प्रा. भरत खैरकर
मनमंजुषेतून
☆ “वाट…” ☆ प्रा. भरत खैरकर ☆
मुख्य रस्ता सोडून आपल्याच धुंदित एकटी एकटी भटकत चालल्यागत वाटणारी ती वाट आठवली की आपण जणू याच रस्त्यानं नेहमी जात येत राहावं असं वाटायचं. मामाच्या गावाच्या त्या वाटेचं मला
बालपणापासून विलक्षण वेड. मी आत्ताही जेव्हा केव्हा मामाच्या गावी जातो ना तर मुख्य रस्ता सोडून ह्या वाटेकडे वळलोच म्हणून समजायचं. या रस्त्यानं कोण जादू केली कोणास ठाऊक?
रस्ता सोडला रे सोडला की लगेच येणारा ओहळ… त्याचं झुळझुळ वाहणारं पाणी… त्या स्वच्छ नितळ पाण्याखालच्या गारगोट्या… बारीक रेती…. मोठ्या दगडांवर जमा झालेली हिरवीगार लव्हाळी. साऱ्यांना एकवार नव्हे, पुन्हा पुन्हा बघितल्याशिवाय पुढे न जाण्याचा जणू माझा नियम. गोट्यांवरून तोल सांभाळत अगदी जोडा न भिजविता पलिकडे जाण्याइतकं पाणी असूनही मला मात्र पाय भिजविल्याशिवाय बरं वाटत
नाही! मामा सांगायचा, ‘जेव्हा आम्ही तुमच्या एवढाले होतो, तवा येथे लाल्या माहाराचं राज्य होतं. येणाऱ्या जाणाऱ्याले तो ह्याच नाल्यामंदी मुद्देमालासकट लुटत होता. पण जीव मात्र कोणाचा घेत नव्हता.
“लहानपणी पोटासाठी लाल्या म्हार लुटालूट करतो असे वाटायचे. “तो चांगला हाय कारण कोणास्नी जीवान मारत नाय”. असं मामाचं ऐकलं की लाल्या म्हारास्नी पाची लयी विच्छा व्हायाची, पण लाल्या म्हाराची भीती आता मुळीच वाटेना ही हुरहुरही पिच्छा सोडीत नाही. उगीच मोठेपणातलं अपराधीपण जाणवतं.
नाल्याशी जुळलेल्या अशा अनके कथा आहेत. पाहणारा माणूस एवढ्याशा नाल्यानं कधीकाळी ह्या बोरीचा सत्यानाश केला होता ह्यावर विश्वास कसा ठेवणार? अख्खं बोरी वाहून नेणाऱ्या ह्याच नाल्यावर सालभर बोरीवाल्यांचा पाण्याचा बिकट प्रश्न सोडविला जातो. रस्त्यावरचं घुटनाभर पाणी अख्ख साल पुरून उरतं! म्हणूनच की काय बोरीवाल्यांच्या ठायी ह्या नाल्याचं महत्त्व “कपीलागाई” च आहे. असा नाला ‘पायाखालून सोडता सोडवत नाही. पायात मोजे घातल्याप्रमाणे गुडघ्याच्या थोडसं खाली म्हणजे पोटऱ्यापर्यंत ओले झालेले पाय सुकेस्तोवर हातात जोडे घेऊन पुढे चालायचं. बरोबर हे ओले पाय टावर लाईनची ती लांबच लांब लाईन आडवी जाते त्या तिथवर सुकतातच. तिथं मग भल्या मोठ्या काळ्या शिळेवर बसून कुणीतरी
त्यावर कधीकाळी कोरलेलं “शाम विमल” वाचायचं नि मोजे उतरवून खरे मोजे चढवायचे. त्यामागून जोडे धरून वरून आलेला हात झटकून टाकायचा. तोवर तरतरी आलेली. कोणी बाईमाणूस आपल्या वयाचं जेव्हा इथून आपल्यासंग असतं तेव्हा उगीचच ती विमल असावी असं वाटतं अन् आपण शाम.. उगीचच.!! “’शाम विमल” कोरण्या मागची पुरी कल्पना काय हे माहित नसूनही ते प्रेमिकांच जुळलेपण असावं असंच वाटतं. त्या शिळेमार्फत सत्य ते काय जाणून घेण्याची इच्छा होते. पण दगडच तो!! तो काय बोलणार? एखादा हिंदी चित्रपट आठवून जातो पुनर्जन्माच्या कथानकाचा. कदाचीत ह्या शिळेखाली शाम-विमल दोघेही गाडले देखील… हा विचार मनी आला न आला तोच अंगावर शहारे येतात. भीतीपोटी रेंगाळलेले पाय झपाझप चालू लागतात. सोबत असली तर गती किंचित कमी. मात्र इथून गती वाढते. आपल्याला
लवकर पोहचायचं हा दबलेला विचार उसळी मारून पायात येतो नि गतीत परावर्तित होतो.
आपण नुसतं चालायच यंत्रवत. मागून कुणी अद्भूत शक्ती ढकलत असल्यासारखं एखाद किलोमीटर पावेतोचा तो चढाव न थकता आपण पूर्ण करणार. न्युटनची गुरूत्वाकर्षण शक्ती ह्या ठिकाणी आपल्याला वर वर नेणारी.! चढावांवर असलेली नर्सरी त्यातील ते गेस्ट हाऊस अगदी ऑस्ट्रेलियन पद्धतीच्या घरांची
आठवण करून देणारं. आपले पाय नर्सरीकडे वळतात. बऱ्याच जणांना नर्सरीतल्या झाडांची ठेवण चांगल्या नावाजलेल्या बगीच्यांना लाजविणारी आहे ह्याची माहिती नाही. नर्सरीतला परसराम मामाच्याच गावचा. पहिल्या पहिली तो मामाकडे माझ्या लहानपणी शेती करायचा. आम्ही सगळे त्याला परशागडी म्हणायचो. लहानपणी तोतरा असलेल्या माझ्या तोंडून “परसाकडे” असं व्हायचं आणि सारे हसायचे. असं खुद्द परसराम सांगतो. परसराम आता मला “सायेब” म्हणतो. पण मला आवडत नाही. त्याचं “बाबा’ म्हणणंच मला लहानपणासारखं आताही आवडतं.
पण तो म्हणत नाही. सोबत माझी बायको असतांना त्यानं “बाबा” म्हणावं हे मला आवडतं पण तिला नाही! बायको सोबत नसली की परसरामकडून मनसोक्त “बाबा… बाबा… “ म्हणवून घ्यायचं. बालपणात लोळायचं. परसराम मंग चोरीचा आरोप लावून मामीनं मला कामावरुन कसं कमी केलं. हे रडू रडू सांगायचा. खूपच हळवा माणूस. तो इथे फुलाफळात नोकरी करतोय हे इथल्या झाडांचं भाग्य आहे. तेव्हाच तर त्यानं एका चांगल्या बगीच्याचं रूप ह्या नर्सरीला दिलं. परसरामनं जोपासलेली फुलझाडं मला माझी भावंड वाटतात. कारण दोघांनाही जपणारा परसरामचं!! ह्या फुलावरुन त्या फुलांवर हात फिरवीत अख्खी नर्सरी हिंडायची. नवीन आलेल्या कलमांची, झाडांची माहिती परसराम न मागताच द्यायचा. बालपणी प्रश्न विचारून भंडावून सोडणारा मी उगीचच आपल्याला हे सगळं ठाऊक असल्याचा आव मिरवितो नि पुन्हा शांत झालेल्या माझ्या स्वभावाला प्रश्नांच्या सरबत्तीची आठवण होऊन परसराम थकेस्तोवरच त्याच्यावर प्रश्नांचा मारा करतो.
मागे आलो तेव्हा मी परसरामला चित्तमपलीचं “पक्षी जाय दिगंतरा” दिलं होतं. तो ते सगळं वाचल्याच
सांगतो. काही चुका आहेत कां परसराम? म्हटल्यावर उगीचच लाजतो. परसरामला वाचनाचा भारी नाद. त्यासाठी तो येणाऱ्या जाणाऱ्या सायबांकडून दुसरी तिसरी काही भेट न घेता “मला फक्त तुमच्या आवडीचं
पुस्तक पुढल्या भेटीत जरूर आणा. ” हे सांगणार. पुस्तक आणि फुलझाडं हेच जणू आता परसरामचं जग! नर्सरीतली फळं थैली आन् गुलाब बाईसायबांसाठी देणारं. परसरामची ही भेट मायेच्या ओलाव्याने भिजलेली.. ओहळाच्या पाण्यासारखी नितळ स्वच्छ… नि त्या शिलेवरच्या ‘शामविमल’ सारखी चिरकाल स्मरणात राहणारी असणार. मग इच्छा नसूनही दुनियादारीत फसलेल्या आपणांस परसराम ला निरोप
द्यावा लागतो. अंगात नवचैतन्य, जगण्याची उमेद भरणारा परसराम नर्सरीच्या गेटवर आपण नजरेआड होईस्तोवर उजवा हात उंचावून निरोप देतच असतो. नर्सरीपासून मामाचा गाव तसा दूर नसतोच. पण आपलं माणूस आपण मागे सोडून पुढे चालल्याची जाणीव गाव खूप दूर असल्याचा भास मनी भरवितो.
गावाकडे जाता जाता रस्त्यातच पडणारं मामाच वावर टाच उंच करून बघावं, कुणी शेतात असलं तर तिकडे पाय वळवावे, शेतातील विहीर, ट्रॅक्टर, थ्रेसर, आऊट हाऊस.. आदी.. आदी सारं प्रतिष्ठितपणाची
जाणीव देणारी मामाची सुखसाधनं न्याहाळावीत. लांबलांब पसरलेलं मामाचं हिरवगार शेत अख्ख्या शिवाराचं भूषण. मामा शेतात असला तर मग संध्याकाळ होईस्तोवर पाहुणे सगळे शेतातच. गडी मात्र गावाकडे निघालेला. वाड्यात निरोप देण्यासाठी “पाहुणचार करायचा नाप्पुरवाल्या पावण्यांसाठी, म्हणून आणि ती वाट त्याला घेऊन जाणारी मामाच्या घरापर्यंत… तिथून पुढे जाणं तिला ठाऊकच नाय.
मामाच्या संगतीत संध्याकाळी गप्पागोष्टीत मस्त पाहुणचार फस्त करायचा नि पुन्हा परत त्याच वाटेनं दुसऱ्या दिवशी… मामाचं शेत… नर्सरी… परसराम… शिळा… शामविमल… टॉवर लाईन… ओहळ…
आणि मुख्य रस्ता आणि आपलं नाप्पुर!!
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
















