मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सण गुढीपाडव्याचा…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “सण गुढीपाडव्याचा…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

 गुढीपाडवा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे बांबुची उंच काठी, त्याच्या टोकाला जरीच वस्त्र, त्यावर उलटे पात्र (कलश), फुलांचा हार, कडुलिंबाची डहाळी आणि साखरेची पदक माळ अस चित्र लगेच समोर येतं.

परंपरे प्रमाणे वर्षानुवर्ष आपण अशी गुढी ऊभी करत आहोत. ती अशीच का उभी करायला सांगितली असेल बरं? याचा कधी विचार केलात का?

 त्याचा निश्चितच शास्त्रशुद्ध अर्थ असणार…

राष्ट्रसेविका समितीच्या नित्य पाठाच्या पुस्तकात यावरचे एक सुरेख गीत आहे. त्या गीतात गुढीचा नेमका जो भावार्थ आहे तो सांगितलेला आहे. हिंदू संस्कृतीत कधीकधी प्रतिकांचा वापर असतो. त्यातून काहीतरी शिकवण आणि बोध आपण घ्यायचा असतो. यावर्षी आपण तो समजून घेऊ.

मान वर करून बघावं लागेल अशा ऊंच जागी गुढी उभी करायची. आपलं ध्येय हे नेहमी उच्च असावं… हेच ही काठी सुचवते. अर्थात हे सहजा सहजी होणार नाही. त्यासाठी आपण वेळ न घालवता सतत कष्ट केले तरच हे साध्य होते… असा कानमंत्र ती देते.

पहाटेच उठून स्नान करून शुचिर्भूत होऊन गुढी उभी करायची.

सहजपणे लक्षात येतं… लवकर उठलं की कामं करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. घ्येय गाठायचं असेल तर कृती करताना काळाचं आणि वेळेचं भान ठेवायच हे गणित जमायला हव.

आज सण आहे म्हणून भरजरी वस्त्र गुढीला लावलेले आहे. ते सांगते.. जीवनात सतत आनंद मिळेल अशी वेडी आशा ठेवायची नाही. दुःखही अटळ आहे.. त्याची पण तयारी ठेवा.

कोणाला दान द्यायचे असेल तर आपण ते पात्र पूर्ण पालथे करतो. रिकामे करतो… त्याचेच प्रतीक हे गुढीवरचे पात्र आहे. म्हणूनच ते पालथे आहे. ढग पृथ्वीवर जलधारांचा वर्षाव करून पूर्ण रिकामे होतात… निसर्गातून आपल्याला हा संदेश दिलेला आहे. यातून आपला हात देणारा… मदतीचा असावा हे शिकवले जाते.

कर्तव्य निभावताना वेळ.. प्रसंगी कठोरपणे निर्णय घ्यावे लागतात. तेव्हा ते कटु वाटले तरी..

 शेवटी ते हिताचे असतात. त्याने मनाला पुढे शांती मिळणार आहे. कडुलिंबाकडून हा बोध घ्यायचा.

गुढीवर साखरेचा मध्यभागी छान पदक असलेला हार असतो. बुद्धी वैभव आले तरी त्याचा गर्व नाही करायचा. अंगी नम्रता हवी. वाणीत गोडवा असावा.. शब्दात मधुरता असेल तरच लोक जोडले जातात.

तर असा हा आपल्या गुढीचा सुरेख अर्थ…

आता यापुढे गीतात जे सांगितले आहे ते फार महत्त्वाचे आहे.

आता अशीच गुढी यावर्षी आपण आपल्या मनात लावूया. ती लावताना मातृभूमीच्या प्रेमाचा सडा टाकायचा, अंतकरणात प्रखर देश निष्ठेची रांगोळी काढायची. मी आणि माझे इतके सिमित न राहता भारत मातेची सेवा हे उच्च ध्येय ठेवायचे.

अशी ही नवीन संकल्पनांची गुढी उभी करून.. आनंदानं नववर्षाचे स्वागत करायचं.

हातचं काही न राखता देशासाठी सर्वस्व अर्पण करायचं. हे ध्येय ठेवलं तर पुढचं वर्षच नाही तर आयुष्य आनंदात जाणार आहे.

इतका विशाल विचार राष्ट्रसेविका समितीच्या गीताने… प्रतिकात्मक अर्थाने आपल्याला दिलेला आहे. तो तर समजला. आता कृती करणे आपल्या हातात आहे.

मी काय करू शकेन.. काय करायला हवं… यासाठी मला कोण सहाय्य करेल… याचा विचार करा. आसपास शोध घ्या. तुम्हाला ऊत्तर मिळेल. प्रत्येकाने थोडे थोडे काम केले तरी सगळ्यांचे मिळून खूप काही होणार आहे. त्यासाठी एकत्र येऊया.

आमच्या राष्ट्र सेविका समितीत या… इथे हेच शिकवले जाते.

मी नेहमी सांगते ते आठवा बरं…

“संगत फार महत्त्वाची असते. “

हा नवा विचार मनात रुजावा… यावर्षी तो समजून घेऊन आपण गुढीकडे पहावे…

म्हणून हा लेखप्रपंच…

मराठी नववर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!!

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ या रंगाला एक्सपायरी नाही… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ या रंगाला एक्सपायरी नाही… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

मानवी जीवन विविध कंगोऱ्यांनी बनलेले असते, असे म्हटले तर वावगे होणार नाही…

कधीकधी मनुष्याला निर्मम, निर्व्याज, निर्मळ प्रेमाची अनुभूति येते…

कधीकधी एखाद्यावर मनुष्य अकारण प्रेम करू लागतो, तर कधीकधी एखाद्याला अशा अकारण प्रेमाचा लाभ होतो, तो अकृत्रिम स्नेह त्याला अनपेक्षितपणे प्राप्त होतो…

अशावेळी त्या त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेने हास्य विलसते…

अशा अकृत्रिम, निर्मळ हास्याने त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर एक विशेष रंग चढतो…

हा रंग कोणालाही दिसत नाही, पण तो जाणवू शकतो…

ज्याच्या चेहऱ्यावर हा रंग खुलतो, तो मनुष्य तो रंग दिवसभर अनुभवू शकतो…

हा रंग कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही…

तर तो निव्वळ अकृत्रिम स्नेहाचे आणि निर्व्याज प्रेमाने प्राप्त होऊ शकतो…

कारण हा रंग अशी दिव्य अनुभूती घेणाऱ्याच्या मनात तयार होत असतो आणि त्याच्या मनातच साठून राहत असतो…

… त्या रंगाला एक्सपायरी नाही…

हा अनुभव आपण कदाचित कधीतरी घेतला असेल…

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘स्वर्गदार…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘स्वर्गदार…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

सत्तरीच्या घरातल्या हसतमुख दमदार पावले टाकीत, येणाऱ्या जाणाऱ्यांचा राम राम स्वीकारत, झपाझप चालत माझ्याकडे येणाऱ्या काकांना मी विचारले “काय हो काका किती दिवसांनी भेटताय कुठे लपला होतात?

माझ्या कोपरखळीला दाद देत मिस्कील हंसत त्यांच उत्तर आलं, ” गेलो होतो मसणात” मी उडालेच, ” काय काका! काहीतरीच काय बोलणं?, नाही म्हणजे कुणी जवळचं माणूस.. त्यांचं काही बरवाईट?तुम्ही दुःखी आहात का? नाही म्हणजे स्मशानात? म्ह ण जे अशा जागी कोणी सहज, मुद्दामून जात नाही, नाही कां? माझा नुसता गोंधळ उडाला होता.

“कबूल आहे! नाही जात अशा ठिकाणी. पण मी गेलो आणि भरून पावलो. प्रसन्न मनाने त्या वैकुंठधामात वावरलो. माझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ बघून काका पुढे म्हणाले, “माझ्या बोलण्याने गोंधळलीस ना नेहमीसारखी! बैस खाली. सगळं सांगतो. माझं कोड्यातलं बोलणं संभ्रमात टाकतय ना तुला? 

“हो ना हो!एक वेळ पुस्तकातलं कोडं सोडवणं सोप्प आहे पण स्मशान काय मसणात काय! काका हे माझ्याअल्पबुद्धी पलीकडचं आहे, तेव्हा आता फिरक्या घेणं पुरे आणि मुद्द्यावर या काकासाहेब “

आणि मग गाडी रुळावर आली वक्तृत्व स्पर्धेत 1ला नंबर असलेले माझे जेष्ठ मित्रवर्य बोलू लागले, “अगं इंदोरला गेलं होतं आमचं मित्र मंडळ. सगळं इंदोर पालथ घातलं. खाऊ गल्ली झाली, मंदिरें झाली, मार्केटिंग झालं. सगळे जाम दमले आणि म्हणाले, ” बस झालं! सगळं शहर फिरलोय आता उद्या पुण्याला निघायचं बघूया.

माझ्या मनात वेगळंच चाललं होतं. मला कुठेतरी वाचल्याचं आठवत होतं. इंदोर दहनघाट बघण्यासारखा आहे. ताड्कन उठलो आणि गर्जना केली “चलो दहनघाट ” दहनघाट???झोपलेले खाड्कन जागे झाले. जागे असलेल्यांनी डोळे विस्फारले, बसलेले ताड्कन उठून मला धरायला धावले, सगळ्यांना वाटलं परिणाम झालाय माझ्या डोक्यावर. बायको तर इतकी भेदरली की किंचाळून म्हणाली, “अहो काल उज्जेनला महाकालेश्वराची भस्मपूजा पाहयलीत त्याचा काही विपरीत परिणाम नाही ना हॊ झाला तुमच्यावर?

सगळ्यांच्या नजरेत कींव होती. “भ्रमिष्ट झालाय हा! अशा सुतकी अशुभ ठिकाणी कुणी जातं कां रें मुर्खा!” वशा खेकसलाचं.

आरडाओरडा, मित्रांच्या शिव्या, बायकोचं रडणं चालूच होतं. जणू काही मी शेवटच्या प्रवासाला निघालोय परत येणारच नाहीय्ये की काय असंच मला वाटायला लागलं. ” काका मजेत टाळ्या वाजवून गंमत सांगत होते.

न राहून मी म्हणाले”काकुंच बरोबर आहे काका, अहो मृत्यूचं नाव काढलं, प्रेतयात्रा पाहिली, ज्वाळा बघितल्या की माणूस घाबरतोच आणि अशा ठिकाणी सगळं सोडून जाण्याची तुम्हाला तरी काय बुद्धि झाली?काहीतरी असतं हं काका तुमचं !

“अगं बाई! पुढचं तर ऐक त्याचं असं झालं माझे एक मित्रवर्य ह्या उपक्रमात सहभागी आहेत. ते म्हणाले “मध्य प्रदेशात आलात ना की दहन घाटाला भेट द्यायला विसरू नका. ती जागा बघण्यासारखी आहे. उदास मनाला टवटवी आणणारी फुलझाडे आहेत तिथे.

असं बघ राधिका, जाणारा महाप्रवासाला पुढे निघून जातो पण मागे राहणाऱ्याचं काय? ते दुःख, वियोग ज्याचा त्यालाचं सहन करावा लागतो. दुखणं आणि दुःख एकमेकांना वाटून नाही घेता येत. अश्रूंचा पूर, वियोग, आक्रोशामुळे वातावरण गंभीर, उदास झालेलं असतं म्हणूनच आत्म्याला शांती आणि दुःखाला मुक्ती मिळावी ह्यासाठी कार्यकारी मंडळींनी त्याठिकाणी वृक्षराजी आणि बागबगीचा लावलाय. तिथे अत्यंत स्वच्छ स्वच्छतागृहे आहेत. मध्य प्रदेशातलं इंदौर शहरातलं उत्कृष्ट सुंदर सुरेख हिरव्यागार गारव्यातलं स्मशानगृह ‘ ऊपेक्षणीय ‘ नसून प्रेक्षणीय आहे. प्रवेशद्वारापासूनच या मोक्षद्वारात आत्म्याला शांती, श्रद्धांजली आणि इतरांच्या उदासी वातावरणाला तिलांजली मिळते. ती हिरवाई बघून क्षणभर कां होईना दुःखाचा विसर पडतो.

महान वृक्ष इथे उभे आहेत त्यांच्या प्रचंड सावलीखाली 100 सव्वाशे माणसं बसू शकतात. पिंपळावर भुते असतात म्हणे! पण हाच पिंपळवड, चिंच, कडुलिंब आपल्याला प्राणवायू पुरवतो. हे तर पट्तय नां तुला? आणि म्हणूनच असे वटवृक्ष शुद्ध हवेसाठी इथे लावलेले आहेत.

ऐक हं!एक सुंदर श्लोक आठवलाय बघ मला..

‘मुले ब्रम्हा, त्वचा विष्णू । शाखा शंकर मे वचं रादन्यो नमोस्तुते. ।। ‘ 

हे संस्कृत पंडित म्हणतात ‘ह्या अश्वत्थ (पिंपळ) वृक्षाच्या मुळात ब्रह्मा, सालीत विष्णू, फांद्यात भगवान शंकर आहेत तर पानांपानांत देवी देवतांचा वास असतो अशा वृक्षराज पिंपळाला माझे नमन असो.

काकांचं अगाध ज्ञान, वक्तृत्व शैली आणि संकलन बघून मी अवाक झाले होते. मी म्हणाले, “मग तर काका त्या मुक्तीधाम मध्ये शंकराचा म्हणजेचं पिंपळवृक्षाचा निवास हवाच नाही का?”

“हॊ तर नक्कीच हवाय! पवित्र तुळसबनही इथे आहे. पर्यावरण, आणि निसर्गांनी दिलेलं दान आपण जपायलाच हवंय. तुला काय सांगू राधिका, तिथल्या व्यवस्थापक मंडळींनी खूप धोरणानी जागरूकतेने ते जपलयं. पर्यावरणाला पूरक असे उपक्रम ते राबवतात. कचऱ्यातून कला साधून, खत सांठवून 

west मधून best ते साधतात. ” 

“काय सांगताय काय काका तुम्ही!”माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

 “पुढचं तर ऐक! दहन केल्यावर फेकलेले बांबू एकत्र करून सुसज्ज, सजावटीचे कठडे विविध रंगाने रंगवून त्यांनी ते प्रेक्षणीय केलेआहेत. “

सारं काही ऐकतांना भारावून मी म्हणाले, ” किती वेगळ्या वातावरणात, निसर्ग सुखसानिध्यात नेऊन दुखितांच दुःख, ही मंडळी हलकं करतात नाही का! खरंच स्तुत्य, आदर्श आहे हा उपक्रम. मला नंबर मिळेल का हो त्यांचा? माझ्या प्रश्नावर काकासाहेब उत्तरले” हो नक्की! अगं पण अजून मला सांगायचंय, ऐक नां! इथे मोक्षकाष्ट मोफत मिळते. अंत्यसंस्कारासाठीची रक्षा हवेत, पर्यावरणात मिसळून प्रदूषण वाढू नये म्हणून खतासाठी ती रक्षा वापरतात. त्यासाठी निर्माल्य कलशासारखे मोठे रक्षाकलश इथे ठेवलेले आहेत.

काकांच्या तोडून ही नवीन आणि उपयुक्त माहिती ऐकून मी निशब्द झाले. खरंच कमाल आहे हं ह्या उपक्रमाची आणि त्या कल्पक मंडळींची. दुःखितांच्या दुःखावर फुंकर घालताना ते समाजकार्यही करताहेत. खरंच भन्नाट आयडिया, काका इथूनच माझा त्यांना मनापासून नमस्कार.

“राधिकाजी इससे भी बढकर और बढीया बात है l आगे सुनो, काकाजी बरेच मूडमध्ये आले होते. उत्साहाने त्यांचा धबधबा सुरू झाला, “अगं माणसांचा, पर्यावरणाचा त्यांनी विचार केला आहेचं पण पशुपक्ष्यांचीही त्यांनी सोय केलीय. त्यांनी अशी मनमोहक सुगंधी फुलझाडं लावली आहे की ती रंगीबेरंगी दुनिया बघून फुलपांखरे फुलाफुलांवर बागडतात. आणि भरपूर मकरंद प्राशन करतात. जवळची माणसं दुरावल्यामुळे आप्तेष्ट उदास निराश झालेली असतात. डोळ्यांची तळी तुडुंब भरतात पण अश्रूंच्या पडद्याआडून त्यांना दिसतील अशी गुलाब जाईजुई मोगरा, पारिजातक, सोनचाफा इत्यादी सुगंधी फुले वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलतात. ते दृश्य त्यांच्या दुःखी मनावर फुंकर घालून क्षणभर का होईना त्यांना दिलासा मिळतो. पक्षीगण मंजूळ आवाजात त्यांचं सांत्वन पण करतात”

हे सगळं काकांचं सांगणं ऐकून मी मंत्रमुग्ध झाले होते माझ्या तोंडून उस्फूर्तपणे शब्द बाहेर पडले, ” काकासाहेब हे स्वर्गदार इतकं दिलासा देणार असेल तर पण मी पण जाईन त्या स्मशानात. घाटावरचा दिलासादायी निसर्ग बघायला “

काका टाळी वाजवून म्हणाले “ पटलं ना तुला? मग समजावून सांग तुझ्या काकीला” 

“नक्कीच काका ” असं आश्वासन देऊन मी बागेच्या बाहेर पडले. मनोमनी इंदोरकरांच्या अफलातून कल्पकतेला आणि उपक्रमाला मी इथूनच हात जोडले. या सगळ्या वेगळ्या अर्थपूर्ण उपक्रमाचे सार्थक करणाऱ्या या मंडळींना खरंच जीवनाचा अर्थ कळला आहे. त्यांना माझा मानाचा मुजरा !! 

 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कटू वास्तव ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ कटू वास्तव ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

२५ जानेवारीची संध्याकाळ. आधीच शनिवार-रविवार आणि त्यात पुन्हा राष्ट्रीय सुट्टी आलेली. आजूबाजूची सगळी शोरुम्स आणि मॉल्स गर्दीनं खचाखच भरुन वाहत होते. कुणाला तरी भेटायला गेलो होतो आणि तिथं आम्हाला बराच वेळ लागला, म्हणून जवळच्या एका मॉलमध्ये आम्ही पोट भरण्यासाठी गेलो. पण तिथल्या कॅफेटेरियाचे दर बघून आमचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. पंधरा-वीस स्टॉल्स होते खरे. पण किंमती अवाढव्य होत्या. ८० रुपयांची पाणीपुरी, २०० रुपयांचं सँडविच, १८० रुपयांपासून पुढे सुरु होणारी चाट हे खिशापेक्षा मनालाच परवडत नव्हतं.

मी त्यांना म्हटलं, “जाऊ द्या. आपण टपरीवर चहा घेऊ. ” 

ते म्हणाले, “जीबीएस कसा भडकला आहे, बघतोयस ना. उघड्यावरचं काही नको रे बाबा. “

आम्हीं पंधरा वीस मिनिटं तिथं होतो आणि शेवटी काहीही न खाता पिता तिथून निघालो. पण त्या मॉल मध्ये जे दृश्य होतं, ते बघून मला धक्का बसला.

तरुण मुलामुलींची तर गर्दी होतीच, शिवाय शेकड्यांनी परिवारसुध्दा होते. तिथं पाणीसुद्धा विकत घेऊन प्यावं लागत होतं. चार-पाच जणांचं बिल एक हजाराच्या वर सहजच जात असेल. कितीतरी लहान लहान मुलं त्या कॅफेटेरिया मध्ये जंक फूड मनसोक्त खात होती. कॉलेजवयीन मुलामुलींच्या जोड्या होत्या.

५०० रुपयाचं सिझलर घेऊन टेबलावर गप्पा मारत बसलेलं एक युगुल दहा मिनिटांनी ती डिश तिथंच तशीच टाकून उठून निघून गेलं. कितीतरी लोक खाणं अर्धवट टाकून उठून निघून जात होते. छोले भटुरे मागवलेल्या एका ग्रुपनं तर निम्मे भटुरे तसेच टाकले. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा अर्धवट टाकून निघून गेलेले लोक मी बघत होतो.

बरं, असला “टाकून माजण्याचा” मस्तवालपणा करणारी जी जनता होती, ती काही मर्सिडीज क्लास नव्हती. सगळेच्या सगळे मध्यमवर्गीयच होते.

“पेट्रोल २५ पैशांनी महागले अन् जनतेचे कंबरडे मोडले” किंवा “कोथिंबीर कडाडली, लोकांनी खायचं काय?” असले मथळे लिहिणाऱ्यांनी मॉलमधले हे मध्यमवर्गीय बघितलेले असतात का? असा प्रश्न मला पडला.  

मेसचे डबे लावून जेवणाऱ्या मुलांचं आणि मुलींचं मी अनेकदा निरीक्षण केलंय. आठवड्यातून तीनदा तरी डब्यातलं अन्न जसंच्या तसं कचऱ्यात गेलेलं असतं. घराघरांतून गोळा केला जाणारा ओला कचरा तुम्ही अवश्य पहा. चांगल्या प्रतीचं ब्रँडेड अन्न कचऱ्यात फेकून दिलेलं तुम्हाला दिसेल. हॉटेलमध्ये सँडविचच्या डिशमध्ये कोबी किसून डेकोरेट करुन सर्व्ह करतात. तो कच्चा कोबी कितीजण खातात? मोठमोठ्या कॉफी शॉप्स मध्ये मी पाहतो, मला फार वाईट वाटतं.

पाचशे-सातशे रुपये किंमतीची कॉफी अर्धवट टाकून लोक निघून जातात. पाचशे रुपयांतले तीनशे रुपये आपण कचऱ्यात ओतले, याचं त्यांना भानही नसतं आणि त्याचं त्यांना वाईटही वाटत नाही.

एकदा सोलापूरहून पुण्याला येत असताना एका प्रसिद्ध हॉटेल मध्ये आम्ही ब्रेक घेतला. शेजारच्या टेबलावर सात आठ जण बसले होते. आठ जणांनी आठ वेगवेगळ्या भाज्या मागवल्या. इतके स्टार्टर्स, इतक्या डिशेस.. टेबल अख्खं भरलं होतं. पण खाल्लं किती? जितकं मागवलं होतं त्यातलं निम्मंसुद्धा नाही.. ! बिल भरुन माणसं निघूनही गेली.

याला आपण नेमकं काय नाव द्यावं? ‘महागाई किती वाढलीय’ असं ओरडणारी अगदी साधी साधी माणसंसुद्धा वडापाव घेताना पाच सात मिरच्या घेतात आणि त्यातली एखादीच खाऊन बाकीच्या चक्क कचऱ्यात टाकतात.. ! पराक्रम दाखवण्याच्या नादात एकस्ट्रा तिखट मिसळ मागवतात आणि चार घासातच त्यांचा धीर गळून पडतो. अन्न वाया.. ! सँडविचची हिरवी चटणी जास्तीची घेतात आणि टाकून देतात.. ! एखाद्या सँडविचवाल्याची किलोभर हिरवी चटणी दररोज सहजच उकिरड्यावर जात असेल..

गुरुवारी – शनिवारी देवळाबाहेर हात पसरुन बसलेली माणसं सुद्धा आता रुपया-दोन रुपयांचं नाणं, पार्ले बिस्कीट पुडा, एखादा वडापाव असलं काही दिलं तरी तोंड वेंगाडतात. त्यांना दहा रुपयांचं नाणं हवं असतं. ताजी पोळी-भाजी दिली तरी टाकून देणारे सुद्धा भिकारी मी पाहिलेत. मग भीक मागण्यामागची त्यांची नेमकी भावना तरी काय? 

आपल्याला आपल्या पात्रतेनुसार किंवा पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मिळतंय, याची जाणीव इथेही दिसत नाही. 

न कमावणारे, कमी कमावणारे, भरपूर कमावणारे, आपकमाईवाले, बापकमाईवाले सगळे सगळे या एकाच बोटीत बसलेले आहेत. काहीजणांची ही वृत्तीच आहे आणि काहीजणांना आपलं काहीतरी चुकतंय याची लांबलांबपर्यंत जाणीवच नाही. आणि दुसरं कुणी ह्यांना ही जाणीव करुन द्यायला तयार नाही.

महिन्यातले पंधरा दिवस मेसचा अख्खा डबा कचऱ्यात टाकणारे विद्यार्थी आणि मुलांच्या हट्टापायी भारंभार पदार्थ मागवून त्यातलं निम्म्याहून जास्त अन्न टाकणारे सुशिक्षित पालक दोघेही समाजाचे दोषी नाहीत का ? 

महागाई वाढल्याचं ढोंग करणारी माणसं त्यांची जीवनशैली जराही बदलायला तयार नाहीत. 

बापकमाईवर घेतलेला ब्रँडेड कपडा जास्तीत जास्त चार पाच वेळा घालून कपाटात कोंबणारे अन् पुढच्या महिन्यात पुन्हा नवे कपडे घेणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा नेमका कसा विचार करत असतील? त्यांचे आईवडील त्यांना दर महिन्याला पैसै पाठवताना काय विचार करत असतील? 

कॉलेजच्या ऑफिसात फी माफीचे अर्ज करुन घेणारी मुलं मला जेव्हां त्यांच्या परमप्रिय मैत्रिणीसोबत फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये दीडशे रुपयांचा उत्तप्पा खाताना दिसतात, तेव्हां त्यांची गरिबी नेमकी कोणती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण कॉलेजची फी खोटं कारण दाखवून माफ करुन घेऊन हॉटेलात एकावेळी पाचशे रुपयांची नोट खर्च करणं हे प्रामाणिक माणसाचं लक्षण नाही.

आमच्या आजूबाजूच्या परिसरात रात्री बारा वाजता पंधरा वीस बुलेट बाइक्स मोठाला आवाज करत गेल्या आणि अर्धा तास हवेत तीन चार हजार रुपयांची फटाक्यांची आतषबाजी होत राहिली की, आपण ओळखावं – आज कुठल्यातरी बेरोजगार दिवट्याचा वाढदिवस आहे आणि चार घरी धुणीभांडी करुन घराचा गाडा ओढणाऱ्या आपल्या आईच्या कमाईवर फुकट मजा मारणारं पोरगं आज एक वर्षानं मोठं झालं आहे.. ! रेशनचं अन्न आणून जगणाऱ्या घरच्या पोरांचे वाढदिवस रात्री बारा वाजता भर रस्त्यावर दोन-दोन केक आणून कसे होतात?

सर्वच स्तरांमध्ये माणसांच्या जगण्याच्या व्याख्या बदलतायत आणि त्या अमिबासारख्या आकार उकार बदलत चालल्या आहेत, हे स्पष्ट दिसतं. याचा विचार कुणी एकट्यानं नव्हे तर, संपूर्ण समाजव्यवस्थेनं केला पाहिजे आणि तो अत्यंत गंभीरपणे केला पाहिजे.

लोकांच्या खिशात पैसा उदंड झालाय? जास्तीचे पर्याय सहज उपलब्ध झालेत? मोकळीक अन् स्वातंत्र्य वाढलंय? की माणसाला कशाचीच किंमत राहिली नाहीय? 

जाणिवांचं श्राद्ध घालून कुठल्याशा पोकळ धुंदीत वागण्याची ही रित समाजातल्या सर्वच स्तरांमध्ये जाणवण्याइतपत वाढतेय, हे प्रगतीचं अन् शहाणपणाचं लक्षण मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही.

खरोखरचं सुजाण पालकत्व आणि आपण सुजाण पालक होण्यासाठी करत असलेला अनाठायी खर्च या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत का? संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा निर्माण करुन आपण काय मिळवतो आहोत, याचा हिशोब कधीतरी कुणीतरी लावला पाहिजे की नको? 

नादारीचा मुखवटा घालून आतून काजू-बदामावर ताव मारणं हे माणसांच्या खोटारडेपणाचं स्वच्छ लक्षण आहे. 

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक

संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ” कुठे थांबायचे?? कळलेच पाहिजे.” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “कुठे थांबायचे?? कळलेच पाहिजे.” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

” Enough for today” Osho चे वाक्य. •••••

“आज एवढं पुरे हं. “••••

 हे वाक्य खूप ऐकतो. ऐकत आलो आहोत. शाळेत ही एक पीरियड संपला की त्या विषयाचा अभ्यास झाला. कोणताही वर्ग योग वर्ग, डान्स क्लास, music class, असो एका निश्चित वेळेत तो संपतो. एका निश्चित वेळेनंतर ‘saturation ‘होत. लक्ष कमी होतं •••

आणि त्या कामाचा आनंद ही कमी होतो. म्हणजे अगदी उत्तम गाणारे असले तरी, त्या कार्यक्रमाचा आनंद एक तासभर चांगला वाटतो. ••••

लहानपणापासून आपण हे शिकतो की काही ही करताना थांबण्याची एक वेळ असते. थांबणे आवश्यक आहे. कुठे थांबायचे??? हे वेळेवर कळणे गरजेचे आहे. •••

लहानपणी शिकलेल्या काही गोष्टी माणूस जसा जसा मोठा होतो, तसा तसा विसरतो. •••

कोणतेही काम असो, कष्टाचे किंवा मनोरंजनाचे कुठे थांबायचे?? हे कळले पाहिजे. ठरविता आले पाहिजे. आणि थांबलेही पाहिजे. ••••

तो ना ‘ workoholic ‘ आहे. workoholic असो, नाही तर ‘Alcoholic’ असो, एका वेळेनंतर थांबलेच पाहिजे. •••

खाणे, झोपणे, काम करणे, काळजी करणे, बोलणे, हसणे, रडणे एका वेळेनंतर थांबलेच पाहिजे. पैसे खर्च करणे किंवा कंजुषी करणे. हेही करताना कुठे थांबायचे कळले पाहिजे. ••••

“अति तिथे माती ” म्हणतात ना ते लक्षात ठेवल्यास सर्व आटोपशीर राहतं. ••••

आयुष्यात नोकरी••• पैसे कमविणे, कष्ट करणे, धावपळ करणे चालूच असते. केंव्हा थांबवायचे??? हे ठरविता आले पाहिजे. राब राब राबणे, कष्ट करणेच म्हणजे आयुष्य जगणे नव्हे. ••••

प्रसिद्ध खेळाडू, Actors ला केव्हा संन्यास घ्यायचा हे कळले पाहिजे. •••• 

आपली जागा दुसऱ्याला देता आली पाहिजे ••••

मला सध्या (वयाच्या तिशीनंतरही) ‘लग्न करायचे नाही’. हा विचार, किंवा माझे करीयर जास्त महत्वाचे आहे. ‘सध्या मुलं नको ‘असे विचार, केव्हा थांबवायचे???? कळले पाहिजेच ••••

आपल्या dignity ला सांभाळून किती झुकायचे?? किती ऐकायचे?? किती दबायचे? किती ‘ gossip करायचे?? किती भाव खायचा??? किती कोणाला लुबाडायचे??? किती कोणाच्या गळ्यात पडायचे??? किती आपलंच कौतुक करायचे?? किती पाल्हाळ लावायचा?? या सर्व गोष्टी थांबवायचे… कळले पाहिजे. ••••

फोनवर किती वेळ बोलायचे??? केंव्हा बोलायचे??? किती जोरात बोलायचे??? किती दादागिरी करायची??? सर्व गोष्टी कळल्या पाहिजेत. •••••

ज्याला हे जमले तो हुशार व आजूबाजूचे पण सुखी होतात.

‘ Life is a game of Timing ‘

बरोबर निर्णय पण उशिरा घेतला तर त्याचा फायदा होत नाही. ••••

आपल ‘assessment ‘करता आल पाहिजे. आपली क्षमता, बुध्दी, साहस याच भान ठेवून निर्णय घेता आला पाहिजे. नाही तर कौन बनेगा करोडपती?? मधे पंचवीस लाख जिंकत असताना एका चूकीच्या निर्णयाने खाली पडताना आपण बघतोच.

••••

लोकांनी म्हणायच्या आत आपल्याला कळले पाहिजे केव्हा थांबायचे??? . एकुलता एक मुलगा असला तरी लाड करणे, कुठे थांबायचे?? केंव्हा ‘हो ‘आणि ‘नाही’ म्हणायचे हे कळलेच पाहिजे. नाहीतर मुलगा ‘बबडया’ व्हायला वेळ लागणार नाही. डोईजड होईल सर्व. •••••

 ‘ Balance ‘ समतोलपणा मग ते कोणतेही क्षेत्र असो सांभाळता आला पाहिजे. भाजीत जास्त मीठ चालत नाही. मग ती भाजी dry fruits ची का असेना.

 अति काहीच चांगले नाही. •••••.

थांबणे ही एक कला आहे.

कुठे?

केंव्हा?

कसे? थांबावे

ही एक कला आहे. ती सर्व कलांमध्ये लागू होते. ••••!!

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जागतिक महिला दिन – ८ मार्च” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “जागतिक महिला दिन – ८ मार्च” ☆ श्री सुधीर करंदीकर

मी नेहेमीच बायकोला खुश करण्याची संधी शोधत असतो. आणि मी तर म्हणीन कि सगळ्यांनीच अशा संधींच्या शोधात राहायला पाहिजे. बायको खुश असेल तर काय काय मज्जा येते – ये तो सभी जानते है. आज अनायसे अशी संधी चालत आली आहे. सकाळी चहा घेतांना बायकोला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विचार केला, बायकोला घेऊन जरा बाहेर फिरून यावं. तेवढ्यात बायकोला मैत्रिणीचा फोन आला. बायकोनी मला खूण करून सांगितले – तुम्ही जाऊन या, मला वेळ लागेल.

फिरत फिरत मृत्युंजय मंदिराच्या जवळच्या चहाच्या दुकानापर्यंत पोहोचलो आणि ओळखीचा म्हणजे मेघना आणि मनवा यांचा आवाज आला – काका, आहात कुठे? कित्येक महिन्यात भेट नाही.

मी – सांगतो, सांगतो,. पण त्याआधी –

मी : आज ८ मार्च – आज खास दिवस आहे – जागतिक महिला दिवस. मेघना आणि मनवा तुम्हाला जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मैत्रिणींना पण शुभेच्छा द्या.

मेघना आणि मनवा : काका, धन्यवाद. आज पहिल्या शुभेच्छा तुमच्याकडूनच मिळाल्या, मजा आली.

चहावाल्या काकांना मी बाहेर बोलावलं. त्यांनी पण शुभेच्छा दिल्या. आणि गम्मत म्हणजे आजूबाजूला उभे असणाऱ्या चहा पिणाऱ्या सगळ्यांनीच मेघना आणि मनवा यांना शुभेच्छा दिल्या.

मेघना आणि मनवा एकदम खुश झाल्या. त्यांनी सगळ्यांना थँक्स दिल्या.

तेवढ्यात आमच्या हातात गरमागरम चहाचे ग्लास आले.

मनवा : काका, आजच्या दिवसामागची हिस्ट्री काय आहे, ते माहित आहे का?

मी : नक्कीच. बाहेरची कामे करतांना पुरुष आणि स्त्रिया यांना समान हक्क मिळावेत म्हणून पूर्वी जगभर आंदोलने झाली आणि स्त्रियांना त्यात यश मिळाले. आणि हा आनंद साजरा करण्याकरता ८ मार्च १९१७ या दिवशी “जागतिक महिला दिन” चा जन्म झाला. सगळ्याच देशांमध्ये हा दिवस साजरा होतो.

मेघना : आता बहुतेक देशात स्त्रियांना समान हक्क मिळाले आहेत. सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया आज कार्यरत आहेत. काही ठिकाणी त्या उच्च पदांवर काम करत आहेत.

मनवा : मैदानी खेळांमध्ये आणि राजकारणात पण पुढे आहेत. पंतप्रधान / राष्ट्रपती या पदांपर्यंत पण महिला पोहोचल्या आहेत. आता तर मंगळावर उतरणारी पहिली व्यक्ती हा बहुमान स्त्रीला मिळणार आहे, असे सांगतात.

मेघना : कला क्षेत्र, चित्रकला, गाणी, नृत्य, साहित्य, सिनेमा वगैरे मधे पण स्त्रिया आघाडीवर आहेत.

मी : खरंच अभिमान वाटावा असंच आहे. पण सिनेमा / टीव्ही या क्षेत्रांमध्ये आघाडी घेण्याकरता त्यांनी निवडलेली अंगप्रदर्शनाची वाट मात्र मनाला खटकते. आणि त्याचेच अनुकरण घराघरात होतांना दिसते.

मनवा : ग्लॅमर पुढे स्त्रिया बुद्धी गहाण ठेवतात हे न रुचणारे सत्य आहे. स्त्रिया या बाबतीत बदलतील अशी शेजारीच असलेल्या देवळा मधल्या देवतेला आपण प्रार्थना करूया..

मेघना : जागतिक महिला दिन सुरु करण्यामागचा जो मूळ उद्देश होता, तो आता पूर्ण होऊनही बरीच वर्ष झाली आहेत. त्यामुळे सध्यातरी या दिवसाचं महत्व फक्त शुभेच्छांची देवाणघेवाण करणे इतपतच राहिलं आहे

मी : बाहेरच्या जगामधे समान हक्क मिळालेल्या स्त्रियांना आपल्या घरांमध्ये पण समान हक्क आहेत कां?

मनवा : सगळ्या स्त्रियांनी जर मनापासून याचं उत्तर दिलं, तर ‘नाही’ असेच त्यांचं उत्तर येईल. जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्यांना नुसत्या “हॅपी महिला दिन ” अशा शुभेच्छा देऊन त्या घरामधे आनंदित होतील का? स्त्री शिवाय घराला घरपण येत नाही असं म्हणतात. मग या स्त्री ला घरामध्ये आनंद देण्याकरता, आपण घरातली मंडळी हिच्या करता काय वेगळं करतो? बहुतेकांकडून उत्तर येईल – काहीच वेगळं करत नाही.

मेघना : प्रत्येक घरात स्त्री ही आई म्हणून रोल करत असते, बायको म्हणून रोल करत असते, सून म्हणून रोल करत असते आणि बाहेर नोकरी, व्यवसाय हे पण करत असते. असे असूनही, घरातले सगळे जण हिला “टेकन फॉर ग्रंटेड” म्हणून घेत असतात. घरातलं सैपाक पाणी / आवराआवर / मुलांचे डबे भरणे / मुलांची शाळेची तयारी / किराणा आणणे / भाजी बाजार आणि सगळी अवांतर कामे, ह्या सगळ्या तिच्याच जबाबदाऱ्या असतात. ती घरात असतांना सगळे जण, हे कुठे आहे / ते कुठे आहे / हे दे / ते दे, असा तगादा तिच्या मागे लावत असतात. सकाळी ऑफिसला जातांना मोबाईलसकट सगळे साहित्य आपल्या हातात यावे अशी नवऱ्याची बायकोकडून अपेक्षा असते. मग नोकरीला जाणाऱ्या स्त्रीने नवऱ्याकडून अशी अपेक्षा का करू नये.

मनवा : मुलगा आणि सून दोघेही ऑफिस ला निघतांना डबा, पाणी, मोबाईल असे सगळे त्यांच्या हातात देणारे सासू / सासरे कुणाच्या बघण्यात आहेत का?

मी : कधी ऐकण्यात नाही. किंवा कुठल्या टीव्ही सिरीयल मधे पण नाहीत

मनवा : किती नवरे घरी जातांना बायकोकरता प्रेमानी गजरा घेऊन जातात / बायको ऑफिस मधून आल्यावर तिच्या ऑफिस च्या कामाबद्दल चौकशी करतात / तू दमली असशील, जरा गाणी वगैरे ऐक, मी चहा करतो / कुकर लावतो / वगैरे, असे म्हणतात. कितीजण तिला सैपाकघरातून तिचा हात धरून सोफ्यापर्यंत घेऊन जातात आणि प्रेमानी खाली बसवतात? आणि हातात चहाचा कप देतात! उत्तर येईल बोटावर मोजण्याइतपतच. आपण केलेल्या कामाचं कौतुक व्हावं, असं सगळ्यांनाच वाटत असतं. आजची डब्यातली पालक – पनीर भाजी एकदम हटके होती, किंवा आज डब्यात पुऱ्या आणि श्रीखंड मुळे मजा आली, एवढं बायकोचं कौतुक पण खरंतर पुरेसं असत. घरातले किती जण असं कौतूक करतात! .

मेघना : किती सासवा सून ऑफिसमधून आल्यानंतर तिच्या हातात खाण्याची डिश देतात / चहा देतात. उत्तर येईल अगदी एखादी.

मनवा : सुनेची विचारपूस करणे / सुनेला मदत करण्याची जेंव्हा गरज असते तेव्हा सासरे त्यांच्या कट्ट्यावर गप्पा मारायला गेलेले असतात किंवा घरात मेडिटेशन करत असतात.

या सगळ्याला अपवादात्मक मंडळी नक्कीच आहेत, किती आहेत, हे मोजायला मात्र आपली हाताची बोटे पुरेशी आहेत.

मी : तुम्ही दोघी म्हणता ते अगदी बरोबर आहे. पण काही बाबतीत, स्त्रियांचे पण चुकत असते. घरातली सगळी कामे स्वतःवर ओढून घेण्याची त्यांची सवय त्यांनी बदलायला पाहिजे. धकाधकीच्या जीवनात आनंदी आणि हेल्दी राहणे पुरुष आणि स्त्रिया या दोघांना पण गरजेचे आहे. आणि याकरता रोज एक ते दीड तास प्रत्येकाने स्वतः करता राखून ठेवलाच पाहिजे.

मनवा : काका, आपने सही फर्मया है. स्त्रियांना जर असा वेळ काढायचा असेल तर घरामधल्या कामाची विभागणी हि करायलाच पाहिजे. आणि त्याकरता कोण काय म्हणेल, याला गौण महत्व द्यायला शिकले पाहिजे.

मेघना : सकाळचा चहा / खाणे, संध्याकाळचे खाणे पिणे, घरातली अवांतर कामे, थोडी आवराआवर, मुलांचे अभ्यास घेणे ह्या कामात सासू सासरे नक्कीच हातभार लावू शकतात. इतर कामे नवऱ्याबरोबर शेअर करता यतात. ध्येय एकच, कि घर चालवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे आणि मला पण माझ्या हॉबी जपायला, व्यायाम करायला, वगैरे वेळ मिळालाच पाहिजे आणि मी तो मिळवणारच.

मनवा : थोडक्यात काय? तर स्त्रियांनी स्वतःवर प्रेम करणे, याला पहिली प्रायोरिटी दिलीच पाहिजे.

मेघना : आता मजा बघा, स्त्री आणि पुरुष हि नक्कीच दोन वेगळी रसायने आहेत. त्यामुळे एकमेकांना समजण्यात थोडे अंतर पडू शकते. पण घरामधली सासू आणि सून यांचे स्त्री रसायन तर एकच असते. तरीपण कुठल्याही स्त्री च्या मागे सासू हे शीर्षक लागलं, की त्यांचं सून या स्त्री च्या बाबतीत वागणे कां बदलते, सुनेला आपलीच मुलगी असे मनापासून समजून तिच्यावर त्या प्रेम का करत नाहीत? आणि स्त्रीच स्त्रीची दुश्मन कां व्हावी, हे एक न उलगडणारे कोडेच आहे.

मी : मला वाटतं सासू या शब्दामधेच ती मेख आहे. लग्न झाल्यानंतर जर नवऱ्याच्या आईचे सासुऐवजी मावशी असे नामकरण केले, तर हे न उलगडणारे कोडे सहज सुटेल. मावशी या नात्यात एक वेगळेच प्रेम आहे. आपल्याकडे म्हण आहे – माय मरो पण मावशी जगो.

मनवा आणि मेघना : काका, एकदम जालीम उपाय आहे. आम्ही घरी गेल्यावर सासूबाईंना आपल्या गप्पांचा संदर्भ देऊन मावशी म्हणायला सुरुवात करतो.

बाजूला चहा पित उभा असलेला ग्रुप : काका कल्पना आवडली. संध्याकाळी घरी गेल्यावर बायकोला सांगतो, की, आईला आता मावशी म्हणत जा. पुढच्या भेटीत तुम्हाला फीडबॅक देतो.

मेघना : काका, तुम्ही आल्यामुळे गप्पा मस्त रंगल्या, काही छान उपाय पुढे आले, मजा आली. चला आम्हाला ऑफिसला निघायला पाहिजे.

सगळ्यांना बाय केले आणि आम्ही आपापल्या मार्गाला लागलो.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जगातले सर्वात श्रीमंत मुख्याध्यापक…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “जगातले सर्वात श्रीमंत मुख्याध्यापक…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

“सरू, चाळीस वर्षं… तब्बल चाळीस वर्षं रक्ताचं पाणी केलं ग मी या पोरांसाठी! स्वतःच्या लेकरावाणी जपलं एकेकाला. पण आज माझा शाळेतला शेवटचा दिवस होता. निरोप समारंभ तर सोडाच, पण एकानेही साधं १ रुपयाचं गुलाबाचं फूलही दिलं नाही ग. मी काय कमी पडलो होतो का ग शिकवायला? का आजकालच्या पोरांच्या काळजात पाझरच उरला नाही? “

देसाई सर सोफ्यावर बसून लहान मुलासारखे धाय मोकलून रडत होते आणि त्यांची बायको त्यांना निमूटपणे सावरत होती.

​​देसाई सर… जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक. शिस्तीचे पक्के, पण मनाने मेणासारखे मऊ. हातातल्या छडीचा मार आणि डोळ्यातलं प्रेम, दोन्हीही विद्यार्थ्यांनी अनुभवलं होतं. आज ३१ मार्च. देसाई सरांच्या रिटायरमेंटचा (सेवानिवृत्तीचा) दिवस.

सकाळपासून देसाई सर आरशासमोर उभे राहून तयारी करत होते. त्यांनी आपली जुना पण कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र शर्ट आणि खाकी पॅन्ट घातली होती. मनात एक वेगळीच हुरहुर होती.

“आज नक्कीच शाळेत मोठा कार्यक्रम असेल. सगळी जुनी पोरं येतील, भाषणांवर भाषणं होतील, गळ्यात हारांचे ओझे असेल… ” या विचारानेच त्यांचे डोळे पाणावले होते.

​सर शाळेत पोहोचले. पण हे काय? शाळेचं फाटक उघडंच होतं, पण तिथे ना फुलांची सजावट होती, ना मंडप टाकला होता. पटांगण सुनं सुनं होतं. सर ऑफिसमध्ये गेले.

सहकारी शिक्षकांनी “गुड मॉर्निंग सर” म्हटलं आणि आपापल्या कामाला लागले. शिपाई रामूकाकासुद्धा नेहमीसारखेच चहा घेऊन आले.

देसाई सरांना वाटलं, ‘कदाचित सरप्राइज असेल. दुपारपर्यंत तयारी करतील. ‘

​दुपार झाली, शाळा सुटायची वेळ झाली. पण काहीच हालचाल नाही. शेवटची घंटा वाजली. मुलं दप्तरं घेऊन पळाली. शिक्षकांनी रजिस्टरवर सह्या केल्या आणि “सर, येतो आम्ही, निवांत भेटा आता, ” असं रुक्षपणे म्हणून निघून गेले.

देसाई सर आपल्या खुर्चीतून उठले. त्यांनी त्या रिकाम्या वर्गांकडे पाहिलं. भिंतीवरचे फळे, ती बाकडी… सगळं काही शांत होतं. त्यांच्या गळ्यात हुंदका दाटून आला. ‘ज्या शाळेला मी मंदिर मानलं, तिथे आज माझ्या जाण्याने कुणालाच काही फरक पडत नाही? ‘

जड पावलांनी, मान खाली घालून सर शाळेबाहेर पडले. रस्ताभर त्यांना लोकांचे चेहरा बघवत नव्हते. त्यांना वाटत होतं, आपण आयुष्यभर फुकट राबलो. कुणालाच कदर नाही.

​घरी येताना त्यांच्या डोक्यात एकच विचार चक्रावून गेला – ‘कर्ज’.

०देसाई सरांनी मुलीच्या लग्नासाठी आणि घराच्या दुरुस्तीसाठी बँकेतून ५ लाखांचे कर्ज काढले होते.

पेन्शनमधून अर्धे पैसे जाणार होते. म्हातारपण कसं जाईल, या चिंतेने त्यांना ग्रासलं होतं. पण त्याहीपेक्षा जास्त दुःख होतं ते ‘उपेक्षेचं’.

​घरी आल्यावर त्यांनी पत्नीसमोर मन मोकळं केलं आणि रडू लागले. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.

सरांनी डोळे पुसले आणि दार उघडलं. समोर पोस्टमन उभा होता.

“देसाई साहेब, बँकेतून पत्र आलंय. अर्जंट आहे, सही करा. “

सरांच्या पोटात गोळा आला. ‘नक्कीच कर्जाच्या हप्त्याची नोटीस असेल. रिटायर झालो नाही, तोच बँकेने तगादा लावला, ‘ असं वाटून त्यांनी थरथरत्या हाताने पाकीट घेतलं.

​ते सोफ्यावर बसले आणि त्यांनी पाकीट फोडलं. आत बँकेचं अधिकृत पत्र आणि एक दुमडलेला कागद होता.

सरांनी बँकेचं पत्र वाचायला सुरुवात केली आणि… वाचता वाचता त्यांचे डोळे विस्फारले. त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यांनी चष्मा पुसून पुन्हा वाचलं.

त्यात स्पष्ट लिहिलं होतं – “श्री. देसाई सर, तुमचे घराचे ५, ००, ००० (पाच लाख) रुपयांचे गृहकर्ज आज दिनांक ३१ मार्च रोजी पूर्णपणे परतफेड (Nil/Closed) करण्यात आले आहे. आता बँकेची तुमच्यावर कोणतीही देणी बाकी नाहीत. “

​सर गोंधळले. “हे कसं शक्य आहे? मी तर पैसे भरलेच नाहीत. “

त्यांनी तो सोबतचा दुसरा कागद उघडला. ते एक हाताने लिहिलेलं पत्र होतं.

​पत्र:

“आदरणीय देसाई सर,

आम्हाला माहीत आहे, आज तुम्ही शाळेतून रिकाम्या हाताने आणि जड अंतःकरणाने घरी गेलात. तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या विद्यार्थ्यांची आठवणशक्ती कमी झाली आहे. पण सर, तुमची शिकवण आम्ही विसरलो नाही.

आम्ही सर्वांनी (तुमच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी आणि सहकारी शिक्षकांनी) मिळून ठरवलं होतं की, तुम्हाला हार-तुरे, शाल-श्रीफळ आणि पेढे देऊन तुमचा सत्कार करायचा नाही. त्या हार-फुलांची किंमत दोन दिवसात कोमेजून जाते.

त्याऐवजी आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून ‘गुप्त वर्गणी’ जमा करत होतो. त्यात आम्हां विद्यार्थ्यांसोबत शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी, शिपायांनी आणि मुख्य म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली मोठमोठ्या पदावर असलेल्या तुमच्या माजी विद्यार्थ्यांनी तर खूप मदत केली. आम्हाला माहीत होतं की तुमच्या डोक्यावर कर्जाचं ओझे आहे आणि निवृत्तीनंतर तुम्हाला त्याची काळजी सतावणार आहे.

म्हणून, तुमच्या निवृत्तीच्या दिवशी, आम्ही तुम्हाला ‘ताणमुक्त’ आयुष्य भेट देत आहोत.

सर, तुम्ही आम्हाला घडवलंत, आता तुमचं म्हातारपण सुखात जावं, हीच आमची खरी गुरुदक्षिणा!

तुमच्यावर प्रेम करणारी… तुमची ‘कृतघ्न’ वाटलेली पोरं! “

​पत्राखाली शेकडो विद्यार्थ्यांच्या सह्या होत्या.

देसाई सर स्तब्ध झाले. त्यांच्या हातातून कागद गळून पडला.

तेवढ्यात घराबाहेर “देसाई सर आगे बढो, हम तुम्हारे साथ है! ” अशा घोषणा ऐकू आल्या.

सरांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. संपूर्ण गल्लीत त्यांचे शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि गावकरी उभे होते. कुणी ढोल वाजवत होतं, तर कुणी डोळ्यात पाणी आणून बघत होतं.

​देसाई सर धावत बाहेर आले. त्यांनी कोणा एकाला नाही, तर समोरच्या गर्दीला हात जोडले आणि गुडघे टेकून जमिनीवर डोकं ठेवलं.

त्यांच्या डोळ्यातून आज दुःख नाही, तर अपार कृतज्ञतेचे अश्रू वाहत होते.

त्यांना उमजलं होतं – ‘माणसं जोडली की पैसा गौण ठरतो. हार गळ्यात नाही, तर लोकांच्या हृदयात असावा लागतो. ‘

आज देसाई सर जगातले सर्वात श्रीमंत मुख्याध्यापक होते.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मराठी माझ्या घरी… ☆ प्राजक्ता नरवणे ☆

प्राजक्ता नरवणे

अल्प परिचय 

अनेक वर्षांपासून ऑस्टिन, टेक्सास, USA येथे वास्तव्य.

इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असून, सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील कामाचा २५ वर्षांचा अनुभव. सध्या सेमीकंडक्टर चीप डिझाईन कंपनीमध्ये सिनियर प्रिंसिपल पदावर कार्यरत.

या व्यतिरिक्त मराठी आणि इंग्रजी लेख, कविता अशा लेखनाबरोबरच मराठी नाटकात प्रमूख भूमिका, संगीत कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि कवितांवर आधारित कार्यक्रम यातही सक्रिय. त्याचबरोबर गिरिभ्रमणाचीही आवड.

??

✦ मराठी माझ्या घरी… ✦ प्राजक्ता नरवणे ☆

माझे नवीन नवीन लग्न झाले तेंव्हाची गोष्ट, २५ वर्षापूर्वीची! पुण्यात नवर्‍याबरोबर त्याच्या एका नातेवाईकांकडे गेले होते. मला सगळेच नवीन होते. तेथे एक ८-९ वर्षाचा मुलगा खाकी चड्डी आणि बनियन घालून “सकाळ” वाचीत बसला होता. मी सहजच त्याला विचारले, “कुठल्या शाळेत जातोस? ” त्याने पटकन कुठल्याश्या शाळेचे नाव सांगितले आणि म्हणाला, “ही शाळा कॅलिफोर्नियात आहे. ” मी तीनताड उडाले आणि आपल्या मुलाला नुसते मराठी बोलायलाच नाही तर वाचायलाही शिकवणार्‍या त्याच्या NRI पालकांना मनातल्या मनात शतश: दंडवत घातले! तेव्हा मीही नवर्‍याच्या मागे मागे देशांतराची तयारी चालवली होती, त्यामुळे या प्रसंगानंतर मी ही ठरवले की माझ्या मुलांनाही असेच मराठी येत असेल!

पुढे सिंगापूरला स्थायिक झाल्यावर आम्हाला एक गोंडससा मुलगा (आपला तो बाब्या) झाला. त्याला आम्ही प्रेमाने “डामू” म्हणायचो… “डामरट मुलगा! “. हा डामू ७ महिन्यांचा असताना आम्ही त्याला घेऊन चीनला माझ्या आत्येभावाकडे गेलो होतो. हे आमचे यजमान कुटुंब अमेरिकेचे नागरिक, पण नोकरीच्या निमित्ताने २ वर्षांसाठी चीनमधे आले होते. त्यांची २ मुले साधारण ८ ते १२ वयोगटातील.. पण घरात छान मराठीत बोलायचे. इमारतीमधील इतर गोर्‍या मुलांशी झकास अमेरीकन उच्चारासकट इंग्रजी बोलायचे आणि बाजारात चिनी दुकानदारांशी अस्खलित चिनी भाषेत बोलायची. ते पाहून वाटले की मुलांची नवीन काही शिकण्याची क्षमता जबरदस्त असते हे खरेच, आणि म्हणून याच वयात आम्ही “डामू” ला ही वेगवेगळ्या भाषांचा परिचय करून दिला पाहिजे!

डामूच्या जन्माआधीपासूनच आम्ही दोघे घरात मराठीतच बोलायचो, तसेच त्याच्या बरोबरही मराठीतच बोलायला लागलो. कधी कोणी प्रश्न विचारला की “अग पण मग याला बाहेर गेल्यावर “प्रोब्लेम” येईल. ” पण म्हंटलं, “नाही तरी तो बाहेर म्हणजे कुठे शाळेतच जाणार ना.. मग तिथे तो शिकेल आपल्या आपण इंग्रजी. पण त्याची मराठीची शाळा फक्त घरच असणार आहे. “

या आमच्या विचारधारणेची पहिली कसोटी लागली ती तो १८ महिन्यांचा असताना त्याला पाळणाघरात घातले तेंव्हा! त्याला इंग्रजीचा फारसा गंध नव्हता. मला थोडीशी चिंता वाटत होती हा कसा तिथे रुळेल? त्याला जर इंग्रजीमधे शिक्षिका काय म्हणत आहेत हे कळले नाही तर त्यांना सांगायला याला धड बोलतही येत नाही. अजून आईलाही नुसता “ई” म्हणून हाक मारतो. पण माझा विश्वास सार्थ ठरला. काही दिवसातच तो तिथे इतका रुळला की थोडे बोलता येऊ लागताच तो आमच्याशी मराठीत आणि तिथे मस्त इंग्रजी + मलय + चीनी अशा खिचडीसदृश्य “सिंगलीश” मधे बोलायला लागला. घरात मराठी हे नकळत्या वयात मनात जिरले. बळजबरी करावी लागली नाही. उलट एकदा त्यानेच माझी एक वाईट खोड पकडली. मी त्याला कशावरून तरी प्रचंड रागावत असताना त्याने थंडपणे विचारले, “तू इंग्लिश मध्ये का रागवतेस”?

जसजसा डामू मोठा होत गेला तसतसा त्याची मराठी आणि इंग्रजीही सुधारत गेली. नवीन मराठी शब्द शिकण्याची इच्छा प्रबळ होत गेली आणि मुख्य गोष्ट म्हणजे आता “आपण मराठी बोलतो” याचा त्याला अभिमान आहे. पण या अभिमानाने माझी एकदा मोठी गोची झाली! सिंगापूर महाराष्ट्र मंडळाच्या मी काम करत असलेल्या “रात्र थोडी सोंगे फार” या नाटकाचे दिग्दर्शक होते गुजराथी. पण बरेच वर्ष मुंबईमधे काढल्याने त्यांना छान मराठी कळायचे. पण आता अनेक वर्ष सिंगापूरमधे काढल्याने त्यांचा मराठी बोलण्याचा सराव तुटला होता. त्यामुळे ते आमच्याशी हिंदी किंवा इंग्रजीमधे बोलायचे. डामू नेहमी माझ्या बरोबर नाटकाच्या तालमीला यायचा. एक दिवस हे वय वर्षे ७ चे कार्टे सरळ आमच्या दिग्दर्शकांना म्हणाले, ” हे महाराष्ट्र मंडळ आहे. इथे सगळ्यांनी मराठीमधेच बोलायचं! ” खुद्द दिग्दर्शकांना असे म्हटल्या मुळे मला धरणी दुभंगून पोटात घेईल का असे वाटू लागले. पण आमच्या मोठ्या मनाच्या दिग्दर्शकांनी मोठ्याने हसून त्याच्याशी मराठीमधेच बोलायला सुरुवात केली! यातील विनोद बाजूला.. पण मुलांच्या मनात मराठीबद्दल अभिमान उत्पन्न होणे महत्वाचे!

इथे परदेशात स्वत:चे मराठी राखताना आणि मुलाचे वाढवताना एक मर्यादा जाणवते ती म्हणजे इथे मराठी ऐकायला मिळणाच्या संधीची! आपली पिढी भारतात वाढताना आपण घरीदारी, शाळेत, बाजारात, मंदिरात, अगदी कट्ट्यावर सुद्धा मराठी शिकलो. पण इथे घर हाच फक्त मराठी कानावर पडण्याचा स्त्रोत आहे. त्यामुळे घरात वापरात येणारे शब्दच फक्त आपल्या शब्द्कोशात राहात आहेत. त्यावर थोडासा उपाय म्हणून आम्ही शरण गेलो, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या “पु. ल. देशपांडे” यांना. आमच्या गाडीमध्ये डामू लहान असल्यापासून पु. लं चे अभिवाचन सतत लागलेले असायचे आणि असते. आम्ही कधीच त्याच्यासाठी इंग्रजी बालकविता लावल्या नाहीत. लावली तर मराठी बडबड गीते. पण सतत “पु. ल. देशपांडे” ऐकून ऐकून त्याच्या मराठीचा दर्जा सुधारला. आजही महाविद्यालयात येणाऱ्या ताणावर रामबाण उपाय म्हणून तो “पु. ल. देशपांडे” ऐकतो.

तो चौथीत असताना आम्ही ऑस्टिनला स्थलांतरित झालो. पुढच्याच वर्षी त्याने “सांगा सांगा शब्द सांगा” या मराठी मंडळाच्या लहान मुलांसाठीच्या प्रश्नमंजुषेचे सराईतपणे मराठीत सूत्रसंचालन केले. त्याचे मराठी बोलणे, उच्चार ऐकून काही लोकं स्वतःच निष्कर्ष काढू लागले, “हां, बरोबर आहे. तो सिंगापूरला होता ना! ” आम्ही बुचकुळ्यात पडायचो कारण सिंगापूरची मराठी लोकसंख्या ऑस्टिनच्या मराठी लोकसंख्येपेक्षाही कमी आहे. आमच्या मते हे स्थळाचे नसून, इच्छाशक्तीचे आणि देशोदेशी पसरलेल्या मराठी मंडळांसारख्या व्यासपीठांचे फळ आहे. स्थळाचा फायदा थोडाफार झाला असेल तर तो त्याला देवनागरी लिपी शिकवायला. पण इथेही मराठी शाळेचे माध्यम उपलब्ध आहे.

मराठीबद्दल प्रेम निर्माण झाल्यावर पुढची पायरी म्हणजे मराठी वाचनाची गोडी. सिंगापूरच्या पहिल्या ४ वर्षांच्या त्याच्या शालेय अभ्यासक्रमातील ‘हिंदी’ या विषयामुळे देवनागरी लिपीची ओळख त्याला होतीच, तीच पुढे मराठीमधील सुंदर साहित्य वाचायला डामूला उपयोगी पडली. आजकाल अधूनमधून मला पिंटरेस्ट वरील मराठी कविता येत असतात. सुटीला घरी आल्यावर ग. दि मा. , शांताबाई, बहिणाई, इंदिरा संत यांच्या कविता आम्ही दोघे मिळून वाचत असतो. आम्हाला म्हणतो, आपण आता फक्त शुद्ध मराठीत बोलायचं, मराठी वाक्यात एकही इंग्रजी शब्द न वापरण्याचा “पण” करायचा. पण हा पण सांभाळता सांभाळता सगळ्यांच्या तोंडाला फेफरे येते.

२२ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा ‘हसत खेळत “मराठी माझ्या घरी”’ चा प्रयोग आता सुफळ संपूर्ण झाल्याची पावती आम्हाला गेले दोन वर्ष निर्विवाद मिळत आहे.

कोलंबिया युनिव्हर्सिटी मधील मातृभाषा दिनाच्या निमित्ताने डामू जेव्हा मी केलेल्या कविता सर्वांसमोर अस्खलित मराठीमध्ये सादर करतो तेव्हा असे वाटते की ज्या मराठीला माऊलींनी प्रत्यक्ष भगवतगीता भाषांतरीत करून पावन केले, तिचा गुंजारव जर असाच अनेक येणार्‍या पिढ्यानपिढ्या निनादत ठेवायचा असेल, तर प्रत्येक मराठी माणसाने आपल्या अंतरंगातील तिच्या प्रेमाचा झरा कधीही आटू देऊ नये. त्यात जर कधी प्रतिष्ठेचा, निष्क्रियतेचा किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा गाळ साठत असेल तर तो वेळोवेळी बाजूला करून तो प्रवाह अगदी खळखळून वाहू दिला पाहिजे.

– – – 

© प्राजक्ता नरवणे

ऑस्टिन, टेक्सास

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मी तरी अशी कशी???” ☆ मंजुषा सुनीत मुळे☆

मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “मी तरी अशी कशी???” ☆  मंजुषा सुनीत मुळे  ☆

*

मी तरी अशी कशी???

 – – एकादशी दुप्पट खाशी… तरीही म्हणे मी उपाशी???

… आज “ पापमोचनी “ एकादशी म्हणून जराशीच लवकर उठले… पटापट आवरून पूजेला बसले. हार फुलांनी विठूला सजवले… पण…

.. पण लक्ष सगळं चुलीशी… पोट ओरडतंय ना… मी तर कालच्या रात्रीपासून आहे की उपाशी… ॥

… मग पूजा पटापट उरकून केली भगर नि दाण्याची आमटी उलुशी …चविष्ट खिचडी जराशी… अन् पित्त नको म्हणून गोडशी लापशी…अंमळ जास्तच झालं म्हणत… सुपारीही खाल्ली की चुकून जराशी…

तरी का वाटतंय् मला… मी आहे उपाशी… ॥

… आज भजनाचा स्पेशल क्लास… आहे ना ही ‘ पापमोचनी’ एकादशी..

मग वामकुक्षी सोडून उठले पटदिशी… मेकअप आवरला अगदी झटदिशी.. साडी नेसले ठेवणीतली झकासशी…

पण निघतांनाही वाटत होतं… आहे मी उपाशी॥

… संध्याकाळी ‘फक्त’ थालीपीठं खमंगशी… चापून खाल्ली लोणकढ्या तुपाशी…

मागचं आवरून टाकलं अगदीच चटदिशी…

टी. व्ही. पहायला अन् आडवारले जराशी… 

तरी अजून का वाटतंय् असल्यासारखं उपाशी? … ॥

… नकळतच डोळा लागला अन् मनाला जाग आली जराशी

… पोटात अडकलेले विचार… हळूच निसटून गेले मनात… अन् दचकलेच जराशी

… मनाचा देव्हारा तर रिकामाच होता… विठूरायाचा त्यात मागमूसही नव्हता…

… त्यालाच नेमकी विसरले कशी? खंत फार दाटून आली मनाच्या तळाशी… ॥

… अन् अचानक कुणीतरी बोललं कानाशी… उठून बसले मी खट्टदिशी…

… ‘‘उपास उपास म्हणत दुप्पट की खाल्लंस… आणि माझ्याकडे नेमकं दुर्लक्ष केलंस… 

… असू देत आता यावेळी… तसंही ‘पापमोचन’ नाहीच होणार.. पण तरी माफ करून टाकतो तुला…

… मात्र खाण्याच्या नादात पुन्हा मला विसरलीस तर… तर जन्मात मी कधीच भेटणार नाही तुला…

… माझ्याखेरीज मनात सारखं इतर भरताड करतेस कशाला? ..

… तिथे असू दे जागा… फक्त माझ्या नामाला…

… मन भरून सतत आठव मला … विसरून जा जरा स्वत:ला…

… मग मात्र नक्की म्हणशील… मन स्वानंदाने गच्च भरलंय्… 

… नंतर खुशाल असं म्हण ना की… एकादशी दुप्पट खाशी…

… पण.. पण आता मात्र मी मुळीच नाही उपाशी… ॥

© मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सौंदर्यदर्शनम्… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

✦ सौंदर्यदर्शनम्… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆

मी किचनकडे चाललो होतो तर बायको म्हणाली, ” चहा करणार असाल तर मला पण करा अर्धा कप, जास्ती नको. ” मी चहा करून तिला दिला. तिनं एक घोट घेतला अन् उद्गारली, ” वा, सुंदर, सुंदर झालाय! ” ” थँक्यू” माझी संयमित प्रतिक्रिया. तेवढ्यात दारावरची बेल वाजली म्हणून दार उघडले. घरात पाऊल टाकताच ऋद्धी उत्तेजित होऊन म्हणाली, ” आजोबा, काय सुंदर पिक्चर आहे हो ‘ दशावतार ‘. दिलीप काकांनी तर कमाल केलीय. सुंदर, अभिनय, सुंदर कोकण, सुंदर चित्रण, सुंदर दिग्दर्शन, व्वा! सुंदर भट्टी जमलीय. मजा आली. “

मला पंच्याहत्तर वर्षांपूर्वी पाठ्यपुस्तकात शिकलेली ग ह पाटलांची “देवा तुझे” ही सुंदर कविता आठवली…

देवा, तुझे किती, सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो ॥

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर

चांदणे सुंदर पडे त्याचे ॥

सुंदर ही झाडे, सुंदर पांखरे

किती गोड बरे गाणे गाती ॥

सुंदर वेलींची सुंदर ही फुले

तशी आम्ही मुले देवा तुझी ॥

इतुके सुंदर जग तुझे जर

किती तू सुंदर असशील!!

 

सौंदर्य—हे एक विलक्षण कोडं आहे!

जगाच्या प्रत्येक कणात, अणुरेणूत त्याचे अस्तित्व जाणवते, पण “हेच ते सौंदर्य” असे हातात घेऊन दाखवता येत नाही. अनुभवांच्या अनंत रंगपंचमीमध्ये विहरताना एकच प्रश्न मनात पुन्हा पुन्हा उगवतो, हे सौंदर्य म्हणजे नवकी आहे तरी काय? त्याची व्याख्या, त्याचे स्वरूपवर्णन, त्याची मिमांसा कशी करावी?

सूर्यास्ताची केशरी प्रभा, बाळाच्या चेहऱ्यावरची निष्पाप, निरागस स्मितरेषा, स्वरांच्या विलोभनीय विभ्रमातून झुळझुळणारा माधुर्यझरा, तरल कवितेतील भावाविष्कार, सद्गुणी माणसाच्या कृतीतून प्रकटणारे औदार्य, आर्तता, करुणा, या साऱ्यात अनामिक अशी एकच छटा असते, – ती म्हणजे सौंदर्याची अनुभूती. हे दृश्य नाही, वस्तू नाही; हे तर मनाच्या स्पर्शातून उमलणारे एक नाजूक भावतत्त्व आहे.

“सौंदर्य” हा शब्दच स्वतः अर्थपूर्ण आहे—

‘सु’ म्हणजे उत्तम आणि ‘अंदर्य’ म्हणजे रूप-गुणांचा संगम. त्यामुळे सौंदर्य केवळ बाह्य रूपांत नसून अंतर्गत लय, संतुलन, माधुर्य व समरसतेचा अविष्कार आहे.

पाश्चात्य तत्त्वज्ञानी आणि भारतीय आचार्यांनी या संकल्पनेला विविध कोनांतून उजाळा दिला आहे.

– – प्लेटो म्हणतो, “Beauty is the splendor of truth” —सत्याचा तेजस्वी झगमगाट म्हणजेच सौंदर्य.

– – अरिस्टॉटलच्या दृष्टीने सौंदर्य हे Order, Symmetry and Definiteness—क्रम, प्रमाण आणि स्पष्टतेत सामावलेले असते.

– –कांटच्या मते सौंदर्य म्हणजे disinterested pleasure—स्वार्थरहित, शुद्ध आनंद.

– – भारतीय परंपरेत भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील रससिद्धांत सौंदर्याच्या अनुभूतीचे केंद्रस्थान आहे. ‘रसोत्पत्ती’ म्हणजेच भावांचे सूक्ष्म स्पंदन मनात जागविणे; हेच कलात्मक सौंदर्याचे सर्वोच्च ध्येय.

✦ *सौंदर्याची वैशिष्ट्ये*

सौंदर्य हे केवळ पाहण्यात नसून जाणण्यात आहे. त्याची काही वैशिष्ट्ये—

१. संतुलन – जिथे अतिरेक नाही, तिथे सौंदर्य वसते. जसे स्वर-तालाची समतोल संगती.

२. लय – विश्वाचा नित्य प्रवाहातच लय आहे; पानांची हालचाल ते हृदयाची ठोके—सर्वत्र लय.

३. समरसता – विविध घटकांची एकात्मतेने झालेली सुंदर संगती.

४. माधुर्य – मनाला शांत करणारी, कोमल करणारी गोड, हवीहवीशी वाटणारी स्पंदने.

५. अहंकारशून्यता – जिथे ‘मी’ विरतो आणि अनुभवात मन पूर्णपणे लीन होते, तोच सौंदर्याचा परम क्षण.

 

भारतीय सौंदर्यमीमांसा

भारतीय चिंतनात सौंदर्य हे “सत्यम्, शिवम्, सुंदरम्” या त्रिसूत्रीमध्ये दडलेले आहे. ‘सुंदर’ म्हणजेच ‘सत्य’ आणि ‘शिव’ यांचे तेजस्वी रूप. भरतमुनींचे नाट्यशास्त्र, आनंदवर्धनाचा ध्वन्यालोक, अभिनवगुप्तांचे अभिनवभारती—हे सारे ग्रंथ सौंदर्यदृष्टीची अंतरंगातील दिशा दाखवतात.

रससिद्धांतानुसार कला म्हणजे रसनिर्मिती—अलौकिक, शुद्ध आणि उत्कट आनंदाचा अनुभव. शृंगारातील प्रेम, करुणेतून उमटणारी विषादलहरी किंवा वीररसमध्ये जाणवणारा पराक्रम—ही सर्व सौंदर्याची विविध रूपे.

भारतीय तत्त्वज्ञान सांगते की सौंदर्य वस्तूत नसते, तर रसग्राही मनात जन्मते. म्हणूनच एकाच दृश्यात एखाद्याला सौंदर्य दिसते, तर दुसऱ्याला कदाचित नाही—अनुभूतीची क्षमता भिन्न असते.

 

पाश्चात्य सौंदर्यमीमांसा

पाश्चात्य विचारसरणीने सौंदर्याला स्वतंत्र तत्त्व म्हणून प्रतिष्ठा दिली आहे.

प्लेटो—सर्व दृश्य-सौंदर्य हे परम आदर्शरूपाचे प्रतिबिंब.

अरिस्टॉटल—कला म्हणजे वास्तवाचे सर्जनशील अनुकरण (Mimesis).

कांट व हेगेल—बुद्धी आणि भावनांच्या समतोलातून सौंदर्य प्रकटते.

टॉलस्टॉय—कला म्हणजे भावनांचा संवेदनांद्वारे प्रसार.

– – या सर्व उक्ती एकच सांगतात—सौंदर्य हे दिसण्यात नव्हे, तर भावना, अर्थ आणि अभिव्यक्तीच्या संगमात असते.

 

✦ *कलेतील सौंदर्य*

.. कला म्हणजे सौंदर्याचा मूर्त अविष्कार!

.. चित्रकलेत रंग-रेषांची नृत्यलय,

.. संगीतामध्ये स्वर-तालाची समरसता,

.. कवितेत शब्द-अर्थ-भावनांची रेशीमगाठ

… कलाकाराच्या अंतर्मनातील स्पंदन जेव्हा रूप घेतं, तेव्हा सौंदर्याचा जन्म होतो.

 

✦ *निसर्गातील सौंदर्य*

निसर्ग हे सौंदर्याचे शुद्धतम रूप!

पहाटेचा शीतल, आल्हाददायक, सुगंध, वाऱ्याची हलकीशी सळसळ, समुद्राच्या लाटांची नित्य लय, फुलांचा बहर, पावसाची रिमझिम—या प्रत्येक क्षणातून सौंदर्य अमृतधारेसारखे ओघळते. निसर्गच कलाकाराला प्रेरणा देणारा पहिला गुरू आहे.

 

✦ *मानवी जीवनातील सौंदर्य*

मानवी सौंदर्य हे देहात नाही, तर माणसाच्या वर्तनात, संस्कारांत, विचारांत असते.

नम्र वाणी, प्रामाणिकपणा, सहानुभूती, परदु:खात सहभागी होण्याची क्षमता—हेच खरे सौंदर्य. करुणा, रुजुता, कोमलता, त्याग, परोपकार या सद्गुणांत लपलेली दिव्यता कोणत्याही चित्रापेक्षा श्रेष्ठ.

 

✦ *सौंदर्य आणि अध्यात्म*

सौंदर्याचा सर्वोच्च अनुभव हा अध्यात्मिक आहे!

जेव्हा मन द्वैत-अद्वैताच्या सीमेपलीकडे जाऊन एकत्व अनुभवते, तेव्हा सौंदर्याचे गूढ स्वरूप उलगडते. भारतीय परंपरेत ब्रह्म हेच “सत्य-शिव-सुंदर” मानले आहे; म्हणूनच सौंदर्याचा शोध हा देवत्वाच्या शोधाशीच जोडलेला असतो.

 

✦ *सौंदर्याचे सार्वत्रिक अस्तित्व*

सौंदर्य अथांग आहे.

ते दगडातही असते आणि फुलातही, सागराच्या लाटात, मेघांच्या गडगडाटातही आणि श्रावणाच्या झडीतही. कधी हसण्यात उमलते, तर कधी अश्रूतून ओघळते. मातेला आपल्या बाळात दिसणारे सौंदर्य आणि वैज्ञानिकाला प्रयोगात जाणवणारे सौंदर्य—दोन्ही एकाच भावविश्वाचे रूप.

सौंदर्याला सीमा नाहीत; ते अखंड वाहणाऱ्या अस्तित्वाची दिव्य संगती आहे.

 

✦ *उपसंहार*

सौंदर्य ना केवळ डोळ्यांनी दिसते, ना केवळ बुद्धीने समजते—ते हृदयात स्पंदते. त्याचा अनुभव म्हणजे एक शुद्ध, नाजूक, परम आनंदाचा क्षण. सौंदर्य हे सत्याचे, शिवाचे, आणि जीवनाच्या मौलिकतेचे रूप आहे.

आपल्याकडे पाहण्याची दृष्टी असेल, तर जगातील प्रत्येक क्षणात, प्रत्येक श्वासात, प्रत्येक कणात सौंदर्य उमलत राहते.

कारण सौंदर्य म्हणजेच ईश्वराचे स्वरूप—

कणाकणात वास करणारे, ब्रह्मांड व्यापूनही अंगुष्ठमात्र उरलेले, अनंत असणारे—

सत्यं, शिवं, सुंदरम्!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares