मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या प्रिय भारतियांनो… 🇮🇳 ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

??

☆ माझ्या प्रिय भारतियांनो… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

मु. पो.- ६८⁰ द. अक्षांश

दक्षिण ध्रुव, चंद्र 

उपग्रह – चंद्र

ग्रह – पृथ्वी

दि. २३ ऑगस्ट २०२३

माझ्या प्रिय भारतीयांनो, 

सर्वांना माझा स. न. वि. वि.

मी इकडे चांदोमामाच्या घरी सुखरूप पोहोचलो. काळजी नसावी. संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारी आजची चंद्रमोहीम फत्ते केली न् भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. अगदी भारावून गेलोय मी! तब्बल ४० दिवसांचा अथक प्रवास…. लाख्खो किलोमीटरचा! तसं पाहिलं तर, मी खूप दमलोय…. पण तुम्ही सर्वजण माझी खुशाली जाणून घ्यायला उत्सुक असाल आणि काही चांगली गोष्ट झाल्यावर ती आपल्या माणसांना शेअर केली की, आनंद अजून वाढतो ना! म्हणून पोहोचल्याबरोब्बर हे पत्र लिहीत आहे. 

दि. १४ जुलैला अवघ्या भारतीयांच्या साक्षीने माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. उण्यापुऱ्या दीडशे कोटी शुभेच्छांचे गोड ओझं सोबतीला होतेच. हुरहूर, उत्सुकता, भीती आणि आपणां सर्वांच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा…. यामुळे थोडं दडपण आलं होतं खरं! त्याचबरोबर चांदोबाच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा पहिला मान ‘आपल्याला’ मिळणार म्हणून जाम खूष पण होतो !

पृथ्वीमातेपासून दूर जाताना पाय निघत नव्हता. थोडे दिवस तिच्याभोवतीच घुटमळत होतो खरा… पण दि.१ ऑगस्टला मनाचा हिय्या केला आणि चांदोबाच्या दिशेने कूच करायला सुरुवात केली. त्याच्याभोवती फिरत फिरत थोडा अंदाज घेतला. माझा दादा चंद्रयान-२ ने केलेल्या चुका (चुका नव्हे…. थोडा चुकीचा अंदाज) टाळत हळूहळू चांदोबाच्या जवळ जाऊ लागलो. आणि आश्चर्य…. चांदोबाच्या अगदी जवळ गेल्यावर तिथे दादानं, चंद्रयान-२ ने ‘welcome buddy’ म्हणत त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. दादाने केलेल्या स्वागतनं मला अजूनच स्फूरण चढलं. योग्य अशी जागा शोधून soft landing करत अलगदपणे चांदोबाजवळ गेलो. अगदी प्रेमभरानं स्वागत केलं त्याने माझं! इतका लांबचा प्रवास हिरीरीने पार पाडल्याबद्दल जवळ घेऊन कौतुकानं माझी पाठ थोपटली. त्यामुळे माझं मन अगदी भरून आलं. आत्ता तिथे पृथ्वीवर तुम्ही सर्वजण माझ्या यशस्वी landing चा सोहळा ‘ Yesssssssss, we have done it ‘ म्हणत जल्लोष करताहात. हळूच डोळ्यांच्या कडांचं पाणी टिपत एकमेकांना wish करता आहात. हे मी इतकं लांबवर असूनही अनुभवतोय. कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न मी पूर्ण केलंय, याचं मला खूप खूप अभिमान वाटतोय. आपला भारत- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश ! एकदम भारी वाटतंय बुवा! भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेलाय, हे नक्की…. अर्थात यामागे आपल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांंचे अपार कष्ट आहेत आणि तुमच्या सदिच्छाही ! 

आणि अरे हो ! रशियाचे चंद्रयान Luna-25 फक्त १० दिवसच प्रवास करुन चंद्रावर पोहोचणार होतं…. तेही माझ्यानंतर निघून माझ्याआधी ! पण उतरताना त्याचं क्रॅश लॅंडिंग झालं. So sorry ! मग माझा ४० दिवसांचा प्रवास ससा-कासवाच्या गोष्टीसारखा ’ slow but steady wins the race ‘ प्रमाणे झालाय; असंच म्हणायला हवं, नाही का ?

असो…. आता थोडा फ्रेश होऊन लगेचच कामाला सुरुवात करणार आहे. फक्त १४ दिवसांच्या कालावधीत करायच्या कामांची भली मोठ्ठी यादी आहे. विक्रम व प्रज्ञान यांच्या मदतीने प्रयोग, अभ्यास, निरीक्षणेही करायची आहेत. इथं पाणी आहे का? हे पहायचं आहे. विविध नमुने गोळा करायचे आहेत. जमलं तर चंद्रयान-२दादाला भेटणार आहे मी. अर्थात इथे घडणारी प्रत्येक गोष्ट मी वेळोवेळी पृथ्वीवर कळवत राहणार आहे. एक गंमत सांगू? इथं गुरुत्वाकर्षण फारच कमी आहे. त्यामुळे अगदी तरंगत तरंगतच चालल्यासारखं वाटतं इथे ! मज्जाच मज्जा वाटतीय….

फावल्या वेळात चांदोबाशी गप्पा मारायच्या आहेत. ‘ तू एक उपग्रह नाही, आमचा नातलग आहेस. बालगोपाळांचा चांदोमामा आहेस. ते ‘चांदोमामा, चांदोमामा भागलास का?’ म्हणतच जेवतात. अंगाईगीतात तू आहेस. आमची आई तुला भाऊ मानते. तुला पाहिल्यानंतरच आमचा संकष्टी चतुर्थीचा उपवास सुटतो. तुझ्या वाटचालीनुसार भारतीय महिन्याची तिथी, सणवार साजरे होतात. युवतींच्या सुंदर चेहऱ्याला तुझी उपमा देतात( ते कितपत योग्य? इथं आल्यावर मला ते सत्य कळ्ळलं बरं) प्रेमीजन तुझीच साक्ष ठेवून आणाभाका घेतात. अनेक गाण्यांतही तू गुंफला आहेस….’ अशा खूप खूप गोष्टी त्याला सांगणार आहे. 

फारसं लिहीत नाही. बाकीचं नंतर सविस्तरपणे लिहीन. कामासंदर्भातील माहिती व फोटो  updates पाठवत जाईन ! एक सांगू….. हे पत्र लिहिताना माझ्या अंगावर कितीतरी वेळा रोमांच उभे राहिलेत आणि पत्र वाचताना तुमच्याही अंगावर उभे राहणार, हे नक्की ! 

पुन्हा एकदा …. I am proud to be an Indian! 🇮🇳

कळावे,

आपल्या सर्वांचा लाडका,

चांद्रयान -३

पत्ता – 

मु. पो. – प्रत्येक भारतीयाचे हृदय

देश –  भारत

खंड – आशिया

ठळक खूण – कर्क वृत्त 

(हिंदी महासागराजवळ)

ग्रह – पृथ्वी (सूर्यमालेतील तिसरा ग्रह)

मंदाकिनी – आकाशगंगा

लेखक : अज्ञात. 

प्रस्तुती –  सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फूल उमलताना…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “फूल उमलताना” ☆ सौ राधिका भांडारकर 

मी एक गोष्ट सांगते तुम्हाला.

दोन शेजारी होते.  एक निवृत्त शिक्षक आणि दुसरा तरुण बँकर.  एक दिवस ते दोघं एका नर्सरी मधून काही झाडांची रोपे आणतात.  ती रोपे आपापल्या अंगणात लावतात. निवृत्त शिक्षक रोपांना अधून मधून पाणी घालत असत. रोपांची जेवढी घ्यायची तेवढी काळजी ते घेत असत. तरुण बँकर मात्र रोपांना रोज रोज भरपूर पाणी घालत असे. त्यामुळे त्याची रोपे अधिक हिरवीगार आणि टवटवीत असत.  निवृत्त शिक्षकाचीही रोपे वाढतच होती मात्र दर्शनी पाहता बँकरची रोपे अधिक आकर्षक भासत होती.

एकदा काय झालं अचानक तुफान आलं आणि त्या तुफानात बँकरची वाढलेली हिरवीगार रोपं उन्मळून गेली. मात्र निवृत्त शिक्षकाची रोपे तुफानाचा सामना करत ताठ उभी होती.

“हे कसं?”

बँकरला  प्रश्नच पडला.

” मी तर माझ्या झाडांना रोज पाणी घालत होतो.  किती काळजी घेत होतो! “

त्यावेळी शिक्षक त्याला म्हणाले ,”अति पाणी घातल्याने, अति काळजी घेतल्याने तुझी रोपे बाह्यांगी वाढली पण त्यांच्या मुळांना काहीच ताण न मिळाल्यामुळे ती जमिनीत खोलवर पाण्याच्या शोधात पसरलीच नाहीत.  म्हणून तुफान आल्यावर अशी उन्मळून पडली.  याउलट माझी झाडे स्वयंपूर्ण बनली.  जास्त पाणी न मिळाल्यामुळे जमिनीत त्यांची मुळं पाण्याच्या शोधात खोलवर रुजत गेली आणि जमीन पकडून राहिली.”

मुलांचे व्यक्तिमत्व घडवताना नेमकं हेच घडतं.  त्यांना जे हवं ते, जेव्हां हवं तेव्हां मिळत गेलं,  त्यांचे प्रत्येक हट्ट लाडा कौतुकाने किंवा अतिरिक्त भावनेने पूर्ण होत गेले तर मुलं स्वयंपूर्ण, स्वावलंबी बनू शकत नाहीत.  त्यांच्यात  स्वतः काही मिळवण्याची जिद्दच निर्माण होऊ शकत नाही किंवा मिळवण्यासाठी स्वतः काही धडपड करण्याची त्यांची इच्छा, क्षमताच खुंटून जाते आणि अशा वातावरणात वाढल्याचे पडसाद पुढच्या आयुष्यात गंभीरपणे उमटू शकतात.  प्रचंड नैराश्य, उदासीनता, अकार्यक्षमता, कधीकधी गुन्हेगारी वृत्ती, व्यसनाधीनतेला ही मुलं बळी पडू शकतात.  त्यामुळे मुलांना घडवताना पालकांनी आपली मुले जबाबदार कशी होतील याचा प्रथम विचार करायला हवा.  जबाबदारी आली की स्वातंत्र्य येते आणि आत्मविश्वास बळावतो. 

मुलांचं व्यक्तिमत्व घडवणं ही खूप संवेदनशील बाब आहे. प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि प्रत्येक पालकाला वाटत असतं की आपलं मूल सर्वगुणसंपन्न असलं पाहिजे,  जगातलं जे जे बेस्ट ते त्याला मी मिळवून देईन पण त्याला “द बेस्ट चाइल्ड” चा पुरस्कार हा मिळालाच पाहिजे.  कधी कधी तर मुलांच्या यशात आई-वडील आपलंच स्टेटस शोधत असतात आणि अगदी लहानपणीच एक स्पर्धात्मक व्हायरस त्यांच्या जडणघडणीच्या काळात तेच ढकलतात.  सुरुवातीला जरी चित्र देखणं वाटत असलं तरी काळा बरोबर हळूहळू त्याचे रंग उडू लागतात.  त्यातूनच एक तर न्यूनगंड निर्माण होऊ शकतो किंवा विद्रोहाची भावनाही उफाळून येऊ शकते.  पण याची जाणीव जेव्हां होते तेव्हां  खूप उशीर झालेला असतो.

डॉक्टर गेनोट हे उत्तम बालमानसशास्त्रज्ञ.  त्यांनी एक संकल्पना मांडली. 

व्हॉइस आणि चॉईस

मुलांना बोलू द्या, त्यांना निवडीचा हक्क द्या, त्यांना काय हवंय हे सांगण्याचे स्वातंत्र्य  द्या.  म्हणजेच एकीकडे मुलांना शिस्त लावताना,वळण लावतानाच मुलांशी संवाद कसा होईल याची दखल घेणे हे जरुरीचं आहे.  ज्या घरात मुलांशी संवाद असतो, ज्या घरातली मुलं आपली मतं मांडू शकतात… ती अधिक धीट, धाडसी आणि आत्मनिर्भर होतात.  एक गोष्ट कधीही विसरू नये की लहान मुलालाही स्वतःचं असं मत असतं.  अगदी दोन महिन्याचं मूल ज्याला बोलून व्यक्त होता येत नाही ते रडून, गोंधळ घालून आपल्या मनासारखं करून घेतच की नाही?  प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याची ही पहिली पायरी असते.

पहिलं  मूल घडवताना तर  आई-वडिलांची खरोखरच तारांबळ उडते कारण तेही प्रथमच पालक झालेले असतात.  त्यामुळे त्यांच्या पालकत्वात कुठेतरी त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांचं बालपण आणि त्यातून सकारात्मक किंवा नकारात्मक विचारांची एक भूमिका दडलेली असते. शिवाय बदलत्या काळानुसार आजूबाजूच्या जगाबरोबर मुलाला वाढवताना मनात खूप गोंधळ उडालेला असतो. पुस्तकी ज्ञानाचाही प्रभाव पडलेला असतो आणि कधी कधी आपलंच मुल आपणच ओळखण्यात कमी पडू शकतो.

मला आजही आठवतं, माझी मुलगी पाच सहा वर्षाचीच असेल.  मी तिला काहीतरी करायला सांगितलं. थोडक्यात एक जॉब दिला मी तिला. ती नाही म्हणाली नाही. पण थोड्यावेळाने माझ्यासमोर दोन्ही हात सरळ करून ताठ उभी राहिली आणि म्हणाली,

” मम्मी चिमणीला पोहता येईल  कधी ?आणि बदक हवेत उडू शकेल का?”

बापरे!  प्रचंड हादरले होते मी तेव्हां. या एवढ्याशा मुलीत हा विचार आला कुठून?  मग मी माझी थिअरी बदलली. मी बेसावध राहिले नाही किंवा तिच्या बाबतीतला सावधपणा सोडला नाही पण तिच्या इवल्या इवल्या मतांनाही मान देत राहिले आणि तिच्याशी संवाद साधत, सांभाळत, काय बरोबर, काय चूक, काय चांगलं, काय वाईट हे यथाशक्ती दाखवत राहिले.

मुलं अत्यंत संवेदनशील असतात तसेच अनुकरणप्रिय असतात थोडक्यात कॉपीबहाद्दर असतात.  त्यामुळे पालकांच्या वागण्याचा, बोलण्याचा नकळत प्रभाव त्यांच्या मनावर पडत असतो. शिवाय मुलं निष्पाप असतात. जेव्हां ती काही बोलतात तेव्हा त्यात उद्धटपणा नसतो तर ते फक्त व्यक्त होणं असतं आणि त्यात पालकाच्या वागण्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं.  ज्यावेळी पालक मुलांना सांगतात “तू हे करू नकोस, हे वाईट आहे. किंवा ही काय भाषा तुझी? कुठून शिकलास?”

अशावेळी एखादं मूल झटकन उत्तर देत.,” तू नाही का त्या दिवशी बोलताना असं म्हणालीस.” अशावेळी पालक निरुत्तरच होतात.  म्हणून अशी वेळच येऊ नये याचा पालकांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. अशावेळी स्वत:च्या काही सवयी बदलणं गरजेचं असतं.

संस्कार हा ही असाच एक गहन विषय आहे.

“ये रे बाबा मी तुझ्यावर आता संस्कार करते” असा “तुला जेवण वाढते” सदरातील हा विषय नाही. संस्कार हे नकळत घडत असतात आणि ते घडवण्यासाठीचे वातावरण कसे आहे त्यावर त्यांचे चांगलेपण अथवा  वाईटपण अवलंबून असते. 

आणखी एक मुद्दा म्हणजे मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्यांना सतत काहीतरी करायचं असतं. त्यांच्या डोक्यात सतत प्रश्न असतात. प्रचंड औत्सुक्य असतं आणि प्रत्येक बाबतीतले  असंख्य “का” त्यांच्या प्रवाहात वहात असतात आणि त्यांची उत्तर ते शोधत असतात. अशावेळी,

” तुला नाही कळणार”

किंवा,

“हे करू नकोस”

” अजून तू लहान आहेस”

” याला हात लावू नकोस”

“मोडून ठेवशील”

“अरे पडशील ना..?”

” किती पसारा रे तुझा?”

” आणि हे काय? अशा भिंतीवर रेघोट्या मारून ठेवल्यात.तुला कितीदा सांगायचं?”

ही सारी बोलण्यातली नकारात्मकता आहे आणि ती त्यांच्या ऊर्जेचं खच्चीकरण करत असते.

तुम्हाला एक गंमत सांगते .

माझे पती आर्किटेक्ट आहेत.  बऱ्याच वर्षांपूर्वी एका तरुण जोडप्याच्या बंगल्याचं त्यांनी स्केच केलं.  ते तरुण जोडपं ऑफिसात  आलेलं असताना माझ्या पतींनी, केलेलं ते स्केच त्यांना दाखवलं.  त्यांच्या पसंतीसही उतरलं पण त्यांच्याबरोबर त्यांची छोटी पिंकी ही होती. ती माझ्या पतींना धिटुकलेपणाने म्हणाली,” काका आमच्या या बंगल्यात ना एक पसारा खोली पण करा माझ्यासाठी. आणि अशी एक भिंत ठेवा की जी फक्त माझी असेल आणि मी त्याच्यावर कशापण रंगरेघोट्या काढेन”       .

तिच्या या बोलण्यावर त्यावेळी आम्ही सगळे खळखळून हसलो होतो.  पण मामला गंभीर होता, डोळ्यात अंजन घालणारा होता याचीही जाणीव  झाली होती.पालकांच्या नकारात्मकतेला दणका देणारी होती.

पण काहींचे पालकत्व मात्र  खरोखरच लक्षवेधी असते. अरुण दाते, सुप्रसिद्ध गायक.  कुठल्यातरी एका शालेय परीक्षेत ते अगदी शेवटच्या नंबरावर होते. जवळजवळ नापासच होते म्हणाना.  घरी येऊन प्रगती पुस्तक कसे दाखवावे ही चिंता त्यांच्या बालमनाला कुरतडत होती.  रामू भैया —अरुण दाते यांचे वडील— त्यांनी ते ओळखले आणि ते आपल्या मुलाला म्हणाले, “अरे पण तुझ्यासारखं कुणाला गाता येतं का?  तिथे तर तुझाच पहिला नंबर आहे ना ?”

या दोन वाक्यांमुळे अरुण दाते सारखा एक महान गायक घडला.

आज हा लेख लिहिताना, मागे वळून पाहताना, माझ्या गतकाळातल्या पालकत्वाला निरखत असताना माझ्या कडून पालकत्वाच्या झालेल्या काही चुका मला खूप वेळा भेडसावतात आणि गंमत म्हणजे आई म्हणून माझ्या हातून झालेल्या चुकांची भरपाई नातवंडांच्या बाबतीत करताना माझी मुलगी मला म्हणते,” थांब ग आई!  तू आमच्यात आत्ता पडू नकोस. तू ही  तर आम्हाला अशीच रागवायचीस ना?”

तेव्हा जाणवतं पालकत्व हा अव्याहत वाहणारा विषय आहे.  काळाप्रमाणे बदलणारा आणि शिकवणाराही आहे.शिवाय तो एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाणारा प्रवास आहे.एक सूक्ष्म लिंक असते त्यांच्यात. त्यात नेमकं असं काहीही नाही.  कारण प्रत्येक मूल वेगळं असतं आणि प्रत्येक सुजाण पालकत्वाच्या व्याख्याही  निराळ्या असतात.

फूल उमलताना कुणी पाहिलं आहे का? पण जमिनीतल्या मुळांशी त्याच्या उमलण्याचं नातं असतं.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परातभर लाह्या… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ परातभर लाह्या… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

” परातभर लाह्या त्यात  बंदा रूपया” असं कोडं सासूबाई माझ्या मुलीला घालत असत आणि मग त्याचे उत्तर त्याच देत असत, “आकाशभर चांदण्या, मध्ये असलेला चांदोबा!”

मनाच्या कढईत या आठवणींच्या लाह्या फुटायला लागल्या की त्या इतक्या भरभरून बुट्टीत जमा होतात की ती बुट्टी कधी भरून ओसंडून वाहू लागते ते कळतच नाही!”

नागपंचमी जवळ आली की आमच्या घरी लाह्या ,तंबिटाचे लाडू,मातीचे नागोबा तयार करणे, या सगळ्या गोष्टी सुरू होत असत ! त्यामुळे पंचमीच्या लाह्या म्हटल्या की मला सासूबाई डोळ्यासमोर येतात. आपुलकीने, उत्साहाने सर्वांसाठी लाह्या घरी करणाऱ्या ! सांगली- मिरजेकडे घरी लाह्या करण्याचे प्रमाण बरेच होते. आषाढी पौर्णिमा झाली की लाह्या करण्याचे वेध आईंना लागत असत !

सांगलीत असताना आमच्या घरी लाह्या बनवणे हा एक खास सोहळा असे. शनिवारच्या बाजारातून खास लाह्यांची यलगर ज्वारी मी आणत  असे. ती ज्वारी आणली की मग लाह्या केव्हा करायच्या तो वार ठरवून आई तयारीला लागत. त्यासाठी मोठी लोखंडाची पाटी बाईकडून घासून घ्यायची. ज्या दिवशी लाह्या करायच्या, त्याच्या आदल्या दिवशी रात्री चाळणीत ज्वारी  घेऊन त्यावर भ रपूर गरम पाणी ओतले जाई. याला ‘उमलं घालणं ‘ असं म्हणतात. ते पाणी निथळले की त्यावर पंचा किंवा सुती पातळ दाबून ठेवत असत  ! हे सर्व त्यांच्या पद्धतीने चालू असे. सकाळी उठून ती ज्वारी जरा कोरडी होण्यासाठी पसरून ठेवायची. लाह्या फोडायच्या म्हणून चहा, आंघोळ वगैरे कामे लवकर आटपून त्या तयारी करत असत !

गॅसच्या शेगडीवर मोठी लोखंडी पाटी ठेवली जाई. एका रवीला कापड गुंडाळून त्याचे ढवळणे केले जाई. तसेच लोखंडी पाटीवर टाकण्यासाठी एक कापड घेतलेले असे. शेजारीच एक बांबूच्या पट्ट्यांची टोपली (शिपतर) लाह्या टाकण्यासाठी ठेवले जाई. एवढा सगळा जामानिमा  झाला की आई लाह्या फोडायला बसत. लोखंडी पाटी चांगली तापली की, चार ज्वारीचे दाणे टाकून ते फुटतात की नाही हे बघायचे आणि मग मूठभर ज्वारी टाकून लाह्या फोडायला सुरुवात करायची ! मुठभर ज्वारी टाकून रवीने जरा ढवळले की ताडताड लाह्या फुटायला सुरुवात होई आणि त्या बाहेर पडू नयेत म्हणून त्यावर छोटे फडके टाकले जाई. त्या लाह्यांचा  फटाफट आवाज येऊ लागला की माझ्या मुलांना आनंदाच्या उकळ्या फुटत ! घरभर लाह्यांचा खमंग वास दरवळत असे. एक किलो ज्वारीत साधारणपणे मोठा पत्र्याचा डबा भरून लाह्या होत असत ! मग काय आनंदी आनंदच ! लाह्या सुपामध्ये चांगल्या घोळून घ्यायच्या. खाली राहणारे गणंग वेगळे काढायचे. लाह्या गरम असताना मिक्सरवर लाह्यांचे पीठ करायचे. तरी बरं आमच्या घरी ‘जाते’ नव्हते, नाहीतर माझ्या आजोळी लाह्यांचे पीठ लगेच जात्यावर काढले जाई !

मग सासुबाई दिव्याच्या अवसेला समयीसाठी आणि नागपंचमीच्या नागाच्या पूजेसाठी लाह्या वेगळ्या काढून ठेवत. मग तो मोठा लाह्यांचा डबा आमच्या ताब्यात येई. भरपूर शेंगदाणे घालून फोडणीच्या लाह्या, तर कधी तेल, मसाला, मीठ लावलेल्या लाह्या, आंब्याचे लोणचे लावून लाह्या, दुपारच्या खाण्यासाठी असत. त्या किलोभर ज्वारीच्या लाह्या खा ण्यात आमचे आठ पंधरा दिवस मजेत जायचे !

आता गेले ते दिवस ! अजून कदाचित सांगली मिरजेकडे हा लाह्या फोडण्याचा कार्यक्रम होत असेल, पण पुण्यात आल्यापासून गेली ती यलगर ज्वारी आणि त्या पांढऱ्या शुभ्र, चुरचुरीत खमंग लाह्या ! दुकानातून छोट्या पुडीतून लाह्या आणायच्या नैवेद्यासाठी । आत्ताच्या मुलांना मक्याचे पॉपकॉर्न आवडतात, पण आपले हे देशी पॉपकॉर्न फारसे आवडत नाहीत बहुतेक ! त्यामुळे लाह्या घरी कशा बनवतात तेही त्यांना माहित नाही ! असो ….  कालाय तस्मै नमः!!

श्रावणाचा सुरुवातीचा सण म्हणजे नागपंचमी ! त्यादिवशी नागोबाला लाह्यांचा  नैवेद्य दाखवतात .म्हणून या लाह्या फोडण्याचे महत्त्व ! निसर्गाशी जवळीक दाखवणाऱ्या आपल्या अनेक सणांपैकी नागपंचमी हा श्रावणातील पहिला सण ! सांगलीजवळ बत्तीसशिराळा येथे नागपंचमीला मोठी यात्रा असते. तिथे नाग, साप यांची मिरवणूकच काढली जाते. आम्ही पूर्वी बत्तीस शिराळा येथील नागपंचमीचा उत्सव पाहिला आहे .

श्रावणातील सणांची लगबग या दिवसापासून सुरू होते. झाडाला झोका बांधून मुली मोठमोठे झोके घेतात, फेर धरून गाणी म्हणतात. हाताला मेंदी लावतात, नवीन बांगड्या भरतात. माहेरवाशिणी नाग चवतीचा उपास करतात. चकल्या, करंज्या फराळाला बनवतात. ते दृश्य अजूनही डोळ्यासमोर उभे राहते. आत्ताही माझे मन त्या जुन्या आठवणींबरोबर श्रावणाची गाणी गात फेर धरू लागले आहे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लालयेत पंच वर्षांनी…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “लालयेत पंच वर्षांनी…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

लालयेत पंच वर्षांनी, दश वर्षांनी ताडयेत ।

प्राप्तेतु शोडषे वर्षे,  पुत्रं मित्रवदाचरैत ।।

…. असे एक संस्कृत वचन आहे.  मुलांचे पाच वर्षे लाड करावेत, दहा वर्षे धाकात ठेवावे आणि सोळाव्या वर्षानंतर मुलांशी मित्राप्रमाणे वागावे असा सरळ अर्थ…. मूल झाल्यावर पहिली पाच वर्षे लाडाची असतात. त्यावेळी मुलं हा आपला आनंद असतो.  लाडाच्या या पाच वर्षात आपण मुलांपासून मिळवलेला आनंद अवर्णनीय असतो व आपल्या आयुष्याला तो अर्थ प्राप्त करून देत असतो.  नंतरची दहा वर्षे मुलांवर संस्कार करायचे असतात.  अशावेळी मुले ही आपली जबाबदारी असते.  त्यांना जबाबदार समाजघटक बनवण्यासाठी सुसंस्कारित करणे व उत्तम नागरिक म्हणून तयार करणे ही पालक म्हणून आपली जबाबदारी असतेच असते. त्यासाठी त्यांना धाक दाखवून का होईना परंतू सुसंस्कारित करणे व पुढील आयुष्यासाठी त्यांचा पाया भक्कम करणे ही जबाबदारी असते.  

त्यानंतर मुले पालकांच्या ऐकण्याच्या पलिकडची असतात.  त्यामुळे त्यांच्याशी मित्रत्वाचे म्हणजेच सलोख्याचे संबंध प्रस्थापित केल्याशिवाय कौटुंबिक संबंध सुरळीत रहात नाहीत. जबाबदारीची दहा वर्षे संपल्यावर मुलांना त्यांच्या पायावर उभे राहून पुढील आयुष्याच्या वाटचालीत त्यांचे मित्र, साथीदार,  भागीदार या भूमिकेतून त्यांच्याशी वागून कौटुंबिक संतुलन टिकवणे हे आपल्या स्वतःच्या सुखा समाधानासाठी आवश्यक असते.  मुलांच्या एकूण जडणघडणीत व पालन पोषणात कुठेही गुंतवणूक हा विचार करणे ही गोष्टच मला चुकीची वाटते.  मुलेही म्हातारपणाची काठी वगैरे जुने विचार आजच्या काळाच्या संदर्भात योग्य आहेत की नाही याचा विचार निश्चितच आवश्यक ठरेल.

पूर्वीच्या पालकांच्या व आत्ताच्या पालकांच्या परिस्थितीत मनस्थितीत तसेच आजच्या सामाजिक परिस्थितीत खूपच फरक पडलेला आहे.  चिंतायुक्त पालक पूर्वीचेही होते व आजचेही आहेत.  परंतु त्यांच्या चिंतांमध्ये फरक आहे.  पूर्वी फक्त एकच माणूस कमावत असे.  त्याच्या कमाईमध्ये घरखर्च चालवणे ही तारेवरची कसरत असे.  आवश्यक गोष्टींसाठी उत्पन्नाची तोंडमिळवणी करताना नाकी नऊ येत असत. त्यामुळे चैनीच्या गोष्टी करणे अशक्यच असे. आजचे पालक त्यामानाने जास्त कमावतात. बहुतांश घरात आई वडील दोघेही कमावते असतात. स्वतःच्या सुखात फारशी तडजोड न करता त्यामध्ये मुलांचेही कोड कौतुक करणे, सर्व कुटुंबाने मिळून काही किमान चैनीच्या गोष्टी करणे सर्वमान्य झाले आहे. 

यामध्ये स्वतःच्या सुखाला मुरड घालून फक्त मुलांसाठीच काही करणारे पालक अपवादात्मकच.  त्यामुळे मुलांनी म्हातारपणाची काठी बनावी अशी अपेक्षा ठेवणे हीच चुकीच्या विचारांची गंगोत्री ठरावी.  जे पालक अशा गुंतवणुकीच्या अपेक्षेने मुलांसाठी काही करत असतील तर ही रिस्की गुंतवणूक आहे हे ध्यानात ठेवावे.  मुलांनी जर पुढे विचारले नाही तर ज्याप्रमाणे चुकीच्या पतपेढ्या बँका वगैरे मधील अधिक व्याजाच्या अपेक्षेने केलेली गुंतवणूक कधीकधी बुडीत होते तशी ही गुंतवणूक सुद्धा बुडीत होण्याची शक्यताही गृहीत धरली पाहिजे. नातेसंबंधातील प्रेमळ सहजीवनाच्या विचारापेक्षा व्यावहारिक विचार जेव्हा प्रबळ होतात त्यावेळी त्यात व्यवहारांमधील रिस्क ही सुद्धा गृहित धरली पाहिजे. 

पुराणकाळाचा विचार केल्यास मुले ही म्हातारपणाची काठी वगैरे विचार त्यावेळी नसावेत असे वाटते.  पंचवीस वर्षे गृहस्थाश्रमाची पूर्ण केल्यावर म्हणजे साधारणपणे मुले गृहस्थाश्रमाच्या टप्प्यावर आल्यावर पालकांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची जी समाजव्यवस्था होती असे ऐकिवात आहे ती चांगलीच.   साधारण २५ ते ३० वर्षादरम्यान गृहस्थाश्रम व ५५ ते ६० वर्षादरम्यान वानप्रस्थाश्रमात प्रवेश ही खरेतर आदर्श समाजव्यवस्था म्हटली पाहिजे.  आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास रिटायरमेंटनंतर पालकांनी वानप्रस्थ स्वीकारणे हे कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हितावह ठरेल.  वानप्रस्थाश्रम म्हणजे आजच्या संदर्भात मुलांच्या संसारात लुडबूड न करता स्वतंत्रपणे राहून समाजोपयोगी कार्यात स्वतःला गुंतवणे.  स्वतःचे अनुभव, जीवनाबद्दलचा दृष्टिकोन यावर आधारित एखादे  समाजोपयोगी कार्य निरपेक्ष बुद्धीने पत्करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी आयुष्याची पुढील वाटचाल करणे.  आज अनेक समाजोपयोगी संस्था कार्यरत आहेत.  अनेक संस्था उत्तम कार्य करतात.  फार मोठ्या धनलाभाची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या चरितार्थाच्या गरजेपुरते अर्थार्जन करून अशा संस्थांच्या कार्यात झोकून देण्याची आज गरज आहे.  अशा गरजांची पूर्तता या वानप्रस्थाश्रम संकल्पनेतून आजच्या काळात करता येणे शक्य आहे.  मुलांच्या संसारात लुडबूड न करता समाजोपयोगी कार्याचा आदर्श त्यांचे पुढे ठेवला तर त्यांनाही पालकांविषयी निश्चितच आदर वाटेल. 

यावर कुणी असे म्हणतील की असले फालतू व्यवहारशून्य आदर्शवाद नकोत.  प्रॅक्टिकली बोला. 

ठीक आहे, प्रॅक्टिकली बोलू….. पहिली पाच वर्षे तुम्ही मुलांसाठी काय करता हो ? खरं म्हणजे तुम्ही मुलांच्या कौतुकात येवढे मग्न असता की, सर्व जगाचे भान विसरता.  जळी स्थळी  मुलांचा विषय व कौतुक याने तुमचे आयुष्य भरून व भारून गेलेले असते.  तो आनंद, ते भारलेपण व कौतुकाची नशा आयुष्यामध्ये येवढे विविध रंग भरते की,  तुमचे आयुष्य हे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे झालेले असते. म्हणजे या पाच वर्षात तुम्ही मुलांसाठी जेवढे करता त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक आयुष्यात सुख, आनंद मिळवता.  म्हणजे पहिली पाच वर्षे तुम्ही फायद्यातच असता.  पुढील दहा वर्षांचा विचार करता असे पहा की तुमच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या, तुम्हाला अक्षय सुखाचा झरा देणाऱ्या कुटुंबाच्या सौख्यासाठी (म्हणजे त्यात तुमचे सुख सुद्धा आहेच)  पडलेली जबाबदारी तुम्ही स्वीकारली, म्हणजे तुम्ही मुलांसाठी काय केलं ?  जे केलं ते स्वतःच्या कर्तव्य पूर्तीसाठी केलं. म्हणजे ही दहा वर्षे ना नफा ना तोटा या परिस्थितीत.  

पंधरा वर्षानंतर आपण मुलांचे कौटुंबिक भागीदार म्हणजे पुन्हा बरोबरीतच. आता व्यावहारिक विचार असा की, तुम्ही गृहस्थाश्रमाच्या काळात जी काही संपत्ती मिळवली असेल तेवढाच तुमचा भाग. तो जर तुम्ही मुलांना दिलात तरच फक्त ती गुंतवणूक. यात काहीही वडिलोपार्जित इस्टेटीचा भाग नाही आणि जर तुम्ही वडिलोपार्जित इस्टेटसुद्धा खर्च केली असेल तर तुम्ही मुलांचे कर्जदारच . अन् स्वकष्टार्जित संपत्ती मुलांना देतानाच जर तुम्ही तुमच्या अपेक्षा त्यांचे समोर मांडून अथवा लेखी एग्रीमेंट करूनच त्यांना दिली तर व्यवहाराचा भाग पूर्ण झाला.  आणि ही एवढीच फक्त तुमची म्हातारपणाची काठी झाली.  परंतु या पद्धतीने तुम्ही काही समाजसेवी संस्थांशीही एग्रीमेंट करू शकता. त्यासाठी ते मुलाशीच केले पाहिजे असेही बंधन कुठाय ?  मुलांशी पटत नसल्यास व तुमचेकडे संपत्ती असल्यास म्हातारपणी जगणे कठीण व अशक्य नाहीच.  त्यासाठी म्हातारपणाची काठी विकत घेण्याची तुमची क्षमता असतेच.  ज्यांची अशी काठी विकत घेण्याची क्षमता नाही त्यांनी पूर्णवेळ समाजकार्यात झोकून देण्याची गरज व आवश्यकता आहेच.  सहसा सध्या प्रत्येकजणच वृद्धापकाळाची सोय म्हणून काही उत्पन्नाची तजवीज करून ठेवत असतोच.  फक्त सर्वात दुर्दैवी असे पालक की जे दुर्धर रोगाने आजारी आहेत, मुले विचारत नाहीत अथवा प्रॅक्टिकली त्यांना ते शक्य होत नाही व जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न नाही.  या व्यक्ती मात्र खरोखरच दुर्दैवी. त्यांचेसाठी सरकारनेच काही सोय करावी.  एक पर्याय असा की त्यांचा वृद्धापकाळाचा खर्च सरकारने उचलावा.  अथवा त्यांचेसाठी इच्छामरणाचा कायदा करावा.  माझ्या मते मुले ही म्हातारपणाची काठी नव्हेतच.  आणि ती गुंतवणूक तर अजिबातच नाही व जबाबदारी फक्त मर्यादित कालावधी पुरतीच. पालकत्व हे आव्हान नव्हे तर ती कौटुंबिक सुखांसाठी आपण होऊन स्वीकारलेली जबाबदारी. ही जबाबदारी ज्यांना नको आहे व टाळताही येत नाही त्यांना वाटणारे आव्हान.  

शेवटी आपल्या पिढीने तरी असे काय भव्यदिव्य केलंय की ज्यामुळे पुढच्या पिढीने आपले उपकार मानावेत ?  म्हणूनच या एकविसाव्या शतकातील तरुणांना मी म्हणतो —

एकविसाव्या शतकातील तरुणांनो,.. आम्ही तुमचे बाप आहोत,

म्हणूनच,

तुम्हाला मिळालेला जन्मसिद्ध शाप आहोत. आम्हीच दिले तुम्हाला, भ्रष्ट स्वातंत्र्याचे वरदान ? 

सामाजिक अराजकतेचे दान ? ढासळत्या पर्यावरणाचे थैमान…. 

आम्हीही होतो तरुण एकेकाळी,… पण नाही थोपवू शकलो हा प्रवाह, नाही परतवू शकलो या लाटा, 

पराभूत अन्  प्रवाहपतिताचं जिणं…   

जरी जगलो तरी………. 

नाही गेलो भोव-याच्या तळाशी.  

प्रवाहातील पत्थरांना चुकवत, 

कपाळमोक्ष नाही होऊ दिला…. 

म्हणूनच अजूनही अशा आहे, प्रवाह वळवता येईल, बिघडलेलं सावरता येईल,

सुकृताच्या अनुभूतीवर विकृताचा आकृतिबंध सुधारता येईल. 

खरंच येईल तरुणांनो …. 

आम्हाला आशा आहे. आमच्या शापित जीवनाला शिव्या घालत बसण्यापेक्षा, 

आमच्या सुकृताच्या अनुभूतीचं सार जाणून घ्या. विचार करा, कृती करा. 

या कृतीत आमचं जीवन संपून जाणं अनिवार्य असेल तरी कचरू नका, 

पण प्रवाहपतित होऊ नका. इतिहासाची पुनरावृत्ती करू नका. भविष्यकाळाच्या भल्यासाठी, 

भूतकाळाच्या छातीत खंजीर खुपसणं, आवश्यकच असेल तर …  

… हे नव्या पिढीतील ब्रुटसांनो,  हा वृद्ध सीझर, निशस्त्र होऊन, तुमचा वार झेलण्यास सिद्ध आहे, 

अन गर्जना करतोय …. 

…. देन सीझर मस्ट डाय.

…. देन सीझर मस्ट डाय.

(माझी पंधरा वर्षांपूर्वीची ही बहुतेक सारी मते आजही मला जशीच्या तशी मान्य आहेत)

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ झंकारलेली तार ऐकू मात्र यायला हवी… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ झंकारलेली तार ऐकू मात्र यायला हवी… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या लोकांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. सध्या एकूण १०० सेवेकरी या टीममध्ये आहेत.

या महिन्यातही खराटा पलटणच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे. 

रस्त्यावर वृद्ध याचक पावसात भिजत आहेत, त्यांना रेनकोट देणे गरजेचे आहे…. परंतु सरसकट हे रेनकोट न वाटता, हे जिथे बसतात तिथली स्वच्छता यांच्याकडून करून घेऊन यांना सन्मानाने रेनकोट दिले आहेत. 

…. हे रेनकोट देताना मी त्यांना सांगितलं आहे की ही रेनकोट भीक म्हणून देत नाही, तुमच्या कष्टाची मजुरी म्हणून देत आहे. 

…. आपण सर्वांनी सुद्धा कोणतीही गोष्ट “भीक” म्हणून देण्यापेक्षा “मजुरी” म्हणून द्यावी अशी माझी आपणास विनंती आहे. 

दोन पाच रुपये देऊन पुण्य मिळवण्याच्या मागे लागू नका, पुण्य इतके स्वस्त नाही…! दोन पाच रुपयात पुण्य विकत घ्यायची लोकांची सवय सुटली, तर भीक मागणाऱ्या लोकांची भीक मागण्याची सवय सुद्धा नक्की सुटेल…. ! माझं हे वाक्य कदाचित कोणालातरी बोचेल परंतु माझा नाईलाज आहे, सध्याची हीच वस्तुस्थिती आहे….!!! 

रस्त्यावर भिक्षेकरी दिसायला नको असतील, तर तुम्ही भीक देणे बंद करा !!! 

“एका दिवसात” हे होणार नाही….  परंतु “एके दिवशी” नक्की होईल… 

भीक नको बाई शिक

१. मागील दोन वर्षांची फी भरली नाही म्हणून शाळेने ऍडमिशन देण्यास नकार दिला..  या मुलीची दोन्ही वर्षांची फी भरून पुन्हा शाळेत तिला ऍडमिशन घेऊन दिले आहे. 

२. थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती असलेल्या आणखी अनेक मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य दिले आहे.  शाळा कॉलेजच्या फी भरून झाल्या आहेत. 

दुर्बल घटकातील अशाच आणखी ५२ मुली- मुलांना तुम्हा सर्वांच्या साथीने शैक्षणिक मदत करत आहोत… ! 

यातील आमच्या एका मुलाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मध्ये Bsc Computer Science, साठी मागील वर्षी प्रवेश घेऊन दिला, तो प्रथम वर्षात शिकत आहे, हेच मुळात विशेष… !!

आज रिझल्ट लागला आणि तो A+ ग्रेडने उत्तीर्ण झाला…! 

जिचे पालक भीक मागत आहेत, अशी मुलगी बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (BBA) करत आहे.  ती सुद्धा A+ ग्रेडने उत्तीर्ण झाली…! 

आनंद व्यक्त करण्यासाठी खरंच माझ्याकडचे शब्द संपले… !!

त्यांचे पालक म्हणून आम्ही जे काही करत आहोत, त्याचे त्यांनी चीज केले… !!!

त्यांना आम्ही जी काही शैक्षणिक मदत केली, खरंतर ती तुम्हा सर्वांकडून आमच्यापर्यंत आली आहे… 

…. आपण सर्वजण त्यांचे आणि आमचे सुद्धा पालक झालात…  आणि म्हणून त्याचं हे यश आपल्या पदरात घालत आहे… 

…… आम्ही आपल्यापुढे नतमस्तक आहोत. 

भिक्षेकरी ते कष्टकरी

१.  भीक मागणारं संपूर्ण एक कुटुंब… कुटुंबातील प्रौढ महिला पूर्णतः अपंग. या ताईला नवीन व्हीलचेअर देऊन, या कुटुंबाला रस्त्यावर खेळणी विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे.  

२.  अनेक वर्षे आजारी असणारी एक प्रौढ व्यक्ती …यांनाही या महिन्यात खेळणी विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे. 

३.  पॅरालीसीस झालेली एक प्रौढ व्यक्ती… यांचा पूर्वी सायकल रिपेअरिंगचा व्यवसाय होता…. पुढे आयुष्याचं चाकच पंक्चर झालं…! ‘ मला सर्व साहित्य घेऊन द्या, मी मला जमेल तसं पुन्हा काम सुरु करतो ‘, – त्यांच्या या जिद्दीला सलाम करत सायकल रिपेअर करण्याचं सर्व साहित्य यांना घेऊन दिलं आहे. बाणेर रोड येथे हा व्यवसाय रस्त्यावर सुरू आहे…! एकदा त्यांची कर्मकहाणी सांगत असताना ते मला कळवळून म्हणाले होते,  ‘ माज्याच लोकांनी माजे पायओढले हो…! ‘ 

मी म्हणालो होतो, ‘ हरकत नाही बाबा, आपण आनंद यात मानायचा की,  पाय ओढण्यासाठी का होईना… पण शेवटी आपल्या पायापाशीच बसावं लागलं ना त्यांना… !’ 

– यावर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य पाहून, नव्या दिवसाची सुरुवात करणारा, “सूर्योदय” वाटला मला तो चेहरा…. !!! 

घर देता का घर ?

रेनकोट आणि छत्री —- रस्त्यावर वृद्ध निराधार याचक पावसात भिजत आहेत यांना छत्री किंवा रेनकोट द्यावेत असं वाटलं. पण अशा सरसकट वाटण्याने आपला हात पुन्हा वर राहणार आणि त्यांचा हात खाली…. एकूण काय एक वेगळ्या प्रकारची भीकच ती… ! 

आणि मग ते जिथे बसतात त्या परिसराची स्वच्छता करवून घेऊन त्यांना चांगल्या क्वालिटीचे रेनकोट किंवा छत्र्या सन्मानाने देत आहोत. सफाई भी सम्मान भी….. यांना छत्री आणि रेनकोट ची “किंमत” नाही समजली तरी चालेल… परंतु देणाऱ्याच्या भावनेचं त्यांना “मोल” कळावं … 

…. हात फक्त भीक मागण्यासाठी नसतात, कष्ट करून सन्मानाने जगण्यासाठी असतात, हे बिंबवण्यासाठी आम्ही केलेला हा एक उपक्रम…. !!! 

मनातलं काही …. 

काम करणाऱ्या सर्वांना रेनकोट वाटून झाले…. एक रेनकोट मी स्वतःसाठी ठेवला…. पुढे गेल्यानंतर मला एकाने रेनकोट मागितला… मी मग माझाच रेनकोट त्याला दिला. यानंतर पुढील स्पॉटवर गेलो, तिथे एक व्यक्ती छत्र्या वाटत होती….  काम करत असताना धो धो पाऊस सुरू झाला…. माझा रेनकोट मी दुसऱ्याला दिल्यामुळे माझ्याकडे आता काहीही साधन नव्हते…. ! मी भिजलो…. माझ्याकडचे सर्व साहित्य भिजुन गेले …. ! 

तेवढ्यात एक भीक मागणारे वृद्ध आजोबा आले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर छत्री धरली आणि छत्री माझ्या हातात देऊन ते स्वतः तिथून भिजत निघाले…. ! 

मी त्यांच्या मागे जात म्हणालो, ‘ अहो, तुम्हाला मिळालेली छत्री तुम्ही मला कशाला देताय ? ठेवा तुम्ही….! ‘ 

ते बाबा गालातल्या गालात हसत म्हणाले, ‘ मी भीजलो तर मी एकटाच भीजेल… पण तू भिजलास तर हजार लोक भिजतील… माझ्यापेक्षा तुला जास्त गरज आहे…. !’ 

आभाळातल्या पावसाशी माझे अश्रू स्पर्धा करू लागले…. ! 

ती तारीख माझ्यासाठी खूप महत्त्वाची…..  कारण त्या दिवशी कोसळणाऱ्या आभाळाला थोपवणारा मला एक बाप मिळाला…. !!! 

प्रणाम…. !!! 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भारतमातेस पत्र… 🇮🇳 ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

🌳 विविधा 🌳

☆ भारतमातेस पत्र… 🇮🇳 ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

हे भारत माते,

……. शि. सा. न. वि. वि.

आई तुझी आठवण नित्यनेमाने येते. तुझ्या पोटी जन्मलो आम्ही खूप भाग्यवान आहोत. रोज तुला नमन करूनच, आम्ही उद्योगाला सुरुवात करतो. चंदेरी मुकुट धारण केलेली निळसर झोपाळ्यावर, हिरवीगार पैठणी नेसलेली तू किती भारदस्त व मोहक दिसतेस.!! अवघ्या विश्वात शोभून दिसतेस.!!

तुझी लेकरे आम्ही सर्व भारतवासी सुखी, आनंदी व समाधानी आहोत. तू दिलेल्या संस्कृतीचा ठेवा जपताना आम्हाला खूप अभिमान वाटतो.तुझ्यामुळे आम्हाला जे निसर्गाचे वरदान लाभले आहे, ते आम्हाला समृद्ध करीत आहे. देवभूमी, रामायण, महाभारत, भगवद्गीता, संत महिमा यामुळे अवघ्या विश्वात तुझेच नाव श्रेष्ठत्वाने घेतले जाते. तू तर विश्व जननी शोभतेस.!!येथे तुझ्यामुळे निर्माण झालेले  दिव्य तेज, शांती, आनंद मनाला  तृप्तता देणारे आहे.

तुझ्याच प्रार्थनेत,  निर्माण होणाऱ्या संस्कारांमुळे आम्ही भारतवासी समृद्धीकडे वाटचाल करीत आहोत. तू निर्माण केलेल्या अन्नरसामुळेच आम्ही बलवान व सामर्थ्यवान झालो आहोत.देशवासीयांची देशभक्ती व बुद्धिमत्ता जगात सर्वांनाच अचंबित करते आहे.

तुझी रक्षा करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. व याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही हेच तुला सांगावेसे वाटते.

आई ,आम्ही अथक प्रयत्नांती नित्य नवे सुयश संपादन करीत राहू. सर्व त्रुटींना संपुष्टात आणून, आम्ही सर्व क्षेत्रात विश्वविक्रम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहोत.

ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी तूच आम्हाला बळ देतेस. इतिहासातील पाऊलखुणा आम्हाला सतत मार्गदर्शन करतात.

तुझे कृपाशीर्वाद सतत पाठीशी असावेत हीच नम्र विनंती.🙏

इकडील सर्व काही ठीक. काळजी नसावी.

(ता.क…. “वसुधैव कुटुंबकम्” हे मनावर ठसले आहे.)

           तुझ्याच सेवेत हरघडी

             आम्ही भारतवासी.

                   जयहिंद

👳‍♀️👲🏻👷🏻‍♂️🧕👮‍♀️👷‍♀️👱‍♂️👱‍♀️

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ झंकारलेली तार ऐकू मात्र यायला हवी… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ झंकारलेली तार ऐकू मात्र यायला हवी… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

संगीत ऐकायला ते दरवेळी कळावंच लागतं असं काही नाही…. मैफिल जमली की, गायकाच्या हृदयात आधी तार झंकारते, ती ऐकू आली म्हणजे झालं…! 

मला रस्त्यावर जमलेल्या अशा अनेक मूक मैफिलींचा साक्षीदार होता आलं…! 

…. एखाद्याला छातीशी लावलं…तेव्हा त्याच्या हृदयाच्या धडधडीत, तबल्याचा ताल जाणवला… ! 

…. कसे आहात ? बरे आहात ना …?  यावर खाली मान घालून त्यांनी दिलेले उत्तर, ‘होय आम्ही बरे   आहोत’… यानंतर ढोलकी वर मारलेली “थाप” आठवली… !! 

…. नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या पतीची कहाणी सांगता सांगता, फुटलेल्या बांगड्यांची किणकिण, सतारीशी स्पर्धा करतात…. !!! 

…. आणि हुंदके देत शब्द बाहेर पडतात त्यावेळी, बीन तालासुरांचं हे गाणं हृदय भेदत जातं…

…. ढोलकी गत दोन्ही बाजूंनी थपडा खाणारी ही माणसं… आयुष्याचा “तमाशा” कधी होतो तेच कळत नाही….! 

गाण्यातला सूर हरवला की ते गाणं बेसूर होतं….  परंतु आयुष्यातला सूर हरवला की आयुष्य भेसूर होतं… 

अशीच काही फसलेली गाणी आणि कविता या महिन्यात हाती आल्या…. 

आपल्याच साथीने… अशा काही बेसूर गाण्यांना सुरात बांधून चाली लावण्याचा प्रयत्न केला… 

ज्या कवितांतून शब्द निसटले होते… तिथे योग्य ते शब्द टाकून, त्या कविता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला….

…. जे काही घडलं, ते आपल्या साथीनं…. आपल्यामुळेच…. 

वैद्यकीय

१. भीक मागणाऱ्या लोकांच्या नेमक्या समस्या ओळखण्यासाठी, त्यांच्या अंगातले कलागुण शोधण्यासाठी, वैद्यकीय सेवा देण्याच्या निमित्ताने जेव्हा त्यांच्यात बसून जेवतो खातो, त्यावेळी परकेपणा आपोआप संपुष्टात येतो. यावेळी आपोआपच सुखदुःखाच्या गोष्टी बोलल्या जातात आणि त्या गोष्टींच्या आधाराने काही आराखडे बांधून त्यांना आपल्या सर्वांच्या साथीने छोटे मोठे व्यवसाय टाकून देत आहे. 

डॉक्टर म्हणून रस्त्यावर जे काही करणे मला शक्य नाही, अशा सर्व बाबींसाठीआपण इतर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशा रुग्णांना ऍडमिट करत आहोत. यामागे हेतू हाच की आजारपणाचे निमित्त करून त्यांनी भीक मागू नये, आजार बरा झाल्यानंतर त्यांना जो जमेल तो व्यवसाय त्यांनी सन्मानाने करावा. 

भिक्षेकरी नाही ..  तर कष्टकरी होऊन, गावकरी म्हणून जगावे… ! 

या महिन्यात जवळपास ६०० रुग्णांवर रस्त्यावर उपचार केले आहेत. अति गंभीर अशा रस्त्यावरील ३ निराधारांना  सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांचे प्राण वाचले आहेत. 

.. गंमत अशी की या तिघांच्याही नातेवाईकांशी, मोठ्या ऑपरेशनपूर्वी त्यांची संमती घेण्यासाठी /सहीसाठी त्यांच्याशी संपर्क साधला… परंतु कोणीही पुढे आले नाही. 

झाल्या असतील यांच्याही काही चुका….

…. पण, माणसाची चूक म्हणजे पुस्तकातलं एक पान आहे….नातं म्हणजे आख्खे पुस्तक आहे…. चुकलं असेल काही तर ते एक पान फाडावं ना …  आख्खे पुस्तक फाडण्यात कोणता शहाणपणा आहे ???

.. असो, सर्व संमती पत्रावर पालक म्हणून माझी सही आहे…. ! एकाच महिन्यात तीन वयस्क आणि जीर्ण पोरांना जन्माला घालताना, बाप म्हणून, किती आनंद होतो ? शब्दात कसं सांगू…. ???

२. रस्त्यावरच रक्त लघवी तपासण्या, वॉकर, कुबड्या, काठी, मानेचे, पायाचे पट्टे यासारखी वैद्यकीय साधने देतच आहोत. पुन्हा हेतू एकच… व्यंगावर मात करत यांनी , माझ्या कुबड्या सोडून, स्वतःच्या पायावर सन्मानानं उभं राहावं… !!! 

अन्नपूर्णा प्रकल्प

रस्त्यावर असहायपणे पडून असलेले गोरगरीब आणि दवाखान्यात उपचार घेत असणारे गोरगरीब यांना आपण दररोज जेवणाचे डबे देत आहोत. (दिसेल त्याला सरसकट आम्ही डबे देत नाही)

जेवण तयार करणे, त्याचे पॅकिंग करणे, आणि ते योग्य त्या व्यक्तींपर्यंत वितरित करणे, हे सर्व काम आमचे सहकारी श्री अमोल शेरेकर हे त्यांच्या पत्नीच्या साथीने करत आहेत. 

अन्नपूर्णा हा संपूर्ण उपक्रम डॉ मनीषा यांच्या देखरेखी खाली सुरु आहे. 

आमचे हात हा प्रकल्प राबवत असले, तरीही देणारे हात मात्र तुम्हा सर्वांचे आहेत. 

एक बाबा… यांना आम्ही जेव्हा डबा द्यायचो, त्यावेळी हात जोडून, ते छताकडे पाहून, तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटायचे… एकदा गमतीने मी त्यांना म्हणालो ‘ काय मागताय बाबा ? ‘ 

.. यावर ते म्हणाले, ‘अरे बाळा, ज्यांनी माझ्या मुखात आज हा घास घातला…त्याला आणि त्याच्या पोरा बाळांना सुख, शांती, समृद्धी आणि समाधान दे… अशी देवाकडे प्रार्थना करतोय… ! ‘ 

.. हे बाबा स्वतः इतक्या त्रासात आहेत, परंतु मागणे मागताना त्यांनी इतरांसाठी मागितले….

शेवटी काय ? स्वतःसाठी मागणं ही झाली लाचारी… पण दुसऱ्यासाठी मागणं ही खरी प्रार्थना… !!!

त्यांची ही प्रार्थना आपणा सर्वांसाठी होती…

त्यांच्या मुखात घास खरंतर आपण सर्वांनी घातले आहेत मी फक्त पोस्टमनचं काम केलं…. तेव्हा त्यांचे आशीर्वाद आपणा सर्वांना लाभू देत हीच माझी शुभेच्छा ! 

– क्रमशः भाग पहिला

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – एका सुंदर जीवनपटाचे साक्षीदार होताना… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

? मनमंजुषेतून ?

☆ – एका सुंदर जीवनपटाचे साक्षीदार होताना… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ

माझ्या घरट्यात त्यांचं घरटं …….. 

दोन वर्षे  उलटली आता या गोष्टीला. १७ ऑगस्ट २०२१ ते ४ सप्टेंबर २०२१ दरम्यानच्या काळात आम्ही एक  सुंदर जीवनपट अनुभवला. कुतूहल, दया, काळजी,बालपण,पालकत्व, उत्साह ,भीती,आनंद अशा अनेक भावनांनी युक्त असा तो काळ होता आमच्यासाठी. 

२२ तारखेला मी आमच्या घराच्या गॅलरीमधल्या हँगीग कुंडीमध्ये पक्षी बसलेला पाहिला. गॅलरीचे दार उघडल्यावर भुर्रकन उडून गेला. साधा नेहमीचाच प्रसंग, त्यामुळे मी लक्ष दिले नाही. तो पक्षी जोडीने अधून मधून दर्शन देत राहतच होता. या जोडीने मला अजिबात थांगपत्ता न लागू देता हँगिंग कुंडीमध्ये त्याचा प्रशस्त बंगलाच  बनवून टाकला होता. सहज शंका आली म्हणून स्टूलवर चढून पाहिले तर सुंदर जीवांची वाट पाहत असणारं एक सुरेख घरटं तयार होतं. म्हटलं चला एक सुंदर अनुभव मिळेल आता. आणि त्या घरट्याचा मोबाईलमध्ये फोटो काढला. 

आता माझ्यातील मातृत्व जागे झाले, कारण ही कुंडी होती, त्यालाच लागून ग्रीलमध्ये कपडे वाळत घालायची दोरी बांधली होती. कपडे वाळत घालताना, काढताना त्या दोरीमुळे ती कुंडी हलत होती. धक्का लागून पक्षांची अंडी किंवा पक्षांचे पिल्लू खाली पडेल याची भीती जाणवली. त्यामुळे ती दोरी सोडून थोडीशी खाली बांधावी, जेणेकरून त्या पक्षांना त्रास होणार नाही असा विचार मनात येताच मी लगेचच अंमलबजावणीसाठी स्टूलवर चढून दोरी सोडू लागले. दोन मिनीटे देखील झाली नसतील तोवर ते दोन्ही पक्षी काही केल्या मला तेथे हात लावून देत नव्हते. मी मग ‘ थोडा वेळ जाऊ दे. मग पुन्हा आपले कार्य 

साधू ‘असा विचार करून मोर्चा किचनकडे वळवला. पक्षी जवळपास नाहीत याचा अंदाज घेऊन पुन्हा मोहीमेवर रुजू झाले. 

त्या दोरीच्या दोनतीन गाठी सोडून होईपर्यंत काहीतरी क्षेपणास्त्राप्रमाणे माझ्याकडे झेपावत आहे असे वाटले. तो पक्षी अक्षरश: सूर मारून येऊन मला हुसकावून लावत होता. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोपर्यंत हा कुठून आला कळलेच नाही. एकदम स्टूलवरचा एक पाय हलून तोल जाऊन मी पडते की काय असे वाटत असताना माझ्या प्रिय ग्रीलने मला वाचवले आणि पुन्हा एका short break साठी मी थांबले. ती दोरी सोडून खाली पुन्हा बांधण्याच्या पाच मिनिटांच्या कामाला अनेक व्यत्ययाने मला दोन तास लागले. पण शेवटी मोहीम फत्तेच केली. आणि एक आत्मिक समाधान मिळाले.

आता रोज उठल्याउठल्या स्टूलवर चढून पक्षाच्या घरटयाचं अवलोकन सुरु झालं. मी आणि माझा मुलगा रोज न चुकता हे काम उठल्याउठल्या करत असू. अर्थातच घरमालक आणि घरमालकीणबाई जवळपास नसताना.थोड्या दिवसांच्या  प्रतिक्षेनंतर घरट्यामध्ये एक अंडं आम्हाला दिसलं. दुसऱ्या दिवशी दुसरे आणि तिसऱ्या दिवशी तिसरे अशी तीन अंडी त्यांच्या घरट्यात विराजमान झालेली बघून मन अगदी लहान मुलां प्रमाणे बागडू लागलं. झाले.  आता आतुरता होती त्या नवीन पिल्लांची. मग रोज न चुकता आमच्याकडून फोटोसेशन चालू झालं. अकरा दिवसांनी एका अंड्यातून एका पिल्लाचे आगमन झाले. बाराव्या दिवशी तीनही जिवांची हालचाल बघून खूप आनंद झाला. 

ती गोंडस पिल्ले वाढताना बघणे म्हणजे एक अतिशय आनंददायी अनुभव होता. एका जीवनपटाचे आम्ही साक्षीदार झालो होतो. रोजच ते उत्सुकतेने घरटयात बघणे आम्ही आनंदाने करत होतोच. पण एक बालपण मी स्वत: देखील अनुभवत होते. अशातच एके दिवशी पक्षीणबाई रस्ता चुकून चक्क घरातच आल्या. अचानक तिचे असे घरात येणे मला एकदम घाबरवूनच गेले.. मी चटकन आधी पंखा चालू नाही ना हे चेक केले. तिच्या बाहेर पडण्यासाठीच्या घिरटया चालू होत्या पण तिला बाहेर जाण्याचा मार्ग काही सापडेना. ती किचनमधून बाहेर हॉलमध्ये आली. पण खिडकी बंद असल्याने बाहेर जाता येईना. मग खिडकी उघडल्यानंतर भुर्रकन उडून गेली. पण दोन मिनीटे घरात उच्छाद मांडला होता तिने. तेव्हापासून गॅलरीचं दार जास्त वेळ उघडून ठेवलेच नाही.

जसजशी अंड्यांमधून पिल्ले बाहेर येऊ लागली तसतशी ही पक्षाची जोडी आक्रमक होऊ लागली. गॅलरी म्हणजे आमचं साम्राज्य आहे आणि इथे कोणीही पाऊल ठेवायचं नाही असा धमकीवजा इशारा आम्हाला मिळू लागला. आम्ही मात्र आमच्याच घरात (गॅलरीत ) चोरासारखं वावरू लागलो. कपडे वाळत घालताना तर घरट्यापासून लांबच घालायचे. जरा म्हणून घरटयाच्या जवळ कोणी दिसले की कुठूनही ही जोडी प्रगट व्हायची. आता फोटो काढणंही खूप अवघड झाले होते. मी आणि माझा मुलगा हे दिव्य कसेबसे म्हणजे एकाने पहारा द्यायचा आणि दुसऱ्याने फोटो काढायचा असे करत होतो.

तर अशा रीतीने आमचं सहजीवन चालू होतं. यात खूप भावलेली एक गोष्ट म्हणजे पक्षी जेव्हा जेव्हा पिलांना खाऊ घेऊन येत तेव्हा जर आम्ही कोणी तिथे असू तर ते घरट्याजवळच घुटमळत. पिलांचा आवाज आल्यावर आम्ही लगेचच बघायला जात असू. पण आम्ही नजरेआड झाल्यावरच ते पिलांना खाऊ घालत. पूर्वीच्या आजीबाई लेकी- सुनांना सांगायच्या ना ..  सगळ्यांसमोर बाळाला खायला द्यायचं नाही, तो सल्ला आठवायचा. आणि मग मी पण गॅलरीचे दार बंद करून घ्यायचे. मग ते पक्षी पिलांना चिमणचारा खाऊ घालत. पक्षी असो जनावरे असोत की माणूस…  सर्वत्र मातृ-पितृभाव सारखाच ना ! शक्यतो दोन्ही पक्षी एकाच वेळी बाहेर जात नसत. एक जण पहारा द्यायचा आणि एक जण पिलांना चिमणचारा आणण्यासाठी जायचा. दोघांनी आपापली कामे वाटून घेतली होती.

अशा रितीने १४ दिवस कसे गेले काही समजलेच नाही. आम्हाला वाटले होते, जसा अंड्याचा क्रम होता तशी त्यांची वाढ होईल. पण सर्व पिल्ले बहुदा एकाच वेळी उडून गेली. बराच वेळ झाला पक्षी आणि पिलांचा आवाज का नाही म्हणून वर चढून बघितलं तर घरटे रिकामे होते. आनंद झाला होता पिलं आता आपल्या पंखांनी सर्वत्र हुंदडतील म्हणून….  पण काहीतरी हरवल्यासारखं पण वाटत होतं .

चला … एक जीवनपट सुफळ संपूर्ण झाला याचे समाधान घेऊन मी जवळजवळ २०-२२ दिवसांनी त्या कुंडीतल्या रोपाला पाणी घातलं.  मला वाटले होते ही वेल आता वाळते की काय. पण त्या वेलीनेही 

बिनपाण्याचा एवढे दिवस तग धरला होता. तीही त्या पक्षांना सहाय्य करीत होती. तिला पण मायेचा ओलावा मिळाल्यामुळे ती देखील बहरली होती….. 

दEurek(h)a

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ १५ ऑगस्टच्या निमित्ताने…🇮🇳 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ १५ ऑगस्टच्या निमित्ताने 🇮🇳 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

“फाळणीमुळे भारत- पाकिस्तान हे दोन देश फक्त भौगोलिक दृष्ट्या विभक्त झालेत असे नाही, तर हजारो वर्षांपासून नांदत असलेली संस्कृती विभागली गेली. या दोन देशात एक दिलाने राहणाऱ्या कोट्यावधी नागरिकांची मने दुभंगली, त्यामुळे फाळणी ही अश्वत्थामाच्या जखमेप्रमाणे भळभळणारी एक जखम म्हणून या विशाल खंडप्राय देशात राहणाऱ्या लोकांच्या काळजात ठसठसत राहिली आणि त्याचे प्रतिबिंब सहाजिकच साहित्यात उमटले. कृष्णाजी वामन पेंडसे हा सव्वाशे वर्षांपूर्वी कोकणात जन्मलेला माणूस, तारुण्यात धाडसाने कराचीला नोकरीसाठी जातो. आपल्या कर्तबगारीने तेथे अधिकार पद मिळवतो, पण फाळणीच्या जबरदस्त तडाख्याने कोकणात माघारी येतो. या दैव दुर्विलासात त्याला त्याची सहधर्मचारिणी खंबीरपणे साथ देते.” —– 

— प्रदीप गांधलीकर यांनी मंगला काकतकर यांच्या “आनंदाचे डोही आनंद तरंग” या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेतील हा काही भाग आहे.

(कै) मंगला काकतकर ही माझी आत्त्या, जन्मापासून कराचीत राहिलेली आणि फाळणीनंतर भारतात येऊन जिने खडतर आयुष्याला तोंड दिले. संगमनेर येथे शिक्षिकेची नोकरी केली व राज्य शासनाचा उत्कृष्ट शिक्षिका हा पुरस्कार मिळवला ,अशी अतिशय कर्तृत्ववान ! तिच्या सांगण्यातून आणि लेखनातून त्यांनी अनुभवलेली फाळणी आम्ही पाहिली !

एकेकाळी आलिशान बंगल्यात राहणाऱ्या व फाळणी झाल्यावर अचानक राहायलाही जागा नाही अशी परिस्थिती ! पण ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेतून परत जन्म घेतो त्याप्रमाणे सर्व कुटुंबाने भरारी घेतली व नव्या आयुष्याला सुरुवात केली.

तिच्या पुस्तकाची सुरुवातच “8 फेब्रुवारी 1947 ,या दिवसाची !” गौरी सदन “कराची येथे नवीन घराची वास्तुशांती ! पण वास्तुशांतीला फक्त घरचे लोक व दोन भटजी ! देशातील वातावरणच अस्थिर होते. तेव्हा जे अनुभवले ते तिने शब्द रूप केले, पुढील पिढीला ते कळावे म्हणून !

“फाळणी नंतरचे काव्य” या लेखात ती सांगते, ” आमच्या जन्मापासून कराचीचे आणि आमचे नाते होते. कराची कधी सोडावी लागेल असे मनातही आले नव्हते. कराचीत दंगली उसळल्यावर सर्व कुटुंब मनोरा (कराची पासून जवळच असलेले बेट,जिथे आजोबांनी observatory त नोकरी केली ! ) येथे उदास व खिन्न मनस्थितीत गेले, केवळ दोन बॅगा बरोबर घेऊन ! त्यानंतर मिळेल तसे हे सर्व कुटुंब भारतात परतले. आत्त्या  सांगायची, ” वडिलांना फाळणीमुळे असे काही घडेल याची कल्पनाच आली नव्हती. इंग्रजी राजवट गेली, पाकिस्तानची येईल !सर्वसामान्य लोकांना काय त्रास होणार?” पण घडले भलतेच ! पाकिस्तानी लोकांनी त्यांना घराबाहेर काढले । सामानाची लुटालूट केली. त्यानंतर सर्व कुटुंब जसं येता येईल तसा प्रवास करून (पाच दिवस बोटीचा)   मुंबईला आले, तिथून पुण्याला आले आणि काही काळाने कोकणात जाऊन स्थिरावले !

७५ वर्षे होऊन गेली या कालखंडाला ! पण माझ्या माहेरच्या पेंडसे कुटुंबाने भोगलेल्या फाळणीच्या आठवणी स्वातंत्र्यदिनी जाग्या होतात आणि नकळत आपण हे सगळे भोगणाऱ्या कुटुंबाच्या साखळीची एक कडी आहोत ही जाणीव मनाला बोचत राहते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

🌳 विविधा 🌳

☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(कारण कुटुंब, समाज आणि राष्ट्र आपल्या प्रत्येक घटक जनांचे संरक्षण, पालन आणि पोषण करत असते. असा मोठा फायदा असल्याने या संकल्पना जगात आज खोलवर रुजल्या आहेत.) – इथून पुढे 

सद्य परिस्थितीत राष्ट्र ही सर्वात मोठी व्यवहारी संकल्पना आहे. देशाच्या अंतर्गत समाजकंटकांपासून न्यायप्रिय लोकांचे रक्षण करण्यासाठी पोलिस व न्याययंत्रणा असतात. राष्ट्राचे शत्रूराष्ट्राच्या आक्रमणांपासून रक्षण करण्यासाठी सीमेवर सेनादले कार्यरत असतात.  

दुसऱ्याच्या कष्टाचे ओरबडण्याला चोरी वा लुट असे म्हणतात. राष्ट्र सुद्धा चोऱ्यामाऱ्यांचा शॉर्टकट घेवून मोठे होण्याचा प्रयत्न करतात. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करून तेथील साधनसंपत्तीची लुटालुटली केल्याची अगणित उदाहरणे इतिहासात सापडतील. 

भारताने मात्र आजवर कुठल्याही राष्ट्रावर असा अन्याय केला नाही. पण भारतीयांच्या या सभ्यपणाला कदाचित भारताची कमजोरी समजली गेली. त्यामुळे खैबर खिंडीतून भारतावर आजवर अनेक आक्रमणे आली. 

एक हजार वर्षांपुर्वी भारताची अर्थव्यवस्था इतकी मजबुत होती की जगाच्या GDP च्या 37% वाटा एकट्या भारताचा होता. इतकी आर्थिक सुबत्ता असुनही सैन्यदले कमकुवत ठेवण्याची चुक आपल्या पुर्वजांनी केली. परिणामी एक हजार वर्षांची गुलामगिरी आणि प्रचंड आर्थिक शोषणाला भारत बळी पडला. 

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची GDP जगाच्या GDP च्या केवळ 3% इतकीच शिल्लक राहिली होती. कधी काळी सोन्याचा धुर निघणारा संपन्न देश स्वतंत्र होईपर्यंत पार उघड्या-नागड्या लोकांचा देश झाला होता.

सीमेवर सेना सज्ज असेल तर देशाअंतर्गतही शांतता आणि स्थैर्य राहते. देशाअंतर्गत शांतता आणि स्थैर्य असेल तर देशात शेती, व्यवसाय आणि व्यापार वाढतो. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की शेती, व्यापार आणि उद्योगधंदे बसतात. परकीय गुंतवणूक निघून जाते. म्हणून देशांच्या सीमेवर शांतता राहणे महत्वाचे असते. 

सीमेवर पराक्रमी सेना पहारा करत असेल तर देशामध्येही कायद्याचे राज्य येते. शांत आणि स्थिर वातावरणात शेती, व्यवसाय आणि व्यापार वाढतो. परकीय गुंतवणूक वाढते. तंत्रज्ञानाचा विकास होतो. आर्थिक सुबत्ता येते. या आर्थिक सुबत्तेतून सेना सक्षम होते. सक्षम सेनेच्या फक्त धाकाने शत्रू आक्रमणाची हिंम्मत करत नाही. त्यातून देशात अजून स्थिरता आणि स्थैर्य येते. अशा प्रकारे सेनेच्या रक्षणातून शेती-व्यापार-व्यवसाय वाढतात. तसेच शेती-व्यापार-व्यवसाय वृद्धीतून सेना सुदृढ होते. या सकारात्मक चक्रातून राष्ट्र बलवान आणि संपन्न होत जाते. 

देशाची सेना मजबुत करण्याची जबाबदारी फक्त एकट्या सरकारची नसून राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची असते. सेनेसाठी नागरिक जेव्हा तण-मन-धन अर्पण करतात तेव्हा सेना बलवान होते. सेनेवर नागरिक तण-मन-धन अर्पण करत असतील तर सेनेचे मनोबल वाढते. शेवटी प्रत्येक सैनिकाला ‘मी कुणासाठी जीव धोक्यात घालून लढतोय’ हा प्रश्न पडतोच की! 

पायाजवळचा स्वार्थ पाहणे सोडून सेना संवर्धनाचा दुरचा विचार करणारे सुज्ञ नागरिक ज्या देशात राहतात त्या देशाची सेनादले मजबूत होतात. ते जीव तोडून देशाचे रक्षण करतात. तिथेच प्रगती होते. हेच देश आज विकसित म्हणून गणले जातात. 

कठीण परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्यदलांचे आपण देणे लागतो का? असा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडायलाच हवा. कुणी असे म्हणू शकते की इतके मोठे सैन्यदल! मी एकटा अशी किती मदत करू शकतो? पण सामान्य भारतीयांकडे अशी एक शक्ती आहे जी कुठलाही बदल घडवून आणू शकतो. ती शक्ती आहे संख्याबळ!  

140 कोटींचा देश! प्रत्येकाने 100 रुपये दिले तरी 14000 कोटी जमतील. देशातील लोकांच्या एक वेळच्या चहा-नाष्ट्याच्या पैशात संपुर्ण सैन्याला बुलेटप्रुफ जॕकेट मिळाले असते. पण तरी जवानांना इतकी वर्षे वाट पहावी लागली. 

जर लोकांनी पैसे जमा केले तर हा सगळा पैसा योग्य मार्गाने जाणेही आवश्यक असते. नाहीतर अशा पैशांना वेगवेगळ्या वाटा फुटून तो पैसा ठगांच्या खिशात जातो. इंटरनेटवर थोडे पाहिल्यावर कळाले की सैन्यदलांनी त्यासाठी छान व्यवस्था करून ठेवलेली आहे.

National Defence Fund !   

1962 च्या युद्धात सामान्य जनतेने यथाशक्ति मदत केली व कोट्यावधी रुपये सैन्याला दिले. या पैशाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी National Defence Fund ची स्थापना झाली. या फंडात आपण नेट बँकींगने आॕनलाईन पैसे पाठवू शकतो. 

2016 सालच्या उरी हल्ल्यानंतर मी हादरून गेलो होतो. त्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकने मला रोमांचित केले होते. पण 2019 च्या जानेवारीत उरी चित्रपट पाहिल्यावर मी सर्जिकल स्ट्राईक मधील खरा थरार अनुभवला. त्यात डोणज्याच्या दवाखान्यात मला दाखवायला BSF चा हा जवान आला होता. त्याची गोष्ट ऐकली आणि अंगावर काटा आला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून हा जवान वाचला होता. त्याचा मित्र आणि सहकारी मात्र इतके नशीबवान नव्हते. सैन्यदलासाठी आपणही काहीतरी करावे हा विचार मनातून काही केल्या जाईना.

प्रत्येक वर्षी एका सैनिकाला लागणारे बॕटल गिअर खरेदी करता येतील इतके पैसे National Defence Fund मध्ये द्यावेत यावर मी विचार करू लागलो. मग नेटवर सैन्यदलांच्या सौद्यांविषयीच्या जुन्या बातम्या शोधल्या. सैन्यातील मित्रांना विचारले. थोडी माहिती मिळाली. 

Bullet proof jacket- कंपनी SMPP Pvt Ltd- किंमत प्रतिनग 35000 रुपये 

Assalt rifle- कंपनी SIG SAURE / कंपनी AK203- किंमत प्रतिनग साधारण 80000 रुपये 

Helmet- कंपनी Kanpur-based defence firm MKU- किंमत प्रतिनग 10800 रुपये 

Helmet mounted Night vision camera – कंपनी PVS 7 Gen 3 Night Vision Goggles- किंमत  65000 रुपये.

एकूण 35000 + 80000 + 10800 + 65000 = 190800 म्हणजे वर्षाला 200000 /- रुपये. 

हा सर्व विचार चालू असतानाच 14 फेब्रुवारी 2019 ची पुलवामाच्या आत्मघाती स्फोटाची बातमी आली. एक दहशदवादी स्वतःबरोबर चाळीस चाळीस जवान उडवून देतो. मन विषन्न झाले. देशाच्या शत्रूंची विद्ध्वंसक मानसिकता यातून पुन्हा जाणवली. दर वर्षी सैन्य दलाला दोन लाख रूपये द्यायचा मी तात्काळ निश्चय केला. 

खरे तर दोन लाख ही रक्कम माझ्या कमाईचा मोठा भाग होता. पण माझा निर्णय पक्का झाला होता. आता मागे फिरण्याचा विचारही शक्य नव्हता. माझ्या दवाखान्याशिवाय मी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे आॕपरेशन करायला जातो. त्याचे जे पैसे मिळतात ते या कामासाठी वापरायचे असे मी ठरवले. बायकोला बेत सांगितला. ती तर माझ्यापेक्षा जास्त खुष झाली.  “नक्की करा आणि घरखर्चाची चिंता करू नका. या कामात काही मदत लागली तर मलाही सांगा” असं ती म्हणाली. आणखी हुरूप वाढला.

पहिले इंटरनेट बँकींग ॲक्टिव्हेट करून घेतले. पहिले दोन लाख नॕशनल डिफेंस फंडाला पाठवले. काही मिळाले की आनंद मिळतो याचा अनुभव आजवर होता. देण्यातही खुप आनंद असतो याची मला प्रथमच प्रचीती आली. 

– क्रमशः भाग दुसरा 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares