मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ गावलं का ताक ?… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? प्रतिमेच्या पलिकडले ?

गावलं का ताक ?… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

😃

बामणिन् ग्येली खय् व्हती उनाची?

अगो बायो जाणार कुठे! लुगड्याला आखोटा लागून फाटलं होतं वीतभर. शेजारच्या वच्छिनं दिलेन् टांके घालून्. मला आता दिसत नाय गो नेढ्यात दोरा ओवायला.

व्हय् व्हय्. तां पन् खरां.

गो बाय् , तुज्याकडं  ताक गावल् काय गो लोटाभर?

आता कुठचं ताक उरायला! आणि बघितलंस्? मी दिसले रे दिसले, की मागामागीला सुरुवात!

तसां नाय् गो. आता पोरां येतिल नाय् सालंतून? तापून येतंत गो उनाची! त्यानला कोप कोप पिल्यावर वाइंच बरा वाटता. पन् ऱ्हावंदे. नको आता. बरां ता बरां. जाव मी आता घरी?

पाहीलंस्? ताक नसेल म्हटल्यावर चालली तशीच घरी! पोरांची काही काळजी आहे की नाही? चल माझ्याबरोबर. थोडं ताक शिल्लक असेलसं वाटतंय् दगडीत! असलं तर देते.

🌴

पूर्वीच्या काळी गांवा-खेडेगांवात बामणी-कुणबी बायका कुठे भेटल्या तर त्यांच्यात असे आपुलकीचे संवाद घडायचे. आपापल्या मराठीत. सहकार्य शब्दाचा केवळ जप न करता आचरण सहकाराचे होते.

🌴

😃

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ पाऊस केव्हाचा पडतो…☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ पाऊस केव्हाचा पडतो… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

पाऊस केव्हाचा पडतो… काळ्या ढगातून जलाचे घड्यावर घडे आज तो रिते करतो… वाऱ्यालाही त्यानं तंबी दिलीय खबरदार आज माझ्या वाट्याला आलास तर कोसळणाऱ्या सरींवर सरीच्या भिंतीना हादरवून गेलास तर…वारा मग पावसाच्या वाऱ्यालाही उभा राहण्यास धजला नाही.. दुतर्फा झाडांची दाट राईचीं अंगे अंगे भिजली जलधारानी.. ओंथबलेले पानं न पान नि सरी वर सरीच्या माऱ्याने झाडांची झुकली मान…इवलीशी तृणपाती, नाजुक कोमल लतावेली चिंब चिंब भिजून जाण्यानं काया त्यांची शहारली… हिंव भरल्या सारखे थरथर कापे पान न पान.. खळखळ पाण्याचा लोट धावे वाट फुटे तसे मनास भावे… जीर्ण शिर्ण पिवळी पानं, काटक्या,काड्या, कागदाचा कपटा, सारं सारं  मिळालेल्या प्रवाहात जाई पुढे पुढे ते वाहात.. सरली तुमची सद्दी उचला तुमची जुनीपुराणी रद्दी. आता नव्हाळीची असे गादी…स्वच्छ झाले शहर नगर, स्वच्छ झाले भवताल… चकचकीत झाले रस्ते… दर्पणाला देखिल त्यात स्वताला निरखून पाहावेसे वाटले…घन अंधार दाटला भवताल त्यात बुडाला.. रस्तावरचे पथदिवे आपल्या मिणमिणत्या प्रकाशाने रस्ता रस्ता उजळून टाकला… निराशेच्या वाटेवर असतो आशेचाही एक किरण आणि तो शोधून सापडण्यास करावी खारीची मदत असा होता  त्यांचा एक मनसुबा…दारं खिडक्या कडेकोट झाली बंद माणसा माणसांनी कोंडूनी जोडूनी घेतला घरोबा…  स्थानबद्ध झाले सगळेच जीवबध्द…चिटपाखरू  न धजे विहराया  बसे घरटयात आपुल्या पिलांच्या कोंडाळ्यात… दाणा गोटा कुठे मिळावा  त्यांना अश्या प्रलयंकारी पावसात…हतबल झाले सारे एका निर्सागा समोरी… पुरे पुरे बा पावसा कोसळणे तुझे हे.. शरणागत आलो तव पायी कळून आली आमची माजोरी…खाऊ देशील का कोरडी सुखी भाकरी… नको नको असा उतु मातू नको दावू ओला दुष्काळ तो… प्रसन्न तू सदा असावे म्हणून आरती तुझी आम्ही नित्य गातो…

गडगडाटी हास्य पावसानं केलं कडकडाटासह कोरडा चपलाने तो ओढला… नि पाऊस हळूहळू कमी होत गेला… पाऊस  शांत शांत झाला..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ किनारा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ किनारा☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

आनंदाचे बेट शोधता शोधता

सगाराची गाज अंतरात उतरली की,

मनातल्या लाटा बोलू लागतात.

अथांगतेच्या खोलीत खूप काही असतं

 साठवून, दडवून ठेवलेलं

लाटेनं किनाऱ्याकडे कैकदा फेकलं तरी..

परतीच्या प्रवासात आपसूक आत सामावतं.

त्यात भरती ओहोटीची कथा औरच !

आतला समुद्र कितीही आपला तरी

तृष्णा शमवण्यास असमर्थ ठरतो.

आभाळ संभ्रमून जातं.

मन कोसळतं, तुडूंब साठलं की,

मनात पाऊस कोसळू लागतो.

पालापाचोळा थिजतो.

असह्यतेने नयनातून पाझरतो.

काळ्याकुट्ट ढगांना मोकळ करु पाहतो

मग रोजच मनात पाऊस पडू लागतो.

खिडकीतून बाहेर ओलाचिंब होतो

कितीही उंच जा पाऊस बरसत राहतो.

आधे-मधे रात्री-अपरात्री

अगदी कधीही कोणत्याही वयात

वयाच भान हरपून पाऊस पडतच राहतो.

क्वचित खिदळतो, थुईथुई नाचतो

मोहरुन जातो विस्मयकारी वाटतो

ऊन-सावलीत पाऊस पडतच राहतो.

आत कोसळणारा पाऊस अमाप सोबत केला तरी

तहानेने कधी कधी आपण व्याकूळच राहतो.

किनाऱ्यावर, रेतीत, समुद्रात नदीत…

कुठे कुठे आणि किती किती सांगायचं..!

तो बरसतच राहतो.

समुद्र, पाऊस दोघेही आपल्यात सामावलेले

ना समुद्राच्या आधीन ना

पावसाच्या स्वाधीन होता येते

मनाच्या सागरात पाऊस बरसत राहतो.

कधी बोलका, तर कधी अबोल पावसा सोबत,

आतल्या समुद्राशी बोलत बोलत..,

किनाऱ्यावर आपण स्वतःला शोधत राहतो..!

निगुतीनं चालत राहतो अविरत..!! 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ जाऊ नको दूर तू… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ जाऊ नको दूर तू… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… सखे थोडं अजून थांबयचं होतसं…

..पावसाची सर ओसरल्यावर निघायचं होतसं…

..वेडे आतातर आलीस मला भेटायला…

..चल निघते बघ फारच उशीर झाला..

..असं लागलीच का म्हणायला…

..अजूनही नेहमीचा काळोख कुठयं पसरायला…

..खट्याळ पावसाचे काळ्या ढगांनी खोड्या काढल्या..

..अंधाराची शाल पांघरून बसलाय…

..तुझं नेहमी असचं असतं यायचं उशीरानं…

..नि जायचं मात्र लवकरच असतं…

 ..आज त्या पावसाचं कारणाची केलीस ना ढाल…

..तू किती कठोर आहेस..

..कशी कळावी तुला माझ्या हृदयाची उलाघाल…

..चल निघते उदयाला भेटू असं म्हणून …

..छत्री उघडून भर पावसातून निघालीस…

..दूर दूर जाताना तुझी लांब लांब सावली…

..मात्र मला वाकुल्या दावत गेली…

..पावसाचे ते तुझ्या छत्रीवर पडणाऱ्या टपोऱ्या …

..सरींनी डोळेमिचकावून हसण्यावारी माझी  चेष्टा केली… .

..भेटीच्या आठवणीनें रस्ता ओलाचिंब झाला..

…मनात माझ्या भावनांचा पूर दाटून आला…

..भेटीची अतृप्तता वाढवून गेला…

..खटटू मनाचा हटट तू ऐकायला हवी होतीस… ..

.. सखे थोडं अजून थांबयचं ना होतसं…

..पावसाची सर ओसरल्यावर निघायचं होतसं…

..वेडे आताच तर आलीस मला भेटायला…

..चल निघते बघ फारच उशीर झाला…

..असं लागलीसच का म्हणायला…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ मृगतृष्णा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ मृगतृष्णा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

 “अरं  ढवळ्या लेका! का असं गठुळ्यागत अंग मुडपूनशान खाली बसलास? मळ्याकडं जोताला जायचं नव्हं का आपुल्याला? धाकलं मालक आता वाड्यातून दहीभाकरचा तुकडा खाऊन बाहीर येतील कि मर्दा! आनी तु असा बसलेला बघितल्यावर खवळायचं न्हाई व्हयं?… आरं ह्यो आळस सोड नि गपगुमान उभा राहा बघू!.. “

“… पवळ्या दादा, म्या आता जो हथं बसलोय ना त्ये काय लवकर उठायचं नावं घेनार नायं… आवं दादा आता कालच दिव्याची आवस उलाटली.. अन सारवण सुरू झाला तरी पाउसाचा टिपुस काय गळाया तयार न्हाई… पार उन्हाळ्यातल्यावानी उनाचा कडाका तसाच पडतोय कि… आजवर चार बाऱ्या झाल्या नांगरटणीला खेटं घालून.. वळीवानं तोंड वळविलं, म्रिगानं तर तोंड दावलचं न्हाई, ती मधली दोनी बी लबाड नक्षत्रं पाठ दाखवूनच गायब… आरं जित्राबं सुध्दा बिळं सोडून गेली तत मानसांची नि  आपली काय गत झालीया, तुला कायं येगळं सांगाय हवं काय? ढेकळांचा चोक शोष पडल्यावानी उताणी पडलेली रानं… हिरीचं, ओढयाचं खरवडून निघालेलं  पानं.. रोज मैल मैल धुरळा उडवीत जाऊन एक कळशीभर पाणीची उसाभर करून आपला तर जीव पार धायकुतीला आला बघं… दादा आता अवसान गळाठयला बघं… चार पावलं उचलून टाकाया न्हाई जमायचं… ते धाकलं मालक येऊ देत न्हाई तर मोठ्ठं… मला  इथचं पडून राहावंसं वाटतया… दादा आता माझा राम राम करायची येळ झाली बघा… तुम्ही वाईट वाटूनशान घेऊ नका… तुमचा  आमचा संबंध इथवर छान जुळला… मला तुमी लै सांभाळून घेतलसा…. आता दादा तुम्ही सोताला सांभाळा… म्या जरा आता निवांत पडून राहतो… मालकानां माझा राम राम सांगा.. “

” अरं ढवळ्या, असं काय येड्यावानी बरळतूया! आरं ते बघं काळं निबारं ढग दाटून आल्याती… पावसाची झड येऊ लागली… गार वारं सुटलं लेका.. आला आला बघ पाऊस सुरू झाला कि येड्या! आरं उठं चटदिशी उभा राहा… पावसाच्ं पाणी पिऊन घे बघं कशी तरतरी येती ते… उठं कि रे गब्रु… अरं उठं.. उठं.. “

ढगांच्या गडगडाटात, विजेच्या लखलखाटात पावसाच्या रूपेरी धारा बरसू लागल्या… संजीवनी घेऊन आलेला पाऊस मात्र ढवळयाची तहान भागवू शकला नाही…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ आयुष्याचं झाडं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ आयुष्याचं झाडं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

या आयुष्याच्या झाडाला बालपणीची पहिली डहाळी सर्वात उंच उंच असते .माय पित्याच्या मायेच्या ढोलीत सख्या सोबत्यांच्या संगतीत किलबिल किलबिल गुजगोष्टीने, प्रत्येकाला रंगीबेरंगी फुलाप्रमाणे स्वप्नं पाहात, पंखातले बळ अजमावत गगनाला गवसणी घालण्याची इच्छा मनात येते. वेळ येते तेव्हा काहींचे मनसुबे पूर्ण होतात तर काहींचे मृगजळाचे रूप घेऊन हुलकावणी देत राहतात.. देव भेटत नाही आणि आशा सुटत नाही याचा प्रत्यय ठायी ठायी येतो. दमछाक होते. नाद सोडून दिला जातो.. आता एकटेपणाचा उबग येतो नि जीवन साथीची गरज भासते.. शांत, सरळ, एकमार्गी धोपट जीवन जगावेसे वाटणे स्वाभाविक असते.. ती आयुष्यातली गोड गुलाबी सल्लज कुजबूज, हितगुज आपल्या प्रियतमांच्या कानात सांगाविशी वाटते. मानवी जीवनातला हा सर्वात सुंदर सुवर्णकाळ असतो.. स्वप्नांच्या पूर्ततेचा हा टप्पा असतो..या संसाराच्या फांद्यावर आता आपलचं स्वतंत्र घरटं असतं.. आणि बालपणीचे सखेसोबतीत अंतर दुरावलेलं असतं.. इथं संबंध झाड हिरवेगार तजेलदार, पानाफुलाने नि फळांनी बहरून आलेलं असतं. मग हळूहळू तो बहर ओसरू लागतो, पानं पिवळी पडत जीर्ण शीर्ण होऊन गळू पाहतात, फुलं कोमेजू लागतात, फळ झाडापासून तुटून खाली पडू पाहतात… ही वार्धक्याची डहाळी झाडाच्या बुंध्याला येऊन टेकलेली असते.. बरेच उन्हाळे पावसाळे झेलून झालेले असल्याने आता कशाचीच असोशी उरलेली नसते.. अगदी जीवन साथीची जवळिकतेची सुद्धा.. केवळ अस्तित्वाने जवळ असणं पुरेसे वाटतं. संवादाला नाहीतरी विवादाला तरी सोबत असावी असचं वाटू लागतं ,मनाप्रमाणे शारिरीक अंतर पडू पाहतं..मावळतीचे काळे करडे राखाडी रंग तनामनावर उमटले जातात.. बालपणीचा किलबिलाट, तरूपणीची गुंजन हवेत कधीच विरून गेलेली असते, आणि आता वृद्धपणी ची कलकल हुंकारत असते.. गुणापेक्षा अवगुणाची एकमेंकाची उजळणी करत करत, एक दिवस विलयाचा येतो नि जगलेल्या जीवनातील आठवणींचा सुंगध मागे दरवळत राहतो.. अशी पाखरे येती नि स्मृती ठेवूनी जाती हेच खरे असते नव्हे काय? 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रतिमेच्या पलिकडले : तू छूपी है कहाँ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ प्रतिमेच्या पलिकडले : तू छूपी है कहाँ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

.. आजच्या विज्ञानाच्या चमत्काराने जग इतके जवळ आलयं.. टाचणी पॅरीसला आयफेल टाॅवर वरून खाली पडली तर त्याचा आवाज इथं लालबाग परळ च्या तेजुकाया मॅन्शन च्या अकरा नंबरच्या खोलीत असलेल्या टि. व्ही. त ऐकू येतो.. आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच हे असे कसे काय बुवा?.. अहो त्याचं काय आहे दिवसरात्र त्या अकरा नंबरच्या खोलीतला तो टि. व्ही चालूच असतो.. चौविस तास ढॅंण ढॅंण ढॅंण…तरूणाई करियर घडवायला आपल्या स्वप्नांची पूर्तता करायला जेष्ठांचा आर्शिवाद घेऊन घर सोडून गेलेली असते.. त्यांचीच छोट्या छोट्या प्रतिमा युवावस्थेत करिअर कोणतं नि कसं घडवावे याचा शोध घेण्यासाठी दिवसाचे चोविस तासापेक्षा जास्त वेळ घराबाहेरच असते, केअर टेकर जेष्ठांना लोणकढी थापा वर थापा मारून.. मग घरात जागं राहते त्या जेष्ठांची एकल तर कधी असलीच तर दुकल..कर्तव्याची इतिकर्तव्यता झालेली असते.. भविष्याकडे धुसर नजरेने पाहत भूतकाळातील कडू गोड आठवणींचा रिटेलिकास्ट मनाच्या पडद्यावर बघत बसणे हाच एकमेव उदयोग वर्तमानकाळात करत बसतात.. ना बोलायला कुणी घरी ,ना चालायला कुणी दारी.. अवतीभवतीची समवयस्क बऱ्यापैकी विकेट टाकून गेलेली .नाही तर गावाला पळालेली, एखादं दुसरे असलं तरी आजारालाच दत्तक घेऊन एक कॉट अडवून बसलेली.. मग अश्या परिस्थितीत हातपाय हलते नि तोंड व्यवस्थित चालते, थोडक्यात सर्व ठिकठाक, असणारे या जेष्ठांना घरात वाली कोण असणार.?.तरुणाईच्या पैश्याच्या पावसाने घराचे नंदनवन फुलते .. सगळ्या बाजारातल्या आधुनिक उपकरणांनी जागा जागा व्यापून गेलेली असते..घंटो का काम चुटकीमें . कामाचा डोंगर निपटणारे. पण तेच त्या तरुणाईच्या मनाच्या कोपऱ्यात एक इंचभर जागा त्यांना मिळू नये..साधी प्रेमाने केलेली विचारपूस किती मनाला आधार देऊन जाते… मनाला हवी असलेली प्रेमाची ऊब,नि आपुलकीची भुक मात्र हे नंदनवन भागवू शकत नाही..असंख्य चॅनेल्स ने खचाखच भरलेला तो टि. व्ही. आणि त्या सारखी उपकरणं, रंगीबेरंगी विविध शंख शिंपल्यासारखे ,समुद्ररूपी कार्यक्रमांच्या लाटावर लाटा आदळत असतात.. तो अखंड बडबडत नि दाखवत सुटतो.. पण कान बहिरे असल्याने ऐकून मात्र घेत नाही.. आणि जेष्ठांना तो जे जे दाखवेल ,ऐकवेल ते ते बघण्या शिवाय पर्याय नाही..त्या समोर बसून चार उलटे नि सहा सुलटे टाके घालून वुलनचा स्वेटर विणायला घेतला तर तो कधी पुरा होणार नसतो..कारण त्याच्या उबेचीच गरज नसतेच मुळी पण वेळ घालवायचा तो एक चाळा असतो त्यांचा..रिमोट हाती असून चालत नाही ना.. टि. व्ही. काही काळ बंद झाला तर.. अख्खी चाळ गोळा होईल ना !अरे अकरा नंबरचा आवाज बंद झाला!.. म्हणजे काही तरी गडबड झाली आहे..त्याने होणारी सतत दाराची उघडझाप आणि त्यांच्या प्रश्नांला उत्तरे देण्याची दमछाक.. इतकचं काय आपली म्हणणारी नातीगोती आपल्यालावरच रागवणार, का देताय आम्हाला उगीच मनस्ताप?. आहे कुठे सगळ्याला दयायला उत्तर आपल्याकडे!.. नाही नाही आता उत्तरचं नसतात त्यांच्या कडे.. असतो फक्त एकच प्रश्न सतत मनात घोळत.. अरे देवा! मला तू येथून कधी…. ? तू छूपी है कहाॅ म्हणत… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रतिमेच्या पलिकडले : कण कण वेचिताना… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ प्रतिमेच्या पलिकडले : कण कण वेचिताना… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… असं म्हणतात की जो इथं जन्माला आला त्याच्या अन्नाची सोय झालेली असतेच. अर्थात चोच आहे तिथे चाराही असतो.. फक्त ज्याला त्याला तो शोधावा लागतो.. त्यासाठी त्याला जन्मताच मिळालेले हातपाय योग्य वेळ येताच हलवावे लागतात.. असेल माझा हरी देई खाटल्यावरी असे भाग्यवंत खूप विरळे असतात.. अदरवाईज जिथे जिथे दाणा पाणी असेल तिथवर यातायात हि करावीच लागते.. बरं पोटाची व्याप्ती पण एकच एक दिवसाची असते.. होय नाही तर ते एकदा ओतप्रोत.. नव्हे नव्हे तट्ट ( फुटेपर्यंत) भरले एकदा आता पुढे चिंता मिटली असं का होतं. तुमचा आमचा अनुभव असा तर अजिबात नाही ना हे सर्व मान्य अक्षय सत्य आहे. दुसरं त्यात पहाना आपलं एकटयाचंच उदरभरणाची गोष्ट असती तर एकवेळ थोडा पोटाला चिमटा घेऊन रोजची हि दगदग न करता एक दोन दिवसाच्या फरकाने चाऱ्याचा शोधात हिंडता आले असते. पण तसं नशिबात नसतं. आपल्या बरोबर आपलीच रक्तामासाची, आपुलकीच्या वीणेने बांधलेली नाती यांची जबाबदारी …घरटयातला कर्त्याला कर्तव्य चुकत नसतं.. अन मग रोज मिळालेला चारा सर्वांना पुरणारा नसेल तर स्वताच्या पोटाला चिमटा घ्यावा लागतो तो खऱ्या अर्थाने. तैल बुद्धीच्या माणसांसारखा हा अन्नाचा साठा करून ठेवण्याची क्षमता आमच्या  पक्ष्यांच्या घरटयात नाही.. त्यामुळे फार काळ साठवलेले अन्नधान्य नाहक नाशवंत होण्याचा धोकाही होत नाही…उन्हाळ्या असो वा पावसाळा, वा हिवाळयाचा कडाका , दाण्याच्या शोधात गावात करावा लागतोच फेरफटका… हि आम्हाला पक्ष्यांना नैसर्गिक शिकवण दिलीयं.. गरजेपुरते आजचे घ्या आणि इतर भुकेलेल्यांना शिल्लक ठेवा निस्वार्थ बुद्धीने.. त्यामुळे कधीही कमतरता पडलीच नाही, भुकबळी झालाच नाही, ना चाऱ्यासाठी आपापसांत भांडण तंटे, चोऱ्यामाऱ्या झाल्या नाहीत.. जे आम्हाला माणसांच्या जगात नेहमी दिसत आलयं.. जे मिळालयं त्यात तृप्तता आमच्या अंगाखांद्यावर दिसून येते..निसर्गत: सामाजिक बांधिलकीची समज असते ती आपल्या सर्वप्राणीमात्रात फक्त आम्हाला उमजलीय .. नि तुम्हा मानवांना स्वार्थाचा तण जो असतो तो मात्र उमजून घेण्याची तसदी घेत नाही… ती लवकरच उमजून यावी हि त्या जगनियंत्याला प्रार्थना..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रतिमेच्या पलिकडले : गजरा लगा के…गजरा सजा के… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ प्रतिमेच्या पलिकडले : गजरा लगा के…गजरा सजा के… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

 गजऱ्यातल्या कळयानां तू जरा समजावून सांग बरं… इतकं  दुसऱ्याला  वेडावून दाखवणं हे शोभत नाही खरं… अंबाडयाच्या   कुंतलातील  छचोर बटा सुगंधाने किती  धुंदल्या… वाऱ्याच्या झुळूकेवर  डोल डोल डोलू लागल्या…कळी कळीच्या गजऱ्याच्या भाराने अंबाडाही मानेवर झुकला..हलकासा घामही चमचमता फुटला… तिच्या हाताच्या पाच नाजूक बोटांना लागला तो चाळा… सैल झाला का अंबाडा चाचपून पाहती कैक वेळा…मऊ मुलायम बोटांच्या स्पर्शानीं कळया कळया मोहरुन गेल्या…लाजुनी घेतले आक्रसून सर्वांगाला…शिंपडलेल्या अत्तरागत सुंगध तो  चोहीकडे दरवळला….काळया केसांच्या अंबरी शुभ्र मोगऱ्याचा गजरा तो विसावला… वेढयावर वेढे फिरले चक्राकार कुंतलाच्या वेटोळी.. जसा धुंद होउनी अहि लपे केवड्याच्या बनी…आसमंती घुमला घमघमाट तो मोगऱ्यांचा…उत्फुल्ल झाली मनं, गंधीत नासिक  शोध घेती रमणीचा… फुला फुलावर भ्रभर जसे भिरभिरती,अनुरागाचे पाय रमणी भोवती घोटाळती…उठे एकच कळ प्रत्येक हृदयात…कळी कळीचा शुल असुयेचा उमटे  त्या मनात..अहाहा  अहाहा.. काय भाग्यते मोगऱ्याच्या कळीचे… मलाही त्यातील एक कळी होता आले असते तर…भाग्यवंत मी स्वतःलाच समजले का नसते…मग कधीतरी ती मुलायम बोटं मजवरूनीही फिरली असती…अंगा अंगावर प्रीत  सरसरून गेली असती…आभासाचा  भास मनाचा मनात शमला… तिच्या सैल झालेल्या अंबाडयावरुन गजरा तो अलगद ओघळला… कळी कळी ती सुटू लागली… अन पायतळीची भुमी आता सुगंधी झाली…अन मी जर कळी त्यातली असतो…तर माझंही जीवन धन्य  नसते का पावलो असतो…..क्षणैक मोहाची ती मिठी दुरावली…फुलण्या आधी कळी कळी निमाली… कळी तशीच निमाली… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रतिमेच्या पलिकडले : आईस्फ्रूट… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ प्रतिमेच्या पलिकडले : आईस्फ्रूट… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“ ए आये घी ना त्यो आईसफ्रुटचा लाल लाल गोळा… मला पाहिजी म्हंजं पाहिजीच.. लै दात शिवशिवालया लागल्यात बघ…गाडी सुटायच्या आदुगर मपल्याला हानून दी.. ती बाकिची पोरास्नी त्याचं आई बा कसं घेऊन देत्यात बघं तिकडं.. ती पोरं माझ्याकडं बघून तोंड वाकडं करूनदावत खिदळतात बघं.. तुला न्हाई तुला न्हाई म्हनून चिडीवित्यात… आये  तू बापसा संग भांडान काढूनशान निघालीस माहेराला… मला अंगावरच्या फाटक्या बंडीवर तसच उचलून.. खाली चड्डी तरी हाय काय नाय ते बी तूझ्या ध्यानात नाही… तापलेल्या इंजिनावनी डोस्कं तुझं संतापलेलं.. उन्हानं कावलेली एस.टी. पकडली…तापलेली सीट,झळा मारणारा वारा जीवाची लाही लाही करत,फारफुर फारफुर करत उर धपापत वेगानं धावणारी ती एस. टी…आतल्या माणसांना बेजार करत रस्ता कापत निघालेली.. सोताच्या इचाराच्या गुंतवळयात आडकलेली .माझी बी खबर घेईनास तू.. बा पोरं भुकेज्याल़ं असलं.. तहान लागली असलं काय बी कळंना तूला… म्या सारखं आये आये म्हनून कवाधरनं मागं लागलूया परं.. तू गप. बैस किरं मुडद्द्या.. बापावानीच छळतूया मेला म्हनून माझयावरच ढाफरतीस… मी तुझ्याच पोटचा गोळा हायं नव्हं मगं मला दि की  त्यो गोळा …न्हाईतर हि खिडकीची दांडीच कडाकडा मोडून खातो बघ… मगं दात तुटलं तरं बेहत्तर…  नि बा ला माघारी बोलवायला  आल्यावर तुला लै रागवायला सांगतो का न्हाई बघ !..” . 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print