आमच्याकडे ती व्यक्ती जेवायला बसली होती. जेवणाच्या ताटाला नमस्कार करून त्यांनी चार पाच घास घेतले व सर्व पदार्थांना दाद दिली. अगदी कोशिंबिरीत दाण्याच्या कुटाबरोबर आणखी काय घातलंय वगैरेही विचारून घेतलं. मी मुद्दाम वेगळा गोड पदार्थ म्हणून श्रीखंड-बासुंदी ऐवजी मोदक केले होते. त्याचीही छान पावती दिली.
मला फार प्रसन्न वाटत होतं की पाहुणे आवडीने जेवताहेत. त्यांच्या बरोबर माझे सासरे व मुलीही जेवत होत्या.
सासरे, मी व पाहुणे त्यांचा हातखंडा विषय ‘गीतासार’, त्यावरची व्याख्यानं, प्रवास व इतर उपक्रम याबद्दल बोलत होतो. पण मुली मात्र शांतपणे जेवत होत्या.
मधेच पाहुण्यांनी मुलींशी बोलायचा प्रयत्न केला, पण त्या बोलायला बिचकताहेत, हे त्यांच्या लक्षात आलं. जेवण झाल्यावर पुन्हा काही तरी विचारल्यावर, माझ्या मुलीने सांगितलं की “काका, तुम्ही गीता या विषयावर बोलत होतात. त्यात मला काय कळणार, म्हणून मी मधे बोलले नाही. “
ह्यावर पाहुणे छान हसले व तिला म्हणाले, “अगं, गीता कळायला खूप सोप्पी आहे. तुला न कळायला काय झालं?
आत्ताचंच उदाहरण घेऊ या. तुझ्या आईने ‘आम्हाला, सासऱ्यांनी जेवायला बोलावलंय’ हे कळल्यावर, तत्परतेने आणि वेळेवर छान स्वयंपाक केला. हो ना बाळा?
हाच कर्मयोग!
आपल्या वाट्याला आलेलं काम आनंदाने व वेळच्या वेळी करणे!
माझ्या मुलीला हे इंटरेस्टिंग वाटलं. पाहुणे पुढे म्हणाले, “तुझ्या आईला स्वयंपाक कसा करावा हे शिकावं लागलं असेल. तिच्या आईकडून, मैत्रिणींकडून किंवा पुस्तकं वाचून तिनं हे ज्ञान मिळवलं. ते स्वतः प्रॅक्टिस करून वाढवलं व आज योग्य पद्धतीनं वापरलंय. खरं ना? “
मुलीला हे सगळं छान पटत होतं!
“नवनवीन गोष्टी योग्य गुरूंकडून शिकणं, त्याचा अभ्यास करणं, त्याचा प्रत्यक्षात उत्तम उपयोग करणं, हाच गीतेतला ज्ञानयोग आहे, बरं का बाळा! “
काकांचं बोलणं पटकन कळल्यामुळे मुलीला इंटरेस्ट घेऊन ऐकावंसं वाटत होतं. मीही थक्क झाले.
मग काका म्हणाले, “आता आणखी एक गंमत सांगतो. तुझ्या आईने किती सुंदर पद्धतीनं केलेले पदार्थ ताटात वाढले होते! प्रेमाने आग्रहाने स्वतः बाजूला उभी राहून ती वाढत होती, आग्रह करीत होती. होय ना बाळा? “
“हो, पण त्यात काय नवीन? “मोकळेपणाने कन्या विचारती झाली.
“अगं, यालाच म्हणायचं भक्तियोग!
समोर जर देण्यायोग्य कोणी असेल, तर आपल्याकडे जे असेल ते प्रेमाने, भावपूर्वक,
आनंदाने समोरच्याला द्यावे, हेच तर भक्तियोगात सांगितलंय. “
गीतेतील हे कळीचे मुद्दे एवढ्या सोप्या शब्दात, साध्या पद्धतीने सांगणारे हे पाहुणे होते,
विद्यावाचस्पती श्री. शंकर अभ्यंकर!
* * * *
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
शाळेत एके दिवशी शिक्षिकेने मुलांना सांगितलं, “आज आपण एका मुलाला नवीन बूट देणार आहोत. पण कोणाला द्यायचे हे ठरवणं माझ्यासाठी कठीण आहे. म्हणून आपण लॉटरी काढूया. ज्याचं नाव येईल त्याला हे बूट मिळतील. ”
सर्व मुलांनी आनंदाने आपल्या-आपल्या नावाचे छोटे कागद लिहून डब्यात टाकले.
शिक्षिकेने त्या कागदांचे तुकडे व्यवस्थित मिसळले आणि सगळ्या मुलांसमोर एक कागद उचलला.
कागद उघडताच त्यावर लिहिलं होतं, “अजय”.
सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या.
अजय हळूच उठला. त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले.
जुन्या, फाटलेल्या बुटांमुळे तो किती दिवस लाजिरवाणा होत होता, हे फक्त त्यालाच ठाऊक होतं.
वडिलांचं छत्र हरपलेलं, आई असहाय असायची … अशा परिस्थितीत नवीन बुटांचं हे बक्षीस त्याच्यासाठी सोन्यासारखं अमूल्य होतं.
त्या क्षणी वर्गात जणू सगळ्या मुलांच्याही डोळ्यात चमक दिसली.
पण शिक्षिकेला घरी गेल्यावर पतीसमोर ही गोष्ट सांगताना अश्रू थांबले नाहीत.
पतीने विचारलं – “अगं, आनंदाची गोष्ट आहे, मग रडतेस का?”
शिक्षिका हुंदके देत म्हणाल्या –
“मला अजयचे बूट पाहून नाही, तर बाकी मुलांच्या हृदयातलं ममत्व पाहून रडावंसं वाटतंय.
कारण जेव्हा मी डब्यातील उरलेले कागद उघडले…
त्यावर सगळीकडे फक्त एकच नाव होतं – अजय.
त्या लहानग्या मुलांनी अजयच्या चेहऱ्यावरचं दुःख, त्याची असहायता ओळखली आणि त्याच्या वाट्याला आनंद यावा म्हणून स्वतःचं नाव न लिहिता त्याचं नाव लिहिलं.
ती निरागस मुलं त्याच्या वेदना जाणून घेऊ शकली, पण मी त्याच्या डोळ्यांतील ती व्यथा ओळखू शकले नाही… याचं मला आयुष्यभर दुःख राहील! “
मित्रांनो, शिक्षणाची ताकद फक्त पुस्तकात किंवा वर्गात नसते,
ती मुलांच्या निर्मळ मनात आणि करुणेत दडलेली असते.
त्या निरागस मुलांनी जे शिकवलं, ते कदाचित कुठल्याही पाठ्यपुस्तकात सापडणार नाही –
खरा आनंद आपल्याला मिळालेल्या गोष्टींमध्ये नसतो, तर इतरांच्या चेहऱ्यावर आणलेल्या हास्यात असतो.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘एक बापाचे निवेदन…’ – लेखक: श्री. आनंद दिवाकर काचरे ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी
“आजपासून एकटी झोपणार म्हणते” तेंव्हा ती मोठी होते….
**
शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी आज रस्ता ओलांङताना दंड पकङून
“सांभाळून बाबा” असं म्हणते तेंव्हा ती मोठी होते…..
*
दोन केक आणि आईस्क्रिम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी आज
“बाबा एक घास हवा का? ”
विचारते तेंव्हा ती मोठी होते…..
*
जरासे लागलं की आपण मलम लावताना आजून जोराने रङणारी मुलगी आज “बाबा ङोकं दुखतय का? बाम लावू का? ” विचारते तेंव्हा ती मोठी होते……
*
चॉकलेटसाठी एक दोन रूपये हक्काने मागताना रडणारी मुलगी आज
“बाबा तुम्हाला पाहिजे तर माझ्या पिगी मधले पैसे घ्या” म्हणते तेंव्हा ती मोठी होते…….
*
मिकी माऊस आणि छोटा भीम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी आज “बाबा तुम्हाला बातम्या बघायच्या आहेत का? ” असं विचारते तेंव्हा ती मोठी होते…….
*
बाहेरगावी कामाला जाताना
‘बाबा जाऊ नको ना ssss’ म्हणत बॅग आत नेऊन लपवणारी मुलगी आज
“बाबा, तुमची बॅग भरू का, विचारते” तेंव्हा ती मोठी होते……
*
पटकन मोठी झालेली ती,
लग्न करून जाताना
“बाबा रङू नको” म्हणत स्वतः धाय मोकलुन रङते
तेंव्हा मात्र ती परत लहान होते…
तेंव्हा मात्र ती परत लहान होते…
**
शेवटच्या चार ओळीत सारे सामावले आहे. वेगळे अजून काय सांगू?
पण एक लक्षात ठेवा ग मुलींनो, तुम्ही म्हणजे बाबाच्या काळजाचा तुकडा असता. मुलावर प्रेम असेलही बाबांचे पण मुलीवर “जीव” असतो. म्हणूनच तुम्हीही त्याला जीवापाड जपा. त्याला तुमच्याकडून फार काही नको असतं. फक्त निखळ प्रेम हवं असतं. आणि त्या प्रेमापुढे जगातलं कोणतंही “सैराट” प्रेम हे फिकेच आहे. बाप होता म्हणून तर तुम्ही हे जग पाहू शकलात, या एका गोष्टीसाठी का होईना, त्या बाबाला तो कधी चुकलाच तर मन मोठे करून माफ करा.
लेखक : श्री आनंद दिवाकर काचरे
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈