवेल टाकून सहदेवच्या घरी गेला.

सहदेवच्या घरी हळूहळू वाडीतील तसेच नातलगे जमा होऊ लागली होती, प्रभाकर घरात गेला आणि त्याने सहदेवच्या मुलांना जवळ घेतले, त्यांना शांत केले आणि तो सहदेवच्या प्रेतापाशी येऊन बसला.

त्याच्या मनात आले, सहदेवच्या अंगात यायचे, त्याच्यामुळे माणसे यायची, मी गाऱ्हाने घालायचो आणि त्याने अंग सोडल की त्याला त्याला पकडून शांत करायचो, त्यामुळे आपल्याला दोन पैसे मिळायचे आणि लोक येऊन नमस्कार पण करायचे. आता सहदेव पण गेला. वार बंद, म्हणजे वाऱ्याला येणारी माणसे बंद म्हणजे आपली कमाई (तशी ती चार महिने बंदच होती) पण आता कायमची बंद.

म्हणजे ही कमाई यापुढे नाही. काही तरी करायला हवे.

स्मशानात पण वाडीतल्या लोकांची आणि गाववाल्यांची हीच चर्चा आणि काळजी

“सादेव गेलो आता देवा धर्माचा कसा होतला? सगळ्यांच्या अडी अडचणीक सादेव होतो म्हणजे सदेवाच्या अंगातलो देव होतो. सदेवाच्या मुखातून देव अडी अडचणी दूर करी, आता पुढे काय?

सहदेव ला पोचवून प्रभाकर आणि त्याचा मुलगा सतीश घरी आले, प्रभाकरला वाटतं होत, पुढे फक्त अंधार आहें, आता हा अंधारातून वाट कशी मिळणार? सहदेवची जागा मोकळी झाली आहें, देव आणि भक्त या मधील जागा मोकळी आहें, कोण भरून काढणार ही पोकळी?

विचार करता करता प्रभाकरला आयडिया सुचली. ही कल्पना आधी का नाही सुचली, असे त्याला वाटले, तो मनोमन खूष झाला, असे झाले तर सगळ्या विवंचना सुटणार होत्या.

सादेव चें सुतक होते तो पर्यत तो गप्प बसला. सुतक संपल्याबरोबर त्याने मुलाला बोलावले, आजूबाजूला कोणी नाही असे पाहून हळू आवाजात तो बोलू लागला

” झिला, आता सादेव गेलो, आमच्या देवाचा वारा त्याचार येय, आता आमी पोरके झालाव, पण सदेवा नंतर कोणाच्या अंगात देवाचा वारा येऊक व्हया सांग?

“कोणाच्या बाबानू…

“अरे माज्या ‘

तुमच्या?

अरे सदेवाच्या वाऱ्याक गाऱ्हाणं कोण घाली सांग?

तुमी बाबानू..

तेना वारा सोडला काय सदेवक कोण पाठसून धरी?

तुमी बाबानू..

मग सदेवा नंतर कोणाच्या अंगात वारा येतला सांग?

तुमच्या बाबानू… पण देव तुमच्या अंगात येत?

“अरे नाय इलो तर तेका हाडूचो लागतलो?

” खायसून हडतलात?

“ता मी काय ता बघताय, तू एक काम कर, देवाचा गाऱ्हाणं मी घाली ता पाठ कर आणि मी वारा सोडलंय काय मागसून माका घट्ट पकड आणि जमिनीवर झोपऊन शांत कर ‘

” होय बाबानू ‘

“आणि हय कोंनांक सांगायचं नाय, सांगाल्स तर तुझी चामडी सोलीन ‘

” होय, अरे हो बिन पैशाचो धंदो आसा, माझ्यानंतर तुका गावातलो.

“होय बाबानू ‘

मग माज्या मागे म्हण आणि वारा येताना हय गाऱ्हाणं घाल

“हें देवा म्हराजा.. बारा गावच्या, बारा राठीच्या…

प्रभाकरचा मुलगा दोन दिवसात मस्त गाऱ्हाने घालू लागला. मग प्रभाकरने त्याला अंग सोडले की आपल्याला मागून कसे पकडायचे हें शिकवले.

माघी पंचमीला देवाची जत्रा, दरवर्षी लांबून लांबून या जत्रेला माणसे येत, माहेर वशिणी आपल्या मुलांना देवाच्या पाया खाली घालायला येत, चाकरमानी मुद्दाम मुला बाळांना घेऊन येत, यंदा तसे लोक आले, जत्रा भरली

कोकणातील जत्रा, लहान मोठी दुकानें आली, खाजे, बत्तीशी वाले आले, चहा भजी वाले होते. फ़ुगेवले, आईस फ्रूट वाले आले. माणसे येत होती, देवाला नारळ ठेवत होती, राऊळ गाऱ्हाने घालत होता.

पण लोकांमध्ये उत्साह नव्हता कारण सादेव च्या अंगातील वारे या वर्षी नव्हते. लोक लांबून लांबून त्या करिता येत होती.

देवाचे मानकरी गप्प बसून होते, या वर्षी देवाचे वारे नाही, म्हणजे मजा नाही, नुसती जत्रा कसली, असल्या जत्रा गावात अनेक ठिकाणी होतात, पण सदेवाच्या अंगातील वारे…

सगळे मानकरी बसले होते, त्या ठिकाणी प्रभाकर आला आणि ज्येष्ठ मानकऱ्यांना म्हणाला

‘अन्नानू, ढोल वाजूवून बघूया, सादेव नंतर कोणाच्या अंगात देव येता काय?

देव तसो आपणाक निराधार करुचो नाय,खायतरी आपली कुड ठेऊन जातलो ‘

अण्णांनी परवानगी दिली आणि ढोल वाजू लागले.

“ढुंम ढुंम ढुंम, ढुंम ढुंम ढुंम…

त्या बरोबर प्रभाकरचा मुलगा गाऱ्हाने घालू लागला..

देवा म्हराजा… बारा गावाच्या…

त्या क्षणी सू… सू.. करत प्रभाकर मान हलवत देवा समोर येऊन घुमू लागला. त्या बरोबर सगळे मानकरी जागा सोडून सरसवले आणि एकच गल्ला सुरु झाला

,”वारा इला, वारा इला, प्रभ्याच्या अंगात देव इलो ‘

बाहेर जत्रेत ही बातमी पसरली आणि जत्रा सोडून लोक देवळात धावली. मग मानकरी देवाची खात्री करू लागले आणि प्रभाकरच्या वाऱ्याला प्रश्न विचारू लागले.

अर्थात देवाने बरोबर उत्तरे दिली आणि मानकऱ्यांनी मान हालवली त्या बरोबर लोकांनी जल्लोष केला आणि जत्रेला उत्साह आला.

मग दर सोमवारी, गुरुवारी माणसे जमू लागली, प्रभाकरचा मुलगा गाऱ्हाने घालू लागला, मग प्रभाकर घुमू लागला, लोक पाचशे, सातशे रु ठेऊ लागली आणि सतीशला शम्बर दोनशे रु देऊ लागली. त्याची तो बिअर आणून पिऊ लागला.

प्रभाकरची परिस्थिती सुधारली, रंगीत टी व्ही आला, फ्रीझ आला, मुलाकडे मोटर सायकल आली, मुलीचे धडक्यात लग्न झाले, घर बांधण्यासाठी एका भक्ताने चिरे पाठवले, एकाने सळी पाठवली, दुसर्याने लोखंड, कोणी सिमेंट…

आता प्रभाकर मजेत आहें. त्याला पंचक्रोशीत मान आहें, त्याच्याकडे आमदार खासदार सुद्धा अडचणी मिटवायला येतात.

रोज संध्याकाळी प्रभाकर घरी असतो, तेंव्हा त्याचा पोरगा फ्रीझ मधून गार बिअर काढून ग्लासात ओतून त्याच्या हातात देतो आणि त्याला म्हणतो

” बाबानू, बिअर घेवा, बिअर म्हणजे दारू न्हय, दारू वाईट, बिअर घेतला की टेन्शन कमी होता ‘.

आणि प्रभाकर त्याच्या हातातील बिअरचा ग्लास ओठाला लावतो.

समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares